पुस्तकपरिचय

श्रद्धांजली
लेखक : विजय हर्डीकर, प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, मूल्य : १७५
‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पुस्तकाचे लेखक म्हणून आपल्याला परिचित असलेल्या श्री. विनय हर्डीकरांचे श्रद्धांजली हे नवे पुस्तक. यात आपले जीवन श्रीमंत करणार्याल चौदा व्यक्तींच्या कर्तृत्वाचे आलेख आहेत असे ते म्हणतात. पण पुस्तक वाचून होताच वाचकाच्या मनावर ठसते ते पंधरा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व. कारण या चौदा जणांच्या कार्याची ओळख करून देत असताना अभावितपणे लेखकाचीही ओळख पक्की होत जाते. या पुस्तकातून हर्डीकर लेखक कमी आणि कार्यकर्ते जास्त असे दिसून येतात. लेखकाचे जीवन समृद्ध करणार्याय या महानुभावांची व्यक्तिवैशिष्ट्ये चितारताना त्यांनी जागोजागी स्वानुभवाचे अस्तर लावलेले आहे. त्यामुळे या चित्रांना उठाव तर आलाच, पण एक वेगळा खरेपणाही आला आहे. हे लिहिणे वस्तुनिष्ठ आत्मप्रत्ययाचे झाले आहे. इतरांबद्दल लिहिताना लेखक सहजपणे उकलत गेला आहे. हे उकलणे बुद्धया नसून उत्स्फूर्त आहे. प्रकृताला आनुषंगिक म्हणून जितके स्वाभाविक तितकेच कलात्मक झाले आहे. वाचकाला अनायासे चौदांवर एक पस्तुरी मिळाली आहे.
चौदा वर्ण्य व्यक्तींपैकी सत्यजित राय आणि नोबेल प्राईज विजेता जर्मन लेखक हाइरिश ब्योल यांना आपण कधी भेटलो नव्हतो, आणि लेख लिहितेवेळी ब्योलचं निधन झाले नव्हते. असा खुलासा लेखकाने प्रारंभीच केला आहे. तो श्रद्धांजली दिवंगतालाच उद्देशून असते असा मराठी मनाचा समज दूर करण्यासाठी असावा.
या श्रद्धांजलीत अग्रपूजेचा मान श्री. हरिशंकर पुरुषोत्तम पायगांवकर या आपल्या शिक्षकाला त्यांनी दिला आहे. ‘मी पाथु द्रोणाला केला’ असे पायगावकरांचे हर्डीकरांच्या जीवनात स्थान आहे. आपला समाज जीव वाचवणाच्या डॉक्टरची किंवा वकीलाची जेवढी कदर करतो तेवढी जीवन घडवणार्याड समर्पित शिक्षकाची काही हरकत नाही हे कटुसत्य आहे. वास्तविक चांगला शिक्षक—पायगावकरांसारखा–अतिदुर्मिळ असतो. हर्डीकर लिहितात, आपल्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. कोणाची री ओढण्यासाठी आपला जन्म नाही, असा पोलादी कणखरपणा माझ्यामध्ये सरांच्यामुळे आला.’ हर्डीकर लहानपणी ८ वषे संघात गेलेले. तरुणपणी जवळ जवळ १० वषे संघपरिवारातून आलेल्या, पण शिक्षणक्षेत्रात अधिक प्रखर ध्येयवादाने काम करणार्याप, कै. अप्पा पेंडसे यांच्या ज्ञानप्रबोधिनीचे पूर्णविळ कार्यकर्ते राहिलेले, यथाकाळ इंडियन एक्सप्रेसमध्येपत्रकारिता केलेले, नंतर राजकारण. त्यात कारावास. पुढे शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा पूर्णवळ कार्यकर्ता (आणि आता इंडियन असोसिएशन फॉर कल्चरल फ्रीडम या संस्थेच्या ‘न्यू वेस्ट’ या द्वैमासिकाचे कार्यकारी संपादक) असा ज्यांचा प्रवास आहे त्या हर्डीकरांच्या या म्हणणाला अर्थ आहे की, ‘कोणत्याही तत्त्वज्ञानाचा, चळवळीचा, नेतृत्वाचा स्वतःचे अस्तित्वच पुसून टाकावे असा प्रभाव माझ्यावर पडू शकला नाही. हर्डीकर सांगतात, ‘सर समाजवादी परिवाराच्या जवळचे. मी संघशाखेवर जात होतो. ते त्यांना माहीत होतं. … पण त्यांनी एकदाही संघाचा विषय काढून टीका केल्याचे मला आठवत नाही. All men are equal, but each one is unique हे त्यांचे तत्त्व होते. गेल्या तीस वर्षातल्या उलथापालथीत … आपलं निशाण फडफडत ठेवावं या (स्वतःच्या) ऊर्मीची तीव्रता नष्ट न होण्याचे मला एकच कारण दिसते-आमचे पायगावकर सर, अशी भावपूर्ण शब्दांजली हर्डीकर वाहतात.
सामान्यपणे स्वतःचे आईवडील जसे आपल्याला प्रिय असतात तसे संस्कारक्षम वयातले कोणी ना कोणी शिक्षक आपले आवडते असतात. दुसरे काही जमले नाही म्हणून शिक्षक झाले त्यातले पायगावकर नव्हते. पुस्तकापेक्षा कितीतरी जास्त शिकवणारे. सहा फूट उंचीचे भव्य व्यक्तित्व. लहान मुलांपुढे वाकून नमस्कार करणारे. प्रत्येकाला वेगवेगळा. सौम्य शांत मुद्रा. काहीसे स्वप्नाळू पण प्रेमळ, गंभीर डोळे. मुलांच्या भांडणात ज्यांची चूक त्यांच्यावतीने दुसन्या गटाची क्षमा मागणारे. सर्वांनाच तासभर कान धरून उभं करून स्वतः तेवढा वेळ वर्गात कान धरून उभे राहणारे हे जगावेगळे सर.
पायगावकरांच्या इंग्रजी आणि फ्रेंच या दोन आवडत्या भाषा. इंग्रजीत उच्चारणात विलक्षण गोडवा. इंग्रजी माणसासारखं इंग्रजी बोलणं, पश्चात्ताप प्रेरणेवर असा विश्वास की मुलांना शिक्षा करण्याचा अधिकार शिक्षकांना नाकारलेला. चोरी, कॉपी असे मोठे गुन्हे करणार्यानसमोर हात जोडून म्हणायचे, ‘ही सवय चांगली नाही. पुन्हा असं करू नकोस’, आणि पाच मिनिटे स्वतःचे दोन्ही कान धरून त्याच्यासमोर उभे राहायचे. शिक्षा करायला तोंड किंवा दोन्ही हात शिवशिवत असणाच्या शिक्षकाला त्यांचा सवाल असे की, “आपली मुले अशी का वागतात याचा तुम्ही काय विचार केला आहे?’
प्रत्येकाला निसर्गानि जरूर काही दिले आहे. ते सहज व्यक्ती होईल अशी शक्यता निर्माण करणारी व्यवस्था म्हणजे शाळा-कॉलेज, हे तत्त्व त्यांनी व्यवहारात आणून दाखवले. । प्रत्येकाला ‘इंग्रजी येणार नाही, गणित येणार नाही. कदाचित एकाही विषयात प्रावीण्य मिळवता येणार नाही, सगळ्यांनाच देखणं होता येणार नाही, सगळ्यांनाच देखणं होता येणार नाही, सगळ्यांनाच पहिले क्रमांक मिळणारही नाहीत. पण म्हणून जगता येणार नाही आणि आनंद मिळवता येणार नाही असं थोडंच आहे?’
हा प्रश्न स्पर्धेवर आधारलेल्या शिक्षणपद्धतीच्या शिल्पकारांना सर विचारात होते व तो आमच्यामधून विचारत होते असे हर्डीकर सांगतात. पण घरोघरच्या पालकांनी रोज स्वतःला विचारला पाहिजे असा हा प्रश्न आहे.
पायगावकरांच्या जीवनाबद्दल लिहितांना हर्डीकरांना तुकाराम आठवतो.
देवाची ते खूण | आला ज्याचा घरा ।
त्याच्या पडे चिरा । संसारासी ।।
पायगावकरसर व्यक्तिवादाचे एक टोक—विधायक–,तर भावेसर व्यक्तिवादाचेच दुसरे पण विघातक टोक.
प्रा. स. शि. भावे फर्गसन कॉलेजमधील हर्डीकरांचे मराठी शिक्षक, एककल्ली व्यक्तिवादी. बेदरकार आत्मनिष्ठेने आत्मनाशाकडे गेले.‘कामजीवनाची विविधता प्राप्त व्हावी म्हणून एकापाठोपाठ एक नाती प्रथम निर्माण करून नंतर ती उध्वस्त करत जाणारे भावे’. त्यांचा व्यक्तिवाद प्रामाणिक असता तर ते निदान व्यावसायिक नीतिमत्ता तरी पाळते! आजच्या आघाडीच्या निर्मात्या-दिग्दर्शक, बाई, पाणी, संवाद, चाकोरी यांसारख्या नामांकित लघुपटांच्या निर्मात्या आणि अनेकांगी पुरस्कार लाभलेल्या दोघी या पूर्णपटाच्या दिग्दर्शक सुमित्रा भावे – पूर्वाश्रमीच्या नीला उमराणी – स. शिं. च्या वशीकरण तंत्रात अडकलेल्या एक पूर्वविद्यार्थिनी, कॉलेजात हर्डीकरांनासीनियर होत्या.
हर्डीकर स. शिं. ची व्यक्तिरेखा ठळकपणे उभी करतात.‘भावे बुटके, सावळे आणि उंचीशी जरा विसंगत वाटण्याइतपत भरलेले … धारदार रोखून पाहणारी नजर … थेट डोळ्यात पाहण्याची धमक.लखलखीत शब्दसंग्रह. मेटॅलिक आवाज. त्याच्यात चढउतार करण्याचे कसब, छद्मीपणा तर जिभेला चिकटलेलाच. त्यावर उपरोध आणि वाङ्मयाच्या प्राध्यपकात क्वचितच आढळणारी तर्कशुद्ध मांडणी.’
वाङ्मयचर्चा करताना अत्यंत वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगत वृत्ती धारण करणारे भावे खरे की कोणत्याही वयाच्या स्त्रीकडे केवळ अभिलाषेने पाहू शकणारे भावे खरे असा प्रश्न लेखकाला पडतो. लेखाच्या शेवटी ते म्हणतात, ‘मढेकर हा आम्हा दोघांमधला सर्वांत मोठा समान धागा… मढेकर आत्मनिष्ठ तर भावेही आत्मनिष्ठ. दोघेही रूढ संकेतांना आव्हान देणारे. मढेकरांनी भाषेत धुमाकूळ घातला, तर भाव्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात … मढेकरही व्यक्तिवादीच जीवन जगले पणआत्मनिष्ठेपायी त्यांनी आपला आत्माच हरवून टाकला नाही.
भाव्यांनी विवेकाऐवजी वासनेची निवड केली आणि विचाराऐवजी विकाराचा पाठपुरावा केला. परिणामी डॉ. फाउस्टसचा शेवट त्यांच्या वाट्याला आला. हर्डीकरांनी ख्रिस्टोफर मार्लोच्या शब्दांत भाव्यांचे व्यक्तिमत्त्व वर्णिले आहे : ‘तरीही, तो विद्वान होता म्हणून …’ (‘yet, for he was a scholar.)
हर्डीकरांना लेखनविषय झालेल्या चौदा व्यक्तीत दोन शिक्षक, चार सर्जनशील लेखक, चार कार्यकर्ते, एक प्रकाशक, एक चित्रपट निर्माता-दिग्दर्शक, आणि दोन शास्त्रीय संगीताचे मूर्धन्य गायक आहेत. हर्डीकरांजवळ आपल्यापेक्षा दुपटीने मोठे असणा-यांशी मैत्री करण्याची काहीतरी किमया असली पाहिजे. एरवी विशीत असताना चाळिशीतल्या जयवंत दळवींशी आणि पंचविशीतअसताना पन्नाशीतल्या विद्याधर पुंडलिकांशी त्यांची विश्वब्ध मैत्री झाली नसती. पुंडलीक नार्सिससचे मन लाभलेले. ‘मौज’ ने पुस्तक काढणे ही मराठी लेखकाची आकांक्षी सहजी पूर्ण झालेले. तेही भाव्यांसारख्याच कलावादी. स्वतः हर्डीकर साहित्याबद्दल सामाजिक बांधिलकीची भूमिका न सोडणारे, कायम आशयवादी. ‘सती’ या कथेत सावरकरांसारक्या स्वातंत्र्यवीरांच्या खाजगी जीवनातले वैगुण्य दाखवल्यामुळे पुंडलीक सावरकरांच्या आंधळ्या भक्तांच्या प्रकोपाचे लक्ष्य झाले. त्या कठिणसमयी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले हर्डीकर त्यांचे सुहृद झाले. समाजशास्त्र प्रा. पुंडलिकांचा विषय. पण इतिहास, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, राजकीय मतप्रणाली, चळवळी, चळवळींचे नेते या सर्व विषयांचे त्यांचे वाचन व्यासंग आणि सूक्ष्म जाण हर्डीकरांना थक्क करून सोडणारी वाटते. विशेष म्हणजे त्यांनाही संघाची पार्श्वभूमी असून नानासाहेब गोव्यांसारखे नेते त्यांचे निकटचे मित्र असू शकत होते. त्यांची मैत्री लाभल्यामळे, ‘माळ तुडवून आलेला वाटसरू सावली आणि पाणी एकाच ठिकाणी सापडल्यावर जसा हरखून जातो तसे आपले झाले’ असे हर्डीकर म्हणतात. सुशिक्षिताच्या आयुष्यातली धर्माचे स्थान हा विषय त्यांनी पी.एच.डी. साठी निवडलेला. अत्यंत वाचनीय विश्लेषण करणे हे त्यांचे बलस्थान, परंपरा पूर्णपणे झिडकारून टाकण्यापेक्षा, परंपरेचे प्रदूषण केव्हा सुरू होते तो क्षण पकडण्यासाठी ते धडपडत असावेत असा हुर्डीकरांचा होए.
वाचन, विश्लेषण आणि लेखन यांत एवढी शिस्त आणि नेटकेपणा कमावलेले पुंडलीक व्यक्तिगत जीवनात कमालीचे घोळघालू होते. घरगुती जबाबदार्याे खमकेपणाने पार पाडणारी सहचारिणी लाभली म्हणून त्यांचे निभले. आपण स्पेशल आहोत. वाचन, मनन आणि आविष्कार या दुर्मिळ क्षमता असणारे आपण देवाचे लाडके आहोत याची त्यांना खात्री होती. जुन्या पिढीतल्या माडखोलकरांप्रमाणे जयवंत दळवींजवळ अनेक तथाकथित लेखकांच्या, कलावंतांच्या, राजकीय नेत्यांच्या विक्षिप्तपणाचे, क्वचित विकृतीचे आणि क्षुद्रपणाचे किस्से यांचे भांडार असे. पंचवीस ते पस्तीस या वयात हर्डीकरांची दळवींशी दोस्ती वाढत गेली. गप्पात कोणत्याही विषयाला मज्जाव नसे.
कीर्तिमान आणि वयाने दुप्पट किंवा जास्त मोठ्या व्यक्तीला आपले मतभेदच नाही, तर आक्षेप आणि आलोचनाही सुनावण्याचे धाष्ट्र हर्डीकरांनी वारंवार दाखविलेले दिसते. तरी दळवीपुंडलिकांसारखे सौम्य व्यक्तिमत्त्वाचे आणि स. शि. भावे आणि रा. ज. देशमुखांसारखे उग्र, आक्रमक व्यक्तिमत्त्वाचे मित्र त्यांना जोडता आले. ही गोष्ट मनाचा पारदर्शी निर्मळपणा आणि विश्लेषणाची भेदकता असल्याशिवाय साधली नसावी.
हर्डीकरांना दळवींमधला माणूस त्यांच्यातल्या लेखकांपेक्षा जास्त उत्कट वाटत होता. पुढे वर्षानुवर्षे भेट न झाली तरी ‘असा माणूस आपल्या मनातच राहायला येतो’ असे ते म्हणतात.
अंतर्मनाचा शोध आणि विसंगतीकडे उमद्या विनोदीवृत्तीने पाहण्याची ताकद हे दळवींचे लेखनातील विशेष हर्डीकरांना भावतात. त्यांच्या लिखाणात विकृतांचे कामजीवन किंवा कामजीवनातील विकृतीचे थैमान याबद्दल अनिवार कुतूहल असल्याचे दिसते. दळवींनीपुंडलिकांप्रमाणे इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मचर्चा, राजकीय तत्त्वप्रणाली, समाजशास्त्रीय विश्लेषण या गहन प्रांतत फारसा प्रवास केलेला नसावा हा हर्डीकरांचे अभिप्राय आहे. तळकोकणातले दोन तीन तालुके आणि मुंबईत स्थायिक झालेले तेथील विस्थापित यापलीकडे दळवींना आशयाची श्रीमंती प्राप्त करता आली नाही. नवीन धक्का दिल्याचा भास निर्माण करीत त्यांनी वेगवेगळ्या कलाकृती घडवल्या खर्याआ; पण त्यातल्या बर्यामच साहित्यकृतीपेक्षा वृत्तान्ता (case history) च्या जवळ गेल्या. ‘तो वृतान्त छापील पानांमध्ये दीर्घ असला तरी त्याचा प्राथमिक आशय मर्यादित होता असा बोचरा निष्कर्ष ते काढतात. शृंगारवर्णनाचा अभाव हे मराठी साहित्याचे वैगुण्य दळवींच्या लेखनातही आहे हे सांगून ते म्हणतात, ‘शृंगार हा प्रत्यक्ष शारीरिक क्रिया घडण्याच्या आधी, ती क्रिया घडताना, घडल्यानंतर आणि काही काळ गेल्यानंतर स्मृतिरूपानेसुद्धा शिल्लक राहणारा शरीर आणि मन यांचा एक विभ्रम आहे.
बीभत्साच्या दर्शनाने प्रथम घृणा व नंतर ते बीभत्स ज्यांच्या नशीबी आले त्यांच्याबद्दल करुणा जागृत होते; तर अश्लील अनुभवातून प्रथम घृणा आणि नंतर तिरस्कार असा प्रवास होतो. दळवींच्या चक्र पर्यंत जीवनाचे मूलभूत बीभत्सस्वरूप कादंबरीत आले नव्हते. वास्तव बीभत्स इतक्या निःसंकोचपणे मढेकरांच्या कवितेनंतर मराठी गद्यात दीर्घस्वरूपात चक्रमध्ये आल्याने चक्रने खळबळ उडवून दिली. ‘चक्र’, ‘सारे प्रवासी घडीचे’ आणि ‘ठणठणपाळ’ या दळवींच्या तीन कृती टिकून राहतील असे हर्डीकरांना वाटते.
हर्डीकरांचा नरहर कुरुंदकरांवरचा लेख इतर लेखांसारखा सुगम वाटत नाही. रा. ज. देशमुख आणि सुलोचना देशमुख हे प्रकाशक दाम्पत्य आणि कुरुंदकर या तिघातला पत्रव्यवहार जया दडकरांनी संपादित केला, त्याची हा लेख प्रस्तावना आहे. तिथे तो वाचताना ससंदर्भ असतो. लेखकाची आणि कुरुंदकरांची भेट एकदाच अन् तीही तासभर झालेली. अन् त्यावेळी तारा जुळल्या नव्हत्या असे ते लिहितात. साहजिकच या लेखातले देशमुख जास्त लक्षात राहतात. कुरुंदकरांच्या सर्वसंचारी लेखणीबद्दल, मूलग्राही चिंतनाबद्दल सोदाहरण लिहिण्याचे हे स्थळ नव्हते. कुरुंदकरांचा लेखनविषयांवरचा अधिकार निर्विवाद नव्हता आणि व्यक्तिमत्त्वही अविवाद्य नव्हते. हर्डीकरांनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांच्यावर पुढेमागे लिहावे. ते विवेचन नक्कीच अधिक वाचनीय तसेच मननीय होईल.
हाइरिश ब्योलबद्दलच्या लेखाला ‘एक युद्ध, एक लेखक’ असा मथळा त्यांनी दिला आहे. या जर्मन लेखकाच्या इंग्रजीत अनुवादित सर्व कादंब-यांचा तपशीलवार परामर्श हर्डीकरांनी घेऊन ब्योलचे मोठेपण सप्रमाण वाचकांपुढे मांडले आहे. थोडीशी शैली असली की व्यक्तिचित्रे लिहिणे हा सोपा वाङ्मय प्रकार आहे. व्यक्तीच्या ठळक वैशिष्ट्यांची नोंद घ्यायची आणि लिहायचे, असे म्हणणा-यांनी ब्योलवरचा लेख वाचण्यासारखा आहेत. ब्योलवरचाच काय, या संग्रहातले सर्वच लेख वाचण्यासारखे आहेत. वारंवार वाचावेसे वाटणारे आहेत. उत्तम साहित्याचे एक लक्षण म्हणजे त्यात आपण दिसतो असे वाचकाला वाटले पाहिजे असे म्हणतात. तसे असेल तर ते लक्षण प्रस्तुत पुस्तकाला पुरेसे लागू पडते असे म्हणता येईल.
सत्यजित रायच्या चित्रपटांवरील लेखांना “एक प्रदीर्घ ‘ह्यूमन डॉक्युमेंट’ असे मोठे मार्मिक शीर्षक दिलेआहे. कुमार गंधर्व आणि पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील प्रदीर्घ लेखाचा पुरेपुर आस्वाद घ्यायला वाचकाला संगीताचा कान असायला पाहिजे. तसे नसले तरी या आणि इतर अनेक गायकवादकांबद्दल लेखकाची परखड मते/लेखाला साजेशा चुरचुरीत भाषेत वाचकाला कधी रोचक तर कधी झणझणीत वाटल्याशिवाय राहणार नाहीत.
देशमुख आणि कंपनी या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संस्थापक रा. ज. देशमुख यांना हर्डीकर ‘महाराष्ट्र शारदेचे गजवाहन’ म्हणतात. ‘आधी गाजवावे तडाखे। तरि मग भूमंडळ धाके। या कोटीचे हे राजे देशमुख. वरून खडकाळ, रांगड्या दिसणार्या‘, पण अंतरी प्रेमाचा जिवंत झरा वाहात असणार्या. देशमुखांचे गडद व्यक्तिमत्त्वही हर्डीकरांनी सहृदयपणे रंगविले आहे.
चार कार्यकर्त्यांच्या शेवटच्या गटात शरद जोशींच्या शेतकरी संघटनेतले, म्यानेजरकी करणारे शंकरराव वाघ (फुटे तरुवर उष्णकाळमासी) स्वयंसेवी चळवळीचे दोन कारभारी (खरे तर कारसेवक), म्हैसाळच्या सहकारीशेती प्रकल्पाचे प्रणेते मधुकर देवल आणि ग्रामायनचे व्ही. डी. देशपांडे, आणि सरतेशेवटी मध्यप्रदेशाच्या रायपूर भागात आदिवासींमध्ये, ‘शोषण के दुश्मन, मुक्ति के मित्र’ शंकर गुहा ‘नियोगी’ या मंडळींच्या कर्तृत्वाचे आलेख हर्डीकरांनी कमालीच्या जिव्हाळ्याने काढले आहेत. कारण अर्थातच हर्डीकर त्यांच्या जातकुळीचे आहेत, त्यांचे घनिष्टआहेत, यथाशक्य सहकारी आहेत हे आहे.
एवंच पुस्तक वाचताना संपूच नये असे वाटणे, संपल्यावर पुन्हा वाचावेसे वाटणे, इतके असूनही ते गंभीर असणे, जागोजागथांबून विचार करायला लावणे हे सारेच ते ग्राह्य आहे, संग्राह्यआहे, याचे पुरावे आहेत.
हर्डीकरांचे भाषाप्रभुत्व डोळ्यात भरण्यासारखे आहे. जे ‘उत्सन्न,’ ‘संप्लवन’ या सारखे संस्कृत शब्द लीलया पेरू शकतात तितक्याच सहजतेने ‘घोळघालू’, ‘खमकेपणा’ ‘धुडकावा’ असे प्राकृत शब्द फेकू शकतात, त्यांच्या लिखाणात ‘डेड्लॉक’, ‘पेशन्स, ‘रिलॅक्स’, ‘डायमेन्शन्स’, ‘इन्व्हाल्व्ह’ अशी इंग्लिश शब्दाची मांदियाळी असावी हे खटकते. एवढे उणे सोडले तर पुस्तक सर्वांग- अंतरंग, बहिरंगासकट – सुंदर आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.