धर्म आणि विवेकवाद -प्रा. स. ह. देशपांडे यांना उत्तर

आजचा सुधारकच्या जुलै आणि चालू अंकात डॉ. स.ह. देशपांडे यांचा ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचा उत्तरार्ध (या अंकात प्रसिद्ध झालेला) पूर्णपणे मला उद्देशून लिहिला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ईश्वर ही कल्पना मानवी मनातून सर्वस्वी काढून टाकणे शक्य दिसत नाही. मी या प्रश्नाशी नीट भिडत नाही. माझी उत्तरे मूळ मुद्दा सोडून असतात. मनुष्य जगात एकटा असून त्याला आधाराला ईश्वर लागतो या मुद्याचा प्रतिवाद मी केला तरी तो उपयुक्त होईल. एरव्ही ईश्वर आणि धर्म यांच्या समाजजीवनावरील प्रभावाचा मी पुरेसा विचार करीत नाही असा आरोप मला पत्करावा लागेल.

यापैकी एकही आक्षेप मला मान्य नाही. का ते सांगण्याचा प्रयत्न करतो.

प्रथम स.हं.चे जे मूलभूत गृहीत आहे त्याविषयी. ते म्हणतात, ईश्वर ही कल्पना मानवी मनांतून सर्वस्वी काढून टाकणे शक्य दिसत नाही, कारण तिची मुळे मानवाच्या “कपाळी लिहिलेल्या एकटेपणात आहेत.” मला वाटते “ईश्वर ही कल्पना’ या शब्दांनी स.हे. ना अभिप्रेत अर्थ ‘ईश्वरावरील विश्वास’ हा आहे, कारण ईश्वर नाही असे म्हणणार्या“ मनुष्यालाही ‘ईश्वर’ या शब्दाने कोणतीतरी विशिष्ट कल्पना अभिप्रेत असते. त्याशिवाय ‘ईश्वर नाही’ हे शब्द निरर्थक होतील.

आता ‘ईश्वर आहे’ हा विश्वास मानवी मनातून सर्वस्वी काढून टाकणे अशक्य आहे असे स.ह. कशाच्या आधाराने म्हणतात? ते म्हणतात, त्या विश्वासाची मुळे केवळ अज्ञांनात आणि अविवेकात नाहीत. ती मानवाच्या कपाळी लिहिलेल्या एकटेपणात आहेत. एकटेपणा माणसाच्या नियतीचा भाग आहे. या ठिकाणी दोन प्रश्न उद्भवतात. माणसाच्या कपाळी लिहिलेले एकटेपण म्हणजे काय? आणि माणसाची नियती काय आहे?हे शब्द फक्त साहित्यिक वाक्प्रचार म्हणून स.हं.नी वापरले आहेत हे शक्य आहे. पण तसे नसेल आणि त्या शब्दांचा अर्थ सामान्यपणे अभिप्रेत असतो तसा घेतला तर त्याचा पुरावा काय असा प्रश्न विचारावासा वाटतो. ‘कपाळी लिहिलेला लेख’ ही तर शुद्ध अडाणी, वेडगळ कल्पना आहे हे मान्य व्हावे. ‘नियती’ ही गोष्ट जरी प्रतिष्ठित असली, तरी तिच्या बाबतीतही काहीसे तसेच म्हणता येईल. नियती, destiny किंवा fate या कल्पनांचा आपण विचार न करता उपयोग करतो. नियती म्हणजे आधीपासूनच घडणार म्हणून ठरलेली गोष्ट. अशी नियती नावाची गोष्ट वस्तुत: आहे याचा पुरावा काय आहे? प्रत्येक घटना जेव्हा आणि जशी घडते तेव्हाच आणि तशीच ती घडणार होती असे पूर्वीपासूनच निश्चित असते, ह्या गोष्टीचा साधक पुरावा काय असू शकेल हे सांगणे कठीण आहे. एखादी गोष्ट (विशेषतः अशुभ) घडल्यानंतर जे घडणार होते ते घडले असे आपण म्हणतो. पण अमुक गोष्ट घडणार आहे हे पूर्वनियत आहे असे म्हणायला आपल्याला काय अधिकार आहे? एखादी घटना घडणार आहे असे भविष्य कोणी वर्तविले, आणि ते खरे ठरले तरी ती घडणार होती हे पूर्वनियत होते हे सिद्ध होत नाही, आणि भविष्ये अशा गुळमुळीत, अनेकार्थी भाषेत वर्तविली जातात की ती कोणत्याही परीस्थितीत खरी ठरली असे म्हणता यावे. तेव्हा नियतीची सिद्धी होऊ शकेल असा युक्तिवाद अशक्य दिसतो.

स.ह. म्हणतात की ‘ईश्वर व धर्म यांचा समूळ उच्छेद शक्य नाही’, हे ते इतक्या ठामपणे कशाच्या आधाराने म्हणतात? ‘ईश्वरकल्पनेची मुळे मानवाच्या कपाळी लिहिलेल्या एकटेपणात आहेत. हे एकटेपण मानवाच्या नियतीचा भाग आहे’ हे शब्द जर केवळ रूढ़ वाक्प्रचार नसतील, आणि स.हं.नी ते वाच्याथन वापरले असतील तर ‘ईश्वर ही कल्पना मानवाच्या मनातून समूळ काढून टाकणे शक्य नाही’ असे ते कशाच्या आधाराने एवढ्या ठामपणे म्हणत आहेत ते समजू शकते. जर नियतीनेच एकटेपणा मानवाला दिला असेल, आणि त्यातून ईश्वरकल्पना निर्माण झाली असेल तर त्या कल्पनेचा पूर्ण उच्छेद करणे अशक्य आहे हे अर्थातच उपपन्न होते. पण मग प्रश्न असा उद्भवतो की नियतीने हे एकटेपण माणसाच्या कपाळी लिहिले आहे याचे प्रमाण काय? ते ते सांगत नाहीत.

पण स.हं.नी ‘नियतीने माणसाच्या कपाळी एकटेपणा लिहिला आहे’ हे शब्द केवळ वाक्प्रचार म्हणून वापरले आहेत हे शक्य आहे. म्हणून आता त्यांविषयी जास्त न लिहिता पुढे जाऊ.

स.ह. म्हणतात की ईश्वरकल्पनेची मुळे मानवाच्या एकटेपणात आहेत. मानवाचा एकटेपणा म्हणजे काय? मानव एकटा आहे कशावरून? त्याच्याखेरीज पृथ्वीवर हजारो जीवजाती आहेत. गायी, म्हशी, घोडे, शेळ्या मेंढ्या इत्यादि उपयुक्त आणि वाघ, सिंह, साप इत्यादि भयानक लक्षावधि प्राणी आहेत. खुद्द मनुष्यजातीत अब्जावधि माणसे आहेत. मग मनुष्य एकटा आहे म्हणजे काय? मनुष्याच्या जोडीला त्याच्याइतकाच किंवा अधिक बुद्धिमान प्राणी जर असता तर तो एकटा राहिला नसता असे म्हणायचे काय? खरे म्हणजे मनुष्य एकटा नसून त्याला अनेक सहायक प्राणी आहेत, आणि त्यांच्याकडून तो भरपूर सेवा घेत आहे. मग मनुष्यएकटा आहे म्हणजे काय? कोणातरी कवीने माणूस एकाकी आहे अशी कल्पना केली आणि मग सगळे त्याची री ओढू लागले असे या बाबतीत झाले आहे. वास्तविक माणूस जन्मतो तेव्हा सामान्यपणे कितीतरी प्रेमाची माणसे हजर असतात, आणि तो जातो तेव्हाही सामान्यपणे अनेक लोक त्याच्याभोवती असतात. मग त्याला एकाकी का म्हणावे?

मनुष्य एकटा आहे यापेक्षा तो दुर्बळ आहे, मित्रा आहे, त्याला निराधार वाटते हे म्हणणेअधिक बरोबर आहे. कारण दयाखोऱ्यांतून उघडे नागडे मटकणान्या, हिंस श्वापदांच्या हल्ल्यांनी त्रस्त असलेल्या, डोंगरातला एखादा खळगा हेच ज्याचे घर आणि झाडांची पाने आणि कंदमुळे हे सापडेल तसे ज्याचे अन्न, त्या आदिमानवाला असहाय वाटले तर स्वाभाविक आहे. पण नंतरच्या हजारो वर्षांत कमीअधिक सुरक्षित जीवन प्राप्त झाल्यावर, आणि इतर मानवांचा आधार मिळाल्यामुळे निराधारता मोठ्या प्रमाणात कमी झाली. ऊन, वारा, पाऊस यांपासून रक्षण होण्याचे उपाय त्याला सापडले आहेत. घरे बांधायला लागून आणि शेती करायला लागून, निवारा आणि अन्न यांची व्यवस्था करता यायला लागून हजारो वर्षे लोटली आहेत. वन्य पशूचा बंदोबस्त झाला आहे. रोगराईचा मोठ्या प्रमाणात निकाल लागला आहे. आरंभी २०२५ वर्षे जगायला मिळणाच्या मानवाला आज ६०-७० वर्षे इतके आयुर्मान लाभले आहे. जीवन पहिल्या मानाने खूपच सुरक्षित झाले आहे. अकाली मृत्यू कमी झाले आहेत. अपघात सोडले तर ते घडत नाहीत. निसर्गाचा क्रम लक्षात घेता त्यात अपघात मधूनमधून होतच राहणार. अपघात होणारच नाहीत अशी व्यवस्था कोणी करू शकत नाही. यात एकच उणीव राहिली आहेवार्धक्य आणि मृत्यू यांच्यावर उपाय सापडण्याची आशा नाही. पण त्यांच्याशी तडजोड करणे शक्य आहे. वार्धक्य आणि मृत्यू अटळ आहेत हे ओळखून त्यांचा स्वीकार करायला शिकणे अवश्य आहे, आणि ते शक्यही आहे. साठ-सत्तर वर्षांचे भरपूर जीवन जगल्यावर आता त्यातून निवृत्त व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे. विविध सुखे भोगल्यानंतर जेव्हा गात्रे थकल्यानंतर सुखाने जगणे अशक्य आहे असे लक्षात येते तेव्हा माणसालाच आता मृत्यू यावा असे वाटू लागते, आणि शांतपणे मृत्यूला सखा म्हणून सामोरे जाऊन त्याच्या स्वाधीन होणे शक्य होते. कृतार्थ होऊन शांतपणे मृत्यू यावा यात जीवनाची पूर्णता आहे असेही म्हणावेसे वाटते. नाहीतरी मृत्यू अटळ आहे हे ओळखल्यावर याहून वेगळे काही करण्यासारखे शिल्लक राहात नाही.

वार्धक्य आणि मृत्यू यांच्याशी तडजोड करण्याचा विवेकी मार्ग कोणता आहे ते आपण पाहिले. आता त्यांना तोंड देण्याचा शिष्टसंमत मार्ग, म्हणजे ईश्वरभक्तीचा, त्याच्याकडे वळू.

आता ईश्वरभक्तीच्या मागनि वस्तुत: काहीही साध्य होत नाही हे इतक्या वेळा सांगून झाले आहे की त्याची पुनरावृत्ती करण्याची जरूर नाही. निसर्गातील एखादी क्षुल्लक घटनाही ईश्वराच्या प्रार्थनेने किंवा नामस्मरणाने घडते त्याहून वेगळी घडत नाही हे सामान्यपणे मान्य
व्हावे. नामस्मरणात अलौकिक सामर्थ्य आहे असे पूर्वी मानीत, पण ते पूर्णपणे खोटे आहे हे सिद्ध झाले आहे. प्रार्थनेने आजारी मृत्युमुखी पडायचे राहात नाहीत, भक्तीने अपघात टळत नाहीत, देवदर्शनाने परीक्षात यश मिळत नाही हे कुणाही विचारी माणसाला मान्य होणार आहे. मग ईश्वरावरील श्रद्धेने काय होते?याचे एकमेव उत्तर म्हणजे ‘आम्हाला आधार वाटतो’, ‘आम्हाला समाधान मिळते’ याच्यापलीकडे काही नाही. परंतु हा आधार आणि समाधान केवळ काल्पनिक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ते खरे समाधान नव्हे. एका असत्य गोष्टीवरील विश्वासावर ते आधारलेले असते. जीवनात अनेक अनिष्ट गोष्टी घडल्यानंतर मनुष्य कित्येकदा दारूत ती दुःखे बुडविण्याचा प्रयत्न करतो त्याहून हे वेगळे नाही. भक्तीची झिंग दारूच्या झिंगेसारखीच केवळ कृतक समाधान देते. पुष्कळ प्रार्थना करूनही आजाण्याला आराम पडला नाही तर धर्मनिष्ठ मनुष्य म्हणतो की ईश्वराच्या मनात तो जावा हे होते, आणि त्याविरुद्ध आपले काही चालत नाही. पण हेच उत्तर विवेकाने देण्यासारखे आहे. ज्याच्यावर आपला इलाज चालत नाही ते आपण स्वीकारले पाहिजे हे विवेकी उत्तर. हे उत्तर ईश्वरवाद्यालाही शेवटी द्यावेच लागते. आणि ते उत्तर पुरेसे आहे. नामस्मरणाने आम्हाला समाधान मिळते हे उत्तर आत्मवंचना करणारे आहे. खरे समाधान शक्यतो सर्व प्रयत्न करण्यात आणि जे अनिवार्य आहे ते स्वीकारण्यात आहे.

श्रद्धेचा मार्ग हजारो वर्षांपासून माणूस वापरत आला आहे. त्या मार्गाचे पुरेपूर कौतुक झालेले आहे. ईश्वरावर श्रद्धा ठेवणे हा सर्वात श्रेष्ठ गुण आहे असे मानण्यात आले आहे. एखादा मनुष्य ईश्वरभक्त आहे असे म्हणणे म्हणजे त्याची परमोच्च प्रशंसा मानली जाते. त्याच्या जीवनाचे सार्थक झाले असे आपण समजतो. त्याच्या उलट नास्तिक, संशयवादी आणि विवेकवादी यांची यथेच्छ निंदा करण्यात आली आहे. पाखंडी मनुष्य ही शिवी समजली गेली आहे. नास्तिकाच्या वाट्याला केवळ निंदा आणि हेटाळणीच नव्हे, तर छळही आला आहे. अशा अतिप्रतिकूल परिस्थितीतही नास्तिकांची जमात वाढते आहे. दोन हजार वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की कोणीही नास्तिक नव्हता, किंवा असलाच तर अपवादात्मक होता. पुढे १६व्या शतकात विज्ञानाचा उदय झाला, त्यावेळी नास्तिकाला मोठा आश्रय मिळाला.

आरंभीचे वैज्ञानिक आस्तिक होते. कोपर्निकस धर्मगुरू होता, केप्लर सूर्योपासक होता, आणि न्यूटन एरियन होता. पण हळूहळू वैज्ञानिकांमधील नास्तिक्य वाढू लागले. निसर्गात कुठेही ईश्वराचा हात दिसेनासा झाला. डार्विनने जीवसृष्टीची (मानवांचीही) केवळ निरीश्वरवादी उपपत्ती मांडली आणि तिचा स्वीकार झाला. विसाव्या शतकात वैज्ञानिक आस्तिक नाहीत असे नाही; पण त्यांची संख्या पूर्वी कधी नव्हती इतकी कमी झाली आहे. शिवाय आस्तिक वैज्ञानिकांचा ईश्वरही वेगळाच असतो. तो मानवांचा पक्षपाती, त्यांच्या प्रार्थनांना जाणणारा, भक्तीने ओलावणारा नसतो. त्याचा मानवाशी कसलाही विशेष संबंध नसतो. त्याने फक्त जग निर्माण केलेएवढेच आस्तिक वैज्ञानिक मानतात. ईश्वरवाद्यांचा ईश्वर आणि वैज्ञानिकांचा ईश्वर यांत फार भेद आहे.

नास्तिक्याची इतकी निंदा, विरोध होत असतांना ही प्रगति झाली आहे. ईश्वरकल्पनेचा उच्छेद होतो आहे आणि तो पूर्ण होण्याची शक्यता आहे हे सिद्ध करण्यास ती पुरेशी आहे. म्हणून मला स.हं. ची आद्य प्रतिज्ञाच मान्य नाही. ईश्ववरकल्पना अन्य कल्पनांसारखी निर्माण झाली आणि ती नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे.

स.हं. चा एक आक्षेप असा आहे की माझी भाषा मला समाजाशी कर्तव्य नसल्यासारखी आहे. माझ्या एका लेखात त्यांना मी विचारले होते की ‘बाकीच्यांची गोष्ट सोडा. तुम्हाला माझं म्हणणं पटतं की नाही ते सांगा’. यावर स.ह. विचारतात : ‘बाकीच्यांचं का सोडा? तोच तर मी निर्माण केलेल्या प्रश्नात मध्यवर्ती आहे.’ ते म्हणतात : ‘मला तुमचं म्हणणं (ईश्वर नाही हे) पटतं. समाजाचे काय करायचं ते सांगा’. आता ‘बाकीच्यांचं सोडा’ हे मी बहुसंख्य लोकांना माझं म्हणणं पटणार नाही या स.हं. च्या मताला उद्देशून म्हटले होते. त्याचा अर्थ असा होता की माझे म्हणणे तुम्हाला पटले तरी पुष्कळ काम झाले. आता जमेल तसे जमेल त्या प्रमाणात ते मत बहुसंख्य लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करू या. ‘बाकीच्यांचं सोडा’ याचा अर्थ स.हं.ना माझे म्हणणे पटले, तर इतराबद्दल विचार कायमचे कारण नाही असा नव्हता. जर स.हं.नाही माझे म्हणणे पटत नसले, म्हणजे ईश्वरावरील श्रद्धेवाचून राहणे अशक्य वाटत असेल, तर ती चिंता करण्यासारखी गोष्ट होती. माझे म्हणणे सर्व लोकांना एकदम पटेल अशी माझी अपेक्षा नव्हती आणि नाही. उलट ते बहुतेक लोकांना पटणार नाही आणि त्याला तीव्र विरोध होईल हे मला माहीत आहे. पण म्हणून स.हे.नाही ते पटावे म्हणून प्रयत्न करायचा नाही असा माझ्या म्हणण्याचा अभिप्राय अर्थातच नव्हता. बहुसंख्य लोकांच्या मताविरुद्ध मताला त्यांचा विरोध होणार हे स्वाभाविक आहे. म्हणून प्रथम सुशिक्षित, विचारी आणि तर्कशुद्ध विचार करू शकणार्याव लोकांना ते प्रथम सांगायचे, आणि त्यांना पटल्यानंतर इतरांकडे वळायचे असा माझा उद्देश होता. कुठल्याही मोठ्या सुधारणेला प्रथम मूठभर लोक सोडून बाकीच्यांचा तीव्र विरोध होणार हे स्वाभाविक आहे. म्हणून प्रथम मूठभर लोकांना ती पटवायची आणि मग बाकीच्या लोकांकडे जायचे असे धोरण आपण सगळीकडेच वापरतो. हिंदू कोड बिलावर जर खानेसुमारी घेतली असती तर ते नक्कीच नापास झाले असते. माझ्या लेखातील कोणत्या भागावरून स.हं.नी हा निष्कर्ष काढला हे मला माहीत नाही. मी सुचविलेल्या सुधारणेला बहुतेक लोकांचा विरोध होईल हा आक्षेप मी प्रथमच ऐकत होतो असेही नाही. पण बहुसंख्यांच्या विरोधामागे आपला छुपा विरोध लपविण्याची युक्ती अनेक लोक वापरतात. तिला उद्देशून मी ते म्हणालो होतो.

स.ह. म्हणतात की ‘सर्वच सुधारणा धर्माच्या चौकटीत होत नाही; काही सुधारणा धर्म आक्रसून होते, काही सुधारणा विशिष्ट श्रद्धांचा त्याग करून होते, आणि या प्रक्रियेत धर्माचा परिसर मर्यादित होतो’, या मुद्याकडे माझे दुर्लक्ष झाले आहे. माझ्या धर्मसुधारणेवरील लेखात मी म्हटले होते की जोपर्यंत धर्माची मूलभूत चौकट सुरक्षित ठेवली जाते तोपर्यंत धर्माची सुधारणा होते असे म्हणण्यात आत्मवंचना आहे. ईश्वर, परलोक, पुनर्जन्म इत्यादींची चौकट कायम ठेवून धर्माचे क्षेत्र काहीसे आक्रसले तरी सुधारणा झाली असे आपल्याला वाटते; पण खरोखर धर्माला, म्हणजे त्याच्या मुळाला धक्का लावला असे होत नाही. उलट त्याने धर्माची चौकट अधिक पक्की होते. त्याची आधारभूत चौकट कायम ठेवून जे बदल होतील ते वरवरचे असणार.

धर्मात सुधारणा फारशी झालेली नाही हे माझे मत स.हं.ना अनैतिहासिक वाटते. ते युरोप धर्माच्या पकडीतून बाहेर पडल्याची महत्त्वाची खूण म्हणून सेक्युलर राज्यसंस्थेचा बव्हंशी स्वीकार पुढे करतात. परंतु धर्माच्या क्षेत्रातून राजकारण वगळले गेले हे जरी खरे असले तरी ईश्वरावरील श्रद्धा, चर्चगमन, धार्मिक संस्कार इत्यादि गोष्टी तशाच कायम आहेत. स.ह. म्हणतात, ‘तीन चार शतकात घडून आलेलं हे परिवर्तन क्रांतिकारक म्हणावं इतके मोठे आहे.’ असेल, पण ते धर्माची चौकट कायम ठेवून झाले आहे. म्हणून धर्माचा प्रांत आक्रसला असे म्हणता येत नाही. भारतामध्येही राज्यसंस्थेची धर्मनिरपेक्षता मान्य झाली आहे. इथली राज्यघटना कोणत्याही धर्माला अनुसरून केलेली नाही हे धर्मसुधारणेचे ढळढळीत उदाहरण म्हणून स.ह. पुढे करतात. पण युरोपात किंवा भारतात लोकांचा धर्मावरील विश्वास कमी झाला आहे असे नाही. धर्माची मूलतत्त्वे, म्हणजे श्रद्धा, ईश्वर, परलोक, मृत्यूत्तर अस्तित्व, पुनर्जन्म, अमरत्व इत्यादींचा धर्मनिरपेक्ष राज्याशी काही संबंध नाही. वैयक्तिक जीवनात प्रत्येक व्यक्तीला आपल्या पद्धतीने उपासना करण्याचा हक्क मिळालेला आहे, आणि त्या व्यक्ती त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.

आता हे खरे आहे की धर्माची मूळ चौकट कायम ठेवूनही त्याचे क्षेत्र आक्रसले आहे, ह्या म्हणण्याकडे असेही पाहाता येईल की धर्मासंबंधी धार्मिकांची दृष्टी काहीशी शिथिल, सहिष्णु, कमी आग्रही झाली आहे, म्हणजे धर्माचा पगडा कमी झाला आहे. धर्माच्या चौकटीला हात लावलेला नसला तरी अन्य बाबतीत धर्माची पिछेहाट होत आहे, याचा अर्थ लोकांच्या मनात धर्माची प्रतिष्ठा कमी झाली आहे. हे खरे असू शकेल, आणि तसे असेल तर हे धर्माच्या निरासाच्या दिशेने पडलेले एक पाऊल आहे असे म्हणता येईल. आज लोक म्हणताहेत की धर्माचे राजकारणात काही चालू नये. उद्या ते म्हणतील की ईश्वरावरील श्रद्धाही डळमळू लागल्याचे ते चिन्ह असेल. हे शक्य आहे. पण ते खरे असेल तर स.हं.च्या ईश्वरआणि धर्म यांचं संपूर्ण निराकरण होणे अशक्य आहे या म्हणण्याला ते बाधक होईल. म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा सध्या कितीही सार्वत्रिक असली तरी ती तशीच सदैव राहील असे म्हणता येणार नाही.

स.हं.चा एक प्रश्न असा आहे : ‘परमेश्वराचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही, म्हणून आस्तिक्यबुद्धीचा त्याग केला पाहिजे. असं केल्याने माणसाचं मन अधिक मुक्त होईल, आत्मनिर्भर होईल – असे दि.यं.चे थोडक्यात प्रतिपादन आहे. त्यांचा हेतू मानवी मनातून हा भ्रम काढून टाकावा असा आहे. तो स्तुत्य आहे असे आपण धरून चालू. मग प्रश्न असा उभा राहतो की एक उघड असत्य लोक हजारो वर्षे का कवटाळीत राहतात? … ईश्वर या संकल्पनेची सामाजिक आणि मानसिक कारणं शोधायला नकोत काय?’

स.हं. च्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ईश्वरातील श्रद्धा एक उघड असत्य आहे असे धार्मिकांना वाटत नाही. उलट श्रद्धेचा महिमा हजारो वर्षे असंख्य लोकांनी इतक्या मुक्त कंठाने गायिला आहे की श्रद्धा बाळगण्यात काही गैर आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते. श्रद्धावान असणे अभिमानाची गोष्ट आहे असे त्यांना सतत ऐकविले गेले आहे. श्रद्धाविषय कदाचित् अस्तित्वात नसेल ही कल्पनाही त्यांना शिवत नाही. श्रद्धेतील दोष समजाऊन सांगणारे युक्तिवाद समजायला कठीण असतात. तेवढी ताकद आणि तयारी सामान्य लोकांची नसते.

जवळजवळ सर्व सज्जन माणसे श्रद्धेचे गुण गात असतात. अशा परिस्थितीत ईश्वरकल्पना आणि तिच्यावर आधारलेली धर्मकल्पना यांचा प्रभाव मानवजातीवर एवढा पडावा ह्यात आश्चर्य नाही.

शेवटी एक छोटासा मुद्दा. श्री गं.र. जोशी यांच्या पत्राला उत्तर देताना ‘मानवाचा पुत्र म्हणजे कोण?’ असा प्रश्न मी विचारला होता. त्यावर स.ह. म्हणतात की माडगूळकरांची ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ही ओळ महाराष्ट्राला इतकी परिचित आहे की मी तो प्रश्न विचारावा याचे आश्चर्य वाटते. माडगूळकरांनी ते शब्द प्रथम वापरले हे मलाही माहीत आहे. पण माडगूळकरांनीही ‘मानवाचा पुत्र’ याऐवजी ‘मानव’ असा एकच शब्द का वापरला नाही? मानव पराधीन नाही, पण त्याचा पुत्र मात्र आहे असे त्यांना म्हणायचे आहे काय? तसे असेल हा मानव कोण? आणि हा स्वत: मानवाचा नसेल तर कोणाचा पुत्र होता?

कदाचित् हे प्रश्न अरसिक आणि कदाचित् अडाणी मनातून उद्भवले असू शकतील. जाणत्यांनी त्यांचा उलगडा केल्यास आभारी होईन.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.