गीता-ज्ञानेश्वरीतील एक अनुत्तरित प्रश्न

‘ही भगवद्गीता अपुरी आहे’ हा प्रा.श्री. म. माटे यांचा एक महत्त्वपूर्ण लेख. ‘विचारशलाका’ या त्यांच्या ग्रंथात तो समाविष्ट केला गेला आहे.

त्या लेखात भगवद्गीतेच्या पहिल्याच म्हणजे मुखाध्यायात अर्जुनाने उपस्थित केलेले दोन प्रश्न मांडले आहेतः
(१) आप्तस्वकीयांच्या मृत्यूविषयीचापहिला चिरंतन स्वरूपाचा प्रश्न.
आणि
(२) कुलक्षयामुळे स्त्रियांमध्ये येणारी दूषितता, स्वैर आचारवत्यातून होणारावर्णसंकर हा दुसरा नैतिक, सामाजिक प्रश्न

पहिल्या प्रश्नाचे उत्तर गीताभर केलेल्या आध्यात्मिक चिंतनात येऊन जाते. देहाचा मृत्यू म्हणजे अमर आत्म्याचा मृत्यूनव्हे हा चिंतनाचा मथितार्थ. त्याअनुरोधाने या जीवात्म्याचे ध्येय काय आणि ते गाठण्याचे मार्ग कोणते याचे विवरण गीतेत येते. मोक्ष हे ध्येय आणि ज्ञान, कर्म, दृढ भक्ती आदित्यासाठी सांगितलेले मार्ग. मतभेद राहोत; पण ही मांडणी सुसंगतझाली. पण कुलक्षयामुळे होणार्‍या कुलस्त्रियांच्या स्वैर आचाराचा व त्यातून होणार्‍या वर्णसंकराचा अर्जुनाचा दुसरा ऐहिक, सामाजिक संदर्भातला प्रश्न अनुत्तरितच राहिला. हे लक्षात घेऊन ही भगवद्गीता अपुरी आहे’ असेगीतेचे अपुरेपण प्रा. माटे यांनी नमूद केले आहे. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील मुक्त भाष्य असूनही तिथेही या प्रश्नाचे उत्तर नाही. म्हणून तीही या बाबतीत अपुरीच ठरते.

कृष्णाने या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. पण पहिल्या प्रश्नाच्या संदर्भात जे आध्यात्मिक चिंतन केले जाते, त्यामध्येच या दुसन्या प्रश्नाचेही उत्तर येऊन जाते, असे अध्यात्मवाद्यांचे उत्तर कदाचित् येऊशकेल. ‘देहातील फक्त आत्माचअमर असल्यानेवीरांच्या देहांचा मृत्यू, वीरांच्या देहधारी कुलांचा क्षय, कुलस्त्रियांच्या देहांचा व्यभिचार, भिन्न वर्गातील पुरुषदेहांचा व स्त्रीदेहांचा संकर यांचा विचार करण्याचे कारण नाही.’ असे उत्तर आल्यास आध्यात्मिक चिंतनाच्या संदर्भात ते कदाचित् सुसंगतही ठरेल.

पण प्रत्यक्ष ऐहिक लौकिक जगात वीरांचे देह मारले गेले. ते त्यांचे अमर आत्मे कुठेतरी निघून गेले. आणि ‘जितो वा भोक्ष्यसे महीम्’ हे श्रीभगवानउवाच खरे करण्यासाठी प्रत्यक्षात आणण्यासाठी, विजयी वीरांचे देह सिंहासनावर बसले, या विजयी वीरांच्या देहांनी त्यांच्या स्त्रियांच्या देहांचा उपभोगघेतला. त्या देहांनी उच्च मद्याचा आस्वाद घेतला. त्यांच्या देहांनी सर्व ऐहिक लौकिक सुखे अंगअंगांनी भोगली. त्यांच्या देहांनी त्यांच्यापुत्र-पौत्रांचे देह जन्माला घातले. त्यांच्या देहांसाठी इहलोकीचीराज्ये जतन करून ठेवली. त्या पुत्र-पौत्रांचे देहही त्यांच्याच सिंहासनांवर बसले आणि सर्व प्रकारची ऐहिक सुखेत्यांच्या देहांनी भोगली.यासर्वकृत्यांमध्ये–कर्मामध्ये या विजयी वीरांचे आत्मेत्यांच्या देहांना हवे तेवढे ऐहिक सुख भोगू देत राहिले आणि स्वतःही ते आत्मे ते ऐहिक सुख, देहात्मे बनून भोगत राहिले.

स्वतः श्रीकृष्णाचा देह त्याने या युद्धानंतर तब्बल ३६ वर्षे या इहलोकात जिवंत ठेवला. त्याच्या देहाने स्त्रिया भोगल्या, मद्ये प्याली. सर्व प्रकारचे विलास त्याच्या देहाने भोगले. त्यानेच सांगितलेली विषयाची अनासक्ती झुगारून, त्याच्याही आत्म्याने न कुरकुरता, सर्व प्रकारची साथ देत, त्यांच्या देहाला सर्व काही भोगू दिले.

त्या अध्यात्मवाद्यांशी प्रतिवाद करण्यासाठी प्रा. माटे यांच्या शैलीची अशी थोडी साथसोबत घेत, हे प्रांजळ सत्य सांगावयास हवेच. अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाच्या संदर्भातील हा थोडासा प्रतिवाद, विषयांतर करून झाला. या लेखाचा तो विषय नव्हे.
* * *
या टिपणात अर्जुनाच्या दुसर्‍या प्रश्नाच्या संदर्भात जिज्ञासा आहे.

कुलक्षयानंतर अधर्म पसरून ‘प्रदुष्यन्तिकुलस्त्रियः’ आणि स्त्रीषुदृष्टासु जायते वर्णसंकरः’ या अर्जुनाने उपस्थित केलेल्या दुसर्‍या प्रश्नाबाबत काय झाले? ज्ञानेश्वरीनुसार युद्धाने घडणार्‍या कुलक्षयानंतर ‘व्यभिचार घडति। कुलस्त्रियांसी…उत्तम अधमीं संचरति । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती जातिधर्म ।’ या त्याच्या दृष्टीने वाटणाच्या ऐहिक महासंकटापायीही, अर्जुन युद्ध टाळत होता.
पण कृष्णाने त्याला युद्ध करावयास लावले. त्याचा परिणाम अर्जुनाने उपस्थित केलेल्या त्या दुसन्या प्रश्नाच्या संदर्भात काय झाला?

कुलक्षय तर झाला. पुढे कुलस्त्रियांनी स्वैर आचार केला का?त्या बिघडल्या का? त्यांच्या बाबत काय घडले?उत्तम-अधमी मिसळणे झाले का?वर्णसंकर झाला का?या बाबत अर्जुनच कृष्णापेक्षा दूरदृष्टीचा ठरला का?

युद्धोत्तर महाभारतात या बाबतचे चित्र काय दिसते?
(अ) कुरुकुलाचा नाशझाला. पाचपांडव, धृतराष्ट्र, विदुर असे नेमके कुरुपुरुष जिवंतराहिले. कुंती, गांधारी या वृद्धा. द्रौपदी, सुभद्रा आणखी एकदोन पांडवस्त्रिया आणि दुर्योधन-दुःशासन आदि कौरवांच्या विधवा स्त्रिया जिवंतच होत्या.

या सर्व कुरुस्त्रियांच्या वाट्याला शोक, दुःख अमाप आले. त्यातील कुंती-गांधारी या दोघींनी थोड्याच दिवसांत धृतराष्ट्र-विदुराबरोबर आपले देह अरण्यातील वणव्यात अग्नीला अर्पण केले.

कौरवांच्या शंभर विधवांनी, युद्धानंतर १७वर्षांनी भागीरथी नदीमध्ये जलसमाधी घेतली. पण या सर्व कुरु स्त्रियांच्या बाबतीत प्रदूषण आणि त्यातून होणारा वर्णसंकर, याबाबत अर्जुनाचे भविष्यकथन खरे झाल्याचे दिसत नाही.

ही वस्तुस्थिती लक्षात घेता, अर्जुनाने उपस्थित केलेल्या या प्रश्नाकडे कृष्णाने दुर्लक्ष केले, हेतसे आक्षेपार्ह ठरत नाही, असे म्हणावे लागेल.

(ब) मात्र दोहोंच्या विविध मित्र-देशांतील १८ अक्षौहिणी सैन्य मारले गेले. त्या विविध राज्यांमधील एवढ्या असंख्य विधवा झालेल्या स्त्रियांचे पुढे काय झाले?त्यांच्यामधील प्रदूषण, व्यभिचार, वर्णसंकर या बाबत महाभारतकार गप्प बसले आहेत. निसर्गनियमानुसार काय घडले असेल हे स्पष्ट असले तरी महाभारताने त्याची नोंद केलेली नाही.

(क) मात्र ज्या श्रीकृष्णाने युद्धोत्तर स्त्रीप्रदूषणाबद्दलच्या आणि वर्णसंकराबद्दलच्या अर्जुनाने उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, त्याच कृष्णवंशातील स्त्रियांची गत काय झाली ते महाभारतकार मौसलपर्वामध्ये मुक्तपणे लिहीत आहेत.

ही घटना महाभारतीय युद्ध झाल्यापासून ३६ वर्षांनंतरची आहे. पण तिची मुळे महाभारतीय युद्धाच्या अखेरीअखेरीसच रुजलेली आहेत. आपल्या शंभर पुत्रांच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या श्रीकृष्णाला गांधारी दुःखसंतापाने स्त्रीपर्वामध्ये शाप देते. यामध्ये त्या ३६ वर्षानंतरच्या घटनेचे मूळआहे.

गांधारी कृष्णाला त्या स्त्रीपर्वामध्ये म्हणते, “तू मोठा बहुश्रुत व चतुर असून दोन्हीकडे तुझ्या शब्दाला मान होता, तू मनावर घेतले असतेस, तर हे भांडण केव्हाच मिटले असते…कौरवांचा नाश होत असताना, मुद्दाम जाणून बुजून तु त्यांची उपेक्षा केलीस…याचे फळ तुला मिळेल. मी शाप देते. ऐक.
“ज्यापेक्षा सगेसोयरे कौरवपांडव एकमेकांच्या हातून नाश पावत असताना तू त्यांची उपेक्षा केलीस, त्यापेक्षा तूही आपल्या जातभाईंचा वध करशील, आजपासून छत्तिसाव्या वर्षी ज्याचे ज्ञातिबांधव, अमात्य व पुत्र निधन पावले आहेत, असा तू अनाथासारखा अगदी अप्रसिद्ध व ज्याकडे कुणीही ढुंकून लक्ष देत नाही असा वनात संचार करीत असता निंद्य मागनि निधन पावशील.

“आणि ज्यांचे पुत्र व ज्ञातिबांधव मरून गेले आहेत अशा तुझ्या स्त्रियाही या भारत स्त्रियांसारख्याच धरणीवर अंग टाकतील.”

गांधारीच्या या शापानुसार एवढेच घडावयाचे नव्हते. तर अर्जुनाच्या तर्कसंगत भविष्यकथनानुसार व्यभिचार आणि वर्णसंकर या गोष्टीही त्या श्रीकृष्णाच्या यादव कुलातील स्त्रियांबाबत घडून आल्या.
यदुवंशातील यादवीनंतर, यादवांच्या कुलाचा क्षय झाल्यानंतर, यादव स्त्रियांबाबत बहुधा आता ते घडणार, याची तीव्र जाणीव कृष्णालाझालेली दिसते. त्यामुळेच त्याच्या अखेरच्या क्षणी, तो यादव स्त्रियांच्या रक्षणाबद्दल अगदी हळवा होऊन काळजी घेत आहे.

तो मनात म्हणतो आहे, हतबांधव गांधारीने पुत्रशोकाने अत्यंत संतप्त होऊन जो शाप दिला, तो काळ आता प्राप्त झाला आहे.
“…. पूर्वी कुरुक्षेत्रावर सैन्ये व्यवस्थेने उभी राहिली असता, पंडुपुत्र जे बोलला, तेच आता पुढे उभे राहिले आहे.” ,
या मौसल पर्वात कृष्णाच्या यदुवंशातीलअंधक, भोज, शैनेयआणि वृष्णिया चारही कुलांतील यादवआपापसातील मद्यधुंद यादवीयुद्धात मारले गेले. राहिले फक्ते वसुदेव, कृष्ण, बलराम, दारुक आणि बभ्रु.

या प्रलयात कृष्णाला भीती निर्माण झाली ती यादव स्त्रियांची. त्याने लागलेच दारुकाला यादव स्त्रियांच्या रक्षणासाठी अर्जुनाला पाचारण्यास कुरुदेशात पाठविले. आणि तो बभूला पण म्हणाला, “तू स्त्रियांच्या रक्षणास सत्वर जा. द्रव्यलोभाने चोरबीर त्यांस मारतील कदाचित्.”
पण या ब्रभूचे आकस्मिक निधन झाले.

मग कृष्ण स्वतः बलरामाला म्हणाला, “रामा, स्त्रियांस स्वकीयांच्या स्वाधीन करून मी लवकरच परत येतो.”

त्याने द्वारकेला जाऊन पित्यास म्हटले, “लवकरचअर्जुन येथे येईल. तोपर्यंत तुम्ही आपल्या सर्व स्त्रियांचे रक्षण करावे.”

स्त्रियांचे हंबरडे व हलकल्लोळ ऐकून/पाहून तो कृष्ण त्या स्त्रियांना धीर देतो, “लवकरचअर्जुन या नगरात येईल व तो नरश्रेष्ठ तुम्हांस दुःखमुक्त करील.”

या पर्वातील पुढील कथाभागही या कृष्णवंशातील यादव स्त्रियांच्या रक्षणाबद्दलच्या काळजीचा व त्यांच्या दुर्दशेचा आहे.

बलराम व कृष्ण यांच्या मृत्यूनंतर अर्जुन द्वारकेस येतो. तो वसुदेवाला धीर देतो, “सर्व वृष्णिस्त्रिया, मुले तसेच वृद्धजन यांस मी आपल्याबरोबर इंद्रप्रस्थास नेईन, याविषयी आपण निश्चिंत असा.”
एवढ्यात वसुदेवाचे योगबलाने निधन होते. देवकी, भद्रा, रोहिणी व मदिरा या त्याच्या चार राण्या, त्याच्याबरोबर चितेवर सहगमन करतात.

आणि मगअर्जुन वासुदेव कृष्णाच्या सोळा सहस्र व इतर हजारो यादवस्त्रिया घेऊन कुरुदेशाकडे प्रयाण करतो.

पुढील कथाभाग, अर्जुनाच्या भविष्यकथनानुसार त्या श्रीकृष्णाच्या या यादव स्त्रियांच्या बाबतीत अर्जुनासमोरच घडतो

“…वाटेत पंचनद नामक एक अत्यंत समृद्ध देश लागतो, तेथे धीमान् पार्थानि मुक्काम केला. तेथे आभीर नामकरानटी लोकांची वस्ती होती. त्यांनी यादवस्त्रियांसहितच्याअर्जुनावर हल्ला केला.”
पण आता वृद्ध झालेल्या अर्जुनाला त्याची अत्रे स्मरेनात. त्याचे गांडीव धनुष्य त्याच्याने वाकेना. ‘सीदन्ति ममगात्राणिमुखं चपरिशुष्यति…वेपथुश्चशरीरे मेरोमहर्षश्च जायते, गांडीवं स्रंसते हस्तात् ‘ अशी ही त्याची तशीच अवस्था, पण वेगळ्या परिस्थितीत झाली.

‘…मग दस्यु एकेक स्त्रीचे हरण करीत असता, कुणीही त्यांचे निवारण करू शकले नाहीत. .. ते दस्यू चोहोंकडून उत्तमोत्तम सुंदरीस देखता देखता पळवीत सुटले. आणि कित्येक तरआपखुषीनेच त्यांकडे गेल्या …’

…अर्जुन बाण संपल्यावर दांडक्याने एकदोघांस मारतो आहे, इतक्यात दुसरे पुष्कळजण चोहोंकडून त्याच्यादेखत यादव अंगनांना पळवीत, याप्रमाणे त्या दस्यूंनी यादवांच्या बहुतेक सर्व स्त्रिया हरण करून नेल्या…’

… दस्यूंनी बहुतेक उत्तमोत्तम स्त्रिया व राहिलेल्यांचे रत्नखचित अलंकार लांबवल्यावर, पार्थअवशिष्ट स्त्रियांसहित मागे परतला आणि एकदाचा कुरुक्षेत्रास येऊन पोहोचला.’ राहिलेल्या यादवस्त्रियांनी नंतर काय केले?

‘.. रुक्मिणी, गांधारी, शैब्या, हेमवती आणि देवी जांबवंती यांनी अग्निप्रवेश केला. सत्यभामा व कृष्णाच्या दुसर्‍या लाडक्या स्त्रिया तपश्चर्या करण्याचा निर्धार करून वनात गेल्या
“मी त्यांना मारून टाकले आहे. तूफक्त निमित्त हो.” हे त्या श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञानी आवाहन. पण युद्धात मरून गेलेल्या वीरांच्या विधवांच्या वाट्याला या लौकिक इहलोकात काय येत असते, ते अर्जुनाला स्पष्ट दिसत होते.

युद्धात होणार्‍या कुठल्याही कुलक्षयानंतर स्त्रियांची दुर्दशा, त्यांचे आत्मदहन, त्यांचा अपहार, त्यांचा व्यभिचार, त्यांवरील बलात्कार आणि त्यानंतरचा वर्णसंकर या गोष्टी अपरिहार्यच असतात.
त्या श्रीकृष्णाने अर्जुनाच्या तर्कसंगत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. पण त्याच्याच वंशातील स्त्रियांबाबत जे घडायचे ते घडलेच.
* * *
(ड) याबाबत आणखी एक नोंद करण्यासारखीः
अर्जुनाला स्त्रियांच्या प्रदूषणाचा आणि वर्णसंकराचा प्रश्न पडतो. कृष्ण मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. याचे कारण काय असावे?

वास्तविक कृष्ण हा जन्मजात चातुर्वर्ण्य-धर्माचा कट्टर पुरस्कर्ता. ‘चातुर्वर्यं मया सृष्टम्’|हा त्याने विषमतामूलक काळा जाहीरनामा काढलेला.पण तरीही अर्जुनाच्या वर्णसंकरविषयक प्रश्नाकडे तो दुर्लक्षच करतो. याचे कारण यदु-कुरु-पुरुवंशांचा वर्णसंकराचा इतिहास त्याला तोंडपाठ असावा?

कृष्णाच्या यदुवंशात ययाति-देवयानी, कृष्ण-जांबवंती, उषा-अनिरुद्ध असे वर्णसंकर आढळतातच.
आणि अर्जुनाच्या कुरु-पुरु वंशात तर वर्णसंकराची मालिकाच सापडते. त्यांचा वर्ण शुद्ध कधीच राहिलेला नाही. या वंशाची प्रजा वर्णसंकरातूनच निर्माण झालेली दिसते.

पुरुरवा-उर्वशी, ययाति-देवयानी, ययाति-शर्मिष्ठा, मिश्रकेशी-अप्सरा, दुष्यंत-शकुंतला, भरद्वाज-भूमन्युमाता, शंतनू-गंगा, शंतनू-सत्यवती, पराशर-सत्यवती, व्यास-अंबिका, व्यासअंबालिका, व्यास-दासी, कुंती-सूर्य, कुंती-यम (विदुर?), कुंती-वायु, कुंती-इंद्र, माद्री-अश्विनीकुमार, भीम-हिडिंबा, अर्जुन-उलुपी अशी ही कुरु/पुरुवंशातील ख्यातकीर्त वर्णसंकरितयुगुले. स्वतः अर्जुन संकरातून झालेला. याज्ञसेनी द्रौपदी, हीपण याज ऋषीने द्रुपदाच्या यज्ञात निर्माण केलेल्या होमद्रव्यातून (?) निर्माण झालेली, म्हणजे संकरजच. या कुरु/पुरु कुळाचा देव, दानव, राक्षस, नाग, गंधर्व, अश्विनीकुमार, दासी, सूत, अप्सरा, ब्राह्मण, धीवर, भिल्लिणी, ऋषिकन्या अशा अनेक वर्षांतील स्त्रीपुरुषांशी संकर होत आलेला. कुठे गांधर्व विवाह, कुठे नियोग, कुठे ऋषिसेवा, कुठे वराने मिळालेला भोग, कुठे यज्ञाचे आवरण, कुठे नावेतील स्वैर संभोग. बहुतेक सारी ही वासनाशरणतेची प्रकरणे आहेत. अशा वासनाशरणतेत वर्णसंकराची फिकीर कोणी केली होती?

कृष्णार्जुनासहित हे सारेच वर्णाश्रमधर्माचे पुरस्कर्ते. व्यवसायाच्या बाबतीत ‘स्वधर्मे निधनंश्रेयः।…स्वे स्वे कर्मण्यभिरतः … वर्णविशेखे…। करिती कर्म अशेखे।’ अशी त्यांची पालुपदे. पण विषयाच्या झंझावातातया स्त्री-पुरुषांना कुणाचा कुठला वर्ण याचे भान असण्याचे कारणच नसते. त्यातून होणारा वर्णसंकर त्यांनी बिनधास्तपणे स्वीकारलेला असतो. युद्धानंतरच वर्णसंकर होतो असे नाही. तो नेहमीच होत आलेला असतो.

या पुरु/कुरूंच्या राजदरबारातील गुरु द्रोण आणि आचार्य कृप या राजगुरूंची निर्मितीही वर्णसंकरातूनच झालेली. शरद्वान ऋषी आणि जानपदी अप्सरा यांच्या संकरातून कृप आणि कृपी, भरद्वाज ऋषी आणि घृताची अप्सरा यांच्या संकरातून द्रोणाचार्य, आणि संकरज द्रोणाचार्य आणि संकरज कृपी यांच्या संकरातून अश्वत्थामा अशी ही पुरु/कुरूंच्यागुरुकुलाचीही संकरित वर्णपरंपराआहे.

एवढा हा कौरव-पांडवांच्या पुरुकुलातील आणि त्यांच्याच राजदरबारातील गुरुकुलातील वर्णसंकराचा ऐतिहासिक दस्तऐवज पाहिल्यानंतर अर्जुनाने उपस्थित केलेल्या युद्धोत्तर स्त्रियांच्या प्रदूषणाबद्दल, स्वैर वर्तनाबद्दल आणि त्यातून घडणाच्या वर्णसंकराबद्दल, कृष्णाने मिठाची गुळणी घ्यावी हेच सयुक्तिक नाही काय?

प्रा. माटे मास्तरांनी वरील सर्व मदनपीडित वर्णसंकराची युगुले पाहिल्यानंतर मिस्किलपणे असेच म्हटले असते ना?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.