अनोखा उंबरठा

लेखक : वि. गो. कुळकर्णी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, मूल्य : ६० रुपये

आमच्या मित्राला ‘अनोखा उंबरठा’ हे पुस्तक अतिशय आवडले, म्हणून त्याने आमच्यासह आणखी काही इष्टमित्रांना ते चक्क सप्रेम भेट दिले. पुस्तक अगदी ताजे म्हणजे १ मे १९९७ रोजी प्रथमावृत्ती निघालेले! झपाटल्यासारखे वाचून काढले अन् मित्राच्या निवडीला व भेट देण्यातील कल्पकतेला मनोमन दाद दिली.

‘अनोखा उंबरठा’ हे पुस्तक वि.गो. कुळकर्णी ह्यांनी लिहिलेल्या विज्ञानविषयक चिंतनपर ललित निबंधांचा संग्रह आहे. १९९५ मध्ये दैनिक ‘लोकसत्ते’त दर रविवारी हे सदर प्रसिद्ध होत असे. जवळजवळ ५२ लेखांचा हा संग्रह पुस्तकरूपाने आज वाचकांसमोर सादर होत आहे. लेखकाची संपूर्ण कारकीर्द टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भौतिकशास्त्रात संशोधन करण्यात गेली. चौफेर व्यासंग, कुशाग्र बुद्धिमत्ता, इतिहासाचे तसेच शास्त्रीय संगीताचे ज्ञान, संस्थेत काम करताना नामवंत व्यक्तींशी, शास्त्रज्ञांशी झालेला परिचय, परिषदेच्या वा अन्य कामानिमित्त अनेक देशांचा केलेला दौरा ह्यांतून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले आहे. ह्याचा प्रत्यय हे छोटेखानी लेख वाचताना पदोपदी येतो.

आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत हे आज इतक्यांदा वेगवेगळ्या माध्यमांतून कानांवर आदळतंय की मनात प्रश्न निर्माण होतात की ह्यापूर्वी आपण इतकी शतके नाही का ओलांडली? त्यावेळी त्या लोकांनी त्या त्या शतकाचे स्वागत नाही का केले? शतकांचे उंबरठे ओलांडण्याचा भक्कम अनुभव पाठीशी असताना एकविसाव्या शतकाची आपल्याला एवढी भीती का वाटते? येऊ घातलेल्या एकविसाव्या शतकाचे आम्हाला एवढे वारेमाप कौतुक कशाला?

ह्याचे उत्तर असे की खुद्द विसावे शतक अतिशय धामधुमीचे गेले (जात आहे). दोन राक्षसी महायुद्धे आणि जीवघेणा तणाव या शतकाने पाहिला. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांची झपाट्याने प्रगती झाली. (शतकाच्या उंबरठ्यावर म्हणजे १९०३ साली राइट बंधूंनी इवलेसे विमान उडवून दाखवले आणि फक्त ६६ वर्षांनी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले.) ह्या प्रगतीपोटी समाजजीवनाचा ऱ्हास होत चालला. कुटुंबसंस्था, न्यायसंस्था, शासनसंस्था आणि शिक्षणसंस्था मोडकळीस आली. विसाव्या शतकाने जे धिंडवडे काढले त्यावरून भविष्याचा अंदाज घेताना अंगावर शहारे येतात.

ह्या पार्श्वभूमीवर, उंबरठा ओलांडल्यावर माझ्या वाट्याला काय येणार? माझा वारसा कोणता? माझ्या स्वागताला काय असणार आहे? तिसरे महायुद्ध, सद्दाम हुसेन, इथियोपिया, सोमालिया आणि बोस्नियातली रणधुमाळी की पेनिसिलिनचं पेटंट घ्यायला नकार देणारे अलेक्झांडर फ्लेमिंग, गांधीजी आणि त्यांच्या पंक्तीला बसू शकणारे महात्मे? …’ (पृ. ८) याविषयी भीतिमिश्रित कुतूहल, उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे.

जर आमचे एकविसाव्या शतकातले पदार्पण हे ‘सुखरूप’ आणि ‘यशस्वी व्हायचे असेल तर विसाव्या शतकात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती एकविसाव्या शतकात न करण्याची खबरदारी आम्ही घ्यायलाच हवी.

विसाव्या शतकात आम्ही सारीच नाती बाजारी केली. त्यामुळे जीवनाचाच बाजार झाला तो थांबवायला हवा, तज्ज्ञ व्यक्तींना प्रामाणिकपणे, कोणतेही दडपण न घेता उपलब्ध पुराव्याचा अर्थ, वैज्ञानिक पुराव्यांची विश्वासार्हता आणि मर्यादा यांचे भान ठेवून लावता आला पाहिजे, नवीन आणि जुने यांचा संगम व्हायला पाहिजे, (अँटिबायोटिक्स आणि आजीबाईचा बटवा दोन्ही संग्रही ठेवायची असतात), आमच्या व्यापाऱ्यांना, कंपन्यांना, शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना स्वत:च्या सरकारचा तरी खात्रीलायक विश्वासार्ह पाठिंबा सातत्याने मिळायला हवा, कोणतेही क्षेत्र असो उत्कृष्टतेसाठी जीव तोडून परिश्रम करण्याचा संस्कार व्हायला हवा, भाषा असो, विज्ञान असो अगदी हस्ताक्षर असो आम्ही उत्कृष्टतेसाठी हट्ट धरायला हवा, असत्याची परिणती हे नेहमी विनाशातच होते हे लक्षात ठेवायला हवे. साक्षरतेची मोहीम घ्या, कुटुंब नियोजनाची मोहीम घ्या, सर्व सुधारणा केवळ कागदावरच, हे चित्र बदलायला हवे. शिस्त, कष्ट, सत्याला सामोरे जाण्याचा निर्भय निर्धार आम्ही करायला हवा, देशप्रेम हे मूल्य आहे ह्याची जाण ठेवून बुद्धिमान तरुण मुले जी वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडून परदेशात स्थायिक होण्याच्या उद्देशाने रवाना होताहेत ह्याला आवर घातला पाहिजे, विद्या संपादन करताच कुठल्याही मोहात न पडता मायदेशी कूच करण्याची विद्याहरणाची परंपरा पुन्हा एकदा उजळ करायला हवी, विविध क्षेत्रातील व्यक्तींना तसेच संस्थांना दिलेले अनुदान म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे ही सामाजिक जाणीव तीव्र व्हायला हवी. उच्च तंत्रज्ञान आयात करायला हरकत नाही, परंतु तंत्रज्ञान ही वस्तू नाही तर गुंतागुंतीच्या प्रक्रियांचे ज्ञान आहे; ते विकत घेणे याचा अर्थ आमच्या तंत्रज्ञांना हे सारे ज्ञान खरेदी करता आले पाहिजे हे लक्षात ठेवायला हवे.

ही आणि इतर अशी अनेक पथ्ये जर आम्हाला पाळता आली तर एकविसाव्या शतकातील आमचे पदार्पण हे निश्चितच सफल होईल. आमच्याजवळ काहीच ठेवा नाही, संचित नाही, कुठलेच भांडवल नाही असे समजण्याचे कारण नाही. विज्ञान, तंत्रज्ञान आणि माणसाचा शहाणपणा यांतून उदयाला येणाऱ्या नव्या घडीचे साम्राज्य एकविसाव्या शतकात दिसेल. ही घडी परस्पर सहकार्य व विश्वास या दोन भक्कम खांबांवर उभारलेली असेल असा दुर्दम्य आशावाद लेखकाने व्यक्त केला आहे.

पुस्तकात वेळोवेळी निवेदनाच्या ओघात अनेक नावे येतात त्यांची थोडीशी माहिती तळटीपेत दिली असती तर फायद्याचे झाले असते असे वाटते. उदा. शि.म. परांजपे, राजाभाऊ कुंदगोळकर, पुरुषराज आळुरपांडे, मोरोपंत, म्हादबा मिस्त्री इ. इ. ह्यातील काही नावांशी जरी परिचय असला तरी सर्वच नावे परिचयाची नाहीत. त्यामुळे पुस्तकाला कोणताही उणेपणा येत नाही. विसाव्या शतकाचे मूल्यमापन करता करता एकविसाव्या शतकाचे संभाव्य चित्र रेखाटण्यात लेखक पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.