पत्रव्यवहार

श्री बाबूराव यांस सप्रेम नमस्कार
सुधारकचा जूनचा अंक तीन आठवड्यांपूर्वी माझ्या हातात आला त्यात तुमचा लेख वाचला. सध्या बरेच दिवसांपासून माझे वास्तव्य हैदराबादला असल्यामुळे पूर्वीच्या अंकांतून तुमचे व श्री कुळकर्णी यांचे काय लिखाण आले आहे ते कळले नाही. त्याचा संदर्भ न घेता काही विचार सुचले ते लिहीत आहे.
चर्चा करण्या अगोदर define your terms” अशी मागणी करणे रास्तच आहे. पण प्रत्येकाने स्वत:पुरत्या वेगळ्या व्याख्या केल्या तर अनवस्था माजेल. अशी काहीशी अवस्था हिंदुत्व या शब्दाबद्दल झालेली आहे. हिंदू असण्याचा भाव म्हणजे हिंदुत्व असा सोपा अर्थ आता राहिलेला नाही. हे फक्त उदाहरण म्हणून दिले.
तुम्ही रूढी आणि परंपरा या शब्दांमध्ये जो फरक सांगितला आहे तो रूढ झालेला अर्थ असेल असे वाटत नाही. तो तसा रूढ होण्यात अडचणीही आहेत. पूर्वीच्या पैकी आज जे पूर्णपणे प्रचलित आहे ती परंपरा, जे लुस होत चालले आहे ती रूढी या तुमच्या अर्थाला अनुसरणारा भाषासंकेत नाही, उलट ‘शास्त्राद् रूढिर्बलीयसी’ या वाक्यात रूढीचेच चालू प्राधान्य सांगितले आहे, शिवाय ‘गेले ती रूढी’ ‘राहिले ती परंपरा’ असे म्हणण्याने इच्छित मूल्यांचा काही संबंध राहात नाही. जे बुडाले ते चांगल्याकरताच बुडाले, जे बुडते ते चांगल्याकरताच बुडते अशी भूमिका घेतली तर परकीयसंस्कृती आमच्या संस्कृतीला नष्ट करत आहे ही ओरड निरर्थक होईल आणि परंपरेपैकी आज जे जिवंत आहे ते राखण्याकरता किंवा घालवण्याकरता काही करायचे आहे हा विषयही निरर्थक होईल.
“तुका म्हणे उगी राहावें । जें जें होईल ते पाहावे’ अशी भूमिका इहवादी बुद्धिवादी आणि चळवळवादी घेऊ शकत नाही. जे गेले आणि जे हयात आहे त्याचे प्रत्येकी दोन भाग करावे लागतील.
*१. बाबूराव म्हणजे श्री. मा. गो. वैद्य
गेले ते (रूढी)
जे ठेवण्यालायक होते
जे घालवण्यालायकच होते
राहिले ते (परंपरा)
जे ठेवण्यालायक आहेजे घालवण्यालायक आहे
अशी विभागणी करून कार्याची दिशा ठरवावी लागेल. वेळोवेळी लोकांनी केलेल्या कार्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. विवेकानंद, फुले, लोकहितवादी, आंबेडकर, महर्षि कर्वे, सगळ्यांनीच काही जुन्याला धक्का देऊन मोडीत काढले आहे. त्यांनी एका वेळच्या परंपरेला धक्का दिला म्हणूनच आज आपण “कशाला त्या जुन्या रूढींची चर्चा करता’ असे म्हणू शकतो. आजपर्यंत जिवंत राहिलेल्या काही परंपरांवर आज जो कोणी हल्ला करतो तो विवेकानंद-फुले-आंबेडकर-महर्षि कर्वे-काळकर्ते परांजपे यांचीच परंपरा पुढे चालवत असतो.
दिल्लीचे एक बुद्धिवादी प्राध्यापक सतीश साबरवाल यांच्या Roots of Crisis या ग्रंथात भारतीय परंपरा व युरोपीय परंपरा यांच्यात काय फरक आहे, यूरोपच्या अंगी विश्व जिंकण्याची जी शक्ती आली तिची मुळे १५०० वर्षांपूर्वीपर्यंत कशी जातात याचे विवेचन आहे. तशी पोषक परंपरा आपल्याकडे कशी नव्हती याचीही चर्चा आहे. मी त्या पुस्तकाचे परीक्षण केले. काही मुद्यांची तारीफ केली. पण काही मुद्यांबद्दल तीव्र असहमती व्यक्त केली. ती वाचून साबरवाल यांनी माझ्याशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. दोन दोन पत्रे आली-गेली. गेल्या आठवड्यातच त्यांचे आणखी एक पत्र आले व काल दुसर्या एका लेखकाच्या पुस्तकातले उतारेही त्यांनी पाठवले. या सगळ्याचा अभ्यास करूनच त्यांना उत्तर पाठवीन.
पुष्कळशा लेखकांच्या या मताशी मी सहमत आहे की भारताची जी जुनी समाजव्यवस्था आहे तिचा आणि जी समाजव्यवस्था आता रूढ होऊ पाहात आहे (समान कायदे, समान नागरिकत्व, एका फार मोठ्या समाजाची सुगम बांधणी, या सर्वांमुळे देशाच्या एका कोपन्यापासून दुसन्यापर्यंत पसरणारे विश्वासाचे जाळे) त्या नव्या समाजव्यवस्थेचा मेळ बसत नाही. जुन्या समाजव्यवस्थेतून आणि तिच्या आधाराने ही नवीन समाजव्यवस्था विकसित होणारी नाही आणि म्हणून एक crisis निर्माण होत आहे.
असो. अनेक शुभेच्छा!
तुमचा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.