पत्रव्यवहार

पुरोगामित्वाचे बुरखे
संपादक, आजचा सुधारक
नुकताच या संक्रातीच्या व हळदीकुंकवाच्या मोसमात दोनतीन ठिकाणी जाण्याचा योग आला. विशेष उत्सुकतेने मी सामील झाले, कारण विधवेलाही आमंत्रण करण्याचे पुरोगामी विचार स्त्रीवर्गाने दाखवल्याने विशेष आनंद वाटला. परंतु तेथे गेल्यावर कुंकू लावणे, वाण देणे व ओटी भरणे या मुख्य कार्यक्रमातून विधवांना वगळून त्यांना तिळगुळाचा प्रसाद केवळ देण्यात आला हे पाहून मन विषण्ण झाले. म्हणजे जेवायला बोलावून मुख्य पक्वान्न न वाढता, वरणभातावर बोळवण केल्याचा पंक्तिप्रंपच केल्याने उपेक्षेचे दुःख वाट्याला आले. यावरून तथाकथित पुरोगामित्वाचे बुरखे ल्यालेल्या स्त्रीसमाजाने अजूनही त्याच पक्षपाती व अपमानकारक परंपरा जपून ठेवलेल्या दिसल्या व काही कटु सत्ये लक्षात आली ती अशी :
१. स्त्रीला तिच्या पतीच्या अस्तित्वाचे कवच नसेल तर तिला स्वतंत्र म्हणून किंमत दिली जात नाही. जरी लंगडालुळा, मनोरुग्ण, व्यसनाधीन, गुन्हेगार व निकम्मा कसाही नवरा असला तरी तिला सौभाग्यवती म्हणायचे. मग स्वकर्तृत्वाने तळपणाच्या, शिक्षणाने सुसंस्कृत व समाजोपयोगी कामे करणार्या् व स्वतःचे एक निश्चित व आदरणीय स्थान स्वकष्टाने साध्य केलेल्या स्त्रीला सौभाग्यवती का म्हणू नये?केवळ नवरा नाही म्हणून?
२. जरी विधवा स्त्रीने कुंकू लावण्याची पद्धत चालू ठेवली असली तरीही तिला कुंकू न लावणे हा तिच्या स्वतंत्र मनोवृत्तीचा व व्यक्तित्वाचा अपमान आहे.
३. मूठभर गहू, चार बोरे व गाजराचे तुकडे आणि रुपया दोन रुपयाचे वाण जे बर्या च सौभाग्यवती घरी आणून टाकून देतात किंवा मोलकरणीला देतात ह्यात त्या सौभाग्यवाणाचा मान कुठे राखला जातो?
हा सर्व प्रकार पाहिल्यावर असे वाटले की हे मिळमिळीत व ढोंगी पुरोगामित्व, नकोच. त्यापेक्षा गेल्या शतकातील ढळढळीत अंधश्रद्ध रूढिप्रियता बरी.
७६, फार्मलॅण्ड रामदासपेठ. नागपूर-१० सुनीला थेरगावकर

माननीय संपादक, आजचा सुधारक
आपल्या आजचा सुधारकचा नोव्हेंबर १९९७ चा अंक पूर्ण वाचला. अंक नेहमीप्रमाणेच विचारांना चालना देणारा आहे. तरी या अंकातील एका विशिष्ट लेखाने मला पत्र लिहिण्यास उद्युक्त केले.
श्री. यशवंत ब्रह्म यांचा ‘सार्वजनिक स्वच्छता’ हा लेख वाचून माझ्या बर्याचच स्मृति जागृत झाल्या. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवात पूज्य विनोबाजींचे नाव अभावानेच तळपले. तसेच सन्माननीय कृष्णदास शहांचे नावही विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ लागले होते परंतु श्री. यशवंत ब्रह्म यांनी त्यांच्या कामाची साद्यंत माहिती देऊन माझ्यासारख्यांनाखूपच आनंद दिला.
माझे पती श्रीरंग कामत वयाच्या १८ व्या वर्षापासून ८२ व्या वर्षापर्यंत सतत देशसेवेत मग्न होते. त्यांपैकी १९५२ ते १९५५ ही तीन वर्षे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी, चिक्कोडी व रायबाग ह्या तालुक्यांत कार्यरत झालेल्या ‘समाज विकास योजने’चे (कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे) विकास योजनाधिकारी म्हणून काम करीत होते. (संपूर्ण आयुष्यात त्यांनी केलेले सरकारी काम हे एवढंच. त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणेखादीच्या कार्याला वाहून घेतलं.)
त्यावेळी श्री. कृष्णदास शहांचा आमच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आला. शहाजींच्या कामाचं महत्त्वच तसं असल्यामुळे रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी नावाच्या गावात शहाजींच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवकांसाठी सफाई शिबिर आयोजित केले होते. १५ दिवसांत अक्षरशः त्या गावाचा कायापालट झाला. कामतांनी या कामाचा पाठपुरावा करून स्वतःच्या कारकीर्दीच्या तीन वर्षांत अनेक गावांत अशा प्रकारची शिबिरे आयोजित केली.
नंतरच्या काळात कृष्णदासजींचे आणि आमच्या कुटुंबाचे संबंध फारच जवळिकीचे झाले. यातून आमच्या आणखी एका मित्राच्या चिरंजीवांना शहाजीकडे शिकण्यासाठी जाण्याची प्रेरणा मिळाली. तो आजही कर्नाटक युनिव्हर्सिटीच्या N.S.S. कॅम्पमध्ये या कामाची माहिती व प्रेरणा देत असतो. सतत २५ वर्षे तो हे काम करीत आहे. या ५० वर्षांच्या तरुणाचे नाव श्री. अशोक देशपांडे, बेळगाव जिल्ह्यातील अनेक प्रकारच्या सामाजिक कामांत त्याचा सहभाग असतो.
१९५७ च्या बेंगलोरला झालेल्या काँग्रेस अधिवेशनात सफाईचे काम करण्यासाठी कृष्णदासजींचे तीन शिष्य आले होते. त्यांनीही अनेक नव्या गोष्टी आम्हाला दाखविल्या. साधी हिराची झाडू! (नारळाच्या पानाच्या काड्यांना आमच्याकडे हीर म्हणतात.) एका विशिष्ट पद्धतीने बनवली तर वर्षानुवर्ष टिकते हे त्यांनी आम्हाला दाखवून दिले. होते. त्यांनी मला बनवून दिलेली झाडू दोनेक वर्षांनी निरुपयोगी झाल्यावर मला खूप वाईट वाटले होते! पण आता तेवढ्या श्रमांनी झाडू कोण तयार करणार? Use and throw चे दिवसहे! त्यामुळे काड्या एकत्र करून नायलॉनच्या दोरीने बांधल्या की झाला झाडू तयार!
जुन्या स्मृतीना उजाळा देण्याची प्रेरणा देणार्‍या श्री यशवंत ब्रह्म यांच्या लेखाबद्दल आभारी आहे.
प्लॉट नं. ५६, विद्यानगर विस्तार, टिळकवाडी, बेळगाव : ५९००६ प्रमिला कामत

संपादक, आजचा सुधारक
जाने. ९८ च्या आजचा सुधारकच्या अंकात श्री. र. वि. पंडित यांचा शास्त्रीय वैद्यकशास्त्र व पर्यायी वैद्यक यावरचा लेख वाचला. त्यांनी अनेक पुरावा-रहित विधाने केली
आहेत.
१. पाश्चात्त्य वैद्यक मानवी शरीराला एक यंत्र म्हणून समजते. या विधानापेक्षा दुसरा सत्यापलाप शोधणे कठीण आहे. मानवी शरीराचा त्याच्या बिघाडांच्या व बिघाडावरील उपचारांचा शास्त्रीय वैद्यकात विविध अंगांनी अभ्यास झाला आहे. उदा. शरीराचे भौतिक गुणधर्म व त्यातील जैव-रासायनिक क्रिया, गर्भ-शास्त्र, आनुवांशिकता-शास्त्र, जंतुशास्त्र, पर्यावरणाचा शरीरावर व आजारावर होणारा परिणाम-विष-शास्त्र, औषधि-शास्त्र, मानसशास्त्र, मनाचे शरीरावर होणारे परिणाम, जैव-संख्याशास्त्र, आहार-शास्त्र, व्यायामशास्त्र, रोग-प्रतिकारक-शक्तिशास्त्र, शास्त्रीय वैद्यक हेच खर्याा अर्थाने ‘होलिस्टिकआहे. पण त्याला नावे ठेवण्याची आपल्याकडे फॅशन झाली आहे.
२. नैसर्गिक पद्धतीने उपचार म्हणजे काय?याचा खुलासा श्री. पंडित यांनी केलेला नाही. तसेच ते असे विधान करतात की आयुर्वेदिक, युनानी, तिब्बी व चिनी औषधे व उपचारपद्धती – सूचिवेधनासकटर्याअ सर्वांची गुणवत्ता उत्तम आहे याबद्दल आता शंका घेतली जात नाही. या विधानाला आधार काय? आता म्हणजे कधीपासून? कोण कोण शंका घेत
नाही?मी स्वतः तरी नक्की शंका घेतो!
शंका न घेणे हा एक मोठा दुर्गुण आहे. शास्त्रीय वैद्यकातील जुन्या गृहीतकांची, . जुन्या स्वीकृत उपचारपद्धतीची व औषधांची पुनःपुनः फेरतपासणी केली जाते. इतर पर्यायीउपचारपद्धतींचा उपचारक व रुग्ण दोघांकडूनही श्रद्धेने स्वीकार केला जातो, शंका घेतली जात नाही, त्यामुळेच या उपचार पद्धतीची प्रगती थांबली आहे. याउलट वारंवार शंका घेणे, एका शास्त्रज्ञाने किंवा प्रयोगशाळेने लावलेल्या शोधांची इतर अनेक प्रयोगशाळांनी पडताळणी घेणे व त्या दाव्याची सत्यता पारखून पाहणे यांसारख्या गोष्टींनी तर शास्त्रीय वैद्यक विश्वासार्ह बनले आहे, प्रगतिशील बनले आहे.
याउलट श्रद्धा व धूसरता हीच पर्यायी उपचारपद्धतीची बलस्थाने आहेत. या उपचारपद्धतींची शास्त्रीय कसोटीवर उपयुक्तता सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे या उपचारपद्धतींना हानिकारक ठरते. कारण एखादे औषध किंवा अन्य उपचार शास्त्रीय वैद्यकात दाखल होतात, व त्यावरील पर्यायी वैद्यक पद्धतीची मक्तेदारी संपते. उलट एखादे औषध शास्त्रीय कसोटीवर निरुपयोगी किंवा हानिकारक ठरल्यास ते औषध वापरणे बंद करावे लागेल. अशा रीतीने सर्वच पर्यायी उपचारांची/औषधांची तपासणी—संशोधन झाल्यास सर्व उपयोगी औषधे शास्त्रीय वैद्यक स्वीकारील, व सर्व निरुपयोगी औषधे वापरणे बंद करावे लागेल. मग पर्यायी उपचारपद्धतीमध्ये काय शिल्लक राहील?तेव्हा अशा रीतीने आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याची पर्यायी उपचारकांची तयारी नसणे साहजिकच आहे. तेव्हा पर्यायी उपचारक किंवा श्रीमंत आयुर्वेदिक औषधिनिर्माते आपल्याऔषधांचे शास्त्रीय परीक्षण करून घेण्यास कधीही तयार होणार नाहीत.
३. आर्थिकदृष्ट्या इतर पिकांपेक्षा अधिक लाभदायक नसेल तर कोणता शेतकरी औषधी वनस्पतींची लागवड करील?
४. आयुर्वेदातील काही औषधे उपयुक्त ठरली म्हणजे आयुर्वेदाचा सिद्धान्त सिद्ध झाला असे होत नाही. काही औषधे उपयुक्त ठरणे हा केवळ योगायोगाचा व परंपरागत अनुभवाचा भाग असू शकेल. कफ-वात-पित्त यांच्या कमी जास्त प्रमाणांमुळे रोगांचा उद्भव होतो हा सिद्धान्त जोपर्यंत आधुनिक शास्त्रीय पायावर सिद्ध होत नाही, तोपर्यंत आयुर्वेद शिकणे-शिकवणे व वापरणे या अंधश्रद्धेच्या गोष्टी होत. आजतागायत तरी अनॅटमी, फिजिऑलजी, बायोकेमिस्ट्री, पॅथालजी, इम्युनॉलजी, जेनेटिक्स वगैरे व इतर कोणत्याही जीवशास्त्राच्या शाखांमधील संशोधनात कफ-वात-पित्त यांच्या अस्तित्वाला दुजोरा मिळालेला नाही.
५. सूक्ष्म जंतु (बॅक्टीरिया, फंजाय्, व्हायरसेस वगैरे) विकरे (एन्झाइम्स्), रोगप्रतिकारशक्ती व विविध लसी (Immunology व Immuno-therapy) या व इतर अनेक गोष्टींच्या अस्तित्वाकडे आयुर्वेद किती दिवस डोळेझाक करणार?जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांमध्ये होणार्याव सर्वांगीण प्रगतीपासून आयुर्वेद किती दिवस अलिप्त राहणार? या सर्व शास्त्रीय प्रगतीबद्दल आयुर्वेदाची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे, कारण हे सर्व नव-नवीन शास्त्रीय ज्ञान व वैज्ञानिक विचार-पद्धती आत्मसात केल्यास आयुर्वेदाचे रूपांतर शास्त्रीय वैद्यकात होईल. म्हणजे आयुर्वेदाच्या स्वतंत्र आस्तित्वालाच धोका निर्माण होईल. उलटपक्षी या सर्व शास्त्रीय ज्ञानाकडे व वैज्ञानिक विचारपद्धतीकडे दुर्लक्ष केल्यास आयुर्वेदाची सर्व प्रगती थांबते व विश्वासार्हता धोक्यात येते. होमिऑपथी व इतर सर्व पर्यायी वैद्यकांची देखील अशीच पंचाईत झाली आहे. या शृंगापत्तीतून मार्ग काढणे हे पर्यायी वैद्यकांच्या आचार्यांना व प्रेमींना एक मोठे आव्हान आहे.
सर्वसाधारण नागरिकाने निवड करताना भावनात्मक दृष्टिकोन न ठेवता सम्यक्वैज्ञानिक निकष वापरावे. आयुर्वेद आपला व शास्त्रीय वैद्यक पाश्चात्त्य म्हणजे परकीय असा विचार नसावा.
२५ नागाळा पार्क डॉ. सुभाष आठले
कोल्हापूर ४१६००३.

दिवाकर मोहनींनी लिहिलेल्या ‘समान नागरी कायद्याचा मसुदाः एक चिकित्सा : १-२’ (आ. सु. जाने. फेब्रु. ९७) या टिपणांवर अभिप्राय.
क्वचित काही व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी समलिंगी विवाहाची आवश्यकता वाटते म्हणून, अशा विवाहांना सरसकटपणे कायदेशीरपणा देणे योग्य होणार नाही. आपल्या समाजातील व्यवहारात असलेले स्त्रीपुरुषसंबंध, त्याबद्दलच्या संकल्पना, व्यक्तीव्यक्तीमधील सर्वसमावेशक नात्याबद्दलच्या अपेक्षा आणि त्या पूर्ण होण्याबाबतीतले वास्तव, त्याचे व्यक्तिजीवनावर, समाजजीवनावर होणारे परिणाम, अशा अनेक मुद्द्यांच्या संदर्भातच समलिंगी व्यक्तींच्या विवाहाचा कायदेशीरपणाबद्दल विचार करावा लागेल. तसा विचार करता अशा विवाहांना कायदेशीर मान्यता मिळू नये.
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबरोबरीने, बहुपत्नी-पतिकत्वाला कायदेशीर मान्यता देणे, विवाहसमयी वधूवरांचे वय १८-२१ पेक्षा कमी असल्यास एका अर्थी तारुण्यात पदार्पण करण्याच्या वयातच विवाह होण्यास कायदेशीर मान्यता, वेडसर लोकांना विवाह करण्याचा कायदेशीर अधिकार या सर्व एकत्र आल्या तर व्यक्तीचे आणि समाजाचे स्वास्थ्य, स्थैर्य धोक्यात येईल. बेवारशी, निराधार, गरीबाघरचे स्त्रीपुरुष, मुलगे, मुली यांच्या जीवनावर त्याचे विपरीत परिणामहोतील. आर्थिक, सामाजिक, धार्मिक सत्तेच्या बळावर स्त्रीपुरुष आणि मुले-मुली यांच्या जीवनावर बेबंद अधिकार गाजविण्याचे, त्यांच्यावर अन्याय करण्याचे साधन उपलब्ध करून दिल्यासारखे होईल. त्याची कल्पना आपण करू शकतो.
समलिंगी विवाह, बहुपति-पत्नीकत्व, लहानवयातील विवाह, वेडसर व्यक्तींच्या विवाहाला मान्यता या गोष्टींचा पाठपुरावा तुम्ही जेव्हा करता तेव्हा आपला समाज हा एक विशिष्ट पातळीपर्यंत सुसंस्कृत, बुद्धिमान, न्याय-अन्यायाची जाण असलेला, स्वतःच्या स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवतानाच दुसर्यायच्या स्वातंत्र्याचाही मान ठेवणारा वगैरे वगैरे आहे असे गृहीत धरीत आहात असे दिसते.
प्रत्यक्षात स्त्रीपुरुषांमधले नाते, व्यक्ती-व्यक्तींमधले नाते, व्यक्तीच्या गरजा, ऊर्मी, स्वातंत्र्य, व्यक्ती आणि समाज यांचे नाते यांबाबतीत संवेदनशील, सुसंस्कृत, प्रगल्भ विचार असलेल्यांची संख्या मूठभरही नाही. ही संख्या जसजशी वाढत जाईल, जेवढ्या प्रमाणावर वाढत जाईल त्या प्रमाणात कायद्याच्या बंधनाची गरजही पडणार नाही. आपल्या सगळ्यांनाच अशा प्रगल्भ समाजाचीच आस लागलेली आहे. ती कधी पुरी होणार कोण जाणे. आर्थिक इष्टताच नव्हे तर वैचारिक इष्टताही. प्रगत समजल्या जाणार्या समाजांमध्ये वास्तवही आपल्यापेक्षा फारसे वेगळे नाही. म्हणूनच त्यांनाही कायद्याची मदत घ्यावीच लागते.
या चर्चेला मुळाशी मुद्दे आहेत ते, एकूण मानवी जीवनातील अनेक गोष्टींपैकी लैंगिक ऊर्मी, शरीरसंबंधांना दिले जाणारे महत्त्व, या संबंधांचे व्यक्तीवर आणि दुसन्यावर होणार्या अन्यायांचे निराकरण करण्याची, त्यांची किंमत योजण्याची तयारी असणे, तेवढी नैतिक धारणा असणे, न्याय अन्यायाबद्दलची चाड, स्वतःच्या कर्तव्यांबद्दलची सशक्त जाणीव यांच्याशी जोडलेले आहेत. स्वतःचे स्वातंत्र्य उपभोगताना, त्याचा आग्रह धरताना दुसर्यायचे स्वातंत्र्य, स्वास्थ्य ओरबाडून घेत नाही ना, याबद्दलच्या जाणिवा प्रगल्भ कशा होतील याची काळजी घेतली पाहिजे. या सर्वच मुद्द्यांबद्दल समाजाचे प्रबोधन होणे ही आजची फार मोठी गरज आहे. स्वातंत्र्याची मागणी करतानाच कर्तव्य, न्याय, माणुसकी, जबाबदा-यांचा वाटाही उचलला गेला पाहिजे याबद्दल अतिशय जागरूक राहाणे आवश्यकआहे.
स्वभाववैचित्र्य किंवा नव्यानेच झालेली स्त्रीस्वातंत्र्याबद्दलची चुकीची समज यामुळे काही ठिकाणी स्त्रिया उद्दामपणाने वागताना दिसल्या तरी सर्वसामान्यतः स्त्रियांची होरपळ होताना दिसते. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होताना दिसतात. काही अशास्त्रीय आणि चमत्कारिक समजुतींमुळे, हातातील सत्तेचा वापर करून वेडसर, नालायक स्त्रीपुरुषांचे विवाह होताना दिसतात. त्यामुळे आयुष्यभर यातना सोसाव्या लागताना दिसतात. ही यादी खूप वाढत जाणारी आहे अशा परिस्थितीत कायदे करायचे ते समाजातील कमकुवत, अन्याय सोसावा लागणा-यांचे हितसंबंध जपण्यासाठीच.
प्रतिभा रानडे
बी. १० मेदिनीकेतन न्या. छागला मार्ग, बामणवाडा, विलेपार्ले (पूर्व) मुंबई ४०००९९

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.