पत्रव्यवहार

नाव नसलेला धर्म
आ.सु. हे जरी बुद्धिवादी लोकांचे मासिक असले तरी त्याच्या लेखक-वाचकांच्या घरी काही धार्मिक आचार होत असावेतच असा माझा अंदाज आहे. निदान माझ्या घरी तरी असे आचार होत असतात. पण तुमच्या-आमच्या या धर्माला (आजकालच्या फॅशनप्रमाणे त्याला उपासनापद्धती म्हणायचे) काही नावच राहिलेले नाही याचा मला नुकताच साक्षात्कार झाला. त्याचे असे झाले की ३ एप्रिल रोजी हैदराबादला प्रज्ञाभारती या संस्थेच्या विद्यमाने एक विचारसत्र घडवले गेले. विषय होता “हिंदुत्व आणि धार्मिक अल्पसंख्य गट’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उप-सर-कार्यवाह श्री सुदर्शन यांनी हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान विशद करताना म्हटले की हिंदू हा शब्द प्रथम परकीयांनी चलनात आणला आणि तेव्हापासून त्याचा अर्थ भारतीय असा आहे; भारतात निर्माण झालेला विचारप्रवाह म्हणजे हिंदुत्व असाच अर्थ घ्यायला पाहिजे; ‘राष्ट्रीय विचारधारेशी समरस होऊ इच्छिणाच्या मुसलमानांनीसुद्धा स्वत:ला हिंदू । म्हणवून घ्यायला कचरू नये वगैरे.
श्री. आबेल यांनी खिश्चन समाजातर्फे आणि श्री अन्वर मुअझ्झम यांनी मुस्लिम समाजातर्फे आपली गा-हाणी नोंदवली. श्री. आबेल यांनी म्हटले की भारताशी एकनिष्ठ असणे एवढाच जर हिंदू या शब्दाचा अर्थ असेल तर मी हिंदू आहे असे म्हणायला मला काहीच हरकत नाही पण श्री सुदर्शन यांनी हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान कितीही सफाईने मांडलेले असले तरी या तत्त्वज्ञानातून प्रत्यक्षात ख्रिश्चन लोकांवर अन्याय होतो. श्री मुअझ्झम यांनी मुस्लिम समाजाच्या आशंका जवळपास अशाच भाषेत सांगितल्या. या आशंकांच्या निरसनार्थ आणखी चर्चा व्हायला पाहिजेत असे सर्वांनी मान्य केले आणि हे विचारसत्र संपले.
गंमत पुढे झाली. सभागृहातून बाहेर पडल्यावर एखादे वाहन मिळेल का हे मी बघत होतो. इतक्यात समोर उभ्या असलेल्या एका माणसाने स्वत:शी बोलता बोलता माझ्याशी बोलणे सुरू केले. तोही सभागृहातून बाहेर पडला होता आणि त्याच्या मनात काहीतरी खदखदताना दिसत होते. जरा आरामशीरपणाने बोलावे म्हणून आम्ही समोरच्या चहाच्या दुकानात जाऊन बसलो. त्याने स्वत:ची ओळख करून दिली. तो एक मुसलमान कवी होता. प्रत्येकाच्या धार्मिक भावनांचा मान राखायला हवा हे त्याला मान्य होते. पण त्याने अचानक मला प्रश्न केला : काहो, हिंदू शब्द जर राष्ट्रवाचक असेल तर तुमच्या धर्माचे (म्हणजे उपासनापद्धतीचे) नाव काय ?
मी निरुत्तर झालो. मला खरोखरच प्रश्न पडला की एक मुसलमान ज्याप्रमाणे स्वत:च्या उपासनापद्धतीचे नाव अभिमानाने सांगेल तसे मी स्वत:च्या उपासनापद्धतीचे नाव काय म्हणून सांगू ? व्यक्तिश: मला हा प्रश्न पडला नाही, कारण मी स्वत: कोणतीच उपासना करीत नाही पण ‘हिंदूच्या वतीने बोलायचे झाले की प्रश्न पडेलच की.
यावर आणखी विचार करताना आणखी गोंधळात पडलो. अशाकरता की हिंदू या शब्दाला हिंदुत्ववाद्यांनी नवीन अर्थ दिला आहे खरा, पण त्यांनी स्वत:च्या संस्थांची नावे ठरवताना हिंदू या शब्दाचा वापर केलेला नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव हिंदू स्वयंसेवक संघ ठेवता आले असते, भारतीय जनता पक्षाला हिंदू जनता पक्ष म्हणता आले असते, व ‘हिंदू’ हा शब्द कुठेतरी चरितार्थ झाला असता.
हिंदुत्वाचा प्रचंड पाठपुरावा होत असताना उपासनापद्धतीचेही ‘हिंदू’ हे नाव चोरले जावे आणि हिंदुत्ववादी संस्थांनीही तो शब्द आपल्या नावात वापरू नये यात हिंदू या शब्दाचा गौरव आहे की अवमूल्यन आहे हेच मला कळेनासे झाले आहे.
मुसलमानांनी मात्र स्वःला हिंदू म्हणावे अशी हिंदुत्ववाद्यांची अपेक्षा आहे.
– भ. पां. पाटणकर
३-४-२०८ काचीगुडा
हैदराबाद ५०० ०२७

आधुनिक/पर्यायी वैद्यक
संपादक, आजचा सुधारक
आजचा सुधारकमध्ये (आ.सु.: ८-१२, ३७४ – ३७६ )डॉ. सुभाष आठले यांचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या पत्रात माझ्या ‘मानवी शरीर (आ.सु.८:१०, ३०१-३०४)या लेखावर टीका केली आहे. डॉ. आठले यांनी माझा लेख वाचला याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. परंतु त्यांनी तो लेख काळजीपूर्वक वाचला नाही अथवा त्या लेखातील प्रतिपादन त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोचविण्यात मी अपेशी ठरलो याबद्दल खेद वाटतो.
मी माझ्या लेखात अनेक (म्हणजे किती?) पुरावा-रहित विधाने केली आहेत असा त्यांचा आक्षेप आहे त्याविषयी खालील मुद्दे प्रसिद्ध करावेत अशी आपणास विनंती आहे.
१. शास्त्रीय (म्हणजे ‘आधुनिक पाश्चात्त्य’ असे त्यांना अभिप्रेत असावे असे मी मानतो) वैद्यकात उपचारांचा विविध अंगांनी अभ्यास झाला आहे असे म्हणून ते आधुनिक वैद्यकातील अभ्यासक्षेत्रांची सूची देतात व शास्त्रीय वैद्यकाला नावे ठेवण्याची फॅशन झाली आहे असे लिहितात. मीसुद्धा माझ्या मूळ लेखात प्रारंभीच ते केले आहे. आधुनिक वैद्यकाला मी माझ्या लेखात नावे ठेवली आहेत असे डॉ. आठले यांना वाटावे? मानवी शरीर हे एक यंत्र आहे हे आधुनिक वैद्यकातील अद्ययावत संशोधनावरून सिद्धच आहे.
२. नैसर्गिक उपचार-पद्धती म्हणजे शल्यक्रिया व औषधोपचार या व्यतिरिक्त रोग्यांवर करावयाचे उपचार. यात physiotherapy, occupational therapy, आहार-नियंत्रण, प्राणायाम, योगासने, मालिश, सॉना, स्टीमबाथ इत्यादी कृत्यांचा समावेश होतो. या सर्व पद्धती निरुपयोगी आहेत असे डॉ. आठले यांना म्हणावयाचे आहे काय? इंग्लंडमधील ८ वर्षांच्या एका मुलाच्या जन्माच्यावेळी मेंदूस प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने तो जन्मापासून संपूर्णपणे मुका, होता. त्याच्या स्वरयंत्रातून एकही ध्वनी उमटत नसे. इंग्लंडमध्ये सर्व उपलब्ध उपचार करूनही उपयोग झाला नाही, म्हणून या मुलाला फ्लोरिडा (अमेरिका) येथील एका निसर्गोपचार केन्द्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यास डॉल्फिन माशांसोबत पोहण्याच्या तलावात पोहण्याचा उपचार करण्यात आला. ५-६ दिवसांतच या मुलाला वाचा फुटली व आता त्याला शब्द शिकविण्यात येत असल्याची अगदी ताजी बातमी आहे. हासुद्धा एक निसर्गोपचारच नाही
काय?
वस्तुत: माझ्या लेखातील मुख्य मुद्दा असा होता की या सर्व पारंपारिक व पर्यायी वैद्यक पद्धतींनी, आधुनिक वैज्ञानिक प्रयोगाधारित परीक्षण पद्धतींचा वापर करून, आपली उपचारपद्धत अधिक वैज्ञानिक करणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी विविध सार्वजनिक व व्यापारी संस्थांनी काही निश्चित कार्य करावे याचा उल्लेख मी केला होता. असे असताना, डॉ. आठले यांनी पर्यायी वैद्यकसंस्था असे करणारच नाहीत कारण त्यामुळे त्यांची मक्तेदारी (?) संपते असे म्हणून मग या पर्यायी उपचार पद्धतीत काय शिल्लक राहील असा प्रश्न केला आहे. हे डॉ. आठले यांचे मत केवळ wishful thinking आहे. १९७१-७२ साली Ileus या विकारावरील आयुर्वेदीय उपचार पद्धतीवर फिलाडोल्फिया येथील एका सुप्रसिद्ध मेडिकल कॉलेजमध्ये, आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने संशोधन होऊन या विकारावर बनारस हिंदू विश्वविद्यालयाने विकसित केलेली आयुर्वेदिक उपचारपद्धती उपयुक्त असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता!
३. औषधी वनस्पतींची लागवड इतर रोखपिकांहून कमी फायद्याची आहे असे डॉ. आठले कशावरून म्हणतात? त्यांनी आयुर्वेदीय औषधांना लागणा-या कच्च्या वनस्पतींचे बाजारभाव तपासले आहेत काय? गुजरातेत इसबगोल या पिकाचे केवढे प्रचंड उत्पन्न आहे याविषयी त्यांनी काही वाचले ऐकले आहे काय?
४. आयुर्वेदातील पायाभूत कफ-वात-पित्त या संकल्पना वैज्ञानिक आहेत असे विधान मी केलेले नाही. आयुर्वेद वैद्यक शिक्षणक्रमामध्ये अनॉटमी, फिजियॉलॉजी, बायोकेमेस्ट्री, पॅथॉलॉजी, सर्जरी हे विषय अंतर्भूत नाहीत असे डॉ. आठले यांना वाटते काय? बहुसंख्य आयुर्वेद शिक्षण संस्थांमधून हे विषय शिकविणारे प्राध्यापक आधुनिक वैद्यकाचेच पदवीधर असतात !
५. Microbiology, Virolgy, Immunology व Immunotherapy, Metabolism and Metabolic Disorders या शाखांतील प्रगतीकडे दुर्लक्ष करून आयुर्वेद अथवा इतर पर्यायी वैद्यकपद्धतीच श्रेष्ठ आहेत असे आम्ही प्रतिपादन केले नव्हते. आधुनिक वैद्यकातील या ज्ञानाकडे दुर्लक्ष करून भागणारच नाही असेच कोणीही सुज्ञ म्हणेल.
आयुर्वेद आपला म्हणून त्याबद्दल प्रेम व आधुनिक वैद्यक पाश्चात्त्य, परकीय म्हणून त्याबद्दल द्वेष, असा विचार वेडगळपणाचा आहे यात शंका नाही, परंतु म्हणून आयुर्वेद, होमियोपॅथी वगैरे उपचारपद्धती Hoodoo म्हणून त्याज्य ठरविण्याची आधुनिक वैद्यकाचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची मनोवृत्ती ही सुद्धा कृपणपणाची आहे असे आमचे मत आहे. हल्ली मोठमोठ्या सुप्रसिद्ध खाजगी विशिष्ट सेवा रुग्णालयात (Speciality Hospitals) मध्ये दैनंदिन उपचार करण्यासाठी आयुर्वेद स्नातकांचीच नेमणूक असते हे डॉ. आठले यांना माहीत असेलच.
३०४, अंबर अपार्टमेंटस्, इस्कॉनजवळ, जुहू मुंबई – ४०० ०४९ र, वि. पंडित
मा. संपादक
‘आजचा सुधारक’,
मार्च १९९८ च्या आजचा सुधारक मध्ये राममनोहर लोहिया यांचे स्त्रीविषयक विचार हा संजय सहस्रबुद्धे यांचा लेख आहे. त्यातील अवतरणे त्यांनी कुठून घेतली ते मला लेखात आढळले नाही. विशेषतः त्यांचे हे विधान, “लोहिया म्हणतात, की या स्त्रिया अग्निपरीक्षेनंतर देखील सीतेला वनवासाला पाठवणाच्या (रामाची भक्ती) कशी करू शकतात याचे आश्चर्य वाटते.’ ‘महाराष्ट्र टाइम्स’ (दि. १४-२-८८) मध्ये नरेंद्र गंगाखेडकर यांनी राम आणि लोहिया यात उल्लेखिलेल्या अवतरणांच्या हे पूर्ण विरुद्ध आहे. राम आणि लोहिया हा लेख लोहियांनी केलेली रामाची अमाप स्तुती, कार्यकारणभाव नसलेली विधाने, विपर्यास, विसंगती यांनी भरलेला आहे. उदाहरणार्थ, “लोहियांच्या मते ‘मर्यादापुरुषोत्तम राम म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व होते. रामराज्यातील कायदे व नियम यांचा आदर करण्याच्या हेतूने त्याने सीतेचा त्याग केला.”
वास्तविक माझ्या रामायणातील रामप्रतिमा या लेखात राम असत्यवचनी, वचनभंगी, क्रूर, इत्यादी असल्याचा पुराव्यासह उल्लेख केला आहे. हा लेख आणि त्याच विषयावरील माझे नरसम्राट नाटक यांची कहाणी आजचा सुधारक’ (जानेवारी १९९७, पृ. २४४-२४६) मध्ये दिली आहे.
गो. श्री. बनहट्टी

श्री. संजय सहस्त्रबुध्दे ह्यांना उत्तर
फेब्रुवारी अंकातल्या आपल्या पत्रात आपण ‘पळपुटेपणा’ हा शब्द वापरला आहे. त्याचा नीट संदर्भ कळला नाही; परंतु आपण मुलांनी लग्नाची घाई करू नये, पंचविशी ओलांडली तरी चिंता करू नये किंबहुना लग्न उशिराच करावी असा मुद्दा मांडला आहे असे मला वाटले. त्यासंबंधी आपल्याला सांगण्यासारखी गोष्ट अशी की पहिले अपत्य मुलींना पंचविशीपर्यंत व्हावे असे वैद्यकीय मत आहे. सत्ताविशीनंतर पहिले अपत्य झाल्यास ते बाळंतपण अवघड होत जाते इतकेन्न नव्हे तर त्यानंतर पहिल्या अपत्याच्या जन्माला जसा उशीर होईल तसा त्या बाळामध्ये जन्मजात विकृती येण्याचा संभव वाढत जातो अशी माझी माहिती आहे. पुरुषांच्या दृष्टीने विचार केला तर पहिल्या अपत्यामध्ये आणि बापामध्ये जितके अंतर अधिक तितकी ‘जनरेशन गॅप’ वाढते, मुलांचा आणि बापाचा संवाद कठीण होतो.
प्राथमिक शाळेत जाणा-या मुलांना “माझे वडील रिटायर झाले आहेत’ असे सांगायचा संकोच होतो, हेही वास्तव आपण ध्यानात घ्यावे. उतरत्या वयात मुले होऊ शकत असली तरी त्यांची आजारपणे काढण्याची आणि त्यांच्यासाठी खस्ता खाण्याची उमेद आईबापांना राहत नाही.
लग्न करण्यामागे प्रजोत्पत्ती हा विचारच नसेल तर विवाह कोणत्याही वयात केला तरी चालेल किंवा अजिबात न केला तरी चालेल, पण आपल्याला मुले व्हावीत, आपण ती वाढवावीत अशी जर इच्छा असेल तर तारुण्य ओसरून गेल्यावर विवाह करण्यात हशील नाही.
आयुष्याचा आलेख काढला तर ऐन तारुण्य हे वीस वर्षांचे आहे असे लक्षात येते. हवे ते कष्ट सोसण्याचे त्याचप्रमाणे लहानमुलांची आणि वडीलधाप्यांची काळजी घेण्याचे सामर्थ्य १७ ते ३७ या काळात पुरेपूर असते. त्यापूर्वीचा काळ हा वाढीचा आणि नंतरचा काळ उतरणीचा असतो. आणि तारुण्याचा काळ हाच स्त्री-पुरुषांच्या सहजीवनाला अत्यंत अनुकूल असतो म्हणून फार बालपणी केलेला विवाह जसा अनुचित तसा तो फार उशीरा करणेही अनुचित असते. (संजय सहस्रबुद्धे ह्यांना ह्या विषयावर साधक बाधक चर्चा हवी होती. ह्या विषयीचे आणखी काही पैलू जाणवत असल्यास त्याबद्दल पत्रे येऊ द्यावी. – सं.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.