संपादकीय

जुनें जाउं द्या मरणालागुनि
जातीयतेमुळे निर्माण होणारी उच्चनीचता ही विषमतेमध्येच मोडत असल्याकारणाने तिच्याविरुद्धचा म्हणजेच विषमतेविरुद्धचा लढा पुढे चालविण्यास आजचा सुधारकला आपल्या वाचकांचे साहाय्य हवे आहे. गेल्या दोनतीनशे वर्षांपासून न सुटलेला हा प्रश्न आम्ही सोडवावयास घेतला आहे. दोनतीनशे वर्षांपूर्वी विषमता नव्हती असा ह्याचा अर्थ नव्हे; पण ती हटविण्यासाठी यत्न सुरू झाले नव्हते, ते त्या सुमारास सुरू झाले. आजवर केल्या गेलेल्या प्रयत्नांना यश आलेले नाही हे जाणून ह्या अत्यन्त जटिल प्रश्नाचे उत्तर आपणास चर्चेमधून काढावयाचे आहे. ही समस्या एकट्या संपादकांनी सोडवावयाची नाही. ती एकट्यादुकट्याला सुटण्यासारखीच नाही. ती आपण सर्वांनी मिळून सोडवावयाची आहे. आमच्या ह्या खटाटोपात परमेश्वर आमच्या साहाय्याला यावयाचा नाही. आजवर ‘तो’ उदासीन राहिला आहे. पुढेही तो (!) तसाच राहील.
जातीजातींमधील उच्चनीचभाव, स्त्रीपुरुषांमधील दर्जाची विषमता आणि आर्थिक असमानता ह्यांमध्ये आमचा भारत सर्वांच्या पुढे असेल. उपरिनिर्दिष्ट तीनही बाबतीत आपल्या देशाची बरोबरी दुसरा कोणता देश करीत नसावा. आम्हाला हा विषमतेचा थोर वारसा लाभला आहे. ही परिस्थिती पूर्णपणे संस्कारजन्य आहे.
युरोपात अस्पृश्यता नव्हती, जातिभेद नाही, स्त्रीपुरुषांच्या दर्जामधील विषमता कमी । आहे. (घटस्फोट आहे, पण बायकोला टाकून देणे, हुंडाबळी ही प्रकरणे तिकडून ऐकू येत नाहीत.) त्याचप्रमाणे आर्थिक विषमतादेखील निःसंशय कमी आहे. प्रबोधनकाळानंतर युरोपात झपाट्याने फरक पडला आहे. तेथल्या सर्वसामान्य माणसाचे मानस येथल्या सामान्य माणसापेक्षा वेगळ्या त-हेने घडलेले आहे असे लक्षात येते. तेथल्या प्रबोधनकाळाचे आम्हाला पुष्कळ खोलात जाऊन अध्ययन करणे आवश्यक आहे. परंतु तूर्तास वरवर जरी पाहिले तरी असे वाटते की तेथे काही काळ धर्माची पकड घट्ट होती आणि त्या पकडीतून सुटण्याची इच्छादेखील उत्कट होती. त्या खिस्ती धर्माच्या पकडीतून सुटण्याच्या, त्या धमनि प्रभावित केलेल्या काळाच्या मागे जाण्याच्या म्हणजे ख्रिस्तपूर्व ग्रीक रोमन संस्कृतीच्या वैभवाला परत प्राप्त करण्याच्या धडपडीमधून नवजागरण झाले असा एक समज आहे–एक सिद्धान्त आहे. तो बहुशः बरोबर असावा. भारतामध्ये आपला धर्म हा सनातन धर्म असल्यामुळे त्याच्या पूर्वीचा असा गौरवास्पद कालखंडच आपल्या इतिहासात नाही. एवढेच नव्हे तर आपल्या आचार-धर्माचे स्वरूप देशभरात एकसारखे नाही. ‘जातौ जातौ नवाचाराः’ असे त्याचे स्वरूप आहे. आमच्या सनातन धमनि प्रभावित नसलेल्या कालखंडाकडे पाहावयाचे झाल्यास आपणाला फक्त भविष्यकाळाकडेच पाहावे लागेल. तसा भविष्यकाळ घडवावा लागेल.
नवीन काही शिकावयाचे असल्यास मनाची पाटी कोरी असावी लागते. युरोपात नवजागरण झाले ते मनाच्या पाटीवरचा ख्रिस्ती धर्माच्या प्रभावाचा भाग पुसून टाकल्यामुळे. बायबलमधील विश्वोत्पत्तीच्या कल्पनांचे मनावरचे जोखड झुगारून दिल्यामुळे. जरी आरंभी हे जोखड सर्वांनी झुगारले नसले तरी जे पाखंडी होते त्यांनी तत्त्वासाठी सोसलेल्या हालअपेष्टा पाहून, त्यांचे निरुपम धैर्य बघून सामान्य मंडळी अचंबित झाली आणि अन्तर्मुखही झाली. त्यांच्या विचारसरणीमध्ये फरक पडू लागला. पुढे ह्या जागरणाचा परिणाम म्हणून अपूर्व अशा घटना घडल्या. पृथ्वीपर्यटने झाली, ललितकलांच्या अध्ययनाला भरती आली आणि औद्योगिक क्रान्ति झाली. लोकशाहीचा पाया रचला गेला, राजसत्ता सीमित झाली, कवायती फौज निर्माण झाली. बघताबघता युरोपचे जनमानस ढवळून निघाले असल्याचे पुरावे दिसू लागले. परिणामी युरोप जगज्जेता झाला. जगातील बहुतांश भूभाग युरोपीयांच्या अमलाखाली आला. ठिकठिकाणी त्यांची सरशी झाली कारण ते समूहशः त्या काळातल्या ‘नेटिवांपेक्षा सरसच होते. भारतात हे काहीच घडले नाही. इतकेच नव्हे तर एकोणिसाव्या शतकापर्यंत आम्हाला ह्या साध्या घटनांचा थांगपत्ताही नव्हता – कारण आमच्या मनाची पाटी कोरी नव्हती. वर्तनामध्ये परिणत होणा-या मानवी संस्कारांचे माहात्म्य कमी करणे म्हणजे मनाची पाटी पुसणे आणि नवीन मजकूर लिहिण्यासाठी तेथे जागा करणे, संस्काराभिमानी आणि संस्कृत्यभिमानी मंडळी आमच्या मनाची पाटी कोरी होऊ देत नाहीत हे आपण जाणले पाहिजे.
एक वेगळा मुद्दा पुढे मांडावयाचा आहे.
एकीकडे नवीन कल्पना स्वीकारण्यासाठी आपल्या सर्वांची तयारी करावयाची आहे आणि दुसरीकडे आपणाला आणखी एक अत्यन्त महत्त्वाचे कार्य ताबडतोब करणे भाग आहे. आपल्या देशाला स्वतंत्र होऊन पन्नास वर्षे होऊन गेली असताना आमच्या सार्वजनिक जीवनात गुन्हेगारांनी प्रतिष्ठा मिळवून ठेवली आहे. सर्व समाज गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. (ही वृत्ति जुनी असली तरी तिला पूर्वी प्रतिष्ठा नव्हती.) वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याशिवाय दुस-या बातम्याच वाचावयाला मिळत नाहीत. ही परिस्थिति परचक्राहून भीषण आहे पण दुःखाची गोष्ट अशी की तिची विकरालता, तिची घोरता, तिची भयावहता अजून आमच्या ध्यानात आलेलीच नाही. सार्वजनिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला महत्त्व देण्याचा संस्कार आपल्यावर झालेला असल्यामुळे की काय आम्ही हे सारे गुन्हे स्वतः करतो किंवा दुस-यांनी ते केल्यावर त्यांवर पांघरूण घालतो. हा आमचा शत्रु आम्हाला आज जाणवत नाही. त्याची जाणीव करून देण्यासाठी, त्याबाबतीत जनजागरण करण्यासाठी आम्हाला एक सशक्त आघाडी उघडणे आवश्यक आहे. आमच्या मराठी भाषेला उत्तमोत्तम निबंधकारांची एक उज्ज्वल परंपरा लाभली आहे. गेल्या शतकातले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि विष्णु कृष्ण चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, शिवराम महादेव परांजपे, लक्ष्मण बळवंत भोपटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, विनायक दामोदर सावरकर आणि भीमराव रामजी आंबेडकर हे आणि असे अनेक शैलीदार लेखक येथे होऊन गेले आहेत. त्यांच्यापासून स्फूर्ति घेऊन हा गुन्हेगारीचा समंध कायमचा गाडून टाकण्यासाठी लोकजागरण करणे आवश्यक झाले आहे.
पी. साईनाथ ह्यांच्या पुस्तकातील सर्वच प्रकरणे हृदय हेलावून सोडणारी आहेत. त्यापैकी दोन प्रकरणांचा अनुवाद आम्ही प्रकाशित केला. तो आमच्या वाचकांच्या करमणुकीसाठी नाही. मानवाचे विवेकहीन वर्तन बंद करण्यासाठी आपल्याला काय करता। येईल ह्याची चर्चा त्या निमित्ताने सुरू व्हावी हा आमचा त्यांच्या प्रसिद्धीमागचा हेतु होता आणि आहे. तो अजून सिद्धीस जावयाचा आहे. ह्या महिन्यात विराम घेऊन तो विषय पुन्हा सुरू करण्यात येईल.