पत्रव्यवहार

आजचा सुधारक सर्वांना आपला’ सुधारक वाटायला हवा
संपादक, आजचा सुधारक
आमच्या लेखावर सुनीती देव यांची प्रतिक्रिया वाचली. आमचे म्हणणे आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहचले नाही असे वाटते. सोबत काही अलीकडील कात्रणे पाठवत आहेत. या कात्रणांवरून आपल्या असे लक्षात येईल की समाजातील उच्चवर्णीयांची मागासवर्गीयांबद्दलची मानसिकता अजून बदललेली नाही. पुरोगामी समजल्या जाणा-या महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे दलित वस्तीतील घरे सवर्णाकडून जाळली जातात, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो. Words Like Freedont या पुस्तकात सिद्धार्थ दुबे हा लेखक म्हणतो की दलितांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली तरी काही बदल झालेला नाही. अजूनही दलितांना माणुसकीचे जिणे जगता येत नाही. आम्ही हे एवढ्यासाठीच सांगत आहोत की समाजामध्ये मागासवर्गीयांची स्थिती जर अशी असेल व समाजात वावरताना पदोपदी जर त्यांची उच्चवर्गीयांकडून व्यक्तिगत व सार्वजनिक रूपाने मानहानी होत असेल तर आजचा सुधारक’ संपादक मंडळातील व त्यात लिहिणा-यांची बहुसंख्य आडनावे पाहिल्यानंतर मागासवर्गीयांतील जाणकार आजचा सुधारक मध्ये लिहितील काय अशी शंका मनात येते. दुसरी गोष्ट म्हणजे समाजात आज असलेली उच्चवर्णीयांची (मराठा व ब्राह्मण) दलितांबद्दलची मानसिकता व दलितांची होत असलेली व्यक्तिगत व सार्वजनिक पातळीवरील मानहानी याबद्दल कधी आजचा सुधारक मध्ये चर्चा झाली नाही. दलित आजचा सुधारक मध्ये का लिहीत नाहीत वा वाचत नाहीत याची कारणमीमांसा ही असेल का?
आडनावावरून जात ओळखण्याची प्रवृत्ती योग्य नसेलही; परंतु समाजातील वास्तव मात्र तसे आहे. कुळकर्णी, जोशी म्हटले की ब्राह्मण व माने, कांबळे म्हटले की दलित है। ओळखले जाते व त्याप्रमाणे समाजात व्यवहार होतो हे वास्तव आहे. ह्यासाठी घडलेली फक्त दोनच उदाहरणे देत आहोत. आमच्या येथे, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणा-या पाषाणमध्ये, भर चौकात कांबळे आडनावाच्या माणसाचा दवाखाना होता. भर चौकात असूनही डॉ. कांबळे यांचा दवाखाना चालला नाही. शेवटी त्यांना तो दवाखाना बंद करावा लागला. त्यांना विचारले की, “याचे काय कारण असावे?” तेव्हा ते म्हणाले की, ‘केवळ आडनाव कांबळे असल्यामुळे माझ्याकडे कोणी येत नाही, M.B.B.S. असूनही डॉ. कांबळ्यांचा भर चौकातील दवाखाना चालला नाही परंतु एका बाजूला कोनाड्यात असलेला B.A.M.S व B.H.M.S. असणा-या कुलकर्णी व जोशी यांचा दवाखाना अॅलोपथीची प्रैक्टिस करून भरघोस चालतो याला काय म्हणावे? आडनावाचा महिमा. दुसरे काय?
दसरे एक उदाहरण देतो. ट्रेनमध्ये एक अनोळखी ब्राह्मण गृहस्थ माझ्याशी दलितांबद्दल फार आकसाने बोलत होते. शेवटी मला म्हणाले, “का हो, खिलारे म्हणजे तुम्ही आपल्यातलेच का?” मी जर कांबळे किंवा माने असे आडनाव सांगितले असते तर त्याच मोकळेपणाने माझ्याशी त्यांनी गप्पा मारल्या असत्या का? सांगायचा मुद्दा असा की खिलारे, पवार या आडनावाने जात ओळखता येत नाही कारण ही आडनावे मागासवर्गीयांतही आहेत आणि उच्चवर्णीयांतही आहेत. म्हणून कळू न शकलेले’ हा वर्ग आम्हाला करावा लागला.
‘पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणान्यांकडून व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणा-यांकडून अशा त-हेच्या प्रवृत्तीचे स्वतःमधून तसेच इतरांमधून उच्चाटन व्हायला हवे, या आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ महाराष्ट्रातील अग्रगण्य पुरोगामी डॉ. आ.ह. साळुखे व निळू फुले काय म्हणतात याचे कात्रण सोबत जोडले आहे.
समाजातील वास्तवापासून आजचा सुधारक ला वेगळे काढता येणार नाही व राहता येणार नाही. म्हणून काही गोष्टी (मागासवर्गीय जाणकारांकडून लिहून घेणे किंवा त्यांना लिहिण्यास प्रवृत्त करणे व समाजातील वास्तवाचे (दलित-सवर्ण व्यवहार) प्रतिबिंब आजचा सुधारकमध्ये उमटवणे) जाणीवपूर्वक कराव्या लागतील.
२३/७ शिदेनगर, चांदणीचौका जवळ प्रभाकर नानावटी
बावधन, पुणे-४११०२१ टी. बी. खिलारे

दलितांच्या मानहानीला अंत आहे की नाही?
‘संडे’ या इंग्रजी साप्ताहिकात सिद्धार्थ दबे लिखित ‘वर्डस् लाईक फ्रीडम’ या पुस्तकातील काही भाग प्रसिद्ध झाला आहे. सिद्धार्थ दुबे यांचे शिक्षण भारतात व अमेरिकेत झालेले असून सध्या ते दिल्ली येथे आरोग्य-धोरणविषयक विश्लेषण तज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. बाबा का गांव या उत्तर प्रदेशातील प्रतापगढ़ जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गेल्या पन्नास वर्षांत घडलेल्या स्थित्यंतराचे चित्रण दुबे यांनी या पुस्तकात केले आहे. एका दलित कुटुंबात घडत गेलेल्या घटनांबरोबरच दुबे यांनी खेड्यातील जातिव्यवस्था, आर्थिक लुबाडणूक, जीवघेणे राजकारण इत्यादींवर टिप्पणी केली आहे. आहे ती गरीबी वाढविण्यास ह्या सर्व गोष्टी कशा कारणीभूत ठरतात व खेड्यातील दलितवर्गाची मानहानि कशी होत असते हे त्यांनी अगदी सोप्या भाषेत अकांडतांडव न करता सांगितले आहे.
उच्चवर्णीयांकडून पाळला जाणारा जातिभेद बाबा का गांवमध्ये कमी होत आहे असे वाटत असले तरी तो संपूर्णपणे गेला आहे, असे म्हणता येणार नाही. या पन्नास वर्षांत दलितांसाठी अनेक कायदे करण्यात आले. परंतु त्यांचा लाभ शहरी भागापुरताच झाला असून खेड्यांत राहणा-या दलित समाजाला त्याचा उपयोग अजिबात झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. शाळा, हॉटेल्स इत्यादी सार्वजनिक ठिकाणी ते जाणवत नसेलही; परंतु खाजगी व्यवहारांत मात्र हा जातिभेद व्यवस्थितपणे पाळला जातो. यात मात्र गरीब-श्रीमंत असा भेद केला जात नाही. दलितांना मानहानीचे चटके सतत बसत असतात हे भीषण वास्तव आपण नाकारू शकत नाही. ‘दलितांचा पदोपदी होणारा हा अपमान कधीच थांबणार नाही का?’ हा प्रश्न दलितांना सतत जाणवत असतो. अजूनही दलितांचा स्पर्श झालेल्या वस्तूंवर पाणी (गंगाजल?) शिंपडले जाते. आम्ही ठाकुरांशी (उच्चवर्णीयांशी) मैत्रीचे संबंध ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न करीत असतो; त्यांच्याकडच्या लग्नसमारंभात एक-दोन वेळा जेवणही घेतले असेल. कारण ती मंडळी मोठी आहेत. परंतु आम्ही त्यांना आमच्या सणासमारंभाला शंभर वेळा बोलवूनही ते एकदासुद्धा आमच्याबरोबर जेवण करीत नाहीत. आम्हीसुद्धा शेवटी माणसेच आहोत ना! आम्ही कितीही कमकुवत असलो तरी अशा वागण्यामुळे आम्हालाही राग येणारच. तुम्ही श्रीमंत आहात म्हणून सोने-चांदी तर खात नाही ना? आमच्यासारखेच अन्नपदार्थ तुमच्या ताटात असतील ना?’ अशी एका दलिताने दिलेली ही प्रतिक्रिया सर्व काही सांगून जाते.
एकदा ठाकुराची म्हातारी आई चुकून विहिरीत पडली. तिचा आकांत ऐकून काही दलित तरुणांनी विहिरीत उडी मारून तिला वाचविले. वर आल्यानंतर त्या म्हातारीने आपल्या मुलांना बोलावून घरातल्या पाण्याने आंघोळ घालण्याचा आग्रह धरला. कारण दलितांनी स्पर्श केल्यामुळे तिला विटाळ झाला होता म्हणे! जीव वाचवल्याबद्दल चार चांगले शब्द तर दूरच राहिले, परंतु सर्वांसमोर दलितांची नाचक्की अशा घटना खेड्यांत नित्याच्याच असतात.
दैनंदिन व्यवहारात सर्व जण घाण करतात. परंतु उच्चवर्णीयांनी केलेली सर्व घाण स्वच्छ करणारा मात्र अस्पृश्य. खरे पाहता घाण करून स्वच्छ न करणाराच अस्पृश्य असावयास हवा. परंतु येथे मात्र सर्व उलटा कारभार! स्वतःबरोबर एखाद्या आईप्रमाणे, इतरांच्यासुद्धा स्वच्छतेची काळजी घेणा-यांना जास्त मान द्यायला हवा. अजूनही गावातील पटवारी (उच्चवर्णीय अधिकारी) चारपाईवर तर भेटण्यास गेलेला दलित एखाद्या कुत्र्यासारखा जमिनीवर असे दृश्य पाहायला मिळते.
इतर धर्माप्रमाणे हिंदू धर्मातसुद्धा सर्व जाती-जमातींत रोटी-बेटी व्यवहार रूढ झाल्यास सामाजिक विषमता थोड्या प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती श्रीमंत असेल म्हणून काय झाले? मिळून मिसळून जेवण करण्यात गैर काय आहे? उच्चवर्णीयांची ह्याबाबतीत असलेली गुर्मी प्रकर्षाने सतत जाणवत असते. अनेक दलित कुटुंबे संपूर्ण शाकाहारी असूनसुद्धा (मटन विकत घेण्यासाठी तेवढे पैसे नकोत का?) केवळ खालच्या जातीतले म्हणून ही उच्चवर्णीय मंडळी त्यांच्याबरोबर कधीच जेवत नाहीत. ‘खरोखरच ह्यांच्या देवाला वा धर्माला एवढा जातीचा पुळका असेल तर ह्यांचा देव आमची जात पटकन ओळखण्यासाठी आम्हाला एखादे शिंग किंवा असाच एखादा आमच्या जातीची ओळख पटवणारा अवयव का देऊ शकला नाही?’ हा प्रश्न आहे त्या गावातील एका दलित तरुणाचा.
दलित स्त्रियांवरील अत्याचार ही तर नेहमीचीच घटना आहे. झाडाझुडपांत दबा धरून ठाकुरांची तरुण मुले शौचास गेलेल्या तरुणीवर बलात्कार करतात. पळून जाणाच्या या तरुणांना ही ठाकूर मंडळी घरात लपवून ठेवतात. खोट्या साक्षी देऊन त्यांना सोडवून आणतात. पोलीस व न्याय-यंत्रणा ठाकुरांच्या कलानेच वागत असते. मुलीवर हात उगारला की बलात्कार केला? अशा प्रकारे शब्दच्छल करून सर्व आरोपींची पद्धतशीर सुटका होते. नंतर मात्र फिर्याद करणारा व त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. दलितांचाच आमदार-खासदार असूनसुद्धा उपयोग होत नाही. कारण ते सुद्धा विकलेले असतात.
दलितांच्या जवळ मुळातच जमिनी कमी. परंतु दलितांना ही ठाकूर मंडळी साधी पेरणीसुद्धा करू देत नाहीत. पायवाट बंद करणार. शेतमजूर म्हणून त्यांच्याकडून काम करून घेणार. मजुरी मात्र इतरांच्या मानाने अध्यापेक्षा कमी. ना दाद ना फिर्याद, देशात कुठलीही लहानसहान घटना घडू दे. तिचे परिणाम मात्र खेड्यातील दलितांनाच भोगावे लागतात. पहिल्यांदा त्यांच्या वस्तीला आग लावणे: झोपडीची मोडतोड इत्यादी गोष्टी नित्याच्याच. एखाद्या संवेदनशील अधिका-यामुळे शासकीय मदत मिळत असेल तर ती देतानासुद्धा एखाद्या भिका-याला भीक देत आहोत असा आविर्भाव. ती मदतसुद्धा अपुरी व त्यातही भ्रष्टाचार, हिंसक घटनेमुळे बळी पडलेल्यांना वाचवण्यासाठी औषधोपचारासाठी वणवण फिरणे, उरलीसुरली जमीन विकणे, व ह्याच ठाकुरांचे पाय धरून कर्ज मिळवणे हे सर्व आता दलितांच्या अंगवळणी पडले आहे. स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांत या परिस्थितीत फरक पडलेला नाही.
वरील वर्णनावरून सिद्धार्थ दुबे या लेखकाला काय म्हणायचे आहे ह्याची स्पष्ट कल्पना येईल. परिस्थितिशरणता हेच आता ह्यांच्या जीवनाचे मुख्य सूत्र झाले आहे. कारण त्यातून सुटका नाही. कायदा, शिक्षण, शासन, न्याययंत्रणा, पंचायती, स्वयंसेवी संस्था हे सर्व नावाला आहेत. आपत्ती कोसळताना ह्यांचा काडीमात्र उपयोग होत नाही. एखाद्या तुरळक प्रयत्नाला प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धी मिळते. एखाद्या दलित व्यक्तीला कदाचित थोडीफार मदतही मिळते. परंतु शेवटी हाताला काही लागत नाही.
बिहार, उत्तरप्रदेश या राज्यांप्रमाणे इतर राज्यांतसुद्धा कमीजास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे. ह्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे अशाच प्रकारच्या खेड्यांतून अनेक दलित कुटुंबे मुंबई-दिल्ली सारख्या शहरांत येतात. झुग्गी-झोपडीमध्ये राहून किड्या-मुंग्यांचे जीवन जगताना दिसतात. या शहरांतील मध्यमवर्गीयांना हे लोक अशा भीषण अवस्थेत कसे काय जगू शकतात याचे नेहमीच आश्चर्य वाटत असते. उपाशी राहू परंतु मानहानीचे जिणे नको अशीच मानसिकता या शिक्षित दलित तरुणांमध्ये रुजू पाहत आहे. आर्थिक विषमता परवडेल, त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल परंतु या सामाजिक विषमतेचा सामना कसा करावा हाच प्रश्न आता कळीचा बनत चालला आहे.
६४ अर्मामेंट कॉलनी, प्रभाकर नानावटी
औंध रोड, पुणे – ४११००७

आजचे वास्तव
संपादक, आजचा सुधारक,
ऑगस्ट ९८ चा आजचा सुधारक अंक वाचला. त्यातील काही विचार आवडले.
सर्व मराठी मासिकांच्या लेखक नावांवरून नजर फिरवली तर काय दिसते? ९९ टक्के लेखक ब्राह्मण आहेत. म्हणजे २ टक्के ब्राह्मणांशिवाय उरलेल्या ९८ टक्के इतर जातीच्या लोकांना लिहिताच येत नाही काय? तर तसे नसून सर्व मासिके उच्चवर्णीयांच्या ताब्यात, त्यामुळे ते पहिला अग्रक्रम आपल्या जातीच्या लेखकांनाच देतात हे कटु सत्य आहे.
या देशाचा इतिहास म्हणजे पराभवाचाच इतिहास आणि याला कारण उच्चवर्णीयांनी उरलेला ९८ टक्के हिंदू समाज हजारो जातींत वाटून ठेवला. फोडा आणि झोडा हे तत्त्व ब्रिटिशांनी नाही तर उच्चवर्णीयांनी हिंदू समाजात हजारो वर्षापासून अमलात आणले. डॉ. आंबेडकर, फुले ज्या समाजातून आले, त्या समाजाशी हे उच्चवर्णीय बेटीव्यवहार का करीत नाहीत? आंबेडकर, फुले यांच्या जयंतीला फोटोला हार घालण्याचे फुकटचे नाटक कशाला करतात? बेटीव्यवहाराचा प्रश्न आला की….. पोटशाखेतीलच पाहिजे असा अट्टाहास का? हिंदू पोटशाखेतील का चालत नाही? त्याच तळ्यांचे पाणी, त्याच दुधाच्या बाटल्या, त्याच वाण्याचे धान्य, कडधान्य, मग जातीजातीत फरक तो काय राहिला? निदान मध्यम वर्गात तरी? मग मध्यमवर्गात फक्त उच्चवर्णीयच येतात काय? उच्चवर्णीयांनी बेटीव्यवहारातली जात काढून टाकली तर ५ वर्षात हिंदू एकसंध होतील. निवडीला व्यापक क्षेत्र मिळेल. उच्चवर्णीयांची याला तयारी आहे काय? नाही हे याचे उत्तर आहे. परिणामी चातुर्वर्ण्य कायम! जातीची उतरंड कायम ! वरच्या टोकाला ब्राह्मण कायम! हे प्रखर वास्तव आहे.
बी १, शांतिवन, अरूण टण्णू
संत जनाबाई पंथ, विलेपार्ले (पूर्व)
मुंबई ४०००५७

स्त्रीला आपले हित समजते
संपादक, आजचा सुधारक यांस
स.न.वि.वि.
आपल्या सप्टेंबर मधील “पाळणाघरांची वाढ, एक अपप्रवृत्ती’ ह्या लेखास हे उत्तर.
“मुले पाळणाघरात ठेवून कामावर जाणारया मातांना अशा परिस्थितीपासून वाचवले पाहिजे’ अशी ह्या लेखाची धारणा आहे व त्या धारणेस “देशाचे स्त्रियांच्या श्रमावाचून अडलेले नाही”, “मुलांची हेळसांड”, “राष्ट्राचे खालावलेले चारित्र्य” वगैरे कारणे सांगितलेली आहेत.
ह्या (स्फुटाच्या) लेखकाला माझी विनंती आहे की देशासाठी, गावासाठी, कुटुंबासाठी, नवग्यासाठी, मुलांसाठी स्त्रीने काय करावे हे तिचे तिला ठरवू दे.
स्त्रीचे हित कशात आहे हे तिला समजते. तिने आपले आयुष्य कश्या रीतीने घालवावे हा निर्णय फक्त तिचा आहे. इतर कुणीही आपली मते तिच्यावर लादू नयेत.
मनुस्मृतीपासून ते अगदी आजतागायत धर्माने, समाजाने, कुटुंबाने परंपरेने स्त्रीच्या पायात शृंखला घातल्या आहेत. त्यातून नुकतीच ती बाहेर पडत आहे. मुलांच्या व देशाच्या हितासाठी स्त्रीच्या हातातले पगाराचे पाकीट काढून घेऊन लेखक परत तिला आर्थिक परावलंबित्वाच्या शृंखलेत अडकवू बघत आहे.
ह्या स्त्रियांना मदत करण्याची इच्छा असेल तर लेखकाने पुढील उपाय योजावेत.
(१) घरातील पुरुषांना तिला घरकामात मदत करण्यात उद्युक्त करावे.
(२) कामाला जाण्यायेण्याचा स्त्रियांचा वेळ वाचेल अशी वाहतूकव्यवस्था निर्माण करावी.
(३) ग्रामीण स्त्रियांसाठी पाळणाघरे स्थापन करावीत व त्यांचे मोल माफक असावे.
(४) पाळणाघरांचा दर्जा जास्तीत जास्त वाढवावा.
(५) ग्रामीण स्त्रियांच्या कामाला पोटभर जेवण मिळेल एवढा पगार द्यावा. त्यांचे पैसे त्या स्वतः खर्च करू शकतील अशी परिस्थिती निर्माण करावी. नवरयाचे दारूचे व्यसन व इतर कुटुंबीयांच्या मागण्या यामुळे पुष्कळदा स्त्रियांचा स्वत:च्या पगारावर ताबा नसतो.
मुलांना एकटी आई घडवत नसून पूर्ण समाज घडवतो. “बापाच्या अनुपस्थितीत एकट्या आईने वाढवलेले मुलगे पुष्कळदा गुन्हेगारीच्या मोहास बळी पडतात’, “पिअर प्रेशरने’ मुले ड्रगच्या व्यसनास बळी पडतात असे अनेक संशोधकांनी आता सिद्ध केले आहे. मुलांना वाढवणे ही जबाबदारी पूर्ण समाजाची आहे. एकट्या आईची नाही.
लेखकाने ‘‘स्त्रियांच्या व बालमजुरांच्या श्रमांमुळे देशाच्या संपत्तीत कितपत भर पडते हे विवाद्य आहे’ असे म्हटले. त्याबद्दल मी असे म्हणेन, “देशाच्या संपत्तीत भर पडो न पडो बालमजुरी बंद व्हायला हवी. जर त्या बालमजुरांच्या आयांना नोक-या असत्या तर त्यांनी आपल्या मुलांना मजुरी करायला पाठवले असतेच का? ग्रामीण बँकसारखे बंगलादेशमधले कार्य “स्त्रियांच्या हातात आर्थिक बळ यावे” (विमेन्स एम्पॉवरमेंट) ह्या तत्त्वावर चालले आहे. “स्त्रीच्या हातात पैसा आला की सर्व कुटुंबाचे भले होते”. उलट पुरूषांच्या हातांत पैसा आला की ते पैसे बरेच पुरुष चैनीवर उडवतात व त्या पैशाने कुटुंबीयाचे भले होत नाही? असे आता अनेक एन.जी.ओ. म्हणत आहेत. (एन.जी.ओ. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायजेशनस्)
“ग्रामीण स्त्रियांच्या श्रमांना अजून पर्याय नाही, त्यांची निंदणा-खुरपण्याची कामे त्यांच्यावाचून कुणी करू शकणार नाहीत असे लेखक का म्हणतात? शहरी स्त्रीपुरुष एवढे कमजोर आहेत का? “आज देशात अन्नधान्य विपुल आहे” असा लेखकांचा दावा आहे. मग ग्रामीण स्त्रिया आपल्या मुलांना एकटे टाकून निंदण्या-खुरपण्याच्या मागे का लागतात? (याचे कारण गरिबी आहे का?) जर आयांना पुरेसे पैसे मिळाले तर त्याही आपली मुले पाळणाघरात ठेवतील.
जर लेखकाचा तान्ह्या मुलांना पाळणाघरात ठेवायला विरोध असेल तर मी असे म्हणेन आईने व वडिलांनी दोघांनीही पार्ट टाईम नोकरी करावी व मुलांना संभाळावे. मुले ही एकट्या आईचीच जबाबदारी नाही.
जगाच्या हितासाठी आजवर असंख्य धर्मगुरु, राज्यकर्ते, पंडित यांनी स्त्रीच्या आयुष्यात ढवळाढवळ करून तिचे हालहाल केले आहेत. आपली मुले पाळणाघरात ठेवून कामावर जाव्या लागणा-या स्त्रियांना कामापासून वाचवण्याची जरुरी नाही.
देशाच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या व तिच्या स्वतःच्या मुलांच्या भल्यासाठी स्त्रियांना बंधनात घालू इच्छिणा-या हितचिंतकापासून तिचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे.
(२) ‘संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन नको’
या चिं. मो. पंडित यांच्या पत्राला हे उत्तर.
‘‘काळा पैसा बाहेर काढण्याचे अनेक मार्ग आहेत” असे चिं. मो. पंडित लिहितात. या मार्गावर त्यांनी एक लेख लिहावा अशी मी त्यांना विनंती करते. भारतात काळ्या पैशाची एवढी वाढ का झाली व आता तो नाहीसा कसा करावा ह्यावरही प्रकाश टाकावा अशीही विनंती आहे.
काळ्या पैशामुळे भारतात प्रवास कंपन्या, दागिने व छानछोकीचे कपडे यांच्या धंद्याची प्रचंड वाढ झाली आहे. संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन हे काळ्या बाजाराच्या आजाराचे लहानसे चिह्न आहे. काळे पैसे बाहेर काढण्याचा ‘ओंगळ प्रदर्शन’ हा मार्ग नाही हे मलाही मान्य आहे. पण जोवर काळा पैसा अस्तित्वात आहे तोवर हे चालूच राहणार,
चिं. मो. पंडित “संवेदनशीलता” “अळ्या’ याबद्दल बरेच काही लिहितात. त्यांना मी असे विचारते, “काळ्या पैशाने, लाचलुचपतीने अनेक माणसांच्या आयुष्याच्या सत्यानाश झाला आहे, एवढेच नव्हे तर साऊथ अमेरिकेत अनेक देशांत काळ्या “ड्रग मनी मुळे हत्याकांडे चालू आहेत. (उदा. कोलंबिया). तेव्हा संवेदनशीलतेचा आणि काळे पैसे खाऊन श्रीमंत झालेल्यांचा संबंधच काय? संवेदनशीलता असती तर लोकांनी इतरांना पिळून पैसा मिळवला असता का?
आज अमेरिकेत प्रसिद्ध होणारया मासिकांत, “भारतात जेवढी खेडी आहेत तेवढे कोटी रुपये भारतीय राजकारण्यांनी व धंदेवाईकांनी स्विस व इतर बँकांत जमा केले आहेत. भारताला फॉरेन एडची जरूरी नाही. आपले पैसे ‘करप्ट दलालांच्या खिशात जातात. असे लेख मी वाचते. हे करप्ट दलालच संपत्तीचे प्रदर्शन करीत आहेत. त्यांच्याकडून संवेदनशीलतेची अपेक्षाच करणे चूक आहे.
– ललिता गंडभीर

र. वि. पंडितांनी पुनर्विचार करावा
श्री. र. वि. पंडित यांचा जुलै ९८ च्या अंकामधील लेख वाचला. लेखात श्री. पंडितांनी जो अभ्युपगम उपन्यास मांडला आहे तो अंधश्रद्धेला चांगलाच खतपाणी घालणारा आहे. भारतात विशिष्ट नऊ महिन्यांच्या कालावधीत जन्मलेल्या व्यक्तींना अधिक यश मिळते असा त्यांचा दावा आहे. खरे तर ह्या गोष्टींसाठी श्री. पंडितांनी आकडेवारी द्यावयाला हवी, तक्ता मांडायला हवा. भारतातील गेल्या दोन हजार वर्षांतील यशस्वी स्त्रीपुरुषांची आकडेवारी प्रस्तुत करायला हवी. ती श्री. पंडितांकडे तयार आहे काय? मुळात संख्याशास्त्राच्या साध्या नियमांनुसार एखीही श्री. पंडितांचे म्हणणे ७५ टक्के खरे ठरायला हरकत नाही. कारण बारा महिन्यांपैकी नऊ महिने त्यांच्या दृष्टीने यशस्वी होण्यासाठी चांगलेच असतात. म्हणजे ह्या नऊ महिन्यांत जन्मलेली कुठलीही व्यक्ती यशस्वी होते असा दावा श्री. पंडितही करणार नाहीत. मग कुठल्या व्यक्ती यशस्वी होतात? ह्या व्यक्ती नेमकी कुठली साधना करतात जेणेकरून त्या यशस्वी होतात? त्यांच्या यशामागील कार्यकारणभाव समजून घेतला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची कहाणी वेगळी असते. केवळ विशिष्ट कालावधीत झालेला जन्म त्यांच्या यशाला कारणीभूत ठरतो का? या बाबतीत आत्मस्तुतीचा वाईट धोका पत्करूनही प्रस्तुत लेखकाला स्वतःबद्दल सांगणे जरूरीचे वाटते.
प्रस्तुत लेखकाचे वय ३५ वर्षे असून तो स्वतः कॉम्प्युटर इंजिनीयर आहे. त्याला स्वतःचा व्यवसाय असून आधीची कुठलीही व्यवसायाची पार्श्वभूमि नसताना तो कोटींमध्ये व्यवसाय करतो. गरिबीतून वरती येत त्याने श्री. पंडितांचे निकष लावले तर यश मिळवले आहे. तो स्वतः कथालेखक असून त्याच्या नावावर दोन कथासंग्रह आहेत. त्यापैकी एकास राज्यपुरस्कार व श्री. दा. पानवलकर पुरस्कार हे निखळ गुणवत्तेच्या बळावर मिळाले आहेत. हे सांगायला संकोच वाटतो पण श्री. पंडितांचा प्रतिवाद करण्यासाठी हे सांगण्याची जरूरी आहे कारण प्रस्तुत लेखकाची जन्मतारीख १० सप्टेंबर आहे. म्हणजे श्री. पंडितांच्या म्हणण्यानुसार यशस्वी होण्यासाठी हा काळ फारसा अनुकूल नाही. परत प्रश्न येतो की प्रस्तुत लेखकाला यशस्वी समजायचे का? तो मापदंड कसा लावायचा? कोणी लावायचा? शिवाजी महाराज यशस्वी होते. त्यांना संभाजीकडून स्वास्थ्य लाभले का? मिझ गालिब फार मोठा कलावंत होता. त्याला समृद्धी मिळाली का? जी. ए. कुलकर्णीपेक्षा खांडेकर, फडके, बाबा कदम असे कितीतरी लेखक लोकप्रिय होते किंवा आहेत. जी.ए. यशस्वी लेखक होते का? जयप्रकाशजींना सत्ता कधीच मिळाली नाही, घेतली नाही. मग ते अयशस्वी होते का? दाऊद, अरुण गवळी आदींचे नाव रोज वर्तमानपत्रात येते म्हणजे ते यशस्वी का? एन्यादी व्यॆक्ती आयुष्यभर यशस्वी असते का? डॉन ब्रैडमन त्याच्या शेवटच्या डावात शून्यावर बाद झाला. मुळात यश ही फार गुंतागुंतीची संकल्पना आहे. प्रस्तुत लेखक कोटींमध्ये व्यवसाय करतो अशी फुशारकी मारू शकतो पण त्याच्यापुढे शेकड्याने लोक आहेत मग तो यशस्वी का? श्री. तेंडुलकरांना आतापर्यंत नोबेल पुरस्कार मिळालेला नाही, मग ते यशस्वी नाटककार आहेत का? यशस्वी असणे व चांगले असणे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की एकच बाजू? रिलायन्सचे धीरूभाई अंबानी टाटांपेक्षा यशस्वी आहेत असे दिसते. टाटांनी आजपर्यंत ज्या संस्था उभ्या केल्या त्या महत्त्वाच्या की एकही पैसा कर न भरणारे धीरूभाई यशस्वी व चांगले? मुळात यश म्हणजे काय? जी व्यक्ती स्वतःमागे सर्वांत जास्त लोक उभे करते ती सर्वांत यशस्वी का?
श्री. पंडिताच्या लिहिण्यानुसार पावसाळ्यात जन्मलेल्या व्यक्ती तितक्याशा यशस्वी नसतात. पावसाळा १५ सप्टेंबरपर्यंतच मानायचा का? मुंबईत हल्ली पावसाळा नवरात्रीपर्यंत लांबतो. पाऊस सुरूही उशिरा होतो. तुमान बदलत चालले आहे. भारतात सर्व ठिकाणी पावसाळा एकाचवेळी असतो असे श्री. पंडितांना म्हणायचे आहे का? १५ सप्टेंबरला जन्मलेली व्यक्ती यशस्वी होण्याचे प्रमाण कमी असण्याची शक्यता व १६ सप्टेंबरला जन्मलेली व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता जास्त हे शास्त्रीय निकषांवर कसे सिद्ध करायचे?
श्री. पंडिताच्या लिहिण्यानुसार १५ सप्टेंबर ते १५ जून दरम्यानच मूल जन्माला घालणे शास्त्रीयदृष्ट्या कितपत शक्य आहे? ही नैसर्गिक गोष्ट ठरवून करता येते का? हा तर टेस्टट्यूब बेबीचा प्रकार झाला.
श्री. पंडितांचे यशस्वितेचे निकष तत्त्वज्ञानाच्या निकषांवर कितपत बरोबर आहेत हे विज्ञान ठरवीलच, त्यांची तारखांची अंधश्रद्धा प्रस्तुत लेखकाला मंजूर नाहीच पण यश ह्या संकल्पनेवर चांगली दीर्घकथा तरी होऊ शकते हे त्याला पटले आहे हे नक्की. त्याबद्दल श्री. पंडितांचा प्रस्तुत लेखक आभारी आहे.
पंकज कुलरकर
Alphabetics Computer Services (P.) Ltd.
5, Hiro Estates, Kataria Marg, Mahim
Mumbai-400 016

आजचा सुधारक अभ्यासमंडळ
प्रा. प्र.ब. कुळकर्णी यांच्या मनात खूप दिवसांपासून ही कल्पना होती की काही थोड्या व्यक्तींनी एकत्रित येऊन, त्यांच्या आवडीच्या पुस्तकांचा गंभीरपणे परिचय करून द्यावा. ही कल्पना मूर्त स्वरूपात दि. १०-८-२७ रोजी आली.
दि. १०-८-९७ रोजी डॉ. श्रीराम लागू यांच्या उपस्थितीत एक अनौपचारिक सभा झाली. ह्या सभेत ह्या मंडळाच्या स्थापनेमागील पाश्र्वभूमि विशद करताना कुळकर्णी म्हणाले,
वैचारिक, सामाजिक परिवर्तनाला अनुकूल अशा ग्रंथांचे वाचन सभेचे सदस्य करतील. साधारण एक तास पुस्तकपरिचयासाठी द्यावा व नंतर त्यावर सविस्तर चर्चा व्हावी. ह्यातूनच साध्य होऊ शकणारा दुय्यम हेतू म्हणजे आजचा सुधारक मध्ये हा परिचय लेख म्हणून छापता येईल.
पहिल्या अनौपचारिक सभेनंतर रीतसर दर महिन्याच्या दुस-या शनिवारी (हा दिवस कधी कधी सोयीनुसार बदलवून घेतला.) सायंकाळी ५.०० वा. सभा घेण्यास प्रारंभ झाला. या सभांमध्ये खालील सभासदांनी त्यांच्या त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची निवड करून सविस्तर परिचय करून दिला.
पुस्तक परिचायक पुस्तकाचे नाव
१. डॉ. सुधीर भगाडे Invasion : Robin Cook
२. डॉ. पु.वि. खांडेकर The Brief History of Time : Hawking
३. श्रीमती आशा ब्रह्म Brighter than a Thousand Suns : Robert Junsk
४. श्री. अनिल ब्रह्म Dragons of Eden : Carl Sagan
५. श्री. नंदा खरे Artificial Life : Steven Levy.
६. प्रा. दि.य. देशपांडे Preparing for the 21st Century”: Paul Kennedy.
७. प्रा. बा.य. देशपांडे भारतीय प्रबोधनाचे स्वरूप: (संपा)
दि.के. बेडेकर आणि भा.शं. भणगे
८. सुनीती नी. देव तत्त्वज्ञानाच्या मूलभूर्त समस्या: प्रा. दि.य. देशपांडे
९. डॉ. विद्यागौरी खरे The Great Indian Middle Class : Pavan Varma.
या सभेमध्ये काही पथ्ये काटेकोरपणे पाळली. (१) सभा वेळेवर सुरू करणे (२) कोणाहीकडून पैसे न घेणे (३) सभेत केवळ चहा, बिस्किटे एवढेच देणे.
मागे वळून पाहताना हे आवर्जून सांगावेसे वाटते की प्रत्येक सदस्याने स्वेच्छेने स्वीकारलेली जबाबदारी अतिशय गंभीरपणे पार पाडली.
दि. २३-२ ९८ रोजी झालेल्या अनौपचारिक सभेत हा अहवाल सादर केला गेला व नवीन वक्ते व पुस्तकांची निवड केली गेली.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.