पत्रव्यवहार

आजचा सुधारक तरुणांना आवडेल असे काहीतरी करा
संपादक, आजचा सुधारक
नुकतीच ३ आठवड्यांपूर्वी माझी प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडून आजचा सुधारक चे काही जुने अंक मला वाचायला मिळाले. ते मला अतिशय
आवडले. विशेषतः आपण लिहिलेले विवेकवादावरचे लेख तर फारच आवडले. सर्वच लिखाण उत्कृष्ट व वाचनीय आहे व त्याचबरोबर विचारप्रवर्तकही आहे. आपले लेख वाचून मनात आलेले विचार मी या पत्राबरोबरच परंतु वेगळे लिहून पाठवीत आहे.
आपण विवेकवादाचा पुरस्कार करून आगरकरांचेच कार्य पुढे चालवत आहात यात शंका नाही. मला स्वतःला आगरकरांबद्दल फार प्रेम आहे. टिळक थोर खरे पण मला त्यांच्यापेक्षा आगकर जास्त थोर वाटतात. स्वातंत्र्य अगोदर की समाजसुधारणा अगोदर या वादात माझे मत समाजसुधारणेच्या बाजूचे आहे.
आपल्या या उपक्रमात सहभागी होण्याची मला फार इच्छा आहे. परंतु असा सहभाग कोणत्या प्रकारे देता येईल हे समजत नाही. यासंबंधी दोन शब्द जरा स्पष्टपणे लिहितो.
सध्या मासिकाचे सुमारे १५०० वाचक आहेत असे प्रा. कुलकर्णी म्हणाले. ही संख्या कमीतकमी ५०,००० पर्यंत तरी वाढायला हवी. अशाकरिता की इतके उत्तम लेखन अधिकाधिक लोकांच्या हातांत पडायला हवे. त्याकरिता मासिकाचा get-up अधिक आकर्षक करावा ही नम्र विनंती आहे. मासिकावर cover का नाही ? उघडे-नागडे मासिक वाईट दिसते.
विद्वत्ता ही विजनवासातच राहिली पाहिजे असा काही नियम नाही, तसेच ती विद्वत्ता भूर्जपत्रावरच लिहिली पाहिजे असाही नियम नाही. (जरा कठीण शब्द वापरले पण कळकळ वाटली म्हणून लिहिले तरी कृपया राग मानू नये).
मासिकाची जोरदार जाहिरात करावी म्हणजे लोकांना माहिती पडेल की असे उत्कृष्ट मासिक खरोखर अस्तित्वात आहे. (नाहीतर माहिती होणार तरी कशी ? कुलकर्णी भेटले नसते तर मला तरी माहिती मिळाली असती का?)
मासिकाचे विचार तरुणांपर्यंत पोचायला हवेत. साधारणपणे कुठल्याही समाजात तरुण-वर्गच जास्त आदर्शवादी असतो. पण इतके उत्तम लेखन वाचून तरुणवर्ग कसा काय प्रभावित झाला नाही याचे आश्चर्य वाटते. मला भारत सोडून अनेक वर्षे झाली. तरीही आजच्या भारतातील तरुणवर्ग इतका निर्बुद्ध व विचारशून्य बनला असेल हे पटत नाही. मग असे का ? काहीतरी त्रुटी आहे हे मात्र नक्की. तरी याचा विचार व्हावा.
संस्थापक संपादकांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ मासिक काढले हे फार स्तुत्य आहे पण तरीही ते केवळ token न राहता खरोखर instrument of reform बनावे ही सदिच्छा.
प्रा. कुलकर्णी यांनी मला मासिकाकरता लेख लिहून देण्याबद्दल फर्माविले आहे. त्या आज्ञेनुसार शक्य होईल तसे लिखाण मी पाठवीन.
माझे विचार स्पष्टपणे मांडल्याचा राग नसावा. लोभापायी लिहिले. पत्रोत्तर यावे.
* * *
विवेकवादाच्या आपल्या प्रतिपादनातून उद्भवणारे प्रश्न
आपले विवेकवादावरचे लेख वाचल्यावर आपणांस खालील प्रश्न विचारावेसे
वाटतात –
१) आपले विवेकवादावरचे काही (३-४ च फक्त) लेख मी आतापर्यंत वाचले आहेत. पण त्यांवरून असे दिसते की आपला सर्व भर Anglo-American तत्त्वज्ञानावरच FEUILT Formal logic, philosophy of language, pragmatism, naturalism, realism, इ. इ. यांवर आहे. याखेरीज जी तत्त्वज्ञानाची इतर क्षेत्रे आहेत, उदा. Continental European philosophy including existentialism, phenomenology, gestalt इ. इ. त्यांच्याशी विवेकवादाचा संबंध काय ? असा प्रश्न मनात येतो. विवेकवाद हे संपूर्ण व सर्वांगीण तत्त्वज्ञान व्हावयाचे असेल तर असा संबंध असणे (व नसल्यास तो जोडणे) व तसेच त्याची सांगड भारतीय तत्त्वज्ञानाशी घालणे आवश्यक ठरते.
२) तसेच Anglo-American तत्त्वज्ञानातही अजूनपर्यंत अनेक त्रुटि आहेत. त्या तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर विवेकवादाची उभारणी केल्यास inheritance मुळे त्या सर्व त्रुटि विवेकवादातही येणार याला उपाय काय ? वानगीदाखल एकच उदाहरण देतो – वरील तत्त्वज्ञानाचा सगळा भर formalism वर आहे. परंतु जगात इतरत्र व आपल्या दैनंदिन व्यवहारातही अनेक गोष्टी अशा असतात की ज्यांचे formalization करणे शक्य नसते. याकरता logician मंडळींनी अनेक प्रयत्न केले. बड रसेलच्या Principia Mathematica R480 Hald ET377 prepositional logic, firstorder logic, second-order logic, model theory, deontic logic, modal logic, dynamic logic, process logic वगैरे अनेक प्रकारची लॉजिके निर्माण करूनही—होऊनही अजूनसुद्धा formalization चा प्रश्न सुटलेला नाही. विवेकवादाजवळ या प्रश्नाचे उत्तर आहे काय ? तसे नसेल तर विवेकवादाचे क्षेत्र फारच मर्यादित राहील. (एक computer scientist या नात्याने मला वरील सर्व लॉजिकांमध्ये उत्तम गति आहे म्हणून हा प्रश्न विचारला.)
३) वरील दोन प्रश्नांशी निगडित असा आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे objective truth विरुद्ध subjective truth. सर्वसाधारणपणे (व मुख्यतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून) objective truth हेच खरे सत्य आहे असे मानले जाते. या सत्याच्या व्याख्येमध्ये subjective truth चा अंतर्भाव होत नाही. पण तरीही subjective truth आस्तित्वात असू शकते व ते “खरे’ ही असू शकते. उदा. मी जर असे म्हटले की माझा हात दुखत आहे. (मराठी लिहिण्याची सवय नाही) तर हे objective truth होऊ शकत नाही – (असे धरून चालू की वेदनेची कोणतीही behavioural बाह्य प्रतिक्रिया मी दर्शविली नाही.) कारण “दुखणे” ही प्रक्रिया किंवा phenomenon संपूर्णपणे subjective domain मध्येच राहतो. तो objective domain मध्ये आणता येत नाही. परंतु तरीही “दुखणे’ ही गोष्ट नक्कीच सत्य असू शकते. तसेच माझे हे विधान ऐकल्यावर आपल्याला त्याचा अर्थबोध होऊ शकतो. म्हणजे epistemology या दृष्टिकोनातूनही हे विधान ग्राह्य ठरते. कारण की आपलाही हात पूर्वी केव्हातरी दुखला असणारच व त्या “दुखणे” नामक अनुभवाची स्मृति आपल्या मनात ठेवली गेली असणार व त्यामुळे माझे विधान ऐकल्यावर त्या स्मृतीशी झालेल्या correlation मुळे आपल्याला अर्थबोध होणारच. पण हे सर्व जरी खरे असले तरी तात्त्विक दृष्ट्या माझे विधान हे subjective truth च राहते. ते objective होऊ शकत नाही. तरीसुद्धा ते खरे आहेच. म्हणजेच काय की subjective truths सुद्धा खरी असू शकतात. यावर विवेकवादाचे काय म्हणणे आहे?
४) वरील प्रश्न क्र. ३ माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हिंदू तत्त्वज्ञानातील बरीचशी तत्त्वे ही subjective truths आहेत. त्यांचे objectification करता येत नसले तरी ती खोटी आहेत असे नव्हे, ती खरी असू शकतात. Objective truth च फक्त खरे व subjective truths खोटी असे मानले तर ज्या दुःखाचे बाह्य स्वरूपात प्रकटीकरण behavioural manifestation केले जात नाही ते दुःखच नव्हे असे म्हणावे लागेल. हे अर्थातच चूक आहे.
या संदर्भात एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते. ३-४ वर्षांपूर्वी मला हार्वर्ड विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे अग्रगण्य प्राध्यापक हिलरी पुटनॅम ह्यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. (मी Steven-Tech) मध्ये प्राध्यापक असताना आम्ही Charles Sanders Peirce च्या शताब्दीनिमित्त त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अमेरिकेच्या पूर्वतीरावर (east coast वर) पर्सला pragmatism चा बाप मानले जाते. तो काही वर्षे Stevens मध्ये शिकवत होता व तेथून पुढे Cornell ला गेला. त्याने सुरू केलेला Philosophy club अजूनही चालू आहे.) आपल्या भाषणात हिलरी म्हणाले की ते आयुष्यभर objective truth हे फक्त खरे असे मानत आले परंतु अलिकडे ते subjectivity व objectivity ह्या दोहोंमधील middle ground चा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिलरींना सांगितले नाही, परंतु माझ्या मते अशी middle ground हिंदू तत्त्वज्ञानामध्ये अगोदरच अस्तित्वात आहे. (ती का व कशी याविषयीचे अधिक लेखन मी सध्या करीत आहे). परंतु ही तत्त्वे subjective truths असल्यामुळे त्यांचा खरेपणा पडताळून पाहण्यात अडचणी आहेत.
दुर्दैवाने ह्या कारणामुळे श्रद्धेचा आश्रय घेतला जातो. वास्तविक येथे श्रद्धेची मुळीच गरज नसून श्रद्धा ही केवळ अज्ञानाविरुद्ध वापरली जाणारी “ढाल’ आहे. (जे समजत नाही, कळत नाही त्यावर श्रद्धा ठेवली जाते. म्हणजे उत्तर देता येत नाही अशी परिस्थिती आली की श्रद्धा ठेवा म्हणून सांगायचे.) खरे तर हिंदू तत्त्वज्ञानामधील सत्ये ही श्रद्धा, विश्वास, निष्ठा ह्यांपैकी कशावरही मुळीच आधारलेली नसून ती फक्त (१) परोक्षानुभूति व (२) अपरोक्षानुभूति अशा दोन अनुभूतींवर म्हणजे प्रत्यक्षानुभवांवर आधारलेली आहेत. म्हणजेच. त्यांचा पाया अनुभववाद हाच आहे असे माझे ठाम मत आहे. या अनुभववादाला जर Husserlian phenomenology ची जोड देता आली तर त्या दोहोंचा संयोग करून आध्यात्मिक सत्यांची (spiritual phenomena) validity तपासून पाहणे शक्य आहे असे मला वाटते.
तेव्हा हिंदू तत्त्वज्ञानातील सत्ये केवळ subjective truths आहेत म्हणून ती खोटी आहेत असे म्हणणे चूक आहे. पण त्याबरोबरच त्यांच्यावर केवळ श्रद्धा ठेवून ती खरी मानणे हेही तितकेच चूक आहे. आधुनिक post-modernist तत्त्वज्ञानानुसार सत्य हे कोणत्याही extreme च्या टोकाला नसून दोन टोकांच्या मध्ये असते. हे विधान वरील बाबतींत अक्षरशः खरे आहे.
मी स्वतः वैज्ञानिक असूनही गेली सुमारे २४ वर्षे योगसाधना व ध्यानसाधना अत्यंत परिश्रमाने केली व हिंदू तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेल्या अनेक सत्यापैकी काही सत्यांची प्रत्यक्षानुभूति’ घेतली. परंतु तरीही मी देव किंवा धर्म ह्यापैकी काहीच मानत नाही व देवपूजा, देवभक्ति, देवावरील श्रद्धा वगैरे गोष्टी निव्वळ ‘‘बकवास’ आहेत असे माझे मत आहे. “रोकड्या अनुभवाखेरीज केलेली अध्यात्माची चचदिखील व्यर्थ आहे. परंतु तरीही अथातो ब्रह्मजिज्ञासा” असे म्हणून केलेले ब्रह्मसूत्रांतील सत्यान्वेषण खोटे नव्हे. (किंबहुना माझ्या मते तेच फक्त खरे आहे व बाकी सर्व फुकट आहे.)
५) हा प्रश्न नसून एक नम्र सूचना आहे. ती अशी –
५ वर्षांपूर्वी न्यूयॉर्कला American Philosophical Association चे मोठे convention झाले. तेव्हा तत्त्वज्ञान हा माझा विषय नसतानाही मी मुद्दाम गेलो होतो. त्यावेळच्या चर्चेत कोलंबिया विद्यापीठातील एका अग्रगण्य प्राध्यापकांनी “भारतीय तत्त्वज्ञान हे मुळी तत्त्वज्ञानच नव्हे’ असे अत्यंत बेजबाबदार विधान केले. तेव्हा त्यांच्याशी मी पुष्कळ वाद घातला होता. वास्तविक भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल अमेरिकेत फार अज्ञान आहे असे नाही परंतु तरीही उच्चपदस्थांची “तिरकस वृत्ति संपत नाही. तू computer science व इंजिनियरिंगचा प्राध्यापक असताना तत्त्वज्ञानात लुडबूड कशाला करतोस ? (मराठी दलित साहित्यिकांच्या भाषेत – “तुही यत्ता कंची?”) असा प्रश्न विचारायलाही एका सद्हस्थांनी कमी केले नाही. Computer च्या क्षेत्रात मी कितीही दादागिरी केली तरी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मी ‘‘दलितच आहे. अर्थात मला याचे दु:ख किंवा पर्वा मुळीच नाही. परंतु भारतीय तत्त्वज्ञानाची पायमल्ली होऊ नये म्हणून ज्यांना ह्या विषयात “यत्ता’ आहे। अशांनी ह्याची दखल घेणे अगत्याचे आहे.
अनिलकुमार भाटे
107 Loring Ave., Edison, NJ 08817 USA

मुलींवर आणखी ओझे नको
संपदिक, आजचा सुधारक,
अरुण टण्णू यांच्या पत्रातली (नोव्हें. ९८) कळकळ मला समजते. जातिभेद नष्ट केले पाहिजेत व जातीयतेमुळे देशाची प्रचंड हानी झाली आहे हे पण मला मान्य आहे. फक्त बेटीव्यवहारातली जात हिंदूना एकसंध करण्यासाठी उच्चवर्णीयांनी किंवा इतर कुठल्याही जातीने काढून टाकावी’ हा त्यांचा मुद्दा मला अमान्य आहे.
आपल्या समाजात अगदी जातिभेदाएवढीच अन्याय्य पुरुषप्रधानता होती व आहे. उच्चवर्णीय स्त्रियांसकट सर्व जातींच्या स्त्रिया पुरुषप्रधानतेच्या जात्यात भरडून निघालेल्या आहेत.
बेटीव्यवहार ह्या शब्दात बेटी ही रोटीसारखी देण्याघेण्याची अचेतन उपभोग्य वस्तू आहे असा अर्थ अभिप्रेत आहे. बेटाव्यवहार हा शब्द अस्तित्वात नाही कारण बेटा हा निर्जीव मालमत्ता मानला जात नाही.
समाजाने मुलींना मालमत्ता मानले तरी त्यांना इच्छा, आकांक्षा असतात. आपण कुणाशी लग्न करावे, आपले हित कशात आहे हे त्यांना समजते.
आत्ताही मुलींचे विवाह त्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून होतात असे मुळीच नाही.
अरुण टण्णू म्हणतात तसे विवाह मुलींच्या स्वतःच्या नव-यामुलाच्या व सासरच्या माणसांच्या संमतीने झाले तर ठीक आहे. पण सासरच्या माणसांची त्यातल्या त्यात सासूची संमती नसली तर मुलींचे हाल होतील. नव-यावर इच्छेविरुद्ध लग्न लादले गेले तर मुलीचे हाल आणखीच वाढतील.
जातीच्या उतरंडीत कुठल्याही दिशेने लग्न झाले तरी मुलीची जात तिच्याविरुद्ध अस्त्राप्रमाणे वापरली जाईल. उदा. “खालच्या जातीची ना, मग तिला अक्कलच कमी!” किंवा “ब्राह्मण ना, स्वतःला शहाणीच समजणार !”
पुरुषप्रधान समाजातली लैंगिक व जातीय विषमता उच्चवर्गीय पुरुषांनी निर्माण केली आहे ती विषमता नष्ट करण्याची जरूरी आहे हे मला मान्य आहे. पण ह्या उदात्त । ध्येयपूर्तीसाठी निष्पाप मुलींना वेठीला धरून त्यांचे विजातीय विवाह करून त्यांच्या सुखाचा चुथडा करण्याचा अधिकार आपल्याला कुणालाच नाही.
आधीच मुली लग्नाच्या बाजारात दुय्यम स्थानी असतात. रूप, रंग, पैसा, पत्रिका असे अनेक अडथळे त्यांच्यापुढे असतात. त्या तडजोड करत असतातच. त्या तडजोडीत विजातीय लग्न करण्याच्या सक्तीची भर नको.
सर्वच जातीच्या मुलींना त्यांनी कोणाशी व कोठल्या जातीत लग्न करायचे हे ठरवावयाचे स्वातंत्र्य हवे. मुलींनी (किंवा मुलांनी) कुणाशी लग्न करायचे हे त्यांनाच ठरवू दे.
आंतरजातीय विवाहाने समाजातील जातीयतेची तीव्रता कमी होईल यात शंका नाही.
उच्चवर्गीयांनी किंवा इतर कुणीही बेटीव्यवहार करून जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आंतरजातीय विवाहास पूरक असे वातावरण निर्माण करण्याची जरूरी आहे.
उदा :
१) समाजातील सर्व जमातींचा आर्थिक, शैक्षणिक व वैचारिक दर्जा उच्च करण्याचा प्रयत्न व्हावा.
२) राहण्याच्या जागा, शाळा, क्लासेस वगैरे ठिकाणी जातींचे मिश्रण असावे.
३) जी मुले व मुली आंतरजातीय विवाह ठरवतील त्यांना भावनिक मदत करणारी संस्था स्थापन करावी.
४) वधूवरसूचक मंडळांना विजातीय स्थळे सुचवण्यास उत्तेजन द्यावे.
जगात उच्चस्थानी असलेला कुठलाही माणसांचा समूह स्वतःहून आपल्या उच्चस्थानाचा त्याग करीत नाही. भारतीय उच्चवर्णीय वर्ग स्वतःहून समानतेच्या उदात्त तत्त्वाने प्रेरित होऊन आपली वागणूक बदलेल अशी शक्यता कमीच आहे.
म्हणून उच्चवर्णीयात विवाहाने मिश्र होण्याची आशा ठेवण्यापेक्षा जातिभेदांमुळे होणा-या अन्यायाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करावा. उदा. शिक्षण, राहणीमान यांतला
फरक,
तसेच समाजातील इतर जातींनीही आपल्यातला दुरावा कमी करण्याचे प्रयत्न करावेत.
समाजातील जातीयतेची विषमता कमी करण्याचे ओझे मुलींच्या खांद्यावर टाकणे योग्य नाही.
ललिता गंडभीर
65, Oxford Rd Newton MA 02159
U.S.A.

जातिवाचक आडनावे सोयीची की गैरसोयीची?
संपादक, आजचा सुधारक
नोव्हेंबर १९९८ च्या अंकातील श्री. अरुण टण्णू व श्री. खिलारे (व नानावटी) यांच्या पत्रातील निष्कर्ष काढण्याची पद्धती पूर्वग्रहदूषित वाटते.
महाराष्ट्रातल्या मासिकांचे ९८% संपादक ब्राह्मण वा उच्चवर्णीय असले तरी ते तो व्यवसाय करीत असल्यामुळे लेख वा कुठलेही साहित्य निवडण्यात त्यांचा पहिला निकष वाचकांची आवड हा असणार! तो लेखक वा लेखिका जातीने कोण आहे हा नव्हे. – तीच गोष्ट डॉक्टरांचे दवाखाने चांगले वा वाईट चालण्याबाबत. माझ्या अल्प मतीनुसार जो डॉक्टर बरे करतो अशा डॉक्टरकडे रोगी जातात. त्याचे आडनाव बघून जात नाहीत. जोशी, कुळकर्णी आडनावाचे डॉक्टरही माश्या मारीत बसलेले मी पाहिले आहेत. बरे, समजा कांबळे आडनाव पाहून ब्राह्मण रोगी त्यांच्याकडे जात नसले तरी ते फक्त २% असणार, बाकीच्या ९८% नी तर कांबळे यांच्या दवाखान्यातच गर्दी करावयास हवी. माझ्या ब्राह्मण डॉक्टर मित्राकडे ९०% रोगी मुसलमान आहेत. श्री खिलारे यांच्या निष्कर्षानुसार त्यांनी मुसलमान डॉक्टरकडे गर्दी करावयास हवी.
आडनावावरून जात कळते हा समजही तितकासा खरा नाही. कांबळे या आडनावाचे ब्राह्मण व जैन गृहस्थ माझ्या माहितीचे आहेत. आमच्या गावात ५०% ब्राह्मणांचे आडनाव इंगळे आहे. आंबेडकर हे तर नाव ब्राह्मण शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब यांचे आंबावडेकर हे मूळ नाव बदलून त्यांना दिले असा उल्लेख श्री. धनंजय कीर यांच्या पुस्तकात आहे. बरे आपल्या आडनावावरून जात दर्शविली जाते व त्याचा आपल्याला तोटा होतो अशी समजूत असेल तर आडनाव बदलण्याचा मार्ग उपलब्ध आहे. माझ्या कित्येक ब्राह्मण मित्रांना कुळकर्णी हे आडनाव गैरसोयीचे वाटल्यामुळे ते बदलून त्यांनी आपल्या गावावरून म्हणजे उदगीरकर, लातूरकर, औंधकर इ. आडनावे लावली आहेत. साठे, टिळक, भालेराव ही आडनावे कित्येक मागासवर्गीय लावतातच. शिवाय लेखकास आपल्या आडनावामुळे आपले साहित्य स्वीकारले न जाण्याची भीती असेल तर ते टोपणनावाने साहित्य पाठवू शकतात.
आजचा सुधारकचे संपादक ब्राह्मण व त्यामुळे (?) लेखकही ब्राह्मण म्हणून त्यांनी मागासवर्गीयांना लिहिते करावे हे ठीक. पण आजचा सुधारक चे वर्गणीदार व आजीव सभासदही ९५% ब्राह्मण आहेत तेव्हा मागासवर्गीयांनी आजचा सुधारक वाचावा म्हणून सुधारककारांनी काय करावे यांचेही खिलारे यांनी दिग्दर्शन करावयास हवे.
– श्याम कुलकर्णी
‘यमाई’, टिळकनगर, औरंगाबाद

जाती मोडण्यासाठी बेटीव्यवहाराशिवाय दुसरा उपाय नाही
संपादक, आजचा सुधारक
पानिपतच्या युद्धात सुरुवातीला अहमदशहा अब्दालीचा पेशव्यांकडून पराभव व्हायचा. एक दिवस रात्री अब्दालीने टेकडीवरून पेशव्यांच्या तंबू राहुट्यांकडे नजर टाकली तर त्याला शेकडो चुली पेटलेल्या दिसल्या. त्याने त्याच्या सरदाराला विचारले की, हे काय आहे ? सरदाराने सांगितले,” पेशव्यांच्या सैन्यात अनेक जाती आहेत. त्यांच्यात रोटीव्यवहार देखील होत नाही म्हणून जातीप्रमाणे प्रत्येकाच्या वेगळ्या चुली पेटल्या आहेत.” अब्दाली म्हणाला, “मग माझे काम सोपे झाले.’ पुढे पेशव्यांचा दारुण पराभव झाला.
पेशवाईत जातीयवादाचा अतिरेक झाला. चतुर्थवर्णाच्या लोकांना तर रस्त्याने जाताना भुंकण्यासाठी गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधावा लागे. एकनाथ महाराजांनी वाळवंटातील उन्हात उभे असलेले महाराचे पोर कडेवर घेतले, असे आपण शालेय पुस्तकात वाचतो. आणि कौतुक करतो. त्यापेक्षा एकनाथ महाराजांनी सर्व दलितांना जवळ बोलावून सवर्णांना त्यांच्याशी रोटीबेटीव्यवहार करायला का नाही लावले? ज्ञानेश्वरांपासून सर्व संतांनी महाराष्ट्रातल्या लोकांना भक्तिमार्गाला लावून दरवर्षी पंढरीची वारी चालू केली. लाखो लोक दरवर्षी पंढरपूरला जायचे. पण हरिजनांना पंढरपूरच्या देवळात प्रवेश नाही. त्यांनी फक्त कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानायचे. हे एकाही संताच्या लक्षात आले नाही, पूज्य साने गुरुजींनी आमरण उपोषण केल्यावर हरिजनांना देवळात प्रवेश सुरू झाला. हा ताजा इतिहास
आहे.
विश्वहिंदू परिषदेच्या अशोक सिंघल यांनी जाहीर केले, “चतुर्थ वर्णाच्या लोकांना देवळात जाऊन पूजा सांगण्याचा अधिकारच नाही.” एक शंकराचार्य जाहीर करतात, “चतुर्थ वर्णाला रथयात्रेत सामील होण्याचा अधिकारच नाही. दुसरे शंकराचार्य जाहीर करतात, “स्त्रियांना आणि शूद्रांना वेदमंत्र म्हणण्याचा अधिकारच नाही.” ह्यातून काय दिसते?
स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी तळमळीने सांगायचे, “मी स्वतःला ब्राह्मण समजत नाही. कोणालाही ब्राह्मण समजत नाही. स्वतःला कट्टर हिंदू समजतो. आणि सर्व हिंदूंनी सातबेड्या, विशेषतः बेटीव्यवहारातील जातींची बेडी तोडल्याशिवाय आणि बेटीव्यवहारात जात घालवल्याशिवाय हिंदू ख-या अर्थाने एकसंध होणार नाहीत. पण स्वा. सावरकरांचे हे वस्तुनिष्ठ तर्कनिष्ठ हिंदुत्व सावरकरवाद्यांना पचवता आले नाही. त्यांनीच सावरकरांचा, त्यांच्या विचारांचा पराभव केला. परिणाम काय झाला ? भारतात अजून सुमारे साडेपाच हजार जाती आहेत. म्हणजे हिंदू समाजात साडेपाचहजार भिती कायमच आहेत. किराणा दुकानात ज्याप्रमाणे सर्व वस्तु असतात, पण किराणा नावाची वस्तु नसते, तसे हिंदूंमध्ये जातविरहित हिंदू कोणी नाही. सावरकर हे खरे विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ द्रष्टे हिंदुत्ववादी होते. पण आपण त्यांच्याकडून काहीच घेतले नाही. महाराष्ट्रात प्रमुख पंचांगे दोन. एक ढवळे पंचांग आणि दुसरे दाते पंचांग. पण दोन्हीत फक्त विशिष्ट जातींचीच आडनावांची यादी असते. सर्व हिंदू जातींची का नाही?
बी ९, शांतिवन, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पू.) मुंबई ४०००५७ – अरुण टण्णू

खिलान्यांच्या सूचना योग्य
प्रो. कुळकर्णी, संपादक, आजचा सुधारक यांस
न्यूयॉर्कला शरद पवारांच्या स्वागतप्रसंगी आपली भेट झाली. त्या भेटीत तुम्ही आजचा सुधारकचा एक अंक देऊन अशा पुरोगामी मासिकाचा परिचय करून दिला ह्याबद्दल धन्यवाद. भारतीय निधर्मी लोकशाही टिकविण्याकरता आम जनतेस त्यांच्या सामाजिक व राजकीय जबाबदा-यांची जाणीव करून देण्याची, तसेच अल्पसंख्यकांच्या हिताच्या दृष्टीने आम जनतेची मनःस्थिती तयार करण्याची जबाबदारी आजचा सुधारकने घेतली आहे हे तुम्ही दिलेल्या अंकावरून समजले. आद्य सुधारकाच्या माजी संपादकांच्या, गोपाळ गणेश आगरकरांच्या, वेळेस नसेल तेवढी मोठी जबाबदारी आज आजचा सुधारकच्या संपादकमंडळावर आहे.
आजचा सुधारकचे जे दोन अंक मी वाचले त्यांवर व टी.बी. खिलारे व नानावटी प्रभृतींच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून दोन शब्द लिहितो. टी.बी. खिलान्यांची एक सूचना
समाजाचे व्यापक हित लक्षात घेऊन व काही कळींच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा घडविण्याच्या दृष्टीने… ब्राह्मणेतर विचारवंतांनी लिहिलेल्या लेखनाचे पुनर्मुद्रण केल्यास ही उणीव भरून निघेल – बरी वाटते. ऑगस्टच्या अंकात व विशेषतः सप्टेंबरच्या अंकात आजचा जर्मनी, ब्रिटिशांचा अमेरिकेकडे कटाक्ष तसेच ऑगस्ट अंकात बरड रसेलचे अप्रिय मताबद्दल मत (मुखपृष्ठावर) जरी academic दृष्ट्या हे सारे बरे असले तरी भारतातील आम जनतेच्या मानाने किंवा बौद्ध वगैरे अल्पसंख्यकांच्या दृष्टीने तेवढे कळकळीचे व जरूरीचे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणांचे १८ खंड आता उपस्थित आहेत त्यांमधून काही त्यांचे विचार आपण प्रकाशित केले असावेत किंवा पुन्हा कराल तर ते जास्त योग्य होईल असे मला वाटते. त्याच दृष्टीने प्रेरित होऊन मी डॉ. म. ना. वानखेडे ह्यांचे दलित साहित्यावरचे भाषण पाठवीत आहे. ते पूर्ण किंवा त्यातील काही भाग प्रसिद्ध केल्यास दलित साहित्यकारांस दलित साहित्याच्या मूळ उद्देशांची पुन्हा जाणीव होईल. श्री शौरी ह्यांच्यावरील माझा एक लेख देखील पाठवीत आहे – त्यातला काही भाग आपण प्रसिद्ध केला तर मला आनंद होईल….
16802, Shipshow River Drive, Leander, Texas – 78641 U.S.A. मधुकर कांबळे

आ. सु. च्या तत्त्वज्ञानाशी विसंगत उतारा
संपादक, आजचा सुधारक
सप्टेंबर १९९८ च्या आजच्या सुधारकचे मुखपृष्ठ वाचले. ते एका आंग्ल कप्तानाचे पेशवाईविषयीचे मत आहे. त्या उता-याचा आजचा सुधारकाच्या तत्त्वज्ञानाशी काय संबंध
आहे हे मला कळत नाही.
एक क्षणभर आपण असे मानू या की कॅप्टन ब्रिग्ज यांनी जे लिहिले ते यथार्थ सत्य होते. पण त्याचा सामाजिक व नैतिक सुधारणेशी संबंध काय? तुम्हाला असे म्हणायचे आहे काय की ती दशा आंग्ल लोकांच्या राज्याखाली नाहीशी झाली?
अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंग्ल लोकांनी लिहिलेल्या इतिहासावरती संपूर्ण विश्वास ठेवणे आम्हाला जड जाते. त्यांना राज्य हिसकवण्यासाठी नेहमी एका कारणाचा शोध घ्यावा लागत असे.
आजचा सुधारकाने वसाहतवादी लोकांचे मत विश्लेषण केल्याशिवाय छापावे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. माझ्या मते, आगरकरांना हे मुळीच आवडले नसते.
न्यूयॉर्क, न्यू यॉर्क U.S.A. – मनोज करमरकर

फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार नाहीच
श्री. संपादक, आ. सु., स. न.
जुलै ९८ अंकात श्री. र. वि. पंडित यांच्या लेखातील दोन मुद्द्यांवर माझे म्हणणे असे आहे :- त्यांचे वाक्य ‘फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार नाही हे जोवर संख्याशास्त्राच्या निकषावर सिद्ध होत नाही तोवर या शास्त्रावर टीका करणे अविवेकीपणाचे आहे. माझे प्रतिपादन असे आहे की, अचेतन ग्रहांना, आणि राहू-केतू या काल्पनिक बिंदूना सुद्धा विचारशक्ती आहे, बुद्धी आहे, फलज्योतिषाचे नियम त्यांना ठाऊक आहेत, त्यांना दैवी सामर्थ्य आहे. – या सर्व कल्पना फलज्योतिषाच्या अगदी मूलभूत सिद्धान्तासाठी गृहीत धराव्याच लागतात. ही वस्तुस्थिती माझ्या दुस-या एका लेखात स्पष्ट केली आहे. फलज्योतिष हे वैज्ञानिक की अवैज्ञानिक हा प्रश्नच आता उरलेला नसून ते निर्विवादपणे एक भ्रामक शास्त्र (बोगस शास्त्र) आहे हे मी सिद्ध केले आहे.
दुसरा मुद्दा जीवनातील यशाच्या कारणांचा. १५ जून ते १५ सप्टेंबर या तीन महिन्यांत जन्माला येणा-यांच्या पेक्षा १५ सप्टेंबर ते १५ जून या नऊ महिन्यांत जन्माला येणारे लोक जीवनात जास्त प्रमाणात यशस्वी होतात, असा त्यांचा निष्कर्ष आहे व तो अगदी साहजिक आहे. ३ महिन्यांत जेवढी माणसे जन्माला येतात त्याच्या तिप्पट माणसे उरलेल्या ९ महिन्यांत जन्माला येतात, तेव्हा या एवढ्या बहुसंख्य माणसांत यशस्वी माणसांचे प्रमाण तिप्पटीपेक्षा कमी तर नक्कीच आढळणार नाही. ते प्रमाण त्याहून फार जास्त आहे असे जर त्यांना आढळले असेल तरच त्यांच्या अभ्युपगमाला काही अर्थ आहे असे म्हणता येईल.
२, वासवी, २१०१, सदाशिव, पुणे ३० – माधव रिसबूड

काही वाचनीय पुस्तके
संपादक, आजचा सुधारक
माझा आजचा सुधारक ऑगस्ट ९८ मधील लेख Goa Board of Secondary and Higher Secondary Education ने July-Sept. 98 या अंकांत भाषांतरासहित छापला. त्यामुळे आजचा सुधारक मासिकाची आणखी काही जणांना माहिती झाली.
वाचकांनी खालील पुस्तके जरूर वाचावीत.
1) India’s China War – Nevile Maxwell
2) Murder of The Mahatma – Justice G. D. Khosla
3) The Cattle Economy of India – V. M. Dandekar
4) The Case that shook India – Prashant Bhushan
५) नववसाहतवाद – प्रा गोपाळ राणे
६) श्रीकृष्ण अहवाल – निखिल वागळे
७) महात्म्याची अखेर – जगन फडणीस
८) अयोध्या-विवाद – प्रा. शेखर सोनाळकर
९) स्वातंत्र्य-आंदोलनातील मुसलमान – प्रा. य. दि. फडके
दलित बुद्धिप्रामाण्यवादी नसल्याने ते आजचा सुधारक वाचीत नाहीत व त्यात लिहीत नाहीत. डॉ. आंबेडकरांनीसुद्धा धर्म-कल्पना नाकारली नाही. ते बौद्ध झाले.
आज पैशाला जास्त महत्त्व आले आहे. दहा हजार रु. द. म. मिळविण्याच्या दलितास सहजरीत्या ब्राह्मण वधू मिळू शकेल. माझ्या माहितीत तीन-चार आंतरधर्मीय व दहापंधरा आंतरजातीय विवाह झाले आहेत. पण ते सर्वजण धर्म पाळतात. देव न मानणारा दलित व मुस्लिम मला अजून भेटलेला नाही.
कळावे. आपला
केशवराव जोशी
जिज्ञासा
सत्यदर्शनातला खरा अडथळा कोणता?
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्
तत् त्वं पूषन् अपावृणु, सत्यधर्माय दृष्टये।।
(सुवर्णमय पात्राने सत्याचे मुख झाकलेले आहे. हे विश्वपोषक प्रभो, माझ्या दर्शनासाठी ते तू उघडे कर).
ह्या वचनासंबंधी माझ्या मनात चिन्तन चालू असताना एक जिज्ञासा अलिकडेच निर्माण झाली. ती अशी की, हे सुवर्णमय पात्र म्हणजे नक्की काय आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला सत्याचे दर्शन होऊ शकत नाही?
त्याचा पायरीपायरीने अधिक विचार करता करता एकेक गोष्ट लक्षात येऊ लागली. म्हणजे असे की, हे सुवर्णपात्र म्हणजे आपल्याला सत्याचे दर्शन घडविण्यातला अडथळा आहे – हा मोहक, आकर्षक असा ज्ञानमार्गातला अडथळा आहे – पडदा आहे. असे अडथळे कोणकोणते असू शकतात ? बाह्य किंवा स्थूल अडथळे आपणा सर्वांना माहीतच आहेत. उदा. भिंतीपलीकडचा धोंडा भिंत पारदर्शक नसल्यामुळे दिसत नाही. किंवा डोळ्यांना पट्टी बांधल्यावर समोरची वस्तूहि दिसत नाही. किंवा दृष्टिदोष असल्यास वस्तू आहे तशी दिसत नाही. पण ह्या सर्वांची कारणे आपल्याला माहीत आहेत–विज्ञानाने माहीत झाली आहेत. म्हणून त्यांबाबत आपल्याला येथे विचार कर्तव्य नाही व वरील पंक्तींमध्येही त्यासंबंधींचा विचार केलेला आहे असे वाटत नाही.
मग ह्या ठिकाणी कशासंबंधी विचार केलेला आहे? हे ‘सत्य’ म्हणजे काय?… सत्. म्हणजे “असणारे आणि सत्य म्हणजे त्याचा- जे आहे त्याचा भाव असण्याचा भाव म्हणजे असणेपण. हे असणेपण वरील उदाहरणांप्रमाणे स्थूल नसून ते सूक्ष्म व अव्यक्त असे आहे. त्यांत आपल्या ज्ञानेंद्रियांना न दिसणारे असे अव्यक्त गुणहि असू शकतील. आणि ते यथार्थपणे जाणण्यातला म्हणजेच त्याचे सम्यक् ज्ञान करून घेण्यातला सुवर्णमयपात्र हा काहीतरी अडथळा असला पाहिजे. ह्या ज्ञानाचे साधन कोणते असावे? बाह्य साधने ह्या सूक्ष्म किंवा अव्यक्त रूपाचे ज्ञान करून घेण्यास उपयोगी पडू शकतील का ? मला वाटते नाही, आपल्या पंच ज्ञानेद्रियांनाही हे ज्ञान होऊ शकणार नाही; कारण जे जाणावयाचे ते अव्यक्त किंवा सूक्ष्म असल्यामुळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्यापैकी कशानेच ते जाणता येत नाही, तर आपली अन्तरिन्द्रिये म्हणजे आपले मन व बुद्धि ह्यांच्याच साह्याने ते जाणता येत असले पाहिजे. आणि हा पडदा किंवा अडथळा हा त्या अन्तरिद्रियांवरच असला पाहिजे असे दिसते.
वास्तविक त्या ज्ञानाचे साधन अशी आपली बुद्धी ही त्याला अनुरूप किंवा अनुकूल अशी असायला हवी, म्हणजे ती कोन्या पाटीसारखी किंवा आरशासारखी सदा स्वच्छ असायला हवी व तशीच ती सतत राहावयालाही हवी. कारण त्याशिवाय वस्तूचे-सत्चे सतत बदलणारे स्वरूप ती जाणू शकणार नाही. पण आज आपण पाहतो की ती तशी असत नाही व राहतही नाही. तिला विशिष्ट पद्धतीने पूर्वानुभवांच्या साह्याने वस्तूचे ज्ञान ग्रहण करण्याची सवय लागलेली आहे. दुस-या शब्दांत सांगायचे तर आपले conditioning झालेले आहे. हा पूर्वसंस्कारांचा पडदा आपल्या बुद्धीवर असतो. हेच ते मोह पाडणारे सुवर्णमय पात्र असेल का ? मला वाटते तेच ते असावे. आपल्याला वस्तूच्या अव्यक्त रूपाच्या यथार्थ ज्ञानासाठी म्हणजेच सत्याच्या दर्शनासाठी हा संस्कारांचा पडदा दूर सारून आपले मन्/बुद्धि आरशासारखे स्वच्छ ठेवता आले पाहिजे. तरच सत्यदर्शन होऊ शकेल. म्हणजेच आपल्या बुद्धीला जडलेली पूर्वसंस्कारांच्या आधारे वस्तूचे ज्ञान ग्रहण करण्याची सवय मोडावी लागेल असे जे मला वाटते, ते बरोबर आहे का? जाणकारांनी माझी जिज्ञासातृप्ती करावी ही विनंती.
ह्या ठिकाणी ईशावस्योपनिषदातील हिरण्मयेन….. ह्या ओळींचा आधार वरील विचार मांडण्यासाठी घेतला आहे. उपनिषत्काली त्यांना त्याचा कोणता अर्थ अभिप्रेत होता, ह्याचा विचार न करता आज व्यवहारात वस्तूच्या यथार्थ ज्ञानासाठी पूर्वसंस्कारांचा पडदा दूर करणे अत्यावश्यक आहे असे मला जे वाटते, ते तर्कदृष्ट्या बरोबर आहे किंवा काय एवढेच मला हवे आहे. माझ्या विचारांना चालना देण्यास त्या पंक्ती कारणीभूत झाल्या एवढेच समजावे.
– हेमलेखा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.