पत्रव्यवहार

निरपराध्यांना आणि गुन्हेगारांना एकच न्याय?
संपादक, आजचा सुधारक
स.न.वि.वि.
श्री. दत्तप्रसाद दाभोलकर यांचे ‘मी नथुराम…. वर बंदी नको’ ह्या शीर्षकाचे पत्र वाचले. मी नथुराम…’वर बंदी नको असे माझेही मत आहे. परंतु हे मत नोंदवताना श्री. दाभोलकरांनी केलेला युक्तिवाद मात्र मला पटत नाही. गांधीजींचा खुन ही एक ऐतिहासिक घटना होती आणि नथुराम ही एक ऐतिहासिक व्यक्ती होती असे म्हणून दाभोलकरांनी गांधी आणि गोडसे या दोघांनाही एकाच मापाने मोजण्याचा प्रयत्न केला आहे.
गोडसेचे आधीचे चरित्र निश्चितच वाईट नव्हते. पण तेवढ्याने त्याने केलेल्या गांधींच्या खुनाला मूल्याधिष्ठित म्हणता येत नाही. तसे पाहिले तर नैतिक समर्थन करणारे तत्त्वज्ञान प्रत्येक दुराचा-याजवळही असते. डाकूसुद्धा मालकी हक्क मुळातून कोठून आले असा प्रश्न करून स्वतःच्या कृत्याचे समर्थन करू शकतो. पण आपण ते मान्य करू शकू काय ? अखेरला एक मूल्यव्यवस्था आज आपण स्वीकारलेली आहे. प्रत्येक कृत्याला अथवा विचाराला एक नव्हे तर अनेक बाजू असू शकतात हे मान्य. या विविध बाजूंना समजावून घेणे आवश्यक असते हेही खरे आहे. पण असे करताना आपण निरपराध्यांना आणि गुन्हेगा-यांना एकाच मापाने तर मोजत नाही ना ह्याचे भान ठेवावयास हवे.
भारताने लोकशाही समाजव्यवस्था स्वीकारली आहे. लोकशाहीत मला जाणवणाच्या सत्यावर विश्वास ठेवण्याचा मला निश्चितच अधिकार आहे. पण कुठेतरी आपल्याला चूक वाटणारे विचारही कदाचित बरोबर असू शकतील ही जाणीवहीं असणे आवश्यक असते व त्यामुळेच आपल्या विरोधकांनाही त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार लोकशाहीत मान्य करावा
लागतो. एवढेच नव्हे तर असे न पटणारे विचार शांतपणे ऐकून घेण्याची सहनशीलताही बाळगावी लागते. आणि ‘We agree to disagree’ असे मान्य करून सहकार्याची इतर क्षेत्रे शोधावी लागतात. त्यामुळे निदान लोकशाहीत तरी खुनाला स्थान असू शकत नाही. असे खून जर आपण समजावून घेऊ लागतो तर कुणालाही ‘माझे सत्य तेच अंतिम सत्य, ते तू मान्य केलेच पाहिजेस नाही तर तुझा काटा काढण्याचा मला अधिकार आहे’ असे म्हणणा-यालाही समजावून घ्यावे लागेल. To understand is to forgive या दृष्टीने हे कदाचित उचित असेलही पण नैतिक दृष्टीने हे उचित आहे असे मानणे चूक होईल हे निश्चित. अंतिमतः हा मार्ग हुकूमशाहीचा आहे याचेही भान आपल्याला ठेवावे लागेल. गांधीजींच्याच शब्दांत सांगायचे तर जेव्हा आपण सुंदर नवभारत घडवण्याचे स्वप्न पाहतो तेव्हा आपल्या विचारांहून वेगळे विचार असणा-यांविरुद्ध आपण औद्धत्य आणि घृणा या शस्त्रांचा वापर करू शकत नाही. कारण त्यामुळे आपल्याच प्रगतीत अवरोध निर्माण होईल.
गांधी खून ते बाबरी मशीद ही एकच परंपरा आहे. न्यायालयात खोटे प्रमाणपत्र देणे, न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी आम्ही राममंदिर बांधणारच असे म्हणणारी परंपरा ही गोडसे-विचार-परंपरा म्हणजेच हुकूमशाही परंपरा आहे. तिचा आपण धिक्कार करणे आवश्यक आहे. असा धिक्कार श्री. दाभोलकरांच्या पत्रात जाणवत नाही याचे मला दुःख आहे.
माझी ही टीका गोडसे या व्यक्तीविरुद्ध नसून ती या हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध आहे. ही अहंवादी प्रवृत्ती गोडसेच्या आणि त्याच्या विचारसरणीच्या लोकांमध्ये असल्याचे जाणवते. पण तरीही गोडसे आदींना त्यांचे विचार न मांडू देणे हेही चूकच. आणि म्हणूनच, ‘मी नथुराम….वर बंदी नसावी. कारण बंदी आली की कट, खून ह्यांना समर्थन मिळते. एवढेच नाही तर समोरच्या व्यक्तीच्या विचारांत जर सत्य असले तर त्या सत्याची गळचेपी होते. आपल्या मर्यादित बुद्धीला अंतिम सत्याचे ज्ञान झालेलेच असेल असे नाही याचे भान आपल्याला ठेवावे लागते. ज्ञानमार्गात आत्मपरीक्षणाला अधिक महत्त्व आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारची बंदी म्हणजे एक प्रकारचा मानसिक रखूनच. तो शारीरिक खुनापेक्षाही भयावह.
गांधीजींचा खुन एकटा गोडसेच करतो असे नाही. मी नथुराम…’ चा प्रयोग बंद पाडणारांनी वेगळे काय केले? “कुणाला मारावे असे एकही कारण माझ्याजवळ नाही पण ज्यासाठी प्राण अर्पण करावे अशी शेकड़ो कारणे माझ्या समोर आहेत,’ असे म्हणणारे गांधी अजून आम्हाला समजलेलेच नाहीत.
ब्रिजमोहन हेडा
३३, ब, समर्थ कॉलनी, अमरावती – ४४४ ६०६

स्त्रीने नोकरी करावी की नाही हे तिचे तिला ठरवू द्या
पाळणाघरची वाढ : एक अपप्रवृत्ती (२) (डिसेंबर ९८) ह्या लेखात दोन मुख्य मुद्दे आहेत.
(१)पैशाची निकड जाणवल्याने स्त्रिया नोक-या करतात.
(२)आईपासून ताटातूट झाल्यामुळे अर्भकाच्या मनात असुरक्षिततेची बीजे रोवली जातात.
(१)पहिल्या मुद्दयाबद्दल वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
आपल्या समाजातल्या अगदी आर्थिक सुस्थिती असलेल्या कुटुंबातल्या स्त्रियांच्या मनांतही स्वत:च्या समाजातल्या स्थानाबद्दल, (पर्यायाने आर्थिक स्थानाबद्दल) असुरक्षितता असते. मुलाचा जन्म झाल्यावर ती वाढतेच, कमी होत नाही. म्हणून ह्या स्त्रियाही आपल्या कुकुल्या बाळाला दुस-याच्या हातांत सोपवून नोकरी करतात.
स्त्रियांच्या मनांतल्या असुरक्षिततेचे कारण आपल्या समाजाची धारणा.
अगदी श्रीमंत आईवडिलांच्या मुलीही आईवडिलांचे पैसे आपले नाहीत, ते भावाला मिळणार हे लहानपणी शिकतात. घरात पैशाने येणारी सत्ता वडिलांच्या हातात आहे, आईच्या नाही हेसुद्धा मुली बघतात. “आपण कितीही लाडक्या असलो तरी ह्या घरात पाहुण्या आहोत” ही भावना माहेराबद्दल मुलींच्या मनांत रुजलेली असते.
मुलीचे लग्न झाले व हुंडा दिला तरी तो आईवडिलांकडून सासरच्या माणसांच्या हातांत जातो. बाई नोकरी करीत असेल तर तिचा पैसाही पुष्कळदा नवग्याच्या हातात जातो.
परिणामी तिची असुरक्षितता वाढते.
नव-याने आपल्याला व मुलाला सोडले, तो मृत्यु पावला तर आपले कसे होणार ही भीती स्त्रियांना सतत भेडसावते. नवरा गेल्यावर त्याचे पैसेही आपल्या हातात येतील ह्याची त्यांना खात्री नसते. नोकरी हा एकच सुरक्षिततेचा धागा स्त्रीच्या हातात असतो. म्हणून ती शक्य तेवढी रजा घेऊन मुलाला सांभाळते व परत कामावर जाऊ लागते.
अमेरिकेत, स्वीडनमध्ये लहान मुलांच्या आईला त्या निराधार झाल्यास सरकार वेल्फेअर म्हणून थोडेसे का होईना पैसे देते. म्हणून ह्या स्त्रियांच्या मनांत थोडीतरी सुरक्षिततेची भावना असते.
भारतात कितीही सुबत्ता आली तरी स्त्रियांची स्वतःच्या व स्वतःच्या मुलांच्या भविष्याबद्दलची काळजी जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत त्या नोकरी करीत राहणार.
स्त्रिया नोकरी करीत राहतात ह्याचे दुसरेही एक कारण आहे. करिअर असलेल्या स्त्रीच्या (किंवा पुरुषाच्या) नोकरीत खंड पडला तर ती आपल्या क्षेत्रात मागे पडते. पुष्कळदा त्या क्षेत्रात परत प्रवेश मिळणेही तिला कठीण होते. उदा. डॉक्टर, वकील आणि उच्च दर्जाची अन्य नोकरी असलेल्या स्त्रिया.
(२) दुसरा मुद्दा असा की पाळणाघरे ही अपप्रवृत्ती आहे का?
सुरुवातीचे सहा महिने मुले विभक्त कुटुंबात एकट्या आईबसेबर राहिली तर फारसे काही बिघडत नाही. पण सहासात महिन्यांनंतर मुले फक्त आईबरोबर राहिली तर एकटी पडतात.
पाळणाघरातील मुलांना इतर मुलांचा व स्त्रीपुरुषांचा सहवास लाभतो. ती धीट व मोकळ्या स्वभावाची होतात. त्यांचे अनुभवविश्व विस्तारते. अशा धर्तीची अभ्यासपूर्वक लिहिलेली पुस्तके आता प्रसिद्ध होत आहेत. अर्थात् ती पाळणाघरे उच्च दर्जाची असली पाहिजेत.
बंद घरात राहणारी मुले एकलकोंडी होतात आणि आजूबाजूला माणसे, मित्रमैत्रिणी असलेली मुले आनंदी राहतात’ असा उल्लेख लीला पटेल (डिसें. ९६) ह्यांच्या पत्रातही आहे.
२०-२५ वर्षानंतरच्या स्त्रीच्या सुखसोयींमध्ये कोणती भर पाडावी ?” असा प्रश्न स्फुट लेखात आहे. त्याला मी पुढील उत्तर देईन.
(१)स्त्रीची स्वतःबद्दलची असुरक्षिततेची भावना नष्ट करण्याचे प्रयत्न व्हावेत.
(२)पाळणाघरे उच्च दर्जाची करण्याचा प्रयत्न करावा.
(३)“स्त्रीने नोकरी करून मुलांना पाळणाघरात ठेवावे की नोकरी सोडून मुलांना सांभाळावे हा निर्णय पूर्णपणे तिचा स्वतःचा असावा. तिची परिस्थिती तीच पूर्णपणे जाणू शकते.
स्फुट लेखात (२) लिहिले आहे त्याप्रमाणे आपल्या समाजात संपत्तिवाटप झाले तर काही स्त्रिया कदाचित मुलांसाठी घरीही राहतील. पण सर्व राहणार नाहीत कारण लेखक पुरुषाला मिळणाच्या मोबदल्याबद्दल चर्चा करीत आहेत. तो मोबदला आपोआप स्त्री मुलांपर्यंत पोचेल असे गृहीत धरीत आहेत. काही कुटुंबात तसे घडेलही. पण अशीही कुटुंबे असतील की नवरा तो पैसा चैनीत उधळेल.
मुले असणा-या स्त्रीला स्वतःचा असा हक्काचा पैसा हवा.
मुले पाळणाघरात ठेवायची नसतील तर आईवडील ह्या दोघांनाही पार्ट टाईम नोकरी करून पहिली अडीच तीन वर्षे घरी राहता येण्याचा हक्क हवा. म्हणजे एकटी स्त्रीच आपल्या व्यवसायात मागे पडणार नाही.
समाजाच्या मानसिक सुरक्षिततेचा मुद्दा “पुन्हा एकदा बेरोजगारी” (डिसें. ९८) ह्या लेखात आलेला आहे. नोकरी सोडून देण्यास स्त्रीलाही अशाच सुरक्षिततेची जरूरी आहे.
लहान मुलाला एकत्र कुटुंबात आया संभाळत होत्या’ अशी समजूत प्रचलित आहे. माझ्या मते ती पूर्णपणे चुकीची आहे. एकत्र कुटुंबात आई मुलाची शारीरिक काळजी घेत असे. पण मुलाला मोठ्या बहिणी, आजी, आजोबा, भाऊ असे सगळे मिळून संभाळत असत.
पाळणाघराची वाढ (२) या लेखात काही विधाने आहेत. “मुलाला आईची अत्यंत गरज सुरुवातीच्या काळात असते. आपल्या बाळाला तिन्हाइताच्या हातांत सोपवून दिवसातील अकरा-बारा तास दूर राहण्यात त्यांना भूषण वाटावे असे आम्हाला वाटत नाही.”
ही विधाने बरोबर आहेत की चूक ह्याबद्दल मला वाद घालायचाच नाही. कारण सर्वच स्त्रियांना (पुरुषांप्रमाणेच) एकच नियम लागू पडत नाही. काही स्त्रिया लहान मुलांना सोडून नोकरी करणे पसंतही करतील. तो त्यांचा निर्णय आहे.
लहान मुलांना प्रेमाने सांभाळले तर मुले आईबरोबर राहतात तेवढ्याच आनंदाने दुसन्याबरोबर राहतील.
आपल्या समाजात पितृत्व हा पुरुषाच्या उन्नतीतला अडथळा नसतो. पुरुष नोकरीनिमित्त मुलांना सोडून राहिला तर त्याला कुणी दोष देत नाही. त्याप्रमाणेच मातृत्व ही स्त्रीच्या उन्नतीत आडकाठी होणे अयोग्य आहे.
आपल्या स्त्रीत्वाची किंमत स्त्रिया अनेक प्रकाराने मोजत असतात. स्त्रीला मुलासाठी घरी बसण्याची सक्ती झाली तर ती पण मी स्त्रीने समाजासाठी मोजलेली किंमत मानते. कारण मुलांची जरूरी सर्व समाजाला आहे. एकट्या स्त्रीला नाही.
म्हणून मी परत लिहिते. “मातृत्व ही स्त्रीच्या पायातली बेडी होणे अयोग्य आहे. नोकरी करायची का नाही हा निर्णय तिचा आहे. तिने मुलाला घरी ठेवून नोकरी करायचा निर्णय घेतला तर तो निर्णय निंद्य मानण्याचे कारण नाही. ती घरी राहिली तरीही हरकत नाही.’ दिवाकर मोहनी, आजचा सुधारकचे लेखक व एक संपादक, यांच्याच शब्दांत “स्वतःची स्वामिनी” असणा-या स्त्रीचे चित्र माझ्यापुढे आहे. तिच्या व तिच्या मुलांच्या आयुष्याची दिशा ती ठरवील.
अर्थात् मुलाच्या वडिलांना मुलाला कुणी सांभाळावे हे ठरवण्याचा हक्क आहे. मुलाला कुटुंबीयांनीच सांभाळावे असे वडिलांनी ठरवले व आईला नोकरी करायची असेल तर वडिलांनी स्वतः घरी राहून मुलाला सांभाळावे.
स्त्रीने नोकरी करावी की नाही हे ठरवण्याचा हक्क दुस-या कुणालाही नाही.
ललिता गंडभीर
65, Oxford Rd. Newton, MA 02459

इदं न मम’ च्या निमित्ताने
आजच्या सुधारकाच्या डिसेंबर महिन्याच्या अंकात, श्री. मधुसूदन मराठे ह्यांचे, उपर्युक्त शीर्षकाचे एक उच्च आणि समयोचित विचार व्यक्त करणारे स्फुट प्रसिद्ध झाले आहे. प्रत्येक व्यक्तीने, तिला वडिलोपार्जित संपत्तीचा जो लाभ होतो (ते तिचे अनार्जित धन असते) त्याचा, अंशतः तरी उपभोग, समाजाला प्रदान करावा असा माफक अपेक्षा व्यक्त करणारा विचार श्री. मराठ्यांनी मांडला असून, ते स्वतः असे प्रत्यक्ष करीत आहेत, असेही त्यांनी निवेदन केले आहे. “आधी केलें मग सांगितले’ ही श्री. मराठ्यांची वृत्ती निःसंशय स्पृहणीय तथा अनुकरणीय आहे.
श्री. मराठ्यांनी मांडलेला सुविचार भारतीय तत्त्वज्ञानात प्राचीन काळापासून पुरस्कारलेल्या व आधुनिक काळात महात्मा गांधींनी प्रवर्तिलेल्या अपरिग्रह व्रताचेच तसे मर्यादित वा संकुचित रूप आहे. अपरिग्रह ह्या संज्ञेचा शब्दशः अर्थ असा : परिग्रह करणे म्हणजे स्वीकार करणे. तो न करणे म्हणजे अपरिग्रह. स्वीकार कशाचा करायचा नाही ? ज्या वस्तूवर आपला नैतिकदृष्ट्या अधिकार पोचत नाही तिचा स्वीकार न करणे म्हणजे अपरिग्रह होय. ज्या वस्तूच्या प्राप्तीसाठी आपण झटलो नाही, ती न स्वीकारणे वा तिच्यावर आपला हक्क न सांगणे म्हणजे अपरिग्रह ठरेल. आपल्या किमान गरजा पूर्ण झाल्यानंतर जे द्रव्य उरेल त्यावर आपला हक्क न सांगणे म्हणजेही अपरिग्रहच. असे असल्यामुळे स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवणे. त्या किमान करणे (minimization of needs) हाही अपरिग्रह मानला जातो.
अपरिग्रह ह्या संज्ञेचा (त्याला भारतीय तत्त्वज्ञानात व गांधीविचारधारेत व्रत म्हणतात) जो अर्थ विशद केला आहे तो लक्षात घेता कोणत्या कृती अपरिग्रह व्रतविरोधी आहेत ते सहजी ध्यानात यावे. हे स्पष्ट करण्यासाठी खाली काही उदाहरणे देत आहोत.
पैतृक धनाचा समाजोपयोगी कार्यासाठी त्याग करणे हा तर अपरिग्रह आहेच. पण त्याचबरोबर स्वकष्टार्जित धनाचा, आपल्या किमान गरजांसाठी आवश्यक तेवढा हिस्सा जवळ ठेवून उर्वरित भाग समाजाला “इदं न मम’ ह्या वृत्तीने स्वेच्छेने व निरहंकारी वृत्तीने अर्पण करणे हाही अपरिग्रहच आहे. एक पेन्शन पुरेशी मिळत असून सुद्धा. कधी काळी केलेल्या, वा घडलेल्या देशसेवेचे पारितोषिक म्हणूनच मिळालेली पेन्शनही दुहेरी लाभ ह्या स्वरूपात स्वीकारणे ही सुद्धा अपरिग्रहाची पायमल्ली आहे व ती गांधी-तत्त्वज्ञानावर शिरा ताणून उठसूठ व्याख्याने झोडणा-या व्यक्तीकडून जर कळत नकळत का होईना घडत असेल, तर ती अपरिग्रह व्रताची सपशेल ऐसीतैसी आहे. साठेबाज माणूस वा व्यापारी सदर व्रताचे भंजन करत असतो. कांदा न खाताही ज्यांचे चालू शकते. त्या व्यक्तींनी कांदा खाणे सोडून “कांदा भाकरी खाणान्यांसाठी तो उपलब्ध करून देणे हाही अपरिग्रहच ठरेल. वर्तमान परिस्थितीत बोकाळलेला चंगळवाद अपरिग्रहाची पायमल्ली आहे. वगैरे.
तात्पर्य “इदं न मम ही वृत्ती फार व्यापक प्रमाणात व अर्थाने अनुसरणे काळाची गरज
आहे.
बा. के. सावंगीकर
४७५, प्रोफेसर्स कॉलनी हनुमाननगर, नागपूर-०९
កាល
अभ्यासमंडळ नागपूरपुरतेच नको
स.न.वि.वि.
आजचा सुधारक च्या वाचकांना निवडक वैचारिक पुस्तकांचा परिचय करून देण्यासाठी आपण चालवत असलेल्या अभ्यासमंडळा’चा उपक्रम आवडला. याच उपक्रमाचा भाग म्हणून दि.य. देशपांडे व विद्यागौरी खरे यांनी लिहिलेल्या पुस्तक-परिचयाचे सुदीर्घ लेखही आवडले. आपण सुचविल्याप्रमाणे मीसुद्धा Everybodh Loves a Good Drought (ले. पी. साईनाथ) हे पुस्तक वाचून सुधारकसाठी नोट्स काढल्या होत्या. परंतु आपण या पुस्तकातील निवडक परिच्छेदांचे भाषांतर करून प्रसिद्ध केल्यामुळे ते लेखन राहून गेले.
अनेक इंग्रजी नियतकालिकांमधून अमेरिका, युरोपमध्ये प्रकाशित झालेल्या वैचारिक पुस्तकांचे परीक्षण/परिचय आपण नेहमी वाचत असतो. त्यांतील काही पुस्तके आपल्या विषयाशी संबंधित असतात. माझ्या अनुभवाप्रमाणे अशी पुस्तके आपल्या येथे उपलब्ध होत नाहीत किंवा अनेक वर्षांनंतर येथे येतात. पुस्तकांच्या किंमती भरपूर असल्यामुळे मनात असूनसुद्धा वैयक्तिकपणे परदेशातून मागवून घेणे अनेकदा परवडत नाही. अशा निवडक पुस्तकांची यादी मी सोबत जोडली आहे. Consilience (ले. Dr. E.O. Wilson) या पुस्तकाचे परीक्षण अजूनही अनेक नियतकालिकातून येत आहे. Sophie’s World ही कादंबरी तत्त्वज्ञानावर आधारित असून मूळ नार्वेजियन पुस्तकाचे ३६ भाषेत भाषांतर झाले आहे. ९० लाख प्रती खपल्या आहेत. Golem at Large हे पुस्तक अनेक कारणाने गाजत आहे. अशा प्रकारच्या पुस्तकांचा परिचय वाचकांना नक्कीच आवडेल.
आपल्या परिचयातील अनेकांचे नातेवाईक व मित्र परदेशात असल्यामुळे अशी पुस्तके आपल्या अभ्यासमंडळाला मिळण्यास अडचणी येणार नाहीत. आपण अशी पुस्तके मागवून अभ्यासमंडळातील सदस्यांकडून परिचय लिहून घ्यावे ही विनंती.
अभ्यासमंडळाची व्याप्ती केवळ नागपूरपुरती न ठेवता महाराष्ट्रातील इतर भागांत वाढवल्यास अनेक जण या उपक्रमात सहभागी होतील. वैचारिक लेखनाची आवड असलेल्या लेखकसदस्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे आपण एखाद्या पुस्तकाचे नाव सुचविल्यास (व ते पुस्तक उपलब्ध केल्यास) त्या दृष्टीने अभ्यास करून सुधारकसाठी पुस्तकपरिचय ते लिहितील. हा एक प्रयोग करून पाहावा ही विनंती.
प्रभाकर नानावटी
ई ६ ४. आर्मामेंट कॉलनी गणेशखिंड,
औंध रोड, पुणे – ४११ ००७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.