पत्रव्यवहार

घटस्फोटितांच्या कुंडल्यांमध्ये साम्य नाही
श्री. संपादक, आजचा सुधारक
आजचा सुधारक (जानेवारी १९९९) पान ३१६. माधव रिसबुडांचे पत्र : ‘फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार नाहीच.
वरील पत्र वाचून मला माझा ह्या क्षेत्रातील अनुभव येथे नोंदवावासा वाटला. १९९० च्या सुमारास कै. वि.म. दांडेकर ह्यांच्या सांगण्यावरून घटस्फोट घेतलेल्या ३०० युगुलांची जन्मतारीख आणि जन्मवेळ (मी व वि.म. दांडेकरांनी) जमा केली. संगणकाच्या साहाय्याने त्यांच्या ३०० पत्रिका करणे सोपे गेले. जवळजवळ आठ सेकंदाला एक ह्या वेगाने जन्मतारीख व जन्मवेळ ह्यांच्या सहाय्याने ज्यांना कुंडल्या म्हणतात त्या तयार करून आम्ही एका समंजस वाटणाच्या ज्योतिष्यापुढे टाकल्या. त्या ज्योतिष्याला ‘सातवे घर’ म्हणजे अत्यंत आत्मविश्वासाने त्याबद्दल भविष्य सांगता येते असे वाटे. वि.म. दांडेकरांना आणि मला ह्या ज्योतिष्याबद्दल आदर व विश्वास वाटे. पत्रिका केल्यानंतर ज्योतिष्याचे घटस्फोटितांबद्दलचे नियम आम्ही नोंदवून घेतले. एक, दोन, तीन – जेवढे नियम सांगता येतील तेवढे सांगून आम्ही ते पडताळून पाहणार होतो. आमची इच्छा एवढीच होती की ह्या नियमांची संख्या मर्यादित असावी. तीनशे कुंडल्यांना तीनशे नियम नसावे. आम्ही पाहत होतो की ह्या कुंडल्यांत किती प्रमाणात ज्योतिष्यांनी सांगितलेले नियम लागू पडतात ? कितीमध्ये ते लागू पडत नाहीत ? का लागू पडत नाहीत? वगैरे.
दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुतांशी नियम बहुतांशी कुंडल्यात लागू पडत ना. ज्याला संख्याशास्त्रात ‘अॅसोसिएशन’ किंवा ‘कोरिलेशन’ संबोधितात तसे काहीच ह्या कुंडल्यांत आम्हाला सापडले नाही. ज्योतिष्यानेही ते मान्य केले. ज्योतिषाच्या मते एवढ्या कुंडल्या एकावेळी त्यांनी कधीच पाहिलेल्या नव्हत्या. केवळ संगणकामुळे ते शक्य झाले होते. पण नियमांचे लक्षणीय सातत्य कोठेच आढळेना.
दुसरा काही विषय घेऊन हेच फिरून पडताळून पाहण्याची इच्छा होती. परंतु विषय निवडल्यावर त्याची व्याख्या करणेही कठीण वाटू लागले. उदाहरणार्थ, घटस्फोटिताची
व्याख्या : कोणाला घटस्फोटित म्हणायचे? जे युगुल एका पाख्याखाली राहते पण ज्यांच्यात कोठल्याच त-हेचा कसलाही संबंध नाही त्याचे काय ? कामानिमित्ते दूर राहण्याने ज्या’ नवराबायकोंचा संबंध दोन-दोन तीन-तीन वर्षांनीही येत नाही त्यांचे काय? अशा त-हेने विषय निवडून त्याची व्याख्या करणेही कठीण वाटून ह्या विषयाचा नाद आम्हास सोडावा लागला.
ज्योतिष्याने सांगितलेले नियम बाजूला ठेवून, केवळ इतर त-हेचे काही संबंध (अॅसोसिएशन्स किंवा कोरिलेशन्स्) सुद्धा आम्हाला आढळले नाहीत.
‘अर्थबोध’ सेनापती बापट मार्ग, कुमुदिनी दांडेकर
पुणे – ४११०५३

कुटुंबव्यवस्थापनाची चर्चा व्हावी
श्री. संपादक, आजचा सुधारक,
तुम्ही शिशुसंगोपन व पाळणाघरे ह्याबाबत आजचा सुधारक मध्ये पत्र-चर्चा करवीत आहात हे प्रोत्साहन वाटले. योग्य-अयोग्य कारणापरत्वे किंवा आवड/चैन म्हणूनही शिक्षित गृहिणी नोक-या करीत करीत संसार सांभाळत आहेत. त्यातून त्यांचा आत्मविश्वास उभा होत आहे. उदारमतवादी, सच्च्या सुधारक विचारांचे पुरुष आपल्या (अल्पशिक्षित असलेल्याही) पत्नीला वैचारिक, बौद्धिक स्वाश्रयित्व येण्यासाठी मदत व प्रोत्साहित करीत आहेत. त्यामुळे स्वयंनिर्णयाची सवय लागून त्यांचे परधार्जिणेपण (किंवा पतिधार्जिणेपण) कमी होत आहे हे उत्साहजनक व समाजोपकारक परिवर्तन घडून येत आहे. वाढत्या शिक्षणामुळे ओघाने स्त्रियांचा अभ्यासूपणा व चिकित्सक विचारशक्ती वाढून त्यांची आत्मनिर्भरता पक्की होत आहे. समाजात त्या आता सार्वजनिक जबाबदारीची तसेच राजकीय नेतृत्वाची पदेही तोलामोलाने सार्थ करीत आहेत. ही प्रगती शिक्षित स्त्रीवर्गाचे स्वास्थ्य व समाधान द्विगुणित करणारी आहे. ..
या विचारगतीचा वेग पाहाता फक्त ‘पाळणाघरे’ एवढा मर्यादित विचार करण्यापेक्षा (चाकरमानींसाठी आज ती व्यवस्था आवश्यक आहे हे नोंदवूनच) कुटुंबव्यवस्थापन : एक सामाजिक गरज’ असा समग्र विषय चर्चेला घ्यावा. समाजधुरीणांनी या विषयाचे मर्म अद्याप जोखलेले नाही. समाजात कुटुंबव्यवस्थापनात रमणारा, स्वतःला शून्यवत् करून घेतलेला गृहिणीवर्ग संख्येने मोठा आहे. त्या गृहिणी ‘शेळी जाते जिवानिशी अन् खाणारा म्हणतो वातड’ अशा पेचात सापडल्या आहेत. त्या फक्त कष्टाच्या हकदार; अधिकार म्हणाल तर शून्य, शिक्षण शिकून शहाणीसुरती होऊन नंतर संसाराचे जोखड मिळावे तर शिकण्याला सुद्धा त्या मोताद! गृहिणींमुळे तर समाजस्वास्थ्य टिकत असते. ह्याच कुटुंबांमुळे परावलंबी आबालवृद्धांचे संगोपन होऊन ‘माणूस’ संस्कारमुशीत घडत असतो. म्हणून ह्या आहे. व्यवस्थापनाचा वैचारिक व शास्त्रीय पाया अभ्यासायला हवा. त्यात बालसंगोपन ही अग्रक्रमाची व मातांच्या प्रेमाला आनंदाचे उधाण देणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक आई वा गृहिणी ही पाकसिद्धीप्रमाणे व्यक्तिमत्त्व-निर्मितीची विद्यार्थिनी व निर्माती असतानाच आयुरारोग्याची किमान जाणकार असावी लागते. या अभ्यासाबरोबर तिला पन्नास टक्के कौटुंबिक संपत्तीची हक्कदार करणारे समानतेचे कायदेकानू व्यवस्थित केले तर गृहिणीपदातील ‘समाजनिर्माण शक्ति’ सार्थ होईल.
एक-एक कुटुंब ही शिशुसंगोपनाची शाळा असून मानवी मनःसंवर्धनाचे ‘विद्यापीठ आहे. शिवाय आजारपणातले प्रेमळ, आश्वासक आश्रयस्थान आहे. ते मातेच्या कोमल, हळुवार प्रेमातूनच साकार होणे समाजाच्या व मानवाच्या खच्या हिताचे आहे. एक-एक कुटुंब हा समाजपुरुषाचा अभंग, खासा कोष आहे. आदर्श समाजाचे ते अमूल्य बीज आहे. त्याची यापूर्वी प्रतिष्ठा जोपासली गेली नाही त्यामुळे तर मानवी मनाचे अनेक अनर्थ आपल्यापुढे प्रश्न उभे करीत आहेत. कुटुंबव्यवस्थापनाचे पेशात्मक आर्थिक मूल्य नजरेआड झाल्याने शिक्षित स्त्रिया आर्थिक हक्क मिळवायला घर सोडून बाहेर आल्या. घरे उघडी पडली – अनाथ झाली!
ह्या अनर्थाला बांध घालायला कुटुंबव्यवस्थापनाचे मोल ओळखणे व देणे हा खरा, एकमेव उपाय आहे.
वीणा सुराणा
८/२ शेती केंद्र
मु. जगताप वस्ती, पो. आसू ४१३५०२
ता. परंडा, जि. उस्मानाबाद

जाति-धर्म-निरपेक्ष-विवाह-निर्धार-दिन
संपादक, आजचा सुधारक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी १ जानेवारी हा दिवस आंतरजातीय विवाह निर्धार दिन’ म्हणून साजरा करते. आंतरजातीय विवाह प्रोत्साहन मेळावा,
आंतरजातीय विवाह केलेल्यांचा सत्कार वगैरे कार्यक्रमांबद्दलच्या बातम्याही आपण मधूनमधून वाचतो. हे चांगले उपक्रम वेगळ्या रीतीने साजरे करावेत असे वाटते. त्याबद्दल व जातिनिर्मूलन आणि धर्मनिरपेक्ष जीवन ह्याबद्दल मनामध्ये आलेले विचार लिहीत आहे. त्यांवर चर्चा व्हावी अशी इच्छा.
आंतरजातीय विवाह हे जाती-जातीमधील वैमनस्य, गैरसमज दूर करून समताधिष्ठित, मानवतावादी समाजनिर्मितीसाठी निश्चितच परिणामकारक असतात. म्हणून त्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असतात.
पण आंतरजातीय विवाहाचा निर्धार करावयाचा, तो प्रत्यक्षात आणावयाचा म्हणजे आपली जात सोडून दुसन्या जातीमधील जोडीदार शोधायला हवा. याचा अर्थ मी ‘अमक्या जातीचा हे न विसरणे, मनातून न जाणे असे होत नाही का ? आणि अशांचा सत्कार करणे म्हणजे पुन्हा त्यांच्या वेगवेगळ्या जातीची आठवण करून देणे होत नाही का ? मनातून आणि आचरणातून जात (आणि धर्मही) जाण्याची, ह्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याची खरी गरज आहे. अशा मानसिकतेचा सत्कार करण्याची गरज आहे.
जातीयवादी दृष्टिकोन बदलण्यासाठी कागदपत्रातून आपल्या नावाला चिकटलेली जात जाणे प्रथम आवश्यक आहे. आणि हे करणे तसे सोपे असते. कोणताही अर्ज, माहितीपत्रक भरताना जात हा रकाना कोरा ठेवावयाचा वा छोटी रेघ काढावयाची. मात्र मनातून जात जाण्यासाटी कठोर व जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.
ह्याहीपुढे आपल्याला चिकटलेला धर्मही जायला हवा. आपण धर्मामुळे चिकटणारी कर्मकांडे निर्धाराने टाळू शकतो. आयुष्यभर “निधर्मी” जगू शकतो पण “निधर्मी’ मरू शकतो
का? उत्तर – होय. सर्व कागदपत्रांत धर्म रकाना कोरा ठेवता येईल. शिवाय मरणापूर्वी मृत्युपत्र केले (किंवा वारसांना संपत्ती ठेवली नाही) म्हणजे झाले. मात्र मृत्युपत्र केले नाही तर आपल्या राहिलेल्या संपत्तीचे वाटप करण्यासाठी आपल्या वारसांना आपण आयुष्यभर आचरलेल्या निधर्मी तत्त्वांना बाजूला सारून नाइलाजाने आपल्याला धर्म चिकटवावा लागेल. कारण वारसा कायदा प्रत्येक धर्माप्रमाणे वेगळा आहे. माझ्या अल्पशा माहितीप्रमाणे निधर्मी’ राष्ट्रात “निधर्मी’ वारसा कायदा अस्तित्वात नाही!
शिवाय वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीचे वाटपही आपल्याला मृत्युपत्राने करता येत . नाही. अशा संपत्तीचे वाटपही प्रत्येक धर्माच्या कायद्यात वेगवेगळे असल्याने अशी संपत्ती असलेल्यांनाही धर्म कागदपत्रातून काढता येणार नाही. दत्तक घेण्यासाठीही धर्म लागतो. तरीही अशा थोड्या लोकांना वगळून उर्वरित समाजाला जाति-धर्म-निरपेक्ष जीवन आचरता येईल.
मला जन्मापासून चिकटलेली जात, ६४ साली, वयाच्या १९ व्या वर्षी मी निर्धारपूर्वक दूर केली. ७० व ७६ साली मुलांच्या जन्मदाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे हे आम्ही पाहिले. त्यामुळे जात त्यांना चिकटली नाही. जात नसल्याने शाळेत प्रवेशाला कोणतीही अडचण आली नाही. ८० सालापासून रोजच्या जीवनात धर्माला स्थान नाही. मनातून धर्म गेला आहे पण कागदपत्रांतून जात नाही. वारसा कायदा, घटस्फोट कायदा, दत्तक कायदा वगैरे कायदे जर धर्मावर आधारित असतील तर कागदपत्रांतून आपण धर्म काढू शकतो का ? कोणा कायदेतज्ज्ञाने यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे.
१ जानेवारीला “आंतरजातीय’ पेक्षा “जाति-धर्म-निरपेक्ष’ विवाह निर्धार दिन साजरा करून ह्या दिवशी जातिनिर्मूलनाचा, मानवधर्माचा (निधर्मी शब्दाचा राजकारण्यांनी पार चुथडा केला आहे.) प्रचार करून लोकांच्या मनातून जात, धर्म ह्या संकल्पना काढल्या पाहिजेत. जे जात-धर्म-निरपेक्ष जीवन जगतात, जगू इच्छितात अशा लोकांचा मेळावा भरवला पाहिजे, अशा विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
ह्या दिवशी पारंपरिक जाति-धर्मावर आधारित विवाह पद्धतींवर चर्चा, व्याख्याने ठेवता येतील, नव्या विवाह-पद्धती सुचवता येतील. ‘सत्यशोधकी’ हा पर्यायही मला योग्य वाटत नाही. अक्षता (फुलांच्या), मंगलाष्टके म्हणावयाची व भटजींना फाटा द्यावयाचा म्हणजे हा पर्याय परत एका विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी होतो. “नोंदणी विवाह” पद्धती एवढी एकच गोष्ट
ख-या अर्थाने जाति-धर्म-निरपेक्ष आहे असे मला वाटते. तिचा प्रचार व पुरस्कार करणे आवश्यक आहे. ह्या विषयावरील आपली मते जरूर कळवावी.
चिंतामणी गद्रे,(कुवेत)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.