पत्रव्यवहार

जातिधर्म निरपेक्ष समुदाय निर्माण व्हावा
संपादक, आजचा सुधारक यांस,
मार्च ९९ च्या अंकातील चिंतामणी गद्रे लिखित जाति-धर्म-निरपेक्ष-विवाह-निर्धारदिन’ त्यातील विचार वाचले. त्यांच्या काही मुद्दयांशी मी सहमत आहे. मी १९७७ साली ग्रॅज्युएट झाले. माझ्या School Leaving Certificate मध्ये जातीचा कॉलम कोरा आहे. त्या जागी छोटी रेघ आहे. (अर्थात् आडनाव हा फॅक्टर जात ओळखण्यास आपल्याकडे फार मोठा आहे.)
हुंडा न देता साधेपणाने लग्न करीन एवढीच प्रथम इच्छा होती. नंतर नोकरी लागल्यावर जातपात कधीच न मानल्याने आंतरजातीय (अर्थात हाच वाक्प्रचार प्रचलित असल्याने) लग्न करीन. त्याची जात विचारण्याचा प्रश्नच झाला नाही. धर्म मानीत नसल्याने अगदी साध्या पद्धतीने पूर्ण वेळ कार्यकर्त्याशी नोंदणी विवाह केला. (arranged marriage). पुढे मुलाला शाळेत घालताना जात कुणबी टाका म्हणजे पुढे सवलती मिळतील असा सल्ला मिळाला. परंतु एकच मुलगा-जातीचा विचार नाही-सोयी सवलती नकोत म्हणून जात टाकली नाही. पण शाळेने ‘हिंदु असा शब्द टाकला.
सततच्या धावपळीच्या व साध्या नोकरीमुळे मुलाला योग्य तितका वेळ देऊ शकले नाही, फारसे संस्कार करू शकले नाही ही खंत मनाला टोचते. पती पूर्ण वेळ कार्यकर्ता, आयुष्यभर नोकरी करणार नाही या अटीवर लग्न केलेले त्यामुळे सतत बाहेर असो.
गद्रे म्हणतात तसे मेळावे झाले पाहिजेत, त्यांत अडीअडचणींची चर्चा व्हायला हवी. मुख्य म्हणजे दोघे एकमेकांना किती समजून घेतात यावरच वैवाहिक जीवनाचे सर्व यशापयश अवलंबून असते. नाहीतर आयुष्यभराची फरफट होते. ती चर्चा मला वाटते सर्वांत महत्त्वाची असावी.
लग्नाला ‘सत्यशोधकी पर्याय मलाही योग्य वाटत नाही. तो कालसापेक्ष असा पर्याय होता. त्यावेळी ब्राह्मणी वर्चस्व फार झाले असल्याने फुल्यांनी हा पर्याय शोधला. पण आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ‘नोंदणी विवाहच योग्य वाटतो.
(असो बरेच काही लिहावयाचे आहे, पण वेळ-निवांतपणा महत्त्वाचा, मी आपल्या आजच्या सुधारकची नियमित वाचक आहे, वेगळे खाद्य त्यातून मिळत असते.)
– निर्मला कुलकर्णी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.