पत्रव्यवहार

मनुष्याचा आत्मा अन् विज्ञान
संपादक, आजचा सुधारक यांस,
प्रस्तावना : मनुष्याचा आत्मा व विज्ञान. यांमधील परस्पर संबंधावर इंग्लंडमधील फिजिक्स वर्ल्ड (मे १९९२) या नियतकलिकात काही वेधक विचार वाचावयास मिळाले. त्यांचा स्वैर व संक्षिप्त अनुवाद येथे दिला आहे. मनुष्य जी बुद्धिमत्तेची कामे करू शकतो, त्यांचा कर्ता असतो त्याचा आत्मा. ही संकल्पना होती देकार्त यांची! याच अर्थाने (फंक्शनल) येथे आत्मा ही संज्ञा वापरली आहे. इंग्लंडमध्ये वैज्ञानिक विचाराची एक दीर्घ परंपरा आढळते. आधुनिक विज्ञानाचा आद्यप्रणेता न्यूटन याचा जन्म इंग्लंडमध्येच झाला होता. त्यानंतरच्या सुमारे दोनशे वर्षांच्या कालखंडात ज्या युरोपिअन देशांनी विज्ञानाचा विकास करण्यास साहाय्य केले त्यांमध्ये इंग्लंडचा सहभाग महत्त्वाचा होता. या कालखंडात नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांच्या यादीवर नजर टाकली तरी याबद्दल कोणाचीही खात्री पटावी. याच कालखंडात विज्ञान विकासाला भारतीयांनी केलेली मदत उल्लेखनीय नव्हती, हे आपणांस मान्य करावे लागते. कोणत्याही अत्याधुनिक तंत्रविद्येसाठ वा यंत्रसामुग्रीसाठी भारताला कोणातरी पाश्चात्त्य देशाकडे धाव द्यावी लागते. ही असते भारताची परिस्थिती : या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता, येथील भारतीय तत्त्वज्ञ विद्वान विज्ञानविषयक संकल्पना बद्दल जे विचार प्रदर्शित करताना दिसतात, त्यामुळे कोणाही वैज्ञानिकाला विस्मय वाटावा असेच दिसतात. कारण त्याद्वारे वैज्ञानिकाचे आकलन व त्यांचे आकलन यामध्ये केवढा मोठा फरक आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. तत्त्वज्ञान्यांच्या तर्कवादात आधारभूत दिसतात काही शाश्वत भव्य तत्त्वे (सेक्रेड ३ कौज). ही तत्त्वे मिळालेली असतात कोणातरी प्रज्ञावंताला त्याच्या चिंतन व मननक्रियेतून. या उलट विज्ञानात अग्रक्रम दिला असतो अनुभवजन्य माहितीला. अनुभवाचा अर्थ लावण्यासाठी विज्ञानात पण तत्त्वे लागतात. तेथे तर्कवाद लागतो पण या दोघांना महत्त्व असते दुय्यम दर्जाचे ही गोष्ट नमूद करणे आवश्यक दिसते.
हवाई बेटावर आत पहावयास मिळतात एका अतिशय पुरातन देवालयाचे अवशेप , ज्यांवर रेखाकृती काढल्या आहेत अशा शिलांचा त्यांमध्ये एक ढीग आढळतो. त्या पाहताच आपल्या लक्षात येते की या आकृत्या आहेत भूलोक व स्वर्गलोक इथल्या देवदेवतांच्या. पर्जन्य, प्रजनन, जीवन आणि मृत्यु यांविषयी मानवी मनात ज्या कल्पना, ज्या आकांक्षा साकार होत असतात त्यांचीच प्रतिविंवे या देवाकृतीत दिसत असणार! अगदी पुरातन कालापासून मानवी मनात तीन विचार साकार होत असले पाहिजेत. त्याच्या अवती भवती पसरलेल्या विविधतापूर्ण विश्वाविषयी त्याच्या मनात असतो एक अपूर्व असा विस्मय. हे सर्व चक्र कसे सुरू झाले असावे याबद्दल त्याच्या मनात असते एक सततची जिज्ञासा. अन् शेवटी त्याच्या सामाजिक सामूहिक जीवनाचे (कमीत कमी हस्तक्षेप करणारे, पण त्याचे प्रभावीपणे नियमन करण्यासाठीचे) नीतिनियम पण त्याला हवे असतात. या असतात त्याच्या आत्म्याच्या आध्यात्मिक गरजा. त्यांचे समाधान निव्वळ बुद्धिवादाने होऊ शकत नाही. हॉकिंग ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ईश्वराच्या मनात काय आहे हे पण आपणास समजून द्यायचे असते.
याचाच शोध घेत आहेत आज सर्न येथील आंतर राष्ट्रीय प्रयोगशाळेतील विलक्षण बुद्धिमत्तेचे पण काही प्रमाणात गूढवादी असे भौतिकीय वैज्ञानिक. त्यावरून असे दिसत नाही का, की जे मानवी आत्म्याला हवे असते अन् जे विज्ञानाला हवे असते यांमध्ये काही फरक नाही.
ब्रौनौस्की व क्रुक्स याच्या वर्णनात हाच विचार असा मांडलेला आढळतोः आधुनिक विज्ञानाप्रमाणे मनुष्याच्या आत्माला साथ असते त्याच्या जणिवेची, वाह्य जगाविषयी त्याला जी माहिती इंद्रियाद्वारे मिळत असते, त्याची जाणीव करून घेऊन, त्यावर संस्करण (प्रोसोसिंग) करून त्याचा आत्मा त्याचा अर्थ लावू शकतो; एवढेच नव्हे तर तो अनुभवापासून शिकू शकतो. जाणिवेच्या आकलनाच्या मर्यादा विस्तारू शकतो. आपल्या जवळ असलेल्या अंतःप्रज्ञेचा कल्पनाशक्तीचा उपयोग करून तो नवीन गोष्टीचा शोध लावू शकतो, प्रत्येक नवीन शोध इज अॅन अॅक्ट ऑफ इमाजिनेशन (भापिक चर्चा करून, काही नवीन शोध लागत नाहीत.) यामुळेच तो विज्ञानक्षेत्रात कलाक्षेत्रात निर्माणक कार्य करू शकतो. चिकित्सक बुद्धिवादात नवनिर्मिती करण्याची क्षमताच नसावी असे वाटते. साहित्यक्षेत्रात सुद्धा चांगले समीक्षक हे कृचितच निर्माणक कृती करताना आढळतात नाही का? गेल्या काही दशकात महाराष्ट्रात वुद्धिवादाचा प्रभाव सतत वाढत चालल्याचा अनुभव मिळतो. वंगालमध्ये असे काही झाल्याचे आढळत नाही. पण वंगालमध्ये धर्मविचार, साहित्य, काव्य, संगीत, चित्रकला, विज्ञान, सांस्कृतिक क्षेत्रात जे नेत्रदीपक प्रबोधन झाल्याचे दिसते तसे ते महाराष्ट्रात झाल्याचे दिसत नाही. या मागे कोणती कारणे असावी याचा शोध विचारवंतानी * घ्यावा असे मला वाटते.
डॉ. वसंत चिपळोणकर
फ्लॅट १०६, अभिनव अपार्टमेंट
९९६ नवी पेठ पुणे ४११ ०३०
संदर्भ:
1. Physics World May 1992
2. Ascent of man Bronowski 1973
3. Evolution of Human Consciousness Crooks 1980
4. A Brief History of Time Hawking 1988
5. Encyclopaedia of Science Guiness 1994

उथळ बातम्या व स्फुटे
संपादक, आजचा सुधारक यांस,
अलिकडे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्यांबद्दल विचार मांडत आहे. पहिली बातमी कोयना जलाशयाला तळात भोक पाडून जल – विद्युत् – प्रकल्पाचा चौथा टप्पा सुरू करण्याबाबत होती. भारतीय अभियांत्रिकीची उच्च झेप म्हणून ही घटना नक्कीच अभिनंदनीय आहे. पण वृत्तपत्रांनी या उच्च तंत्र-कौशल्याने दिपून वाहून जाणे व आपली चिकित्सक भूमिका सोडणे इष्ट नव्हते. तांत्रिक दृष्ट्या शक्य असणा-या सर्वच गोष्टी जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य, वांछनीय व परवडणा-या असतील असे नाही. कोयनेच्या या चौथ्या टप्प्याने वर्षाकाठी पूर्वीइतकीच वीज निर्माण होईल याकडे पुरेसे लक्ष वेधलेले दिसत नाही. विजेसाठी पूर्वी इतकेच पाणी उपलब्ध असल्याने जास्त वीज – निर्मिती होणार नाही. फक्त दर ताशी दुप्पट वीज निर्माण झाल्याने पूर्वी १६ तासांत होणारी वीज आता ८ तासांत निर्माण करून उच्च मागणीच्या वेळी जास्त वीज पुरवणे शक्य होईल. यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करणे कसे परवडण्यासारखे आहे याचे गणित वृत्तपत्रांनी जनतेपुढे मांडणे आवश्यक आहे. कारण पैसा जनतेचा खर्च झाला आहे.
दुसरी बातमी अणुशक्तीच्या साहाय्याने समुद्राचे खारे पाणी गोडे बनवण्याबद्दल होती. अणुशक्तीचा उल्लेख होताच प्रत्येकाच्या मनात धोक्याचा लाल कंदील पेटला पाहिजे. त्याचा प्रत्यय वृत्तपत्रातील बातम्यांत दिसला नाही. प्रत्यक्ष कोणते अणु – इंधन वापरणार, त्याच्या सुरक्षित वाहतुकीची, साठ्याची काय व्यवस्था करणार व त्याचा खर्च किती? अतिरेक्यांना ते इंधन पळवून नेऊन अणु बाँब करता येईल का? निर्माण होणारा किरणोत्सारी कचरा किती असेल, त्याची विल्हेवाट कशी लावणार. किरणोत्सारी प्रदूषणाची शक्यता किती, प्रदूषण विपयक व अन्य धोक्यांची माहिती गोपनीय असणार काय, सर्व छुपे व उघड खर्च लक्षात घेऊन निर्माण होणा-या गोड्या पाण्याची किंमत किती होईल, खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी प्रकल्पाचा किमान आकार व उत्पादनक्षमता किती असेल वगैरे अनेक पैलूंची माहिती काढून ती जनतेसमोर ठेवणे हे वातमीदारांचे व वृत्तपत्रांचे काम आहे. सवंग कौतुक करणे हे वृत्तपत्राचे धोरण नसावे. विज्ञान व तंत्रज्ञान नेहमीच कल्याणकारी असेल, अशी अंधश्रद्धा नसावी.
सुभाष आठले
२५, नागाळा पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३

संघर्षाशिवाय सुधारणा नाही!
संपादक, आजचा सुधारक यांस,
एप्रिल महिन्याचा सुधारक आजच मिळाला. तो चाळत असता माझ्या मनामध्ये विचारचक्राचे वादळ जे सुरू झाले ते थांबता थांबेना. त्या वादळातच हे लिहावयास घेतले. त्यातून काय निघेल ते माझे मलाच अवगत होत नाही. परंतु लिहावयास घेतले आहे ते खरे.
आपला आशावाद मला जबरदस्त वाटतो. मी जन्मानेच नास्तिक जन्मलो आहे. आज ९५ व्या वर्षीही नास्तिकच आहे. जन्मभर अनेक विचारतरंग येऊन आपटत होते. पण एकदाही देवधर्मावर विश्वास ठेवावा असे वाटले नाही. माझ्याकडून होईल तितका वुद्धिवादाचा आचार करीतच राहिलो आहे. पण निराशेशिवाय दुसरे काही पदरी पडले नाही.
भारतातील मानव हा एक मोठा पाषाण आहे. त्यावर कशाचाही परिणाम होत नाही. हजारो वर्षे झाली त्याची जी एकदा घडण झाली ती पक्की, अभेद्य झाली. हजारो वर्षे झाली; अनेक आले आणि गेले. आम्ही मात्र जेथे आहो तेथे कायम. आमची संस्कृती, आमची जडणघडण, आमचे विचार त्यात भेद पडत नाही. जे धरले ते कायम. हजारो वर्षांची शिकवण अशी जबरदस्त आहे ती फुटतच नाही. जितके नको तितके आम्हाला शिकवले आहे. त्यात देव, संत, कवी, सर्व सर्व आले. सर्वांचा मिळून एकच उपदेश. जन्माला येऊन एकच करा, भक्ती. ती करा आणि मोक्षाला जा. याखेरीज दुसरे काही नाही. ही शिकवण जात नाही. वाटेल तितकी खटपट केली तरी जात नाही. जे काही चुकीचे सांगितले ते जात नाही. त्यामुळे भारतीय माणूस म्हणजे एक दुर्गुणांचे बंडल बनून राहिला. त्याला सांगूनसवरून, उपदेश करून, विचार करायाला शिकवून तो काही वदलेल ही आशा व्यर्थ आहे. त्याला हजारो वर्षात चांगले दिवस आले नाहीत आणि हजारो वर्षात येणार नाहीत. तो असाच सर्वार्थाने दरिद्री राहणार.
यावर उपाय एकच, तो म्हणजे संघर्षाचा. भारताची भविष्यात जर सुधारणा होणार असेल तर ती भलेपणाने नाही. ती संघर्षानेच होईल. येथे गुळमुळीत विचाराने काही होणार नाही. जवरदस्तीनेच हे काम करावे लागेल.
इतिहास काय सांगतो!
१४-१५ व्या शतकात जेव्हा माणसानी युरोपमध्ये बडगा उभारला आणि माणसाने माणसाला नव्या जन्मात घातले तेव्हा जग बदलण्यास सुरूवात झाली. देवा धर्माविरुद्ध मोठे वंड करून त्याला वळणावर आणले. जग नव्याने जन्मास आले.
हे काम भारतवासी माणसाना करावे लागणार आहे. एक फार मोठा संघर्ष आपणापुढे उभा आहे. त्यातून सुटका नाही. भारतीय माणसाचा आमूलाग्र बदल करावा लागणार आहे, आणि हे कार्य नुसत्या शब्दांनी होणार नाही.त्याला कृती पाहिजे. विचार हा विवेकवाद्यांचा पाया आहे. ते विचार करण्याचे काम आपला आजचा सुधारक करीत आहे. त्याला परिणाम करण्याला कृतीची जोड पाहिजे. अनेक शब्दांनी जे काम होणार नाही ते एका कृतीने होईल. एक ओंजळभर बेकायदा मीठ करून महात्माजींनी स्वराज्य मिळवून दाखवले. बेकायदा मीठ जर तयार केले नसते तर स्वराज्य मिळाले नसते. पण बेकायदा मियने जो संघर्ष निर्माण केला त्याने ते मिळविले. या संघर्षाने ते मिळाले. यासाठी विवेकवादाला कृतीची जोड पाहिजे.
आपण दहा वर्षे मासिक चालवले पण विवेकवादाला उचलून धरणारी एखादी कृती केली का? ती पाहिजेनुसते बौद्धिक फार होऊ लागले!
यासाठी माझ्या अल्पमतीप्रमाणे काही सुचवतो. पहा आपणास कसे वाटत? आपला गणपति-उत्सव म्हणजे एक अंधश्रद्धेचे खूळ आहे. त्याविरुद्ध एक संघर्ष उठवावा. गणपती म्हणजे एक मातीचे बाहुले. त्यात मातीशिवाय दुसरे काही नाही त्याचे वेड्यासारखे विसर्जन करण्याऐवजी ते बाहुले जर फोडून टाकून दिले तर ती कृती विवेकवादाला धरून होईल. सार्वजनिकरीत्या हे मूर्तिभंजन करावे. अनेक देवांच्या अनेक मूर्ति करून त्यांचे स्तोम माजवले जात आहे त्याविरुद्ध ही चळवळ सुरू करावी. पहा येवढे साधे काम करण्यास कितीजण तयार होतात ते. त्यापासून हे काम किती अवघड आहे याची कल्पना येईल. आजचा सुधारक तर मूर्तिभंजनाची चळवळ सुरू करील तर ते एक क्रांतिकारक कार्य ठरेल. त्याचा विचार करण्यात समाज हादरून जाईल. आपल्या आपल्यामध्ये संघर्ष सुरू होईल. भारतीय renaissance movement आजच्या सुधारकाने केली असे इतिहासात नोंदविले जाईल. मग आपल्या प्रयत्नांना रूप येईल. चळवळीस अर्थ येईल. धीट माणसे आपल्या भोवती जमा होतील. अनादि कालापासून अज्ञानात वुडलेला एक मानवसंघ जिवंत होईल. ही संधी आपणच आपल्या मतानी निर्माण केली आहे तिची सांगता होईल.
पाहा, आपणास काही कृती करावी असे वाटते का ते.
श्री . वा. किर्लोस्कर
४४७, सिंध हाउसिंग सोसा., औंध, पुणे – ४११ ००७

गणपति – विसर्जनाचे विसर्जन
संपादक, आजचा सुधारक यांस,
…..गरज आहे, गणपतीला नव्या पद्धतीने विसर्जित करायच्या विचाराला सुरवात करण्याची. ज्याला ज्या पद्धतीने आवडेल अन् योग्य वाटेल त्या पद्धतीने त्याने गणेशविसर्जन करण्यास समाजाने विरोध करू नये. देव, देवत्व अन् मांगल्याच्या भावना आणि कल्पना ह्या व्यक्तीगणिक वेगळ्या असतात तेव्हा मला भावणारे विसर्जन इतरांनाही तसेच भावावे असा मी अट्टाहास धरू नये.
कोणाला गणपतीला विसर्जित न करता ती मूर्ती तशीच घरी ठेवून दरवर्षी नव्याने प्राणप्रतिष्ठ करून उत्सव साजरा करावा असे वाटेल. असे करण्याचा आपल्याकडे काही लोकांत रिवाज आहे देखील. ह्या पद्धतीत वर्षभर त्या मूर्तीची जपणूक करणे ही एक जबाबदारीच असते. शिवाय ही पद्धत सर्वांनी आचरणात आणली तर गणेश मूर्ती बनविणा-या मूर्तिकाराच्या व्यवसायावर गदा यायची!
गणपती हा मातीचा बनविलेला असतो. मातीला मातीच्याच घरी पोहचवायला काय हरकत आहे? पाण्यात बोळवायच्या ऐवजी जमिनीत बोळवले तर कसे होईल?
वाजत गाजत आता निघते तशीच गणपतीची मिरवणूक काढावी; फक्त ती गावातील बुजू लागलेल्या तलावाकडे न वळवता गावाबाहेरील मोकळ्या ओसाड माळरानावर न्यावी. माळरानावर सर्वांनी मिळून मोठ थोरला गणपती ऐसपैस मावेल । असा खड्डा खाणावा, त्यात गणपतीची मूर्ती षोडशोपचारे पूजा करून ठेवावी. सर्व लोकांनी आपल्याबरोबर पाणी न्यावे आणि ते पाणी गणेशावर ओतावे. ज्यांना गणपतीला पाण्यात बोळवायचे असेल त्यांनी तो खड्डा पाण्याने पूर्ण भरावा म्हणजे त्यांना गजाननाला पाण्यात बोळावण्याचे समाधान मिळेल. नंतर तो खड्डा मातीने बुजवून टाकावा व त्यावर आठ्वण म्हणून छानसे वृक्षाचे रोपटे लावावे.
ही पद्धत सद्यःपरिस्थितीत उत्तम वाटते. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनसुद्धा योग्य. गणपतीपुढे अखंड दहा दिवस नाचकामात रमणाच्या तरुण रक्ताला खड्डा खणण्याचे काम मिळेल, त्यात झाड लावल्याने सत्ककर्म केल्याचे पुण्य मिळेल. आणि या निमित्ताने हजारो, लाखो, झाडे लावली जातील.
कृपया अशा विसर्जनाला सुजाण नागरिकांनी नगरपालिकेला खड्डे खणायला किंवा माळरानावर पाण्याची सोय करायला लावू नये. तसेच गजानन ज्या जागेवर विसर्जित केले त्या जागेवर आपला हक्कदेखील सांगू नये, तेथे आपली पाटीसुद्धा लावू नये.
सरकारने फक्त झाडे कोठे लावायची अन कोठे लावायची नाहीत हे सांगावे. लोकांनी देखील सरकार कडून एवढीच माफक्त आपेक्षा करावी. एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या या माफक अपेक्षेपुढेसुद्धा सरकारी सचिव लॉ सॅण्ड ऑर्डरचे भूत उभे करतीलच……
कौस्तुभ ताम्हणकर
धैर्य सोसा., नवी खडके इमारत,
स्वामी विवेकानंद रोड, नौपाडा, ठाणे – ४०० ६०२.

जात धर्म आणि राष्ट्र ह्यांपेक्षा महत्त्वाचा निकष
संपादक, आजचा सुधारक यांस,
सर्वसाधारणपणे वाचकांचा असा समज असतो की, आपण पाश्चात्त्य देशांच्या मानाने लोकशाही यशस्वी करण्याच्या बाबतीत बरेच मागासलेले आहोत. परंतु भारताची तुलना सद्यःपरिस्थितीतील पाश्चात्त्य देशांशी करणे चूक आहे.
त्या राष्ट्रांत लोकशाही स्थापन होऊन आज शेकडो वर्षे लोटली आहेत. आपल्याकडे जे आज आयाराम-गयाराम दिसतात आणि ५० पक्ष आहेत, तशीच परिस्थिती इंग्लंडमध्ये १८ व्या, १९ व्या शतकांत होती. त्यावेळी शेलबर्न, मेलबर्न, ग्लॅडस्टन, पामर्स्टन इ. अनेक पंतप्रधान झाले. इतकेच कशाला, चेंबरलेनने व चर्चिलनेसुद्धा त्यांच्या पक्षात सवतेसुभे निर्माण केले होते.
दुसरी एक गोष्ट, परकीय आणि स्वकीय यांच्या निवडीबद्दल आज आपल्याकडे वाद घातला जात आहे. परंतु भारताचे थोर नेते, दादाभाई नौरोजी इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये १८९२ साली निवडून आले होते आणि त्यावेळी आपला देश पारतंत्र्यात होता. तरीसुद्धा त्यांच्या निवडीला इंग्लंडमध्ये कोणीही हरकत घेतली नाही.
आणखी एक गोष्ट, सिस्टर निवेदिता, दीनबंधू अँड्यूज, अॅनी बेझंट, नेली सेनगुप्ता, मीराबेन इत्यादी अनेक परकीय व्यक्तींनी आपल्या समाजजीवनात भाग घेतलेला आहे.
व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची अथवा राष्ट्राची आहे याचा विचार न करता, ती व्यक्ती कोणासाठी समर्पित जीवन जगत आहे, ते पाहणे महत्त्वाचे ठरते. अव्राहम लिंकन कृष्णवर्णीय नव्हते, महात्मा फुले किंवा अण्णासाहेव कर्वे स्त्री, नव्हते. ज्या एंगेल्सने कार्ल मार्क्सला आर्थिक मदत करून त्याची पुस्तके छापली, तो कामगार नव्हता, तर भांडवलदार होता. नक्षलवाद्यांसाठी काम करणारे चारू मजूमदार जमीनदार होते.
केशवराव जोशी
तत्त्वबोध, हाय वे चेक नाका,
नेरळ (रायगड) – ४१० १०१

हरभ-याच्या झाडावर चढू नका.
संपादक, आजचा सुधारक यांस,
बऱ्याच महिन्यानंतर प्रा. दि. य. देशपांडे यांचा मोठा लेख वाचून आनंद झाला. वाचकमेळाव्यात निरर्थक वेळ व शक्ती घालविण्यापेक्षा त्यांनी चांगला लेख लिहिला ही मोलाची गोष्ट आहे. ते आपल्या रुग्णावस्थेतही इतके लेखन करून अध्यात्मासारख्या विवादास्पद विषयावर तर्कशुद्ध विचार देतात हे त्यांचे वाचकांवर उपकारच मानावे लागतात. प्रा. देशपांडे यांना माझे अभिनंदन पोचते करावे ही विनंती. प्रा. प्र. व. कुळकर्णी हे आपल्या अमेरिकेतील वास्तव्यात आ.सु. चा चांगला प्रचार करीत आहेत व त्याचा विस्तृत वृत्तात्त नियमितपणे प्रसिद्ध करीत आहेत, यावद्दल त्यांचेही अभिनंदन! अमेरिकेत स्थाईक झालेली हजारो मराठी कुटुंबे मराठी नियतकलिकांबद्दल आपुलकी बाळगतात ही स्पृहणीय बाब आहे. परंतु गणपती वसविणे, गीतेवर प्रवचने व चर्चा करणे, फॅशन म्हणून मराठी भाषिकांची संमेलने भरविणे, मराठी लेखकांची व्याख्याने, संगीताच्या मैफली यासारखे विरंगुळ्याचे आणि भावनिक न्यूनगंड (Guilt Complex) लपविण्याच्या भारतीय अमेरिकन मंडळींच्या मोहजालात (आणि information web मध्येही) आ. सु. ने अडकू नये असे वाटते. आ.सु. ची वर्गणी वाढवावी, रंगीत सचित्र आवरण असावे, इंग्रजी/हिंदी मधील आवृत्ती प्रसिद्ध करावी, जाहिरात करावी व जाहिराती स्वीकाराव्यात या सर्व कल्पना व सूचना मुळीच मान्य होऊ नयेत. तसेच इंटरनेटवरही आणखी काही वर्षे आ. सु. आणण्याचेही प्रयोजन नाही. आ. सु. हे एक जागतिक दर्जाचे प्रकाशन आहे व त्याचा संपूर्ण जगभर प्रसार झाला पाहिजे या सूचनारूपी हरभ-याच्या झाडावर आ. सु. ने चढण्याचा वेडेपणा करू नये. महाराष्ट्र फाऊंडेशन ने उत्स्फूर्तपणे आ. सु. ला पुरस्कृत केले म्हणून त्या संस्थेची अदृश्य वंधने (strings) मुळीच स्वीकारू नयेत.
आ. सु. हे महाराष्ट्रातील सामान्य परंतु शिक्षित जनतेचे प्रवोधन करण्यासाठी व महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वर्तणुकीतील अंधश्रद्धा, विसंगती, सनातनी धार्मिक समजुती, अनाठायी श्रद्धा हे दोष निवारण्यासाठी अस्तित्वात आले आहे असेच आ. सु. चे वहुसंख्य वाचक मानतात. आणि एखाद्या मर्यादित क्षेत्रातही आ. सु. चा अजून नगण्य प्रभाव आहे हे विसरता कामा नये. हा प्रभाव वाढविणे ही आ. सु. ची प्राथमिकता आहे. उच्चभ्रू व परदेशी अथवा परभाषिकांचे रंजन करणे हे आ. सु. चे कर्तव्य नाही हे सदैव ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. वाचनालयांना (विशेषतः मागासवर्गीय व ग्रामीण विभागातील) आ. सु. निःशुल्क पुरविण्याची योजनाबद्ध व्यवस्था मात्र मराठी अमेरिकनांच्या तसेच समृद्ध भारतीयांच्या साह्याने अवश्य अमलात आणावयास हवी. आ. सु. चे बहुसंख्य लेखक उच्चवर्णीय आहेत हा मुद्दा मात्र मुळातच खोडला गेला पाहिजे. अशा प्रकारचा विचार करणा-या मंडळींना आ. सु. ने कटाक्षाने दूर ठेवले पाहिजे. माझे स्वतःचेच उदाहरण द्यावयाचे झाल्यास, मी लिंगायत वाणी समाजात जन्मलो परंतु मला आ.सु. आपलाच वाटतो आणि आ. सु. नेही कधी असा विचार आपल्या संपादकीय धोरणात दर्शविला नाही त्याचा मला अभिमान वाटतो.
श्रीमती विजया पुणेकर यांच्या लेखातील प्रतिपादन, वैयक्तिक संदर्भ विस्तृतपणे असले तरी, पटले. नव्हे असा वैयक्तिक तपशील दिला नसता तर लेख अगदीच उथळ झाला असता. व्यक्तिमाहात्म्य लेखनात नसावे असा जरी संकेत असला तरी प्रसंगविशेषी त्यामुळे लेखन अधिक परिणामकारक होते ह्याचेच हे उत्तम उदाहरण आहे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.