मनाचा जो व्यापार चालतो तो सारा इंग्रजी भाषेत

इंग्लिश भाषेचे सामान्य ज्ञान तर आतांशा बहुधा प्रत्येक मनुष्यास जरूर झालें आहे. दिवसेंदिवस तर तींत निपुण होणे हा जीवनाचाच एक उपाय होऊ पहात आहे. चोहोंकडे प्रतिष्ठा मिरविण्याचे तर यासारखे सध्यां दुसरें साधनच नाहीं. तेव्हा तिचा जो हल्ली फैलावा झाला आहे, व होत चालला आहे, त्यापुढे वर सांगितलेल्या भाषांची गोष्ट काय बोलावी? इंग्लिश लोक आपल्या उत्कृष्ट भाषेचा साया भूमंडळावर प्रसार होत चालला आहे याचा अतिशयित गर्व वहातात, व तो त्यांचा गर्व यथार्थ आहे. आमच्या नुसत्या हिंदुस्थानांतच पाहिले तर आमच्या तरुण विद्वानांस तिने इतके वेडावून टाकले आहे की, त्यांस आपल्या आईबापांशी, बायकांशीं, बहिणीशीं, चाकरांशीं सुद्धां शुद्ध व सरळ बोलण्याची मारामार पडते! मग ग्रंथांतील भाषेविषयीं तर काय सांगावें! त्यांच्या मनाचा जो व्यापार चालतो तो सारा इंग्रजी भाषेत; तेव्हां देशभाषेत बोलणे किंवा लिहिणे झाल्यास ते भाषांतर होऊन निघायचे! असो; तर या सर्व गोष्टींचा क्षणभर विचार केला असतां सहज ध्यानात येईल की, मुसलमानांच्या सहवासाने आपल्या पेहेरावांत जितकी तफावत पडली तितकीच भाषेतहि पडली. म्हणजे मूळची साधी रीत जी दोनच वस्त्रे वापरण्याची ती जाऊन तीहून डौलाचा जो सध्यांचा आंगरखा, पागोटें, उपवस्त्र, हा पोषाक जसा त्या लोकांपासून आपण उचलला, त्याप्रमाणेच त्यांच्या भाषेतून
आपल्या भाषेत कांहीं शब्द येऊन व तीस नवे वळण लागून तींत झोंकदारपणा व आवेश हे गुण मात्र जास्त आले. तेव्हां त्या भाषेच्या मिसळण्याने आपल्या भाषेचे अहित न होतां हितच झालें, यांत संशय नाहीं. पण इंग्लिश भाषेचा प्रचार हाच आतां सार्वत्रिक होऊन मूळच्या भाषेचा लोप होऊ पहात आहे. कारण विचार, कल्पना यांची उत्पत्ति ज्या मनापासून तेच इंग्रेजी बनल्यावर मूळच्या भाषेची प्रधानता कोठे राहिली? अर्थात्च नाहीं; तीस सर्व प्रकारें गौणत्व येऊन इंग्रेजी जिकडे नेईल तिकडे जाणे तीस प्राप्त झाले.