संपादकीय

गेल्या दोन-तीन महिन्यांत काही आम्ही लिहिलेल्या व काही आम्ही प्रकाशित केलेल्या लेखांमुळे पुष्कळ पत्रे आली आहेत. त्या पत्रांना सविस्तर उत्तरे देण्याची गरज निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर काही पत्रांवर ताबडतोब काही ना काही कृती करण्याची गरज आहे अशा पत्रांमध्ये श्री. देवदत्त दाभोलकर ह्यांचा क्रम पहिला लागतो. श्री. भ. पां. पाटणकर (ऑगस्ट ९९ अंक पाहावा), श्री. ग. के. केळकर, श्री. प्रभाकर गोखले, ह्या आमच्या वाचकांनी पाठविलेल्या पत्रांना (चालू अंकात अन्यत्र प्रकाशित) क्रमशः उत्तरे पुढे दिली आहेत. मराठी भाषाप्रेमींना लिहिलेल्या अनावृत पत्राला आलेल्या उत्तरांपैकी काही या महिन्यात प्रसिद्ध करीत आहोत, बाकीची ऑक्टोबरमध्ये व त्यांचा समारोप शक्यतोवर नोव्हेंबरमध्ये करावा असा इरादा आहे.
आम्ही नागपूरला राहतो. त्या नागपूरची छीथू जगभरात व्हावी अशा काही घटना अलिकडे घडल्या आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात (जे एकाच वेळी सर्वांत शुद्ध, गंगोत्रीच्या जलासारखे निर्मळ आणि सगळे कल्मष भस्मसात् करून टाकणा-या पावका प्रमाणे आहे तेथेच) पराकोटीचा भ्रष्टाचार माजला आहे. सध्या एकटे नागपूर विद्यापीठ जरी बदनाम झाले असले तरी बाकीच्या विद्यापीठांची स्थिती फार वेगळी नसावी. शिक्षणक्षेत्राला वळण लावणे हे सगळ्यांत तातडीचे काम होऊन बसले आहे. जेथे आजचे काम सुरू करता येईल असे ते क्षेत्र आहे. तरी ह्या क्षेत्राची परिशुद्धी करण्यासाठी आपण व्यक्तिशः किंवा संघशः काय करू शकतो. काय व्हायला हवे, ह्याविषयी आमच्या सर्व वाचकांनी आपल्या सूचना पाठवाव्या. ज्यांच्या संकलनातून एक पूर्ण कार्यक्रम लोकांच्या समोर ठेवता येईल असे त्या सूचनांचे स्वरूप असावे, अशी आमच्या वाचकांना विनंती आहे. काहीतरी होईल, कोणीतरी करील असा विचार न करता, इतकेच नव्हे तर पारंपरिक विचारांवर अवलंबून न राहता शिक्षणक्षेत्राची परिशुद्धी करणे ही जबाबदारी आमची, आजचा सुधारकच्या वाचकांची आहे असे मानून ह्या प्रश्नाला आपण सर्वांनी हात घालावा ही प्रार्थना. जानेवारी-फेब्रुवारीच्या सुमारास, दहावे वर्ष संपता-संपता, एक शिक्षणविशेषांक काढावा असा विचार चालू आहे.
आजचा सुधारकला ह्या अंकाने साडेनऊ वर्षे पूर्ण होत आहेत. दहाव्या वर्षाच्या उत्तरार्धात आम्ही प्रवेश करीत आहोत. ते निमित्त साधून येत्या डिसेंबर महिन्याच्या अंतिम सप्ताहात शक्यतोवर २५-२६ तारखांपैकी एका दिवशी वाचकांचा एक मेळावा पुण्याला घ्यावा आणि तेथे केवळ महाराष्ट्रभरातल्याच नव्हे तर विदेशातल्या काही मंडळींनी सुद्धा हजेरी लावावी अशी इच्छा आहे. डिसेंबरच्या सुट्यांमध्ये त्यांना इकडे येणे सुकर होईल व त्यांच्या भारतातल्या मुक्कामातला एक दिवस सुधारकासाठी ते वेगळा ठेवू शकतील अशी आशा करतो.

आम्हास ईश्वर का नको?
श्री. भ. पां. पाटणकर यांस उत्तर,आपले ऑगस्ट ९९ च्या अंकातील पत्र वाचले. आपल्या प्रत्येक शब्दातून आपल्याला आजचा सुधारकबद्दल जी कळकळ वाटते तिचा प्रत्यय येतो. आपल्या पत्रात एक मुद्रणदोष शिल्लक राहिला आहे तो पहिल्याने दुरुस्त करतो. आपल्या पहिल्या वाक्यात polemics हा शब्द छापावयाचा राहिला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या पत्रातील पहिले वाक्य हे ‘अंक क्र. १०/४ मिळाला. या अंकाला polemics चे स्वरूप आले आहे’ असे असावयास हवे होते.
आपले त्याविषयीचे म्हणणे मला मान्य आहे. ह्या चर्चेचे स्वरूप वादासाठी वाद करणे, वादंग माजविणे असे होऊ नये तर ते वादे वादे जायते तत्त्वबोधः’ असे असावयास हवे. दुःखाची गोष्ट अशी की कृतीपर्यंत पोहचणारा तत्त्वबोध फार थोड्यांना हवा आहे. बहुतेक लेखकांचे लक्ष्य शब्दच्छल करून कीर्ति मिळविणे असे आहे. संपादकांना त्यामुळेच तारेवरची कसरत करावी लागते, आणि ती कसरत करताना त्यांचा क्वचित् तोल जातो. तो तोल सावरण्यास आपल्या सारख्यांच्या पत्राची त्यांना निःसंशय मदत होते. तत्त्वबोध वादातूनच होईल असे जाणून वादविवाद निर्माण करणारे लेखन प्रकाशित करणे आवश्यक असते आणि त्याच वेळी त्यातून गुद्दागुद्दी होणार नाही असेही जागरूकपणे पाहावे लागते.
आमच्या मासिकाचे स्वरूप हे केवळ समाशोधनगृहासारखे (clearing house) असावे, आम्ही तटस्थपणे—विषयनिष्ठपणे प्रत्येकाला आपापले म्हणणे त्यांच्या स्वतःच्याच शब्दांत मांडू द्यावे अशी एक सूचना आलेली आहे. परंतु ती मान्य करताना एक अडचण येते. मूळ विषय मागे पडून वैयक्तिक दोषारोप आणि हेत्वारोप ह्यांच्या जाळ्यात आम्ही सापडू अशी शक्यता निर्माण होते. म्हणून तसे करता येत नाही. फेरबदल करावाच लागला तर तो मूळ लेखकाच्या लक्षात आणून देऊन, त्याची संमती घेऊन, करण्याचे तूर्त योजले आहे. पण त्याच्या व्यवहार्यतेबद्दल शंका आहेच.
आज काय करायचे ते सांगा असे आपण म्हटले आहे. त्याविषयी आमचे मत असे आहे की आम्हाला सगळ्या सुधारणा आजच हव्या आहेत. इतकेच नव्हे तर आमचे जे अंतिम साध्य आहे तेच आमचे आजचे साधनही असावे अशीही आमची इच्छा आहे. ‘कल करै सो आज कर, आज करे सो अब’ या कबीराच्या वचनावर आमचा विश्वास आहे. शक्यतोवर कडू औषध रोग्याने आहे तसेच स्वीकारावे असे आम्हाला वाटते. ते त्याला घेणे अशक्यच असेल तर ते गूळ, मध, साखर ह्यापैकी कशाबरोबर घ्यायचे किंवा आहे तसे कडूच चाटावयाचे हे आम्ही व्यक्तिशः रोग्यावर सोपवितो. आम्ही त्या औषधाचे शर्करावगुंठन करण्याच्या भरीस पडत नाही. पण तसे केल्यामुळे इष्ट तो लाभ होत नाही याची आम्हाला जाण आहे. आमची औषधयोजना योग्य आहे अशा विश्वासाने आम्ही वागतो परंतु जोपर्यंत त्या औषधोपचाराचा गुण आम्हाला प्रकटपणे दिसत नाही तोपर्यंत आमच्या औषधाची परिणामकारकता ठरविता येत नाही; आणि ते औषध कडू असल्यामुळे कोणीच घेतले नाही तर आमच्या उपचारपत्राचा (prescription) पडताळा आम्हाला मिळत नाही. त्या कारणाने ‘शर्करावगुंठनाला’ आम्हाला अजिबात वर्ज करता येत नाही. एकंदरीने अशा गुंत्यात सध्या आम्ही सापडलो आहोत.
सुधारकाला जे परिवर्तन घडवून आणायचे आहे, ते तो एकटा करू शकत नाही. ते करायचे तर त्याला सहस्रबाहु व्हावे लागेल, परंतु त्यासाठीही त्याच्या वाचकांची आज तयारी दिसत नाही. एक अनुभव येथे सांगण्याजोगा आहे. आजचे स्त्री-पुरुषसंबंध सुधारावेत ह्यासाठी आम्ही उत्सुक आहोत हे आपण जाणताच. ते करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून विवाहविषयक कायद्यांची पुन्हा चर्चा सुरू करावी आणि त्यातून जनजागरण साधावे हा हेतू मनात धरून आम्ही महाराष्ट्रातल्या काही नामवंत स्त्री-पुरुषांना विनंतीवजा पत्रे लिहिली. १५-२० पत्रांपैकी एकाचेही उत्तर आम्हाला आले नाही. आम्हाला केवळ जनजागरण अपेक्षित होते, कोणतीही धाडशी कृती अपेक्षित नव्हती तरीदेखील आम्हास ते साध्य झाले नाही. मुलांच्या शिक्षणात इंग्रजी माध्यमाचा अडथळा होतो असे मत आम्ही मांडतो. ते अनेकांनी तत्त्वतः मान्य आहे; परंतु कोणीही कृती करण्यास पुढे आल्याचे आम्हास माहीत नाही. परिणामी आमच्या हाती अरण्यरुदनच राहते. आम्ही तेही केले नाही तर काहीच घडायचे नाही असा विचार करून तेवढे आम्ही निष्ठेने करीत असतो.
विवेकवादामध्ये केवळ rationalism नाही असे सद्यःसंपादकांचे मत आहे. आधुनिक मूल्ये ही चिरंतन मूल्ये नसतीलच हे कशावरून असा विचार करून सध्या त्यांचा पुरस्कार करण्याचा विचार आहे. त्यांच्यात चिरजीवित्व नसल्यास ते त्यांच्याविषयीच्या चर्चेतून समजावे असाही तो पुरस्कार करताना विचार असतो.
अन्याय दूर करण्यासाठी देव नाही असे सांगण्याची गरज नाही असे आपण म्हणता पण ह्या बाबतीत आपला आणि आमचा मतभेद आहे. आपण गांधीजींचे नाव लिहिले आहे. त्यामुळे ह्या मुझ्यावर थोडे अधिक विस्ताराने लिहावे लागेल.
ज्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे त्यांनी समता आणण्यासाठी सामान्य जनांच्या दानबुद्धीला आणि न्यायबुद्धीला आवाहन केले आहे. तेवढ्याने समता येत नाही कारण आजची विषमता ही परमेश्वरानेच निर्माण केली आहे आणि ती नष्ट करण्यासाठी मानवाचे प्रयत्न पुरे पडणार नाहीत असा त्यांचा विश्वास असतो ही एक गोष्ट आणि परमेश्वरावर विश्वास कायम राखणे म्हणजे रोगाचे मूळ न बघता आणि त्यावर उपाययोजना न करता वर वरची मलमपट्टी करणे असे त्याचे स्वरूप होते. मानवी मनाची आजवर झालेली घडण ने बदलता समता आणण्याचे प्रयत्न करणेच तेवढे त्यांच्या (आस्तिकांच्या) हाती राहते. थोडक्यात जोवर मनामध्ये देवाचे अस्तित्व कायम आहे तोपर्यंत मन एका चौकटीच्या आत विचार करते; आणि त्यामुळे समाजाच्या रचनेचीदेखील एक विशिष्ट चौकट प्रत्येक आस्तिक समाजसुधारकाला गृहीत धरावी लागते, मान्य करावी लागते. कारण त्या चौकटीचे नटबोल्टसच मुळी देवाधर्मावरची श्रद्धा हे आहेत. श्रद्धा जितकी दृढ़ तितका हा नट घट्ट पिळलेला. जुने काही बदलताना त्याच्या मतातील श्रद्धेमुळे साशंक असलेला, ‘जुने ते चांगले नाही का? त्याला देवाचे संमोदन नाही का?’ हे सतत तपासून पाहून निर्णय करण्यास विलंब करणारा, आप्तवाक्यप्रामाण्य मानणारा असा स्वभाव देवा-धर्मावर विश्वास असणा-यांचा असतो. देवाला मानणारे सहसा एकशः प्रयत्न करतात. समूहशः घडणारे त्यांचे प्रयत्न हे देवाधर्माशी संबंधित असतात. समाजसुधारणेशी संबंधित नसतात. ज्या समाजसुधारणांसाठी आमूलाग्र बदल हवे असतात त्या ठिकाणी श्रद्धालूची सामूहिक कृती घडताना आढळली नाही. मंदिरे बांधणे, यज्ञ करणे, ह्यांमध्ये लोकांची जशी एकजूट दिसते तशी स्त्री-शूद्रांवरचा अन्याय नष्ट करणे, आर्थिक समानता आणणे, ह्यात दिसून येत नाही. भगवच्छरणता आणि परिस्थितिशरणता ह्यांत फरक राहत नाही.
आपल्या देशामध्ये संघशः प्रयत्न घडत नाहीत याची उदाहरणे अनेकानेक आहेत. एकच साधे उदाहरण घ्यायचे तर ते असे की जुन्या शाळा मुलांना प्रवेश : देताना देणग्या व डिपॉझिटे घेऊ लागल्या तर त्यांच्या विरोधात पालकांची अडवणूक – पिळवणूक न करणा-या, चांगले शिक्षण देणा-या, नवीन शाळा उभ्या राहत नाहीत, हजारो पालक स्वतःची अडवणूक करून घेऊ शकतात पण ते एकत्र येऊन जितक्या देणग्या, ते चालू शाळेला देतात तितक्याच पैशांच्या बळावर नवी शाळा उभी करू शकत नाहीत. ज्या प्रदेशात विहिरीचे पाणी पिकांसाठी कमी पडते तेथे ते आपापल्या विहिरी खोदत जातात पण संघटितपणे प्रयत्न करून, असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविणे त्यांना साधत नाही. अण्णा हजारे ह्यांसारख्या मंडळीनी करून दाखविलेली किमया त्यांच्या स्वतःच्या गावापुरतीच सीमित राहते. कारण अण्णांवर ईश्वराचा कृपाप्रसाद आहे आणि आपल्यावर नाही अशी सर्वांची मनोमन खात्री असते. महाराष्ट्र सरकार त्यांच्या योजनेप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात काही गावे निवडून महाराष्ट्रातल्या तीनचारशे गावाचा कायापालट घडवून आणणार होते, परंतु आजपर्यंत काहीही घडलेले नाही ह्याचे कारण आमच्या मते गतानुगतिकत्व हे आहे. ही मनाला लागलेली सवय
आहे, मनाला पडलेले वळण हे आहे.
जुन्या चौकटीत माणसाला कसे सुरक्षित वाटते. पुण्यकर्म करणारे आणि पापकर्म करणारे दोघेही देवावर भार टाकून निश्चित असतात. आपल्या इहलोकातल्या कर्मांच्या कार्यकारणभावाचा आपल्या प्रारब्धाशी किंवा पूर्वसंचिताशी संबंध लावतात. ज्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे त्यांच्याविषयी आम्हाला असेही वाटते की सर्वसाधारणपणे ३ जे पूर्वी घडलेच नाही असे काही घडविण्याला उत्सुक नसतात, कारण आम्ही बदलल्यामुळे जग बदलते अशी त्यांची खात्री पटलेली नसते. हरीची इच्छा जशी असेल तसे होईल. मी दुर्बल आहे अशी शिकवण त्यांनी त्यांच्या मनाला दिलेली असते, त्यामुळे एकूण समाजामध्ये गतानुगतिकत्व, परंपराभिमान अशांसारखे दोष आढळतात. श्रद्धेचा पीळ घट्ट असला आणि जुना असला तर तो हळुवारपणे सैल करता येतोच असे नाही. त्यामुळे श्रद्धांची तोडफोड करण्याची गरज समाजसुधारकांना कायमच वाटत राहते.
जे परिवर्तन घडवायचे आहे ते मलाच आणि आताच घडवून आणणे जरूर आहे असे जितक्या तीव्रपणे अश्रद्ध माणसाला वाटते तितके ते सश्रद्ध माणसाला वाटत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे समाजामध्ये जे परिवर्तन घडवावयाचे आहे त्याची सुरुवात परमेश्वराचे अस्तित्व नाकारण्यापासून करणे आम्हास इष्ट वाटते.

श्री. ग. के. केळकर यांस उत्तर
विवेकाचे उग्र व्रत ह्या नावाच्या आमच्या संपादकीयात आपल्याला विचारांची सुसूत्रता आढळली नाही असे आपण आपल्या पत्रात म्हटले आहे, त्या अर्थी माझ्या विवेचनात काही त्रुटी राहून गेली हे उघड आहे. भारतातील सुशिक्षित आणि अशिक्षित मतदार लोकशाहीप्रक्रियेस अयोग्य आहे म्हणून सध्याचा सत्तारूढ पक्ष घटनादुरुस्ती सुचवीत आहे. मतदारांचे प्रबोधन करण्याचे कोणीच मनावर घेत नाही हे आमचे दुःख आहे. आमच्या समजुतीप्रमाणे आपलेही दुःख तेच आहे. जी कामे मतदारांचे प्रबोधन (मग हे कार्य कितीही अवघड असो) करून साधावयाची, ती करण्यासाठी घटनादुरुस्तीचा उपाय सुचविला जावा हे आमच्या पन्नास वर्षांच्या लोकशाहीचे स्वरूप मन विषण्ण करणारे आहे हे आम्हाला प्रामुख्याने त्या संपादकीयात सांगायचे होते. सोनिया गांधी ह्या आमच्यासारख्याच साधारण बुद्धीच्या महिलेला पंतप्रधानपदासारखी अत्यंत जबाबदारीची आणि नाजूक कामगिरी मुळीच देण्यात येऊ नये असेच आम्हालाही वाटते. पण त्या एका व्यक्तीचा बंदोबस्त करण्यासाठी जे उपाय सुचविले जात आहेत ते आजारापेक्षा औषध भयंकर अशा स्वरूपाचे आहेत. एका तक्षकाला मारण्यासाठी जनमेजयाने सर्पसत्र आरंभावे असा हा प्रकार आहे किंवा एका गुन्हेगाराला आवरण्यासाठी पूर्ण देशभरात कफ्यूं लावावा असे त्याचे स्वरूप आहे.
हा मुद्दा पुन्हा विशद करण्याचा प्रयत्न करतो. लोकशाही म्हणजे एकाधिकारशाही नव्हे. लोकशाही म्हणजे बहुसंख्येची सत्ता, ती एकाची सत्ता नाही. लोकशाही ही कोणाच्याही एकाच्या हातात सत्ता एकवटू नये ह्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. त्या रचनेमध्ये परस्परांवर अंकुश ठेवण्याची पुरेशी सोय आहे. मंत्रिमंडळाचा प्रधानमंत्र्यावर अंकुश, प्रधानमंत्र्याचा राष्ट्रपतींवर अंकुश आणि राष्ट्रपतींचा मंत्रिमंडळावर अंकुश, राज्यसभेचा लोकसभेवर अंकुश, राज्यसभेवर राष्ट्रपतींवर अंकुश आणि या सर्वांवर न्यायालयांचा अंकुश आपल्या घटनेमध्ये अभिप्रेत आहे आणि तो व्यवहारात आणलाही जातो. आपल्या लोकप्रतिनिधींवर त्या त्या मतदारसंघाचा अंकुश असावा असे आपल्या घटनाकारांना अभिप्रेत आहे. बहुसंख्य लोकांच्या इच्छेचे प्रतिबिंब आपल्या देशाच्या धोरणात आणि राज्यकारभारात पडावे अशी इच्छा घटनाकारांनी त्या घटनेच्या रचनेतून व्यक्त केली आहे.
आपल्या देशाचा पंतप्रधानाने लोकांच्या इच्छेचा कौल घेऊन ज्याप्रमाणे आपली धोरणे आखावयाची आहेत त्याचप्रमाणे जनतेच्या प्रवोधनाचेही कार्य करीत राहिले पाहिजे, तिच्या विचारांना योग्य ती दिशा देण्यासाठी तिच्याशी सतत संवाद करण्याची गरज असताना आपल्या देशात तसे काहीच घडत नाही. आमच्या गृहमंत्रिपदावरची माणसे धर्मज्वर ज्यामुळे वाढेल अशा घटनांच्या मागे आहेत की काय अशी शंका वाटावी अशी परिस्थिती आज आहे. आमच्या लोकप्रतिनिधींमध्येच योग्य कृती काय आणि अयोग्य कृती काय ह्याविषयीच्या विवेकाचा अभाव आम्हाला जाणवतो, आणि अखेर आमचे मतदार त्यांना दारू पाजणायांना, त्यांना लुगडीधोतरे वाटणा-यांना, धाकदपटशा करणा-यांना, त्यांना निरनिराळ्या प्रकारची लाच व आमिषे दाखविणा-यांना, त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालणा-यांना निवडून देतात हे आजचे वास्तव आहे. घटनेमध्ये बदल करून परकीय वंशामध्ये जन्मलेल्या लोकांचा पंतप्रधानाच्या अथवा तत्सम पदावर येण्याचा अधिकार हिरावून घेऊन हे वास्तव बदलणार नाही. आम्हाला म्हणजे विवेकी लोकांना हे वास्तव बदलण्यासाठी कंबर कसली पाहिजे असे आम्हाला त्या संपादकीयातून सांगायचे होते.
उच्चपदी असणारया व्यक्तींना देशाची महत्त्वाची गुपिते माहीत असतात म्हणून पंतप्रधानपदावर परदेशात जन्मलेला माणूस कधीही आरूढ होऊ नये अशी घटनादुरुस्ती करून काहीही लाभ नाही असे आमचे मत आहे, कारण गुपिते फोडण्यामध्ये बहुतेक वेळा स्वदेशात जन्मलेले लोकच पुढाकार घेतात हे आम्हाला ठाऊक आहे. नुकत्याच कश्मिरमध्ये झालेल्या हातघाईच्या लढाईचे कारण पाहिले तर ते आमचा गाफीलपणा हे आहे. आणि हा आम्हाला महागात पडलेला गाफीलपणा परदेशात जन्मलेल्यांनी केला नाही. पंतप्रधानपदी कोणतीही व्यक्ती असो तिच्याकडून देशहिताचेच वर्तन घडेल असे वळ आम्हा मतदारांना मिळवायचे आहे.
कोणतीही एक व्यक्ती पंतप्रधानपदी बसण्यासाठी तिच्या ठिकाणी असलेला लायकीचा अभाव यावर भर न देता विरोधी पक्षाने तिच्या विरोधात लायक माणसांची फौज उभी करणे आणि त्यासाठी आवश्यक ते जनजागरण करणे इष्ट आहे. विवेकाचे हेच उग्र व्रत होय.
श्री. केळकरांच्या अन्य मुद्द्यांविषयी पुन्हा कधीतरी.
श्री. प्रभाकर गोखले यांस उत्तर
१. आमच्या मासिकातील बहुतेक लेखकांचा आत्मविश्वास थोडा जास्तच आहे हे मला मान्य आहे. परंतु ते आपले लेखन केवळ आपले मत दुस-यांना पटवून देणे एवढ्याचसाठी करीत नाहीत, तर त्यावरील टीका जाणून घेण्यासाठीही करीत असतात. बहुतेक सर्व लेखांची दुसरी बाजू आम्ही आवर्जून प्रकाशित करतो; आणि अंतिम निर्णय वाचकांवर सोपवितो.
२. अन्याय दूर करणे आणि वास्तव बदलणे हा आमच्या लेखनाचा हेतु आहे हेही आम्ही अमान्य करीत नाही. आमची शक्ति तुटपुंजी आहे हेही खरेच. पण मोठी हिंमत धरली नाही तर आम्ही काहीच करू शकणार नाही. सध्या आमचे लेखन ‘आमची विचारान्ती अशी अशी खात्री झालेली आहे. आपले काय म्हणणे आहे?
अशा थाटाचे असते. आमच्याप्रमाणे आम्ही इतरांचीही खात्री पटवू शकलो म्हणजे पुरे. एक छोटासा समुदाय एका मताचा झाल्यानंतर त्याची संख्या वाढविण्याचा विचार करू. प्रत्येकाने स्वतंत्र विचार करून आमच्या मताला यावे असा हा प्रयत्न असल्यामुळे एकदम मोठ्या संख्येपुढे जाण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला अनुयायी नकोत. समविचारी लोक हवेत. आणि जे विचार करणारे आहेत त्यांचे एकमत होणे कठिण ह्याची कल्पना आहे. त्यामुळे हे असेच चालणार. मात्र आमचा मार्ग खडतर आहे म्हणून मार्गच बदलावा असे आम्हाला आज वाटत नाही.
३. ‘सर्वच त्या वातावरणाचे कैदी’ हा उतारा ढाकुलकरांच्या पत्राला उद्देशून होता. प्रकाशित झालेली त्यांची तिन्ही पत्रे आणि आम्ही त्यांना दिलेली उत्तरे आपण एकत्र वाचावी अशी आपणाला विनंती आहे. बुद्धिवाद आणि विवेकवाद ह्यांचा अर्थच आप्तवाक्य स्वीकारावयाचे नाही, ग्रन्थप्रामाण्य नाकारावयाचे असा आम्ही करतो. आप्तवाक्यप्रामाण्यनिषेध हा विवेकाचा मूलाधारच होय.
४. विवेकवाद म्हणजे काय ते आम्ही पहिल्या वर्षाच्या पहिल्या अंकापासून सांगत आलो आहोत.
जून ९९ मधील केशवराव जोशी ह्यांचे पत्र सोनिया गांधींच्या संदर्भात असावे. सोनिया गांधी आम्हाला हव्या असे मुळीच नाही. त्या आम्हाला नकोत. पण एकट्या त्या नकोत म्हणून जे उपाय सुचविले जात आहेत ते चुकीचे आहेत. देवकीच्या पोटी येणा-या मुलाकडून कंसाचा वध होणार अशी भविष्यवाणी झाल्यामुळे कंसाने तिच्या निरपराध अपत्यांचा बळी घेतला; तसेच हे असे आम्हाला वाटते. कंसाचे ते करणे जसे योग्य नव्हते तसे घटनादुरुस्ती करणे योग्य होणार नाही एवढेच. केशवरावांचेही तसेच म्हणणे असावे.
राष्ट्रीय अस्मिता, अभिमान ह्या संकल्पना बहुसंख्य लोकांच्या मनात आहेत. त्यासुद्धा आपण देवाचे अस्तित्व जसे तपासून घेतले पाहिजे तशाच तपासून घेतल्या पाहिजेत. विवेकवाद म्हणजे आपल्या संकल्पना तपासत राहणे.
५. आजपर्यंत कोठल्याही विचारसरणीशी जुळणारा समाज अस्तित्वात नव्हता. पुढेही तो तसा होईल अशी मुळीच खात्री नाही. फक्त आपल्याला त्या दिशेने यथाशक्य वाटचाल करावयाची आहे.
६. आमच्या विचारसरणीला विवेकवाद म्हणण्याचे कारण असे की विवेकाने तर्काचाहि योग्यायोग्यता तपासावी अशी कल्पना आहे. तर्क हे विवेकाचे अंतिम साध्य नव्हे, ते त्याचे एक अत्यन्त वलिष्ठ साधन आहे. त्याच्यावाचून विवेकाचे भागू शकत नाही हे खरेच.
आपण मनमोकळेपणाने विचारले ह्याबद्दल आपल्याला धन्यवाद,