धर्म आणि श्रद्धा

धर्मचिकित्सा करणा-या विद्वानांचे, ढोबळ मानाने, दोन वर्ग आहेत. एक वर्ग आहे – धर्म मानणा-या आस्तिकांचा, तर दुसरा आहे-धर्म न मानणा-या नास्तिकांचा. आस्तिक धर्मचिकित्सक हे सिद्ध करू पाहतो की धर्म ही अत्यंत कल्याणकर (किंबहुना, एकमेव कल्याणकर) बाब आहे. उलट, नास्तिक धर्मचिकित्सक हे दाखवू पाहतो की धर्म ही अत्यंत घातक आणि मानवाला सर्वस्वी अशोभनीय बाब आहे. धर्मचिकित्सकांच्या या दोन वर्षांनी काढलेले धर्मासंबंधीचे निष्कर्ष भिन्न (किंबहुना, एकमेकांविरुद्ध) असले, तरी त्या दोहोंमध्ये एका बाबतीत मतैक्य असल्याचे आढळते. नास्तिक आणि आस्तिक या दोन्ही प्रकारचे बहुतेक धर्मचिकित्सक असे मानतात की धर्माचा आधार श्रद्धा हा आहे. माझ्या मते, ही समजूत सर्वस्वी चुकीची असून अन्यायकारक आहे. नास्तिक लोक तर धर्माला झोडपायलाच बसलेले असतात; त्यामुळे प्रतिपक्षाचा दुबळा भाग शोधून त्यावर आघात करणे युक्तिवादात विजय मिळविण्यासाठी त्यांना उपयोगी वाटणे आणि त्यामुळे धर्म हा श्रद्धेच्या ठिसूळ पायावर उभा आहे असे या नास्तिकांनी ठासून म्हणणे (चुकीचे असले तरी) स्वाभाविक आहे. पण धर्माचे समर्थक म्हणवणा-या आस्तिकांनीही तसे म्हणणे म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.
कोणतीही चिकित्सा करीत असता सत्यशोधन हा आपला उद्देश असायला पाहिजे. पण, दुर्दैवाने, वर उल्लेखिलेल्या दोन्ही वर्गातल्या धर्मचिकित्सकांचा उद्देश सत्यशोधन हा नसून आपापल्या पूर्वग्रहांचे वृथा-समर्थन (rationalization) करण्यासाठीच ते आपली लेखणी व वाणी झिजवीत असतात असे दिसते. श्रद्धा ही बुद्धिप्रधान मनुष्यप्राण्याला अशोभनीय असल्यामुळे श्रद्धेवर आधारलेला धर्म मानणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होय. असे नास्तिक धर्मचिकित्सकांचे म्हणणे, तर श्रद्धा ही अत्यंत वांछनीय गोष्ट असल्यामुळे श्रद्धेचे समर्थन करणे हा आस्तिक धर्मचिकित्सकांचा खटाटोप. एखादा माणूस पाण्यात बुडाल्यामुळे मेला की मेल्यामुळे पाण्यात पडला या चर्चेत विद्वानांनी तिरिमिरीवर यावे, आणि वस्तुतः तो माणूस जिवंतच असावा तशीच या धर्मचिकित्सकांची तहा! धर्माचा आधार श्रद्धा हा नाही अशी वस्तुस्थिती असताना श्रद्धा चांगली की वाईट याची व्यर्थ चर्चा करणे धर्मचिकित्सेच्या संदर्भात अगदीच अप्रस्तुत आणि पोरकटपणाचे आहे.
एका दृष्टीने पाहिल्यास श्रद्धा ही दैनंदिन व्यवहारासाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आहे. एखाद्या अनोळखी माणसाला एखादा पत्ता आपण विचारतो तेव्हा तो सांगेल ते खरे असे आपण गृहीत धरीत नाही काय? एखाद्या डॉक्टरांकडे आपण जेव्हा जातो तेव्हा त्याला व्याधी आणि औषधयोजना यांचे ज्ञान असून तो आपल्यावर योग्य ती उपाययोजना करील असे आपण गृहीत धरीत नाही काय? रेल्वे स्टेशनवर अमुक नंबरची गाडी अमुक वेळी अमुक प्लॅटफॉर्मवरून अमुक शहराकडे प्रस्थान करील असे जेव्हा घोषित केले जाते तेव्हा ते खरे आहे असे आपण गृहीत धरीत नाही काय? सर्व संशयांची निवृत्ती होईपर्यंत पाऊलच उचलायचे नाही असे ठरवून त्याबरहुकूम वागणे ही सर्वथैव अशक्य आणि अव्यवहार्य गोष्ट असून समुद्रातील सगळ्या लाटा संपल्यावर समुद्रस्नान करू इच्छिण्यासारखीच हास्यास्पद आहे. विश्वास ठेवणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. माणूस आधी विश्वास ठेवतो त्या विश्वासानुसार व्यवहार करतो, आणि फसवणूक झाली असा अनुभव आल्यास मग अविश्वास धारण करतो.
माणसाचा माणसाच्या प्रामाणिकपणावरील विश्वास हा रोजच्या व्यवहारात अपरिहार्य आहेच, एवढेच नव्हे तर, जे विज्ञान कोणतीही गोष्ट पुराव्याने सिद्ध केल्याशिवाय मानत नाही त्या विज्ञानातही अपरिहार्य आहे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा • नियम किंवा आइन्स्टाइनचा सापेक्षतावादाचा सिद्धान्त प्रथम आपण विश्वासावरच स्वीकारतो. आपण असे म्हणतो की न्यूटन-आइनस्टाइन सारखे थोर वैज्ञानिक लबाडी करणार नाहीत–ते विश्वासार्ह आहेत. अर्थात् श्रद्धेवर स्वीकारलेले हे सिद्धान्त पुढे आपण स्वतः पडताळून पाहतो, आणि कसोटीला उतरले तरच ते ग्राह्य मानतो. पण ते पडताळून पाहायच्या लायकीचे आहेत ही तरी आपली श्रद्धाच असते की नाही? मग आपण असे म्हणणार काय की सगळ्या विज्ञानाची भिस्त श्रद्धेच्या ठिसूळ पायावर आहे?
मुद्दा असा की ज्या अर्थाने आणि ज्या प्रमाणात विज्ञानात श्रद्धेचे स्थान आहे त्याच अर्थाने आणि त्याच प्रमाणात ते धर्मात आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील थोर थोर संशोधकांसारखेच धार्मिक क्षेत्रातही मोठमोठे संशोधक होऊन गेले. त्यांना ऋषी असे म्हणतात. ऋषी म्हणजे प्रत्यक्ष पाहणारे–अनुभवणारे. श्रद्धा ठेवणारे नव्हेत. आपण शोधून काढलेली रहस्ये इतर अज्ञानी (किंवा ज्ञानेच्छु म्हणा) लोकांना सांगून ती सत्य आहेत किंवा नाहीत याचा पडताळा स्वानुभवाने घ्यावयाला ते त्यांना प्रवृत्त करीत. विज्ञानाच्या नवशिक्या विद्यार्थ्यांची न्यूटन-आइन्स्टाइनवरील तात्पुरती श्रद्धा आणि शिष्याची गुरूवरील श्रद्धा या दोन्ही एकाच प्रकारच्या होत. आणि ही श्रद्धा दोन्ही क्षेत्रांत केवळ तात्पुरत्या स्वरूपाची असून स्वानुभव हाच सत्यासत्यतेचा अंतिम निकष होय हे विज्ञानाप्रमाणेच धर्मही मानतो.
विज्ञानाप्रमाणेच धर्मातदेखील श्रद्धेला स्थान जरी असले तरी ज्याप्रमाणे विज्ञानाचा आधार श्रद्धा होय असे म्हणणे हास्यास्पद होईल, तसेच धर्माचा आधार श्रद्धा होय असे म्हणणेदेखील हास्यास्पद होईल. याचे कारण असे की ज्या श्रद्धेला विज्ञानात किंवा धर्मात स्थान आहे ती श्रद्धा कोणत्याही विधानाच्या सत्यतेबाबतची श्रद्धा नसून एखादे विधान करणा-या एखाद्या निःस्वार्थी आप्ताच्या सत्यनिष्ठेवरील श्रद्धा असते आणि ही श्रद्धा केवळ काही अभ्युपगम (hypotheses) पडताळा पाहण्यासाठी स्वीकारण्यापुरतीच मर्यादित असते. हा मुद्दा आणखी स्पष्ट करायचा झाल्यास असे म्हणता येईल की ही श्रद्धा आप्तवाक्याच्या सत्यतेवरील नसून आप्ताच्या सत्यभाषीपणावरील श्रद्धा असते.
ब्रह्म, आत्मा, ईश्वर वगैरेसंबंधी काही अभ्युपगम (hypotheses) आपल्याला विश्वसनीय वाटणा-या व्यक्तीकडून किंवा ग्रंथांमधून पडताळण्यासाठी तात्पुरते स्वीकारणे आणि ते अभ्युपगम स्वतःच्या प्रचीतीस उतरले तरच त्यांना सत्य म्हणून मान्यता देणे हे धर्माचे आधारतत्त्व आहे, आणि हे तत्त्व शंभर टक्के वैज्ञानिक नाही काय?