[कॅनडामधील एकतच्या जानेवारी १९९९ अंकामध्ये ‘सुधारकाची सात वर्षे’ हा प्राध्यापक प्र. ब. कुलकर्णी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. प्रा. प्र.ब. कुळकर्णी ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे सहसंपादक असून संस्थापक प्रा. दि. य. देशपांडे यांचे पहिल्यापासूनचे सहकारी आहेत. आजचा सुधारक’ मासिक विवेकवाद किंवा बुद्धिवादी विचारसरणी इंग्रजीत “रॅशनॅलिझम” म्हणून ओळखली जाते, जिच्यात व्यक्तिस्वातंत्र्य, समतावादी दृष्टिकोन आहे). प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा लेख, तसेच आजचा सुधारक’ चे काही अंक वाचनात आले. प्रा. प्र. ब. कुळकर्णी कामानिमित्त अमेरिकेत आले असताना त्यांच्याशी या विषयावर चर्चात्मक गप्पा करायची संधी मिळाली. -एकता जुलै १९९९ वरून साभार.]
श्रीराम गोवंडे : तुमचा लेख व ‘आजचा सुधारक’चे काही अंक वाचल्यानंतर एकूण लेखनाचा भर (१) व्यक्तिपूजा-विरोध, (२) श्रद्धा-अंधश्रद्धा निर्मूलन, (३) निरीश्वरवादाचा पुरस्कार आणि (४) विचार-विवेकाला, म्हणजेच बुद्धिवादाला प्राधान्य ह्या विचारधारांवर विशेष आहे, असे मला वाटले. तुम्ही यासंबंधी व एकूण विवेकवादी जीवनपद्धतीबद्दल आणखी काही सांगाल का?
प्रा. कुळकर्णी : तुमची विचारधारांबद्दलची समजूत बरोबर आहे. तुम्ही जर चौथा मुद्दा प्रथम घेतलात, तर त्यातूनच बाकीचे मुद्दे उत्क्रांत होतात हे लक्षात येईल. विवेक हे जर मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारले गेले असेल तर कोणत्याही प्रकारचे व्यक्तिमाहात्म्य (गुरू बाबा, इ.) वर्ज करावे लागते. न्यायदर्शनात श्रद्धेची व्याख्या ‘शास्त्र आणि गुरूच्या वचनावर विश्वास’ अशी करतात. ह्यातील शास्त्र आणि गुरू यांचे स्तोम इतके वाढते की त्यामुळे आमची बुद्धीच बंदिस्त होते. ह्यामुळे विवेकवादाचा श्रद्धेला विरोध असतो. दुसरे असे की परलोक व परमेश्वर ह्यांच्या अस्तित्वासंबंधी कसलेही प्रमाण उपलब्ध नाही. त्यामुळे निरीश्वरवादी विचारधाराच ग्राह्य वाटते. थोडक्यात, विवेकवादी विचारसरणीचे सार असे, की सत्य असेल त्यावर विश्वास ठेवावा आणि इष्ट तेच करावे. यामधून ऐहिक सुखाला प्राधान्य देणारा ‘इहवाद’ निघतो. तसेच व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय, या मूल्यांवर समाजाची रचना व्हावी, असा विचार पुढे येतो.
गोवंडे : शास्त्र म्हणजे विज्ञान आणि गुरू म्हणजे शिक्षक, या अर्थाने त्यांच्यावरील विश्वास व श्रद्धा जीवनात आवश्यक आहेत. मग श्रद्धा आक्षेपार्ह का मानता?
कुळकर्णी : मुद्दा चांगला आहे, पण वरील व्याख्येत शास्त्र व गुरू यांचे वेगळे, विशिष्ट अर्थ अभिप्रेत आहेत. ज्या गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणाने व अनुमानाने कळतात, त्यांसंबंधी गुरुवचनांची व शास्त्रांची गरजच नाही. ‘तर्काच्या कक्षेत न येणा-या गोष्टींसंबंधी, म्हणजे मुख्यतः पारलौकिक गोष्टींबद्दल शास्त्रे जे सांगतात त्यावर विश्वास’ म्हणजे श्रद्धा, असा या न्यायवचनाचा अर्थ आहे. आणि तो विश्वास आम्हाला आक्षेपार्ह आहे.
गोवंडे : तर्काच्या कक्षेतील गोष्टींबद्दलसुद्धा पडताळा घेणे हे सर्वांना आणि सर्वदा शक्य नसते. तसेच ज्ञानाच्या क्षेत्रात इतक्या अनपेक्षित शक्यता असतात की त्यातील काही गृहीत धरून पुढे निरीक्षण, प्रयोग, इत्यादी ज्ञानसाधना करावी, तेव्हाच सत्य हाती येते. या ठिकाणी पुरेसे ज्ञान होईपर्यंत गृहीतावरचा श्रद्धाभाव उपयोगी आहे, असे नाही का वाटत?
कुळकर्णी : इथे थोड़ा खुलासा करायला हवा. जेव्हा स्वतःला ज्ञान मिळवणे शक्य नसते, तेव्हा तज्ज्ञाचे म्हणणे प्रमाण मानावे लागते. यात दोन गोष्टी गृहीत आहेत. एक म्हणजे मुळात त्या व्यक्तीने ते ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान ह्याच साधनांनी मिळवले आहे, आणि दुसरे असे की तत्त्वतः आपणही त्या साधनांचा अवलंब करून त्या ज्ञानाचे प्रत्यंतर घेऊ शकतो. हे ज्ञान-विषय लौकिक आहेत, हे अर्थातच गृहीत धरलेले आहे. ज्या गोष्टींमध्ये गुरुवचन अथवा शास्त्रवचन स्वीकारण्यास आमचा विरोध आहे. दुसरे असे की जे जे सत्य असेल त्याचे ज्ञान म्हणून महत्त्व आहेच आणि त्याचा शोध घेण्याकरता काही गृहीत धरावे लागते, त्याला श्रद्धा म्हणणे चूक आहे. गृहीत आपण तपासत असतो, पोषक पुरावा नसेल तर ते सोडायची आपली तयारी असते. याउलट श्रद्धेत तर्कगम्य नसणा-या, पारलौकिक गोष्टींवर अढळ आणि ठाम विश्वास असतो, प्रतिकूल पुराव्याची तिला पर्वा नसते.
गोवंडे : परलोक व परमात्मा या अगम्य गोष्टी आहेत, तर त्या नाहीतच’ अशी अभावात्मक (नेगटिव्ह) भूमिका विवेकवादी विचारसरणीत घेतलेली दिसते. ते योग्य आहे का? कारण अशी भूमिका ही नेगटिव्ह श्रद्धाच नाही का?
कुळकर्णी : ज्यांच्या अस्तित्वाचे कोणतेही प्रमाण नाही त्या गोष्टी नाकारणे, ह्यात जहाल विवेकवादी धोरणाप्रमाणे श्रद्धेचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याच्या सत्यतेचे प्रमाण आहे तेच स्वीकारणे हा विवेकवाद आहे. जो इंद्रियानुभवाचा विषय नाही, त्याबद्दल अज्ञेयवादी भूमिका घेणे हा एक मवाळ विवेकवादी मार्ग आहे, परंतु तो पलायनवाद आहे, असे जहाल विवेकवादी मानतात.
गोवंडे : ईश्वर मानू नका, गुरू मानू नका, श्रद्धा बाळगू नका, असे आजचा सुधारक, पर्यायाने विवेकवाद, म्हणतो. पण मग काय करू नका’ याबरोबरच सामान्य माणसाने दैनंदिन जीवनात काय करावे’ ह्याबद्दल तुमची विवेकवादी भूमिका काय?
कुळकर्णी : मनुष्याने आपले जीवन जास्तीत जास्त सुखी करावे. स्वार्थासोबत साधेल तेवढा परोपकार करावा. याची मिल (Mill), रसेल (Russell) यांसारखी पाश्चात्त्य आणि आगरकर, र. धों. कर्वे, यांसारखी भारतीय उदाहरणे आहेत. आधुनिक काळातही अंधश्रद्धा-निर्मूलनाचे कार्य करणारे आणि स्वतः त्याप्रमाणे वागणारे समाजसेवक आहेतच की!
गोवंडे : म्हणजे मग याचा अर्थ, सर्वसामान्यांनी विचारवंतांचे अनुकरण करायचे किंवा दुस-या शब्दांत सांगायचे तर त्यांच्यावर विश्वास-श्रद्धा ठेवून वागायचे असेच ना?
कुळकर्णी : ते अपरिहार्य आहे. पण इथे फरक असा, की अशा व्यक्तींच्या विश्वसनीयतेचा आपण अनुभव घेतलेला असतो आणि त्यांची विचारसरणी आपल्याला पटलेली असते. अनुकरण करणे किंवा आदर्श ठेवणे वेगळे आणि श्रद्धा ठेवणे वेगळे. विवेकवाद श्रद्धा आणि विश्वास यांत फरक करतो. श्रद्धेचे विषय आधी म्हटल्याप्रमाणे पारलौकिक असतात. अनुभव आणि तर्क यांच्या पलीकडचे असतात. ही गोष्ट आम्ही अधोरेखित (underline) करतो. जीवनात अनेक गोष्टींचा अनुभव घेणे किंवा स्वतः सर्व ज्ञान मिळवणे आपल्याला शक्य नसते. अशा वेळी तज्ज्ञ आणि सज्जन यांच्यावर आपण जो विश्वास ठेवतो, तो मात्र विवेकवादाला बाधक नाही. ही श्रद्धा नाही. तज्ज्ञाचा मार्ग वैज्ञानिक पद्धतीला धरून असतो आणि सज्जनाचा सल्लादेखील आपण या ना त्या प्रकारे पारखून घेतलेला असतो.
गोवंडे : ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, अशा संतांना तुमच्या व्याख्येप्रमाणे कमीतकमी सज्जन तरी नक्कीच म्हणता येईल. त्यांचे जीवन बघता त्यांची शिकवण व आचरण लोककल्याणार्थच होते असे दिसते. मग त्यांच्या विरुद्ध आपला आक्षेप का?
कुळकर्णी : आमचा आक्षेप भक्तिमार्गाला आणि श्रद्धेला आहे; कारण हा मार्ग बन्याचदा धोक्याचा ठरतो. समाजसुधारणा धर्मसुधारणेच्या मार्गाने नको यासंबंधीची एक भूमिका अशी की धर्म हा श्रद्धेचा व शब्दप्रामाण्याचा अवलंब करीत असल्याने त्यापायी मनुष्य बुद्धी गहाण टाकतो. तो नको त्या गोष्टी करायची शक्यता असते. याचे उदाहरण म्हणजे झालेली व आजही होणारी धर्मयुद्धे आणि धार्मिक संघर्षातून होणारी हानी. शिवाय अठरा पुराणांचे सार तरी हेच आहे की परपीडा पापकारक आणि परोपकार पुण्यकारक. हे आपल्या बुद्धीला दिसत असता पुराणांचा आणि धर्माचा आधार घ्या कशाला?
गोवंडे : याच अनुषंगाने आणखी एक विचार मांडायचा आहे, तो म्हणजे ‘गणेशोत्सव’, ‘सत्यनारायण पूजा’ इत्यादी विवेकवादी विचारसरणीला मान्य नाहीत. परंतु असे नाही का आपल्याला वाटत की या निमित्ताने आपला समाज एकत्र येतो, श्रद्धेच्या झेंड्याखाली का होईना, पण संघटित होतो? विशेषतः आमच्यासारख्या अनिवासी भारतीयांना देशाबाहेर राहून भारतीय, हिंदु संस्कृती जतन करण्यासाठी तर हा एक ‘हमखास’ मार्ग आहे. तसेच लोकांमध्ये “sense of belonging” वाढीस लागायला याची नक्कीच मदत होते. यावर विवेकवादी दृष्टिकोनातून आपले विचार काय?
कुळकर्णी : बरोबर आहे. आपले उद्दिष्ट जर समाजसुधारणा हे असेल तर कोणत्याही निमित्ताने एकत्र येणा-या समाजात उपस्थित राहून समाजसुधारणेचे विचार प्रकट करणे योग्य ठरेल. शिवाय धार्मिक प्रसंगी उपस्थित राहणारी प्रत्येक व्यक्ती धार्मिक असतेच असे नाही. उदाहरणार्थ विवेकवादाचे पुरस्कर्ते गोपाळ गणेश आगरकर हे कीर्तनाला जात असत. आपल्या एकत्वाची, मुळ एक असण्याची भावना (sense of belonging) यासंबंधी बोलायचे म्हणजे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन हे समारंभ लोकांना एकत्र आणण्यासाठी जोपर्यंत पाहिजे तेवढे दृढमूल झालेले नाहीत, तोपर्यंत वरील प्रसंगांनी एकत्र येऊन ही एकत्वाची भावना वाढीला लावणे याला पर्याय नाही
गोवंडे : ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास ह्यांनी समाज-सुधारणेचा मार्ग अवलंबला तो तत्कालीन समाजाच्या विचारशक्तीची जडण-घडण आणि माणसाच्या बुद्धीच्या मर्यादा लक्षात घेऊन, असे वाटते. सर्वसामान्य माणसाला ‘तर्ककठोर विवेकवाद’ समजेल का? आणि मग सुधारणेचा विचार सर्वांना स्वीकरणीय होईल अशा रीतीने सांगता येईल का?
कुळकर्णी : इहलोकीच्या सुखाची शाश्वती आणि सुख-दुःखाबाबतची मानवाची समान प्रतिक्रिया लक्षात घेता हा विवेकवाद कोणाही सामान्यबुद्धीच्या व्यक्तीला समजण्यासारखा आहे. स्वतःसारखे इतरांना समजून वागा, प्रमाणाशिवाय काही सत्य मानू नका, ऐंद्रिय अनुभव व त्यावर आधारित तर्क हेच प्रमाण माना, एवढा साधा विवेकवाद आहे.
गोवंडे : प्रत्येकाच्या आयुष्यात नैराश्याचे, हतबल होण्याचे प्रसंग येतात. अशा वेळी मानसोपचारतज्ज्ञाकडे धाव घेतली जाईल. म्हणून प्रश्न असा, की कोणता मार्ग जास्त सोपा व स्वीकरणीय? परमेश्वराचा, की मानसोपचाराचा?
कुळकर्णी : प्रत्येकाच्या आयुष्यात हतबल होण्याचे प्रसंग येतात, हे खरे. अशा वेळी ईश्वराचा खोटा आधार घ्यायच्या ऐवजी विचारीपणाने त्या प्रसंगाला सामोरे जायचे; तशीच जरूर पडली तर मानसोपचारांची मदत घेऊन मनाला तयार करायचे, हाच मार्ग योग्य वाटतो. नीतीने वागणा-याला दुःख आणि अनीतीने वागणा-याला सुख असे जेव्हा दिसून येते, तेव्हा ईश्वराचा आधार किती खोटा आहे हे विचारी माणसाच्या लक्षात यायला वेळ लागू नये.
गोवंडे : आज आपल्याशी गप्पा करायला आवडले. या गप्पांच्या अनुषंगाने ऐकायला मिळालेले आपले विचार डोक्याला खाद्य देणारे आणि मनाला अंतर्मुख करून स्वतःच्या मतांना पुन्हा तपासून पाहायला लावणारे असे वाटले. आभार!