राष्ट्रीयतेचा प्रश्न

‘राष्ट्र’ या संकल्पनेचा उगम ‘मातृभूमी व तिजबाबतचे ममत्व यांपासून झालेला असावा. कारण, असे ममत्व जगभरात प्रत्येकासच आपापल्या मातृभूमी’बाबत वाटत असल्याचे दिसते. मायभूमीसाठी जीव ओवाळून टाकणारे असामान्य लोक तर जगात असतातच. पण, वंश-धर्म-भाषाभेद मानणारा व आयुष्यभर परदेशी राहिलेला सामान्यांतला सामान्य माणूस देखील ‘मातृभूमी’चे एकदा तरी दर्शन घडावे म्हणून तडफडत असतो आणि किमान अंत्यविधी तरी ‘मायभूमीतच व्हावा असा ध्यास धरतो. तसेच राष्ट्र-प्रांत-धर्म इत्यादी भिंतींना झुगारणारे बुद्धिप्रामाण्यवादीदेखील तसाच ध्यास धरतात आणि त्यामुळे त्यांनी सकृद्दर्शनी नाकारलेले ‘मायभूमी’बाबतचे ममत्व प्रकट होतेच. म्हणजेच, पूर्वीच्या टोळी’ किंवा ‘राज्य’ या संकल्पनांच्या कक्षा रुंदावत जाऊन आता राष्ट्र ही संकल्पना साकारली आहे.
एकंदरीत, जन्मस्थान व संगोपन-संस्कार स्थानाशी निगडित असलेल्या जेवढ्या भूभागातील लोकांबद्दल ममत्व (आपुलकी) इतर भूभागातील लोकांपेक्षा अधिक वाटू लागते व इतर भूभागातील लोक परके वाटू लागतात – त्यांच्यासमोर जेवढ्या भूभागातील जनतेचे आपसातील भेदभाव गळून पडतात . . . . तेवढा भूभाग हा ‘राष्ट्र’ म्हणून साकारतो.
‘मातृभूमी’ बाबतच्या ममत्वातून ‘राष्ट्रीयता’ साकारते हे मान्य करण्यासाठी जन्मभूमीबाबत अपवादात्मक व वैचित्र्य असलेल्या नमुन्यांस तपासून घेणे गरजेचे आहे. उदा.
१. ज्या भारतीय व्यक्तींचा जन्म फाळणीपूर्वी कराची-लाहोर वगैरे सध्याच्या पाकिस्तानातील भागात झाला असेल त्यांच्यात राष्ट्रीयते’बाबत काय भावना असेल? – तर याबाबत असे दिसून येईल की त्या व्यक्तींची पाकिस्तान ही जन्मभूमी असली तरी त्यांची ‘मातृभूमी’ ते ‘अखंड भारत’ मानतात कारण त्यांच्या जन्मवेळी व संगोपनकाळी भारत अखंड होता. त्यांच्या ‘मातृभूमीचे’ पूर्वीचे स्वरूपच त्यांना हवेहवेसे वाटते. किमान आपले जन्मस्थान’ तरी भारताने जोडून घ्यावे अशी इच्छा ते मनात बाळगतात. आणि आपले जन्मस्थान शत्रूने-म्हणजे पाकिस्तानने बळकावले आहे असे ते मानून पाकिस्तानचा द्वेष करतात. नाइलाजास्तव, जरी त्यांना जन्मस्थान सोडून भारतात राहावे लागत असले तरीही मातृभूमी म्हणून ते भारतासच मानतात. उदा. ट्रॉटस्की हा जन्माने व संस्कारानी जॉर्जियन होता. तो ‘रशिया’चा राष्ट्राभिमानी व क्रांतीसाठी लढणारा होता. पण त्यानेच क्रांतीनंतर आग्रहपूर्वक जॉर्जिया स्वतंत्र न ठेवता रशियात विलीन केला. कारण तसाच ‘विशाल रशिया’ त्याने ‘मातृभूमी’ मानली होती.
२. इस्राएल या देशाची निर्मिती झाली तेव्हा येथे कोणीच नागरिक नव्हते. निर्मितीनंतर जगभरातून ज्यू तेथे गेले व नागरिक बनले. मग त्यांच्या ‘मातृभूमीच्या’ व ‘राष्ट्रप्रेमा’बाबत काय भावना असतील? इस्राएलच्या नागरिकांचे राष्ट्रप्रेम हे जगजाहीर आहे. तेव्हाच्या नागरिकांना अपरिहार्यपणे त्या भूमीस जन्मभूमी नसून ‘राष्ट्र’ म्हणून स्वीकारावे लागले होते. भारताशिवाय जगात जेथे जेथे त्यांची जन्मभूमी होती तेथे त्यांना द्वेष व छळ सहन करावा लागला. एखाद्यास दुष्ट आई मिळाल्यास जे घडेल तसे घडले. पण तरीही त्यांना त्यांच्या मूळ जन्मभूमीबाबत आकर्षण राहिलेच होते. ‘ममत्व मात्र नव्हते, ते इस्राएलबाबत होते.
३. इंग्लंडमध्ये व आफ्रिकेत कित्येक वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या भारतीयांचे मरेपर्यंत भारतावरच प्रेम राहिलेले आढळते. त्यांच्या नवीन नागरिकत्व पत्करलेल्या देशांशी खेळांच्या स्पर्धेत भारताचा विजय झाल्यास ते आनंदोत्सव साजरा करतात. तथापि त्यांची तेथेच जन्मलेली मुले-नातवंडे मात्र तसे करत नाहीत. उलट आज भारतीय वंशाचे तेथील खेळाडू खेळात भारतास नामोहरम करण्यात कसा आनंद लुटतात ते आपण पाहतोच.
४. नीरद चौधरी यांच्यासारखे अत्यंत विरळ आणि विक्षिप्त मानले गेलेले उदाहरणही पाहिले पाहिजे. भारतात जन्मून व संगोपन होऊनही ते भारतद्वेष्टे व इंग्लडप्रेमी कसे होऊ शकले? याबाबतही पुन्हा ज्यूंशी तुलना करता येईल. तसेच, चौधरींचे ‘इंग्लंड’ या ‘दुस-या आई’ वरचे प्रेम हे ‘आई’ म्हणून होते की ‘सुंदरसुस्वभावी स्त्री’ म्हणून होते हे समजणे कठीण! आणि समजा, ते ‘आई’ म्हणूनच प्रेम मानले तरी त्यांची ‘खया आईच्या वात्सल्याची तृष्णा शमली की नाही हे ही कळणे कठीण!! पुन्हा जगाने त्यांना विक्षिप्त ठरवले म्हणजेच जग ‘मातृभूमी वरील प्रेम’च स्वाभाविक मानते हे निश्चित!!
५. अत्यंत परक्या देशात स्थायिक होऊन तेथील जनतेची सेवा करण्यात एकरूप होण्याच्या व्यक्तींची या संदर्भात काय भावना असेल?…. या व्यक्ती मूलतः राष्ट्राच्या भिंतीच मानत नसतात. या व्यक्ती धर्म-प्रांत-राष्ट्र इत्यादी पलीकडे जाऊन शुद्ध मानवतावादावर निष्ठा ठेवतात. आणि त्यांचे एकरूप होणे व सेवा करणे हे पीडित-शोषितांशी निगडित असते …. राष्ट्राशी नव्हे. म्हणजेच त्या व्यक्तीदेखील त्या परक्या राष्ट्राबाबत ममत्व बाळगत नाहीत.
म्हणजेच, जे राष्ट्राच्या भिंती झुगारून मानवतावाद मानतात किंवा ज्यांना जन्मभूमीतील लोकांनीच लाथाडल्यामुळे इतरत्र जावे लागले अशी काही तुरळकअपवादात्मक उदाहरणे वगळता इतरांना सरसकट ‘मातृभूमी’बाबत ‘ममत्व’ असतेज्याला व्यापक स्वरूपात आपण ‘राष्ट्रप्रेम’ म्हणतो. थोडक्यात, ‘राष्ट्र’ ह्या संकल्पनेचा पाया व मूळ ‘मातृभूमी’बाबतच्या ममत्वात आहे.
तथापि स्वतः, कुटुंब, घराणे, जात, धर्म, वंश तसेच भाषा, प्रांत राष्ट्र ह्या बाबी माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणा-या आहेत आणि ह्या बाबींवर विसंबून जगू पाहणारी माणसे, ही तितक्या बाबतींत आपापले जीवन संकुचित करत जातात असे बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे प्रतिपादन आहे, जे सुयोग्य आहे. माणसा माणसांमध्ये दरी निर्माण करणारी कोणतीही बाब त्याज्य मानावी हा विचार निश्चितपणे प्रागतिक आणि मनुष्यजातीस एकमेकांच्या जवळ आणणारा आहे. मानवतावादाच्या आड येणारी कोणतीही भिंत म्हणजेच, घराणेवाद, जातीयवादापासून राष्ट्रवादापर्यंतची कोणताही वाद ओलांडता येणे …. किंबहुना अशी भिंत उद्ध्वस्त करणे हे खरे माणूसपणाचे लक्षण आहे हे देखील पूर्णतः मान्य करण्यासारखे आहे. काही काळानंतर व्यक्ती, कुटुंब, घराणे, जात, धर्म, वंश, प्रांत राष्ट्र, खंड इ. पलीकडे जाऊन सबंध जगातील मनुष्यजात एक व्हावी किंवा त्यांच्यातील सर्वप्रकारचे भेदभाव नष्ट व्हावे हे बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे (वस्तुतः सर्व मानवांचे) आदर्श स्वरूप ठरावे.
तथापि, अशी काल्पनिक स्थिती अथवा बुद्धिप्रामाण्यवाद्यांची आदर्श मानलेली स्थिती ही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. जातीयवादापासून राष्ट्रवादापर्यंत प्रत्येक बाब संकुचित मनोवृत्तीची आहे – माणुसकीचा भेद करणारी आहे हे मान्य केले तरी त्या बाबी आज जगात ठामपणे अस्तित्वात आहेत हे मात्र प्रखर वास्तव आहे. त्यामुळे, अशा वास्तवातल्या स्थितीत सतत निर्माण होणा-या समस्यांवर बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी काय करावे हा खरा प्रश्न आहे.
कोणत्याही सतत भेडसावणा-या समस्यांवर दोन प्रकारे उपाय उपलब्ध असतात. एक म्हणजे कायमस्वरूपी उपाय आणि दुसरा तात्पुरता. धार्मिक बंधनांचे मूळ हे ‘धर्मसंस्थापक’, ‘धर्मग्रंथ’ किंवा ‘उपासना’ यांच्यावरील श्रद्धेत आहे. त्यामुळे धार्मिक बंधनातून निर्माण होणा-या समस्यांच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी धर्मसंस्थापक’, ‘धर्मग्रंथ’ व उपासना यांच्यावरील श्रद्धेचे उच्चाटन हे कायमस्वरूपी उत्तर आहे.
भाषिक प्रांतरचना काही कारणास्तव अपरिहार्य झाल्यास मात्र तेथील समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शक्य नाही. अशा परिस्थितीत तात्पुरत्या उपायासाठी स्थानिक भाषेचे वर्चस्व नाकारल्यास भाषिक प्रांतरचनाच उद्ध्वस्त होते. धर्मसंस्थापक, धर्मग्रंथ किंवा उपासनांवरील श्रद्धा नाकारल्यास ‘धर्म’च नाकारला जातो . … मग, ते नाकारून धर्मांतर्गत सुधारणा होऊच शकत नाही. म्हणून, धर्मांतर्गत सुधारणा करायची झाल्यास धर्माचे ‘मूळ’, म्हणजे, संस्थापक किंवा ग्रंथ किंवा उपासना यांच्यावरील श्रद्धा स्वीकारून इतर बाबतींत बदल करणे गरजेचे ठरते. थोडक्यात, एखादे वर्तुळ आहे असे मानल्यास त्याचा केंद्रबिंदू असल्याचे मान्य करावे लागते. तो केंद्रबिंदू नाकारल्यास ‘ते’ वर्तुळच राहत नाही. म्हणून, वर्तुळांतर्गत बदल घडवायचे झाल्यास केंद्रबिंदूस धक्का न पोहोचवता ते करणे अपरिहार्य होते.
राष्ट्राबाबतचे ममत्व ही एक संकुचित भावना आहे व ती माणुसकीस छेद देते म्हणून अशा भावनेचे अच्चाटन हे आदर्श माणुसकीचे लक्षण ठरेल हे मान्यच आहे. परंतु इतर सर्वच जग जेव्हा राष्ट्रवाद कवटाळून स्वराष्ट्रीयांखेरीज इतरांना परके मानतात- त्यांना लुबाडू पाहतात – त्यांवर आक्रमण करू पाहतात … तेव्हा राष्ट्रवाद हा ‘आपद्धर्म’ म्हणून स्वीकारणे प्रत्येकास, अगदी बुद्धिप्रामाण्यवाद्यांसाठी अनिवार्य ठरते.
‘आपद्धर्म’ म्हणून का होईना? पण ‘राष्ट्रवाद’ मानणे अनिवार्य आहे असे म्हटल्यावर राष्ट्रवादाचे मूळ-पाया-म्हणजे ‘मातृभूमी-संगोपनभूमी-संस्कारभूमी’ ह्यांनाच राष्ट्रीयत्वाचा निकष मानणे हे क्रमप्राप्त ठरते. कारण ‘राष्ट्रवादा’च्या वर्तुळाचा तो केंद्रबिंदू आहे. मग राष्ट्रांतर्गत सुधारणा राष्ट्रीयतेबाबत खुलेपणा आणायचा झाल्यास राष्ट्रीयतेचे मूळ कायम ठेवूनच त्या आणणे अपरिहार्य आहे. कारण राष्ट्रीयतेचे मूळ बदलल्यास अथवा नष्ट केल्यास ‘राष्ट्र’ ही संकल्पनाच उद्ध्वस्त होईल. ‘राष्ट्र’ ही संकल्पना मानावी पण राष्ट्रीयत्वासाठी ‘मातृभूमी-संगोपनभूमी’ हे निकष लावू नयेत असे जर प्रतिपादन केले तर ते आत्मविसंगतिपूर्ण असेल.
तथापि, अशी ‘मातृभूमी नसलेल्या स्थायिकांना राष्ट्रीयत्व देऊ नये असे म्हणणे म्हणजे राष्ट्रा-राष्ट्रांतील परकेपणाची भावना तशीच कायम ठेवणे. म्हणून सर्वच राष्ट्रांनी स्थायिक झालेल्यांना नागरिकत्व देणे गरजेचे आहे. परंतु असे नागरिकत्व देताना अशा नागरिकांना स्वतःच्या मातृभूमी’ बाबत ममत्व राहणारच आहे हे ध्यानात ठेवावे. व या बाबीमुळे उद्भवू शकणारे अनेकविध, गुंतागुतीचे धोके व दूरगामी परिणाम लक्षात ठेवून जोपर्यंत ‘राष्ट्र’ ही संकल्पना तग धरून आहे तोपर्यंत त्यांच्या ‘परक्या’ मातृभूमीबाबतच्या ममत्वामुळे नवीन नागरिकत्व पत्करलेल्या राष्ट्रावरील प्रेमाची घनता इतर नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाइतकी असेलच याबाबत खात्री देता येत नाही. म्हणून, त्यांच्या नागरिकत्वाचा दर्जा इतर नागरिकांपेक्षा निम्न ठेवावा लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.