पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
जून महिन्याच्या अंकातील श्री. किर्लोस्कर, श्री. पांढरे यांचे पत्र आणि संपादकीय मला खूप आवडले. श्री. किर्लोस्करांचा लेख चांगला आहे असे म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे होय. त्यांचे भारतीय संस्कृती आणि बुद्धिवाद आणि चार्वाक ही नाटके माझ्या संग्रही आहेत.
परंतु त्यांनी मूर्तिभंजक होण्यास सांगितले आहे ते मात्र तितकेसे पटत नाही. याबाबत लो. टिळकांची गोष्ट सांगतो. लोकमान्य टिळकांकडे एकदा शिवराम महादेव परांजपे गेले आणि त्यांना म्हणाले की, “तुम्ही सशस्त्र लढ्याची घोषणा का करीत नाही?” त्यावर टिळक म्हणाले, “तू मला ५०० माणसे अशी आणून दे, की जी मरावयास तयार आहेत.” बहुदा श्री. किर्लोस्करांना ही गोष्ट माहीत असेल.
तुमच्या संपादकीयाबद्दल मला जास्त माहिती वाचकांसाठी द्यावयाची आहे. मरहूम मौलाना अबुल कलाम आझाद यांची आई अरबी वंशाची होती आणि त्यांचा जन्म मक्केला झाला होता. त्यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ ही अत्युच्च पदवी दिली होती.
जगात ठिकठिकाणी जे भारतीय श्रेष्ठ पदांवर आहेत; त्यांची नावे अशी आहेत- १) वासुदेव पांडे – त्रिनिनादचे पंतप्रधान. २) महेंद्र चौधरी – फिजीचे पंतप्रधान. ३) देवेन् नायर – सिंगापूरचे राष्ट्रपती. ४) राजरत्नम् – मलेशिआचे परराष्ट्रमंत्री आहेत.
ब-याच वेळा घराणेशाहीबद्दल बोलले जाते. परंतु त्यावेळी असे लक्षात घेतले जात नाही की, कोणतीही व्यक्ती ज्या परिस्थितीत किंवा वातावरणात वाढते त्याचेच संस्कार त्या व्यक्तीवर होतात. वास्तविक शिवाजीच्या नातवाला तलवार कशी धरावी हे सुद्धा माहिती नव्हते. तसेच भोसले घराण्यात अनेकजण दत्तकपुत्र आहेत तरीसुद्धा आजही भोसले घराण्यातील व्यक्तीला मान दिला जातो. इतकेच नव्हे तर शिवाजीचे मूल्यमापन करणा-या पंढरीनाथ रानड्यांना विद्यापीठाच्या इतिहासाच्या. प्रमुख-पदावरून काढून टाकण्यात येते. ३०० वर्षांनंतर शिवाजीच्याच नावाने मते मागितली जातात ही व्यक्तिपूजा नव्हे काय?
मला विदर्भातील फारशी माहिती नाही. परंतु काकासाहेब खाडिलकरांची पणती, टिळकांचा पणतू, काकासाहेब गाडगीळांचा नातू, विखे पाटलांचा नातू, पवारांचा पुतण्या, प्रबोधनकार ठाक-यांचे नातू इ.ना. मान दिला जातोच ना! मग तो नेहरू घराण्यातील व्यक्तीला का द्यावयाचा नाही? ती जर कर्तबगार नसेल तर आपसूकच फेकली जाईल. राजकारण म्हणजे एखादी पेढी अथवा फार्म नव्हे. त्यात कर्तबगारी सिद्धच करावी लागते.
अनेक उद्योजकांचे वंशज त्यांचा धंदा चालवितात. वैद्यक किंवा वकिली हा व्यवसाय करणारीसुद्धा अनेक घराणी आहेत. त्यात काय चूक आहे?
परदेशी व्यक्ती येथील गुप्त माहिती परदेशात देतील असे म्हणणे तर एकदम चूक आहे. आजपर्यंत हेरगिरी करण्याबद्दल जे लोक दोषी ठरविले, त्यांमध्ये – ८०% लोक अस्सल हिंदू होते. तसेच पैशांचे गैरव्यवहार झाले, ते करणारेसुद्धा हिंदूच आहेत. चोरट्या व्यापारात मात्र हिंदू-मुस्लिम समसमान आहेत.
शिवाजीबद्दल लोकांना फार आकर्षण आहे. परंतु त्याचे सरदारसुद्धा मुस्लिमांना मिळाले होते.
खरी गोम अशी आहे की, नेहरू घराण्यातील व्यक्ती आली तर तिचा कल समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ह्याकडे राहील ही भीती या लोकांच्या मनात असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका तरी नेत्याने पं. नेहरूचे वाङ्मय विशेषतः Society & Science ह्या मासिकातील लेख वाचले आहेत का? ते जर वाचले तर पं. नेहरूंच्या बुद्धिमत्तेची झेप त्यांना कळून येईल.
बॅ.आंबेडकरांचे अर्थविषयक लेख आणि डॉ. गोपाळ राणे यांचे नववसाहतवाद हे पुस्तक वाचून जर ‘स्वदेशी जागरण मंच’ कार्य करणार असेल तर आमचा पाठिंबाच आहे. परंतु आज असे दिसते की, मुंबईत ७५० कोटी खर्च करून उड्डाणपूल बांधतात. आणि खेडेगावात रस्तेसुद्धा नाहीत. मुंबईला अनेक हॉटेल्समध्ये पोहण्याचे तलाव आहेत. आणि खेडेगावांतील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणीही नाही.
सध्याची चंगळवादी संस्कृती ज्यांना बदलावयास नको आहे, तेच लोक नेहरूंच्या घराणेशाहीला विरोध करीत आहेत.
– केशवराव जोशी
तत्त्वबोध, चेकनाका हायवे,
नेरळ ४१०१०१

संपादक, आजचा सुधारक, यांस
श्री. ढाकुलकरांच्या लेखात खूप तळमळ व झालेल्या अन्यायाबद्दल चीड आहे हे मला समजते. (एप्रिल, जुलै ९९). तरी पण त्यांना काय म्हणावयाचे आहे त्याचा पूर्णपणे मला बोध होत नाही म्हणून हे पत्र.
चातुर्वर्ण्य-पद्धतीबद्दल ब्राह्मणांना दोष, संतांचा वारकरी पंथ व त्याची थोरवी, म. फुले व आंबेडकर यांचे कार्य याविषयीचे त्यांचे मुद्दे मला मान्य आहेत.
लेखातील पुढील वाक्यांचा संदर्भ लागत नाही.
अ) बाळासाहेब ठाकरे यांचे बोलणे व ब्राह्मणवाद यांचा काय संबंध?
ब) “आजच्या ‘सुसंस्कृत झालेल्या स्त्रिया ‘सु’इंग्रजी झालेल्या स्त्रियांच्या मेळाव्यात पौरोहित्य (इ. इ.) करू लागल्या आहेत” ह्या विधानाचा संदर्भ काय? ह्या वाक्यात उपहास आहे हे कळते. परंतु तो उपहास का?
श्री. ढाकुलकर म्हणतात, पौरोहित्य करणा-या वर्गात आ. सु. चा वाचकवर्ग आहे. तो असेलही. ह्या स्त्रियांनी पौरोहित्य करणे केवळ आ. सु. वाचून थांबवावे किंवा एरवीही करू नये असे ढाकुलकरांना म्हणावयाचे आहे काय?
स्त्रियांनी पौरोहित्य करणे हा स्त्रीमुक्तीचा एक टप्पा आहे असे मी मानते. आज एके काळी शुद्रच मानल्या गेलेल्या स्त्रिया पौरोहित्य करू लागल्या तर इतर जातींनीही ते का करू नये? निदान स्वतःच्या, आपआपल्या जातीत तरी?
आज वेद, संस्कृत वगैरे वाचायला व त्यांचा अभ्यास करायला सर्वांनाच परवानगी आहे. श्री. ढाकुलकरांचा पौरोहित्य, भजनकीर्तन यांना विरोध आहे की त्याचा मक्ता ब्राह्मणांनी घेतलेला होता याला विरोध आहे?
पंडे, बडवे इ. भाविकांच्या भावनेचा छळ करतात” अशी ढाकुलकरांची तक्रार आहे. पण मग त्या छळाला भविकांनी बळी पडण्याची चूक करू नये. पंडे, बडवे
आपले पोट भरण्यासाठी जन्मभर जे करीत आले ते करणारच.
ह्या जगात आजवर कुणीही आपल्या हातातली सत्ता स्वतःहून सोडलेली नाही. परंपरेची मानसिक व्यसने, लाचार आदत ही दारूसारखी आहेत. दारू पिणारयाला स्वतःलाच ती प्रयत्न करून सोडावी लागते.
मनुस्मृती, पुराणे वगैरे ब्राह्मणांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली व विषमता रूढ केली. त्याला आजचे ब्राह्मण जबाबदार नाहीत. तरी पण आजचा ब्राह्मणवर्ग व इतर उच्चवर्णीय मानल्या गेलेल्या जमाती पूर्वजांनी केलेल्या अन्यायाची सामुदायिक किंमत मोजतच आहेत.
अप्रगतांसाठी कॉलेजातील राखीव जागा, शिष्यवृत्या, राखीव नोक-या ही एक प्रकारची सामुदायिकरीत्या मोजलेली किंमतच आहे. (समानता निर्माण करण्यासाठी, समाजहितासाठी ती किंमत मोजणे आवश्यकही आहे.)
ब्राह्मण चातुर्वर्ण्यपद्धतीचे शिल्पकार होते म्हणून त्यांच्या नशिबी जास्त दोष येतो हे खरे आहे. पण ही विषमता अगदी अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींतही होती हे लक्षात घेतले पाहिजे. उच्चनीचतेचा खेळ अगदी सर्वांत कनिष्ठ मानली गेलेली जात सोडून सगळेच खेळत होते. (अगदी तळागाळात होत्या कनिष्ठ जातीच्या स्त्रिया.)
अगदी प्रगत ब्राह्मणेतर माणसांत अजूनही मला एक प्रकारचा न्यूनगंड दिसून येतो. (ब्राह्मणाच्या मुलीशी ब्राह्मणेतराने लग्न केले तर “चांगली ब्राह्मणाची पटकावली म्हणतात.” ते का?)
“ब्राह्मणेतर जमातींनी स्वतःच्या मनातला न्यूनगंड काढून स्वतःला ब्राह्मणांच्या समान मानणे” ही चातुर्वण्र्याचे व जातींचे मानेवरचे जू फेकून देण्याची पहिली महत्त्वाची पायरी आहे.
( स्त्रीपुरुष, काळेगोरे ह्यांच्या बाबतीत हाच नियम लागू पडतो.)
अगदी पत्नी ब्राह्मण असेल व नव-याच्या मनात स्वतःच्या जातीचा न्यूनगंड असेल तर मुलांच्यामध्ये तो उतरतोच. न्यूनगंडाबरोबर राग, द्वेष वगैरे हानिकारक भावना येतात. अमेरिकेतील आधुनिक पिढी ह्या भावनांना “निगेटिव्ह एनर्जी” म्हणते. अशा जळफळाटाने काही निष्पन्न होत नाही.
आ. सु. चा वाचकवर्ग प्रामुख्याने ब्राह्मण असला तर काय बिघडले? जेवढे ब्राह्मण विवेकवादी असतील तेवढे उत्तमच आहे. ब्राह्मण नसलेल्या वाचकलेखकांची संख्या वाढवण्याची जरुरी आहे. (हा लेखकवाचकवर्ग ब्राह्मण आहे हे कुणी कसे ठरवले हे मात्र मला कळत नाही.)
श्री. रिसबूड यांच्या पत्रात “पूर्वजांनी पापे केली त्याचे प्रायश्चित म्हणून रु आजच्या ब्राह्मणसमाजाने मागे मागे राहावे अशी कुणाची अपेक्षा असल्यास ती पुरी करण्याची. . . . .” वगैरे लिहिले आहे. हे विधान त्यांनी श्री. ढाकुलकर यांच्या कोठल्या मुद्द्यांमुळे केले ते मला समजले नाही. तरी पण येवढेच लिहिते की ब्राह्मणवर्ग मागे पडण्यात ब्राह्मणवर्गाचे, देशाचे, समाजाचे किंवा अब्राह्मणांचेही हित नाही. समाजाचे ध्येय सर्वांना आपली उन्नती करून घेण्याची संधी मिळावी, पुरेसे अन्न, निवारा व कपडे घेण्याइतपत तरी पैसे मिळावेत हे आहे (किंवा असावे).
युगांडातल्या भारतीयांना ढकलून देशाबाहेर काढल्यावर आता त्यांना आमिषे दाखवून परत बोलावण्याचे प्रयत्न चालले आहेत. समाजातला शिक्षित, व्यापारी वर्ग नाहीसा केला तर समाजाचा कसा सत्यानाश होतो त्याचे हे उदाहरण आहे.
श्री. ढाकुलकरांनी पुढील मुद्द्यांचाही खुलासा करावा ही विनंती :
१) विद्रोही लेख म्हणजे कसा?
२) ब्राह्मण्यवाद व ब्राह्मण यांच्या व्याख्याही लिहाव्यात.
स्फुट लेख (ऑ. ९९) मध्ये “हिंदू कोणाला म्हणावयाचे?” हा प्रश्न भारताचे कायदे किंवा जातीची पद्धत यांच्याशी निगडित ठेवण्याची काय जरुरी आहे?
जे स्वतःला हिंदू मानतात ते हिंदू” हे समीकरण चुकीचे आहे काय?
परदेशातील हिंदूंना कोठली जात स्वीकारणार?” हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही.
परस्परविरोधी (धार्मिक) विचारसरणीचे लोक स्वतःला हिंदू म्हणवतात हे खरे आहे. पण तसेच परस्परविरोधी विचारांचे इतर धर्मीय पण आहेत. एकमेकांना एका काळी जाळणारे कॅथलिक व प्रॉटेस्टंटस् स्वतःला ख्रिस्ती म्हणवितात. शिया व सुन्नी यांचे संघर्ष चालू असताना ते स्वतःला मुसलमान म्हणवितात.
जगात वेगवेगळ्या धर्मीयांची संख्या मोजली जाते तेव्हा “विवेकवादी” ही संज्ञा अजून तरी मी वाचलेली नाही. धर्माशी निगडित असे राजकीय व सामाजिक महत्त्वाचे निर्णय घेण्याची पद्धत अजूनही प्रचलित आहे. परिणामी हिंदूंची संख्या कमी झाल्यास त्यांचे नुकसान होईल. हा एक मुद्दा सोडल्यास हिंदूच्या संख्येचे मलाही महत्त्व वाटत नाही.
ललिता गंभीर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.