स्त्रीपुरुषतुलना – ले. ताराबाई शिंदे (१८५० – १९१०)

स्त्रीपुरुषतुलना हे ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली लिहिलेले पुस्तक श्री शिवाजी छापखाना, पुणे येथून प्रसिद्ध झाले. श्री. विलास खोले यांनी त्या पुस्तकाची नवीन आवृत्ती संपादित केली आहे. मूळ संहिता उपलब्ध असताना पुन्हा हे पुस्तक संपादन करण्याचे प्रयोजन सांगताना संपादक म्हणतात, “पूर्वाभ्यासातील उणिवा दूर करणे, नवीन माहितीचा शोध घेणे आणि साहित्यकृतीचा नवा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणे या तीन उद्देशांनी मी प्रस्तुत संपादनास प्रवृत्त झालो’ (पृ. ९).

माझे प्रतिपादन संपादकांची प्रस्तावना तसेच मूळ संहिता या दोहोंवर बेतलेले आहे. सर्वच पृष्ठ क्रमांक, जे वेळोवेळी दिलेले आहेत, ते संपादित पुस्तकाचे आहेत.

ताराबाई शिंदे यांचा कालखंड १८५० ते १९१०. जन्म प्रतिष्ठित, सांपत्तिक स्थिती उत्तम असलेल्या जमीनदार मराठा कुटुंबात झाला होता. बापूजी हरी शिंदे-डेप्युटी कमिशनरच्या कार्यालयात हेडक्लार्कच्या पदावर होते.. ते जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. तर काका-रामचंद्र हरी शिदे-जोतिबांच्या व्यवसायातील भागीदार होते. वडिलांनी ताराबाईंचा विवाह एका सामान्य व्यक्तीशी करून दिला व त्याला घरजावई म्हणून ठेवले. ही गोष्ट ताराबाईंना फारशी रुचलेली दिसत नाही. (ताराबाईंचा विवाह शिंदे आडनावाच्याच गृहस्थाशी झाला होता की परंपरेप्रमाणे विवाहोत्तर पतीचे आडनाव लावण्याचे नाकारून स्वतःचे माहेरचेच आडनाव त्यांनी कायम ठेवले? हा माझा प्रश्न.)

स्त्रीपुरुषतुलना या पुस्तकाचे लेखन नोव्हेंबर-डिसेंबर १८८१ मध्ये ताराबाईंनी केले व १८८२ च्या सुरुवातीस ते प्रकाशित झाले. म्हणजे वयाच्या एकतीस – बत्तिसाव्या वर्षी त्यांनी हे लेखन केलेले आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रतिपाद्य विषय कोणता हे समजते. स्त्रीपुरुषतुलना करताना ताराबाईंसमोर विधवा स्त्रिया तसेच विवाहित स्त्रिया आहेत. बाल्यावस्थेचा विचार करण्याची गरज त्यांना भासली नाही याचे कारण बालविवाहाची प्रथा तेव्हा रूढ होती. विवाह मुलीचे सर्व बालपणच हिरावून घेत असे.

हे पुस्तक लिहिण्यास ताराबाई प्रवृत्त झाल्या याचे कारण म्हणजे विजयालक्ष्मी या विधवेवर ओढवलेला दारुण प्रसंग! तत्कालीन वर्तमानपत्रांतून जी चर्चा झाली ती वाचून ताराबाईंना सात्त्विक संताप आला व त्याचा उद्रेक ह्या पुस्तकरूपाने बाहेर पडला.

प्रस्तावनेच्या सुरुवातीला ताराबाई आपल्या पुस्तकाचे प्रयोजन स्पष्ट करतात. ‘ज्या परमेश्वराने ही आश्चर्यकारक सृष्टि निर्माण केली, त्यानेच स्त्री पुरुष निर्माण केले’. तरी सर्व प्रकारचे साहास दुर्गुण स्त्रियांचेच अंगीं वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंग आहेत तेच पुरुषांत आहेत किंवा नाहींत हे अगदी स्पष्ट करून दाखवावे याच हेतूने हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहे. यांत अमुकच जाती किंवा कुळ याकडे माझे मुळीच लक्ष नाहीं. स्त्रीपुरुषाची तुलना आहे’ (पृ. ७९).
**स्त्रीपुरुषतुलना, संपादक : विलास खोले, प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन, पुणे, मूल्य : १२५ रुपये.

प्रस्तावनेच्या शेवटी शेवटी हे पुस्तक लिहिल्यावाचून त्या राहूच शकल्या नसल्या हे सांगताना त्या म्हणतात, ‘…. रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजींचे नित्य नवीं भयंकर उदाहरणे दिसून येत असतांही तिकडे कोणीच लक्ष न देतां स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणी लादतात, हे पाहून स्त्रीजात्याभिमानाने माझे मन अगदीं खळबळून तळतळून गेले त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडखडीत लिहिल्यावांचून रहावेना’ (पृ. ८१). पुस्तकात प्रामुख्याने तीन विषयांची मांडणी केलेली आढळते. विधवा पुनर्विवाहाला बंदी असल्यामुळे विधवा स्त्रियांची होणारी कुचंबणा, दोन, विवाहित स्त्रीचे शोषण आणि तीन, जे दुर्गुण स्त्रियांच्या ठिकाणी आहेत असे मानले जाते ते पुरुषांच्या ठिकाणीही कसे ओतप्रोत भरलेले आहेत ह्याचे दिग्दर्शन. (संहितेत सर्वात जास्त विस्ताराने विवेचन या विषयाचे आहे.)

स्त्री धर्म म्हणजे काय? ताराबाई म्हणतात, ‘निरंतर पतीची आज्ञा पाळणे, त्याचे मर्जीप्रमाणे वागणे, त्यानीं लाथा मारिल्या, शिव्या दिल्या, दुसन्या रांडा ठेविल्या, नवरूजी दारू पिऊन, जुवा खेळून, कफलक होऊन, शंख करीत, चोरी करून, कोणाचा प्राण घेऊन, फितूर, चाहाडी, खजिना लुटून, लांच खाऊन जरी घरीं आले; तरी स्त्रियांनी आपले हे कोणी जसे कांहीं कृष्ण महाराजच गौळ्यांचे दहीं दूध चोरून चंद्रावळीला कलंक लावून आलेत; असे समजून परमात्म्यासारखीच यांची मोठ्या हासत मुखाने देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर रहावें …’ (पृ. क्र. ८३). हा आहे का? (पुरुषधर्म कोणता? हा मला पडलेला प्रश्न.)

मनूने घालून दिलेला दंडक तर प्रसिद्ध आहे आणि त्याची भलावण करणारे, समर्थन करणारे महाभाग आजही आहेत. पतिव्रता धर्म (मनाने, वाणीने व शरीराने सर्व प्रकारचे नियमन करून कोणताही व्यभिचार न करणारी स्त्री मरणोत्तर पतिलोकास प्राप्त होते व सज्जनांकडून साध्वी म्हणून संबोधिली जाते. पृ. क्र. २७). या पतिव्रताधर्माचे गोडवे सर्वच धर्मग्रंथांनी, स्मृतिकारांनी गाईले आहेत. पतिव्रत्याच्या धर्माप्रमाणे पती हा जर देव मानायचा तर पतीनेही देवासारखे वागावे की नाही? हा प्रश्न ताराबाईंना पडतो.

या संदर्भात त्या शास्त्रकर्त्यांचीही कानउघाडणी करतात. पतिव्रता म्हणून निवडलेल्या स्त्रिया दोषास कशा पात्र आहेत हे दाखवून देतात. “…. द्रोपदी पांच नवऱ्यांची बायको, . . . . सत्यवती, कुंती ह्यानी आपले कुमारदशेतच पुत्रांना जन्म दिला. वारे देव! वारे ऋषि! एकाचडी एक’ (पृ. क्र. ८५).

‘या संसारांत नानात-हानी तुमच्या अब्रूस कोणत्याही प्रकारे धक्का न वसावा म्हणून नमते; जेव्हां पहावी तेव्हां सर्वेत हजर ; दुःख सुखाचे वेळी अमृताचे वल्लीप्रमाणे सदा सर्वदा सर्व सोडून निरंतर गोडच.’ तरीही तिला पुरुष ज्ञानाप्रकारचे दोष देतात यावर संतापून ताराबाई विचारतात, ‘तुह्मांस कांहींच लाज वाटत नाहीं कारे?’ (पृ. क्र. ९१).

विधवा स्त्रीवर मनूने घातलेले निर्बध पाहा : ‘भक्षणास योग्य अशी मुळे, (कंद) मुळे, फुले, जरूर तर अल्पाहारानेच शरीर कृश केले तरी चालेल, पण पती वारला असता परपुरुषाचे नावही स्त्रीने उच्चारू नये, पतिनिधनानंतर स्त्रीने आमरण क्षमाशील, नियमशील व कडक व्रह्मचारी असावे. पुत्रप्राप्तीकरिताही परपुरुषाची इच्छा करू नये’ (पृ. ३१).

विधवा स्त्रीचे सुंदरपण घालवतात, अलंकार जातात, तिला सर्व तऱ्हेने नागविले जाते. लग्नकार्यात, समारंभात, जेथे काही सौभाग्यकारक असेल तेथे तिला जाण्याची बंदी. हे पाहून ताराबाई पोटतिडकीने विचारतात, ‘देवांजवळ “या नवऱ्याला देवा तुम्ही लवकर न्याहो” असा कांहीं तिने अर्ज का केला होता?’ (पृ. ९४)

बरे, पतिनिधनाची स्त्रीला शिक्षा मग पत्नीनिधनाची पुरुषाला कोणती शिक्षा? (हा माझा प्रश्न.) येथे तर परिस्थिती उलटच आहे. एक बायको मेली की तिच्या दहाव्या दिवशीच दुसरी बायको आणली जाते. ताराबाई विचारतात, “तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्हीही आपले तोंड काळे करून दाढ्या मिशा भादरून यावत् जन्मपर्यंत कोठेही अरण्यवासांत कां राहूं नये बरे? (पृ. ९३)…

शृंगारशतकात भर्तृहरी म्हणतो, “स्त्रीरूप यंत्र जारणमारणापेक्षां बलिष्ठ आहे; अनेक संशयांचा परिभ्रम भोंवरा; उद्धततेचे केवळ गृहच; अविचारकर्माचे नगरच; सकल दोषांचे निधान, शतशः कापट्यांनी व्यापलेलें; दुर्गुणांचेंहि उत्पत्तिस्थान; स्वर्गमार्गाचा नाश करणारें; यमनगरीचे द्वारच; सर्व कापट्ययुक्त लीला राहावयाचे पात्र; या प्रकारे स्त्रीयंत्र विषवत् असतां अमृततुल्य वाटणारा असा प्राणिमात्रांस मोहरूप बंधन करणारा रज्जु ब्रह्मदेवाने निर्माण केला आहे” (पृ. ३९).

स्त्रियांच्या ठिकाणी सांगितलेले हे नऊ दुर्गुण आधाराला घेऊन ताराबाईंनी पुरुषांच्या दुर्गुणांची सविस्तर मीमांसा केली आहे. ताराबाई म्हणतात, ‘तुम्ही पाजी, बेइमान, भरंवसा देऊन केसांनीं गळा कापणारे जे तुम्ही त्या तुमच्या हातून कधीच अविचार होत नाहीं? तुह्मी अगदी विचारमंदिरें! अहारे शाबास! अरे, तुम्ही महापढीक शहाणे व विचारी असून तुमचे हातून नभूतोनभविष्यति, असे अविचार घडून व रोज घडत असतांही तुम्ही मोठे विचारी ह्मणवितां याला काय म्हणावे?’ (पृ. १०६)

खोट्या नोटा छापणे, लाच खाणे, दुसऱ्याची बायको पळवून नेणे, विषप्रयोग करणे, राजद्रोह करणे, खोटी साक्ष देणे, खून करणे इ. ही काय विचाराची कामे म्हणावयाची?

ताराबाईंच्या मते स्त्रियांच्या हातून सर्वांत मोठा घडणारा अविचार म्हणजे परद्वार होय. पण ताराबाई म्हणतात, ‘तिच्या मनांत दुष्ट वासना उत्पन्न करण्यास आधीं पाऊल कोण टाकितो बरे?… स्त्री कितीही निर्लज्ज असली तरी ती होऊन कधीं परपुरुषांचे गळ्यांत पडणार नाहीं. ही अगदी खात्री’ (पृ. १०७).
स्त्रियांना दुर्गुणांचा वारा पुरुषांमुळेच लागतो. प्रथम गोड गोड बोलून, नादी लावून तिला घराबाहेर काढायचे. मग पुढे दुर्गुण शिकविण्याकरिता तिला कोणी पंतोजी लागत नाही. घराचा उंबरा पारखा झाल्यावर आपण कसे तरी पोट भरू याची तिला खात्री असते. ती हा निंद्य व्यापार उघडपणे करणे व दुसरीला आपल्यासारखे करू पाहते.

आणखी एक दुर्गुण म्हणजे स्त्री ही स्वर्गमार्गाचा नाश करणारे यमनगरीचे द्वार आहे. हे संबोधन स्त्रियांना लावणान्यांना ताराबाई चिडून विचारतात, “तुम्हीं जन्म कोणाच्या पोटीं घेतलात. तुमचे नऊ महिने जिवासांड ओझे कोणीं वागविलें?…. तुम्हाला प्राणापेक्षां कोण जपले, त्या तुमच्या आयाचना? (पृ. १२६)” असे असतानाही त्यांना सर्व कपटाचे पात्र, दुर्गुणांची पेठच, स्वर्गमार्ग नाश करणारी ही संबोधने पुरुष तिला लावतो अशा पुरुषांना मातृद्रोही म्हणावे की मातृनिंदा करणारे म्हणावे हा प्रश्न ताराबाईंना पडतो.

ताराबाई हे दाखवून देतात की जर हे दुर्गुण स्त्रियांमध्ये असतील तर पुरुषांमध्येही आहेत पण त्याबद्दल पुरुषांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मात्र भिन्न आहे. ताराबाईंचा दृष्टिकोन (संतुलित) आहे. त्या पुरुषांचे दोष दाखवितात त्याचप्रमाणे स्त्रियांचेही दोष स्पष्टपणे सांगतात. ताराबाईंच्या लिखाणावरून त्यांच्या जडणघडणीविषयी काही आडाखे बांधता येतात. त्यांच्या समोर जोतिबा फुल्यांचा आदर्श आहे, दोघांच्याही विचारात बरेचसे साम्य परंतु भेद ही आहेत (पृ. क्र. ६० ते ६३). त्यांचे समकालीन मराठी वाङ्मयाचे वाचन असले पाहिजे. (पृ. क्र. ६३) मनोरमा, मुक्तमाला, मंजुघोषा इ. चा त्या उल्लेख करतात. रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये, पुराणकथा, श्रीधराचे ‘पांडव प्रताप’, ‘रामविजय’ या सारख्या ग्रंथांची चिकित्सा करून मत व्यक्त करतात. इंग्रजी, संस्कृत भाषांचेही त्यांना ज्ञान असावे. त्यांचे भाषेचे, विशेषतः मराठी भाषेचे, ज्ञान, जाण समृद्ध आहे. अनेक म्हणींचा त्या सहज वापर करतात. अनेक अपरिचित शब्द वापरतात. उदा. तळहावले पृ. ८४, लेकावळा (८६), खपगी (९०), बाजिंदी (९६) इ. इ. ताराबाई काही समाजसुधारक वा कार्यकत्र्या नाहीत. समाजपरिवर्तन घडून स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलावी व तिला सन्मानाची वागणूक मिळावी, अशी त्यांची आकांक्षा आहे. (पृ. ४६) त्यांची या निबंधातील भाषा मात्र रोखठोक, उपरोधिक, कोणाचाही मुलाहिजा न बाळगणारी आहे. ती तशी असणे स्वाभाविक आहे. ज्याच्यावर अन्याय होतो, त्याचा होणारा उद्रेक सौम्य भाषेत कसा व्यक्त होणार?

हे सर्व प्रतिपादन पुस्तकातील आशयासंबंधी झाले. आता थोडे पुस्तकाविषयी. संपादकांनी काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यापैकी काहींसंबंधी तर्कही व्यक्त केला आहे.

ताराबाईंचे हे पुस्तक १८८२ सालचे. १८८५ मध्ये जोतिबांच्या ‘सत्कार’ मध्ये आणि ना. के. वैद्य यांच्या १८८६ साली लिहिलेल्या पुस्तिकेत ताराबाईंच्या लेखनाची झालेली शिफारस वगळता जवळ जवळ १९७५ पर्यंत या लिखाणास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जवळ जवळ शंभर वर्षे हे पुस्तक अज्ञातवासातच राहिले. (पृ. ५५) याचे एक संभाव्य कारण, जे संपादकांनी सुचविले आहे व ते मान्य होण्यास हरकत नसावी. ते असे की त्याकाळी समाजसुधारणेसाठी धडपडणारी माणसे ही प्रायः ब्राह्मण होती. ब्राह्मणी मुल्यव्यवस्थेवर व पुरुषांवर कठोर आघात करणाऱ्या अब्राह्मण स्त्रीच्या प्रखर विचारांची दखल घेणे त्यांना सोयीचे वाटले नसावे. त्यामुळे एकंदर पुरुषवर्ग त्यातही ब्राह्मण पुरुषवर्ग ताराबाईंच्या विचारांना फारसा अनुकूल असणे संभवत नाही.

दुसरा एक प्रश्न असा की ज्या काळी ताराबाईंचे पुस्तक प्रसिद्ध झाले त्याच सुमारास म्हणजे १८८२ मध्ये पंडिता रमाबाईंचे स्त्रीधर्मनीती हे पुस्तक प्रसिद्ध झाले. जी प्रसिद्धी रमाबाईंच्या विचारांना, कार्यकर्तृत्वाला लाभली ती ताराबाईंच्या वाट्याला आली नाही.

तिसरा प्रश्न जो खुद्द ताराबाईंविषयीच पडतो तो असा की ज्या स्त्रीने हे क्रांतिकारक विचार, ज्या काळात व्यक्त करण्याचे धाडस केले त्यानंतर या बाईंनी पुढील वीस बावीस वर्षांच्या आयुष्यात काहीच का लिहिले नाही. (पृ. ६९) मौन का पाळले? समकालीन समाजस्थितीविषयी, स्त्रियांच्या स्थितीविषयी ताराबाईंना काय वाटत होते हे कळायला काही मार्ग नाही.

शेवटी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवते. ते असे. हे पुस्तक वाचताना ते १८८२ साली लिहिले आहे हे ऐतिहासिक सत्य आपल्याला स्वीकारावे लागते परंतु हे साल बदलून त्यावर आजचे साल लिहिले तरी हरकत नाही. पुस्तकात व्यक्त केलेले विचार आजही, एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना, तेवढेच प्रस्तुत (relevant) आहेत, ते कालबाह्य ठरले नाहीत. हे वास्तव पुरोगामी विचारांच्या प्रगतीचे द्योतक मानायचे? हा माझा प्रश्न.
(वरील निबंध सुधारक वाचक मंडळाच्या सभेत सप्टेंबर मध्ये वाचला गेला आहे.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.