पत्रव्यवहार

दोन महिन्यांपूर्वी श्री. मोहनी येथे आले होते त्या वेळी डिसेंबर महिन्यात पुण्यात काही कार्यक्रम घेण्याचे विचार बोलले होते. त्याचे पुढे काय झाले? आम्हाला नागपूर एका बाजूस पडल्यासारखे वाटते. पश्चिम महाराष्ट्र वैचारिक बाबतींत बराच पुढारलेला आहे. आपल्या विचाराच्या पूर्व-पश्चिम महाराष्ट्रातल्या मंडळींना एकमेकांस पाहू दे तरी. मग विचार सुरू होतील. एखादी मध्यवर्ती जागा घेतली तरी चालेल. वैचारिक वादळ जोराने सुरू झाले आहे. आपल्या विचारांना गती देणे जरूर आहे. आपल्या सल्लागार मंडळीपुढे हा विचार मांडावा.*
श्री. वा. किर्लोस्कर
४४७, सिंध हौ. सोसायटी, औंध, पुणे – ४११ ००७
*टीप : आता पुणे येथे जानेवारी ६ रोजी सायंकाळी ६ वाजता साधना सभागृहात वाचक मेळावा घेत आहोत.
— संपादक

संपादक, आजचा सुधारक, यांस,
‘विवेकाच्या गोठी’ ह्या शीर्षकाखाली आ. सु. डिसेंबर १९९९ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या श्री. केशवराव जोशी यांच्या पत्राच्या संदर्भात पुढील खुलासा करीत आहे.
१. स. ह. देशपांडे यांनी “नवभारत” (वाई) जुलै १९९८ च्या अंकात संघाची भलामण करणारा लेख लिहिला आहे’, असे जोशी लिहितात.
संबंधित लेख संघावरही नाही आणि त्यात त्याची भलामणही नाही.. लेखाचा विषय मला अभिप्रेत असलेली भारताच्या राष्ट्रवादाची मांडणी हा आहे. त्याचे शीर्षकच ‘धर्मनिरपेक्ष पण परंपरासापेक्ष राष्ट्रवाद’ असे आहे. त्यातल्या पूर्वभागात माझी राष्ट्रवादविषयक भूमिका संक्षेपाने सांगून उत्तरभागात माझ्या भूमिकेवर श्री. वसंत पळशीकर यांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तरे दिली आहेत. मी संघाची ‘वकिली’ करतो असा पळशीकराचा एक आक्षेप होता त्याच्या संदर्भात संघाविषयी काही मजकूर मी लिहिलेला आहे. त्यात काही विधाने संघाला अनुकूल तर काही प्रतिकूल आहेत. म्हणजे ही भलामण’ नाही. ‘भलामण’ या शब्दाचा अर्थ ‘खोटी किंवा/आणि मतलबी स्तुती’ असा मी करतो.
२. संबंधित लेखात ‘गोहत्याबंदीचा आग्रह’ मी कोठेही धरलेला नाही. माझ्या तत्पूर्वीच्या आणि तदनंतरच्या लिखाणातही नाही, केव्हाही नाही. मग हा आग्रह जोशी यांना कुठे दिसला ते त्यांनी सांगावे; एरव्ही आपली चूक कबूल करावी. त्यांच्या ‘विवेका’ला ते शोभून दिसेल.
जोशी यांचे वाचन ‘चौफेर’ असते असा त्यांचा परिचय आ. सु. ने त्याच अंकात करून दिला आहे. ते खरे असेलही, पण ते आपले वाचन काळजीपूर्वक करतात असे दिसत नाही.
असे का होते याबद्दलचा एक अंदाज प्रकट करू इच्छितो. मी हिंदुसंघटनवादी (हिंदुराष्ट्रवादी नव्हे) या अर्थाने हिंदुत्ववादी आहे. पण ‘हिंदुत्व’ हा शब्द उच्चारला जाताक्षणीच काही मंडळींच्या मनात विशेष प्रकारचे संज्ञाप्रवाह सुरू होतात. हिंदुत्ववादी म्हणजे संघवाला (व जातीयवादी, आक्रमक वगैरे). संघवाला म्हणजे गोहत्याबंदीचा आग्रह धरणारा. अशा संज्ञाप्रवाहांनी मन व्यापले म्हणजे वाचन पूर्वग्रहरहित दृष्टीने होत नाही, विवेक रजा घेतो आणि सत्याच्या जागी भ्रमांची प्रतिष्ठापना होते. संज्ञाप्रवाहांची साखळी तर्कानुगामी नसते हे प्रसिद्धच आहे.
स. ह. देशपांडे
सी. २८, गंगाविष्णू संकुल,
प्रतिज्ञा हॉलसमोर, कर्वेनगर, पुणे – ४११ ०५२

संपादक, आजचा सुधारक, यांस,
आपण आजचा सुधारक मध्ये ऑक्टोबर ‘९९ व डिसेंबर ‘९९ अंकात श्री केशवराव जोशी यांची दोन पत्रे प्रसिद्ध केली आहेत. श्री जोशी हे विवेकवादाचे समर्थक व ससंदर्भ लेखन करतात, अशी त्यांची माहिती दिल्याने, मी हे पत्र लिहीत आहे.
ऑक्टोबर १९९९ च्या पत्रात श्री जोशी यांनी असे विधान केले आहे – की ‘नेहरू घराण्यातील व्यक्ती आली तर तिचा कल समाजवाद व धर्मनिरपेक्षता याकडे राहील ही भीती या लोकांच्या मनात असते. या लोकांच्या म्हणजे कोणाच्या हे पत्रात स्पष्ट नाही. पण पत्रांच्या अगोदरच्या सुरावरून, श्री. जोशी यांना भा.ज.प. ची मंडळी अध्याहृत असावीत. त्याच्याशी मला कर्तव्य नाही. एक इतिहासाचा वाचक म्हणून मी लिहीत आहे. सत्तेवर आल्या आल्या ‘केरळातील मुस्लीम लीग ही निराळी आहे’ असा पवित्रा पंडित नेहरूंनी घेतला, व केरळ प्रांतात काँग्रेसने तेथील लीगशी साटेलोटे करण्याचा मार्ग मोकळा केला. तर त्यांचे नातू राजीव यानी ‘शहाबानो’ प्रकरणात जात्यंध मुसलमानांची तळी उचलून धरली. नेहरू घराण्यातील व्यक्ती आली तर तिचा कल ‘ढोंगी धर्मनिरपेक्षते’ कडे राहील अशी भीती लोकांच्या मनात जरूर आहे. कारण हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरजच नव्हती. प्रश्न आहे, फाळणीनंतरच्या पन्नास वर्षांत नेहरू- घराण्यातील नेत्यांनी, येथील अल्पसंख्य समाजांना धर्मनिरपेक्षता शिकविण्यासारखे काही केले का? आता तर बॅ. गाडगीळ यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून सल्ला दिला आहे. की ‘धर्मनिरपेक्षतेचा प्रचार कमी करा; याला हिंदुविरोधाची दुर्गंधी आलेली आहे.’ (सकाळ १३-११-९९) असो.
डिसेंबर ‘९९ च्या अंकात छापलेल्या पत्रात केशवराव जोशी यांनी, ‘४८ साली पाकिस्तानला दिल्या गेलेल्या ५५ कोटी संबंधात अशी वाक्यरचना केली आहे, की जणू ५५ कोटी पाकिस्तानला द्यावे, हा महात्मा गांधींचा हट्टाग्रहच नव्हता! आता खालील संदर्भ पाहा.
उपप्रधानमंत्री गृहखात्याचे मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी नवी दिल्ली येथे १२ जाने १९४८ ला दिलेले वक्तव्य पाहावे. संसदेत पटेल यांनी केलेले निवेदन असे –
‘हिंदुस्थानच्या तिजोरीतून ५५ कोटीचा जो हिस्सा पाकिस्तानला देणे निघतो, तो हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानला द्यावा असे उभयपक्षी ठरले आहे. पण जोपर्यंत पाकिस्तान टोळीवाल्यांना पाकिस्तान माघारी घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले जाणार नाहीत.’
याच्या दुस-या दिवशी महात्मा गांधींनी १३ जाने ‘४८ ला दिल्लीत उपोषण सुरू केले.
‘इंडिया फ्रॉम कर्झन टू नेहरू’ या पुस्तकात दुर्गादास लिहितात –
‘Patel took a firm stand against turning our 550 million to Pakistan until the other provisions of the pact were honoured. Finance Minister Shanmukham Chetty strongly backed him. Word went round that the fast was directed against Patel’s decision to withhold the cash balance.’
[P. 275 & 276]
दिनांक १६ जाने. १९४८ ला हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानला बिना अट ५५ कोटी बहाल करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर करताना खुलासा केला
‘हा निर्णय म्हणजे या देशाच्या दैदीप्यमान परंपरेला अनुसरून शांतता व सदिच्छा टिकविण्यासाठी गांधीजींच्या अहिंसक आणि उदात्त प्रयत्नांना, हिंदुस्थान शासनाची देणगी आहे’. (पंचावन्न कोटीचे बळी परिशिष्ट पृष्ठ क्र. १६०)
म्हणजे १२ जानेवारीला ज्या दैदीप्यमान परंपरेचा हिंदुस्थान सरकारला पत्ता नव्हता – ती त्यांना १६ जानेवारीला अचानक आठवली!
हे वृत्त देताना मुंबईच्या ‘नॅशनल गार्डियन’ या साप्ताहिकाने १७ जाने. १९४८ च्या अंकात लिहिले
‘नेहरू शासनाकडून हिंदुस्थानची घोर फसवणूक, पाकिस्तान दमदाटीने जे साधू शकले नाही, ते गांधीजींच्या हट्टाग्रहाने साधले.’
महात्मा गांधीजींनी १८ जाने. १९४८ ला उपोषण सोडले.
हे सर्व तात्कालीन संदर्भ आहेत. ज्यावरून श्री. केशवराव जोशी यांच्या ध्यानात खरी हकिगत येऊ शकेल, असे वाटते.
वि. ग. कानिटकर
औदुंबर सदनिका,
१३६२ सदाशिव पेठ, पुणे – ४११ ०३०

संपादक, आजचा सुधारक, यांस,
आ. सु. साठी काही लिहावयाचे म्हटल्यास मनावरचे क्विंटलभर ओझे बाजूला हटवावे लागते. विद्वानांच्या सभेत संस्कृत आणि तत्त्वज्ञान यात गती नसणा-या माझ्यासारख्याने, जावयाचे तर हातपाय थरथरतात. नोव्हेंबर ‘९९ च्या अंकातील शेवटच्या ओळीत मराठे यांना उद्देशून आपण लिहिले की त्यांनी या अंकाबाबत मत कळवावे. मराठे ते कळवतीलच. पण या आवाहनाचा आपणही फायदा घ्यावा असे वाटले. प्रतिक्रियेला घासून पुसून नीट करण्यात २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर एवढा अवधी लागला. ५ डिसेंबर उजाडत नाही तोच डिसेंबर ‘९९ चा बाँब (अंक) डोक्यावर आदळला.
नोव्हेंबरचा अंक चांगलाच होता. डिसेंबरचा अधिक चांगला होता. आ. सु. चे प्रकाशित सर्व अंक आधीच्या ८ वर्षांचे एकत्र बांधलेले माझ्या संग्रही आहेत, वाचले आहेत. दि. य. दे. ना खूप वाचकांनी बोचकारले आहे. सरळ व वाकड्या प्रश्नांना उत्तरे देण्यात त्यांची बरीच शक्ती खर्च झाली. प्रश्नांच्या चक्रव्यूहातून मात्र ते यशस्वीपणे बाहेर पडले आहेत. त्यांच्या विद्वत्तेला प्रणाम. त्यांना विवेकवादाचे शंकराचार्यच म्हणावे लागेल. दिवाकर मोहनींनी त्यांची विचारधारा अधिक आक्रमकपणे पुढे चालविली. खिलारे – नानावटी – ढाकुलकर यांच्या विचारांची परिणती डिसेंबर ‘९९ चे अंकात ज्या मिलिंद देशमुखांनी केली त्यांना निडरपणे व मुलाहिजा न ठेवता ज्या युक्तीने मोहनींनी उत्तरे दिली ती केवळ लाजवाब. दिलेली उत्तरे वादग्रस्त जरूर आहेत पण ब्राह्मण्याला दोष न देता व धक्का न लावता उत्तरे देण्याची पद्धत सफल झाली आहे. तुमच्या संपादकत्वाखाली निघालेल्या दोन्ही अंकांत तुम्ही विवेकवादाचे अंगाने कठीण व बोचक प्रश्नांना दिलेली उत्तरे त्रोटक पण स्पष्ट, समर्पक, अप्रतिम वाटली. उत्तरे देण्याची ही पद्धत पुढेही सुरू ठेवावी. शंकराचार्यांची गादी तुम्ही आणि मोहनी यशस्वीपणे चालवाल यात मुळीही शंका नाही.
आ. सु. वर एकसुरीपणाचा व त्याच त्याच लेखकांच्या लिखाणाचा आरोप अनेक अभ्यासूंनी केला आहे. गेल्या ४-५ महिन्यांत ह्या दोन्ही आरोपांना घालवून लावण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले. मला स्वतःला एकसुरीपणाच आवडलेला आहे. अनेक सुरांचे कालवण असणारी इतर पुष्कळ मासिके मराठीत प्रकाशित होतात, त्यावर मिसळीच्या भोक्त्यांनी ताव मारावा. माझ्या मते एकसुरीपणा आ. सु. चे वैशिष्ट्य व सामर्थ्य ही आहे. लेखकांचा परिघ वाढविणे आ. सु. चे हातात नाही. अभ्यासूंनी त्यात लिहावे. मी कुणबी. फुले-आंबेडकर-शाहू-सावरकर (त्यांचे हिंदुत्व सोडून) यांचा अभ्यासक आणि त्यांच्या विचारा-वळणाचा आहे. आणि तरीही आ. सु. त प्रसिद्ध होत असलेले विचार-धन मला मनापासून आवडते. कारण पूर्णतः नसले तरी या चार विचारवंतांचे आणि आ. सु. चे विचारात बरेच साधर्म्य आहे. अधिकाधिक ब्राह्मणेतरांनी आ. सु. त लिहिणे आवश्यक आहे. आ. सु. जातिभेद पाळत नाही. दि. य. दें, ना आरोग्य व आ. सु. ला चिरंजीवी आयुष्य लाभावे असे चिंतितो. आ. सु. च्या प्रथमपासून आजवरच्या अंकात कठीण व कधी तर अनाकलनीय शब्द वापरले गेलेले आहेत. सुरुवातीपासून वापरण्यात आलेल्या असल्या शब्दांचे समर्पक, सोपे अर्थ क्रमशः प्रसिद्ध करण्याचा उपक्रम सुरू केल्यास वाचकांचे हित होईल. त्यासाठी इंग्रजी शब्दाचीही मदत घेतली तरी वावगे होणार नाही.
देवराव भालकर
निवृत्त प्राचार्य, ३५ आश्विनी ले आऊट,
सहकार नगर जवळ, अकोला – ४४४ ००४

संपादक, आजचा सुधारक, यांस,
ग्रॅहॅम स्टीन्सच्या हत्येच्या निमित्ताने श्री. यशवन्त ब्रह्म ह्यांचा एक लेख नोव्हेंबर ‘९९ च्या अंकामध्ये आला आहे. मिशनरी लबाडीने-चर्चने दिलेले लक्ष्य पुरे करण्यासाठी-धर्मान्तरे घडवून आणतात म्हणून बाकीच्यांनी जागरूक राहिले पाहिजे असे ते म्हणतात. मिशनयांना लवाडी करता येऊ नये म्हणून काय करता येईल ह्या विचारीतून सुचलेला उपाय.
ज्याला धर्म बदलावयाचा आहे त्याने त्याचा तसा संकल्प स्वतःच्या हाताने लिहून दर महिन्याला ठराविक दिवशी जिल्हाधिका-याकडे सतत अठरा महिने नेऊन द्यावा. कधी एखाद्या महिन्यांत तो चुकल्यास त्याची धर्म बदलण्याची इच्छा तेवढी तीव्र राहिली नाही असे समजून त्याला पुन्हा पहिल्यापासून नियमितपणे सलग १८ महिने धर्मपरिवर्तनाचा संकल्प सादर करावा लागेल. हा संकल्प त्याला एखाद्या राजपत्रित अधिका-यासमोर स्वहस्ते लिहून देऊन त्या अधिका-याची पावती घ्यावी लागेल. असे न करणारी व्यक्ती नव्या धर्मात प्रवेश करू शकणार नाही. नव्या धर्माच्या श्रेष्ठतेबद्दल त्या व्यक्तीची खात्री पटली आहे ह्याची शहानिशा जिल्हाधिका-याने करून घ्यावी आणि ती झाल्यावरच दीक्षिताचे नाव राजपत्रात प्रसिद्ध करावे. ही पूर्ण प्रक्रिया झाली नसल्यास अशी दीक्षा शून्य (null & void) समजावी. कोणत्याही निरक्षर व्यक्तीला धर्म बदलण्याची परवानगी असू नये. मिशन-यांना ज्याचे धर्मान्तर घडवून आणायचे असेल त्याला त्यांनी प्रथम साक्षर करावे.
धर्मांतरणाच्या प्रश्नाला आणखी एक पैलू आहे. तो आहे देशनिष्ठेचा. ती निष्ठा धर्मांतरणामुळे बदलू नये अशी जर आपली इच्छा असेल तर सर्व भिन्नभिन्न धर्मीयांचे ऐहिक जीवन सारख्या प्रतीचे पाहिजे. आपल्या गावात जर आपणास पुरेसे उत्पन्न असेल तर फक्त मिशनरी वृत्तीचे लोक ग्रामत्याग करतील. देशत्यागोमागे पैशाचे प्रलोभन फार मोठे असते. दुसरे एक कारण job satisfaction. एकमेकांविषयी वाटणा-या मत्सराची परिणती प्रगतीचा मार्ग खुटण्यात होत असते. आम्ही भारतीय इतके मत्सरी आहोत की त्यापायी आपण आपल्या येथल्या लायक लोकांना परदेशात पाठवतो आणि त्यांच्या सेवेला आपला स्वतःचा देश वंचित होतो हे आपल्याला समजत नाही. म्हणून आपल्या कृतीने स्वतःचा एकट्याचा लाभ झाला तरी संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे काय ते तपासण्याची बुद्धी वाढविण्याची गरज आहे.
दिवाकर मोहनी
मोहनीभवन, खरे टाऊन,
धरमपेठ, नागपूर -४४० ०१०

संपादक, आजचा सुधारक, यांस,
डिसेंबर ‘९९ अंकात ‘विवेकाच्या गोठी’त श्री. केशवराव जोशी यांचा लेख आला आहे. “मी नथुराम” हे नाटक खोट्या हकिगतीवर आधारलेले आहे असे त्यात म्हटले आहे. म. गांधींचा उपवास शांतता-प्रस्थापनेसाठी होता, ५५ कोटीसाठी तो नवृताच असे त्यांना म्हणायचे असावे. परंतु पुढील घटनांवरून असे दिसेल की, उपोषणाचा मुख्य हेतू हाच होता की, पाकिस्तानचे देणे भारत-सरकारने ताबडतोब देऊन टाकावे. ता. ३ जानेवारी रोजी सरदार पटेल यांनी कलकत्ता येथे जाहीरपणे सांगितले होते की, We will not pay a pie to Pakistan to purchase bullets for firing at us. उपोषण १३ ता. ला सुरू झाले. १५ ता. ला कॅबिनेटची तातडीची बैठक होऊन देणे रक्कम देण्याचा निर्णय झाला. त्यानंतरही उपोषण चालू राहिले, पण याचा अर्थ असा होत नाही की “तो” हेतू त्यामागे नव्हताच.
खुद्द म. गांधींनी १८ जानेवारीच्या प्रार्थना सभेत असे म्हटले की भारत सरकारने ही रक्कम देऊन एक उदात्त आदर्श जगापुढे ठेवला आहे व त्यान आपण निमित्त झालो आहोत. जर केवळ शांतता स्थापन व्हावी हा हेतू असता, तर पाकिस्तानला रक्कम देण्याचा निर्णय घेण्याने शांतता प्रस्थापित होणार होती का? कारगिल युद्धात जवानांनी सांडलेल्या रक्ताबद्दल सर्वानी हळहळ व्यक्त केली. पण १९४७-४८ च्या युद्धातही जवानांचे रक्तच सांडत होते, हे लोक विसरतात! म. गांधींचा खून झाला ही गोष्ट वाईटच झाली, पण गांधींचे उपोषण ५५ कोटीसाठी नव्हतेच असे म्हणणे हा सत्याचा विपर्यास आहे. असो.
माधव रिसबूड
२१०१, सदाशिव,
पुणे – ४११ ०३०

दोन मोठी पत्रे व छोटी उत्तरे
पत्र क्र. १
प्रा. श्री. गो. काशीकर, ११३, शिवाजीनगर, नागपूर – ४४० ०१०. प्रश्न १. डॉ. भाऊ लोखंडे यांनी वैदिक काळात गोमांसभक्षण होत असे याची प्रमाणे दिली आहेत. ती सुविदित आहेत त्यात काही नवे ‘सत्यशोधन’ केले नाही.
२. हिंदुधर्म विकसनशील आहे. अनेक अयोग्य गोष्टी त्याने टाकल्या त्याला कलिवर्ण्य म्हणतात. गोमांस-भक्षण त्यातलेच.
३. हिंदुधर्माने कमी महत्त्वाच्या सर्वच गोष्टी सोडल्या असे नाही. काही बाबतीत आजही प्रयत्न चालू आहेत. परंतु जो ज्या अध्यात्माच्या पायरीवर असेल तेथून त्याने त्याला प्रशस्त वाटणाच्या मार्गाने जावे, सर्व मार्ग शेवटी एकाच गंतव्याजवळ पोहचवतात. हे अंतिम गंतव्य आहे ‘तत्त्वमसि’चा साक्षात्कार.

उत्तर १. नवे सत्यशोधन म्हणजे काय? धर्मग्रंथातील अवतरणे देऊन लोखंडे यांनी आपले प्रतिपादन केले आहे. ही अवतरणे आपण समजता तेवढी सुविदित नाहीत.
२. काय कलिवर्य करावे आणि काय नाही याचे तारतम्य विवेकानेच ठरवावे लागते. म्हणजेच धर्मापेक्षा विवेकाचा अधिकार मोठा आहे. ब्राह्मणाशिवाय इतर वर्ण एका शुद्रांत जमा करणे हा क्षत्रिय-वैश्य यांना कलिवर्ण्य करण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे शाहूमहाराजांसारख्या पुरोगामी छत्रपतींना ब्राह्मणांनी शूद्र ठरवून महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास कलीच्या नावाने कलुषित केला आहे.
३. ‘तत्त्वमसि’ चा साक्षात्कार म्हणजे काय? शंकराचार्य त्याचा अद्वैती अर्थ करतात. मध्वाचार्य तो नाकारून द्वैती अर्थ करतात. ‘तत्त्वम् असि’ असा विग्रह करून ‘तत्त्वम्’ हा समास ‘तस्मिन् त्वम्’ असा (सप्तमी तत्पुरुष) सोडवून त्या विष्णूच्या ठिकाणी तुझे स्थान आहे असा चक्क द्वैती अर्थ मध्वाचार्य करतात. त्यामुळे शंकराचार्य एकतेचा पुरस्कार तर मध्व द्वैताचा पुरस्कार करतात. हे गंतव्य एकच आहे काय?

पत्र क्र. २
श्री. माधव रिसबूड, २१०१, सदाशिव, पुणे – ३०.
प्रश्न १. आपल्यावर अन्याय हजारो वर्षे झाला आहे असे मानणारा बहूजन समाज दलितांवर अन्याय करतो. गावातल्या विहिरीवर पाणी भरू देत नाही. आमच्या सामाजिक दुराचाराचे कारण म्हणजे आत्मौपम्य बुद्धीचा अभाव. आपली संस्कृतीच अशी. तेच आमच्या दांभिक वागणूकीचे मूळ आहे.
उत्तर १. आदर्श चांगला असूनही लोक दुटप्पी वागू शकतात. त्यालाच दांभिकपणा म्हणतात. आत्मौपम्य बुद्धीची शिकवण वेदात, उपनिषदात भरपूर आहे. कठोपनिषदाच्या पाचव्या वल्लीत १२ व्या श्लोकात म्हटले आहे की, जो सर्व जीवांचा अंतरात्मा एक असून तोच स्वतःमध्ये आहे असे पाहतो त्याच शहाण्या मणुष्याला शाश्वत सुख मिळते. इतरांना नाही. म्हणजेच तत्त्वाची वाण नाही आचाराची आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.