पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस,
डिसेंबर ९९ चा आपला अंक मिळाला. मी गेली ९ वर्षे आपले मासिक नियमित व काळजीपूर्वक वाचले आहे. ते मला आवडलेही आहे. त्याने मला विचार करायची दिशा दाखवलेली आहे. तसेच देव, धर्म, जात व त्या संबंधित विषयाचे विचार मी वाचले व पटले आहेत.
लेखक, विषय, तेच तेच आपण प्रसिद्ध करता आहात. एखाद्या यत्तेत चांगल्या प्रकाराने पास झाल्यावर त्या वर्गातच परत बसून शिकल्यावर जसे वाटते तसे मला वाटत होते. म्हणून ह्यापुढे आपले मासिक पाठविणे बंद करावे. दुस-या मासिकाची वर्गणी मी भरली आहे.
लोकसंख्येची अनिर्बध वाढ, गर्भलिंगपरीक्षा, स्त्रीगर्भपात त्यामुळे येणारे स्त्री-पुरुषांचे व्यस्त प्रमाण, भ्रष्टाचार, घराणेशाही, वाढणारी निरक्षरांची संख्या, बेरोजगारांची वाढती संख्या, अन्नधान्य, दूधउत्पादन वाढ होऊनही ४०% लोकांचे होणारे कुपोषण, वाढती महागाई हे आजचे काही सामाजिक प्रश्न आहेत. ह्यावर समाजशास्त्रज्ञांकडून आपण लेख का लिहून घेत नाही? आपण जे विषय वारंवार प्रसिद्ध करता त्याबरोबर वरील नवीन विषयही असावेत. पण त्यासाठी संपादकसल्लागार-मंडळात बदल हवेत.
लक्ष्मीनिवास, लोकमान्य टिळक मार्ग, मा. गो. खांडेकर
मुलुंड (पूर्व), मुंबई- ४०००८१

नोव्हेंबरच्या आ. सु.च्या मुखपृष्ठावरील श्री. हमीद दलवाईचे विचार, १० ऑक्टोबरला साता-याला भरलेल्या शिक्षण, न्याय आणि अल्पसंख्य’ या विषयावरील मुस्लिम जमातीच्या चर्चासत्राचा संपादकीयामध्ये आपण केलेला उल्लेख, व नोव्हेंबरमध्ये भरणा-या मुस्लिम समाज-सुधारकांची परिषद’ या बद्दलच्या सूचना वाचल्या. परंतु पुन्हा जो प्रश्न डोळ्यापुढे येतो तो असा की हमीद दलवाई, नजमा मणियार, अन्वर शेख किंवा रझिया पटेल यांसारख्यांच्या पातळीवरून विचार करणारे मुस्लिम किती असणार? जसे विवेकवाद उचलून धरणारे शिक्षित, बौद्धिक लोक अल्पसंख्य, तसेच ह्या मंडळींच्या विचारसरणीला उचलून धरणारे पण अल्पसंख्यच असतील ना? बहुसंख्य-म्हणजे किमान निम्म्याहून अधिक – मुस्लिम जनतेला हमीद दलवाईंचे ‘हिंदूमुस्लिम सहजीवनाबद्दलचे विचार बहुतेक पटणार नाहीत, पटत नाहीत ही आजची वस्तुस्थिति आहे ना? ह्याला उपाय काय? एक उदाहरण म्हणजे ज्यांच्या व्यवहारात आधीच विवेकवाद आहे व ज्यांना आ. सु. न वाचूनसुद्धा त्यातील एकंदर विचार पटलेले आहेत, अशी मंडळीच बहुधा आ. सु. वाचत असतात. तसेच, ज्यांना हमीद दलवाई इत्यादींची मते आधीच मान्य आहेत केवळ अशी मुस्लिम मंडळीच जर अशी परिषदेला उपस्थित राहिली तर ह्याचा उपयोग किती?
8Wethersfield Dr:, Plainsboro, NJ 08536 U.S.A. अशोक विद्वांस

यावेळचा अंक भरगच्च वाटला. मोहनींचे ‘आम्ही आणि ते चांगलेच झाले. ना. भास्करराव जाधवांचे लेख माझ्या लहानपणी ‘ज्ञानमंदिर’ आणि ‘मराठा’ या मासिकात मी वाचले होते. आज इतक्या वर्षांनंतर पुनःप्रत्ययाचा आनंद आपण मिळवून दिला. माधवराव बागलांच्या काही लेखांचेही असेच पुनर्मुद्रण करता येईल. वेचा कालोचित हवा. मंटोच्या कथांनीही अंकाला लालित्य आले. सुधारकला सुधारायचे आपले प्रयत्न सफल होत असलेले पाहून बरे वाटते.
कमलपुष्प, वांद्रे रिक्लमेशन, मुंबई – ४०० ०५० न. ब. पाटील

पत्रपरामर्श

पत्र -१
के. रा. जोशी, २/२ M.I.G. कॉलनी, वंजारीनगर, नागपूर -४४० ००३
१. आजचा भारतातला ब्राह्मणसमाज पूर्णपणे गोमांसनिवृत्त आहे मग या सत्यनिवेदनाचा (आ. सु. डिसेंबर १९९९) लाभ कोणता? एकेकाळी समाज दिगंबरावस्थेत राहत होता. हवे तसे स्त्री-पुरुषसंबंध होते. अशा त-हेचे सत्य समोर मांडून आपण त्या पूर्वस्थितीला समाजाला नेऊ इच्छिणे वरोवर होईल काय?
२. कलौ पाराशरी स्मृतिः। असे गौरविल्या गेलेल्या पाराशरस्मृतीत गवालंभगोहत्या-कलियुगात वर्ल्स (कलिवर्थ्य) म्हणून स्पष्ट सांगितलेला आहे.
३.“येथे मी ज्याचे मांस खातो तो मला परलोकी खाणार आहे हा मांस शब्दाचा व्युत्पत्यर्थ लक्षात घेऊन मांसाला ‘मांस’ या शब्दाने विद्वान लोक संबोधतात.”
मां स भक्षयिताऽमुत्र यस्य मांसमिहाम्यहम् ।
एतन्मांसस्य मांसत्व प्रवदन्ति मनीषिणः।। मनु ५.५५
‘मा हिंस्यात् सर्व भूतानि’ – कुठल्याही प्राण्याची हिंसा करू नका असा मुख्य वैदिक आदेश आहे. ४. सध्या वेद मनुस्मृती यांना कोणीही विचारत नाही. भारताचा कारभार विशिष्ट वर्गाकडून भीमस्मृती म्हणून अपरिवर्तनीय गौरविल्या जाणा-या भारतीय संविधानानुसार चालतो.
५. भारतीय जीवनात ब्राह्मणवर्गाचे विशिष्ट स्थान होते. सर्व (स्वातंत्र्यादि) आंदोलनात या वर्गातील लोकांचा आद्य पुढाकार होता. त्यामुळे इंग्रज, ख्रिस्तीपाद्री यांनी ब्राह्मणवर्गाविषयी समाजात अप्रीती, द्वेषभाव, अविश्वास निर्माण व्हावा यासाठी प्रचंड प्रयत्न केले व अजूनही चालू ठेवले आहेत. … आ. सु. ने ही या कामाला हातभार लावला तर नवल नाही.
६. कुठल्याही जातीचा उल्लेख करून तिच्यासंबंधी निंदाव्यंजक लिखाण करणे वा प्रसिद्ध करणे हा कायद्याच्या विरुद्ध अपराध ठरतो.

परामर्श
१. काय खाण्यायोग्य आणि काय अयोग्य हा प्रश्न आहारशास्त्राचा आहे, आरोग्यशास्त्राचा आहे. धर्मशास्त्राच्या हाती बुद्धीचा लगाम दिला की, केवढ्या मोठ्या क्रौर्याला लोक धर्माचरण समजतात हे दाखवणे हाच या सत्यनिवेदनाचा लाभ.
२. पाराशरस्मृतीने गोहत्या वर्त्य सांगितली म्हणून तिचे गोडवे गावे आणि स्त्रीहत्या धर्मसंमत केली तर तिचे काय करावे? प्रकाशात आलेली एक १० वर्षांच्या फुलमणीची हत्या आणि कोर्टापुढे न आलेल्या कोण जाणे कितीतरी हत्या बंगालमधील भद्रलोक पाराशरस्मृतीच्या नावावर समर्थनीय समजत होते, त्याचे काय? (संपादकीय पाहा.)
३. ‘मांस’ शब्दाची आपण दिलेली व्युत्पत्ती कल्पनारम्य आहे. ती मनुस्मृतीत असूनही मैथिली विद्वान ब्राह्मण आजही मांसाहारावर यथेच्छ ताव मारतात. कुठल्याही प्राण्याची हिंसा करू नका’ हा मुख्य वैदिक आदेशही मोठ्या प्रमाणात धार्मिक हिंदु समाजाने असाच धाब्यावर बसविलेला दिसतो. गुवाहाटी (आसाम) च्या कामाख्या मंदिरात, कलकत्त्याच्या कालिमंदिरात आणि फार दूर कशाला तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात (आणखी अशा असंख्य देवस्थानी) मुक्या पशूची हत्या केल्याशिवाय देवता प्रसन्न होत नाही असे वाटणारे भक्त कमी झाले नाहीत.
४. सध्या वेद, मनुस्मृती यांना कोणी विचारीत नाही हेही खरे नाही. यज्ञाचे अजूनही लोकांना आकर्षण आहे. अश्वमेध आणि इतर प्रकारचे नाना यज्ञ यांचा सतत डांगोरा पिटला जातो.
५. विश्वाला आर्य करायला निघालेल्या (कृण्वन्तो विधं आर्यम्।) वर्गाने आपल्या पायातल्या अंधश्रद्धा आणि रूढीच्या मणामणाच्या बेड्या तोडणे आधी आवश्यक आहे. कालबाह्य धर्मशास्त्रांच्या पट्टया डोळ्यांवरून काढल्याशिवाय कोणीही समाजाला मार्ग दाखवू शकत नाही.
श्रुति-स्मृति-पुराणोक्ताच्या आंधळ्या समर्थकांनी ह्या भरतभूचे किती नुकसान केले याची त्यांना स्वतःला कल्पना नाही आणि कोणी जाणीव करून दिली तर ती खपतही नाही. ६. वस्तुस्थिती आणि निंदा-स्तुती यांत फरक आहे. ऐतिहासिक वस्तुस्थिती साधार सांगणे ही ना निंदा ना स्तुती.

पत्र -२
बा. के. सावंगीकर, ४७५, प्रोफेसर्स कॉलनी, हनुमान नगर, नागपूर – ४४० ००९
१. ब्राह्मणांचे गोमांसभक्षण सिद्ध करण्यासाठी आप्तप्रामाण्यविरोधी बौद्ध विचारवंत सोयीत बसेल तेव्हा व ते आप्तप्रामाण्य स्वीकारतात व जे गैरसोयीचे आहे ते नाकारतात असे दिसते.
२. हजारो वर्षांपूर्वी जी निंद्य गोष्ट हिंदू करीत होते ती त्यांनी केव्हाच विचारपूर्वक त्यागली व तिचा धिक्कार केला म्हणून ते अभिनंदनाला पात्र आहेत, निंदेला नव्हे.
३. पाराशरस्मृतीत कलिवर्यप्रकरणात असा श्लोक आहे.
अश्वालंभ, गवालंभ, संन्यासं, पलपैतृकम्।
देवरात् च सुतोत्पत्तिः, कलौ पंच विवर्जयेत्।।
(म्हणजे घोड्याचा बली, गौवंशाचा वली, संन्यास, मांसयुक्त पिंडदान, दिरापासून संतानप्राप्ती ह्या ५ गोष्टी कलियुगात वर्ण्य कराव्यात. – संपा.)

परामर्श
१. वेदकाळी ब्राह्मण गोहत्या करीत हे ज्ञान बौद्धांना आप्तवचनाने मिळाले हा आपला ग्रह टिकणारा नाही. वेद आणि वैदिकांचे धर्मग्रंथ बौद्धांना आप्तवचन होऊ शकत नाहीत. आप्तवचनाच्या आधारे लौकिक गोष्टींची माहिती मिळत नाही.
२. वैदिकांनी विचारपूर्वक पशुहत्या त्यागली ह्या म्हणण्यापेक्षा वेदनिंदकांच्या मर्मभेदक भडिमारामुळे यज्ञीय हिंसा थांबली हे जास्त पटण्यासारखे आहे. यज्ञविरोधक म्हणतात वृक्ष तोडून, पशूना मारून, रक्ताचा चिखल करून जर स्वर्ग लाभत असेल तर मग नरक कशाने मिळतो?
(वृक्षान् छित्वा, पशून् हत्वा, कृत्वा रुधिरकर्दमम्।
यदि वा गम्यते स्वर्ग, नरकं केन गम्यते? ।।)
यज्ञीय हिंसा थांबली म्हणून काय झाले? श्रुति-स्मृति-पुराणांचा बडिवार माजवणे, सत्यनारायणासारख्या खुळचट कथा-पोथ्यांवर विश्वास ठेवणे धर्मधुरीणांनी सोडले असे आपल्याला म्हणायचे आहे काय?
३. कलियुग इ. स. पूर्व १३ फेब्रु ३१०२ ला सुरू झाले. तेव्हापासून गेल्या सुमारे ५ हजार वर्षांत आणि आजही सहस्रावधी संन्यासी दिसतात ते कसे? श्री शंकराचार्य, स्वामी विवेकानंद इत्यादींना पाराशरस्मृतीचे हे कलिवयंप्रकरण माहीत नसावेसे दिसते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.