‘माझं घर’च्या निमित्ताने

‘माझं घर’ या जयंत पवार लिखित नाटकाचा प्रयोग नुकताच पाहिला. जयंत पवार हे प्रायः समस्याप्रधान नाटकलेखक म्हणून जसे परिचित आहेत तसेच सकस नाट्यसमीक्षक म्हणूनही सुपरिचित आहेत. हेही नाटक एक कौटुंबिक समस्या घेऊनच तुमच्या समोर येते, पण ते केवळ तुमच्यापुढे समस्या ठेवत नाही तर तिला उत्तरही देते.

नवरा कलावंत! आपल्याला जपावे, फुलवावे ही त्याची बायकोकडून अपेक्षा. बायको ही केवळ गृहिणी नाही तर ती बँकेत नोकरी करणारी + घर सांभाळणारी + सासूबाईंची सेवा करणारी + आपल्या अकरा वर्षांच्या मुलीची सर्वार्थाने काळजी घेणारी एक स्त्री आहे. (आणखी किती अपेक्षांचे ओझे विवाहित स्त्रीवर लादणार? अशा परिस्थितीत इतर पन्नास कामांबरोबर ‘तेही’ एक एकावन्नावे काम ठरले तर दोष कोणाचा?) तीही कलावंत आहे, उत्तम सतारवादक आहे, कथ्थक नृत्य शिकलेली आहे. (याची फक्त अंधुकशी कल्पना नवऱ्याला आहे.) ती हे सर्व बाजूला ठेवून सासरी आल्यावर हे घर आपले, स्वतःचे समजून, स्वतःला त्या घराशी पूर्णपणे एकरूप करून घेते. अन् अचानक एका रात्री नवरा नेहमीप्रमाणे रात्री उशीरा घरी परत आल्यावर त्याला तिच्यापासून घटस्फोट हवा आहे हे सांगतो. कारण काय? तर त्याची देखभाल करणारी, यंत्रवत् बायको त्याला नको, तर त्याच्या कलेला खतपाणी घालणारी, त्याच्या आवडीनिवडी जपणारी अशा प्रेयसीच्या रूपात त्याला बायको हवी आहे. (हे अकरा वर्षे संसार केल्यावर उमगले!) आणि तशी स्त्री त्याला त्याच्या ऑफिसमध्ये काम करण्याच्या नंदिताच्या रूपाने भेटलेली आहे. तिच्याशी तो विवाहबद्ध होणार आहे. वगैरे, वगैरे!

ज्या घरासाठी आपण रक्ताचे पाणी केले ते अचानक असे सोडून जावे लागणार – मग ‘माझे roots कुठले?’ हा बायकोला पडलेला गंभीर प्रश्न! माहेरी तू परक्याचे धन’ म्हणून सतत जाणीव देत संवर्धन केले जाते, तिथेही पाळेमुळे रुजू देत नाही, सासर देखील स्वतःचे म्हणण्याची सोय नाही. मग पाळेमुळे रुजवायची कुठे?

येथे लेखक नेहमीप्रमाणे तिला माहेरी पाठवून प्रश्न सोडवीत नाही. बायको काही दिवस माहेरी जाते पण ती सासरी – स्वतःच्या घरी – पुन्हा राहायला येते. नवरा तिला हाकलण्याचा प्रयत्न करतो. पण सासूबाईंना कोर्ट मानून ती हे घर माझे आहे आणि नवऱ्यालाच या घरातून बाहेर जायला सांगायला हवे हे सांगते. येथे सासूबाई स्वतःच्या मुलाला ‘तू हे घर सोडून जा’ हा आदेश ठणकावून देतात. (अशी परिस्थिती प्रत्यक्षात येईल का? एखादी सासू सुनेची बाजू घेऊन मुलाला घराबाहेर काढायला सज्ज होणे हे वास्तव प्रत्यक्षात उतरण्यासाठी किती काळ वाट पाहायची? की केवळ येणारा काळ बदलेल या आशेवरच स्त्रीने जगायचे?) त्याला कारण आहे. सुनेवर जो प्रसंग ओढवला तसाच प्रसंग भूतकाळात सासूवरही ओढवलेला असतो. पण त्या वेळी त्या रडतभेकत सासरीच मला राहू द्या ही विनंती नवऱ्याला करतात. त्याच्या पायावर तान्हे मूल (आता ज्याला घराबाहेर जाण्याचा आदेश दिला तो मुलगा) ठेवतात व तेथेच अपमानाचे जिणे जगतात. अशी वेळ सुनेवर येऊ देणार नाही म्हणून खंबीरपणे सुनेच्या पाठीशी त्या उभ्या राहतात. (येथेही सासूने सुनेची बाजू घेणे हे धक्कादायकच! एरवी सासूची वृत्ती स्वतःला जो त्रास झाला तोच सुनेलाही झाला पाहिजे ही! सासू मात्र अपवाद आहे. या अपवादाचे सामान्यीकरण केव्हा होणार?)

यथावकाश मुलगा दुसरे लग्न करतो. सुरुवातीला खंबीरपणे आपल्या पाठीशी असणारी नणंद व सासू मुलाला मुलगा झाल्यावर बदलल्या की काय ही शंका सुनेला येते. त्याचे कारण त्यांनी पुन्हा मुलाच्या नवीन घरी जाणे, त्याच्याशी संबंध ठेवणे हे! सासू नातवाला पाहून चार-आठ दिवसांनी घरी येते तेव्हा ही सैरभैर झालेली! काय करावे हे सुचत नाही. सासूच्या हे लक्षात येते. ती सुनेला समजावते. अन् काहीही झाले तरी ‘मी तुला अंतर देणार नाही’ हा शब्द देते, तेव्हा ही निश्चित होते.

मध्यंतरी सुनेचा भाऊ आपल्या बहिणीसाठी प्रपोजल घेऊन येतो. सैरभैर अवस्थेत ती नाही म्हणते परंतु नंतर सर्व शांत झाल्यावर ‘हो’ म्हणते. पण एका अटीवर. अट कोणती? तर त्या मुलाने माझ्या घरी राहायला यावे! ही परंपरा नाही! पण जरा मुलांनाही कळू देत की आपली मायेची, जिव्हाळ्याची माणसे सोडून नवीन घरी जाताना मुलीची काय अवस्था होत असेल ते! सासू सुनेच्या पाठीवरून मायेने हात फिरवून या तिच्या अटीला मूक संमती देते व नाटक संपते! एकाच प्रसंगाप्रती‘नव-याने घरातून घालवून लावणे’- सासूने आणि सूनने वक्य केलेली प्रतिक्रिया भिन्न आहे. हा केवळ काळाचा बदल नाही तर विचारसरणीचा बदल आहे आजही हे पाऊल उचलणे किती जणींना शक्य होणार?

नाटक पाहताना सतत आपल्या समाजात स्त्री पुरुषांसाठी लावल्या जाणाऱ्या भिन्न निकषांची प्रकर्षाने, पदोपदी जाणीव होत होती. हे सर्व आहे तसेच चालत राहणार हीच बहुतेकांची वृत्ती! याला कुठेतरी छेद दिला पाहिजे असे वाटतच नाही. अन् ज्यांना तसे वाटते त्यांना ‘चमत्कारिक’ म्हणून खड्यासारखे वेगळे ठेवणार! दुःख खड्यासारखे वेगळे ठेवण्याचे नाही, तर विचार समजूनही न घेता टीका करण्याचे आहे!

का नाही सुनेलाही तिची कला जपण्याचा अधिकार? नवरा कलावंत आहे, तर तीही तेवढीच तोलामोलाची कलावंत आहे. पण तिने स्वतःतल्या कलावंताला मूठमाती दिली! का नाही नव-याला असे वाटले की तिलाही फुलवावे? तिने केवळ आपल्या घरासाठी स्वतःची आहुती देऊ नये? की स्वतःच्या कोशाबाहेर हे पुरुष पाहणारच नाहीत?

लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते! का नाही मुलगा मुलीच्या माहेरी जाऊन राहात? ‘घरजावई’ आपल्याकडे तुरळक आढळत असतीलही. परंतु ती सरसकट पद्धत आपल्या समाजात कधीच नव्हती अन् नाही. उलट घरजावई जो होतो त्याची कुचेष्टा केली जाते. का? सासरी केवळ मुलीनेच का जायचे? सर्व मायेचे बंध तोडून, नवीन, सर्वस्वी अपरिचित घरात (प्रेमविवाह असेल तर ते घर थोडेबहुत परिचयाचे असते) जाऊन स्वतःला रुजवायचे! वरे, रुजवून घेतल्यावर कोणत्याही क्षणी तिला उपटून फेकून देण्याचे अधिकार मात्र मुलाला आहेतच! हा कुठला न्याय? ही कुठली माणुसकी? कधीतरी आम्ही गंभीरपणे या सर्व गोष्टींचा विचार करणार की नाही? भरल्या संसारातून एका स्त्रीला उठविण्याचे पातक करताना त्याला स्त्री जेवढी जबाबदार आहे तेवढाच पुरुषही जबाबदार आहे. (नाटकात हा नवरा ‘मी प्रामाणिक आहे. तिला सर्व सांगितले. नाही तर असे अनेक संसार सुरू असतातच की नाही?’ हा प्रश्न उलट सुनेच्या भावाला विचारतो. वारे प्रामाणिकपणा!) एकनिष्ठा ही केवळ स्त्रीकडूनच अपेक्षित? पुरुषाकडून नको? की ते सदैव फुलपाखरूच राहणार?

नाटकात स्त्रियांच्या तीन पिढ्या (म्हटले तर चार पिढ्या! पण ‘राणी’ अजून खूप लहान आहे.) वावरताहेत! मागच्या पिढीची सासू-मधल्या पिढीची सूनतर आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी नणंद-ऊर्मिला-ही बिनधास्त आहे. ती कोल्हापूरला शिकायला म्हणून एकटीच होस्टेलला राहते. तिचा लग्न या गोष्टीवर विश्वास नाही. तिला ‘विकास’ आवडतो. त्याच्याशी तिचे लैंगिक संबंध आहेत अन् यात तिला काहीही गैर वाटत नाही. ती आपल्या वहिनीला हे मोकळेपणाने सांगते. (पण आईला मात्र सांगू नको हेही सांगते. ते का?). आता ऊर्मिला ही तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी मानली तरी किती घरातून मुलीला इतके बिनधास्त वाढविले जाते/जाईल? (हे ऊर्मिलाच्या वागण्याचे समर्थन नव्हे.) ती जे वागते आहे, ते समजून घेऊन, तिच्या विचारांचे स्वागत, आस्थेवाईकपणाने विचार किती घरातून होईल?
लेखकाने अनेक मुद्द्यांच्या बाबतीत आतापर्यंत असलेली समाजमान्य चौकट मोडण्याचे प्रयत्न केले आहेत.

नाटकाची संहिता विचारप्रवर्तक नक्कीच आहे. त्यात सुचविलेली काही उत्तरे प्रत्यक्षात उतरायला हवीत. कलाकारांनी आपापली कामे छानच केली आहेत. सैरभैर, भरल्या संसारातून उखडलेली सून, क्षमा राज यांनी मन लावून उभी केली आहे. तर तिच्या पाठीशी खंबीरपणे, भक्कमपणे उभी असलेली सासू ज्योती चांदेकर यांनी वठविली आहे. दोन्हीही कलाकार रंगमंचाला अपरिचित नाहीत. नाटकाच्या इतर अंगांविषयी-संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना इ. बोलण्याची कुवत माझ्यात नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.