पत्रव्यवहार

आजचा सुधारक, जानेवारी २००० मधील नंदा खरे यांचा ‘एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा’ हा लेख परत परत वाचला. इथे कै. मृणालिनी देसाई, या गांधीवादी लेखिकेची आठवण होणे अपरिहार्य आहे. ज्या काळी मिश्रविवाह हेच एक धाडस होते, त्या काळात महाराष्ट्रीय मृणालिनीने गुजराती पतीशी विवाह केला. पतीच्या कुटुंबात ती समरस झालीच पण देसाई कुटुंबीयांनीही या बहूचा प्रेम-आदर राखला. गुजराती समाजात, विवाहप्रसंगी झडणा-या जेवणावळी पाहून गरिबांचा कळवळा असणा-या मृणालिनीने अशा प्रसंगी न जेवण्याचा निर्णय घेतला. नवी बहू ‘नाही’ म्हणतेय हे पाहून हळूहळू सर्व देसाई कुटुंबानेच अशा जेवणावळींवर बहिष्कार घातला. ही खरी ‘जबाबदारीची जाणीव, विचारांची प्रगल्भता!’ हे तुम्हा आम्हास जमेल काय?
दुस-या एका लेखकाचीही इथे आठवण येते. कोणत्याही प्रकारची सुधारकी भूमिका स्वतःकडे न घेता, सातत्याने शोधपूर्वक दिसलेले सामाजिक सत्य सांगणारे त्यांचे लेखन, मनाला भिडणारे व वाचनीय असे असते. हे विचारप्रवर्तक लेखन कसे घडते? डॉ. अनिल अवचटांसारखे असे लेखन नंदा ख-यांना जमेल काय? फॅक्टरी बंद पडलेली असताना, कामागारांचे पगार थकलेले असताना, मोर्चे निघत असतानाही फॅक्टरीमालक राजेशाही विवाहसमारंभ थाटात पार पाडतो व आम्ही मध्यमवर्गीय तेथे आनंदाने हजेरी लावतो ही सध्या वस्तुस्थिती आहे. – अशा विषयावर अध्ययन, संशोधन करून ख-यांनी अवचटांसारखा विचारप्रवर्तक लेख लिहिला तरच आम्ही मानू की ख-या अर्थाने ख-यांनी विचारांची प्रगल्भता, जबाबदारीची जाणीव, औदार्य, सौजन्य इत्यादि गुण प्रकट केले आहेत. कारण आधी केले, मग सांगितले! असाच सुधारक आजही समाजास हवाय नाही का?
११, मानस बेझंट रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई – ४०० ०५४ कल्पना सु. कोठारे

फेब्रु २००० चा अंक मला पोचला. पुणे-मित्रमेळाव्याचा वृत्तान्त (पृ. ३३१ आणि ३५०) वाचला. आ. सु.चा टाइप आहे त्यापेक्षा मोठा करण्याची गरज नाही. मोठा म्हणजे आणखी किती मोठा करणार? आ. सु. बाबतच्या वाचकांच्या अपेक्षा वाढत आहेत, हे स्वागतार्ह. राज्यघटनेचा फेरआढावा; संघाचे राजकारण: सामाजिक, सांस्कृतिक की राजकीय; असे ताजे विषय व आ. सु. ची स्पष्ट भूमिका, हे सर्व आता प्रकाशात आले पाहिजे. पत्र-परामर्श आवडला.
केशव एकनाथ पोतदार

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.