सावर.. रे !

भारत सासणे यांच्या ‘एका प्रेमाची दास्तान’ ह्या कथेचे नाट्यरूपांतर केलेले सावर रे! हे नाटक नुकतेच पाहिले. नाटक वैचारिक, संवादप्रधान आहे. विषय प्रौढ अविवाहित स्त्रीसंबंधीचा आहे. नायिका इंदू ही बुद्धिमान असल्यामुळे लहानपणापासूनच ‘तू इतरांपेक्षा वेगळी आहेस’ हे तिच्या मनावर बिंबवलेले. एरवी, ‘तू मुलगी आहेस, परक्याचे धन आहे’ वगैरे, वगैरे चाकोरीबद्ध विचारांपासून तिला जाणीवपूर्वक दूर ठेवलेले. इंदूदेखील यशाचा एक एक टप्पा सहज गाठत जाते. मेरीट मध्ये येणे, इंग्रजीत एम्. ए. करणे, प्राध्यापक म्हणून सफल होणे, पीएच. डी. होणे, संशोधनपर लेख लिहिणे, चर्चासत्राला जाणे इ. इ. ह्या यशाची धुंदी तिलाही चढलेली, त्या कैफातच ती सतत वावरते. ह्या तिच्या यशात तिच्या वडिलांचे योगदान खूपच मोठे. आईचे निधन तिच्या लहानपणीच झालेले. वडिलांनीच माता-पिता ह्या दोन्ही भूमिका निभावलेल्या! दरम्यानच्या काळात वडिलांचे निधन झाल्याने आता ती एकटी अगदी एकटी असते. स्वतःची ‘विचारवंत’, ‘विदुषी’ ही प्रतिमा तिला भावते, स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात ती पडते.

पण हळूहळू ह्या यशाची धुंदी उतरते. कुठेतरी आपणही माणूस आहोत, आपल्यालाही भावना आहेत, कोणावर तरी मनापासून प्रेम करावेसे वाटते ह्याची जाणीव तिला होते. यशाच्या कैफात, ज्या वयात जे करावेसे वाटणे स्वाभाविक असते त्याकडे प्रयत्नपूर्वक पाठ फिरवलेली! कुठेतरी तळमनात त्या नाजुक भावनांना ढकलून दिलेले! पण आयुष्यात जे जे मिळवायचे होते ते ते मिळविल्यावर स्वतःचा व्यक्ती म्हणून विचार मनात येतो. भावनिक गोंधळलेल्या, द्विधा मनःस्थितीत तिचा डॉ. भाल ह्यांच्याशी परिचय होतो. डॉ. भाल हेही बुद्धिमान!

व्यवसायाने डॉक्टर आणि विवाहित. इंदू त्यांच्या बोद्धिक दराऱ्याने दिपून गेलेली. तर डॉ. भालदेखील आपल्याला एक बुद्धिमान मैत्रीण मिळाली ह्या आनंदात! बौद्धिक स्तरावरील मैत्री केव्हा तरी नकळत शारीरिक पातळीवर येते! इंदूवर त्यांचे व इंदूचे त्यांच्यावर प्रेम आहे. पण ह्या सर्वांचा शेवट काय?

इंदू ह्या भावनिक संघर्षातून, कल्लोळातून आपल्याला वाट दाखवावी, मार्गदर्शन करावे म्हणून व्यंकटेश ह्या तिच्या वर्गमित्राला सल्ल्यासाठी बोलावते. व्यंकटेश हा व्यवसायाने डॉक्टर, आपल्या गावी व्यवसाय अधिक शेती करणारा, त्याची पत्नी – जानकी-मॅट्रीक पास, पूर्णपणे खेड्यात राहिलेली, त्यांची कन्या इंदूच्याच गावी होस्टेलवर राहून शिकणारी!

व्यंकटेश इंदूने बोलवल्याप्रमाणे येतो. ती त्याला सर्व भावानिक गुंता सांगते. व्यंकटेश शांतपणे सर्व ऐकतो. डॉ. भालही त्याला भेटतात. ते त्यांची कैफियत व्यंकटेशसमोर मांडतात. डॉ. भालची बायकोही त्याला भेटते. तीही तिची बाजू मांडून ‘माझा वीस वर्षांचा संसार उद्ध्वस्त होऊ नये अशी अपेक्षा त्याच्याजवळ व्यक्त करते व इंदूला त्याने समजवावे ही विनंती करते. हा सगळा तिढा कसा सुटणार? ह्याची उत्सुकता शिगेला पोहचते. अन् व्यंकटेशची पत्नी जेव्हा इंदूच्या घरी येते, सर्व ऐकते, तेव्हा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तिला सांगते ‘लग्न कर’ इंदूही तिने सुचविलेल्या ह्या पर्यायाला मूक संमती देते व तिला बिलगते.’

प्रेक्षकांच्या मनात येथून प्रश्नांना, विचारांना सुरुवात होते. पहिल्या पूर्ण अंकात इंदूची भावनिक अस्वस्थता, त्यातून तिला मार्ग न सापडणे, काय करावे ही गोंधळलेली अवस्था! व्यंकटेशसमोर मांडलेली कैफियत! हे सर्व सुरू असताना नकळत प्रेक्षक कुठेतरी स्वतःला इंदूशी एकरूप करतो. अन् खरंच, एखाद्या प्रौढ अविवाहित स्त्रीची ही समस्या असेल तर ह्यातून काय मार्ग निघेल ह्याची उत्सुकता त्याला वाटते. इंदूला डॉ. भाल यांचा संसार मोडायचा नाही असे ती म्हणते पण कधीतरी डॉ. भालने हा सर्व प्रश्न त्यांच्या पत्नीसमोर मांडावा असेही तिला वाटते. मुळात इंदूला वाटते तसे डॉ. भाल आपल्या पत्नीला विचारीतच नाहीत. ते भेकड आहेत. त्यांना पत्नी हवी आहे, सामाजिक प्रतिष्ठाही हवी आहे, तिला कुठेही तडा जाऊ नये असेही वाटते, अन् इंदूसारखी मैत्रीणही हवी आहे. (म्हणजे डॉ. भालदेखील सर्वसामान्य पुरुषच आहेत.) ह्या ठिकाणी मनात प्रश्न येतो, खरंच इंदू व डॉ. भाल ह्यांची मैत्री ही वौद्धिक पातळीवर होती का? त्यांचे एकमेकांशी शारीरिक संबंध येणे ही त्यांच्या मैत्रीची, प्रेमाची परिणती असू शकेल पण मुळात एकमेकांशी झालेली मैत्री ही शारीरिक आधारावर होती की बौद्धिक? इंदूकडून ती बौद्धिक पातळीवर असावी असे वाटते. पण डॉ. भाल मात्र इंदूचा ‘उत्तम sex’ एवढाच विचार करतात. म्हणजे कुठेतरी इंदूचे स्त्री असणेच तिच्या बुद्धिमत्तेपेक्षा वरचढ ठरते. व डॉ. भालदेखील केवळ ‘पुरुषच’ ठरतात!

डॉ. भाल ह्यांचे इंदूकडे आकर्षिले जाणे आपण समजू शकतो. सर्वार्थाने इंदू ही त्यांच्या पत्नीपेक्षा सरस आहे. पण वीस वर्षांपूर्वी जेव्हा त्यांचा विवाह (तो त्यांच्या मर्जीविरुद्ध होतो हा उल्लेख नाटकात येतो.) होतो तेव्हा त्यांनी पत्नीला स्वीकारलेले असते. तिच्या माहेरच्या पैशावर ह्यांचे उच्च शिक्षण, दवाखाना थाटणे, हे वैभव मिळविलेले असते. मुळात बुद्धिमान अन् पुढे विवाहानंतर यशाचा एक एक टप्पा गाठलेले! ह्या सर्व विकासात पत्नी खूपच मागे पडलेली! अन् मग कुठेतरी विसंवादाला सुरुवात झालेली! एखाद्या विषयावर चर्चा करावीशी वाटली तर ती पत्नीजवळ करण्याची सोय नाही. अशा कोंडीत इंदूचे त्यांच्या आयुष्यात येणे हे सगळे समजू शकते. कोणतेही पति-पत्नी विवाहाच्या वेळी एकत्र येतात तेव्हा ज्या गोष्टींना अग्रक्रम दिला जोतो त्या वेगळ्या असतात. परंतु नंतर जसजशी वर्षे उलटतात तसतसे दोघेही स्वतःच्या विकासाच्या नव्या नव्या वाटा शोधू लागतात. (विकसित करण्याची दोघांचीही वाट एकच असेल तर उत्तम. पण सहसा असे आढळत नाही. ह्या विकासात मग पत्नीच्या संदर्भात पतीला स्थान असेल का? किंवा पतीच्या विकासात पत्नीला स्थान असेल का हे प्रश्न निर्माण होतात. खूपदा लक्षात येते की दोघांचाही होणारा विकास स्वतंत्र मार्गांनी होतोय. ते मार्ग कुठेही एकमेकांना छेदत नाहीत. अशा वेळी नात्याने पति-पत्नी, राहणे एका घरात मांडलेला संसार कसातरी सुरू असतो, बाह्यतः सर्व आलबेल दिसते. पण मनाने दोघेही एकमेकांच्या पार दूर गेलेले! मग तिला कोणीतरी जिवाभावाचा सखा भेटतो, ह्याला कोणीतरी सखी भेटते! हे सर्व जोवर मांडलेला संसार मोडत नाही तोवर ठीक आहे! पण त्यामुळे जर संसार उद्ध्वस्त होत असेल तर ???

इंदूचे डॉ. भालकडे आकर्षित होणेही स्वाभाविक आहे. इंदू विवाहित असती तर हा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा झाला असता. इंदूला जाणवलेल्या एकटेपणावर डॉ. भाल यांच्यांशी मैत्री हा मार्ग असूही शकेल. पण ‘एकटेपणा’ ही प्रत्येकाच्याच वाट्याला अटळपणे येणारी एक घटना आहे. अविवाहित असणे हे त्याचे एकमेव कारण नाही. विवाहित व्यक्तीदेखील, चार चौघांत राहूनही पूर्णपणे एकट्या असू शकतात. कोणाला तो एकटेपणा भावतो, आवडतो. कोणाला तो आवडला नाही तरी अटळ म्हणून स्वीकारणे भाग आहे हे सत्य उमगते. त्याला इलाज नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. कोणीही कोणातही स्वतःला पूर्णपणे विलीन करू शकत नाही. स्वतःचे ‘स्वतः’ असणे हे शेवटी उरणारच की!

नाटक पाहताना सर्वांत खटकलेली गोष्ट म्हणजे व्यंकटेशच्या खेडवळ, अशिक्षित पत्नीने इंदूला ह्या समस्येवर तोडगा म्हणून विवाहाचा सल्ला देणे आणि इंदूने तो पर्याय सुचविल्याचा आनंद व्यक्त करणे. (जानकी अशिक्षित असली तरी अनुभवाने समृद्ध आहे. त्यामुळे ती अशिक्षित आहे म्हणून तिने दिलेला सल्ला मान्य करण्याची गरज नाही हा येथे मुद्दा अजिबात नाही.) ह्या गुंत्याचे इतके सोपे उत्तर द्यावयाचे होते तर पहिल्या अंकातला इंदू व व्यंकटेशचा वैचारिक संवाद व्यर्थच होता म्हणायचे! अन् विवाह हाच पर्याय का? पुन्हा कुठेतरी आहे ती चौकट स्त्रीने स्वीकारायला हवी का? पुरुष अविवाहित राहत नाही का? त्यांची स्त्रियांशी मैत्री, शारीरिक संबंध असत नाहीत का? हे इतरांना माहीत नसते का? मग ह्यावर त्यांना कोणी ‘तुम्ही विवाह करा’ हा सल्ला का देत नाही ? पुन्हा स्त्रीपुरुषांच्या संदर्भात समाजात रूढ असलेल्या भिन्न निकषांची येथे प्रकर्षाने जाणीव होते. स्त्रीकडे आम्ही स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहायला केव्हा शिकणार? समजा तिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध आले तरी ती लगेच हीन चारित्र्याची का मानली जावी? की चारित्र्य, शुद्धता ही केवळ स्त्रीनेच सांभाळायची? पुरुषांना रान मोकळे ? संस्कृतिरक्षणाची जबाबदारी केवळ स्त्रीचीच?

शेवटी जाता जाता नाटकाच्या शीर्षकाविषयी थोडेसे! सावर रे ! हे कोण, कोणाला उद्देशून म्हणत आहे? इंदू व्यंकटेशला म्हणतेय का? की डॉ. भाल ला? डॉ. भालला ती म्हणत नसावी कारण डॉ. भाल केवळ ‘पुरुष’ आहे, वृत्तीने भेकड आहे हे तिच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत तिच्या मनात कमालीचा कोरडेपणा येतो. कदाचित ती व्यंकटेशला उद्देशून म्हणत असावी. पण ह्याहीपेक्षा तिने स्वतःच स्वतःला उद्देशून हे का म्हटले नाही? आपल्याला दुसऱ्या कोणीतरी सावरण्यापेक्षा, स्वतःच स्वतःला का सावरू नये? स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात मोहाचे क्षण येतात, नाही असे नाही. पण अशा कसोटीच्या क्षणी दोघांनीही स्वतःला सावरले तर मला वाटते, निकोप मैत्रीही राहू शकेल व कुठेही आपल्या प्रतिमेला तडा तर गेला नाही ना ही बोच, हा सलही मनात राहणार नाही.

३/४, कर्मयोग, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर – ४४० ०१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.