मुक्काम नासिक – १५ एप्रिल २०००

नासिक शब्द कसा लिहायचा? नाशिक, नाशीक की नासिक? नासिका म्हणजे नाक. भौगोलिक संदर्भ घेऊन सह्याद्रीच्या पाच शाखांपैकी एक जी सातमाळा ती नाकासारखी पुढे येऊन हा परिसर झाला असावा. असे अनुमान करता येईल. जुन्या नाशकाचा भाग पन्नास हजार वर्षांपूर्वी जलाशयाखाली होता हे तिथे सापडलेल्या अश्मीभूत (fossils) अवशेषांवरून समजते असे भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात. पण या भौगोलिक म्हणा की प्रागैतिहासिक म्हणा, विशेषांपेक्षा नासिकचे सुधारकी मनाला चकित करणारे एक वैशिष्ट्य आहे. खरे वाटणार नाही पण तिथल्या एका चौकाचे नाव चार्वाक चौक असे आहे. आता चार्वाकासारख्या वेदनिंदक नास्तिकाचे नाव सिंहस्थपर्वणीचे माहात्म्य लाभलेल्या या गोदाकाठच्या तीर्थक्षेत्राला कसे भावले असावे? ह्या प्रकारामागे थोडा गनिमी कावा आहे. शिवसेनेचा ताबा या महानगरावर असताना चार्वाक चौक हे नामकरण झाले. संदीप भावसार आणि इतर चार्वाकभक्तांनी नगर सेवकांना चार्वाक एक महान् प्राचीन संत आहे असे सांगितले आणि काम झाले. चौकाचे ‘संत चार्वाक चौक’ असे नामकरण झाले.
सा. वा. ना. (सार्वजनिक वाचनालय नासिक) हे सव्वाशे वर्षांहून जुने वाचनालय खुद्द लोकहितवादींच्या वेळचे. लोकहितवादी मंडळ, नाशिक या संस्थेच्या वाढदिवसाच्या प्रसंगी श्री. गोवर्धन पारीख यांनी लोकहितवादींच्या कार्यावर १९६९ मध्ये दिलेली व्यासंगपूर्ण व्याख्याने मौजेने पुस्तकरूपाने काढली आहेत. नासिकचे आम्हाला भावलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथला काळाराम-मंदिर सत्याग्रह. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने मंदिर प्रवेशासाठी हा सत्याग्रह झाला. ५ वर्षे ८ महिने इतका दीर्घकाळ चालला. (मार्च १९३० ते ऑक्टो. १९३५). या मुक्कामात ते स्थळ पाहायला मिळाले.
महाराष्ट्रात पुण्याखालोखाल मराठीपणा सांभाळून असलेल्या या नगरीला खूप देदिप्यमान पार्श्वभूमी आहे. इतिहास आहे, वर्तमानही आहे. नाशकात आ. सु.चा प्रवेश कवी कुसुमाग्रज आणि नाटककार वसंत कानेटकर यांच्या घरी जरी प्रथम झाला तरी आ. सु.चा सूर ओळखण्याचे श्रेय आहे लोकेश शेवडे यांना. १९९३ चा सुमार असेल. प कु द (पळशीकर, कुरुंदकर, दलवाई) यांच्या विचारांचा हवाला देऊन स. ह. देशपांड्यांनी लिहिलेला एक लेख लोकेशच्या वाचनात आला. जिज्ञासेने केलेल्या पत्रव्यवहारात लोकेशला स. हं. कडून आ. सु.चे नाव कळले. लोकेशने आ. सु.ची स्वतः ओळख करून घेतली अन् स्वतःच्या आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना करून द्यायचा प्रघात पाडला. परिणामी नासिकच्या ६० वर्गणीदारांची नावे आ. सु.च्या दप्तरी दाखल झाली. आजच्या आ. सु.—- मित्रमेळ्यात मोहन गुंजाळ यांनी पावती दिली की पहिल्या वर्षी लोकेशने माझी वर्गणी भरून सुधारक मला भेट म्हणून दिला. वर्षभरात घरच्या सगळ्यांनाच आ. सु. आवडू लागला. पुढे आम्ही स्वतःहून वर्गणी-दार झालो. गुंजाळ यांचे उदाहरण प्रातिनिधिक असावे. नाशकातील आ. सु.च्या वर्गणीदार–वाचकांत मुख्यतः तरुण मंडळींचा भरणा आहे, ह्या गोष्टीचे आम्हाला अप्रूप आहे. लोकेशच्या अवती भोवतीची आणि संपर्क–सान्निध्यातली सुरेन्द्र देशपांडे, श्रीकांत हलदुले, मिलिंद मुरुाकर–अश्विनी कुळकर्णी, तुषार अंधृटकर आणि असा ठाकूर, आनंद क्षेमकल्याणी आणि विवेक भारदे अशी एकापेक्षा एक तरुण मंडळी या वाचकमेळ्यात आमच्या ओळखीची झाली. पुण्याचे राजीव साने, अभ्यागत, हा आमच्या दृष्टीने मित्रलाभ झाला.
पुण्याच्या वाचक-मेळाव्याच्या धर्तीवर त्याच धाटणीची सम्मेलने अमरावती आणि नासिक येथे झाली. पुण्याची धाटणी म्हणजे सलग चार तासांची बैठक. अर्थात मध्ये चहापानाचा अर्धविराम. अमरावतीप्रमाणे नासिकलाही वेळ कमी पडला असे वाटण्याइतपत या बैठकी रंगल्या. अमरावतीची वेळ दुपारी एकची तर नासिकची वेळ दुपारी तीनची. (तारीख १५ एप्रिल — शनिवार) स्थळ ग्रीन–व्ह्यू–हॉटेलचा रम्य हिरा हॉल. हा हिरा–हॉल, हिरव्या तृण-वन राजींनी वेढलेले एक नीरव स्थान. कोणी औपचारिक अध्यक्ष नव्हते. आयोजकांना आत्मानुशासन अभिप्रेत असावे. आरंभी लोकेशने आ. सु.चे संपादक प्र. ब. कुळकर्णी, माजी संपादक दिवाकर मोहनी आणि या मेळाव्यासाठी विशेष आमंत्रित आ. सु.चे लेखक नागपूरचे प्रा. ह. चं. घोंगे यांचा धवल-शाल आणि गुलाब–पुष्प देऊन आदरसत्कार केला आणि (याच क्रमाने) पाहुण्यांनी मनोगत सांगावे व त्यावर श्रोते-वाचकांनी मनमोकळा प्रतिसाद द्यावा, अशी घोषणा केली. वेळोवेळी शंका-सूचना व्यक्त करण्याची मुभा होतीच. श्री. राजीव साने यांना आ. सु.च्या आधारभूत तत्त्वज्ञानाविषयी काही एक मत विस्ताराने मांडायचे आहे ते साने योग्य वेळी मांडतील अशा खुलाशाने सभा सुरू केली.
आ. सु.ची विचारसरणी, आजवरची वाटचाल, स्थापनेची थोडीशी कुळकथा प्र. बं. नी कथन केली. दिवाकर मोहनींना एक मुद्दा श्रोत्यांच्या मनावर ठसवायचा होता तो त्यांनी आपल्या अंगभूत मवाळपणाने आणि इतक्या हळुवार आवाजात मांडला की त्यामागचा त्यांचा आग्रह श्रोत्यांच्या मनावर ठसला की नाही याची शंका यावी. मोहनींचा मुद्दा असा होता : आ. सु.चा म्हणण्यापेक्षा, विवेकवादाचा प्रसार भराभर होईल अशी अपेक्षा आम्ही, निदान मी (मोहनी) ठेवतच नाही. कारण मनुष्य स्वभावाने, श्रद्धावान आणि शिक्षणाने, मनन-चिंतनाने, विवेकी होऊ शकतो. त्यांचा दृष्टांत असा की बदक पाण्यात उतराते तितक्या सहजपणे मनुष्य भाषा उचलतो. पण लिपी, लेखनकला मात्र त्याला यत्नाने साध्य करावी लागते. (मोहनी एका स्वतंत्र लेखात ही भूमिका आ. सु.त मांडतील). विशेष–निमंत्रित प्रा. घोंगे यांची व्यथा अशी की कौटुंबिक संस्कार आणि धार्मिक वातावरण यांत वाढलेली आपली बहुधा अखेरची पिढी. आपल्या मुलाबाळा-नंतर येणारी त्यांची मुलेबाळे म्हणजे तिसरी पिढी ही संस्कारशून्य राहणार आहे. चंगळवादाच्या विळख्यात सापडलेल्या पुढील पिढ्यांना जीवनदृष्टी कोणी द्यावी? किंबहुना त्यांच्या ठिकाणी जीवनदृष्टी कोणती यावी, हा विचार करण्यासारखा प्र न आहे. आपल्या पुढच्या पिढीची विज्ञाननिष्ठा तंत्रज्ञानापुरती असल्यामुळे त्यांच्या पुढची पिढी पूर्ण चंगळवादी होण्याची खरी भीती आहे. आ. सु. ने त्यांच्यासाठी काही कार्यक्रम मांडावा. या मुद्द्यावर पुष्कळच जिवंत चर्चा झाली. चहापानाच्या अर्धविरामानंतर राजीव साने यांनी आपला विचारप्रबंध मांडला. औद्योगिक क्षेत्रातले विवेकीकरणाचे प्रयोग हे त्यांचे अभ्यासक्षेत्र आणि कार्यक्षेत्र- देखील. दुसऱ्या शब्दांत, ते कामगार-चळवळीत काम करतात. त्यांच्याशी निगडित प्र नांची तात्त्विक आणि तत्त्वज्ञानात्मक चिकित्सा हा त्यांच्या व्यासंगाचा विषय. त्यांनी मांडलेल्या प्रबंधाला ‘कर्तृत्ववाद’ असे नाव देता येईल. त्यांचे प्रतिपादन असे की, कर्तृत्वासाठी संकल्पशक्तीची जोपासना आवश्यक आहे. कर्तृत्वाचा प्रांत विज्ञानाच्या आवाक्यापलीकडे आहे. विज्ञानाच्या नियमांना निरपवाद सार्वत्रिकपणा असतो खरा, पण मनुष्याच्या कृतीला हे नियम जसेच्या तसे लागत नाहीत. त्याच्या कर्तृत्वात सृजन, संकल्प आणि स्वीकार या तीन शक्ती आहेत. त्यांच्या अपूर्व मीलनातून कर्तृत्वाचा आविष्कार होतो. कर्तृत्वाचे दमन निसर्गनियम करू शकत नाहीत. एखादा उप-न्यास — अभ्युपगम — hypothesis मनुष्य आपल्या अंगच्या खेळकरपणातून म्हणा, प्रतिभाविलासातून म्हणा, की आचरटपणातून म्हणा मांडत असतो, सर्जनशील झेप घेत असतो. म्हणून पूर्णपणे जडवादी दृष्टी त्याच्या कर्तृत्वाला तोकडी पडते.
मनुष्याची संकल्पशक्ती हा काही तर्कनियमांनी अंकित संकल्प नसतो. या संकल्पशक्तीचा वापर कार्यकारणभावाच्या साम्राज्याबाहेर असतो. कर्तृत्वाची तिसरी जी शक्ती ती स्वीकारशक्ती. याचा अर्थ असा की जग—मनुष्याचे जग—पूर्णतः नियत नाही. त्यातल्या अनेक गोष्टी अपघाती आहेत. त्यात खुद्द आपले अस्तित्वही आले. हे जग आहे तसे आपल्याला स्वीकारावे लागते. आपण अनेक घटिते (phenomena) स्वीकारत जातो. (सर्वदा अनिच्छेने किंवा नाइलाजाने नाही.) यावस्न काय दिसते?
विज्ञान हे फक्त उपकरण (tool) आहे! आपल्या स्वीकारशक्तीवर धार्मिकांनी कब्जा केला आहे. त्यावर मात कस्न दैववाद, धर्मवाद, अध्यात्मवाद यांच्या प्रभावाची जागा इहवादी आत्मविद्येने घ्यावी.
काला कर्तुमकर्तुं विवेक असावा. उदा. समता हे मूल्य त्याला इहवादी विवेकवादातून लाभू शकत नाही हे त्याने लक्षात घ्यावे. (इहवादी आत्मविद्येचा हा प्रबंध स्वतंत्र लेखख्याने आ. सु.मधून मांडावा ही आमची विनंती सान्यांनी मान्य केली.)
तरुण श्रोत्यांमधून थोडी सैद्धान्तिक भाषा वापरणारे श्री. आनंद क्षेम-कल्याणी. आपण एका छोट्या मासिकाचे संपादक आहोत अशी आपली ओळख त्यांनी करून दिली. (त्यांच्या मासिकाचे नाव स्रग्धरा) विवेकवादी तत्त्वज्ञानाच्या अपुरेपणाकडे लक्ष वेधून ते म्हणाले,
१. विवेक म्हणजे अहंकारविरहित आत्मनिष्ठा —- असे असताना,
२. विवेकवादात जे समानतेचे प्रस्थ माजविले जाते त्याचा अर्थ काय करायचा? उदा. एक प्रोटोकॉल म्हणून सर्वांना एका पंक्तीत बसविणे म्हणजे विवेक म्हणायचे का? दुसऱ्या शब्दात नुसता सुसंस्कृतपणा म्हणजे विवेकवाद काय?
३. जगण्याच्या प्रवाहीपणाला विवेकवादाचे काही उत्तर आहे काय असा त्यांचा तिसरा प्र न. उदा. मृत्यूमुळे निर्माण होणारे प्र न. मृत्यू ही मानवाची अटळ नियती आहे हा प्र न घेऊन त्याला भिडणारा अस्तित्ववाद अधिक टोकदार वाटतो. या अटळ नियतीची दखल आ. सु.त मांडलेल्या विवेकवादात घेतलेली दिसत नाही. एवंच आ. सु. ला अभिप्रेत असलेला विवेकवाद जगण्याच्या प्रवाहीपणापुढे कसा टिकेल?
प्र नोत्तरात सहभागी झालेले आणि दादप्रतिसाद देणारे आणखी काही श्रोते–वाचक म्हणजे श्री. तुषार अंधृटकर, प्रमोद वाघदरीकर, श्रीमती शोभा कुमार, श्री. मिलिंद मुसाकर, श्रीमती अश्विनी कुळकर्णी, श्री. अरुण ठाकूर, श्री. श्रीकांत हलदुले स्वतः श्री. लोकेश शेवडे, विवेक भारदे आणि मोहन गुंजाळ. श्री. विवेक भारदे, श्रीमती शोभा कुमार आणि हलदुले यांचे प्रतिपादन श्रद्धा या विषयाभोवती फिरत होते. भारदे तारुण्यसुलभ आवेशाने म्हणाले विवेकवादी असणे हीच श्रद्धा आहे की काय? तसे असले तर ‘श्रद्धाळू–विवेकवाद’ अशी नवी संकल्पना तयार होईल. श्रीमती शोभा कुमार ह्यांचा सवाल असा की श्रद्धा आणि विवेक यांच्यात काटेकोर विभाजनरेषा काढायलाच हव्यात का? व्याख्या मांडून श्रद्धा विरुद्ध विवेक असे चित्र उभे करणे कितपत इष्ट आहे? श्री. हलदुले श्रद्धेच्या चिरफाडीने व्यथित झाल्यासारखे वाटले. ते म्हणाले, श्रद्धा ही एक लखलखती भावना आहे. ती नाकारणे शक्य नाही. ती मला आत्मविश्वास देते. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला उद्युक्त करते. पराभवावर मात करायला शिकवते. प्रदीर्घ संघर्षानंतर माझ्या मनाला शांती देते, विश्रांती देते. ती सोडण्याची भाषा मला आत्मघातकी वाटते.
श्री. तुषार अंधृटकर दिवाकर मोहनींच्या गोत्रातले —- जन्माने आणि कर्माने मुद्रणव्यवसायी. आ. सु.च्या बाह्यस्याबद्दल एक अनुभवी मुद्रक म्हणून त्यांना समाधान वाटले. सध्याचा टाईप थोडा मोठा म्हणजे १४ पॉइंटचा करावा, ही त्यांची सूचना. कारण आ. सु. वैचारिक मासिक आहे. ते वाचताना डोळे आणि मन या दोहोंवर एकदमच ताण येऊ नये म्हणून ते हा बदल त्यांना इष्ट वाटतो. दुसरे असे की, मुखपृष्ठावर दिल्या जाणाऱ्या विचाराचा आतल्या मजकुराशी संबंध दिसत नाही अशी त्यांची तक्रार. उदा. एप्रिलच्या अंकातला डॉ. आंबेडकरांचा लोकशाहीच्या पथ्यांबद्दलचा विचार. त्यांचा तिसरा मुद्दा असा की अंकाच्या पृष्ठसंख्येतील काही पाने विशिष्ट विषयांसाठीच राखून ठेवावी. म्हणजे त्यातील लेखांच्या प्रतिपादनात सलगता दिसेल आणि चौथा व शेवटचा मुद्दा हा
की, आगामी अंकातील विषयांची घोषणा चालू अंकात करावी.
मुखपृष्ठावरील विचाराच्या मुद्द्यावरून श्री. गुंजाळ म्हणाले तसले अभिमत इतर वाचकांकडूनही आले तर हवे आहे. म्हणजे समग्र अंकातील कोणता भाग आपण सर्वांत आधी वाचतो, कोणता नंतर वाचतो आणि कोणता वाचतच नाही याबद्दलचा वाचकांचा रोख कळला तर अशा अभिप्रायातून आमचे प्रतिपोषण होईल. गुंजाळ म्हणाले : आम्ही—-म्हणजे मी, माझी बायको, मुले मुखपृष्ठावरील विचार आधी वाचतो. नंतर लगेच पत्रव्यवहार वाचतो. वाचकांचा आणि लेखकांचा वाद-संवाद आणि पत्रपरामर्श आम्हाला आवडतो. गुंजाळांना वाटते की आजचा सुधारक कितीही वाचला तरी आपली विचाराची धाटणी सहसा बदलत नाही. उदा. एखाद्याचा अकल्पित मृत्यू झाला तर आपण या घटनेबद्दल त्याच जुन्या भाषेत बोलतो. नशीब, प्रारब्ध, नियती, पूर्वकर्म हीच भाषा तोंडात येते. प्रा. घोंगे यांना हा मुद्दा अधोरेखित व्हावा असे तीव्रतेने वाटले. त्यांना आकस्मिक दुःखांचा दाह सहन करायला पूर्वकर्म, प्रारब्ध हीच भाषा शीतल वाटते. तिच्यातून सांत्वना मिळते. सामान्य माणसाला जीवन सुसह्य होण्यासाठी श्रद्धा, ईश्वरनिष्ठा आवश्यक का वाटते हे आपण समजून घेतले पाहिजे असा त्यांचा आग्रह, विवेकाच्या अत्याग्रहामुळे मनुष्य रसिकता, प्रेमभावना, सौंदर्यबुद्धी, काव्य इतकेच काय आई-वडिलांची माया अशा साध्या–साध्या गोष्टींच्या आनंदाला पारखा होईल ही घोंग्यांना पडलेली भीती.
प्रा. प्रमोद वाघदरीकर हे आपण कॉलेजात गणित शिकवितो अशी ओळख करून देऊन म्हणाले, मृत्यू, मृत्यूनंतर आत्म्याचे अस्तित्व हे असले प्र न मला अप्रस्तुत — अव्याकृत वाटतात. जीवन म्हणजे इहलौकिक जीवन. ते सुखी करण्याची उत्तम विचारसरणी म्हणून मी विवेकवादाकडे पाहतो.
श्री. मिलिंद मुसाकर स्थानिक इंजिनियरिंग कॉलेजमधील प्राध्यापक. त्यांना प्र न पडला की धर्माचे नावदेखील विवेकवादाला वावडे आहे की काय? ओरिसात जिवंत जाळलेल्या फादर स्टेन्सची पत्नी धर्मसुलभ कारुण्याने प्रेरित होऊन अपराध्याला क्षमा करा म्हणते तेव्हा हे उदात्त कृत्य धर्मभावनेतून आले एवढ्यावरून कमी मोलाचे ठरते का? जे. कृष्णमूर्ती, रजनीश इत्यादी श्रेष्ठ विचारवंत मनुष्य-जीवनाचे उन्नयन करणारे जे तत्त्वज्ञान मांडतात ते आ. सु.च्या विवेकवादात का बसत नाही? स्पष्टच बोलायचे तर रजनीशांचा एखादा विचार आ. सु.च्या मुखपृष्ठावर येऊ शकेल काय? आत्मविद्येची भाषा आ. सु. ला एकदम वर्ण्य आहे काय?
स्त्री-पुरुषसंबंधांचा फेरविचार व्हावा या हेतूने आ. सु.मध्ये र. धों. कर्त्यांचे काही लेखन पुनर्मुद्रित होत असते. त्याचे स्वागत करून श्रीमती अश्विनी कुळकर्णी म्हणाल्या हे धीट लिखाण देणे आपण चालू ठेवावे. र. धों. कर्वे हा अधिकाधिक मांडला जावा, विचार व्हावा असा विषय आहे. अरुण ठाकूर यांना कामगार संप अयशस्वी का झाले या किंवा असल्या प्र नांना विवेकवादात काय उत्तर आहे असे (राजीव सान्यांचे?) सवाल अप्रस्तुत वाटतात. नशिबावर हवाला ठेवू नका. स्वतःच्या प्रयत्नाने इहलोकीचे सुख संपादन करा. ते करताना इतरांवर अन्याय करू नका. निसर्ग कार्यकारणनियमाने बांधलेला आहे. त्याला धार्मिक आणि आध्यात्मिक आशय देऊ नका. एवढा स्थूल विवेकवादी दृष्टिकोन आहे असे त्यांचे म्हणणे. श्री. अशोक वनवे सुधारकातील एका सूचनेला अनुलक्षून म्हणाले की तेथे लेखकांनी आपल्या लेखासोबत आपला परिचय द्यावा; स्वतःच्या पूर्वप्रसिद्ध लेखनाची आणि कार्याची माहिती द्यावी असे म्हटले आहे. परंतु असे लेखन किंवा कार्य पाठीशी नसणाऱ्यांनी आ. सु.त लिहूच नये की काय? समारोप करताना श्री. लोकेश शेवडे यांनी स्वतःच्या काही सूचना मांडल्या. पहिली गोष्ट म्हणजे संपादकीय कात्री थोडी औदार्याने म्हणजे थोडी जपून वापरली जावी. आपला एक लेख शस्त्रक्रिया होऊन आ. सु.त आला तेव्हा ते आपलेच अपत्य का हे मला कळेनासे झाले. दुसरी गोष्ट आ. सु.ने गंभीर चर्चांच्याबाबत फारच सोवळेपणा पाळू नये. थोडी रंजकता निरुपद्रवी असेल तर ती यावी. तिच्यामुळे आ. सु. मधील चर्चा शुष्क होण्याऐवजी जरा आस्वाद्यच होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मानवी जीवनाशी नातेसंबंध असलेले आणि पारलौकिकता नसलेले अनेक विषय आहेत ते आ. सु.त का न यावे?
कार्यक्रम संपला त्यावेळी साडेसात वाजून गेले होते. परस्पर आभारांची देवाणघेवाण करून उरलेली चर्चा उद्या दुपारी आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी, श्री. सुरेन्द्र देशपांडे यांच्याकडे करायची ठरवून औपचारिक मेळावा आम्ही संपविला.

प्रा. श्रीनिवास हेमाडे, संगमनेर कॉलेज, संगमनेर, जि. अहमदनगर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.