पत्रव्यवहार

गंगाधर गलांडे
4 Aldridge Court, Meadway, High Wycombe, Bucks, HP11 1SE, UK
आ. सु. चे स्वरूप सुधारण्याबद्दल मूळ उद्दिष्टाकडे दुर्लक्ष नको
अंकांतले श्री. श्रीराम गोवंडे यांचे पत्र वाचल्यावर मनात आलेले विचार :
आजचा सुधारकचे संपादक व संपादक मंडळ यांच्या वाचकांच्याविषयी (वर्गणीदारांची संख्या, त्यांची वैचारिक/बौद्धिक पातळी, दर्जा, इत्यादि विविध दृष्टिकोनांतून) काय अपेक्षा आहेत, तसेच वाचकमंडळींची संपादकांकडून,व मासिकाकडून काय अपेक्षा आहेत अशी छाननी/तपासणी करताना मासिकाचे मूळ हेतू, मूळ उद्दिष्ट यांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.
__आता अकराव्या वर्षांत पदार्पण करताना ३७६ ‘आजीव वर्गणीदार’ लाभलेले आहेत आ.सु.ला — कोणतीही जाहिरातबाजी न करता व मासिक आहे तसेच प्रसिद्ध होत असता. एखाद्या गुळगुळीत कागदावर अर्ध वा संपूर्ण विवस्त्र स्त्रीचे चित्र छापल्यावर जाहिरातदार तुमच्या दारी नि िचत गर्दी करतील, वाचक/वर्गणीदार-संख्याही अलबत वाढेल. आदि गोष्टी जरूर साध्य होतील मग मी मात्र दुरून इतकेच म्हणेन, “कृपया, आजचा सुधारक हे नाव मात्र बदला.”

प्रभाकर वि. पंडित
२७०१–ई, सुदामा नगर, इन्दोर (म. प्र) — ४५२ ००९
धार्मिक उन्माद वाढतो आहे
मी आ. सु.चा गेले २ वर्षांपासूनचा एक वाचक आहे. (केवळ वाचक म्हणून तटस्थ दृष्टीने २ वर्षे घालवली व आता काही लिहायचा हुरूप येत आहे म्हणून हे पत्र.)
आजकाल आपल्याला दिसून येते की पूर्ण समाजात धार्मिक उद्रेक वाढून येत आहे. एक त-हेचा उन्माद– धार्मिक उन्माद लोकांमध्ये संचारत आहे. माझ्या मते ह्याला दोन कारणे आहेत. आज आमचा मध्यमवर्ग श्रीमंत होत आहे. पाचवे पे कमिशन व वाढता व्यापार–उदीम ह्यामुळे मध्यमवर्गीय लोकांच्या खिशांत पैसा जास्तच खुळखुळत
आहे. हा पैसा परत कोठल्या तरी रचनात्मक कार्यासाठी गुंतवण्यापेक्षा धार्मिक दुकानदारीमध्ये खर्च करायची प्रवृत्ती वाढत आहे व ह्या प्रवृत्तीचा फायदा (की गैरफायदा) घेण्यासाठी धार्मिक दुकानदार आपली दुकाने रात्रंदिवस उघडी ठेवत आहेत. दुसरे कारण म्हणजे केन्द्रस्थली भाजप असल्यामुळे धार्मिक प्रवृत्तींना वेगळाच जोश येत आहे. कारण काहीही असेल पण हा वाढता धार्मिक उन्माद कोणत्याही देशाच्या स्वास्थ्यासाठी व प्रकृतीसाठी ठीक नाही. ह्याचा परमोच्च बिंदु एक विस्फोटक स्थिति निर्माण करू शकतो व म्हणून ह्या प्रवृत्तीला वेळीच रोखणे आवश्यक आहे.

ग. के. केळकर
17, Prafulla, 14, G. Pasta Rd., Dadar, Mumbai-400 014
एकतर्फी लिहू नका
आ. सु.च्या मुखपृष्ठावर आगरकरांपासून डॉ. आंबेडकरापर्यंतच्या विद्वान समाजसुधारकांची वचने देण्याचा आपला उपक्रम चांगला व अनुकरणीय आहे. कारण त्यातले विचार आजही नवे व ताजे वाटतात. एप्रिल २००० च्या अंकावरही सनदशीर मार्गाने आपले विचार मांडण्याबाबतचे डॉ. आंबेडकरांचे विचार आजही लागू आहेत. याच अंकातील “वॉटर’ चित्रपट-निर्मितीच्या विरोधातील घटनावरील लेखातही आपण डॉक्टरांचे विचार दिले आहेत. अशा वेळोवेळी आलेल्या आ. सु.मधील लिखाणाची उपयुक्तता व महत्त्व कोणी नाकारणार नाही. पण मला अलीकडे असे वाटू लागले आहे की यांबाबतीतील आपली विषयांची व घटनांची निवड एकाच दिशेने होत आहे. आणि आपल्यापुढे काही विशिष्ट विचारसरणी आहे.
गेल्या दोन एक महिन्यांत “घटनेचा आढावा व त्यासाठी समिती’ हा विषय गाजतो आहे. त्याविरुद्ध असणारे विरोधी पक्ष, नेते, खासदार, कार्यकर्ते अशा सर्वांनी लोकसभेत आणि बाहेर असहिष्णुता व वाचाळता याचे सर्व मार्ग अवलंबले आहेत. एखाद्या सिनेमाला, नाटकाला, पेंटिंगला एखाद्या गावी विरोध करणारी निदर्शने झाल्याबरोबर आ.सु.मध्ये त्यावर मजकूर व उपदेश येतो. पण लोकसभेच्या अंदाज-पत्रकी अधिवेशनांत खासदारांकडून “घटना आढावा” विरोधांत आठआठ दिवस दंगल करून कामकाज बंद पाडले जाते त्यावेळी आपल्याला हा विषय वर्ज कसा होऊ शकतो!
उपलब्ध माहितीच्या आधारावर आपण काही संतुलित लिखाण या विषयावर आ. सु.मध्ये प्रसिद्ध करावे अशी माझी विनंती आहे. अन्यथा आ. सु.मधील एकेरी लिखाणाबद्दल नेहमीच खंत जाणवत राहील.

वि. ग. कानिटकर
औदुंबर सदनिका, १३६२ सदाशिव पेठ, पुणे — ४११ ०३३
मागील अंकातील पत्राचा ता. क.
दि. १३ जाने. १९४८ ला म. गांधीनी उपोषण सुरू केले. दि. १६ जाने. १९४८ ला पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. प्रत्यक्षात उपोषण १८ जाने. ४८ ला सुटले. यामुळे उपोषणाशी ५५ कोटींच्या निर्ण-याचा संबंध नव्हता, असा गैरसमज आहे. यासाठी संपूर्ण उपोषण कालाची हकिगत देणे गरजेचे आहे हकिगत अशी —-उपवास सुरू झाल्यावर गांधीजी म्हणाले —
‘मला मुसलमानाबद्दल सहानुभूती वाटते व केवळ त्यांच्यासाठी मी हे उपोषण सुरू केले आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे बरोबर आहे. . . . पाकिस्तान-निर्मितीमुळे हिंदुस्थानातील मुसलमान स्वाभिमानाला व आत्मविश्वासाला पारखे झाले आहेत. पाकिस्तानात काय वाटेल ते होवो, हिंदुस्थानांतील हिंदूंनी व ख्रिस्त्यांनी हिंदुस्थानातील एकाही मुसलमानावर हात उचलता कामा नये.’
यावर सरदार पटेल यांनी, आपण गांधीच्या इच्छेप्रमाणे काहीही करण्यास तयार आहोत असे सांगितले. यावर गांधीनी पाकिस्तानचे अडवलेले ५५ कोटी रुपये हिंदुस्थान सरकारने परत करावेत असे सुचविले. ताबडतोब गांधींच्या अंथरुणाभोवतीच मंत्रिमडळाची बैठक भस्न ५५ कोटींचा नव्याने विचार करण्याची तयारी दाखवण्यात आली. १६ जानेवारीला मंत्रिमंडळाने ५५ कोटी परत करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर आपण उपोषण थांबवावे असा सल्ला आपल्याला देण्यात आल्याचे सांगून, तसे करता आले असते तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया गांधीजीनी व्यक्त केली. १७ जानेवारीला मौ. आझाद यांनी गांधींची भेट घेऊन, उपोषण-समाप्तीसाठी आणखी कोणत्या अटी आहेत याबद्दल बोलणी केली. गांधींनी अटी सात घातल्या. त्यांतल्या पाच महत्त्वाच्या —-
१. दिल्लीतील मुसलमानांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहील. २. सब्जीमंडी, करोल बाग, पहाडगंज आदी वस्तीत मुसलमान मुक्तपणे वावरू शकतील. ३. ख्वाजा कुतुबुद्दिन दर्याचा उत्सव नेहमीप्रमाणे होईल. ४. हिंदूंनी व्यापलेल्या मशिदी मुसलमानांना परत केल्या जातील. ५. दिल्ली सोडून गेलेले मुसलमान परत येऊ शकतील.
राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झालेल्या शांतता-समितीने या अटींना मान्यता दिली — १७ जाने. १९४८.
१८ जानेवारी १९८४ ला गांधीजींनी उपोषण सोडले.
(संदर्भ : शोध महात्मा गांधींचा : खंड २, पृ. ५५६ ते ५५८, लेखक : अरुण सारथी, प्रकाशक : अस्मिता प्रकाशन पुणे ३०)

भ. पां. पाटणकर
३-४-२०८ काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
चर्चेत व्यक्तिगत टीका नको

आ. सु.चे मार्च-एप्रिलचे अंक मिळाले व आवडले. विवेकवादाचे आपल्याला अभिप्रेत असलेले स्वरूप आपण थोडक्यात स्पष्ट केलेत हे चांगले झाले. विषयांची विविधता वाढली आहे हेही स्वागतार्ह आहे. रा. स्व. संघाच्या (प्रतिगामी) विचारसरणीचाही आ. सु.ने समाचार घेतला पाहिजे असे कुणीतरी म्हटले आहे. मला वाटते की संघाचे नाव न घेता किंवा त्यांच्या प्रचाराचा प्रत्यक्ष संदर्भ न देता, ऐतिहासिक व सांस्कृतिक सत्ये पुढे मांडणे जास्त उचित होईल. म्हणजे एकंदर चर्चा व्यक्तिगत टीका व उपहासपूर्ण लिखाणापासून अलिप्त राहील.

ल. ग. चिंचोळकर
काँग्रेसनगर, नागपूर — ४४० ०१२
सैनिकी कारवाई गांधीजींना असंमतच
आजचा सुधारकच्या मे २००० च्या अंकात श्री. वि. ग. कानिटकर यांचे पत्र प्रसिद्ध झालेले आहे. त्यात पान क्र. ७८ वर ‘हिंदुस्थान सरकारने म. गांधीच्या संमतीने, काश्मिरात सैन्य पाठवलेले होते’ असे विधान आहे. ही समजूत अनेकांची असल्याचे आढळून येते.
परंतु वस्तुस्थिती मात्र अशी नाही. निर्दिष्ट घटनेनंतर दिनांक ५ नोव्हेंबरला दिल्ली येथील प्रार्थना-सभेत गांधीजींनी त्यांच्यावर टीका करणारे एक पत्र वाचून दाखविले. त्यात पत्र पाठविणाऱ्याने गांधीजींवर अशी टीका केली होती की पूर्वी त्यांनी चर्चिल, मुसोलिनी, हिटलर आणि जपान्यांना अहिंसापालनाचा उपदेश केलेला होता. मात्र त्यावेळच्या काँग्रेस-शासनाने काश्मिरात सैन्य पाठविले तेव्हा तसा म्हणजे अहिंसेचा उपदेश केला नाही. याचे उत्तरात गांधीजींनी, त्याच सभेत असे स्पष्ट केले की काश्मिरमधील सैन्य कार्यवाहीला त्यांची संमती नव्हती. त्यांचा त्यावेळच्या केंद्रीय शासनातील मित्रांवर प्रभाव नव्हता आणि ते त्यांची मते त्यांच्या मित्रांवरसुद्धा लादू शकले नाहीत. इतकेच नव्हे तर, त्यांच्या मते, सशस्त्र आक्रमण झाल्यावर सुद्धा संरक्षकदलाने, मूठसुद्धा न आवळता आक्रमकाविरुद्ध मनात कोणताही आकस न ठेवता, कोणताही सशस्त्र प्रतिकार न करता मृत्यू स्वीकारावा. त्यातच शौर्य प्रकट होईल. यावरून गांधीजींचा काश्मिरमध्ये सशस्त्रसंघर्षाद्वारे पाकिस्तानचे आक्रमण परतून लावण्यास विरोध होता, पाठिंबा नव्हता किंवा संमती नव्हती हे स्पष्ट होईल. परंतु वर उल्लेखित पत्रात व इतरत्रही अनेकांची गांधीजींचा वरील सशस्त्र कार्यवाहीला पाठिंबा होता किंवा संमती होती अशी समजूत दिसून येते. ती वस्तुस्थितीशी विसंगत असल्याने माहितीसाठी खुलासा करीत आहे. (Gandhian Concept of State’ या श्री. बी. बी. मुजुमदार द्वारा संपादित ग्रंथातील, The State In Gandhian Philosophy’ या प्रा. बोधराज यांच्या संशोधनपर निबंधावर आधारित)

अनिल द. तिकोनकर
७/५ सदिच्छानगर, गल्ली क्र.९, कर्वेनगर, पुणे–४११ ०५२
सावर . . . रेच्या परीक्षणाचा खूपच उपयोग
आजचा सुधारक गेले दीड वर्ष नियमित वाचक आहे. मासिक नियमित येते. उत्सुकतेने मासिकाची वाट पहात असतो व पूर्णपणे वाचतो. अंधश्रद्धा निर्मूलन-चळवळीत गेली दहा वर्षे काम करीत असल्याने वैचारिक साहित्य वाचण्याची सवय लागली. त्यामुळे आजचा सुधारक कंटाळवाणा वाटला नाही, पचनी पडला. विवेकवाद, आभ्यासू लेखक, सामाजिक परिवर्तनासाठी उपयुक्त मासिक म्हणून जवळचा वाटला.
एप्रिलच्या अंकात विषयांची विविधता होती. अंक सर्वसामान्य वाचका पर्यंत पोचण्यासाठी सावर . . . रे नाटकाच्या परीक्षणाचा खूपच उपयोग होतो. या बद्दल सुनीती देव यांना धन्यवाद. एका मित्रास नाटकांची आवड असल्याने लेख वाचायला दिला. त्याने लेखाबरोबर अंक वाचून काढला. अशा प्रकारच्या नाट्य परीक्षणामुळे, पुस्तकाचा परिचय करून दिल्याने जास्त वाचक मिळतील असे वाटते. मध्यंतरी ‘साधना’ साप्ताहिकातून श्रीराम लागू यांचे प्रवासवर्णन येत असे. त्यामुळे ‘साधना’ उत्सुकतेने वाचले जायचे. बदलासाठी याची उपयुक्तता असते.
आजचा सुधारकमध्ये पूर्व-इतिहासापेक्षा वर्तमानकाळातील समस्यांचे लेखन व्हावे. या समस्या माणसाच्या अज्ञानातूनच निर्माण झाल्याने योग्य ती माहिती मासिका-तून दिली जावी.
१. उदा. वैद्यकीय अंधश्रद्धांतून निर्माण झालेल्या निरनिराळ्या पॅथीची वाट चुंबकीय थेरेपी — रेकी — निसर्गोपचार पद्धती, आयुर्वेदातील कोठल्याही प्रयोगशाळेत सिद्ध न झालेले दावे. उदा. च्यवनप्राश (शक्तिवर्धन) । शंखपुष्पी (स्मरणशक्तीत वाढ)
२. आर्थिक समस्या — आज बेकार तरुणांची संख्या प्रचंड वाढत आहे — त्यांना नैतिकता, विवेकवादाचे धडे कसे देणार? खुले आर्थिक धोरण म्हणजे काय? त्याचे काय परिणाम होणार या बाबत मासिकात चर्चा असावी. आर्थिक शोषण हा समाज-व्यवस्थेचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. याबद्दल मासिकात वेगळे पान असणे आवश्यक आहे.
३. पर्यावरण, व्यसनाधीनता, आहार, वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांचा समावेश असावा.
मासिकावरील प्रेमामुळे जास्त सूचना दिल्या याची जाणीव आहे. लेखकांची उणीव व वाचकांची अभिरुची या मुख्य समस्या आहेतच.
चांगल्या मासिकाच्या निर्मितीबद्दल धन्यवाद.

बा. के. सावंगीकर
४७५ प्रोफेसर्स कॉलनी, हनुमान नगर, नागपूर — ४४० ००९
घटना डॉ. आंबेडकरांनी लिहिली?
मे २००० च्या अंकातील, पत्रव्यवहार ह्या सदरामधील चंद्रपूरच्या प्रा. विद्याधर बन्सोड ह्यांचे पत्र वाचले. पत्राच्या उपान्त्य परिच्छेदात त्यांनी डॉ. के. रा. जोशी ह्यांच्या पत्रातील (संदर्भ फेब्रुवारी २००० चा अंक) खालील वाक्य उद्धृत केले.
“सध्या वेद, स्मृती ह्यांना कोणीही विचारत नाही. भारताचा कारभार विशिष्ट वर्गाकडून भीमस्मृती म्हणून अपरिवर्तनीय गौरविल्या जाणाऱ्या भारतीय संविधानानुसार चालतो” इति. ह्यावर प्राध्यापक बन्सोड ह्यांचे भाष्य असे —- “जोशीसाहेब, आपल्या ज्ञानाची कीव करावीशी वाटते. भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय नाही. बहुमताने घटनादुरुस्ती करता येते. इतके स्पष्ट खोटे बोलता . . . आणि ‘भीमस्मृती’ हा चुकीचा शब्द वापरता. ती भारतीय राज्यघटना आहे. स्मृती नव्हे. आणि डॉ. आंबेड-करांनी लिहिली याबद्दलची तुमची खंत दिसत आहे” इति.
डॉ. के. रा. जों.च्या विधानातील उपरोध व वर्तमान घटना पुनर-वलोकनाच्या संदर्भातील “भीमगर्जना” (बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आम्ही कदापि बदलू देणार नाही इ.) ह्या संदर्भाला अनुसस्न डॉ. के. रा. जो.नी केलेले ते विधान आहे. भारतीय घटना “अपरिवर्तनीय स्मृती” नाही इतके न समजू शकणारे जोशी अज्ञ नाहीत, नसावेत, असा आमचा दृढ समज आहे.
भारताची राज्यघटना डॉ. आंबेडकरांनी लिहिली हे प्रा. बन्सोडांचे विधान पूर्ण सत्य नाही. डॉ. आंबेडकरांनी घटनासमितीच्या समारोपातील आपल्या भाषणात घटनानिर्मितीचे, तिच्या लिखित स्वरूपाचे, महत्त्वाचे श्रेय दोन व्यक्तींना दिले आहे. ह्या संदर्भात डॉ. बाबासाहेब म्हणतात, “घटनानिर्मितीच्या कार्याचे जे श्रेय मला देण्यात आलेले आहे ते श्रेय खरोखर माझे नाही. ते श्रेय घटनासमितीचे सल्लागार, सर बी. एन. राव ह्यांना दिले पाहिजे. त्यांनी ड्राफ्टिंग कमिटीच्या विचारविनिमयासाठी कच्चा खर्डा तयार केला. त्यांनी घटनेचा पाया उत्तम रीतीने तयार केला म्हणून त्या पायावर घटनेची टोलेजंग इमारत आम्हाला उभारता आली. . . . श्री. एस्. एन्. मुकर्जी हे घटनेचा मसुदा तयार करणारे प्रमुख अधिकारी होत. श्रेयाचा बराचसा वाटा त्यांनाही दिला पाहिजे. घटनेबद्दलच्या दुर्घट (शब्द) योजना अगदी साध्या व स्पष्ट शब्दांत मांडून त्यांना कायदेशीर स्वरूप देण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्याचप्रमाणे सतत परिश्रम करण्याबद्दलची त्यांची प्रचंड शक्ती वाखाणण्यासारखी आहे. ह्या दोन्ही बाबतींत त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही. ते घटनासमितीला मिळू शकले हे ठीक झाले.”
आम्हालाही डॉ. आंबेडकरासंबंधी नितांत आदर व अभिमान आहे. कोणालाही अभिमान असावा, पण दुरभिमान नसावा. डॉ. बाबासाहेबांचा विनय त्यांच्या भक्तांनीही प्रामाणिकपणे अंगी व विचारांत बाणवावा असे आम्हाला मना-पासून वाटते. तसेच ते घटनेचे एकमेव शिल्पकार होते असा चुकीचा व वास्तव-विरोधी विचार प्रसृत होणार नाही ह्याची खबरदारी सुबुद्धांनी घ्यावी अशी सूचना आम्ही करतो.

वीन्द्र विस्पाक्ष पांढरे
डिफेन्स कॉलनी, रेल्वेजवळ, दौंड, जि. पुणे.
नग्न पुतळा–प्रक्षालनाच्या निमित्ताने
काही आठवड्यांपूर्वी नागपूरला घडलेल्या एका अप्रिय घटनेचे पडसाद यथावकाश अखिल महाराष्ट्रात उठले ते वृत्तपत्रांतून वाचल्यावर मनास यातना झाल्या.
__ नागपूरच्या दीक्षाभूमी या बौद्ध बांधवांच्या पवित्र स्थळी असलेल्या भारत-रत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवनियुक्त सरसंघचालक श्री. सुदर्शन यांनी पुष्पहार अर्पण केला. एका सार्वजनिक स्थळी (ज्याची निर्मिती बव्हंशी शासकीय खर्चाने अर्थात करदात्यांच्या द्रव्यातून झालेली आहे.) असलेल्या एका सर्वपूजनीय व्यक्तीच्या पुतळ्याला, एका अन्य सार्वजनिक संस्थेच्या (संघ सार्वजनिक संस्था आहे, गुप्त संघटन नव्हे) प्रमुखाने आदरांजली वाहिली यात कोणत्याही दृष्टीने विचार केल्यास काहीही गैर नाही. राष्ट्रीय स्वयं-सेवक संघाची विचारसरणी व कार्य अनेकांना पटत नाही व आमच्यासारख्या विचारी व विवेकी लोकांचा संघाला कडक विरोध आहे. परंतु संघ जे काही करतो त्यास आमचा वैचारिक विरोध आहे. (भडक) कृतिशील विरोध करणे हे आततायी अविचारीपणाचे, सवंग वर्तन आम्ही मानतो. परंतु नागपूरच्या काही पुरोगामी म्हणविणाऱ्या व्यक्तींनी उपरोक्त अदखल-पात्र घटनेनंतर, बाबासाहेबांचा पुतळा संघ प्रमुखांच्या स्पर्शाने अपवित्र झाला अशी पोरकट (तिरपा ठसा आमचा. संपा.) ओरड करून तो सार्वजनिकपणे धुवून काढल्याची घटना घडली या पुरोगामी मंडळींमध्ये आजचा सुधारक च्या सल्लागार मंडळांवरील एक सदस्य प्रा. डॉ. भा. ल. भोळे हे ही होते असे वाचले. जी व्यक्ती पवित्र/अपवित्र होते, ती व्यक्ती आजचा सुधारकसारख्या धर्म, अध्यात्म, व्यक्तिपूजा यांसारख्या संकल्प-नांचा सातत्याने विरोध करणाऱ्या प्रकाशनाशी संबंधित कशी राहू शकते?
ह्यापूर्वी आजचा सुधारक च्या सल्लागार मंडळाच्या एका सदस्य असलेल्या व्यक्तीने धर्मपरिवर्तन कस्न आपण धर्मावर विश्वास ठेवतो असे जाहीर प्रकटन केल्यामुळे त्या व्यक्तीचे नाव आजचा सुधारकच्या सल्लागार-मंडळ सदस्यांच्या सूचीतून अदृश्य झाले होते हे चांगले स्मरते. याच कारणासाठी प्रा. भोळे यांनी आजचा सुधारक च्या सल्लागार मंडळाच्या सदस्यत्वाचा तात्काळ राजिनामा दिला पाहिजे व तसा त्यांनी दिला नाही तर त्यांचे नाव या मंडळावरून काढून टाकण्यात आले पाहिजे.
असे करणे हे आजचा सुधारक च्या प्रकट धोरणाची भेदाभेदरहित व सातत्यपूर्ण कृती ठरेल. यासंबंधी अविलंब कार्यवाही झाली नाही तर मात्र आजचा सुधारक वरील वाचकांचा विश्वास नाहीसा होईल व आजचा सुधारक चे संचालक तत्त्वशून्य, सोईस्कर वर्तन करतात असे ठरेल.

भा. ल. भोळे
१६/ब, विद्याविहार कॉलनी, राणा प्रताप नगर, नागपूर – ४४० ०२२
पुतळाप्रक्षालनाची गरज का भासली?
नागपूर शहरातील काही पुरोगामी व्यक्तींनी दीक्षा भूमीवरचा डॉ. आंबेडकरांचा पुतळा जाहीरपणे धुतला. त्या घटनेसंबंधी रा. रवीन्द्र विस्पाक्ष पांढरे यांनी आजचा सुधारक ला आवर्जून पत्र पाठवले. मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या पत्रामुळे मला आ.सु.च्या सर्व वाचकांपुढे त्या आमच्या कृत्यामागची भूमिका मांडून अपुऱ्या व पक्षपाती माहितीमुळे त्यांच्याही मनात जर काही गैरसमज किंवा कुशंका निर्माण झाल्या असतील तर त्या दूर करण्याची संधी मिळाली आहे. खुद्द पांढरेही अशाच अर्धवट, माहितीपायी चिडलेले दिसतात पुण्याकडच्या काही प्रतिष्ठित दैनिकांनी मूळ बातमी न छापता केवळ काही एकांगी प्रतिक्रियाच प्रसिद्ध केल्या असल्याचे समजले.
प्रथमच हे स्पष्ट करायला हवे की पुतळा धुण्याच्या संदर्भात पत्रकारांनी काहीही मथळे दिले असले तरी धुण्याऱ्यांपैकी कोणाच्याही मनात बाट, विटाळ, अस्पृश्यता, अपवित्रता, शुद्धीकरण, विटंबना यांपैकी कोणताही विचार नव्हता. (तिरपा ठसा आमचा. संपा.) त्या खुळचट कल्पनांवर कोणाचाच काडीमात्रही विश्वास नव्हता आणि आजही नाही. पुतळ्याला हार घालण्याचे नाटक कस्न दलित बहुजनांची दिशाभूल करण्याची सरसंघचालकांची स्टंटबाजी एका प्रभावी प्रतीकात्मक कृतीद्वारे वेशीवर टांगणे एवढाच त्यांचा हेतू होता. जनसामान्यांच्या लक्षात एखादी गोष्ट ठळकपणे आणून देण्यासाठी अशा कल्पक प्रतीकात्मक कृतींची गरज असते हे चळवळींशी परिचित असलेल्या कोणाच्याही ध्यानात येऊ शकेल. एका सार्वजनिक संस्थेच्या प्रमुखाने दुसऱ्या सार्वजनिक ठिकाणाच्या पुतळ्याला हार घातला तर त्यात काय बिघडले? इतका निष्पाप, निरागस हा प्रकार नाही. कोणत्याही कृतीचा विचार करताना तिचा वेळ-काळ, हेतू आणि संदर्भ लक्षात घ्यावेच लागतात. सुदर्शनांनी सरसंघचालक-पद स्वीकारल्याबरोबर ही आदरांजली अर्पण केलेली नव्हती. तर भारतीय संविधानाबद्दल यथेच्छ बेजबाबदार मुक्ताफळे उधळल्यानंतर जणू उपरती झाल्याप्रमाणे ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याकडे धावून आले होते. प्रत्यक्ष तशी उपरती वगैरे नव्हती, ती असती तर त्यांनी त्यांच्या उद्गगारां-बद्दल किमान दिल्लगिरी व्यक्त केली असती. ती त्यांनी केलेली नव्हती. दलित जनमानस आपल्या विधानांनी दुखावले असल्यास सारवासारव करावी ही जाहीरपणे व प्रसिद्धिपूर्वक पुतळ्याला हार घालण्यामागची प्रेरणा होती. दुसरी गोष्ट अशी की चौदा एप्रिल रोजी श्रीमती सोनिया गांधींची विराट सभा नागपुरात होणार होती आणि त्यात संविधानसमीक्षेच्या विरोधात त्या रणाशिंग फुकणार होत्या. त्या दीक्षाभूमीवरही येणार होत्या. तत्पूर्वीच दीक्षाभूमीवर हजेरी लावून श्रीमती गांधींचा संभाव्य प्रभाव पुसण्याचे राजकारण करण्यासाठी सुदर्शनांनी हार घालण्याचा घाट घडवून आणला होता; हेही ध्यानात घेण्याची गरज आहे.
पुतळा धुण्याचा निर्णय नागपुरात आधीपासूनच क्रियाशील असलेल्या संविधान समीक्षा विरोधी, कृती–समितीने घेतलेला होता. समितीच्या इतर कार्यक्रमांचा तो भाग होता. स्पर्शाच्या पवित्र–अपवित्रतेचा नव्हे तर पुतळ्याला हार घालून संविधा-नाला सुरुंग लावणाऱ्या दुतोंडी व दुटप्पी छाकटेपणाचा पर्दाफाश करण्याचाच विचार समितीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होता. संविधानसमीक्षेचा संदर्भ सोडून पुतळा धुण्याच्या घटनेचा निषेध करणे म्हणजे साप सोडून भुई धोपटण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. ज्यांच्या अंतरंगात आंबेडकरी मूल्यांना सपशेल छेद देणारी मूल्यव्यवस्था घट्ट बसलेली आहे आणि जे संविधानसमीक्षेच्या नावाने स्वतःच्या मनुवादी मूल्यांना प्रतिष्ठित करू पाहतात त्यांनी पुतळ्याला हार घालून गाजावाजा करणे संविधान-समीक्षाविरोधी समितीला दांभिकपणाचे वाटते. पुतळा धुण्याद्वारे त्यांनी ती दांभिकता चव्हाट्यावर आणली आहे
संघाला ज्यांचा वैचारिक विरोध आहे आणि तो केवळ विवेकी मार्गांनीच मांडावा असे ज्यांना वाटते त्यांना आम्ही आवर्जून हे सांगू इच्छितो की संघासारखे संकट यापुढे केवळ वैचारिक वादप्रतिवादाद्वारे निस्तरणे अशक्य आहे. पांढरे जेव्हा असे म्हणतात की ‘कृतिशील विरोध करणे हे आततायी अविचारीपणाचे सवंग वर्तन आम्ही मानतो’ तेव्हा ते हे विसरतात की संघविरोधकांची ही निष्क्रियताच संघ-परिवाराच्या पथ्यावर पडली आहे. तुम्ही वैचारिक–तात्त्विक टीका करीत राहा, आम्ही आमचे पाय पसरत जाऊ हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्या त्या धोरणाचे त्यांच्या दृष्टीने इष्ट आणि समाजाच्या दृष्टीने अनिष्ट परिणामही आता ठळकपणे दिसू लागले आहेत. सत्तेची अल्पस्वल्प संधी मिळताच हिंदुत्वशक्तींचा चेहरा किती आक्रमक, हिंसक, दुराग्रही व असहिष्णू झाला आहे हे केवळ अल्पसंख्याकांच्याच नव्हे तर कोणाही संवेदनशील नागरिकाच्या सहज प्रत्ययास येऊ शकेल
पुरोगामी, विवेकवादी, धर्मनिरपेक्ष विचाराच्या पाठीशी जनमानसाची शक्ती जर उभी करायची असेल तर बौद्धिक लढायांबरोबरच लाक्षणिक कृतींच्या माध्यमातून जनजागरणाचे प्रयत्नही करावेच लागतील. “आम्ही विचारी, आणि म्हणून विवेकी, आणि म्हणून कृतिशील असे काहीच करणार नाही’ हा पुरोगाम्यांचा सोवळेपणाच समाजाला आजच्या पिसाट धर्मवादी दुरवस्थेपर्यंत आणण्यास कारणीभूत झाला आहे. आंबेडकरी चळवळीला भगवेपणाची डूब देऊन संघपरिवाराच्या दावणीला बांधण्याचे समरसता मंच, दीनदयाल शोधसंस्थान, वनवासी कल्याण आश्रम अशा “नाना” उपक्रमांतून जे प्रयत्न जोमाने सुरू आहेत, त्यांचाच एक भाग म्हणजे सुदर्शनांना डॉ. आंबेडकर पुतळ्याला हार घालण्याचा आलेला पुळका हा होता. पुतळा धुवून आम्ही हेच सर्वांच्या–विशेषतः दलित–शोषित–गोरगरीब– ग्रामीण जनतेच्या–निदर्शनास आणू इच्छीत होतो. आमचा तो इरादा आमच्या अपेक्षेपेक्षाही यशस्वी झाला आहे याचे आम्हाला समाधान आहे राहता राहिला प्र न आ. सु. च्या सल्लागार मंडळातून आम्हाला वगळण्याचा. आमच्या दृष्टीने हा अगदीच दुय्यम मुद्दा आहे पण पत्रकर्त्याने तो फारच तावातावाने मांडला आहे. सल्लागार मंडळसदस्यत्वाचा राजीनामा आम्ही कोणत्याही क्षणी द्यायला तयार आहोत. पण कोण्या रवीन्द्र विख्याक्ष पांढरे नामक अलबत्या गलबत्याच्या सांगण्यावस्न खचितच नव्हे! आ. सु.च्या सूत्रधारांना आमची भूमिका अमान्य असती तर रा. पांढरे यांच्या पत्राची प्रतीक्षा न करता यापूर्वीच त्यांनी आम्हाला त्यासंबंधी विचारणा केली असती. अजून तरी तसे झालेले नाही. उद्या कदाचित होईलही. पण तो आ. सु. चा आपला स्वंतत्रपणे घेतलेला निर्णय असेल. ‘अमक्या तमक्याने राजीनामा दिला पाहिजे आणि तसा त्याने न दिल्यास त्याचे नाव मंडळातून काढून टाकले पाहिजे’ अशी उपटसुंभांची हडेलहप्पी अजून तरी आ. सु. मध्ये शिरलेली नाही. हां, उद्या संघपरिवाराने जर सुदर्शन म्हणतात तसे भारतीय संविधान निकालातच काढले आणि त्याजगी त्यांची एकचालकानुवर्ती व फॅसिस्ट संस्कृती देशावर लादण्यात जर यश मिळवले तर काय होईल हे कोणी सांगावे? .बुद्धिजीवी मंडळी जर आपला बौद्धिक सोवळेपणा सांभाळीत जनसामान्यांपासून आजूनही दूरच राहण्याचे पत्करणार असेल तर देशावर हे गंडांतर येणारच नाही असे मात्र कोणीच खात्रीने म्हणू शकणार नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.