संतांचे बंड आणि भक्तीचा मुलामा

‘. . . तरीसुद्धा या बंडाचा (संतांच्या भागवत-धर्माचा) चातुर्वर्ण्यविध्वं-सनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही. तिची किंमत स्वयंसिद्ध आहे. हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहीत. त्यामुळे चातुर्वर्ण्याचे दडपण कायम राहिले. संतांच्या बंडाचा एक मोठाच दुष्परिणाम झाला. तुम्ही चोखामेळ्यासारखे भक्त व्हा, मग आम्ही तुम्हाला मानू, असे म्हणून दलितवर्गाची वंचना करण्याची एक नवी युक्ती मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सापडली. दलितवर्गातील कुरकुरणारी तोंडे त्या उपायाने बंद होतात, असा ब्राह्मणांचा अनुभव आहे. सांप्रदायी लोक साधुसंतांच्या चमत्काराच्या दंतकथा शक्य तितक्या अतिशयोक्तीने वर्णन करतात, परंतु साधूंनी प्रतिपादिलेल्या न्यायबुद्धीची, भूतदयेची नि समतावादाची व उदार विचारांची ते हटकून पायमल्ली करतात. कारण त्यांनाही जातीच्या दुरभिमानाने पछाडलेले असते.’ (बहिष्कृत भारत, १ फेब्रु. २९ डॉ. आंबेडकर)
. . . आंबेडकरांचा रामदासांवरील अभिप्राय कसा अचूक होता हेही त्यावरून दिसून येते.
गुरु तो सकळांसी ब्राह्मण । जरी तो जाला क्रियाहीन ।
तरी तयासींच शरण। अनन्य-भावे असावें।।
ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत ।।
पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्येंकरूनी ।।
असो ब्राह्मणा सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडे किती ।।
जरी ब्राह्मण मूढमति । तरी तो जगद्वंद्य ।।
अंत्येज शब्द ज्ञाता बरवा। परी तो नेऊन काय करावा ।
ब्राह्मणासन्निध पुजावा । हें तो न घडे की ।।
धनंजय कीर,