प्रिय वाचक

प्रचार वाईट, प्रसार चांगला, असे आमचे एक वाङ्मयसेवक विद्वान मित्र म्हणतात. आ. सु. प्रचार-पत्र आहे हा त्याचा अवगुण आहे असे त्यांचे मत आहे. प्रसार हळूहळू होत असतो, आपोआप होतो. प्रचार केला जातो. त्यात भल्याबुऱ्या मार्गांचा विधिनिषेध नसतो. विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते; कसेही करून आपलेच घोडे पुढे दामटले जाते. मेरी मुर्गीकी एकही टांग अशी हटवादी भूमिका घेतली जाते. असा त्यांचा खुलासा. त्यांनी हा आरोप अनेक वेळा केला, आमच्या सहकाऱ्यांजवळही केला. म्हणून आम्ही कोश उघडून पाहिला. ‘प्रचार’ आणि ‘प्रसार’ हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत. मोल्सवर्थचा मराठी आणि वा. शि. आपट्यांचा संस्कृत कोशही पाहिला. दोन्ही ठिकाणचे अर्थ जवळजवळ सारखे आहेत, आणि त्यांत वैगुण्यदर्शक काही नाही. (दाते-कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशातील संबद्ध अर्थ असे आहेत. प्रचार —- प्रसिद्धी; प्रसार; जाहिरात; परिस्फुटता प्रसार —- पसरणे; विस्तारणे; फैलावणे; विखुरणे)
मग ‘प्रचार’ अनिष्ट का ठरतो? राजकीय पक्ष प्रचारात प्रतिपक्षावर मात करण्यासाठी जे डावपेच वापरतात त्यामुळे ? की धर्मप्रचारक प्रलोभन, जबरदस्ती, फसवणूक अशा मार्गांनी आपला कळप वाढवत असतात म्हणून? कसेही असले तरी आ. सु.ला राजकारण्यांसारखी कोणतीही सत्ता हस्तगत करायची नाही की कोणाला मिळवून द्यायची नाही. परलोक, तारण, पापमुक्ती यांसाठी कुठले शुभवर्तमान सांगायचे नाही की आमच्या कळपात सामील झालेल्यांना प्रलोभन द्यायचे नाही. तेव्हा आम्ही राजकारण्यांसारखा किंवा धर्मकारण्यांसारखा लोभमूलक म्हणा की लाभमूलक म्हणा हेतू बाळगतो हे म्हणणे हेत्वारोप करण्यासारखे होईल. आमच्या-जवळ द्यायला एका विचाराखेरीज दुसरे काही नाही. आणि तोही विचार एवढाच की, ज्याचा त्याने विचार करावा. पोथ्यापुराणे म्हणा किंवा धर्मगुरू मोक्षगुरू म्हणा यांच्याकडे आपली बुद्धी गहाण टाकू नये हा. शिवाय प्रचार हा शब्द सदासर्वदा हीनार्थकच आहे असे कसे म्हणता येईल? संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, किंवा राष्ट्र-भाषा प्रचार समिती ह्या वाङ्मयक्षेत्रातल्या मान्यवर संस्थांनी तर आपआपल्या नावातच प्रचार शब्दाला स्थान दिले आहे. आमच्या विद्वान मित्राने घेतलेल्या आक्षेपां-पैकी एखादाही आक्षेप त्यांना लागू पडतो असे म्हणता येणार नाही.
आ. सु. ला कोणी प्रचारपत्र म्हणो की प्रसारपत्र म्हणो, आम्हाला ते विचारपत्र वाटते एवढे मात्र खरे. शनिशिंगणापूर किंवा या प्रकारच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांची दखल घेणे नेहमीच शक्य नसते. सुधारणेच्या तपशिलापेक्षा तत्त्वाकडे आमचे लक्ष अधिक असते तेही याचमुळे. याच अंकात प्रा. घोंगे यांचा सखीबंधन हा लेख व श्री. दिवाकर मोहनींचा लैंगिक स्वातंत्र्याबद्दलचा लेख दिला आहे. र. धों. कर्वे ह्यांना प्रचलित विवाहसंस्था टाकाऊ वाटत होती. उंदराच्या सापळ्यासारखा शिरायला सोपा पण अडकले की बाहेर पडायला कठीण असा पिंजरा. त्यांनी लिहिले त्यावेळी उच्चवर्णीयांना सोड-लग्नाची सोय नव्हती म्हणून असेल, विवाहाने स्त्रीच्या गुलामगिरीवर शिक्कामोर्तब होते म्हणून असेल, स्त्रीपुरुषांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून असेल, आपली विवाहसंस्था त्यांना त्याज्य वाटत होती. उभयपक्षी संमती असेल तर स्त्री-पुरुषांचा मुक्तसंग त्यांना स्वैराचार वाटत नव्हता. वैचित्र्यप्रियता पुरुषांइतकीच स्त्रियांना हवीशी वाटेल असे त्यांचे या विषयावरील तज्ज्ञांच्या लिखाणावरून मत झाले होते. घोंगे म्हणतात त्याप्रमाणे सँपल सर्व्हे त्यांनी स्वतः केले नव्हते. पण समकालीन उपलब्ध शास्त्रीय संशोधनाचा त्यांचा अभ्यास भरपूर होता. हिन्दी त्रैमासिक सुधारक प्रकाशित झाला आहे. कर्क-संक्रमण, २१ जून २०००ला पहिला अंक निघाला. आमच्या वाचकांनी स्वतःसाठी किंवा आपल्या मित्रांसाठी नमुना अंक मागवावा.
आपला प्र. ब. कुळकर्णी