विवेकवादी नीती

आतापर्यंत आपण सत्य-असत्याच्या प्रांतात होतो. पण नीतीचा प्रांत म्हणजे सत्य-असत्याचा नव्हे, तर चांगल्यावाइटाचा किंवा साधु-असाधु गोष्टींचा प्रांत. जिला reason म्हणतात, आणि जिचा पर्याय म्हणून आपण ‘विवेक’ हा शब्द वापरतो, त्याच्या प्रांतातून वेगळ्या प्रांतात प्रवेश करतो आहोत. हे कटाक्षाने सांगावे लागते, कारण reason चे, विवेकाचे क्षेत्र म्हणजे सत्य-असत्याचे क्षेत्र हे मत अठराव्या शतकात डेव्हिड ह्यूम (१७११ ते १७७९) या तत्त्वज्ञाने व्यक्त केले असून ते बरोबर असावे असा माझा समज आहे. ह्यूमनंतर आलेल्या कांट (१७२४-१८०४) या जर्मन तत्त्वज्ञाने दोन reasons आहेत असे मत मांडले, Theoretical Reason (औपपत्तिक विवेक) आणि Practical Reason (व्यावहारिक विवेक). त्यांपैकी Theoretical Reason चे क्षेत्र सत्य-असत्याचे असून, साधु-असाधु गोष्टींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या reasonला तो Practical Reason म्हणतो, आणि Practical Reason वाचून नीती अशक्य आहे असे मत मांडतो. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात कांटचा अधिकार आणि दबदबा मोठा आहे. ह्यूमच्या मताचा प्रतिवाद केल्यामुळे त्याचे मत खूपच प्रसिद्धी आणि मान्यता पावले आहे. परंतु कांटचे मत बरोबर नसावे, आणि विवेकाचे क्षेत्र सत्य-असत्यापुरते मर्यादित आहे ह्या ह्यूमच्या मतात बराच सत्यांश असावा असे मला अलीकडे वाटू लागले आहे. मला असेही वाटते की ह्यूमचे मत सकृद्दर्शनी इतके तहेवाईक दिसते की त्याचा सहानुभूतिपूर्वक आणि पुरेसा विचारच झाला नाही. कार्यकारणसंबंध अवश्य (necessary) संबंध नाही, त्याची सार्विकता केवळ संभाव्य (probable) आहे ह्या मताची संशयवादी म्हणून तत्त्वज्ञांच्या जगात जशी संभावना झाली, तशीच संभावना नीतीच्या क्षेत्रात विवेकाचे काही कार्य नाही याही मताची झाली. ते मत इतके उघडपणे उपेक्षणीय दिसले की त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही असे सामान्यपणे समजले गेले. परंतु ह्यूमच्या मताचा थंड डोक्याने शांतपणे विचार केल्यास त्यात बराच तथ्यांश आहे असे दिसून येईल असे मला वाटते. त्याच्या कारण– विषयक मताचा विचार येथे प्रस्तुत नाही; पण त्याच्या नीतिविषयक मताचा विचार करण्याचा मानस आहे. व्यावहारिक विवेक (practical reason) कोणत्या अर्थाने विवेक (reason) आहे? या प्र नाचा प्रथम विचार करू.
ज्याला कांट औपपत्तिक विवेक (Theoretical Reason) म्हणतो त्याच्याशी व्यावहारिक विवेकाची तुलना केल्यास या विषयावर प्रकाश पडू शकेल असे वाटते.
औपपत्तिक विवेकाचे विशेष काय आहेत?
(१) ती एक आकारिक विचार करणारी शक्ती आहे. आकारिक विचार म्हणजे विधानांच्या फक्त आकाराचा विचार, त्यांच्या द्रव्याचा किंवा आशयाचा नाही. उदा. ‘अ ब आहे’ हा ‘ही गाय काळी आहे’ या विधानाचा आकार; ‘गाय’ आणि ‘काळी’ हे द्रव्य. एखादे विधान सत्य आहे की असत्य आहे त्याचा केवळ आकार तपासून ती ठरविते. ज्यात व्याघात आहे ते विधान असत्य, उदा. ‘अ ब आणि ब-भिन्न आहे’, ज्यात उक्तवचन (tautology) आहे ते सत्य, उदा. ‘जर अ ब असेल तर अ ब आहे;’ आणि ज्यात ही दोन्ही नाहीत त्याची सत्यासत्यता औपपत्तिक विवेकाने नव्हे, तर इंद्रियानुभवाने ठरते. उदा. ‘अ ब आहे’ किंवा ‘ही वस्तु लाल आहे.’
(२) औपपत्तिक विवेकाच्या विधानांना पूर्वतः (a priori) विधाने म्हणतात. ती अनुभवापासून पूर्णपणे स्वतंत्र असतात. पूर्वतः विधानांचे दोन निकष आहेत असे कांट म्हणतो, (१) अवश्यता (necessity) आणि (२) कठोर सार्विकता (strict universality). अवश्यतेच्या संकल्पनेविषयी कांटच्या विवेचनात गोंधळ आहे. अवश्यतेची एक संकल्पना लाइनित्स या तत्त्वज्ञाने विशद केली होती; ज्या विधानाचा निषेध व्याघातपूर्ण होतो ते विधान अवश्य. पण कांटची अवश्यता लाइनित्सची नव्हे. लाइनित्सच्या संकल्पनेचा निषेध व्याघात युक्त होतो. पण कांटच्या संकल्पनेत हा गुण नाही. मग ती अवश्यता कशावरून? कांटने दिलेल्या पूर्वतः विधानांच्या दोन निकषांपैकी दुसरा म्हणजे कठोर सार्विकता. तिचा कदाचित् आपल्याला उपयोग होऊ शकेल. येथेही एखाद्या विधानाची सार्विकता कठोर आहे की नाही हे कसे ठरवायचे हा प्र नच आहे. अवश्यतेच्या निकषाने विधान सार्विक आहे की नाही हे निःसंदिग्धपणे सांगता येते. पण ती अवश्यता लाइनित्सची अवश्यता आहे. आ चर्य म्हणजे कांटची अवश्यता कोणती हे त्याने कोठेही सांगितले नाही. त्यामुळे कांट कोणत्या अर्थाने ‘अवश्य’ शब्द वापरतो ते कुठेही स्पष्ट होत नाही. व्यावहारिक विवेक विवेक (reason) कशावरून या प्र नाचे उत्तर ‘त्याची प्रतत्त्वे (principles) निरपवादपणे सार्विक आहेत’ असे आपण गृहीत धरू निदान या अर्थाने व्यावहारिक विवेक reason आहे असे समजून त्या प्रतत्त्वांचा विचार करू या.
नीतीचे आदेश निरपवाद असतात असे कांटचे मत आहे. या आदेशांना तो Categorical Imperatives हे नाव देतो. आदेश categorical आहे याचा अर्थ तो बिनशर्त, विना अट बंधनकारक आहे. Categorical Imperative ची फोड करताना त्याने तो तीन प्रकारे मांडला आहे. निदान ही प्रतत्त्वे आपल्याला व्यावहारिक विवेकाकडून प्राप्त होतात असे समजायला हरकत नाही. ती कितपत सार्विक आहेत ते आता पाहू.
पहिले प्रतत्त्व असे आहे : ज्या नियमानुसार तुम्ही एखादे कर्म करणार आहात, तो नियम सर्वांच्या वागण्याचा सार्विक नियम होऊ शकेल, तरच त्या नियमानुसार वागा. हा पूर्ण आकारिक असा नियम आहे, आणि तो बरोबरही असावा असे वाटते. कारण जे कर्म मी करणे योग्य असेल ते कर्म त्याच परिस्थितीत असणाऱ्या कोणीही केले तरी योग्यच वाटावे हे म्हणणे बरोबर दिसते. पण त्या प्रतत्त्वात एक गंभीर उणीव आहे. त्याने कर्तव्यकर्माची अवश्य अट सांगितली पण पर्याप्त अट सांगितली नाही. अवश्य (necessary) अट म्हणजे जी अट पुरी झाली नाही तर कर्म कर्तव्य होणार नाही; आणि पर्याप्त (sufficient) अट म्हणजे जी अट पुरी झाली तर कर्माचे कर्तव्यत्व सिद्ध होते. आता कांटच्या प्रतत्त्वात कर्तव्याची फक्त अवश्य अट सांगितली आहे. पण ती पुरी होऊनही कर्मकर्तव्य ठरत नाही. उदा. आपण सकाळी उठल्यावर दहा मिनिटे ईश्वराचे नामस्मरण करावे, या नियमाचे सार्विकीकरण करता येते, पण ते करता आले तरी त्यामुळे त्यात सांगितलेले कर्म कर्तव्य आहे असे होत नाही. याप्रमाणे कांटच्या प्रतत्त्वाने कर्तव्यतेचा आशय अंशतःच व्यक्त होतो असे म्हणावे लागते. हा त्याच्या प्रतत्त्वात मोठा दोष आहे. त्यामुळे कर्तव्य नसलेली कर्मेही कर्तव्य आहेत असा निष्कर्ष निघतो. आता कांटच्या दुसऱ्या प्रतत्त्वाकडे वळू. ते असे आहे : मनुष्यतेला, मग ती दुसऱ्या कोणाची असो किंवा तुमची स्वतःची असो, तिला नेहमी साध्य (end) म्हणून वागणूक द्या, ती केवळ साधन म्हणून कदापि वापरू नका. या प्रतत्त्वाचे स्पष्टीकरण असे आहे. कांटच्या मते मनुष्याची ईहा (will) ही सबंध विश्वात एकमेव अशी वस्तू आहे की जिला स्वतःचे कधीही कमी न होणारे मूल्य आहे. अशी स्वतोमूल्यवान वस्तू ही स्वाभाविकपणे साध्य (end) असते. ती अन्य कशाचे साधन म्हणून वापरली जाऊ शकेल, पण तिचे स्वरूप साध्याचे आहे. म्हणून तिचा वापर साधन म्हणून केला तरी ती स्वतः परमोच्च साध्यच राहते. आणि मनुष्यप्राणी तिचे अधिष्ठान असल्यामुळे तोही सर्वदा साध्यच राहतो. म्हणून त्याचा उपयोग अन्य कोणी किंवा त्याने स्वतःही केवळ साधन म्हणून करता कामा नये. पण हे प्रतत्त्व निरपवाद नाही असे म्हणावेसे वाटते. एखाद्या उदार मनाच्या महात्म्याने अन्य मानवांकरिता स्वतःचा बळी दिला तर ते नि िचतच गैर कर्म झाले असे सामान्यपणे आपण म्हणणार नाही. म्हणजे याही प्रतत्त्वाला अपवाद संभवतो. कांटचे तिसरे प्रतत्त्व असे आहे : मानवांच्या ईहांचे एक साध्यांचे राज्य (kingdom of ends) असून प्रत्येक मनुष्य त्याचा समान दर्जाचा घटक आहे, आणि त्या राज्याचा राजा ईश्वर आहे. या प्रतत्त्वासंबंधी एवढे म्हणणे पुरे आहे की ती एक रम्य कविकल्पना याहून अधिक काही नाही. पूर्ण आकारिक असलेल्या व्यावहारिक विवेकाला इतका तपशील कसा कळला हाही प्र नच आहे. शिवाय ईश्वराचे अस्तित्व हेही निःसंदेह खरे नाही. त्यामुळे हेही प्रतत्त्व उपयोगाचे नाही.
सारांश, औपपत्तिक विवेकाच्या जोडीला व्यावहारिक विवेकही आहे हे मत अनुपपन्न राहते. शिवाय औपपत्तिक विवेकाचा प्रभाव कर्माच्या क्षेत्रावरही चालतो. कर्माच्या क्षेत्रातही व्याघात वर्ण्य असले पाहिजेत. अर्थात् व्यावहारिक विवेक ही एक निरुपयोगी अडगळ आहे. जर साधु काय आणि असाधु काय हे विवेकाने ठरत नसेल तर मग ते कशाने ठरते? ते आपल्या इच्छांनी ठरते. आपल्या शेकडो इच्छा असतात. इच्छाविषयां-पैकी काही अन्य साध्यांची साधने असतात. पण काही इच्छाविषय अन्य कशाची साधने नसून ती स्वतःच साध्ये असतात. उदा. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे समीपस्थ साध्य तो ज्या वर्गात असेल त्याची परीक्षा उत्तीर्ण होणे हे असते. पण हे स्वतः शालान्त परीक्षा उत्तीर्ण होणे ह्या साध्याचे साधन आहे. पण तेही अंतिम साध्य नव्हे. अंतिम साध्य म्हणजे जे अन्य कोठल्या साध्याचे साधन नसावे. वेगळी परिभाषा वापरायची तर साध्याला मूल्य असते असे म्हणता येईल. हे मूल्य दोन प्रकारचे असते, स्वतोमूल्य किंवा साध्यमूल्य आणि परतोमूल्य किंवा साधनमूल्य. आता हे उघड आहे की सर्वच वस्तूंचे मूल्य परतोमूल्य किंवा साधनमूल्य असू शकत नाही; निदान एका वस्तूचे मूल्य ती कशाचेही साधन नसल्यामुळे असले पाहिजे. जर निदान एक वस्तू केवळ तिच्याकरिता मूल्यवान नसेल, तर कशालाही साधनमूल्य असू शकणार नाही. एका उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट होईल. ज्याप्रमाणे काही तरी स्वप्रकाश असल्याशिवाय काहीही परप्रकाशित असू शकत नाही, त्याप्रमाणे हे आहे. म्हणजे मूल्ये दोन प्रकारची झाली. साधनमूल्ये आणि अंतिम साध्यमूल्ये; किंवा काही गोष्टी अंतिम साध्ये असतात आणि काही साधने असतात.
आता एक मत असे आहे की स्वतोमूल्य (intrinsic value) कशालाही असू शकत नाही. हे म्हणणे एका अर्थाने खरे आहे, पण तो अर्थ नेमका काय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या वस्तूला स्वतोमूल्य आहे याचा अर्थ आपण ती तिच्या स्वतःकरिता इच्छितो. म्हणजे आपण तिची इच्छा अन्य कशाचे साधन म्हणून करीत नाही. या अर्थी अनेक वस्तू प्रसंगविशेषी स्वतोमूल्यवान असतात. उदा. आपल्याला भूक लागली असताना आपण अन्न केवळ अन्नाकरिताच इच्छितो. या अर्थी अनेक वस्तू वेळोवेळी स्वतोमूल्यवान असतात. पण दुसऱ्या एका अर्थी स्वतोमूल्यवान काहीही असत नाही. उदा. मूरच्या अर्थी. मूर हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ म्हणाला होता की intrinsic good म्हणजे अशी वस्तू की जी कोणालाही तिच्या स्वतःकरिता अभिलषणीय वाटेल. पण याअर्थी निर्जीव जगात वस्तूला कसलेही मूल्य असू शकत नाही. म्हणजे जर इच्छिणारे जीव नसते तर कोणतीही वस्तू स्वतोमूल्यवान असू शकली नसती. मूरचे आरंभी असे मत होते की साधुत्व (goodness) वस्तूंच्या ठिकाणी असणारा वस्तुनिष्ठ गुण आहे. तसे असेल तर निर्जीव जगातही साधुत्व असू शकले असते. ज्याप्रमाणे वस्तूंचा आकार हा वस्तूंच्या ठिकाणी असणारा वस्तुनिष्ठ गुण आहे तसाच साधुत्व हाही वस्तूंच्या ठिकाणी असणारा वस्तुनिष्ठ गुण असता. परंतु जड जगात साधुत्व असू शकणार नाही. हे मूरच्या शब्दांवरूनही दिसून येते. तो म्हणतो की साधुत्व हे त्याच्या स्वतःखातर अभिलषणीय आहे. म्हणजे साधुत्व ही कल्पना अभिलाषासापेक्ष झाली. ती स्वयं-वस्तुनिष्ठ असू शकत नाही.
याप्रमाणे इच्छाविषयात केवळ साध्य आणि साधन असा भेद करता येतो. पण वस्तुनिष्ठपणे, म्हणजे अभिलाषानिरपेक्ष, केवळ साध्यमात्र असू शकत नाही. वस्तू कोणाला त्यांच्या स्वतःकरिताच मूल्यवान वाटल्या तरच त्या स्वतःसाध्ये होऊ शकतील.
इच्छांची तृप्ती
एखादी इच्छा अशी असू शकेल की तिची तृप्ती कदापि होऊ शकणार नाही. उदा. आपण अमर व्हावे. परंतु आपल्या बहुतेक इच्छा सामान्यपणे तृप्त होण्यासारख्या असतात. आता आपल्या इच्छा प्रत्येकी तृप्य असतील. पण बऱ्याच अशाही असतील की त्यांच्यापैकी एकीची तृप्ती झाली तर अनेक इच्छांची तृप्ती अशक्य असते. दोन इच्छा जेव्हा एकाच वेळी तृप्य असतात तेव्हा त्या परस्पर-अविरोधी असतात. लाइनित्सने एका वेगळ्या संदर्भात वापरलेली compossibility ची, सहशक्यतेची कल्पना आपण येथे वापरू शकतो. उदा. समजा की आपल्याला एका मित्राला भेटायचे आहे आणि एका गाण्याच्या कार्यक्रमालाही जायचे आहे. आता जर तो मित्रही गाण्याला जाणार असला तर आपल्या दोन्ही इच्छा तृप्त होऊ शकतात. पण सगळ्याच इच्छा अशा नसतात. म्हणून आपली इच्छातृप्ती महत्तम व्हायची असेल तर ते सहशक्य इच्छांची निवड करून साधता येते. म्हणून आपल्या इच्छांचा जास्तीत जास्त मोठा सहशक्य इच्छांचा समूह निवडला तर आपली अधिक तृप्ती होऊ शकेल.
या संदर्भात लक्षात ठेवायची आणखी एक गोष्ट आहे. ती म्हणजे ज्या प्रमाणे एका व्यक्तीच्या जीवनात सहशक्य इच्छांचे लहानमोठे अनेक गट असतात, त्याचप्रमाणे अनेक व्यक्ती मिळूनही असू शकेल. एका व्यक्तीच्या इच्छा परस्परअविरोधी असणे जसे अवश्य असते, तसेच समाजातील भिन्न व्यक्तींचेही आहे. शिवाय काही इच्छांची तृप्ती केल्याने आपल्याला तात्कालिक सुख लाभले तरी नंतर प चात्ताप करण्याची पाळी येते. त्यामुळे अशा इच्छांना आवर घालणे तृप्तीची मात्रा वाढविण्याकरिता आवश्यक असू शकेल.
या आणि अशा इच्छांचा विचार करून तृप्तीकरिता त्यांची निवड करणे जरूर असते. आपल्या इच्छांपैकी बहुतेक इच्छा आपल्या स्वतःच्या सुखाकरिता असतात. असे जरी असले तरी आपल्या अनेक इच्छा आपल्याहून अन्य एका किंवा अनेक व्यक्तींना सुख व्हावे किंवा त्यांच्या दु:खाचा परिहार व्हावा म्हणून असतात हे लक्षात ठेवणे जरूर आहे. उदा. आपली मुले, मित्र इत्यादींच्या दुःखाने आपण कळवळतो, आणि सबंध मनुष्यजातही सुखी असावी अशी इच्छा जवळपास प्रत्येक मनुष्यास असते. ही परसुखार्थ इच्छा सामान्यपणे बरीच दुर्बल असते हे खरे. परंतु ती महत्त्वाची आहे. कारण ती तृप्त केली की अधिक मानवांना सुख होते. याकरिता या इच्छेला विशेष महत्त्व आहे. म्हणून तिचे शक्य तो अधिक संगोपन करणे जरूर असते. आता हे खरे आहे की काही व्यक्तींच्या ठिकाणी ही इच्छा अतिशय दुर्बल असते. तसे असले तरी इतरांनी परोपकाराचे महत्त्व त्यांना पटवून द्यायला हवे. क्वचित् त्यांच्यावर थोडा बलप्रयोग करावा लागला तरी तो करावा. या बलप्रयोगाचे समर्थन आपण राजकीय जीवनात करतो तसे करावे. उदा. एखाद्या व्यक्तीला लोकशाही पसंत नसली तरी आपण तिच्यावर लोकशाहीचे कडक निर्बंध घालतो. तसेच येथेही करावे. लोकशाहीचे पुरस्कर्ते बलप्रयोगाचे समर्थन जसे करतात तसेच आपणही करू शकू.
Duty (कर्तव्या)ची संकल्पना खरोखर कायदा-क्षेत्रातील. तिच्यात कोणी-तरी सार्वभौम विधिकार (legislator) तिच्यामागे असतो, आणि तो कर्तव्यच्युती-बद्दल शिक्षा करतो. म्हणून आपण ती कल्पना नीतीच्या क्षेत्रात उचलू शकत नाही; कारण कर्तव्य निरपवादपणे बंधनकारक करणाऱ्या शक्तीची आपण नीतिक्षेत्रात कल्पना करू शकत नाही. सत्याच्या क्षेत्रात निरपवाद सार्विकतेची कल्पना आहे; पण ती अलंघ्य निरपवादित्वाची कल्पना नाही, म्हणून आपण ती स्वीकारू शकतो. परंतु नीतीच्या क्षेत्रात तशी कल्पना करण्यास वाव नाही. म्हणून राजकीय जीवनात जशी मनुष्यकृत बंधने असतात तशी बंधने आपण स्वीकारू शकतो. राजकीय जीवनात ज्याप्रमाणे पहिले कायदे यदृच्छया, आपोआप निर्माण होतात, आणि ते आपण स्वीकारतो आणि क्वचित सुधास्नही घेतो, त्याचप्रमाणे नीतीच्या क्षेत्रातही नौतिक नियम आपोआप, यदृच्छया निर्माण होतात आणि आपण ते पाळतो.
हे वाचत असताना एक प्र न वाचकांच्या मनात उद्भवणे अपरिहार्य आहे. तो प्र न असा. या लेखातील आतापर्यंत विवेचनावस्न ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की विवेकाचे (reasonचे) नीतीच्या क्षेत्रात कसलेही काम नाही. मग या नीतीला विवेक-वादी कसे म्हणता येईल?
एका अर्थाने हा प्र न बिनतोड आहे यात शंका नाही. जर विवेकाचे क्षेत्र पूर्णपणे नीतीच्या बाहेर असेल तर नीती विवेकवादी असू शकणार नाही हे म्हणणे बरोबर आहे. पण दुसऱ्या एका अर्थाने नीतीत विवेकाचे खूपच कार्य आहे. ‘विवेक’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत, आणि त्यापैकी एक अर्थ reason असा आहे. त्याचा दुसरा अर्थ कोशात ‘तारतम्य बुद्धि, समंजसपणा, सारासारविचार’ असा दिला आहे. Reason या अर्थी विवेक ही एक कठोर शक्ती आहे; पण दुसऱ्या अर्थी ती बरीच मवाळ गोष्ट आहे. अतिशोक करणाऱ्या माणसाला आपण म्हणतो, अरे, थोडा विवेक कर; किंवा ज्याला चारचौघांमध्ये वागता येत नाही त्याला तारतम्य नाही असे म्हणतो. हा दुसराही अर्थ ‘विवेक’ शब्दाचा योग्य अर्थ आहे. असाच अर्थ ‘reasonable’ या इंग्लिश शब्दातही आहे हे लक्षणीय आहे. ‘Reasonable’ म्हणजे ‘rational’ नव्हे; आणि ‘rational’ म्हणजे ‘reasonable’ नव्हे. या दृष्टीने पाहता ‘विवेकवादी नीति’ हे नाव खरोखर अन्वर्थक आहे असे म्हणता येते.

3/4, कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपुर — 440 012