सखी-बंधन

माणसात नर मादीचे नवे नाते अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे नाते सखीबंधनातून जडते. सखी-बंधन ही संकल्पना माझी नाही. नाशकाला आजचा सुधारक ह्या मासिकाच्या वाचकवर्गाचा नुकताच मेळावा भरविण्यात आला. लोकेश शेवडे, सुरेंद्र देशपांडे ह्या नाशिककरांनी तो आयोजित केला होता. या मासिकात स्त्रीपुरुषांचे विवाहनिरपेक्ष संबंध स्ढ व्हावेत या निसर्गसमीपतेचा पुरस्कार करणाऱ्या र. धों. कर्व्यांचे लेख नुकतेच प्रसिद्ध झाले होते. नागपूरचे दिवाकर मोहनी याच विचारांचा तात्त्विक पाठपुरावा करणारे लेखक नाशकातील मेळाव्यात उपस्थित होते. या लेखांविषयी साधकबाधक चर्चा मेळाव्याच्या सभेनंतर एका खाजगी मैफलीत रंगली. या चर्चेत राजीव साने ह्या सामाजिक तत्त्वज्ञाने चर्चेच्या ओघात सहज म्हणून ‘सखी-बंधन’ ही संकल्पना मांडली. ‘सखी-बंधन’ ही संकल्पना व शब्दयोजना राजीवच्या कल्पकतेतून जन्माला आली. र. धों. कर्व्यांचे विचार प्रत्यक्षात उतरावेत यासाठी ही संकल्पना कशी उचलून धरता येईल याचा हा थोडा विचार. सखीबंधनात सखा-बंधन अभिप्रेत आहेच.

राखी-बंधनाचा सोहळा हिंदूंना जिव्हाळ्याचा आहे. मेवाडच्या राणीने संरक्षणासाठी हुमायून नावाच्या तुर्काला राखी बांधून त्याच्याशी भावाचे नाते जोडले होते. इतिहासात हुमायून आळशी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने मेवाडच्या या राजपूत भगिनीचे रक्षण केले नाही. राखीबंधनाचे हे पुण्यकार्य आजही राखीपूर्णिमेला होत असते. आता परिवारातून हा सोहळा महाविद्यालयापर्यंत विस्तारत गेला आहे. प्रियकर-प्रेयसी हे नाते प्रस्थापित होणे शक्य नसेल तर उपनेणिवेतील प्रीतीच्या भावनेचे उदात्तीकरण होऊन रक्षाबंधनाचा सोहळा कॉलेजातील तरुण-तरुणी साजरा करीत असतात. तरुणीच्या हातून मनगटावर राखी सजली की मग विवाहाची द्वारे या प्रेमळ व्यक्तींसाठी अनायासे बंद होतात. पण प्रणयाची ओढ संपत नाही. सखी-बंधन हा एक निष्काम उपचार असू शकतो.

हिंदू संस्कृतीत भ्राता आणि भगिनी ह्यांचे विवाह समाजमान्य नसतात. मुसलमानांत एकाच मातेचे दूध पिणारे भ्राता भगिनी विवाह करू शकत नाहीत. प्राचीन काळी भ्रातृ-भगिनींचे विवाह प्रचारात होते. पण ऋग्वेदकाळापासून ते निषेधार्ह ठरले याची साक्ष देणारे एक सूक्त दहाव्या मंडळातील यम-यमीच्या संवादातून मिळते. जन्मदात्री वेगळी असेल तर अशा सन्ततीच्या मुलामुलींना विवाह करता येत असावा असेही स्पष्ट करणारी उदाहरणे प्राचीन काळात आहेत. पण वर्तमानात मात्र एका गोत्राच्या अपत्यांचाही विवाह ब्राह्मणांना मान्य नाही. म्हणून राखीबंधनाच्या पवित्र-बंधनात अडकून झुरण्यापेक्षा सखीबंधनातून परस्पर मिलनाची कवाडे उघडी असतात. नात्याची बंधने कितपत नाजुक आणि पवित्र असावीत हे परिस्थितीवर आणि भवितव्या-वर सोपविणारे एकमेव माध्यम म्हणजे सखी-बंधन. सखीबंधनाची व्याप्ती संकुचित नाही. प्रीती, विवाह, समागम, हे त्यांत अभिप्रेत असेल वा नसेलही.

र. धों. कर्व्यांची विवाहनिरपेक्ष संबंधांची नैसर्गिक संकल्पना मान्य करूनही एक प्रश्न उत्पन्न होतो. अनोळखी स्त्री पुरुषांनी जवळीक साधायची कशी? परस्परांविषयी आवड किंवा आकर्षण निर्माण झाले तरी रतिक्रीडेत गुरफटण्याचे क्षण शोधायचे कसे? परस्परांविषयी असणाऱ्या आकर्षणाची आणि अंतिम सुखप्राप्तीची अभिलाषा व्यक्त करणारी अभिव्यक्ती होणार कशी? साठी उलटलेल्या, वयस्कांना हा संबंध शक्य होईल काय? र. धों. कर्व्यांना, किंवा दिवाकर मोहनींना या प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत. कारण या प्रश्नांची उत्तरे कल्पनाविश्वातदेखील मला सापडलेली नाहीत. र. धों. कर्वे किंवा दिवाकर मोहनी यांच्या लेखांतून प्रामुख्याने पुरुषी कामवासना तृप्तीचा सोस अधिक जाणवतो. र. धों. कर्वे ह्यांनी या बाबतीत स्त्रियांना प्रश्नावली देऊन त्यांची मते जाणून घेण्याचा खटाटोप केला अथवा नाही याविषयी मला माहिती नाही. दिवाकर मोहनी ह्यांनी हा प्रयत्न केला नाही याबद्दल खात्री देता येते. र. धों. कर्व्यांच्या लेखनातून ते स्वैर जीवनाचा पुरस्कार करतात, विवाहसंस्थेचा उच्छेद इच्छितात, नावीन्याचा पुरस्कार करतात, की विवाहजीवन विस्कळीत असणाऱ्यांना मार्ग दाखवितात? त्यांचा उद्देश सुस्पष्ट होत नाही. मला तरी तो स्पष्ट झाला नाही.

र. धों. कर्वे, दिवाकर मोहनी ह्यांचे विचार अगदीच नावीन्यपूर्ण आहेत असेही नाही. इतिहासात ही स्वैराचारी अवस्था होती. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो ह्याने साम्यवादी विचाराचे मंडन करताना राज्यकर्त्यांसाठी उत्तम नारी आणि उत्तम पुरुष ह्यांचे संघ अभिप्रेत धरून त्यांच्यात स्वैर समागम व्हावा असा विचार मांडला होताच. हरिदास मित्र यांच्या गणपतीवरील प्रबंधात विवाहपद्धती रूढ नव्हती अशा सात जातींना त्यांनी ‘उत्सवसंकेत’ असे विशेषण लावलेले आहे (गणेश कोश, अमरेंद्र गाडगीळ पान ९२). अशा प्रॉमिस्क्युअस समाजाची अनेक उदाहरणे महाभारतातून आढळतात (Evolution of Morals in Epics व्होरा). विवाहसंस्था ज्या समाजात पक्की रुजलेली आहे तेथे कर्वे आणि मोहनी यांनी जे आदर्श प्रस्थापित व्हावे ह्याचा लाहो घेऊन लेखन केले आहे ते राजरोसपणे मान्य होऊ शकत नाही. चोरटे व्यवहार शक्य आहेत आणि हे चोरटे कर्म ज्याला जार कर्म म्हणतात ते तर कृष्णदयार्णवांनी हरिवरदा ग्रंथात यथातथ्य वर्णन करून सांगितले आहे. तो ग्रंथ अठराव्या शतकातील आहे. विवाहसंस्था मान्य केली आणि विवाहितांना विवाहबाह्यसंबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य मान्य केले तर ते जार किंवा जारिणीचे कर्म ठरणार नाही काय? हलायुधाच्या शब्दकोशात कुंड आणि कुंभ ह्यांचे अर्थ विवाहबाह्य संबंधाच्या संदर्भाची जाणीव करून देतात. र. धों. कर्वे अशा तऱ्हेने कुंडिन आणि कुंभीन संस्कृतीचा पुरस्कार करून कुंडगोलकाला आणि कुंभगोलकांना मान्यता देतात असेही म्हणता येते.
मुख्य प्रश्न असा की मुक्त समागमाचा प्रस्ताव मांडून तो स्वीकृत होण्यासाठी परस्परांची मानसिक तयारी होण्यासाठी प्रस्ताव मांडायचा कोणी? आणि केव्हा? वर्तमानकाळात अस्तित्वात आलेले भार्यांची अदलाबदल करणारे क्लब किंवा दुसऱ्या बाजीरावाचा घटकंचुकीचा खेळ हे सारे श्रीमंत समाजातील घटकांनी नावीन्याच्या गरजेपोटी निर्माण केले आहेत. घटकंचुकीच्या खेळातही कंचुकीच्या साहाय्याने जी स्त्री वाट्याला येत असे त्या स्त्रिया कुलीन होत्या वा सरदारांच्या नाटकशाळेतील कुंभिनी होत्या? याची चर्चा राजवाड्यांनीही केली नाही. दीर्घतमा, पाराशर हे ऋषी गोतम धर्माचे पुरस्कर्ते होते. पण दीर्घतम्याची पत्नी प्रद्वेषी आणि पराशराची प्रिया सत्यवती या अशा उघड्यावर होणाऱ्या रतिक्रीडेसाठी सहमत नव्हत्या. तात्पर्य स्त्रियांचा लज्जासुलभ स्वभाव लक्षात घेता र. धों. कर्वे आणि दिवाकर मोहनी यांनी स्त्रीपुरुष मुक्त संबंधाचा जो पुरस्कार केला तो कल्पनाविश्वातच शक्य आहे. प्रत्यक्षात तसे घडून येण्यात ज्या अडचणी आहेत, विशेषतः स्त्रियांची त्या संदर्भातील मानसिकता वा सहभाग कितपत अनुकूल वा प्रतिकूल ह्यांचा शोध र. धों. कर्वे ह्यांनी मुळीच घेतलेला नाही. प्लेटोचे रिपब्लिक जसे युटोपियन स्वरूपाचे होते तसेच हे लेखन युटोपियन ठरते.

पण अशा तऱ्हेच्या संधी मिळण्यास जी मानसिकता आवश्यक असते ती राजीव साने ह्यांनी मांडलेल्या ‘सखीबंधन’ ह्या संकल्पनेतून शक्य होईल असे वाटते. चित्रपट, दूरदर्शनवरील ‘धारावाही’तून आता प्रणयनिरपेक्ष असे एक कामवासनाविरहित मैत्रीचे नाते तरुण-तरुणीत निर्माण झाल्याची उदाहरणे समोर येतात. हे असे नाते असू शकते यावर माझा जरी विश्वास असला तरी हे नाते निरोगी वृत्तीने न स्वीकारणाऱ्या माझ्या परिचयाच्या स्त्रीलिंगी व्यक्तीचे दोषारोपण माझ्या कानावर आले. या नात्यावर सुशिक्षित स्त्रीपुरुषांचाही विश्वास नाही हे मी अनुभविले आहे. एका पुरुषाला अनेक मैत्रिणी असल्या तर त्याच्यावर वुमनायझर म्हणून दोषारोप होतो. महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिकाही असा दोषारोप करतात. मग सामान्यांचे ते काय? सखी-बंधन जसे प्रचारात येईल तसतसे हे दोषारोपण संपुष्टात येईल. प्रणयबंधन, राखीबंधन ही दोन बंधने रूढ झालेली आहेत. सखी-बंधन ही नवी संकल्पना आहे. निखळ मैत्रीपेक्षा सखी-सखा या नात्याचे अनुबंध अधिक घट्ट असतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ ह्या दिवशी तरुण-तरुणी फूल देऊन प्राथमिक स्तरावर प्रेम भावना व्यक्त करतात ते अगदीच चूक आहे. कारण मुळात हा दिवस रंजल्या- गांजलेल्यांना प्रेमाची भेट देण्याचा होता याचा विसर पडला आहे.

राखीबंधनात वासनानिरपेक्ष नात्याची हमी द्यावी लागते. राखीबंधन हे स्त्रीलिंगी व्यक्ती कडूनच होत असते. सखीबंधन वा सखाबंधन या उपचारात ही हमी नसते. प्रणयाची परिणती केव्हातरी देहसमागमात व्हावी हे प्रियकर प्रेयसीला अभिप्रेत असतेच. सखा व सखी-बंधनात समागम अभिप्रेत असेलही वा नसेलही. प्रणयात गुंतलेल्यांचा परस्परांच्या जीवनावर हक्क प्रस्थापित होतो. सखीबंधनात असा हक्क प्रस्थापित होत नसतो. एका सखीचे अनेक सखे आणि एका सख्याच्या अनेक सखी असू शकतात. प्रेमबंधनासारखा उभयान्वयी संबंध सखा-सखी बंधनात नसतो. या बंधनात विवाह होईल वा होणार नसला तरी बंधन अतूट राहू शकते. प्रणयातील अपयशामुळे येणारी विरहाची धग सखा आणि सखी यांच्या सहवासात कमी होऊ शकते. मुख्य म्हणजे प्रेम, राखीबंधन ह्या जशा तारुण्यसुलभ संकल्पना आहेत तसे सखी वा सखा बंधन याला वयाचे बंधन राहणार नाही. म्हाताऱ्याची सखी अगदी तरुण वा म्हातारी असू शकेल. त्यांत परस्पर नाते कोणत्या पातळीवर असावे हे सखा किंवा सखी ठरवू शकेल. एखादा वृद्ध विधुर, वृद्धा विधवा सखा किंवा सखी असू शकतात. सख्याचा किंवा सखीचा विवाह अन्यत्र झाला तरी हे नाते अतूट असू शकते. असा एखादा दिवस आवश्यक आहे की ज्या दिवशी हे नाते प्रदर्शित करण्यास संधी दिली जावी. राजीव साने ह्यांनी निकटवर्ती भवितव्यात निर्माण होऊ पाहणाऱ्या एका नव्या अनुबंधाची संकल्पना मांडली आहे. प्रेम हे ठरवून केले जात नाही. सखी वा सखा हे नाते ठरवून प्रस्थापित केले जाते. त्यात दया, क्षमा, शांती, करुणा, निष्कामता सकामता या दैवी, वा मानवी गुणांचा परिपोष साधला जातो. सखीबंधन वा सखाबंधन हे प्रणयबंधनात की रक्षाबंधनात परिणत व्हावे हे परस्परांच्या इच्छेवर आणि परिस्थितीवर अवलंबून असेल. प्रीतीचे तंतू रेशमासारखे नाजुक असतात असे म्हणतात. सखी आणि सखा यांच्या अनुबंधाची वीण घट्ट असते. चिंतकांनी हे नाते उचलून धरण्याची गरज आहे. वाढत्या वयानुसार कंटाळा आणि संघर्ष या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पतिपत्नीच्या अतूट विवाहबंधनात सखी आणि सखा हे अनुबंध सौंदर्यस्थळाप्रमाणे मनाला सुखविणारे ठरू शकतात. तरीपण एक प्रश्न अडचणीचा आहे. सखी वा सखा-बंधनाचा प्रस्ताव मांडावयाचा कुणी? कसा? आणि कोठे? लज्जा हा जिचा नैसर्गिक स्वभाव आहे तिचा प्रतिसाद सख्याला मिळणार कसा? ज्याला अवसर आणि पुरेसा एकान्त मिळतो त्यांनाच हे शक्य आहे. एवढे मात्र खरे की नोकरी करणाऱ्या स्त्री पुरुषांना अशा संधी सहज प्राप्त होऊ शकतात.

गुजरवाड्याजवळ, महाल, नागपूर ४४० ००२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.