लैंगिक स्वातंत्र्य

ह्या अंकामध्ये प्रा. ह. चं. घोंगे यांचा ‘सखीबंधन’ नावाचा लेख प्रकाशित झाला आहे. त्या लेखात मी ज्याचा तात्त्विक पाठपुरावा करतो अशा विषयाचा ऊहापोह त्यांनी केला आहे. स्त्रीपुरुषांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित व्हावेत असे मी पूर्वी प्रतिपादन केले आहे असे श्री. घोंग्यांचे म्हणणे. तसेच ह्या विषयामधले पूर्वसूरी रघुनाथ धोंडो कर्वे ह्यांच्या आणि माझ्या भूमिकांमध्ये काय फरक आहे तो त्यांनी विशद करून मागितला आहे. मला येथे कबूल केले पाहिजे की मी कर्व्यांचे लिखाण फार थोडे वाचले आहे. त्यामुळे अशी तुलनात्मक भूमिका मांडताना माझ्याकडून त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. तेव्हा कर्व्यांचा कमीतकमी उल्लेख करून स्त्रीपुरुषसंबंधांबद्दलचे माझे मत मी येथे मांडणार आहे.

मी स्त्रीमुक्तिचा पुरस्कर्ता आहे. आणि स्त्रीमुक्ति जर खऱ्या अर्थाने घडवून आणायची असेल तर स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य द्यावेच लागेल असे मी वेळोवेळी मांडले आहे. मला स्त्रीमुक्ति हवी आणि तिचे अपरिहार्य अंग असणारे लैंगिक स्वातंत्र्यही हवे. हे लैंगिक स्वातंत्र्य स्त्रीमुक्तिसाठी हवे आहे, पुरुषांची वैचित्र्याची गरज भागविण्यासाठी नाही हे श्री. घोंगे यांनी लक्षात घ्यावे. रघुनाथ धोंडो कर्व्यांना मला अभिप्रेत असलेली स्त्रीमुक्ति हवी होती की नाही हे मला सांगता येणार नाही. स्त्रीमुक्ति आणि योनिशुचिता एका ठिकाणी नांदू शकत नाहीत ह्याविषयी माझ्या मनात संदेह नाही. मी योनिशुचिता हे मूल्य कदापि मान्य करीत नाही. (पण स्त्रिया मुक्त म्हणजे स्वतंत्र असल्याकारणाने त्यांचे ब्रह्मचारिणी राहण्याचे अथवा एका पुरुषाशी एकनिष्ठ राहण्याचे स्वातंत्र्य अबाधित आहे हे मी येथे स्पष्ट करू इच्छितो.) योनिशुचितेला म्हणजे अविवाहित स्त्रीच्या कौमार्याला किंवा विवाहितांच्या पातिव्रत्याला मी कवडीइतकी किंमत देत नाही. माझ्या दृष्टीने ब्रह्मचारिणी/पतिव्रता आणि कुलटा/जारिणी ह्यांच्या दर्जात रतिमात्र फरक नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये विवाहसंस्काराचे महत्त्व शून्य असावे अशी माझी इच्छा आहे. विवाहबंधन ही अनेकांसाठी, मुख्यतः महिलांसाठी, दुःखाची खाण आहे. ती खाण कितीही खोल खणली तरी तिच्या तळाशी दु:ख आहेच. हे विवाहजन्य दुःख केवळ स्त्रीपुरुषसंबंधामध्ये दिसते असे नव्हे. ते सासूसुनांच्या, नणंदाभावजयांच्या, जावाजावांच्या संबंधातसुद्धा प्रकट होत असते. माणसाच्या आयुष्यातील दु:ख कमी करायचे असेल तर आपण जेथे विवाह नाही अशा संस्कृतीत प्रवेश करणे अगत्याचे आहे. जर विवाह पूर्ण नष्ट होणार नसेल तर त्याचे स्वरूप बदलावे लागेल परंतु त्याचा विचार मागाहून करू.

माझा हल्ला विवाहसंस्थेवर आहे, त्याचप्रमाणे विवाहविधीवर आहे. आमच्या आयुष्यात ज्यामुळे त्या विधीला इतके महत्त्व आले त्या मनावरच्या संस्कारावर आहे. आमच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या त्या पवित्रापवित्राच्या संकल्पनेवर आहे. विवाहसंबंध जुळवून आणणारी जशी मंडळे आहेत तशी विवाहबाह्यसंबंध जुळवून आणणारी मंडळे उघडणे आणि ती चालविणे हे माझे कार्य नाही. मला विवाह बंद करायचे आहेत. किमानपक्षी त्यांचे आमच्या मनातले महत्त्व नष्ट करायचे आहे. विवाहाची चौकट तशीच कायम ठेवून विवाहान्तर्गत सुधारणा म्हणून विवाहितांच्या आयुष्यांचा एकसुरीपणा घालविण्यासाठी पालट घडविणे हे माझे कार्य आहे असे मी मानत नाही. हा लढा मला शारीरिक पातळीवर लढायचाच नाही. मला तो मनावर होणाऱ्या संस्कारांच्या (conditioning of minds च्या) पातळीवर लढायचा आहे. स्त्रीची ओळख एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून व्हावी, कुमारी, सुवासिनी, विधवा म्हणून किंवा ब्रह्मचारिणी, पतिव्रता, परित्यक्त्या अथवा व्यभिचारिणी म्हणून होऊ नये; त्यांना त्यांच्या शरीरावर, नावामध्ये किंवा आणखी कोठेही त्यांच्या आयुष्यात पुरुषांचे स्थान काय ते दाखविण्याची, सांगण्याची गरज पडू नये आणि हा फरक तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनांत पडावा ह्यासाठी माझी खटपट आहे. कोणतीही स्त्री पहिल्याने भेटल्यानंतर तिचा वैवाहिक दर्जा काय असा विचार मनात येऊ नये, मनाला लागलेली ही सवय मोडावी, ह्यासाठी काय करता येईल असा प्रश्न मला पडला आहे. एवढे प्रास्ताविक करून आता श्रीयुत घोंगे यांच्या लेखाकडे वळतो.

नासिकच्या त्या खाजगी मैफिलीत कोण काय बोलले हे श्रीयुत घोंगे यांनी नावानिशी सांगितले नसते तर बरे झाले असते. श्री. राजीव साने यांचा उल्लेख त्यांनी टाळायला हवा होता असा विचार पहिल्याने माझ्या मनात येऊन गेला. साने काय बोलले ते, ते नाकारणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून मी त्यांचा उल्लेख टाळत नाही. परंतु खाजगी बैठकीमध्ये जे बोलणे होते ते बोलणाऱ्याच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकाशनार्थ पाठविणे बरोबर नाही. (अशी पूर्वसंमती श्री घोंगे यांनी घेतली असल्यास प्रश्नच मिटला.) त्या लेखामध्ये माझा उल्लेख जेथे जेथे आला आहे तेवढ्याविषयी मी माझे मत मांडतो. श्री. घोंगे यांना प्रश्न पडला आहे की कर्व्यांची विवाहनिरपेक्ष संबंधाची नैसर्गिक संकल्पना मान्य झाल्यावर अनोळखी स्त्री-पुरुषांनी जवळीक साधायची कशी? परस्परांविषयी आवड किंवा आकर्षण निर्माण झाले तरी रतिक्रीडेत गुरफटण्याचे क्षण शोधायचे कसे? साठी उलटलेल्यांना, वयस्कांना, हा स्वैराचार शक्य होईल काय? ह्यावर माझे म्हणणे असे की अनोळखी स्त्री-पुरुषांनी जवळीक साधायची नाही. मला स्त्रीमुक्ति हवी, स्वैराचार नको. ज्या पुरुषाविषयी किंवा स्त्रीविषयी प्रतियोगी पक्षाला काहीही माहिती नाही, कोठल्याही नाजुक भावनांचा उदय परस्परांच्या मनांत झालेला नाही अशांच्या समागमाला मी स्वैराचार मानतो. चांगल्या चवीचा पदार्थ दिसला की भूक नसताना तो खाणे हा स्वैराचार आहे; त्याचप्रमाणे कोणतीही मनाची (किंवा केवळ शरीराचीसुद्धा) गरज नसताना स्त्रीपुरुषांनी एकमेकांना मुक्त संग देणे हा स्वैराचार आहे. परस्परांविषयीचे आकर्षण किंवा आवड असा शब्द श्री. घोंगे यांनी पुढच्या वाक्यात वापरला आहे. त्यातला परस्पर हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. ते आकर्षण उभयतांमध्ये निर्माण झाले आहे हे परस्परांना कळल्यानंतर बाहेरच्या कोठल्याही मध्यस्थाची गरज राहत नाही. त्यामुळे त्यांचे ‘अनोळखी स्त्री-पुरुष’ आणि ‘परस्परांविषयी ओढ’ हे शब्द एकमेकांना छेदतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. पलिकडे ते साठी उलटलेल्या स्त्री-पुरुषांचा उल्लेख करतात. तेव्हा त्यांच्या मनात वैचित्र्याशिवाय दुसरा भावच नाही आहे असे लक्षात येते. भूक नसताना अग्निवर्धक औषधांचे सेवन करून आपली चित्रविचित्र खाद्यपदार्थांची हौस पुरवायची आणि साठी-पासष्टी उलटल्यावर वाजीकरणाची औषधे घेऊन आपली वैचित्र्याची हौस पुरवायची ह्या दोन्हीला मी स्वैराचार मानत असल्यामुळे मला ती त्याज्य आहेत.

‘दिवाकर मोहनींच्या लेखातून प्रामुख्याने पुरुषी कामवासनातृप्तीचा सोस जाणवतो.’ श्रीयुत घोंगे यांनी माझ्या कोणत्या वाक्यावरून त्यांना असे वाटले ते दाखवून दिले असते तर बरे झाले असते कारण माझ्या आठवणीप्रमाणे मी कामक्रीडा ही उभयतांची क्रीडा आहे असेच पुनःपुन्हा प्रतिपादन केले आहे. माझ्या एका लेखात स्त्रिया ह्या सुंदर वेष्टनाने मढविलेल्या Do not use if seal is broken असे ज्यांवर लिहिले आहे अशा, स्वतः काहीही हालचाल न करणाऱ्या बाटल्या नाहीत असे वाक्य आहे. त्यांनाही स्वतःच्या प्रेरणा आहेत आणि त्यांच्या स्वाभाविक प्रेरणांबरोबर आपण, म्हणजे आपल्या समाजाने, त्यांच्यावर लादलेल्या योनिशुचितेच्या निर्बंधामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे असेच वेळोवेळी म्हटले आहे. मी स्त्रियांना प्रश्नावली दिली नसली तरी अंदाजे तीन वर्षे ह्या विषयावर पुन्हापुन्हा लिहिल्यानंतर एकाही स्त्रीने माझा निषेध केला नाही हे मला माहीत आहे. किंबहुना खाजगीमध्ये तर अनेक स्त्रियांनी माझ्या धीटपणाने मांडलेल्या मतांमुळे माझे अभिनंदनच केले. “कर्व्यांचे आणि मोहनींचे विचार नावीन्यपूर्ण आहेत असेही नाही’ असे ते म्हणतात. त्याविषयी मला असे सांगायचे आहे की मी नावीन्याचा दावा केला नाही, करणार नाही. माझ्या लैंगिक स्वातंत्र्य ह्या विषयावरच्या लेखनाचा हेतू स्त्रियांवरचा अन्याय दूर करणे, त्यांच्या आयुष्यातील दु:ख कमी करणे आणि जे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे अशा आचरणाच्या समीप जाणे इतकाच होता.

श्रीयुत घोंग्यांचे पुढचे वाक्य ‘विवाहसंस्था ज्या समाजात पक्की झालेली आहे त्या समाजात कर्व्यांना आणि मोहनींना जे आदर्श प्रस्थापित व्हावेत असे वाटते ते राजरोसपणे समाजमान्य होऊ शकत नाहीत’ असे आहे. याविषयी मला पुन्हा असे सांगायचे आहे की ते समाजमान्य व्हावे ह्यासाठी मी प्रयत्न करीत आहे आणि ते अखेरपर्यंत करीत राहीन. ह्या संबंधांतला चोरटेपणा मला घालवावयाचा आहे आणि चोरटेपणा कायम ठेवून ते संबंध कायम ठेवण्यासाठी माझी कोणालाही मदत होणार नाही. श्रीयुत घोंगे ज्यांना स्वैराचारी संबंध म्हणतात त्यांना मोहनी तसे म्हणत नाहीत. (मोहनी स्वैराचार कशाला म्हणतो ते वर सांगितले आहे.) मोहनींच्या मते समाजाने असे संबंध हे स्वैराचारी संबंध म्हणून गणू नये यासाठी तो प्रयत्नशील आहे. “स्त्रियांचा लज्जासुलभ स्वभाव लक्षात घेता कर्व्यांनी आणि मोहनींनी स्त्री-पुरुष-मुक्तसंबंधाचा जो पुरस्कार केला तो कल्पनाविश्वातच शक्य आहे.” असे जे घोंगे म्हणतात ते मध्यमवर्गीय, ‘सुसंस्कृत’, मुख्यतः ब्राह्मणांच्या आणि ज्यांनी ब्राह्मणांचे आदर्श स्वीकारले आहेत अशा समाजाविषयी खरे आहे. पण मोहनीच्या नशिबाने अजून जेथे बहुपतिकत्व आणि बहुपतिपत्नीकत्व मान्य आहे असे समाज अजून अस्तित्वात आहेत. त्यांची संख्या आणि व्याप्ती कमी होत आहे असे अलिकडे ऐकले. ती कमी न होता वाढावी ह्यासाठी आमच्या प्रयत्नांची गरज पडणार आहे. कल्पनाविश्वातले आम्हाला प्रत्यक्षात आणावयाचे आहे. बाकीचे श्रीयुत घोंगे यांचे बहुतेक सारे लेखन हे त्यांच्या इच्छाचिंतनासारखे आहे. स्त्रीमुक्ति का हवी याची काही कारणे पुन्हा येथे सांगतो. जेथे स्त्रीमुक्ति नाही तेथे योनिशुचितेवर भर आहे. तेथे एकपतिकत्व स्त्रियांच्या माथी मारलेले आहे आणि त्या एकपतिकत्वामुळे, स्त्रियांना जन्मोजन्मी एकाच पतीची कामना करावयाची असल्यामुळे, पुरुष हा स्त्रीदेहाचा स्वामी बनून चुकला आहे. स्त्रीला पसंत करणारा पुरुष न भेटल्यास तिच्या नशिबी आजन्म कुंवारपण येते. आपली कामेच्छा व्यक्त करण्याची तिला उजागरीच नाही. विवाहाचा अपरिहार्य भाग म्हणून तिला वैधव्य स्वीकारावे लागते. वैधव्यामुळे तिचा सामाजिक दर्जा एकदम घसरतो. नाना प्रकारची भीती तिच्या मनात वसते. बलात्काराची वगैरे. एकपतिकत्वामुळे स्त्रीचा दर्जा हा पुरुषापेक्षा नेहमीच नीच दर्जाचा असतो. पतिविषयीची निष्ठा सिद्ध करण्याची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे पतीने किंवा बाहेरच्या व्यक्तीने संशय घेतल्यास तिचे काहीच चालत नाही. तिने कितीही डोके फोडले तरी तो संशय कायमच. निष्ठेविषयी संशय घेऊन कोणालाही नमविणे फार सोपे असते. ह्या सर्व परिस्थितीचा उपयोग पुरुष तिचे आत्मबल खच्ची करण्यासाठी करतात. आणि तिच्याकडून अमर्याद सहनशीलनेची अपेक्षा करतात.

स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे कुटुंबसंस्था नष्ट होईल असा एक वेडा समज आहे. पण आजच्या लेखाचा विषय तो नसल्यामुळे त्याविषयी आणि नवे कुटुंब कसे असेल त्याविषयी पुन्हा कधीतरी.

मोहनी भवन, धरमपेठ, नागपूर ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.