पत्रसंवाद

प्रत्येक व्यक्तीच्या समाज–गटाच्या किंवा समाजाच्या जीवनामध्ये सतत भिन्न प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होत असतात. त्या स्वतःच्या आर्थिक स्थितीतील बदलांमुळे किंवा इतरत्र (बाह्य) होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतात. त्यांचे परिणामही आपल्यावर काही प्रमाणात प्रत्यक्ष आणि काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे घडतात त्या त्या प्रमाणात त्या समस्यांमध्ये आपला सहभाग (involvement) असतो. ज्या समस्यांशी आपला थेट संबंध असतो त्यांच्याबद्दलची आपली जाण चांगली असते. त्यामुळे त्यासंबंधीची इतरांची मते, सरकारी धोरणे कंपन्यांची धोरणे इत्यादी गोष्टी कितपत योग्य आहेत हे आपल्याला चांगले माहीत असते. परंतु थेट संबंध न येणाऱ्या क्षेत्रांतील घडामोडींचा तपशील आपल्याला कमी माहीत असतो. परिणाम असा होतो की एकतर आपण इतर क्षेत्रांतील धोरणांबद्दल अनभिज्ञ असतो किंवा त्याच्याकडे आपण आपल्या मर्यादित अनुभवातून पाहतो व जे काही चूक/बरोबर वाटते ते मत व्यक्त करतो. अनेकदा ऐकीव अपुरी आणि आग्रही मते तयार करून इतर क्षेत्रात जे चालले आहे ते चूकच असणार असे आपण समजतो. आपली वर्तमानपत्रे व अन्य माध्यमे माहिती देत नाहीत, आंशिक दृष्टिकोनच स्वीकारतात. त्यामुळे त्या बातम्यांचा अर्थ काय लावायचा हेही कळू शकत नाही. उदाहरणार्थ, सोन्याचांदीच्या बाजारात खरेदीदार व विक्रीदार दोघेही असतात, पण बातमी असते की ‘सोने झळाळले, चांदी चमकली !’ हा बदल कोणाकरिता अनुकूल व कोणाकरता प्रतिकूल आहे हे कळायला वेळ लागतो. तसेच बहुतांश नोकरदार वर्ग वार्षिक अंदाजपत्रकात फक्त आयकर वाढला की कमी झाला एवढ्यावरून ते अंदाजपत्रक चांगले की वाईट, तो मंत्री आणि ते सरकार चांगले की वाईट हे ठरवू पाहतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील, चांगल्या क्रियाशील लोकशाहीकरिता भावनात्मक, एकांगी विचार करणाऱ्या नागरिकाच्या ऐवजी सर्वांगीण आर्थिक विचार करणारा विवेकी नागरिक आवश्यक आहे. त्यादृष्टीने आजचा सुधारक-मध्ये लिखाण प्रकाशित करण्याचा मानस आहे.

ह्या उद्देशाने समाजाच्या आर्थिक व्यवहारांचे सर्वांगीण स्वरूप महत्त्वाच्या व रोज वापरल्या जाणाऱ्या (जसे शेतीच्या समस्या, भाववाढ, मंदी, बेरोजगारी, शोषण, क्रयशक्ती, आंतरराष्ट्रीय व्यापार, जागतिकीकरणाचे विविध पैलू इत्यादी) संकल्पनांवर सुजाण व तज्ज्ञ वाचक-लेखकांनी (एकावेळी) सुमारे १२००–१५०० शब्दांचे लेख पाठवावे अशी विनंती आहे.
(डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या टिपणावरून)

पत्रसंवाद वि. ग. कानिटकर
औदुंबर सदनिका, १२६२ सदाशिव पेठ, पुणे — ४११ ०३०
गांधी आणि सैनिकी कारवाई
खालील संदर्भ वाचून, पत्रलेखकाने व्यक्त केलेल्या मताचा त्यांनी पुनः विचार करावा ही विनंती, (पाहा — ल. ग. चिंचोळकरांचे पत्र आ. सु. जून २०००) २६ सप्टेंबर १९४७ च्या प्रार्थना सभेत गांधीजी म्हणाले की ते सर्व प्रकारच्या युद्धाचे विरोधक आहेत. परंतु पाकिस्तानकडून न्याय मिळवण्याचा अन्य कोणताच मार्ग नसेल, पाकिस्तान आपला सिद्ध झालेला गुन्हा कबूल न करता, तो गुन्हाच नाही म्हणत असेल, तर सरकारपुढे युद्ध करण्यावाचून अन्य पर्याय असणार नाही. युद्ध ही काही गंमत नव्हे. यामार्गाने सर्वनाशच पदरी येतो. परंतु ते (गांधीजी) कोणालाही अन्याय सहन करण्याचा उपदेश करू शकत नाहीत.’ (लास्ट फेज — ले. प्यारेलाल, पृ. ४७६)

गांधीजीनी सुचवलेल्या अहिंसक मार्गाने न जाता, गांधीजींनी युद्धाच्या पर्यायाला दिलेली संमती, शिरोधार्य मानून, नेहरू-पटेल यांनी काश्मिरांत युद्ध छेडले. यामुळे सहस्रावधी स्त्रियांवरचे बलात्कार व त्यांचे धर्मांतर टळले. याचा अर्थ पं. नेहरू व पटेल हे साधुत्वात गांधीजीपेक्षा उणे होते हे नसून त्यांना जास्त व्यावहारिक शहाणपण होते असा आहे.

दीपरत्न राऊत
नेरी — ४४२ ९०४ ता. चिमूर, जि. चंद्रपूर
धर्म आणि धम्म
भाऊ लोखंडे यांच्या धर्म आणि धम्म (आ. सु. १ मे २०००) या लेखाच्या निमित्ताने काही प्र न उपस्थित करीत आहोत. प्र न तसे जुनेच आहेत.

१. डॉ. आंबेडकरांनी धम्म हा शब्द घडविलेला (coinage) आहे काय?

२. बुद्धासंदर्भातील सर्व वाङ्मय जर संस्कृतमध्येच उपलब्ध असते तर धम्म हा शब्द अस्तित्वात आला असता काय? मग डॉ. आंबेडकरांनी ‘धर्म व धम्म’ असे न लिहिता ‘तो धर्म’ व ‘हा धर्म’ असे लिहिले असते काय?

३. नीती म्हणजे तंतोतंतपणे धम्मच काय? तसे नसल्यास नीतीपेक्षा धम्मात जास्त काही आहे काय?
सचीन अणसिंगकर बार्शी, पुतळा-प्रक्षालन योग्य कृती

माझे ज्येष्ठ स्नेही श्री. शशिकांत हुमणे यांनी माझी आ. सु.ची वर्गणी भरली. अंक वाचल्यावर (नोव्हें. ९९ ते जून २०००) उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद तर मिळालाच पण आ. सु.ची भूमिकाही निरोगी, निकोप व निरामय मनोवृत्तीची व सुसंस्कृत, विवेकनिष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी समाज निर्माण करण्यास आवश्यक आहे असे मत झाले. आ. सु.चे आधीचे खंड मिळवून वाचण्याची उत्कंठा लागली आहे. जूनच्या अंकातील भा. ल. भोळेंची पुतळा प्रक्षालनामागील कृती व भूमिका योग्य होती.

केशवराव जोशी
तत्त्वबोध, चेकनाक्याजवळ, नेरळ — ४१० १०१

निर्जीवाला काय नमस्कार?
विद्वान लोक स्वतःची विद्वत्ता दाखविण्यासाठी उगीच भारंभार लिहितात.

१. प्रा. माटे म्हणतात, “शंकराचार्य, रामानुजाचार्य यांच्यासारखे जे प्रखर बुद्धिमान लोक आहेत, ते मला केवळ तालीमबाजांसारखे वाटतात. माझे मन मला सांगत असते की गड्या, ही कसरत आहे, ते केवळ अनुमानाचे आहे. खऱ्या वास्तवाशी ओळखसुद्धा नाही.”

२. मी गांधीवादी नाही, किंबहुना मला गांधींच्याबद्दल प्रेम नाही. मला सर्वांत जास्त आदर ज्ञानकोशकार केतकर, इतिहासाचार्य राजवाडे आणि आगरकर ह्यांचेबद्दल आहे. या तिघांनीही दारिद्र्यात राहून ज्ञानोपासना केली. त्या तिघांचीही मालमत्ता नाही. नंतर पंडित नेहरू ह्यांच्याबद्दल मला आदर आहे. पंडित नेहरू म्हणत असत, “कारखाने आणि धरणे ही आजची तीर्थक्षेत्रे होत.” ह्या ना त्या स्वरूपात देव मानणाऱ्या कोणत्याही विद्वानाबद्दल मला आदर नाही. महात्मा गांधींनी राजकीय व्यासपीठावर प्रार्थना, उपवास, आतला आवाज इत्यादि आणून राजकारणातील धर्माचा प्रभाव वाढविला, प्राध्यापक हिरेन् मुखर्जी म्हणतात, “भारताचा सर्वोच्च नेता म्हणून वावरलेले गांधीजी ‘आगीशी’ खेळले.” कोणत्याही निर्जीव वस्तूला नमस्कार करून ती वस्तू आपल्यावर प्रसन्न झाली असे समजणे हे मला पटत नाही.

३. हिन्दुत्ववाद्यांची एक लाडकी कल्पना आहे की हिंदू सहिष्णू आहेत. येथे एक लक्षात ठेवले पाहिजे की जेते अत्याचार करतात आणि हिंदू जेते कधीच नव्हते. ख्रि चन आणि मुसलमान राजे होते. मशिदी आणि चर्चेस् हिंदू उद्ध्वस्त करूच शकत नव्हते. हिंदूंनी अनेक बौद्धविहार नष्ट केले आहेत. आणि दलितांच्यावर तर ते आजही अत्याचार करतात. (आजचा सुधारक डिसेंबर ९१) दुसरी एक गोड कल्पना हिंदूंना भावते, की त्यांनी दुसऱ्यांच्या मुली पळविल्या नाहीत. India and World Civilization-Volume I by D. P. Singhal Pg. N. 57

प्रभाकर गोखले
‘पद्मावती’, २० शिरगांवकर सोसायटी, कोल्हापूर — ४१६ ००८
ब्राह्मण झालो याची लाज वाटावी काय?
गेली ४/५ वर्षे मी आ. सु.चा आजीव सदस्य आहे. अलीकडच्या अंकांवर नजर टाकली असता जाणवणाऱ्या काही गोष्टी मी नमूद करू इच्छितो. उदाहरणासाठी जून २००० चा अंक मी घेतला आहे.

१. एकूण लिखाणाचा रोख पाहता माझी निवड नसता भारतात व हिंदू धर्मात व त्यातही ब्राह्मण कुळांत जन्मास आलो याची लाज वाटणे गरजेचे आहे की काय असे वाटावे अशी स्थिती असल्याचा बोध मला होऊ लागला. (संपादकीय व ब्राह्मणांचे गोमांसभक्षण हे काही पूर्वीचे लिखाण वाचून.)

२. श्री. अरुण ठाकूर यांनी र. धों कर्वे यांच्या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या प्रत्येक परिच्छेदास आपण दिलेले निर्णयस्वरूप उत्तर/टिप्पणी संपादकीय नियमांत बसते किंवा नाही हे कळत नाही. आपण स्वतंत्र लेख लिहून श्री. ठाकूर यांचा प्रतिवाद करू शकला असता, व ते योग्य झाले असते. पण ते न करता त्यांना तिथल्या तिथे प्रत्त्युत्तर देणे अशी अप्रौढ भूमिका आपण घेतलेली दिसते. सुखवाद (Hedonism) ही तत्त्वप्रणाली व त्याचा उपसिद्धान्त वगैरे ठीक, पण तो श्री. ठाकूर यांच्या आक्षेपाचे उत्तर कसे काय ठरतो? र. धों कर्वे थोर होते हे मान्य करूनही त्यांचे प्रत्येक लिखाण हे ‘शेवटचे सत्य’ आहे असे का समजावयाचे? १९३५/३६ साली लिहिलेले ‘आप्तवाक्य’ तुम्ही प्रमाण मानता असे समजणे भाग आहे. परंतु ‘आप्तवाक्य’ तुम्हास तसे वर्त्यच असावे.

३. ‘मुक्काम नासिक’ मध्ये चार्वाक हा महान प्राचीन संत होता असा बनाव निर्माण करून ‘शिवसेना’ सत्तेत असताना हा चौक काही चार्वाकप्रेमींनी पदरांत पाडून घेतला. चार्वाकांससुद्धा हे असत्य आवडले नसते. आपण त्याची भलावण करता हे आ चर्यकारकच म्हणावे लागेल. त्याच लेखात श्री. मोहनी या पूर्वसंपादकांच्या मवाळपणाचा व हळुवार आवाजाचा (ज्याचा सभेवर प्रभाव पडू शकला नाही) अश्लाघ्यपणे उल्लेख करिता हे कुठल्या विवेकवादात वा सभ्यपणात बसते?

४. श्री. भा. ल. भोळे यांचे पत्र घ्या. पुतळा प्रक्षालनाबद्दलच्या त्यांच्या भूमिकेबद्दल वाद होऊ शकतो. पण तो क्षणभर बाजूला ठेऊ. (शिवाय त्यांच्या मनांत बाट, विटाळ असे काही नसल्याचे आपले तिरप्या ठश्यांतले प्रमाणपत्र आहेच) श्री. भा. ल. भोळे पुतळा प्रक्षालनाबद्दल ती कल्पक कृती असल्याचे सांगतात. यात कल्पकता काय? हे तर पुराणमतवादी अनेक वर्षे करीत आले आहेत. तेही सोडून देऊ.

श्री. भोळे, श्री. पांढरे यांच्या उल्लेख रा. (म्हणजे राजश्री) या उपाधीने पत्राचे सुरवातीस करितात व त्यांचे आभार मानतात. (श्री. भोळे यांना अधिकृत खुलासा करण्याची संधी उपलब्ध झाल्याबद्दल) पत्राच्या शेवटी मात्र अचानक वरील सभ्यपणाची झूल फेकून देऊन श्री. पांढरे हे ‘अलबत्या — गलबत्या’ ठरतात व श्री. भोळे यांनी संपादक-मंडळाचा राजिनामा द्यावा अथवा त्यांना वगळावे ही त्यांची सूचना उपटसुंभ हडेलहप्पीची असल्याचा उल्लेख करितात. ही सर्व भाषा ‘विवेकवाद’च काय सामान्य सभ्यपणातही बसत नाही असे म्हणणे भाग आहे. आपली संपादकीय कात्री (जी तुम्ही जास्त वापरता असा उल्लेख याच अंकांत इतरत्र आहे) आपण इथे कशी वापरली नाही?

५. समाजात जे लोक विद्वान आहेत, त्यांची सर्व उक्ती, कृती व लिखाण हे समाजांमध्ये सामजस्य, सलोखा, समता निर्माण होण्यासाठी करणे आवश्यक असताना, समाजातील भेद, ऐतिहासिक वर्तनातील त्रुटी अथवा दोष इत्यादींवर एकसारखी टीका करणे हे कितपत योग्य आहे याचा विचार सर्वांनीच करणे गरजेचे आहे असे मला नेहमीच वाटते.

६. मनुष्यातील व समाजातील अनेक रोगांचे मूळ कारण माणसाचा भौतिक स्वार्थ, अहंकारीपणा, स्वयंकेंद्रितता इत्यादि गोष्टींत आहे हे विचार केला असता आढळून येईल.

७. विवेकवादाची महत्त्वाची आयुधे, म्हणजे ‘तर्क’ व ‘विवेचन’ (argument and discussion), याबद्दल बहुधा वाद होऊ नये. तर तर्काविषयी व पूर्वोक्त विवेचन यांविषयी दोन किस्से सांगावेसे वाटतात. (हे किस्से ओशोंच्या प्रवचनांतून घेतले आहेत)
(अ) एक श्रीमंत व्यापारी नदी पार करिताना बुडून मरण पावला. त्याचे प्रेत दुसऱ्या दिवशी एका कोळ्याच्या हाती लागले. क्रियाकर्मासाठी पुत्रांनी कोळ्याकडे प्रेताची मागणी केली. पण मोबदल्यावरून वाद निर्माण झाला. वकिलांचा सल्ला पडला की तुमच्याशिवाय कोणीही या प्रेताला ग्राहक नाही, त्यामुळे किंमत वाढवू नका. दोन तीन दिवसांनी प्रेत सडू लागले. कोळ्यास दुर्गंधी सहन होईना. अगोदरच आपण हा व्यवहार का केला नाही याचा त्याला प चात्ताप झाला. त्यानेही याच वकिलाचा सल्ला घेतला. वकिलाने त्याला सांगितले की किंमत कमी करण्याची काहीच गरज नाही, कारण त्या श्रीमंत मुलांना हे प्रेत दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. (वकिलास मात्र दुहेरी लाभ झाला) ही arguments तशी convincing आहेत असे वाटते.
(ब) एकदा ब्राझीलचा कोणी वकील ब्रिटन येथे, राणीचे समवेत घोड्यांच्या बग्गीतून मानवंदना स्वीकारत होता. त्याच वेळी बग्गीचा एक घोडा पादला. त्यावर राणीस संकोच वाटून ती म्हणाली Mr. Ambassdor, I am sorry. ब्राझीलचा वकील यावर उद्गारला की Never mind, your Majesty, these things happen, I even thought, it was the horse. (ऐकणारा मनुष्य आपल्या बोलण्याचा काय अर्थ घेईल हे सांगणे अवघडच आहे असो.)

आमचे उत्तर
१. कोणत्या देशात, धर्मात, जातीत जन्माला यावे यातले आपल्या हाती काही नसले तरी, आमच्या अन्यायी समाजव्यवस्थेतील वंचित जातिजमातींनी शतकानुशतके किती अवहेलना सहन केल्या असतील याची थोडी कल्पना करणे शक्य आहे. तेवढी जाणीव ठेवलीत तरी पुरे.

२. ऐकणारा आपल्या बोलण्याचा (आणि वाचणारा लिहिण्याचाही!) काय अर्थ घेईल हे सांगणे अवघडच आहे, असे आपण म्हणता ते खरे आहे. नाहीतर अरुण ठाकूर यांच्या प्रतिक्रियास्वरूप टिपणावर आम्ही दिलेली परिच्छेदवार छोटी उत्तरे आपल्याला निर्णयस्वख्य का वाटावी? ठाकुरांच्या आक्षेपांवर उत्तर द्यायला र. धों. कर्वे हयात नाहीत. त्यांनी काय उत्तर दिले असते याची कल्पना करून त्यांच्या पद्धतीने ती उत्तरे दिली आहेत. आक्षेपातला मुख्य मुद्दा तिरप्या ठशात देऊन जिथल्या तिथे परिच्छेदवार उत्तर दिले तरी ते काही प्रौढ वाचकांच्या लक्षात येत नाही हे तुमच्या पत्राने दिसले आहे.

सुखप्राप्ती हे मनुष्यजीवनाचे एकमेव साध्य असेल, आणि कामशांती हे सर्वांना शक्य असलेले सर्वांत मोठे सुख (साधन) असेल, तर कामतृप्ती साधावी. हा सुखवादी तत्त्वप्रणालीचा (Hedonism) उपसिद्धान्त ठरतो.

र. धों. कर्वे यांचे हे प्रतिपादन शेवटचे सत्य समजायचे की समीपचे हा ज्याचा त्याचा प्र न आहे.
तुम्हाला पडलेल्या प्र नांवर आधी कोणी सखोल विचार केलेला असेल, अभ्यासाने काही निष्कर्ष काढले असतील, आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ युक्तिवाद दिले असतील तर ते निष्कर्ष आणि ते युक्तिवाद मननीय आहेत असे मानणे म्हणजे आप्तवचन स्वीकारणे नाही. शिवाय इंद्रियगम्य आणि तर्कगम्य ज्ञान हा आप्तवचनांचा विषय नसतो.

३. मोल्सवर्थच्या शब्दकोशात संत या शब्दाचे पुढील अर्थ दिले आहेत.
संत — (adj) Gentle, soft-flowing, calm, unruffled; — as a stream, a breeze, the water, the air : gently burning; — as a flame : mild, not vehement or violent; — as a disorder or other disturbance : soft, placid,
peaceable; as a disposition or spirit.
तेव्हा चार्वाकांना संत म्हणण्यात असत्य काही नाही.

एकूण काय तर, ऐकणारा आपल्या बोलण्याचा काय अर्थ घेईल हे सांगणे अवघडच आहे ! आणि गनिमी कावा ही झुंडशाहीला समजणारी भाषा आहे हे छत्रपती शिवरायांनीच दाखवून दिले आहे.
आपल्याला विनोदाचे वावडे आहे हे उघड आहे. मोहनींच्या मवाळपणाचा व हळुवार आवाजाचा उल्लेख त्यांना स्वतःला आवडलेला आहे. त्याला त्यांची पूर्वसंमती होती. त्यांच्या मताबद्दल, ‘त्यामागचा त्यांचा आग्रह श्रोत्यांच्या मनावर ठसला की नाही याची शंका यावी’ अशी आमची भाषा आहे. तुम्ही ती नीट न वाचता, नीट उद्धृत न करता ‘अ लाध्य’ आणि ‘असभ्य’ ठरविली आहे. पुन्हा क्रोधाविष्ट न होता शांतपणे वाचाल तर पटेल.

४. तिरपा ठसा लक्ष वेधून घेण्यासाठी असतो. त्याला प्रमाणपत्र म्हणणे अजब तर्कशास्त्र आहे.

५. ‘ऐतिहासिक वर्तन’ जर एखादी दुष्ट स्ढी असेल तर तिच्यातील ‘त्रुटी अथवा दोष इत्यादींवर एकसारखी टीका करणे’, ‘सामंजस्य आणि समता’ निर्माण होण्यासाठीच आवश्यक आहे.

६. समाजातील अनेक रोगांचे मूळ कारण माणसाचा भौतिक स्वार्थ, अहंकारीपणा, स्वयंकेंद्रितता इ. गोष्टींत आहे, हे आपले मत पटायला हरकत नाही. मात्र ते आम्ही सांगितले तर दोषदर्शन आणि तुम्ही सांगितले तर गुणवर्णन होते की काय?

७. विवेकवादाची आयुधे म्हणजे तर्क आणि विवेचन (argument and discussion) हे सांगून आपण ओशोंच्या प्रवचनातील दोन किस्से दिले आहेत. त्यातून तर्काचे आनर्थक्यच जर तुम्हाला दाखवायचे असेल तर मग पत्रलेखनाचा एवढा खटाटोप कशाला केलात? ओशो-शिष्यांचे बरे आहे, आम्हाला argument आणि discussion यांशिवाय दुसरा मार्ग माहीत नाही.

हिमांशु तुळपुळे
४ श्रीप्रिय, पुणे — ४११०३८

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.