महाराष्ट्र फौंडेशन या अमेरिकेतील संस्थेचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आगमन ही मुळातच एक स्वागतार्ह घटना आहे यात शंका नाही. पुरस्कार, अनुदान, अर्थसाहाय्य इत्यादी स्पांनी ललित साहित्य, वैचारिक वाङ्मय, प्रकाशकीय व्यवहार, समाजकार्य इत्यादींना ती खरोखरच ‘भरघोस’ म्हणावी अशी मदत करते. मात्र तिचे निवडीचे निकष आणि निवडयंत्रणा यांबाबत कोठे चर्चा झाल्याचे आढळत नाही. एक महत्त्वाची सांस्कृतिक संस्था म्हणून तिचे अशा दृष्टीने परीक्षण होणे अवश्य आहे. त्या संदर्भात काही विचार मांडीत आहे.
१. ललित साहित्याच्या निवडीचे निकष (संदर्भ : संवादिनी, १९९९ पृ. ६२)
प्रथमदर्शनी एक गोष्ट जाणवते ती अशी की यात ‘ललित्या’चा उल्लेख कोठेच नाही. वैचारिक साहित्याच्या निकषात ‘सत्याचा शोध’ ह्या उद्दिष्टाचा जसा उल्लेख आहे तसा सौंदर्य, कलावत्ता, रमणीयता, रसवत्ता —- असा काही तरी उद्देश उल्लेखावयास हवा होता.
ज्यांच्या साहित्यातून मानवी स्वातंत्र्य, समता, न्याय ह्यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाची जाणीव व्यक्त होते —- हा निकष कलाकृतींच्या बाबतीत गैरलागू आहे. ललित साहित्यावर हे ओझे कशासाठी? हॅम्लेट, ऑथेल्लो, मॅकबेथ, किंग लिअर, उत्तररामचरित, शाकुंतल, पु. शि. रेग्यांची किंवा बालकवींची कविता या कृती स्वातंत्र्य,समता, परिवर्तन ह्यांपैकी काहीही सुचवीत नाहीत तरीही त्या थोर आहेत.
फौंडेशनने निर्देशिलेली मूल्ये मला स्वतःला प्रिय असूनही मी असे म्हणतो हे लक्षात घ्यावे. वरील निकषामुळे ललित साहित्याचा परिवेष घेऊन आलेले प्रचारकी साहित्यही गौरवित होण्याचा संभव आहे हेही लक्षात घ्यावे.
ज्यांच्या साहित्यातून मानवी जीवनाचे समर्थ दर्शन होते —- मूळ कृती कलाकृती असावी हे मान्य केल्यावर मग हा आणखी एक निकष असण्यास प्रत्यवाय दिसत नाही. मात्र ह्या विधानाचा नेमका अर्थ काय केला जातो ह्यावर बरेचसे अवलंबून राहील. ललित साहित्य मानव-मानवांचे संबंध, त्यांच्या भाव-भावना, विचार, अनुभव, कल्पना ह्यांविषयीच असल्यामुळे त्यांत ‘जीवनदर्शन’ आपाततः होतेच. मात्र ‘समर्थ’ असे म्हणताना ते ‘सखोल’ म्हणजे मानवी जीवनातली व्यामिश्रता, गुंतागुंत ह्यांना प्रकट करणारे असावे एवढाच आग्रह योग्य होईल. समाजाच्या अमुक एका भागाचे, किंवा अमुक एका प्रकारच्या वेदनेचेच त्यात चित्रण असावे असा अर्थ केला जाता कामा नये. या माझ्या मताचा असा अर्थ नव्हे की परिवर्तनात्मक विचार ललित वाङ्मयातून सूचित होऊच नये, किंवा समाजाच्या अन्यायग्रस्त विभागांच्या दर्शनाला मज्जाव असावा. उदाहरणच द्यायचे तर नारायण सुर्वे यांच्या कविता मला आवडतात कारण त्या मुळात कविता आहेत. परिवर्तनवादी विचार हा साहित्यिकाच्या अनुभवाचा भाग होऊन, ललित रूप घेऊन प्रकट झाला तर तो गर्हणीय नाही. उदा. होवार्ड फास्टची रोमन गुलामांच्या बंडावरची स्पार्टाकस ही कादंबरी. मला स्वतःला साम्यवादी क्रांतीचे ध्येय प्रिय नाही, पण विंदा करंदीकरांची ‘माझ्या मना बन दगड’ ही कविता मला आवडते : ‘लाल धूळ उडत येईल, तिच्यामागून येईल स्वार, ह्या दगडावर लावील धार’ ह्यातली ‘लाल धूळ’ वैचारिक स्तरावर मला धोक्याच्या लाल रंगाची आठवण करून देते; पण ह्या कवितेतील नाट्यमय विरोध, प्रतिमा, सूचकता, लय इत्यादींमुळे ती मला कविता म्हणून आकृष्ट करते. आणखी असे की परिवर्तनवादीच काय, कुठलाही विचार साहित्यातून सूचित होण्यावर बंधन असू नये. साहित्यिकाचे आविष्कार-स्वातंत्र्य आदरणीय समजले पाहिजे. सर्वकालीन व सार्वत्रिक मूल्ये —- ह्यांबद्दल माझे वरच्यासारखेच म्हणणे आहे.
समाजाला किंवा व्यक्तीच्या वर्तनाला लावावयाचे नियम आणि कलाकृतींना लावावयाचे नियम एक नसतात. त्यांत गल्लत केली तर सांस्कृतिक क्षेत्राची स्वायत्तता धोक्यात येते.
एक टीप अवश्य आहे. म. फौं. च्या निकषांमुळे सरसकटपणे कमअस्सल साहित्याला उत्तेजन मिळाले आहे असा दावा मला करावयाचा नाही. एक तर गौरवार्ह ठरलेले सर्व साहित्य मी वाचलेले नाही. दुसरे असे की काही गौरव योग्य स्थळी झाल्याचे दिसते. तरीही हे खरेच की निकष निर्दोष असले तर परीक्षकांना अधिक उचित असे मार्गदर्शन होईल.
२. वैचारिक साहित्याच्या निवडीचे निकष
विविध क्षेत्रांत ‘महत्त्वाची भर’ हे ठीक आहे. निःस्पृह वृत्तीने व निर्भयपणे तात्त्विक सत्याचा शोध —- हा निकष कुणालाही शिरोधार्य वाटावा.
सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा —- हे तत्त्व दोन कारणांसाठी अनुचित आहे. काही तात्त्विक विषय, उदा. व्याकरण, ज्ञानमीमांसा, इत्यादींमधील काही भागांचा तरी सामाजिक प्र नांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षही संबंध असतोच असे नाही. ह्यांवरचे वैचारिक वाङ्मय या निकषामुळे वर्जित राहील. शिवाय हा निकष वरच्या निकषाशी सुसंगत आहे असेही दाखवता येणार नाही. त्या निकषात सत्याचा शोध असे म्हटले आहे. निरनिराळे लेखक त्यांच्या त्यांच्या दृष्टीतून ‘शोध’ घेत असतात. स्वातंत्र्य, समता, न्याय ह्यांचा अर्थही सगळे लेखक एकाच प्रकारे करतात असे नाही. हे सर्व अर्थ आणि शोध मुक्तपणे प्रकट होणे वैचारिक संस्कृतीच्या निकोप वाढीच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांचा अर्थ नि िचत नाही आणि ज्यांच्यामध्ये अंतर्गत विसंवादही असू शकतात (उदा. स्वातंत्र्य व समता) अशा संकल्पनांचा निकषांत समावेश करणे योग्य नाही.
वैचारिक साहित्याचे मुख्य निकष पुढीलप्रमाणे असू शकतील : अभ्यास आणि युक्तिवाद. ह्याशिवाय नवा विचार, नवे भाष्य अशा सर्जकता-दर्शक निकषाचाही उल्लेख करता येईल पण तो ‘इष्ट’ समजावा, ‘अनिवार्य’ समजू नये. ‘युक्तिवाद’ म्हणताना वैचारिक शिस्त म्ह. तर्कशुद्धता, साधार प्रतिपादन, संकल्पनांची रेखीव चिकित्सा, सुसंगती —- इत्यादि घटक माझ्या मनात आहेत.
भाषा सभ्य असावी हे अर्थातच गृहीत धरले आहे. म. फौं. च्या निकषांमुळे धोका कसा निर्माण होतो याचे एक तरी उदाहरण माझ्या दृष्टीत्पत्तीस आलेले आहे. प्रा. रावसाहेब कसबे ह्यांच्या हिंदू-मुसलमान प्र न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद या ग्रंथाला म. फौं. चा १९९५ सालचा ‘सर्वोत्कृष्ट वैचारिक’ ग्रंथाबद्दलचा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकावर समाज प्रबोधन पत्रिकेच्या जुलै–सप्टेंबर १९९८ च्या अंकात मी विस्तृत परीक्षण लिहिले आहे आणि दाखविले आहे की त्या पुस्तकात साक्षेपी अभ्यास नाही, तर्कशुद्ध युक्तिवाद नाही, विरोधी मताचे विकृतीकरण आहे, राज्यशास्त्रीय संकल्पनांचे अज्ञान आहे, सत्यापलाप आहे, विसंगती आहेत, खोट्या पांडित्याचे प्रदर्शन आहे, दर्पयुक्त विधाने आहेत, विरोधकांचे चारित्र्यहनन आहे, प्रसंगी असभ्य भाषाही आहे.
तरीही ह्या ग्रंथावर फौं. चे परीक्षक (डॉ. सदा क-हाडे) ह्यांचा अभिप्राय पुढीलप्रमाणे आहे : ‘डॉ. रावसाहेब कसबे हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य विचारवंत आहेत. . . . त्यांची भूमिका ही समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या तत्त्वचिंतकाची आहे. कोणत्याही प्र नाचा मूलगामी शोध घेण्याची त्यांची वृत्ती आहे. . . . त्यांच्या लेखनातून चिंतनशील वृत्तीचा विचारवंत सतत जाणवतो. त्याचप्रमाणे सत्यान्वेषी संशोधकही जाणवतो. याची साक्ष त्यांच्या हिंदू मुस्लिम प्र न . . . .या ग्रंथात मिळते.’
मराठी वैचारिकतेच्या अधःपाताची ही परिसीमाच आहे. (येथे हे नमूद करावेसे वाटते की स. प्र. प्रत्रिकेतील माझ्या टीकेचा प्रा. कसबे, डॉ. क-हाडे किंवा म. फौं. यांपैकी कुणीही आजतागायत प्रतिवाद केलेला नाही.) शंका अशी येते की सावरकर, हिंदुत्ववाद, स. ह. देशपांडे, शेषराव मोरे इत्यादींवर कसब्यांच्या पुस्तकात शस्त्र धरले असल्यामुळे ते पुरोगामी आणि पुरस्कारार्ह ठरले असावे की काय? ३. निवड-यंत्रणा याबद्दल लिहिणे औचित्याला धन होणार नाही कारण त्यात व्यक्तींचा संबंध येतो असे प्रथम वाटले. पण हाही मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे त्याबद्दल मूक राहणे योग्य होणार नाही असे ठरविले. संबंधित व्यक्तींविषयी माझ्या मनात कसलीही अनादराची भावना नाही. मी करणार असलेली टीका प्रस्तुत संदर्भातल्या त्यांच्या स्थानविशेषांना धस्न असणार आहे. केशव गोरे स्मारक ट्रस्ट ही साहित्यसंस्था नाही. शिवाय तिचे कार्यकर्ते डाव्या विचारांचे आहेत. म. फौं. ने आपल्या योजनांची कार्यवाही या संस्थेकडून करून घेणे अनुचित आहे. श्रीमती मृणाल गोरे या भारतातील साहित्य पुरस्कार सल्लागार समितीच्या अध्यक्ष असाव्यात हे एक आ चर्य आहे. त्यांचा स्वार्थत्याग, लढाऊपणा याबद्दल आदर असूनही असे म्हणावेसे वाटते की त्यांची नेमणूक अस्थानी आहे. ह्या समितीवर प्रा. दिगंबर पाध्ये, डॉ. सुधीर पानसे, श्री. नारायण सुर्वे, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले हे साम्यवादी किंवा डाव्या विचारांचे सदस्य आहेत. एकच अपवाद दिसतो तो विजया राजाध्यक्ष ह्यांचा.
अमेरिकेतील सल्लागार समितीच्या सदस्यांत, पद्मजा फाटक ह्यांचा एकमात्र अपवाद वगळता, सर्व व्यक्ती, माझ्या माहितीप्रमाणे, अनेक वर्षे अमेरिकेतच जीवन व्यतीत केलेल्या असून त्यांचा महाराष्ट्रातील वैचारिक, सांस्कृतिक जगाशी रोजचा, जागता संबंध नाही. अशा व्यक्तींकडून निवडीवर अखेरचे शिक्कामोर्तब व्हावे ही गोष्टही योग्य नाही. पद्मजा फाटक या मराठीतील प्रतिष्ठित लेखिका आहेत. फक्त गेली काही वर्षे वैयक्तिक कारणांसाठी त्या अमेरिकेत आहेत. मात्र हळूहळू त्यांचाही महाराष्ट्राशी संबंध सुटेल हे उघड आहे.
ही सर्व स्थिती लक्षात घेता काही सूचना कराव्याश्या वाटतात.
अ) निवडीचे निकष बदलणे जरूर आहे. विद्यमान निकषांचे परीक्षण करताना पर्यायी निकष मी सुचविलेलेच आहेत.
आ) निवडीचे काम करणारी महाराष्ट्रातील सल्लागार प्रतिनिधित्व करणारी असावी. ललित साहित्याचे नामवंत समीक्षक आणि निरनिराळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ विचारवंत यांचा तीत समावेश असावा.
इ) परीक्षकांची योजनाही अधिक काळजीपूर्वक झाली पाहिजे. विशेषतः वैचारिक साहित्याच्या परीक्षणाबाबत त्या-त्या विषयांतील तज्ज्ञता ही कसोटी असली पाहिजे.
ई) अमेरिकेतल्या समितीने महाराष्ट्रातल्या समितीला आपल्या सूचना पाठवाव्या पण निवडीचा अंतिम अधिकार वर सुचविल्याप्रमाणे घटित झालेल्या समितीकडे ठेवावा.
५. समारोप संवादिनी १९९९ सांगते, ‘श्री. सुनील देशमुख . . . यांच्या . . . उदार देणगीमधून प्रगतिशील मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी . . .’ वगैरे. (अधोरेखा स. ह. दे.)
‘प्रगतिशील’ म्हणजे ‘पुरोगामी’ म्हणजेच ‘डावे’ असा सार्वत्रिक अर्थ आहे. या विचारसरणीचीच छाया निवड निकष आणि निवड-यंत्रणा ह्यांवर पडलेली दिसते. कुठल्याही विचारप्रणालीचा (आयडियालॉजीचा) —- समाजवादी, मुक्त व्यापारवादी, हिंदुत्ववादी, हिंदीत्ववादी अशा कोणत्याही विचारप्रणालीचा —- प्रभाव निवडीवर पडणे अनिष्ट आहे.
मात्र एक काहीशी दिलासा देणारी गोष्ट आहे. संवादिनी १९९९ या अंकात श्री. सुनील देशमुख ह्यांचे १९९८ च्या पुरस्कार-प्रदान सोहळ्यात झालेले भाषण छापले आहे. त्यात त्यांनी अभिव्यक्ति-स्वातंत्र्याचे तळमळीने समर्थन केले आहे. अमेरिकेच्या Bill of Rights चा उल्लेख केला आहे. अभिव्यक्ति-स्वातंत्र्य आणि सर्जकता ह्यांचा संबंध दाखविला आहे. अर्थात् ‘परिवार’, ‘सेना’, ‘फॅसिझम’, ‘धर्मांधता’, ‘मूलतत्त्ववाद’ इत्यादीं-वरचा त्यांचा रोषही या भाषणात प्रकट झाला आहे. तो व्हायला हवाच. त्याचे त्यांना स्वातंत्र्य आहेच. पण हे स्वातंत्र्य कुणीही स्वतःपुरते घेऊ नये, असेही त्यांचे मत आहे असे दिसते.
may not agree with what you say but I will defend to death your right to say it’ हे (व्होल्टेअरचे?) विधान त्यांनी उद्धृत केले आहे.
या निर्वाणीच्या प्रतिज्ञेला सुसंगत अशा दिशेने महाराष्ट्र फौंडेशनचे मार्गक्रमण व्हावे अशा हेतूने वरील विचार मांडले आहेत
सी. २८, गंगाविष्णु संकुल, प्रतिज्ञा हॉलसमोर, कर्वेनगर, पुणे — ४११ ०५२