पत्रसंवाद

सेक्युलॅरिझम् (धर्मनिरपेक्षता) शब्द प्रथम कोणी वापरला?
‘सेक्युलॅरिझम्’ या संकल्पनेच्या आशयाबद्दल वेगवेगळे विचारप्रवाह आहेत आणि म्हणूनच १५० वर्षापूर्वी हा शब्द प्रथम वापरला गेला तेव्हापासून आजतागायत या विषयावर अविरतपणे चर्चा चालू असते.

१८५० साली हा शब्द पहिल्या प्रथम वापरणाऱ्या जॉर्ज जेकब हॉलयोकचा जन्म १८१७ साली, इंग्लडमधील बर्मिंगहॅम या शहरात झाला. तरुण वयात त्याची धर्मावर अढळ श्रद्धा होती. धर्मप्रसारकांच्या सभा-बैठकांमध्येही तो सामील होत असे, एवढेच नव्हे तर या श्रद्धेप्रीत्यर्थ आवश्यक असणारा खर्चही तो स्वतःच्या खिशातून करीत असे. या त्याच्या कार्यातून त्याची बढती झाली, आणि १८३६ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी तो दर रविवारी प्रवचनेही करू लागला. परंतु लगेच पुढच्या वर्षी म्हणजे जून १८३७ मध्ये, त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. समाजवाद या संकल्पनेची प्राथमिक स्वस्पाची मांडणी करणाऱ्या, विवेक-प्रामाण्यावर भर देणाऱ्या, व्यवसायाने कापड कारखानदार असणाऱ्या, अर्थशास्त्राचा अभ्यासक रॉबर्ट ओवेन या सुप्रसिद्ध व्यक्तीशी हॉलयोकचा परिचय त्या वर्षी (१८३७) झाला. पुढील पाच वर्षे या दोघांचे विविध विषयांवर संवाद झाले आणि त्यांतून हॉयलोकच्या मनातील धर्मश्रद्धा क्षीण होत गेली. वयाच्या २४ व्या वर्षी, म्हणजे १८४१ साली, धर्मश्रद्धा पूर्ण संपुष्टात आली आणि विवेकप्रामाण्यावर तो भर देऊ लागला.

हॉलयोकच्या मनातील हे स्थित्यंतर दृढ झाले त्याच वर्षी (१८४१ साली), साऊथवेल, याल, आणि चिल्टन या अन्य विवेकप्रामाण्यवाद्यांच्या सहकार्याने, ‘विवेक-वादाचा दिव्य संदेश’ या नावाची निरीश्वरवादाची मांडणी करणारी प्रकाशनमाला त्याने सुरू केली. २७ नोव्हेंबर रोजी, ‘दी ज्यू बुक’ या नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला. त्याबरोबर साऊथवेलवर धर्मनिंदा केल्याचा आरोप ठेवून खटला भरण्यात आला. त्याला दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १८४२ साली हॉलयोकने चेल्टेनहॅम या गावी एक भाषण दिले. त्या काळात असलेले दारिद्र्य लक्षात घेऊन, चर्च या धर्मसंस्थेमधील सर्वांना निम्मा पगार देण्यात यावा व चर्चच्या कारभारातील खर्चात कपात करण्यात यावी अशी शिफारस त्याने आपल्या भाषणात केली. या गुन्ह्याबद्दल तत्कालीन न्यायमूर्ती आर्किन यांनी त्याला सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

जून १८४६ मध्ये हॉलयोक याने ‘विवेकनिष्ठ’ (द रीझनर) या नावाचे एक साप्ताहिक सुरू केले. १८६१ पर्यंत हे साप्ताहिक चालू होते. याच कालावधीत १८५० साली, हॉलयोकने ‘सेक्युलॅरिझम्’ हा शब्द प्रथम वापरला. या संकल्पनेचे स्वरूप व्यक्त करिताना, ती एक जीवननिष्ठा (जीवनाचे तत्त्वज्ञान) आहे, असे मांडले. अधिक विस्ताराने विवेचन करिताना, त्याने खालील तीन मुद्द्यांमध्ये या संकल्पनेचा आशय सामावलेला आहे याकडे लक्ष वेधले :

मानवाच्या त्या त्या कालातील (इहलोकावरील) अस्तित्वाशी ही संकल्पना निगडित आहे. मानवाने आपली शारीरिक, बौद्धिक व नैतिक उन्नती विकसित कस्न, त्यांचा परमोच्च बिंदू गाठणे, हे समाजाने आपले तातडीचे कर्तव्य आहे असे मानले पाहिजे. निरीश्वरवाद, ईश्वरवाद किंवा ख्रि चन धर्म यापेक्षा सुद्धा निसर्गाशी सुसंगत अशी नीतिमत्ता बिंबविली गेली पाहिजे. १८६१ साली बंद पडलेले त्याचे साप्ताहिक, पुन्हा एकवार अनियमितपणे सुरू झाले, ते १८७१ पर्यंत चालले. यात शासन आणि धर्म, मानव आणि धर्म, अशा विविध पैलूंचे विवेचन त्याने केलेले आढळते. वयाच्या ८९ व्या वर्षी, ‘संस्मरणीय गतगोष्टी’ या शीर्षकाखाली त्याचे एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले. सहकार व त्या तत्त्वावर अधिष्ठित अशा आंदोलनावरही, त्याने महत्त्वपूर्ण लिखाण केलेले आहे. आयुष्याच्या अखेरीच्या आठवड्यात, देशाच्या तत्कालीन सार्वत्रिक निवडणुकीमध्येही त्याने स्वारस्य दाखविले होते. १९०६ च्या जॅनेवारी महिन्यात, ब्रायटन या गावी, पत्नीच्या व मुलीच्या साक्षीने त्याने इहलोकाचा निरोप घेतला.

अधिक अभ्यासासाठी खालील पुस्तके उपयुक्त ठरतील :
1. Life and Letters of G. J. Holyoke : by Joseph Mac Cabe
2. A Descriptive Bibliography of the Writings of G. J. Holyoke :
by C. W. F. Goiss.
दीपरत्न रा. राऊत
मु. पो. नेरी, तह. चिमूर, जिल्हा चन्द्रपूर (म. रा.) — ४४२ ९०४

काही विचारतरंग आणि वस्तुस्थिती —-
१. हवा तर एक नवा ‘बुद्धिवादी संघ’ स्थापा! असे वि. दा. सावरकरांनी डॉ. आंबेडकरांच्या धर्मपरिवर्तन विचाराच्या संदर्भात लिहिले होते. पुढे डॉ. आंबेडकरांनी बुद्धधर्माचा स्वीकार केला. डॉ. आंबेडकर हे एक कृतीशील विचारवंत होते वस्तुस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव होती. मला वाटते की, त्या काळातील सर्वसामान्य लोकांच्या मानसिकतेचा विचार करता निव्वळ बुद्धिवादाकडे जायचे असेल तर या बौद्धधर्माच्या खिडकीतूनच बाहेर पडायला हवे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या विचाराची पार्श्वभूमी तयार होईल असे त्यांना अभिप्रेत असावे. पण आज वस्तुस्थिती वेगळी दिसते आहे.

२. वि. दा. सावरकरांनी सात स्वदेशी शृंखला तोडण्याविषयी लिहिले होते. त्यात त्यांनी बेटीबंदी ही तोडण्याचे आवाहन केले होते. डॉ. आंबेडकरांनी तर आंतरविवाहाचा पुरस्कारच केला होता. या संदर्भात I am convinced that the real remedy is inter-marriage, fusion of blood can alone create the feeling of being kith and kin and unless this feeling of kinship, of being kindred, becomes paramount, the separatist feeling — the feeling of being alien — created by caste, will not vanish असे लिहिलेले आहे. माझा प्र न असा की भारतीय समाज या विचारापर्यंत आलेला आहे काय? डॉ. आंबेडकरांना ज्या समाजात सर्वोच्च स्थान आहे त्या समाजातील लोकांनी जाती (पर्यायाने पोटजातीही) सोडलेल्या आहेत काय? त्याचे उत्तर सरळ-सरळ ‘नाही’ असे आहे (जेथे मी जगतो आहे तेथील हा अनुभव आहे. इतर जातींविषयी अनुभव नाही.) लग्न आणि विशेषतः गावगाड्यातील निवडणुकीच्या वेळेस जातीलाच नव्हे तर पोटजातीलाही उधान येते. (वर वर काही दिसत नाही पण आतून हे सर्व चालू असते. अर्थात् याला सन्माननीय अपवाद असतीलच.)

३. विभूतिपूजा-विरोधी असलेले डॉ. आंबेडकर (तसेच इतर महापुरुष) यांचे दैवतीकरण झालेले आहे हे सत्य आहे. या संदर्भात उठणारे कोणतेही वादळ हे rapid sentimentality याच स्वरूपाचे असते. Sentiments must be outlawed from the domain of science या डॉ. आंबेडकरांच्या प्रसिद्ध विचाराला खूप कमी लोक जागतात.

४. I shall even go to the length of rejecting the divinity of the most ancient shastras if they do not appeal to my reason असे बोलणारे महात्मा गांधी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचायला हवे आहेत. प्रार्थना करणारे व ‘आतला आवाज’ इ. म्हणणारे नव्हे.
जी. ए. शारंगपाणी
३९१, शिवाजीनगर, पुणे — ४११ ००४

हलदुल्यांच्या खरा रोख विज्ञानावर दिसतो, पण त्या जास्त प्रचलित शब्दाऐवजी ते ‘शास्त्र’ हा शब्द वापरतात. त्यांचा हा पर्याय वापरण्यामागचा भाव कोणता?

त्यांचा असाही समज दिसतो की विसाव्या शतकातील (बहुधा सापेक्षतावाद, पुंजवाद वगैरे) ‘शास्त्राने’ जुन्या सर्व ‘शास्त्रीय सत्यांना’ (न्यूटन व अभिजात भौतिकी) निकामी ठरवले. प्रत्यक्षात मात्र अंतराळ-प्रवास वगैरे बाबतीत आणि पृथ्वीवरच्या बहुतांश अभियांत्रिकीत आजही अभिजात भौतिकीच वापरली जाते. नव्या ‘शास्त्राने’ फक्त जुन्या ‘शास्त्राच्या’ काही मर्यादा स्पष्ट केल्या, त्याला ‘निकामी’ ठरवले नाही.

दुसरे म्हणजे उपलब्ध असलेल्या गृहीततत्त्वांची संख्या वाढल्यामुळे आपण सत्यापासून दूर जातो असे नाही. आपण डोंगर चढताना जास्त दूरवरचे, जास्त क्षेत्र आपल्या दृष्टिपथात येते, त्यालाच समांतर प्रकार ‘शास्त्रीय’ शोधातही होतो. आणि खूपशा नव्या गृहीततत्त्वांचा परिणाम नेहेमीच काही विशिष्ट परिस्थितींमध्येच दिसतो.

मुळात अंतिम असे सत्य मानणे–न मानणे हा ‘शास्त्रातला’ (विज्ञानातला) प्रश्नच नाही.

निसर्गव्यवहाराची जास्तीत जास्त समज मिळवणे, हाच विज्ञानाचा हेतू, ‘कुठल्याही विचारात किंवा मूल्यांमध्ये . . . शाश्वत मूल्य शोधणे’, हा विज्ञानाचा मूळ हेतूच नाही. उलट वारंवार वैज्ञानिक सांगतात की मूल्यविचारांत विज्ञान पुरत नाही. विज्ञान मूल्यविचाराची जबाबदारी ठामपणे तुमच्या—माझ्या सदसद्विवेकावरच टाकते! हलदुल्यांचा आईन्स्टाईनही ‘युनिव्हर्सल (एलेमेंटरी) लॉज’ शोधायचीच भाषा बोलतो — ‘मूल्ये’ शोधायची इच्छाही तो व्यक्त करत नाही! खरे तर कुठे विज्ञान वापरावे आणि कुठे नाही यावरची चर्चा फाईनमनच्या (ऑगस्ट २०००) लेखात बऱ्याच बारकाईने केलेली आहे. तसला बारीक विचार न केल्यानेच घोळ होत आहे.
मीना कुर्लेकर
वंचित विकास, ४०५/९ नारायण पेठ, मोदी गणपतीमागे, पुणे — ४११०३०

आपल्या ऑगस्ट २००० अंकातील ‘सखी-बंधन’ हा श्री. ह. चं. घोंगे यांचा लेख वाचला. लेख चांगला आहे. परंतु काही मुद्द्यांबद्दल मत व्यक्त करावेसे वाटते. म्हणून हे पत्र. सखी-बंधन ही कल्पना अतिशय छान आहे. आजच्या समाजामध्ये ज्या वेळेला स्त्री-पुरुष कामानिमित्त एकत्र येतात, तेव्हा कळत नकळत मैत्रीचा एक सुरेख गोफ विणला जाऊ शकतो. मैत्री किंवा मैत्रीतील प्रेम हे ठरवून होत नाही. मला व्यक्तिशः असे वाटते की, हे मैत्रीचे नाते प्रणयनिरपेक्ष असावे. नवरा व बायकोच्या नात्याशी या नात्याचा संबंध जोडू नये. एखादे वेळेस ह्या मैत्रीतील जवळीक, प्रेम व विश्वास नवरा-बायकोच्या नात्यापेक्षा जास्त असू शकेल. परंतु त्याची नवरा-बायकोच्या नात्याशी तुलना करू नये. हे नाते खरोखरच निखळ मैत्रीचे असेल तर समाज हे मान्य करेल.

या मैत्रीला एकांताची आवश्यकता असेल असे नाही. एवढे मात्र निश्चित आहे की, त्या दोघांना एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी वेळ मिळावा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.