“We should probe our commonsense reactions to evolutionary theories carefully before concluding that the commonsense itself isn’t a cognitive distortion created by evolution” —- (‘द मॉरल अॅनिमल’ — रिचर्ड राईट).
प्र न : व्यक्तींच्या आनुवंशिक गुणांपैकी जगण्याला आणि प्रजोत्पादनाला मदत करणारे गुण साऱ्या जीवजातींत पसरतात आणि असे अनेक पिढ्यांमध्ये घडून जीवजातीच्या गुणांचा संच बदलतो. नैसर्गिक निवडीतून होणाऱ्या उत्क्रांतीचे हे वर्णन आपण पाहिले. ह्याचा एक अर्थ असा की स्वार्थीपणाने स्वतःचा आणि स्वतःच्या प्रजेचाच विचार करणाऱ्या व्यक्ती टिकून राहायची शक्यता जास्त आहे, तर उलटपक्षी स्वार्थत्याग, परोपकार, असे गुण असलेल्या व्यक्तींची प्रजा आणि गुण ह्यांचा प्रसार व्हायची शक्यता कमी. अशा त्यागी व्यक्ती इतरांसाठी आपली संसाधने वापरून एका अर्थी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार! पण प्राणी, माणसे, ह्यांच्यात स्वार्थत्यागी, परोपकारी, ‘भाईचाऱ्या’च्या वृत्ती आढळतात. स्वार्थ आणि स्वार्थत्याग ह्या एकमेकांविरुद्ध गुणांचे एकाच व्यक्तीत दर्शन घडते. हे का घडते, हा उत्क्रांति-मानसशास्त्रातला एक महत्त्वाचा प्र न आहे.
जीन–वहन : कोणत्याही व्यक्तीच्या वागण्याचा संबंध जैवरसायनांशी लावता येतो. एखाद्या परिस्थितीत एखादा माणूस ठाम उभे राहून परिस्थितीशी झगडणार की ‘शेपूट घालून’ पळणार, हे शरीरातल्या अॅड्रिनलीन या द्रव्याच्या प्रमाणानुसार ठरते. अशी इतरही अनेक रसायने वेगवेगळ्या वागणुकीशी जुळलेली आढळतात. आणि ही रसायने घडवणारे जीन्सही शोधले गेले आहेत. म्हणजे काही अर्थी जीन-जैवरसायन-वागणूक यांची समीकरणे मांडता आली
आहेत. पण हा प्रकार इतका सरळ नाही.
असे समजा की एखाद्या व्यक्तीतले जीन्स भरपूर अॅड्रिनलीन उत्पन्न करतात, ज्यामुळे ती व्यक्ती युयुत्सु बनते. जर ह्या जीन्ससोबत सक्षम शरीर देणारे जीन्स नसले, तर वृत्तीने भांडखोर पण शरीराने दुबळी व्यक्ती घडेल. अशी व्यक्ती आणि तिची प्रजा टिकून राहणे अवघडच. त्यामुळे सुट्या जीन्सऐवजी जीनसंचांची संकल्पना वापरली जाते.
आता समीकरण बनते — जीनसंच म्हणजे वागणुकीचे प्रकार. हे जास्त नेमके समीकरण आहे.
उत्क्रांति-मानसशास्त्र आणखी एक महत्त्वाची संकल्पना वापरते. एखादी व्यक्ती ही केवळ व्यक्तीच नसते, तर एका पिढीतून पुढच्या पिढीत जीन्स नेण्याचे वाहनही असते. नैसर्गिक निवडीचे तत्त्व आता एका जराशा वेगळ्या । ख्यात मांडता येईल —- स्वतःच्या जगण्याला आणि प्रजोत्पादनाला उपयुक्त असणारे जीनसंच दरेक पिढीसोबत जास्त जास्त व्यक्तींमध्ये पसरत जाणे, म्हणजेच उत्क्रांती! आणि एकदा हे ‘स्वार्थी जीन’ तत्त्व मान्य केले की स्वार्थ आणि स्वार्थत्याग एकत्र आढळण्याचा तिढा सुटतो.
जो जीनसंच माझ्यात असेल तोच सरासरीने माझ्या सख्ख्या भावंडांपैकी अर्थ्यांमध्येही असेल. माझ्या काका मामा-आत्या-मावश्यांपैकी पाव जणांमध्येही तो जीनसंच असेल. माझ्या चुलत-मामे-आते-मावस भावंडांपैकी एक अष्टमांश व्यक्तींमध्येही तो जीनसंच असेल. हे सारे प्रजननाच्या क्रियेच्या आकलनातून उघड झालेले ‘गणित’ आहे. आणि हे गणित अगदी लहानात लहान केंद्र असलेल्या अमीबांपासून ते मोठ्यात मोठ्या सिक्वॉइया ह्या झाडांपर्यंत सर्व जीवांसाठी तपासले गेले आहे.
आता अशी कल्पना करा की मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या दोन सख्ख्या भावंडांना धोक्यापासून वाचवतो आहे. जर मी ‘कामी आलो’, तरी माझे बहुतांश जीन्स भावंडांमध्ये टिकून राहून पुढच्या पिढ्यांमध्ये जातीलच, आणि जर मीही वाचलो आणि भावंडेही वाचली तर जीन्स दुपटीने वाचलेले असतील. अशा त-हेने व्यक्ती म्हणून माझा स्वार्थत्याग हा जीन्सचा वाहक म्हणून जीन्सचा स्वार्थ साधत असतो! ज्याला आपण हेटाळणीने ‘भाई भतीजा वाद’ म्हणतो (आणि कौतुकाने ‘कुटुंबवत्सल भाव’ म्हणतो!) त्याचे जीवशास्त्रीय स्पष्टीकरण असे जीन पातळीवर सापडते! काही परिस्थितीत तरी स्वार्थत्यागच स्वार्थही ठरतो.
हे स्पष्टीकरण अनेकांना आवडत नाही. ‘सोशिओबायॉलजी’ ह्या नावाने ही विचारप्रणाली पहिल्याने लोकांपुढे मांडणारा ई. ओ. विल्सन हा शास्त्रज्ञ बऱ्याच टीकेचे लक्ष्य बनला होता. हळूहळू मात्र प्रत्येक जीव ही व्यक्तीही असते आणि त्याचवेळी जीन्सचे वाहनही असते, असे मानून सभोवतीच्या घटनांचा अर्थ लावणे मान्य होत आहे. अशा शोधाचे एक ‘उत्तर’ पाहा —-
जर प्रत्येक जीव ही केवळ व्यक्ती आहे असे मानले तर तिच्या आईबापांचे तिच्यावरील ‘प्रेम’ संतत, न बदलणारे असायला हवे. पण जर जीवाला जीन्सचे वाहनच मानले तर आईबापांचे प्रेम त्या व्यक्तीच्या प्रजननक्षमतेशी जोडलेल्या प्रमाणात बदलते असेल. वयासोबत प्रजननक्षमता बदलते का, ह्या प्र नाचे उत्तर होकारार्थी आहे. एखाद्या वयातल्या व्यक्तीची प्रजननक्षमता म्हणजे त्या व्यक्तीला उरलेल्या आयुष्यात किती मुले होतील त्याचा सरासरी अंदाज. उदाहरणार्थ, जर एका व्यक्तीला सरासरीने तीन मुले होतात, पहिले पंचविसाव्या वर्षी, दुसरे सत्ताविसाव्या आणि तिसरे तिसाव्या वर्षी —- तर त्या व्यक्तीची प्रजननक्षमता पंचविसाव्या वर्षापर्यंत ‘तीन’ मानायची. पंचविसापासून सत्तावीसच्या वयात ‘दोन’, पुढे तीस वर्षांपर्यंत ‘एक’ —- आणि नंतर मात्र शून्य. (हे काल्पनिक उदाहरण आहे, आकड्यांमध्ये काटेकोरपणा नसलेले.) ह्यातच व्यक्तीच्या ‘टिकाऊपणाचा’ एक घटकही मिसळता येतो. अगदी तान्हे मूल नाजुक असते. लहानशा आजारानेही ते दगावू शकते. त्यामानाने वीस-पंचवीस वर्षांचे मूल सक्षम असते. आपण ह्या दोन घटकांच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची वेगवेगळ्या वयातील ‘टिकाऊ प्रजननक्षमता’ ठरवू शकतो.
१९८९ साली कॅनडात एक सर्वेक्षण केले गेले. हे दोन भागांत होते. पहिला भाग काल्पनिक होता, ‘तुमचे मूल अमुक वयात दगावले तर तुम्हाला किती दुःख होईल?’, असल्या प्र नांवर आधारलेला. दुसऱ्या भागात वेगवेगळ्या वयांची मुले गमावलेल्या माणसांना त्यांच्या अपत्यशोकाच्या तीव्रतेवर प्र न विचारले गेले. हा ‘प्रत्यक्ष’ भाग. तिसरे सर्वेक्षण आफ्रिकेतल्या ‘कुंग’ (! Kung) ह्या आदिवासी जमातीच्या प्रत्यक्ष अपत्यशोकाबाबतचे होते., ह्या तीन तुकड्यांची उत्तरे अशी —- एकीकडे वय आणि दुसरीकडे प्रजननक्षमता अशा आलेखाशी ‘काल्पनिक कॅनेडियन’ आणि ‘प्रत्यक्ष कुंग’ हे आलेख खूपच जुळते होते. ‘प्रत्यक्ष कॅनेडियन’ आलेखही साधारण
आलेखासारखाच, पण जरासा वेगळा होता. ह्या तुलनेवर उत्क्रांति-मानस-शास्त्रज्ञ म्हणतात की माणसांच्या उत्क्रांतीचा शेवटचा दहा हजार वर्षांचा काळच शेती आणि उद्योगप्रधान, ‘नागर’ असा आहे. त्याआधीची तीसेक लक्ष वर्षे आणि त्याही आधीची लक्षावधी कपी आणि माकडाच्या अवस्थेतली वर्षे ही भटक्या टोळ्यांच्या रूपातच माणसांच्या पूर्वजांनी घालवलेली आहेत. म्हणून काल्पनिक कॅनेडियन आलेख प्रत्यक्ष कुंग आलेखाशी तंतोतंत जुळतो, कारण कॅनेडियन मूळ-मानसिकताही खरी टोळ्यांची, आदिवासींचीच आहे! प्रत्यक्ष कॅनेडियन आलेख ताज्या नागरी समाज-व्यवस्थेमुळे जरासा वेगळा झालेला आहे. पुढे हे वेगळेपण वाढण्याचीही शक्यता आहे. आणि, हे सारेच आलेख अपत्यप्रेम-अपत्यशोकांचे प्रजननक्षमतेवर अवलंबून असणे अधोरेखित करतात. व्यक्तींना जीन-वाहक मानणे अशा अवलंबनाशी सुसंगतच आहे. ‘ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय’, ह्या भावनेशी मात्र हे स्वार्थी अपत्यप्रेमाचे आलेख फटकून आहेत!
‘सरसकट परोपकार’ : ठीक आहे, नातलगांसाठी स्वार्थत्याग करणे, नातलगांवर उपकार करणे, नातलगांशी सहकार्य करणे ह्या साऱ्या जीनपातळीवर स्वार्थ साधणाऱ्या क्रिया आहेत. पण माणसे फक्त नातलगांसाठीच असे करत नाहीत, तर इतरांसाठीही मदतीचे हात पुढे करत असतात. ह्याचे स्पष्टीकरण काय? सिंडरेला आणि तिची सावत्र आई ह्यांचे संबंध त्यामानाने स्पष्ट आहेत. आपल्या मुलींचे आयुष्य सुखाचे व्हावे म्हणून सावत्र आई सिंडरेलाला ‘दाबून’ ठेवत असे हे उघड शत्रुत्व समजण्यासारखे आहे. पण माणसे आपल्याशी कोणताही संबंध नसलेल्या माणसांना अन्नात वाटा देतात, धोक्याच्या सूचना देतात, सहकार्य करतात. हा भाव कसा उपजतो?
हे समजावून द्यायला ‘गेम थिअरी’ उर्फ स्पर्धाशास्त्राचा आधार घेता येतो. ही गणिताची शाखा साठेक वर्षांपूर्वी घडवली गेली. एखाद्या स्पर्धेत भाग घेणाऱ्याने कोणत्या धोरणानुसार वागावे, ह्याच्या सांख्यिकीय आणि इतर अभ्यासातून ही गणित-शाखा घडली. समजा दोन व्यक्तींना वारंवार काही व्यवहार एकत्रपणे करावे लागतात. आता एका टोकाला दोघांमध्ये पूर्ण असहकार असेल. दुसऱ्या टोकाला पूर्ण सहकाराने वागून त्यापासूनचे फायदे–तोटे समप्रमाणात वाटून घेणे असेल. आणि ह्या दोन टोकां-मधला सहकार-असहकाराचा सारा ‘रंगपट्ट’ असेल. ह्या धोरणांपैकी कोणते धोरण दीर्घकाळपर्यंत लाभदायक ठरत राहील, ह्याचा बराच अभ्यास केला गेला. प्रत्येक धोरणाचे फायदे–तोटे बदलूनही पाहिले गेले. ह्यासाठी संगणकाचाही वापर केला गेला, की अनेक शक्यता वेगाने आणि वारंवार तपासता याव्या. साऱ्या अभ्यासाचे उत्तर मात्र सोपे (आणि अपेक्षित!) निघाले, की ‘जशास तसे’ हे सर्वांत लाभदायक धोरण आहे. जो आपल्याला मदत करतो त्याला मदत करावी आणि जो आपल्याशी फटकून किंवा थेट शत्रुत्वाने वागतो त्याच्याशी त्याच्यासारखेच वागावे. दीर्घकाळचा स्वार्थ ह्या धोरणाने जसा साध्य होतो तसा इतर कोणत्याही धोरणाने होत नाही!
पण दोन व्यक्तींचा प्रथमच संबंध येतो, तेव्हा काय करावे? ह्याला उत्तर असे की फार महत्त्व नसलेल्या एखाद्या गोष्टीबाबत मदत करून पहावी. जर प्रतिसाद मदतीच्या रूपात आला तर धोरण योग्य ठरले. जर ‘गद्दारी’ झाली तर पुढच्या वेळी आपणही धोका द्यावा! (बहुजन समाज पक्ष आणि भारतीय जनता पक्ष भविष्यात एकमेकांशी कसे वागतात हे पहात रहावे!) ह्या विचारी वागणुकीला धार केव्हा येते ते पहा. माझ्यापाशी पाच पोळ्या आहेत
आणि माझी भूक तीनच पोळ्यांची आहे. माझ्या एक शेजारी मात्र माझ्याइतकाच भुकेला असून ‘पोळीहीन’ आहे. त्याला एक पोळी किंवा दोन पोळ्या देणे, ह्यात माझा त्याग तसा सौम्यच आहे. तो मात्र माझे उपकार बरेच जास्त मानतो, कारण त्या मदतीशिवाय त्याचे निभणे कठीण. मी प्रथम उपकार करताना माझी उपकार करायची क्षमताही जोखतो, आणि त्याची गरजही जोखतो. एकदा का मी उपकार केला, की मग मात्र मी त्याचे वागणे बारकाईने पहात राहतो. परोपकार किंवा खरे तर परस्परोपकार (ज्यासाठी Reciprocal Altruism असा तांत्रिक शब्दप्रयोग केला जातो) हा अशा हिशेबी मदत करण्यातून घडतो. पुन्हा एकदा सहानुभूती, भ्रातृभाव ह्या ‘उच्च’ भावनांचे मूळ मात्र तोलून मापून राबवलेल्या स्वार्थात भेटते!
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे —- ह्या प्रकारची वागणूक मानवेतर प्राण्यांमध्येही दिसते. चिंपांझी, व्हीसस माकडे असे आपले ‘जवळचे’ नातलग तर परस्परोपकारी असतातच, पण आपल्याहून बऱ्याच दूरच्या प्राण्यांमध्येही हा प्रकार दिसतो. ‘व्हँपायर वटवाघूळ’ नावाचे प्राणी असतात, जे गाईगुरांचे रक्त शोषून त्यावर जगतात. रक्त टिकाऊ वस्तू नाही. जर एखाद्या रक्तपिपासू वटवाघळाला रक्त मिळाले नाही, तर पोटे भरलेली वटवाघळे त्याला ‘ओकून’ रक्त देतात. इथेही परतफेड अपेक्षित असते. आपल्या भाषेमध्येही शुद्ध मैत्री ऐवजी परतफेडीची, उपकाराची अपेक्षा असणारी मैत्रीच जास्त दिसते. वानगीदाखल ह्या म्हणी पहा —- क) नेकी कर, दर्यामें डाल. ख) Cast your bread upon the waters ग) A freind in need is a friend indeed घ) करावे तसे भरावे —- आणि शेवटी ट्रकांच्या पाठीवर लोकप्रिय झालेले हे ‘सुभाषित’ —- ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!’
जॉर्ज विल्यम्स् ह्या शास्त्रज्ञाने परोपकार, परस्परोपकार कसे उद्भवतात ह्यावर प्रथम विचार केला १९६६ साली. त्या वेळेपासून आजपर्यंत त्याच्या मूळ मांडणीला आधारच मिळत गेलेला आहे. ह्या काळात एकही पर्यायी स्पष्टीकरण दिले गेलेले नाही. उलट विल्यम्सच्या मांडणीला पूरक तत्त्वे बरीच सुचलेली आहेत. आपण उपकाराची परतफेड अपकाराने झाली तर खूप अस्वस्थ होतो. घरी-बाजारी त्या अन्यायाची हाकाटी करतो. शेक्सपीयरने दिलेल्या सापाच्या विषदंताच्या उपमेपर्यंत आपण अपकाराबाबतचा तिरस्कार साहित्यात अजरामर केला आहे. हे काही ‘उगीचच’ घडलेले नाही!
आता ह्या मनोधारणेत उत्क्रांतीचा भाग किती मानावा? संगणकाच्या मदतीने वेगवेगळी धोरणे तपासून ‘जशास तसे’ हे धोरण दीर्घ काळ लाभदायक ठरल्याचे आपण नोंदले. अनेक व्यक्ती असलेल्या, अनेक जीवजातींच्या, अनेक पिढ्यांच्या उत्क्रांतीला संगणकी तपास अत्यंत नेमकेपणाने समांतर आहे, समस्य आहे! सहानुभूती आणि नावड, मैत्री आणि शत्रुत्वभाव, उपकृततेची भावना आणि घातकीपणाबाबतची चीड, ही सारी अखेर हिशेबी परस्परोपकाराचीच दृश्य अंगे आहेत. आणि हा सारा जीनपातळीवरचा स्वार्थीपणा ‘उच्च नैतिक मूल्यांच्या’ स्पात जाणवावा, अशी आपल्या मनांची घडण केली आहे ती उत्क्रांतीने!
१९३, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर — ४४० ०१०