पत्रसंवाद

हर्षवर्धन निमखेडकर
माहूर, २९, देवतळे ले-आऊट नागपूर — ४४० ०१०
सुधारकने वेबसाईट उघडावी का?
आजचा सुधारक या मासिकाची इंटरनेटवर ‘वेब-साईट’ काढावी असा आग्रह मी अनेक दिवसांपासून संपादकांकडे करतो आहे. कधी ना कधी तरी ही इच्छा पूर्ण होईल, अशी मला आशा आहे. दरम्यान, याबाबत माझेच मला पडलेले काही प्र न मी येथे मांडतो. वेब-साईट उपयुक्त आहे की नाही, या विषयावर थोडी चर्चा व्हावी, या हेतूने. वेब-साईट सुरू करणे म्हटले तर फारसे खर्चाचे नाही—-पण तिचे संगणकीय आरेखन/आलेखन करणे व सातत्याने तिच्या मजकुरात बदल करणे—-यासाठी मात्र तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागणार असल्याने ही बाब खर्चिक ठरते. फारशी नाही, परंतु खर्च आहेत. आपली ‘वेब-साईट’ संगणकीय महाआंतरजालात (इंटरनेट) रोवायला एखादी जागा लागते. पैसेवाली मंडळी अशी जागा विकत घेतात. मात्र बिनापैशाने जागा हवी असल्यास मोफत मंचांचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी, या बदल्यात दुसऱ्या कोणाची तरी जाहिरात आपल्या साईटवर करू देण्याची परवानगी द्यावी लागते. म्हणजे जाहिरातीचा पैसा जागामालक घेणार व तुम्हाला फुकटात जागा वापरू देणार, असा हा प्रकार आहे. (उपलब्ध जागेपैकी जवळपास सत्तर टक्के जागा तुम्हाला मिळते.) सध्याच्या द्या-घ्या च्या जमान्यात, यासाठी फार कोणाचा आक्षेप असू नये. बिना मोबदल्याच्या व बिना जाहिरातीच्या फुकट जागाही मिळतात — पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय तुमच्या साईटचा पत्ता सुकर व सोपा असला तर लक्षात ठेवायला मदत होते. फुकटवाल्या जागांमध्ये आधी मालकाचा लांबलचक पत्ता व मग तुमचा, अशी वाटणी होते. आता, एकदा साईट उघडायचे ठरविले तर त्यासाठी कोणाला तरी तिच्या संपादनाची, संकलनाची व ती साईट ‘मॅनेज’ करायची जबाबदारी घ्यावी लागेल. संगणक-तंत्रज्ञांशी संपर्क साधून आपल्याला हव्या त्या प्रकारे तिची निर्मिती करवून घ्यावी लागेल, तिचे वेळोवेळी नूतनीकरण करवावे लागेल, साईटला भेट देणाऱ्या वाचक/प्रेक्षकांशी संपर्क ठेवावा लागेल. तांत्रिक अडचणी समजावून घ्याव्या लागतील; सोडवून घ्याव्या लागतील. शिवाय आपली साईट ‘मराठी’त राहणार त्यामुळे या अशा भाषिक साईटस् वाचता याव्यात म्हणून सुलभ ‘फाँट’ वा टंकाची निवड करावी लागेल. ज्या संगणकांवर तो उपलब्ध नसेल तेथे तो ‘उतरवून’ घेता येण्याची व्यवस्था करावी लागेल. थोडक्यात, हा काही अगदी सहजसाध्य मार्ग नाही आणि ‘साईट’ चे व्यवस्थापन करणाऱ्या ‘वेबमास्टर’ ला आपला पुष्कळ वेळ यासाठी खर्च करावा लागेल. सध्याचे संपादक-मंडळ, आपले खासगी व्यवहार, व्यावसायिक जबाबदाऱ्या व प्रत्यक्ष मासिकाचे संपादन–निर्मिती हे सारे सांभाळून हे सर्व पार पाडू शकतील का? की त्यांना यासाठी एखादी वेगळी व्यवस्था करावी लागेल? सर्वांत शेवटी, अशा वेबसाईटचा व्यावहारिक उपयोग किती? प्रचार-प्रसारासोबत सुधारकला यातून काही आर्थिक लाभ होऊ शकेल का? हा उपक्रम चालवायला काही कालमर्यादा आहे की तो असीमित काळासाठी आहे? आणि जगभरातले असे किती लोक तुमची साईट बघतील? केवळ हौस म्हणून हा उपक्रम राबवायचा की काही निचित उद्देश घेऊन? त्याची फलश्रुती काय?
आ. सु.च्या वाचकांपैकी अनेक जण संगणकाच्या क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त असतील. त्यांपैकी किमान दोघा– चौघांनी तरी याबाबत मतप्रदर्शन करावे, ही विनंती आहे. इंटरनेटबद्दल आणखी काही, पुढच्या वेळी!

केशवराव जोशी
तत्त्वबोध,चेकनाक्याजवळ, नेरळ — ४१० १०१
सप्टेंबरचा अंक आज मिळाला. माझ्या मते ‘महाराष्ट्र फौंडेशन’ खाजगी संस्था आहे. त्यांनी कोणाकडून कार्यवाही करवावी व कोणाला बक्षिस द्यावे हा त्यांचा प्र न आहे.
‘तुम्ही आम्ही आपण सगळेच’ (संपादक अविनाश धर्माधिकारी, दिवाळी अंक १९९७) मध्ये माधवराव गोडबोले लिहितात, ‘संघाला ह्या देशाची जडणघडणच समजलेली नाही’. तिनईकर लिहितात. ‘संघ माणसांची मने आकुंचित करतो. झापड लावल्याने, संघीय Critical Analysis करण्यास सक्षम राहू शकत नाहीत’. खुद्द धर्माधिकारी ९८च्या अंकात लिहितात, ‘संघाने चारित्र्यवान निर्माण केले पण मला (धर्माधिकाऱ्यांना) रोशन हजारे व अण्णा जोशींनी पूर्णतः फसविले’ गोडबोले तिनईकर डावे नाहीत.
‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ केंद्रीय शासन-संस्था आहे. त्यावर टीका करण्याचा कोणालाही अधिकार आहे. ह्या मंडलाने ‘धार्मिक विधि (Vedic rituals) व ज्योतिष (Astrology) ह्यासाठी पदवी देण्याचे ठरविले आहे’. सोबत कात्रण पाठवीत आहे. निःपक्षपाती विचारवंत मुरली मनोहर जोशींवर टीका करतील काय?
[महाराष्ट्र फाऊंडेशनबद्दल जोशींचे मत आम्हाला पटते. संघाबद्दलच्या मतमतांतरांपैकी काही जोशी नोंदतात. त्यांचा सुधारणेशी थेट संबंध नाही. विद्यापीठ अनुदान मंडळाने बहुधा ‘मानवी संसाधन विकास’ मंत्री मुरली मनोहर जोशींच्या दबावातून/प्रेरणेने चालवलेला प्रकार आम्हाला अत्यंत निंद्य वाटतो. विधी (कर्मकांडे) व ज्योतिष ह्यांच्या अक्षम्य अविवेकीपणावर आम्ही अनेकवार लिहिले आहेच. कोणी जर विद्यापीठ अनुदान मंडळाच्या कृतीला विरोध करणार असेल, तर आम्ही आ. सु. तर्फ व व्यक्तिशः त्यात सहभागी होऊ. आमच्या वाचकांनाही असे करायचे
आवाहन आहेच.] —- संपा.

गंगाधर गलांडे
4 Aldridge Court, Meadway, HIGH WYCOMBE, Bucks,
HP11 1SE UNITED KINGDOM
१. आजच सकाळी हाती आलेल्या आजचा सुधारकच्या २११ व्या पृष्ठावर पुण्यातल्या ‘विद्यार्थी सहाय्यक संस्था’वरची माहिती वाचली. कृपया, त्या संस्थेचा पत्ता व तेथल्या कार्यप्रमुखाचे नाव आपण मला कळवू शकाल का?
२. पत्रसंवाद मधले श्री. ल. ग. चिंचोळकर यांच्या पत्रातला एक परिच्छेद असा आहे, ‘गांधीजींनी प्रत्येक प्रसंगी हिंसा त्याज्य मानली होती. बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा सुद्धा हिंसात्मक प्रतिकार करण्याऐवजी संबंधित स्त्रीने आत्महत्या (त्या?) करावी असे त्यांचे मत होते.’
प्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी आज ४५+ वर्षे भारताबाहेर रहात आहे. भारतात रहात असताना देखील मी कधी हरिजनचा अंक, हातात धरल्याचे तर दूरच राहो पण बघितल्याचेही मला स्मरत नाही. आणि आता तर, संदर्भासाठीही, तो मला इथे वाचायला मिळणे केवळ अशक्य आहे. सबब श्री. चिंचोळकर यांनी केलेले विधान प्रमाण मानूनच, मी, एक अतिसामान्य पामर, माझे विचार लिहीत आहे.
एखाद्या महिलेवर बलात्कार होत असता तिने काय पवित्रा घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार गांधींना कोणी केव्हा, कसा व कोणत्या न्यायाने दिला वा त्यांनी आपणहून स्वतःकडे घेतला हे मला कोणी स्पष्टपणे व खुलासेवार समजावेल का? अन्यथा हा मामला ‘मिया-काजी राजी तो क्या करेगी बिब्बिजी’ याच मालिकेतला नाही का? असे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र का म्हणून? दुसऱ्या व्यक्तीसही तितकीच विचार, मत, आचार, सुखरुप मुक्त संचार आदि सर्व स्वातंत्र्ये आहेत हे सदैव लक्षात ठेवून त्याच्या/तिच्या व्यवहारात नाक खुपसण्याचा चोंबडेपणा करू नये असे माझे प्रामाणिक मत आहे. (विलायतेतला साहेब त्याच्या भाषेत म्हणतो, ‘Of course all are equal. It is just that some are more equal than others.’ कोणीही, कोणत्याही भाषेत भले काहीही/कसेही विचार व्यक्त करोत, तमाम विधानांतला गाभा मुळात एकच आहे. अंती पुराणांतली वांगी पुराणांतच रहातात हेच खरे!) इति अलम्।

निखिल जोशी
तत्त्वबोध, हायवे, चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड) — ४१० १०१
आ. सु.च्या ऑगस्ट २००० च्या अंकात रिचर्ड फाइनमन या शास्त्रज्ञाच्या लेखाचे भाषांतर आहे. एखाद्या विचारक्षम व्यक्तीचा नास्तिक बनण्याचा प्रवास त्यात चांगला रेखाटला आहे. मात्र विज्ञानशाखेचा कोणीही विद्यार्थी नास्तिक होतो असे नाही. भारतातील शिक्षणसंस्था तर धर्म आणि विज्ञान यांचा मिलाफ आणि सह जीवन होण्यास काहीही आडकाठी करीत नाहीत. गणपती दूध पीत असल्याची अफवा E-mail, E-Chat मुळे व STD, ISD मुळे पसरली. कॉम्पुटर इंजिनिअर, डॉक्टर होऊन परदेशी गेलेले सिद्धिविनायकाची ऑनलाईन पूजा करतात, देवळांना देणग्या देतात. Modern Physics चे आध्यात्मिक अर्थ लावणारे लोक विज्ञानाचे पदवीधर असतात.
मात्र फाइनमनच्या लेखातील नीतिनियमांच्या बाबतचे लिखाण मला self consistent वाटत नाही. कृपया खुलासा करावा.
१. ‘देवावरचा विश्वास क्षीण झाला की सदाचरणाची ओढही मंदावते’ ह्या वाक्याला खोडून काढणारी अनेक वाक्ये लेखातच आढळतात. उदा. ‘माझे सहकारी- त्यांची माणुसकी, समजूतदारपणा, नीती ही सश्रद्धांमध्ये अश्रद्धांमध्ये सारखीच आढळते’, ‘—- मेटॅफिजिकल बाबींचा नीतीशी संबंध नाही —-‘ आणि अशी अनेक
शिवाय देवावर ठाम विश्वास ठेवणारे किती लोक नीतिमान आहेत? धर्मातली कोणती स्ढी नीतिनियमांचे पालन करते? श्रीमंताने गरीबाचे, पुरुषाने स्त्रीचे उच्चभ्रू जातीने दलितांचे शोषण करणे मान्य करणारा धर्म नीतिमान कसा? किती गुन्हेगार नास्तिक आहेत? Crusades, दंगली हे नीतीचा भाग आहेत का? धर्माच्या भीतीने नीतीचे पालन घडल्याचे आज तरी दिसत नाही —- तो हुकूमशाहीचा प्रकार आहे. जसे रक्तगटांची विविधता, ही धर्म जातिनिरपेक्ष आहे, तसेच मनोवृत्ती, चांगुल-पणा वगैरे धर्मावर अवलंबून नाहीत, असे मानसशास्त्र सांगते.
२. अमुक करावे की नाही याचे उत्तर भौतिकशास्त्राला येत नाही हे मान्य आहे. परंतु नैसर्गिक शास्त्रांपेक्षा वेगळी अशी सामाजिक शास्त्रे आहेत. मानवी समाजाच्या फायद्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांविषयीचे ठोकताळे त्यात आहेत. ते जवळजवळ नेहमी खरे ठरत असल्याने विश्वासार्ह आहेत.
By the way, भारतात ऐहिक-जीवन-नियंत्रणाचे, नीति-अनीति ठरवण्याचे सर्व अधिकार घटनेकडे आहेत. उपास, पूजा, धर्मप्रचार इ. वैयक्तिक बाबींवरही धर्माला मुक्तद्वार नाही.

देवदत्त दाभोलकर
४३, गुस्कृपा कॉलनी, गोडोली, सातारा — ४१५ ००१
सप्टेंबर २००० चा अंक पाहिला. तर्क सुप्रतिष्ठित असावा हे समजले. धक्का ‘प्रिय वाचक’ मध्ये मिळाला. नेतृत्वात हे असे ‘खांदेपालट’ हे काही तर्काला धस्न असतीलच. ते समजण्याचा माहितीचा अधिकार वाचकाना हवाच. विशेषतः आपल्यासारख्या नियतकालिकांच्या बाबतीत. कारण माहितीच नसेल तर तर्क-कुतर्क यांत भेद तरी कसा करणार!
[एप्रिल ९८ (अंक ९.१) मध्ये दि. य. देशपांड्यांनी लिहिले, ‘. . . या सर्व विचारातून एक योजना मला सुचली. ती अशी —- संपादक-मंडळ एकूण पाच जणांचे करावे, आणि त्यापैकी प्रत्येकाने आळीपाळीने एक एक वर्षभर संपादकत्व करावे.’ यानंतर मोहनी, कुळकर्णी, देशपांडे (बा. य.), खरे, देव असे संपादकमंडळ नोंदले. पुढे दि. यं. नी लिहिले, ‘संपादकाला संपादक म्हणून काही जास्त मोकळीक अर्थात असावी. पण त्याने वरील (विवेकवादी) चौकटीत सामान्यपणे राहून काय उपक्रम किंवा प्रयोग करायचे असतील ते करावे.’ ह्या सूत्राप्रमाणे आजवर दोन खांदेपालट झाले. प्र. ब. कुळकर्णी परदेशात असल्याने मोहनींचा कार्यकाळ जरासा वाढला. बा. य. देशपांडे यांचे निधन झाल्याने संपादकमंडळ चारांवर आले. —- आता तर्क-कुतर्कात भेद करता यावा!] —- संपा.

S. V. Yete
F-13, Shishir, Laxminagar, Nagpur – 440 022
यातील श्री. नरेन तांबे यांच्या निष्ठा :- दोन पैलू. लेखाचा पोत वर्णनातीत म्हणावा. लेखाच्या उत्तरार्धातील ‘सत्यनिष्ठेवर भर देणाऱ्यांचा सार्वजनिक जीवनांत पराभव व नकली नेत्यांचे पारडे जड’ ही सर्व काळांतील शोकांतिका. सर्वसामान्यांच्या जीवनातील अपरिहार्य बाब मानावी का? कारण गॅलिलियोसारखे ‘बट इट डझ मूव्ह’ म्हणण्याचे बळच समाजजीवनात आज राहिलेले नाही. लेखकाला पडलेला प्र न — कोणत्या रसायनाने अशी माणसे घडविता येतात? यापेक्षा रसायनाची उपलब्धी शोधता येणे गरजेचे. आ. सु.ने यावर सतत गॅलिलियोची ‘भूमिका घेतली तर या दिशेकडे वाट पाहत असणारे समाजजीवन सत्याकडे हळू हळू प्रवास करताना आढळेल’ आम्ही यांत आहोतच परंतु मस्त झालोत. म्हणून विनंती.

वसंत कानेटकर
शिवाई, शरणपूर रोड, नाशिक — ४२२ ००२
आपले अंक फारच विचारप्रवर्तक आणि मुळालाच हात घालणारे असतात. विरोधकांची पर्वा आपण करू नये, (करीत नाहीच.) ‘विधवाविवाह हा सशास्त्र आहे की अशास्त्र?’ यावर वादंग घालणाऱ्या १९ व्या शतकाच्या अखेर होऊन गेलेल्या पढीक पंडितांचेच हे विरोधक वारसदार आहेत. तेही आपल्या ‘शास्त्रा’ सकट वाहून जाणे कालौघात अपरिहार्यच आहे. ‘स्त्रीमुक्ति’बद्दलची आपली वैचारिक चळवळ अनेकांगांनी विचार करायला लावणारी आहे. श्रीमती ललिता गंडभीर यांचे या अंकातील श्री. घोंगे यांच्या लेखाला दिलेले उत्तर अत्यंत विचारप्रवर्तक आणि मूलगामी आहे. त्यातून अनेक प्र नांचा उलगडा (माझ्यापुरता तरी) झालेला आहे. अखेर ‘स्त्रीमुक्ति’ ही ‘मनुष्यमुक्तीच’ आहे हेच संपूर्ण सत्य आहे. स्त्री-पुरुष संबंधांचा संपूर्ण नव्याने विचार झाला पाहिजे. ‘दारेखिडक्या किलकिल्या करू नका, संपूर्ण सताड उघड्या टाका’ —- असे श्रीमती शांता शेळके म्हणतात ते योग्यच आहे.
याच संदर्भात एका वेगळ्या विचाराकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्रात मान्यता (उच्चभ्रू ‘वतनदारी’ संस्कृतीत) पावलेला ‘तमाशा’ हा पुरुषप्रधान विकृत नृत्यप्रकार आणि लावणी हा कम-अस्सल काव्यप्रकार लोकनाट्य या नावाने पुन च प्रस्थापित करण्याचा प्रयत्न याच ‘चंगळवादी भ्रष्ट’ संस्कृतिवाद्यांनी राजरोस चालवलेला आहे, असे मला स्पष्टपणे वाटते. भारतातल्या प्रत्येक भाषिक प्रदेशाला स्वतःचा सांस्कृतिक नृत्यप्रकार आहे. फक्त महाराष्ट्राला नाही. दक्षिणेत घरोघरी मुलींना नृत्य-गायन शिकवले जाते. महाराष्ट्रात घरोघरच्या मुलींना तमाशा-लावणी सांस्कृतिक भाग म्हणून शिकवली जाते का? आपल्या मुलींना ‘तमाशात’ अभिमानाने घालणारे आईबाप महाराष्ट्रात एखादे तरी दाखवता येतील का? ‘नऊवारी लुगडे— तुळशीवृंदावन’ संस्कृती घरात जपणारे महाभाग (पुरुषच) तोंडाला रुमाल लावून तमाशा थिएटरात या ‘लोकनाट्याला’ उदार आश्रय आजही देतात. ‘तमासगीर’ हा शब्द कोणते ‘सांस्कृतिक वैभव’ सुचवतो? तमाशात ‘लोकनाट्य’ सेवा करणाऱ्या मुली कोणत्या घरांतून येतात व कुठे जातात? ‘लटपट लटपट तुझं चालणं . . .’ काय, किंवा अग ‘दो दिवसाची तनु ही साची’ . . . काय, या दोन्ही प्रकारच्या (‘रंगेल’ आणि ‘वैराग्यपर’) लावण्या म्हणजे ‘वतनदारी ढोंगीपणा’ आहे. या विषयावर अभ्यासपूर्ण कोणीतरी लिहायला हवे.
आपल्या वैचारिक चळवळीत’ मराठी प्राचीन (लोक) साहित्याचाही शोध घेण्याची गरज आहे.

समाजप्रबोधन पत्रिका, द्वारा प्रा. राजेंद्र व्होरा
राज्यशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे — ४११ ००७
समाज प्रबोधन पत्रिका हे सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक प्रश्नांची चर्चा करणारे नियतकालिक आहे हे आपण जाणताच. या नियतकालिकाच्या वाचकवर्गाचा विस्तार व्हावा या हेतूने आम्ही आपल्याला अशी विनंती करतो की कृपया पत्रिकेची जाहिरात आपल्या नियतकालिकात प्रसिद्ध करावी. अशाच प्रकारे आपली जाहिरात आम्ही पत्रिकेत प्रसिद्ध करू कृपया आपला होकारार्थी प्रतिसाद कळवावा. सोबत ‘पत्रिके’च्या जाहिरातीचा मसुदा पाठवीत आहोत.
[आजचा सुधारकच्या संपादकीय धोरणात जाहिरात स्वीकारणे अनावश्यक (आज तरी!) मानले जाते. पण समाज प्रबोधन पत्रिका हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे वैचारिक नियतकालिक आहे. त्यांना आम्ही सुयश चिंतितो. अधिक माहितीसाठी प्रा. राजेंद्र व्होरा यांच्याशी पत्रव्यवहार करावा.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.