लोकांना विवेकनिष्ठ होणे शक्य आहे?

स्वतःला विवेकवादी समजण्याची मला सवय आहे; आणि विवेकवादी, माझ्या मते, दुसऱ्यांनी विवेकी व्हावे असे वाटणारा असलाच पाहिजे. पण हल्ली विवेकी विचारसरणीवर बरेच जोराचे हल्ले झाले आहेत. त्यामुळे विवेकीपणा म्हणजे काय याबद्दल कोण काय समजतो ते कळेनासे झाले आहे किंवा ते समजले तरी तो प्राप्त करणे मनुष्याला साधेल का असा प्रश्न आहे. विवेकीपणाच्या प्रश्नाला दोन बाजू आहेत, सैद्धान्तिक आणि व्यावहारिक : विवेकी मतप्रणाली कशी आहे? आणि विवेकी आचारप्रणाली कशी असते? लभ्यांशवाद (Pragmatism) विचारातल्या अविवेकावर भर देतो, आणि मनोविश्लेषणवाद (Psycho-analysis) आचरणातल्या अविवेकीपणावर भर देतो. उभयतांमुळे पुष्कळ लोकांना असे वाटू लागले आहे की, ज्याला धरून विचार करणे वागणे फायद्याचे आहे तो विवेक असा आदर्श म्हणून काही नसतोच. यातून निष्कर्ष असा निघेलसे दिसते की, तुम्ही आणि मी भिन्न मतांचे असलो तर, युक्तिवादाचा आश्रय घेणे व्यर्थ आहे, किंवा एखाद्या बाहेरच्या निःपक्ष तटस्थाचा लवाद स्वीकारणे निष्फळ आहे; आपल्याला आपसांत लढण्यावाचून करण्यासारखे काहीच शिल्लक उरले नाही, भावनांना हात घालणारी जोशपूर्ण भाषणे करणे, जाहिरातबाजी करणे अथवा आपापल्या आर्थिक आणि सामरिक शक्तीच्या मगदुराप्रमाणे युद्ध पुकारणे एवढेच शक्य आहे. हा दृष्टिकोण फार धोकादायक आहे, आणि, सरतेशेवटी तो मानवी सभ्यतेला घातक आहे असा माझा समज आहे. म्हणून मी, हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की, विवेकीपणाचा आदर्श त्याला घातक समजल्या गेलेल्या विचारसरणींना दाद न देता शाबूत राहतो, आणि चिन्तनाचा आणि जीवनाचा मार्गदर्शक म्हणून त्याचे जे महत्त्व होते ते पूर्ववत् अबाधित राहते. मतातील विवेकीपणापासून सुरुवात करायची तर : मी त्याची व्याख्या, कोणत्याही बाबतीत दृढ समजूत होऊ देण्यापूर्वी तिच्याशी संबद्ध सर्व पुरावे विचारात घेण्याची सवय, अशी करतो. जेथे निश्चिती अप्राप्य असते, तेथे विवेकी मनुष्य सर्वांत जास्त संभाव्य मताला सर्वाधिक किंमत देईल, दुसरी लक्षणीय संभाव्यता असलेली मते तो, आपल्या मनात राखून ठेवील, पुढे मागे हे अभ्युपगम (hypotheses) पुराव्याच्या बळावर स्वीकार्य ठरू शकतील म्हणून. ह्यात, अर्थात्, हे गृहीत आहे की, पुष्कळ प्रकरणांत तथ्ये आणि संभवनीयता ह्यांचे वस्तुनिष्ठ पद्धतीने आकलन होऊ शकते. ही पद्धती अशी की, दोन सावध व्यक्ती ह्या रीतीने विचार करता एकाच निष्कर्षाप्रत येतात. ही गोष्ट अनेकदा नाकारली जाते. पुष्कळ जण असे म्हणतात की, व्यक्तीच्या इच्छा आणि गरजांची पूर्ती साधतील हे पाहणे एवढेच काय ते बुद्धीचे कार्य आहे. Plebs Text-Books Committee आपल्या Outline of Psychology (पृ. ६८) त म्हणते, बुद्धी ही सर्वांहून जास्त पक्षपातीपणाचे उपकरण आहे. व्यक्तीच्या किंवा तिच्या जातीच्या हिताला पोषक कृती केल्या जातील आणि कमी हिताच्या कृती रोखल्या जातील हे पाहणे हे बुद्धीचे काम आहे. (तिरपा ठसा मुळातच आहे.) पण तेच लेखक त्याच ग्रंथात (पृ. १२३), म्हणतात, पुन्हा तिरपा ठसा देऊन, ‘मार्क्सिस्टांचा पंथ धार्मिकांच्या पंथाहून खूपच भिन्न आहे; दुसरा केवळ इच्छा अन् परंपरा यांच्यावर आधारलेला आहे; पहिला वास्तविक तथ्याच्या वैज्ञानिक वि लेषणावर अधिष्ठित आहे’ बुद्धीसंबंधी त्यांनी जे म्हटले त्याशी हे विसंगत दिसते, अर्थात त्यांना मासिस्ट पंथाचा स्वीकार करण्यास बुद्धीने मार्गदर्शन केले नाही असे त्यांना सुचवायचे असेल तर मात्र गोष्ट वेगळी. काहीही असले तरी, ‘वास्तविक तथ्यांचे वैज्ञानिक वि लेषण’ करणे शक्य असल्याचे त्यांना कबूल असल्यामुळे त्यांनी हेही मान्य केले पाहिजे की, ज्यांना वस्तुनिष्ठ म्हणतात अशी मते असणे शक्य असते. अधिक प्रकांड पंडित लेखक, विवेकविरोधी दृष्टिकोणाचे समर्थक, उदाहरणार्थ, लभ्यांशवादी तत्त्वज्ञ, सहजासहजी कोंडीत सापडणारे नाहीत. जिच्याशी सुसंवादी असली तर आपली मते सत्य ठरतील अशी वास्तविक परिस्थिती म्हणून काही नसतेच असे त्यांचे म्हणणे. आपली मते जीवनार्थ कलहातील आयुधे असतात. त्यातील, मनुष्याला टिकून राहण्यास्तव जी सहायक होतात ती ‘सत्य’ म्हणविली जातात. ही विचारसरणी, जपानमध्ये, सहाव्या शतकात प्रचलित होती, त्याच वेळी बौद्धधर्म तेथे प्रथमच पोहोचला. शासन नव्या पंथाच्या सत्यतेबद्दल साशंक असल्यामुळे, त्याने एका दरबारी मानकऱ्याला प्रयोगादाखल हा धर्म स्वीकारण्याची आज्ञा केली; इतरांपेक्षा ह्याची जास्त भरभराट झाली तर, तो धर्म सर्वांनी स्वीकारायचा होता. (आधुनिक काळानुरूप बदल कस्न) हीच पद्धती लभ्यांशवादी तत्त्वज्ञ सर्व धार्मिक विवादांचे प्रकरणी, पुरस्कारतात; तथापि इतरांपेक्षा अधिक लवकर समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या ज्यू धर्माचा अंगीकार आपण करत आहोत अशी घोषणा करणारे कोणी माझ्या ऐकिवात नाहीत. लभ्यांशवादी ‘सत्या’ची व्याख्या अशी करत असला तरी, तो दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या कमी तरल प्र नांच्या बाबतीत वेगळा मापदण्ड वापरताना आढळतो. खुनाच्या खटल्यात पंचकमेटीवर बसणारा ज्युरी, इतरांप्रमाणेच समोरचा पुरावा विचारात घेईल, मात्र त्याचा घोषित निकष लावायचा तर जनतेपैकी कोण फासावर लटकवला तर जास्तीत जास्त फायदा होईल हे त्याने पाहिले पाहिजे. असाच मनुष्य, त्यांच्या व्याख्येप्रमाणे, खुनाबद्दल दोषी ठरेल, कारण इतर कोणाहीपेक्षा त्याच्या अपराधीपणाबदलची समजूत अधिक फायदेशीर, म्हणून अधिक ‘सत्य’ ठरेल. मला भय आहे की असा व्यावहारिक लभ्यांशवादी आचार कधी कधी घडतो; वरील विवेचन लागू पडेल अशी ‘बनावाची’ प्रकरणे अमेरिकेत आणि रशियात घडत असल्याचे मी ऐकले आहे. परंतु या सर्व प्रकरणांत नंतर लपवाछपवीचे सर्व शक्य प्रयत्न केले जातात, आणि ते फसले तर छीः थू होते. ह्या लपवाछपवीच्या प्रयत्नांवरून दिसते की, खुद्द पोलिस अधिकारीही, फौजदारी प्रकरणात सत्याची वास्तविकता या गोष्टीवर विश्वास ठेवत असतात. ह्या जातीचे वास्तविक सत्य—-(नित्य परिचयाचे आणि चारचौघांना परिचित)—-विज्ञानाला शोधायचे असते. ते गवसेल असे वाटते तोवर धर्मातही लोकांना ह्या प्रकारचेच (सत्य) हवे असते. धर्म या नेहमीच्या अर्थाने सत्य आहे हे दाखवून द्यायची लोकांनी एकदा आशा सोडली की तो कोणत्या तरी अभिनव अर्थाने ‘सत्य’ ठर-विण्याच्या खटपटीस ते लागतात. असा स्थूल नियम सांगता येईल की, अविवेकीपणा म्हणजे वास्तविक तथ्यांबद्दलचा अविश्वास, नेहमी, ज्या गोष्टीला कसला पुरावा नाही ती आहे असा दावा करण्याच्या इच्छेतून किंवा जिचा धडधडीत पुरावा आहे ती नाकारण्याच्या इच्छेतून उदयाला येतो. परंतु व्यावहारिक प्र नांच्या बाबतीत जसे आर्थिक गुंतवणुक करताना किंवा नोकर कामावर ठेवताना, तथ्यांच्या वस्तुनिष्ठते-वरचा विश्वास नेहमी कायम असतो. आणि एकदा सत्याची कसोटी तथ्यांची वास्तविकता ही असेल तर मग सर्वत्र तीच असली पाहिजे, अन् जेथे ती लागू पडत नसेल तेथे अज्ञेयवादाचा मार्ग धरला पाहिजे.

वरील युक्तिवाद प्रतिपाद्य विषयाच्या मानाने अर्थात्, खूपच अपुरा आहे. तथ्यांची वास्तविकता हा प्र न तत्त्वज्ञांच्या वादावादीत गूढ झाला आहे, त्याचा मी इतरत्र सविस्तर परामर्श घेतला आहे. तूर्तास मी इतकेच गृहीत धरतो की, तथ्ये असतात, आणि काही तथ्ये नेमकी जाणली जाऊ शकतात, अन् त्यांच्याशी निगडित आणखी काही अशी आहेत की त्यांच्याबद्दल अंशतः संभवनीय विधान करता येते. आपले विश्वास बरेचदा, वस्तुस्थितीच्या विरुद्ध असतात; पुरावा पाहता एखादी गोष्ट संभवनीय नाही असे ठरविणे क्रमप्राप्त असता, त्याच पुराव्याच्या बळावर आपण ती गोष्ट संभवनीय मानून चुकतो. तर मग, विवेकीपणाची सैद्धान्तिक बाजू अशी की, वास्तविक तथ्यांबद्दलच्या आपल्या समजुतींचे आधार आकांक्षा, पूर्वग्रह अथवा परंपरा यांच्या ऐवजी त्या पुराव्यावर आधारित असल्या पाहिजेत. विषयभेदानुसार विवेकी माणूस एकदा न्यायनिष्ठ असतो तर एकदा विज्ञाननिष्ठ होतो.

पुष्कळांच्या हृदयाशी कवटाळलेल्या श्रद्धांचे मूळ चमत्कारिक आणि रुणसदृश भ्रामक समजुतीत आहे हे दाखवून, काही जण म्हणतात की, आपल्या समजुतीत विवेक अशक्य आहे हे मनोविश्लेषणपद्धतीने दाखवून दिले आहे. मनोवि लेषणाबद्दल मला अतीव आदर आहे आणि ते मोठ्या प्रमाणात उपयोगी होऊ शकेल असा मला विश्वास आहे. परन्तु फ्रॉईड अन् त्याचे अनुयायी कोणत्या हेतूने प्रेरित झालेले होते याचे विस्मरण लोकांना झालेले आहे. त्यांची पद्धती मुख्यतः उपचारपद्धती आहे, हिस्टेरिया आणि मनोविकृतीचे कित्येक प्रकार दुरुस्त करण्याची. युद्धकाळात मनो-विश्लेषण ही युद्धजन्य मनोविकारांपासून मुक्तीची एक अतिशय प्रभावी पद्धती असल्याचे सिद्ध झाले. Rivers चा Instinct and the Unconscious, हा ग्रंथ बराचसा दारुगोळ्यांनी धास्तावलेल्या रुणांच्या अनुभवांवर आधारलेला आहे. भीतीची जेव्हा सरळ सरळ कबुली देणे अवघड जाते तेव्हा तिच्या होणाऱ्या विकृत आविष्कारांचे त्यात सुरेख वि लेषण आहे. हे आविष्कार, अर्थात् बहुदा अबौद्धिक असतात; त्यांच्यात पक्षघाताच्या कित्येक प्रकारांचा अंतर्भाव होतो तसेच कितीतरी प्रकारचे सकृद्दर्शनी शारीरिक वाटणारे रोग असतात. त्यांच्याशी सध्या आपल्याला कर्तव्य नाही; बौद्धिक असंतुलन हा आपल्या विमर्शाचा विषय आहे. वेड्यांचे कित्येक भ्रम उपजत मानसिक प्रतिबंधातून निघालेले असतात, आणि ते केवळ मानसोपचारांनी दुरुस्त होऊ शकतात—जी तथ्ये रुणाने स्मरणात दडविली ती सणाकडून मनःपटला-वर आणवणे—या उपायांनी. या प्रकारच्या उपाययोजनेत, आणि तिच्या मागच्या विचारसरणीत, मनाची एक संतुलित अवस्था, तिच्यापासून सणाचे ढळणे, सर्व संबद्ध तथ्ये तो अगदी विसरू इच्छित असलेल्या गोष्टीसकट त्याला अवगत करणे या उपायांनी त्याला पूर्वपदांवर आणणे, हे गृहीत धरले आहे.

ही गोष्ट, मनोविश्लेषणाने विवेकविरोधी समजुतींचे अस्तित्व सिद्ध होते एवढेच ज्यांना माहीत आहे ते बरेचदा पुरस्कारीत असलेल्या प्रवाहपतित अविवेकी-पणाच्या नेमकी उलट आहे आणि ते लोक हे विसरतात किंवा लक्षात घेत नाहीत की, एका ठराविक उपचारपद्धतीने तो (अविवेकीपणा) कमी कमी करत नेणे हे त्याचे (मनोवि लेषणाचे) उद्दिष्ट आहे. ह्या पद्धतीशी खूपच सदृश पद्धतीने वेडेपणाचा शिक्का न मारला गेलेल्यांचा विवेकविरोध दुरुस्त केला जाऊ शकतो. मात्र जो त्यांच्या भ्रमांपासून मुक्त आहे अशा एखाद्या चिकित्सकाच्या उपचारांना त्यांनी सादर झाले पाहिजे. राष्ट्रप्रमुख, कॅबिनेटदर्जाचे मंत्री आणि धुरंधर पुरुष, मात्र, क्वचितच ही पात्रता पूर्ण करतात, आणि म्हणून उपचार न होता तसेच राहून जातात. आतापर्यंत विवेकीपणाच्या सैद्धान्तिक अंगाचा विचार आपण करीत आहोत. आता आपल्याला लक्ष वळवले पाहिजे, ती व्यावहारिक बाजू, अधिक अवघड आहे. व्यावहारिक प्र नांबद्दलचे मतभेद दोन कारणांतून उद्भवतात : एक प्रतिपक्षीयांच्या इच्छांमधील विरोध; दुसरे, आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांच्या सूक्तासूक्ततेबद्दलचा मतभेद. यातली दुसऱ्या प्रकारची मतभिन्नता वस्तुतः सैद्धान्तिकच आहे, आणि फक्त तर्कतः व्यावहारिक आहे. उदाहरणार्थ काही शासक मानतात की, आपली पहिली संरक्षणफळी लढाऊ जहाजांची असावी, तर दुसरे म्हणतात ती विमानांची असावी, येथे संकल्पित साध्य कोणते याबद्दल म्हणजे राष्ट्रीय संरक्षणाबद्दल मतभेद नाहीत, फक्त ते साधनांबद्दल आहेत. म्हणून हा युक्तिवाद शुद्ध वैज्ञानिक पद्धतीने करणे शक्य आहे. कारण कलहाला कारणीभूत होणारा मतभेद तथ्यांसंबंधी आहे, वर्तमान म्हणा की भावी म्हणा, निश्चित म्हणा की संभाव्य! अशा सर्व प्रकरणी मी ज्याला सैद्धान्तिक विवेकीपणा म्हणतो तो लागू पडतो, त्यात व्यावहारिक समस्या निहित असून देखील.

तथापि या सदरात मोडणाऱ्या पुष्कळ प्रकरणांत एक प्रत्यक्षात फार महत्त्वाची असणारी गुंतागुत दडलेली आहे. अमुक एका प्रकारे वागू इच्छिणारा स्वतःची अशी समजूत करून घेईल की, तसेच वागण्याने त्याला इष्ट वाटणारे विशिष्ट साध्य त्याला मिळवता येईल, मात्र, तसले काही ईप्सित त्याला नसते तर त्याची तशी समजूत व्हायला कारण मिळाले नसते. त्याच्या विरुद्ध इच्छा असणारा माणूस वास्तविक तथ्ये आणि संभाव्यता यांच्याबद्दल वेगळेच निदान करील. सर्वांना हे माहीत आहे की, जुगारी लोक अनेक प्रकारच्या अविवेकी समजुतींनी पछाडलेले असतात : अमुक तंत्राने खेळले की शेवटी विजय झालाच.

राजकारणात रमणारे आपला असा समज कस्न घेतात की विरुद्ध पक्ष करतो तसे पाताळयंत्री राजकारण त्यांच्या पक्षातले नेते कधीही करणार नाहीत. अधिकार गाजविण्याची हौस असणारे असे समजत असतात की, जनसमुदायाला मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हाकणे हेच त्यांच्यासाठी इष्ट असते. तंबाखू आवडणारे म्हणतात की तिने मज्जातंतूंना विसावा मिळतो, अन् मद्य आवडणारे म्हणतात की त्याने कल्पनाशक्तीला चालना लाभते. वस्तुस्थिती काय आहे यासंबंधी अशा कारणांनी उत्पन्न झालेल्या पूर्वग्रहांनी मनुष्याची धारणा अशी काही कलुषित होते की ती टाळणे फार कठीण आहे. मज्जासंस्थेवर मद्याचे परिणाम या विषयावरील अभ्यासपूर्ण शोधनिबंधातही, अंतर्गत पुराव्यावस्न साधारणतः संशोधक निर्व्यसनी आहे की कसा ते दिसून येते. तो काय असेल ते असो, आपल्या वर्तनाचे समर्थन जेणे करून होईल तशाच ख्यात तथ्ये पाहण्याची त्याची प्रवृत्ती असते. राजनीतीत आणि धर्मसंस्थेत तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. सार्वजनिक हिताच्या आकांक्षेने प्रेरित होऊन आपण आपली राजकीय विचारसरणी बनविली आहे असे बहुतेक लोक समजतात; पण माणूस आपला चरितार्थ कसा चालवतो ते पाहून दहापैकी नऊ जणांचा राजकीय पक्ष कोणता असेल ते ओळखता येते. त्यामुळे काही जणांची समजूत आणि आणखी कित्येकांची प्रत्यक्ष वागणूक अशी असते की, अशा बाबतीत वस्तुनिष्ठ होणे अशक्य आहे, आणि विरोधी पूर्वग्रह असणाऱ्यांनी आपसांत रस्सीखेच करणे याशिवाय दुसरी पद्धत शक्य दिसत नाही.

तथापि, नेमक्या अशाच बाबतीत, मनोविश्लेषणपद्धती खास उपयोगाची आहे, कारण आजवर सुप्तावस्थेत असलेला पूर्वग्रह कळून येण्यास ती मनुष्याला मदत करते. दुसरे आपल्याकडे जसे पाहतात तसे स्वतःकडे पाहण्याचे तंत्र ती उपलब्ध करून देते, आणि त्यातून आपली प्रतिमा ही आपण समजतो तितकी पक्षपातीपणे दाखविली गेली नाही, याचे प्रमाण ती देते. या पद्धतीला वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या प्रशिक्षणाची जोड दिली अन् ती व्यापकपणे राबविली, तर ती, वास्तविक तथ्ये आणि कोणत्याही संकल्पित कृत्याचे संभाव्य परिणाम यांसंबंधी त्यांच्या समजुती सध्या आहेत त्याहून अमर्यादपणे अधिक विवेकी होण्यास साहाय्यभूत होईल. आणि मग असल्या गोष्टींबद्दल मतभेद नाहीसे होतील आणि उर्वरित गोष्टींत मतभेद राहिले तरी ते जवळ जवळ नि िचतपणे सामंजस्याने, तडजोड निघण्या इतपत असल्याचे दिसून येईल.

नुसत्या बौद्धिक पद्धतीने हाताळले जाऊ शकत नाही असे काही अजून शिल्लक राहते. एका मनुष्याच्या इच्छा दुसऱ्याच्या इच्छांशी तंतोतंत जुळतील हे कदापि होणे नाही. अमुक एका किंवा दुसऱ्या कुठल्या चालीचे शेअरबाजारावर काय परिणाम होतील याबद्दल दोन स्पर्धकांचे पूर्ण एकमत असेल, पण त्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्यात सौहार्द उत्पन्न होईल असे नाही, कारण एकाच्या जिवावरच दुसऱ्याला श्रीमंत व्हायचे असते. पण येथेही एरवी जी हानी व्हावयाची ती रोखण्यास विवेकीपणाच समर्थ आहे. माणूस विकारवश होऊन वागतो तेव्हा त्याला आपण अविवेकी म्हणतो, जसे चेहेरा विद्रूप करण्यासाठी तो आपले नाक कापून घेतो तेव्हा. तो अविवेकी असतो कारण तो हे विसरतो की, त्या क्षणी त्याला अनावर झालेल्या इच्छेच्या अधीन होताना भविष्यात त्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इच्छांचा तो बळी देत असतो. लोक अधिक विवेकनिष्ठ असते तर ते स्वहिताचा हल्लीपेक्षा जास्त, उचित दृष्टिकोण बाळगते; आणि सर्वजण उदात्त स्वार्थाचा हेतू ठेवून वागते तर विश्व आहे त्याच्या तुलनेत नंदनवन झाले असते. स्वार्थाशिवाय बेहेत्तर असा कृतीचा हेतू नसतोच असे मला प्रतिपादायचे नाही; पण मी हे जरूर म्हणतो की, उदात्त नसलेल्या स्वार्थ-बुद्धीपेक्षा, परार्थबुद्धीप्रमाणे, ती उदात्त असते तेव्हा ती जास्त श्रेयस्कर असते. व्यवस्थाबद्ध समाजात, इतरांना अतिशय अपायकारक अशी एखादी कृती करणे, क्वचितच कर्त्याच्या हिताचे असते. माणूस जितका कमी विवेकी, तितका तो हे ओळखण्यात कमी पडेल की इतरांना जे अपायकारक आहे ते त्यालाही अपायकारक असते. कारण तेव्हा त्याला द्वेष आणि मत्सर अंध करतात. म्हणून मी, जरी, उदात्त स्वार्थ हीच सर्वश्रेष्ठ नीतिमत्ता आहे असे म्हणण्याचे धार्य करीत नसलो तरी, मी अवश्य म्हणतो की, तो जर सार्वजनिक झाला तर तो हे जग आहे त्यापेक्षा निरतिशय बेहेत्तर स्थान बनवून सोडील.

वागणुकीतला विवेकीपणा काय याची व्याख्या, कृती करताना त्या क्षणी सर्वांत प्रबळ इच्छेनुसार वागण्यापेक्षा, आपल्या सर्व संबद्ध इच्छांची आठवण ठेवण्याची सवय, अशी करता येईल. विचारातल्या विवेकीपणासारखी ही प्रमाणभेदाची बाब आहे. परिपूर्ण विवेकनिष्ठा हा अप्राप्य आदर्श आहे यात शंका नाही. पण ज्या अर्थी आपण काहींना ठार वेडे या वर्गात लोटतो त्यावरून हे उघड आहे की काही लोकांना आपण इतरांपेक्षा जास्त विवेकी ठरवतो. माझा दृढविश्वास आहे की जगातली सर्व भरीव प्रगती विचारातली आणि आचारातली अशी दोन्ही प्रकारची, विवेकीपणाच्या वृद्धीत सामावली आहे. परोपकारी नीतिमत्तेचा उपदेश करणे मला काहीसे निरर्थक दिसते, कारण ज्यांच्या ठिकाणी परोपकाराची भावना असते त्यांनाच ती भावेल, पण विवेकनिष्ठेचा उपदेश करणे काहीसे वेगळे आहे, कारण विवेकीपणा आपल्या स्वतःच्या इच्छांची साकल्याने, मग त्या काहीही असोत, पूर्ती करण्यास मदत करतो. बुद्धी इच्छांचे आकलन करण्यात आणि नियमन करण्यात ज्या प्रमाणात प्रभावी होते त्या प्रमाणात मनुष्य विवेकी असतो. मला खात्री आहे की, आपल्या कृतींचे नियंत्रण बुद्धीद्वारे होणे हेच सरतेशेवटी, सर्वाधिक महत्त्वाचे असते, आणि त्यामुळेच, विज्ञान आपल्याजवळच्या एकमेकांना अपाय करण्याच्या आयुधांमध्ये वाढ करीत असले तरी, समाजजीवन टिकवून ठेवणे शक्य होईल. शिक्षण, वृत्तपत्रे, राजनीती, धर्मसंस्था—-एका शब्दात, जगातल्या सर्व श्रेष्ठ शक्ती—-आजमितीस अविवेकीपणाच्या पक्षात आहेत; लोकराजाचा अनुनय त्याला बहकाविण्यासाठी करणाऱ्यांच्या हातात त्या आहेत. यावर उपाय एखाद्या महाशक्ति-शाली प्रभावाने उलथापालथ करणे हा नसून, व्यक्तिमात्राकडून आपल्या शेजाऱ्याशी अन् जगाशी आपल्या असलेल्या संबंधात अधिक सुज्ञ आणि संतुलित दृष्टिकोण आणण्यात आहे. बुद्धीत, अधिकाधिक विस्तारात जाणाऱ्या बुद्धीत, आपले जग जी दु:खे भोगीत आहे त्यांतून सुटण्याचा उपाय आपण शोधला पाहिजे.

मूळ लेखक : बर्ट्रांड रसेल
अनुवादक : प्र. ब. कुळकर्णी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.