माणसांच्या समूहांमध्ये पूर्ण समता कधीच आढळत नाही. सर्वच समाजां-मध्ये घटक-व्यक्तींना श्रेणींमध्ये विभागलेले असते. ह्या श्रेणींचा उच्चनीच क्रम कधी वयावर अवलंबून असतो, कधी शारीरिक शक्तीवर, कधी संपत्तीवर, तर कधी इतर कोणत्या घटकांवर. समाजाप्रमाणे हे घटक बदलतात, पण त्यांच्यानुसार घडलेली श्रेणींची उतरंड (Hierarchy) मात्र सगळ्याच समाजांमध्ये निरपवादपणे आढळते. हे कसे उपजले? पूर्वी एक आडवळणाचे स्पष्टीकरण दिले जाई. जास्त काटेकोरपणे श्रेणीबद्ध असलेले समाज सैल श्रेणींच्या समाजांपेक्षा जास्त सबळ असतात, असे मानले जाई. म्हणजे दोन समाजांमध्ये भांडण झाले, तर जास्त श्रेणीबद्ध समाज जिंकणार, आणि असे होत होत कठोर श्रेणीबद्ध समाजच टिकून राहणार, असे हे स्पष्टीकरण होते. आज काटेकोर रीतीने श्रेणीबद्ध असलेले समाज जास्त सबळ असतात, हे मानले जात नाही. कठोर वर्ग-विग्रह असलेला जर्मन समाज दोन महायुद्ध हरला. बरीच समता बहाल करणाऱ्या हो ची मिन्हचा व्हिएतनाम आणि कास्त्रोचा क्यूबा हे देश अमेरिकेसारख्या महासत्तेलाही नमवता आले नाहीत. श्रेणींचा उद्भव दोन समूहांच्या किंवा समाजांच्या भांडणांमधून समजू शकत नाही. त्यासाठी एकाच समूहातल्या व्यक्तींची वागणूक तपासायला हवी.
कोंबड्यांच्या गटांचा ह्या दृष्टीने अभ्यास केला गेला. एखाद्या जागी अनेक कोंबड्यांना एकत्र ठेवले तर आधी त्यांच्यात मारामाऱ्या होतात. लवकरच एक ‘टोचणी क्रम’ (Pecking Order) घडतो. ‘अ’ ही कोंबडी ‘ब’ या कोंबडीला टोची मारते, आणि ‘ब’ हे मुकाट्याने सहन करते. ‘ब’ तिकडे ‘क’ला टोचते, आणि ‘क’ ही दादागिरी सहन करते. गटातल्या सर्व कोंबड्या अशा टोचाटोचीतून जात हा सबळतेचा क्रम घडतो. नंतर मात्र फार शक्तिपरीक्षा न होता ही श्रेणीबद्धता कायम राहते. माकडे, कपी, माणसे, हे प्राणी कोंबड्यांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात. थेट शक्ति-परीक्षण न करताही ह्या माकडांच्या गटांतल्या व्यक्ती आपापली सामाजिक स्थाने ओळखून वागतात.
खालच्या सामाजिक स्थानाच्या व्यक्तींना फार दारिद्र्य भोगावे लागते. जीवनोपयोगी वस्तूंच्या वाटपात सामाजिक दृष्ट्या दुर्बळांचा वाटा नेहेमीच कमी असतो. अशा दुबळ्यांना कधीकधी तर प्रजोत्पादनासाठी जोडीदारही मिळणे कठीण जाते. हे का सहन केले जाते?
प्र नाचे उत्तर दोन भागांत आहे. एक म्हणजे खालचे सामाजिक स्थान कधीच मुकाट्याने सहन केले जात नाही —- उलट प्रत्येक व्यक्ती हर प्रयत्नाने आपले सामाजिक स्थान उंचावायला धडपडत असते! दुसरे म्हणजे, काही अंशी तरी आपले सामाजिकदृष्ट्या दुय्यम स्थान मान्य करणेच जगण्याला आणि प्रजोत्पादनाला उपयुक्त ठरते. प्रत्येक व्यक्तीपाशी ऊर्जेचा मर्यादित साठा असतो. आपले सामाजिक स्थान टिकवायला आणि सुधारायला ऊर्जा लागते. तशीच ती जगायला आणि प्रजोत्पादनालाही लागते. एकाच अंगावर फार ऊर्जा खर्च करणाऱ्यांचे दुसरे अंग नेहेमीच कमकुवत ठरते. त्याऐवजी ह्या दोन अंगांत समतोल राखणे, जुजबी अप-मानही सहन करणे, पण प्रजावाढीसाठी धडपडणे शेवटी उपयुक्त ठरते. जॉन मेनार्ड स्मिथने पक्ष्यांच्या अभ्यासातून दाखवून दिले आहे की टोचणीतून आपले सामाजिक स्थान सांभाळायचा फार जोमदार प्रयत्न करणारे पक्षी पुढच्या पिढीत कमी प्रजा ‘ठेवतात’. फार खालचे सामाजिक स्थान स्वीकारणाऱ्यांचेही असेच होते. पण सम-तोल साधणाऱ्या पक्ष्यांना दोन्ही ‘टोकाच्या’ वागणुकीपेक्षा टिकाऊ प्रजोत्पादनात जास्त यश मिळते!
जगणे आणि आपला वंश पुढे नेणे हे सर्वच सजीवांचे मुख्य उद्दिष्ट असते. सामाजिक स्थान सुधारणे, हे पूरक उद्दिष्ट. माकड-माणसांसारख्या प्राण्यांमध्ये कमी श्रमाने हे पूरक उद्दिष्ट गाठू देणारी वर्तणूक आढळते. एकमेकांना मदत करणे, परस्परोपकार (Reciprocal Altruism) हे यातले महत्त्वाचे अंग. श्रेणी तर आहेतच, आणि त्यांची शिडी चढणेही जगण्या-जनण्याला आवश्यकच आहे. मग दर टप्प्यावर मित्र जोडून, शत्रू आणि स्पर्धकांना अडथळे उत्पन्न करून उद्दिष्टे साधली जातात. थेट मारामाऱ्या, भांडाभांडी करत श्रेणींची शिडी चढणे कमी प्रमाणात आढळते. रामाने सुग्रीवाशी आणि मास्तीशी मैत्री जोडणे, पांडवांनी अनेक विवाह-संबंधांमधून इतर राजांशी मैत्री जोडणे, एक्काहत्तरच्या बांगलादेश युद्धाच्या आधी इंदिरा गांधींनी ‘पब्लिक रिलेशन्स’साठी जगप्रवास करणे ही सारी अशा वागणुकीचीच उदाहरणे आहेत. आणि सुट्या व्यक्तींपर्यंत ह्या वागणुकीची उदाहरणे आपण आपल्या परिचितांमध्येही पाहत असतो.
ही वागणूक जीनबद्ध असावी, असेही दिसते. जसे, आपल्या श्रेणीच्या कमीजास्त स्थानाबद्दल नर जास्त ‘हळवे’ असतात. माद्या त्या मानाने सामाजिक स्थान सुधारायला फार धडपडताना दिसत नाहीत. माद्यांचे जीन्स पुढच्या पिढीत जातातच, मग त्या बलात्कारिता का असेनात. नरांचे जीन्स पुढे जायला मात्र जोडीदारीण हवी, आणि तिला गाठायला सामाजिक स्थान बरे हवे!
माणसांच्या इतिहासातल्या वेगवेगळ्या जीवनक्रमांची ‘मापे’ पाहणेही उपयुक्त आहे. पुराजीवशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, ह्या सान्यातून वेगवेगळ्या जीवन-क्रमांचे काळ ठरवता येतात. मनुष्य सध्याच्या ख्यात घडला त्याला आज तीस-चाळीस लाख वर्षे झाली आहेत —- पंचवीस वर्षांची एक पिढी मानली, तर सव्वा-दीड लाख पिढ्या. ह्यांपैकी बहुतांश भाग फळेमुळे गोळा करून खाणे, जुजबी शिकार करणे, असा जीवनक्रम होता —- आदिवासींमध्ये आजही आहे. ह्याला ‘शिकार-सावड’ जीवनक्रम म्हणतात (Hunting-Gathering). शेतीची सुस्वात दहाएक हजार वर्षांपूर्वी झाली, म्हणजे चारेकशे पिढ्या तो जीवनक्रम अस्तित्वात आहे. औद्योगिक जीवनक्रम आठ-दहा पिढ्या, दोन-अडीचशे वर्षे जुना आहे—आणि ई डॉट कॉमची पहिलीच पिढी आहे! म्हणजे माणसांची वागणूक आजही मुख्यतः शेपन्नास माणसांच्या शिकार-सावड करणाऱ्या टोळ्यांमधील समाजव्यवस्थेनेच घडवल्यासारखी आहे. शेती आणि उद्योग यांचा परिणाम दिसण्याइतके ते दोन्ही जीवनक्रम ‘जुने’ नाहीत, आणि याचाच अर्थ असा की माणसांच्या सामाजिक वागणुकी-तली निकटवर्ती लोकांबद्दलची अंगेच (केवळ) उत्क्रांतीतून घडली आहेत. त्यापेक्षा मोठाल्या गटांच्या, श्रेणींच्या, समूहांच्या बाबतीत आपले वागणे फक्त ‘सांस्कृतिक’ वाटांनीच घडलेले आहे, ते ‘नैसर्गिक’ किंवा निसर्गाने बहाल केलेले नाही.
उतारवयातला टोळीप्रमुख आणि त्याला आव्हान देणारा तरणा पुंड, ह्याला समांतर वागणूक म्हणजे कुटुंबप्रमुख आणि त्याला ललकारणारा मुलगा. ह्या वादांमध्ये एक जाणीव नेहेमीच असते, की दोन्ही बाजू मुळात एकच आहेत, त्यामुळे वाद नेहेमीच आटोक्यात राहतात. मोठ्या गटांमधले श्रेणींबाबतचे वाद असे नियंत्रित राहात नाहीत. त्यांच्या नियंत्रणासाठी सामाजिक संस्था घडवणे, यंत्रणा उभारणे, असे सारे प्रयत्नाने करावे लागते. ‘पक्षांतर्गत बंडखोरी’ आटोक्यात ठेवा-यला शिस्तीची यंत्रणा लागते. मंत्रिमंडळातली गटबाजी मात्र लहानशा गटातलीच असते, आणि सहजगत्या ती आत्मघातकी तीव्रता गाठत नाही! मित्रामित्रांच्या, कुटुंबाच्या गटात कोण कोणाशी नम्रतेने वागतो, कोणाला हिडिसफिडिस करतो, हा स्थानिक प्र न असतो, आणि तो सोडवायला उत्क्रांतीने यंत्रणा घडवलेल्याच आहेत. वर्गकलह, जातिभेद, हे मात्र मोठ्या गटांचे प्र न आहेत, आणि म्हणूनच निसर्गातल्या सौम्य नियंत्रणाने आवरता येणारे नाहीत. आपल्या निकटवर्तीयांच्या गटात माणसे आपोआप स्वतःचे स्थान सुधा-रायला धडपडतात. मित्र जोडतात, समर्थन-गट घडवतात, स्पर्धकांना खाली ओढा-यला झटतात. आपण आहोत त्यापेक्षा चांगले आहोत, हुषार आहोत, सशक्त आहोत असे भासवतात. कधी हे उघडपणे घडते, तर कधी संयत सुप्तपणे. पण अशी चढाओढ सतत सुच असते. आणि ही बारीकसारीक ‘सोंगे’, हे स्वतःची प्रतिमा उजळवणे, हे नीट घडायला प्रथम स्वतःला पटवून द्यावे लागते, की आपण ‘विशेष’ काही तरी आहोत! लहान गटांमध्ये यशस्वी व्हायला नेहेमीच आपली बाजू न्याय्य आहे, आपला पक्ष ‘भल्याचा’ आहे, असे स्वतःला पटवून द्यावे लागते—असे म्हणता येईल, की इतरांना यशस्वीपणे ‘फसवायला’ आधी स्वतःला फसवावे लागते! एकदा का स्वतःला स्वतःचे महत्त्व पटवून दिले, की इतरांना ते पटवून देणे सोपे जाते.
ह्या प्रकाराबद्दल रॉबर्ट राईट म्हणतो, “उत्क्रांति-मानसशास्त्रज्ञाला हा भ्रम इतका सर्वव्यापी वाटतो, की मुळात कोठे इमानदारी असेल असे मानणेच निरुपयोगी वाटते”. (To an evolutionary psychologist, the delusion seems so pervasive that the usefulness of thinking about any core of honesty falls into doubt,)
ह्या विचारानुसार सर्व चर्चा, सर्व संवाद, सर्व मैत्र्यांच्या मोडतोडी, सारे फक्त सत्तासंघर्षाचे ‘अवयव’ ठरतात. चर्चाचे निष्कर्ष, संवादांचे परिणाम, बदललेली समीकरणे, ह्या साऱ्यांत ‘सत्यमेव जयते’ हाही भ्रमच ठरतो.
फ्रॉईडच्या मानसशास्त्रीय विचारांचे एक अंग असे होते, की माणसे स्वतः-बद्दलचे सत्य पचवू शकत नाहीत. ह्या नव्या मानसशास्त्रात आणखी जहाल भाग आहे, की माणूस स्वतःला इतका फसवतो की त्याला सत्यच दिसत नाही! उपेक्षावाद (cynicism) ची ही तीव्र आवृत्ती आहे का?
रॉबर्ट राईट म्हणतो, “मनुष्यप्राणी नैतिक प्राणी असू शकतो का, हा कठीण प्र न आहे. आधुनिक उपेक्षावाद ह्या प्र नापुढे हतबल आणि वैफल्यगस्त आहे. त्याला हा प्र न विक्षिप्त वाटतो. नव्या डार्विनवादाने ‘नैतिक’ हा शब्दच तर विनोदी ठरणार नाही?” (Thus the difficult question of whether the human animal can be a moral animal —- the question that modern cynicism tends to greet with despair —- may seem increasingly quaint. The ques tion may be whether, after the new Darvinism takes root, the word moral can be anything but a joke.)
पण आपल्याला स्वतःच्याच वागणुकीतला स्वतःलाच फसवायचा भाग जाणवतो, तो कसा? एखादे वेळी स्वतःबद्दलच्या नव्या धारणा घडण्यातले हे पहिले पाऊल तर नाही?
[रॉबर्ट राईटच्या ‘द मॉरल अॅनिमल’ ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या उत्क्रांती-मानसशास्त्राची ओळख करून देणारा हा तिसरा लेखांक. ह्या नव्याने घडत असलेल्या शास्त्राची गृहीत तत्त्वे अशी —-
१. नैसर्गिक निवडीमुळे प्राण्यांच्या जातींचे गुणांचे संच बदलत जातात. याला ‘उत्क्रांती’ म्हणतात.
२. गुणांचे संच ही जीन्सच्या संचांचे व्यक्त स्प, कारण जीन्स जैवरसायनांच्या प्रमाणांचे नियंत्रण करतात, आणि जैवरसायने अखेर गुण घडवतात.
३. इथे ‘गुण’ म्हणजे फक्त शारीरिक गुण नव्हेत, तर वागणुकींचे प्रकारही त्यातच समाविष्ट आहेत. ४. आणि असे सर्व गुण, वागणुकींचे प्रकार, वगैरे अनेक पिढ्यांच्या उत्क्रांतीतूनच घडले आहेत.
आता —- राईट जे काही सांगतो ते वरच्या सर्व सूत्रांशी सुसंगत आहे, असा त्याचा दावा आहे. त्याच्या पुस्तकाचा परिचय करून देऊ पाहणाऱ्या मला याबद्दल काही प्र न, शंका वगैरे सुचतात. ‘आजचा सुधारक’च्या वाचकांनाही असे प्र न, अशा शंका असणारच. असे प्र न मांडले जावेत, त्यांच्यावर चर्चा व्हावी, राईटच्या मांडणीचा कोठे प्रतिवाद व्हावा तर कोठे पर्याय सुचवले जावे, या इच्छेनेच हा परिचय दिला जात आहे.
पण लेख प्रकाशित होण्यापासून त्यावर प्रतिसाद येण्याला दोन-तीन महिने लागतात. छपाई, टपाल, आजचा सुधारकचे व्यवस्थापकीय प्र न, वाचकांना प्र न मांडता येणे, ह्या सर्वांमधून ही दिरंगाई घडते —- म्हणाल तर ‘अक्षम्य’, म्हणाल तर ‘अटळ’! म्हणून चौथा (आणि बहुधा शेवटचा) लेखांक जानेवारी २००१ च्या अंकात न देता जरा उशीराने द्यावासा वाटतो. मधल्या काळात वाचकांना मूळ पुस्तक किंवा हा परिचय, यातून प्र न सुचले तर ते हवेच आहे.] १९३, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर — ४४० ०१०