अक्करमाशी, योनिशुचिता आणि स्त्रीमुक्ति

आज मला देण्यात आलेले पुस्तक ‘अक्करमाशी’ आणि ‘पुन्हा अक्करमाशी’ हे आहे. ही दोन पुस्तके जरी समोर दिसली तरी त्या एकाच पुस्तकाच्या दोन आवृत्ती आहेत.
‘अक्करमाशी’ पुस्तक आता तिसऱ्या आवृत्तीत आले आहे. पहिली आवृत्ती १९८४ मध्ये, दुसरी १९९० मध्ये आणि तिसरी ऑक्टोबर ९९ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ‘पुन्हा अक्करमाशी’ हे पुस्तक मूळ पुस्तकावरून नव्याने लिहिले आहे. त्याची पहिली आवृत्ती १९९९ मधली आहे. आणि ती अक्करमाशीच्या तिसऱ्या आवृत्तीच्या तीन महिने अगोदर प्रकाशित झाली.
‘अक्करमाशी’ आणि ‘पुन्हा अक्करमाशी’ यात काही थोडे प्रसंग वेगळे आहेत. पण मुख्य म्हणजे नवीन पुस्तकाची भाषा निराळी आहे. बोलीभाषेऐवजी ते पुस्तक प्रमाण-भाषेमध्ये आहे. कोणतेही पुस्तक वाचकांसाठी लिहिले जाते. दूरच्या वाचकाला जी भाषा सहज समजेल त्या भाषेतच पुस्तक लिहिले गेले पाहिजे ही जाण लेखकाला उशिरा का होईना आली ह्याबद्दल आपण त्याचे अभिनंदन करू या.
‘अक्करमाशी’ हे आत्मचरित्र आहे. अनौरस संततीच्या वाट्याला येणारे अत्यंत अपमानास्पद आणि अत्यंत बिकट असे आयुष्य शरणकुमार लिंबाळे यांनी व्यतीत केले आहे. त्या आयुष्याचा तो वृत्तान्त आहे. पुस्तकात करुणरस कसा भळभळा वाहतो. लिंबाळ्यांच्या आयुष्यातल्या त्या अपमानास्पद परिस्थितीचे सविस्तर विवरण करण्याचा माझा इरादा नाही. माझी इच्छा निराळी आहे. ती मी लिंबाळ्यांच्या शब्दांत सांगतो. ते म्हणतात, ‘अक्करमाशी प्रकाशित होऊन एक तप उलटले. ह्या पुस्तकाचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात प्रवेश झाला. अन्य भाषांत भाषांतरे झाली. खूप चर्चा झाली. पुरस्कार मिळाले, हे सर्व खरे असले तरी अक्करमाशीतील प्र न तसेच राहिले. अजूनही अक्करमाशीतली माणसे जिवंत आहेत. ते आयुष्य जगत आहेत. मी मात्र सर्वांपासून तुटलो आहे ह्याची मला खन्त वाटते.’
‘अक्करमाशी’ने निर्माण केलेल्या प्र नांची चर्चा आपण येथे करणार आहोत. ‘अक्करमाशी’च्या किंवा ‘पुन्हा अक्करमाशी’च्या भाषेविषयी अथवा साहित्यिक गुणांविषयी मी आज काहीही बोलणार नाही. त्यांची चर्चा करायची असेल तर आपण त्यासाठी दुसरा एखादा दिवस निवडू. आजचा सर्व वेळ आपण पुस्तकाने निर्माण केलेल्या प्र नांना देऊ या.
‘अक्करमाशी’ हा शब्द अकरा मासे ह्यापासून झाला आहे. अकरा मासे म्हणजे पूर्ण बारा मासे नसलेला. काहीतरी कमीपणा असणारा. अनौरस संततीला उद्देशून हा शब्द मराठीत वापरला जातो. तर आज ‘अक्करमाशी’मध्ये जी समाज-स्थिती प्रतिबिंबित झाली आहे त्या समाजस्थितीविषयीच्या, ती कशामुळे उद्भवली आणि कशामुळे बदलेल ह्याविषयीच्या चर्चेला ह्या ठिकाणी मला तोंड फोडावयाचे आहे. मी वर सांगितलेच आहे की आजचा विषय अनौरस संततीचा आहे त्यामुळे तो नाजुक आहे. विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे. तो तुमच्याही जिव्हाळ्याचा असावा, नसल्यास व्हावा, अशी इच्छा आहे.
शरणकुमार लिंबाळे या माणसाला आपला बाप कोण ते माहीत आहे. पण त्याला आपल्या बापाचे नाव सांगायची उजागरी नाही. कारण त्याच्या आईचे आणि त्याच्या जन्मदात्या पित्याचे लग्न लागलेले नाही. ते लग्न होऊ शकले नाही, कारण त्यांच्या आईवडिलांची जात वेगळी आहे. त्याचे वडील घरंदाज आणि प्रतिष्ठित अशा जमीनदाराच्या कुळात (लिंगायतांच्या) जन्मले आहेत आणि आई अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या महार जातीची आहे. ती अस्पृश्य आहे कारण तिची आई महार जातीची होती. त्याच्या आईचे वडील महामूद दस्तगीर जमादार हा मुसलमान माणूस फार प्रेमळ दाखविला आहे. ‘अक्करमाशी’ कादंबरी नाही–ती आत्मकथा आहे–त्यामुळे तो मुसलमान खरोखरच प्रेमळ असला पाहिजे. पण ते असो. आपल्याला जसे या पुस्तकाचे साहित्यिक गुण तपासायचे नाहीत तसेच त्यामध्ये वर्णन केलेल्या घटनांची वा व्यक्तिचित्रणांची दखल आज घ्यायची नाही. आपल्याला ऊहापोह करायचा आहे तो त्या पुस्तकाने आपल्यासमोर उभ्या केलेल्या प्र नांचा, समस्यांचा. आपल्या समस्या आहेत जातीच्या, धर्माच्या, औरस-अनौरसपणाच्या म्हणजे जात, धर्म आणि अनौरसपणा पुसून टाकण्याच्या. ह्या तीनपैकी एक धर्म तेवढा आपल्याला स्वतःला पुसता येतो. पण तोसुद्धा त्याऐवजी दुसरा एखादा स्वीकारला तरच. अनौरसपणा असल्यास तोही अलीकडे पुसता येतो. पण तुम्हाला स्वतःला नाही. तुम्ही त्या बाबतीत पूर्ण परतंत्र. कोर्टामार्फत नवीन आईबापांनी तुमचा स्वीकार केला तर! खऱ्या आईबापांनी तुम्हाला टाकून दिले आणि दुसऱ्या संपन्न जोडप्याने तुमचा स्वीकार केला असेल तर कालांतराने तुम्ही दुसऱ्या आईबापांचे मानले जाऊ शकता. पण जात–ती तुमचा मरेपर्यंत पिच्छा सोडत नाही. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही जातीत स्वेच्छेने जाऊच शकत नाही. धर्म बदलला तरीसुद्धा जात सावली-सारखी तुमच्या मागोमाग येते. ह्या नियमालाही एक अपवाद आहे. धर्मांतराबरोबर देशांतर केले तर क्वचित जात तुमच्या मागे येत नाही. पण परदेशातही काही लोक आपली जात बरोबर नेतात. परदेशात आपापल्या जातीविषयीचा अभिमान अथवा अहंगंड बाळगणे किंवा न्यूनगंड बाळगणे म्हणजे जात परदेशात नेणे. या सगळ्याच्या मागे काय आहे? एकच गोष्ट आहे. ती आहे आपल्या मनावरचे संस्कार. आपल्या मनाची घडण. आपल्या मनावर असलेले आमच्या संस्काराचे अधिराज्य. चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची अनिच्छा. किंवा विचार करण्याचीच अनिच्छा. जे पूर्वीपासून चालू आहे ते तसेच पुढे चालू ठेवणे ही आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली आहे. आपले स्त्री-पुरुषसंबंधच नाही, तर आपल्या रस्त्याच्या कडेला जमा होणाऱ्या कचऱ्यापर्यंतच्या सर्व समस्या आपण आपले जुने संस्कार, आपल्या जुन्या सवयी न मोडल्यामुळे निर्माण झाल्या आहेत.
मी वर स्त्री-पुरुष-संबंधाचा उल्लेख केला आहे. पण मला म्हणायचे आहे स्त्री-पुरुष समानता आणि स्त्रियांमधील आपसातली समानता. जिचा अभाव स्त्रीमुक्ति-मधील धोंड आहे. जोपर्यंत आपण आपल्या मुलांची, आहे. पण मला म्हणायचे आहेत स्त्री-पुरुष समानता आणि एकमेकांची जात, एक-मेकांचा धर्म आणि अनौरसपणा म्हणजे त्याविषयीचा न्यूनगंड व अहंगंड विसरत नाही तोपर्यंत समता नाही. आणि समता नाही म्हणजे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य आणि समता ह्या हातात हात घालून चालणाऱ्या आहेत. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आमच्यावर इंग्रजांचे राज्य होते. त्यापूर्वी मोगलांचे राज्य होते. दुसऱ्यांच्या राज्यात आपल्या आणि राज्यकर्त्यांच्या दर्जात फरक असतो. म्हणजेच समता नसते. पारतंत्र्य आणि विषमता हे पर्यायी शब्द आहेत, असे मला वाटते. राजा आणि त्याची प्रजा अशी जेव्हा समाजरचना असते, तेव्हाही प्रजा परतंत्रच असते. लोकशाही—प्रजेची स्वायत्तता—येईपर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य कोणीच उपभोगू शकत नाही. हे सारे सांगण्याचे कारण स्त्रीमुक्ति म्हणजे सगळ्या स्त्रियांच्या आणि सगळ्या स्त्री-पुरुषांच्या दर्जाची समानता.
कोणी कोणते काम करावयाचे ह्याला महत्त्व नाही. घरकाम केल्याने स्त्रियांचा किंवा पुरुषांचाही दर्जा खाली घसरण्याचे काहीच कारण नाही. थोडक्यात काय तर स्त्रीमुक्तीचा आणि घरकामाचा काही संबंध नाही. मात्र स्त्रीमुक्तीचा अपत्याच्या औरस-अनौरसपणाशी, म्हणजेच योनिशुचितेशी अत्यंत जवळचा संबंध आहे. शरणकुमार लिंबाळे हा त्यांच्या आईचा अनौरस मुलगा आहे, कारण तिचे त्याच्या बापाशी विधिपूर्वक लग्न झाले नाही. त्याची आई त्यामुळे गावकऱ्यांच्या नजरेत दुःशीला, कुलटा, व्यभिचारिणी अशी आहे. तिचे चारित्र्य कलंकित आहे. शरणकुमार लिंबाळेचा कोणताही दोष नसताना त्याला जे भोगावे लागले ते आणखी कोणालाही भोगायला लागू नये म्हणून लिंबाळेला स्वतःला आता काहीही करण्याची गरज असू नये. आपण, हा नि चय करावा की ते स्त्रियांची मनातल्या मनात वर्गवारी करणार नाहीत. विवाहित, अविवाहित, कुमारी, सधवा, सापत्य, निरपत्य, वंध्या पहिल्या मुलाची आई वगैरे. पण त्यापेक्षा आणखी एक वर्गवारी आहे, ती म्हणजे पतिव्रता, जारिणी ह्यांची. आमच्या प्रत्येकाच्या मनातून हा विचार पुसून टाकायचा आहे, ह्या बाबतीतले आमचे संस्कार आम्हाला विसरायचे आहेत, आमची संस्कृती आम्हाला बदलायची आहे. आमच्या मनात पतिव्रतांना इतर स्त्रियांपेक्षा जे अधिक श्रेष्ठ स्थान आहे ते आम्हाला नष्ट करायचे आहे.
स्त्रिया स्वायत्त झाल्या तरच अनौरस अपत्यांचा छळ थांबेल. समाजामध्ये आज जे उच्चनीच वर्ण आहेत, त्यांचा आधार योनिशुचिता आहे. ब्राह्मण आपणांस इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ कशाच्या बळावर मानतात हे शोधले तर त्याचे मूळ दोन गोष्टींमध्ये सापडेल. पहिली गोष्ट म्हणजे जी मंडळी मांसाहार करतात, किंवा ज्यांचा रक्ताशी जवळून किंवा दुख्न संबंध येतो ती ब्राह्मणांसाठी अपंक्त आणि नीच. त्या रक्तामुळे स्त्री, (ब्राह्मणाचीसुद्धा) अस्पृश्य, विटाळशी!
दुसरी गोष्ट म्हणजे विधवा-विवाह-निषेध.
आपल्या हिन्दुस्थानात जातीशिवाय माणूस नाही. भिन्नजातीय स्त्री-पुरुषांची संतती ही कोणत्याच जातीत पडायला नको, पण तसे होत नाही. ती कडू, गोळक, लेकावळे, कृष्णपक्षी, अक्करमाशी अशा नावाने ओळखली जात असे. अलिकडे आंतरजातीय विवाहांची संतती मातापित्यांपैकी कोणत्यातरी एकाच्या जातीत पडते. बहुधा बापाच्या जातीत, तर क्वचित प्रसंगी आईच्या. आई उच्चवर्णीय असेल तर ती (आई) मुले आपल्या जातीची म्हणून ओळखली जावी असा यत्न करते. जेथे सरकारी सवलतींचा संबंध असतो तेथे जास्त सवलती जिकडे मिळतील तिकडे जातींचे वळण असते.
योनिशुचितेचा दुसरा प्रभाव म्हणजे स्त्रियांचा दुय्यम दर्जा. आणि त्यांच्या मनावर असलेले भीतीचे राज्य. कोणीही पुरुष आपल्यावर बलात्कार करील आणि कोणी आपली खोटी बदनामी करील त्याची भीती. ह्या दोन भीतींमधून कोणत्याही वयाच्या आणि सांपत्तिक स्थितीच्या स्त्रिया सुटल्या नाहीत. मुलींना जरा समजू लागल्यावर त्यांच्या बोकांडी जी भीती बसते ती मरेपर्यंत त्यांची सोबत करते. निष्ठेबद्दल शंका घेऊन कोणालाही वाकवता येते. स्त्रियांना सतत नम्र ठेवण्यासाठी पुरुषांनी हा डाव रचला आहे असे माझे मत आहे. बरे, हा डाव आमच्या कोणत्या पिढीतल्या पूर्वजांनी रचला हे कोणालाही माहीत नाही. आम्ही आमच्या पिढीतले लोक आंधळेपणाने आमच्या पूर्वजांचे अनुसरण करीत आहोत. आम्ही आमच्या अकला गहाण टाकल्या असेच म्हणणे भाग आहे. आमच्या मनावरील संस्कार आम्हाला दुसरे काही करूच देत नाही.
स्त्रियांकडून केल्या जाणाऱ्या योनिशुचितेच्या अपेक्षेमुळे त्यांच्या वाट्याला कोणकोणत्या प्रकारची भीती येते त्यांची मी एकदा यादी केली होती. त्या यादीत वरच्या दोन प्रकारच्या भीतींशिवाय जावई मिळविण्यासाठी बापाला ऐपतीबाहेर हुंडा द्यावा लागेल ही भीती; (मुलींनी या भीतीपोटी आत्महत्या केलेल्या आहेत.) सासरी छळ होईल ही भीती; छळाची मजल जाळून मास्न टाकण्यापर्यंत जाईल ही भीती; सासरी आपली उपासमार होईल ही भीती; नवरा टाकून देईल, तो भलभलते संशय घेईल ही भीती; नवरा पदोपदी अपमान करील ही भीती; तो उरावर सवत आणून बसवील, नोकरीमध्ये वरिष्ठाधिकारी नको त्या मागण्या करील ही भीती. आणि ह्याशिवाय सगळ्यांत महत्त्वाची—-ज्या आपल्या अत्यंत स्वाभाविक अश्या भावना आहेत ज्या अगदी नैसर्गिक अश्या प्रेरणा आहेत त्या त्यांना नकळत, चुकून, प्रकट होतील अशी भीती. ही शेवटची भीती सगळ्यांत वाईट आहे. तिच्यापोटी स्त्रिया अकाली प्रौढ होऊन गेल्या. त्या त्यांच्या स्वाभाविक हास्य गमावून बसल्या. त्या खोटेखोटे हसायला शिकल्या. ज्यामुळे मनुष्यप्राणी इतर प्राण्यांहून वेगळा उठून पडतो ते त्याचे लक्षण हास्य. तेच स्त्रियांपासून हिरावून घेतले आहे आणि आम्ही त्यांना जनावरांच्या वर्गात टाकले आहे.समाजाने स्त्रियांपासून केलेल्या योनिशुचितेच्या अपेक्षेमुळे त्यांच्या स्वभावा-मधली प्रत्येक स्वाभाविक गोष्ट हुडकून काढून, वेचून ठेचून मास्न टाकली गेली आहे. स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक परिस्थितिशरण असण्याचे कारण त्यांच्यावर लादली गेलेली योनिशुचिता असे माझे मत आहे. अनौरस मुलांना आज जो त्रास होतो तो पुढे होऊ द्यायचा नसेल तर आपण स्त्रियांना मुक्त केले पाहिजे. स्त्रीमुक्तीचा अर्थ पुरुष जे जे करतात ते ते स्त्रियांनी करावे असा नव्हे तर पुरुष जे करीत नाहीत तेही स्त्रियांनी करावे म्हणजे अनेकांवर सारखे प्रेम करून दाखवावे. दुसऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेऊ नये, तर समस्त स्त्री-पुरुषांच्या गरजा जाणून घ्याव्या आणि आपल्या हृदयातल्या करुणेचा प्रत्यय येऊ द्यावा. माझ्या कल्पनेतली स्त्रीमुक्ति झाली तर संशयी नवऱ्यांना बायका धुडकावून लावू शकतील. परित्यक्त्यांचे प्र न सुटतील. त्यांची निवारागृहे आणि मुलांची अनाथालये बंद पडतील. व्यभिचारासाठी कोणावरही खटला भरता येणार नाही. बलात्काराबद्दल आजच्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा होतील. ब्रह्मचारी स्त्री-पुरुष आपल्या खऱ्याखोट्या ब्रह्मचर्याचा टेंभा मिरविणार नाहीत. पतिव्रता त्यांच्या पातिव्रत्याच्या दिमाख दाखविणार नाहीत. त्यावरून कुणी कुणाचा अपमान करू शकणार नाही. आईबहिणीवरून कुणाला शिव्या देता येणार नाही. कोणत्याही स्त्रीला ब्लॅकमेल करता येणार नाही. मी जवालेचा मुलगा आहे. माझे नाव सत्यकाम आहे. असे सांगण्याचा कुण्या मुलाला संकोच होणार नाही. बापाचे नाव सांगितलेच पाहिजे अशी कुणावर सक्ती होणार नाही. वारशाचे कायदे थोडे बदलावे लागतील. त्याविषयी अधिक विचार करावा लागेल. आपोआपच समान नागरी कायदा अमलात येईल. पुरुषांना हुंडा मागता येणार नाही. त्यासाठी हुंडाबळीची किंवा जळिताची प्रकरणे होणार नाहीत.
आपली बहुतेक सारी कुटुंबे पूर्वीसारखीच राहतील. क्वचित काही कुटुंबांमध्ये एका जोडण्यापेक्षा अधिक स्त्री पुरुष राहिले तर ते आजच्या पुनर्विवाहित जोडप्यांसारखे कुठल्याही लांच्छनाशिवाय, उजळ माथ्याने, राहतील. आणि मुख्य म्हणजे भयग्रस्त स्त्रिया नेहमीसाठी भयमुक्त होतील.
स्त्रियांना स्वायत्तता मिळवून देण्यासाठी आपल्याला जे जे करता येण्यासारखे आहे ते ते आपण केले पाहिजे. मी त्यासाठी आजचे एकपतिपत्नीकत्वाचे जे कायदे आहेत ते रद्द करावे ह्यापासून आपल्या ह्या कार्याला सुरुवात करावी असे सुचवितो. किमानपक्षी विवाहविषयक कायद्यांचे पुनरवलोकन आम्ही ताबडतोब सुरू करण्याची गरज आहे.
आपण आणखी कोणकोणते उपाय सुचवता?

(दिवाकर मोहनींनी नागपूरला एका सभेमध्ये वाचलेला निबंध. त्यावर आलेलें उत्तर पुढील पानावर. मोहनींचें उत्तराला. प्रत्युत्तर पुढच्या अंकामध्ये —-संपादक)
‘अक्करमाशी’च्या निमित्ताने संजीवनी केळकर
शरणकुमार लिंबाळे यांच्या आत्मचरित्राबद्दल समीक्षा, चर्चा व्हावी म्हणून श्री. दिवाकर मोहनी त्यांनी ‘सामाजिक प्र न कसा सोडवावा’ याबद्दल आपले मत व्यक्त केले. ‘अक्करमाशी’ म्हणजे बापाचे नाव उघडपणे वापरू न शकणारी प्रजा —- किंवा ‘अनौरस संतती’. यात त्या संततीचा यत्किंचितही दोष नसताना समाज त्यांच्यावर अन्याय करतो, त्यांना हिणवतो, त्यांनाच गौण ठरवतो. त्यासाठी या समाजाची मानसिकता बदलणे अगत्याचे आहे. आपण ती कशी काय बदलू शकू–याबद्दल श्री. मोहनींनी आपले विचार व्यक्त केले. परंतु ते विचार सर्वांकडे व्यवस्थित पोचले नाहीत — भरकटत गेले असे मला वाटते.
‘अशा संततीला सर्व समाजाने पोसावे’ असा विचार एका सद्गृहस्थांनी मांडला. हे काही एवढ्या मोठ्या प्र नाचे उत्तर होऊ शकत नाही. आणि त्यामुळे कुठलेच कोडे सुटू शकत नाही. स्त्री स्वातंत्र्य व योनिशुचिता यावरही विचार मांडले गेले. परंतु ते विचार मुख्य ‘अक्करमाशी’च्या प्र नाला सोडवण्याऐवजी भलतीकडेच गेल्याने मुख्य प्र नाला बगल दिली गेली. स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे थोडक्यात कुणावरही प्रेम करून कसेही ‘अंगवस्त्र’ बाळगण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने मूळ अनौरस संततीचा प्र न कसा काय सुटू शकेल हे मला कळत नाही. सुशिक्षित समाजात आज पुनर्विवाह, विधवाविवाह घटस्फोटानंतर विवाह वगैरे नियमित होत असतांना हे प्र न तिथे थोडे गौण ठरतात. कुटुंबसंस्था टिकवून ठेवायची असेल तर स्त्री व पुरुष या दोघांनीही विवाहबंधनातले पावित्र्य राखले तरच हे शक्य होते. अन्यथा कुणा एकालाही सूट मिळाली (उदा. पुरुषाला) तर ‘अक्करमाशी’ जन्माला येणे क्रमप्राप्त आहे. जोपर्यंत वेश्याव्यवसाय सुरू राहील खुला वा छुपा, व जोपर्यंत पुरुषवर्ग वेश्येकडे जाणे थांबवणार नाही, नैसर्गिक कामप्रेरणांचे योग्य प्रकारे उन्नयन करणार नाही, तोपर्यंत फक्त एड्सच कशाला, इतरही लैंगिक व गुप्तरोग वाढत व पसरतच जाणार, केवळ स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य मिळाल्याने असे होईल असे म्हणणे बरोबर नाही. पुन्हा ‘अक्करमाशी’ हे अत्यंत प्रांजळ, प्रामाणिकपणे लिहिलेले आत्मचरित्र आहे. त्यात फक्त भोगलेल्या दुःखांचे, यातनांचे, भावनिक खच्चीकरणाचे प्रासंगिक वर्णन आहे. अतिशय सच्चे. कुणावरही कोरडे न ओढता, टीका न करता, कटुपणा न येता व काहीही न लपवता लिहिलेले, स्वतःचे गुणवर्णन न गाता लिहिलेले ‘जसेच्या तसे आत्मचरित्र!
लहानपणापासून भोगलेले कष्ट, दारिद्र्य हेटाळणी, खऱ्या आईपासून सावत्र आईसारखी मिळालेली वागणूक हे सर्व असूनही कोणत्या संस्कारातून शरणकुमार एवढे पी. एच. डी. झाले? लेखक झाले?
महार असूनही ‘अक्करमाशी’ म्हणून ‘बारमाशी’ महारांनी हिणवले गेलेले लिंबाळे. प्रत्येक मनुष्याची आपल्याहून कमी असणाऱ्याला गौण लेखण्याची ही वृत्ती काय सांगते? येथे तर जात एकच होती ना?
तेव्हा ‘अक्करमाशी’ आपल्याला एक मोठा धक्का देते तो सांकेतिक समजुतींना.
१. बापाचे नाव लावू न देता जगणारा, समाजाची हेटाळणी सहन करता करता जगणारा, जन्मल्यापासून शिक्षण होईपर्यंत सततच अत्यंत वाईट संस्काराचे बाळकडू मिळालेला (त्यात व्यभिचार चोऱ्या, दारू, खोटे बोलणे, शाळा चुकवणे) असा हा शरणकुमार — कोणत्या गोष्टींमुळे प्रामाणिक, ज्ञानी, कष्टाळू व हिम्मतवान असा लेखक झाला? आईचे प्रेम, वडिलांचे छत्र, दोघांचे पांडित्य किंवा कौशल्य मनाला जपणे, यातले काय मिळाले त्याला?
२. पुरुषांची मानसिकता बदलणे शक्य आहे काय? त्यांचे वेश्येकडे जाणे हेही बरेचदा गृहीत धरले जाते. दाचे किंवा सिगरेटचे व्यसनही गृहीत धरले जाते. नैसर्गिक कामप्रेरणांचे उन्नयन करणे किंवा संयम ठेवणे हे मुलीला– स्त्रीला शिकवले जाते तसे मुलाला किंवा पुरुषाला शिकवणे काय कठीण आहे ? ‘मर्यादा’ दोघांनाही नको का?
‘धर्मे च अर्थे च कामे च — नातिचरामि’ ही विवाह-विधीनंतर फक्त पुरुषानेच घेण्याची शपथ कुणासाठी?
बाबा आमटे म्हणतात त्याप्रमाणे —-
‘आपले भोग व त्याग यात निवडीचे हे स्वातंत्र्य समतोल ढळू न देता साधणे हीच खरी नीतिमत्ता आहे.’ ‘शुक्रबीज आणि रजापिंड (स्त्रीबीज) यांच्या आंधळ्या टक्करीने नको असता लादले जाणारे मातृत्व अथवा पितृत्व ही माणसाची गुलामी आहे.’ ही आंधळी टक्कर असते हे लक्षात घेणे गरजेचे, असे ते म्हणतात.
३. गर्भवती मातेच्या अपार सोसण्याला, तिच्या वेदनांना, तिच्या कुशीला आपल्या पुरुषप्रधान समाजात खरे तर काहीच किंमत नाही. कशाला पाहिजेच बापाचे नाव? त्याचा आग्रह कशासाठी? आई आहे ना १०० टक्के त्याच बाळाची? तिला कुठे गरज आहे आपल्या नावाची? जर वडिलांचे नाव विचारण्याचा सोस थांबवला तर ‘अनौरस’ कोण होईल? त्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. प्रचंड शिक्षणाची गरज आहे. समाजसुधारणेची गरज आहे.
४. संततिनियमनाच्या साधनांचा योग्य वापर होणे हेही तितकेच जरुरी. नको असलेली संतती निर्माण होणेच थांबेल. इथेही, शिक्षण जस्स्रीचे. ‘मसाई’ ला यातले काहीच मिळाले नाही.
५. ‘मसाई’ सारखी असहाय स्त्री आणि अशाच हजारो लाखो स्त्रिया ज्यांना गुजराण करण्याची कोणतीच कला किंवा शिक्षण नाही त्यांनी जगण्यासाठी कुणाच्या तरी आश्रयाला येणे व त्यानुसार वागणे हे क्रमप्राप्त होते. इथे दोघांची गरज भागते आहे. जबरदस्तीचा मामला नाही. ‘मसाई’ चा नाईलाज आहे. तरीही त्या नाइलाजाबरोबरच निष्ठा आणि प्रेमही आहे. मग मुलींचे विवाहदेखील जबाबदारीने केले जातात.
६. स्त्रियांना समानतेचा दर्जा मिळणे, पुरुषांची मानसिकता बदलवणे (वर्चस्वाची आस), स्त्रीला सन्मानाने वागणूक मिळणे, वडिलांचे नाव लावण्याचा आग्रह नसणे, गरज नसणे. या गोष्टींसाठी प्रयत्न करण्याची आज जरुरी आहे. स्त्रीचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलण्याची फार गरज आहे. आधी माणूस समजणे व मग स्वतःला वस्तू, उपभोग्य न मानणे हे गरजेचे. त्यासाठी स्त्रीचाच आत्मसन्मान वाढवण्याचा प्रयत्न होणेही तेवढेच जरुरी. ते शिक्षणानेच साध्य होईल. ‘पुनर्नवा’ रामदासपेठ, नागपूर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.