पत्रसंवाद

भ. पां. पाटणकर
३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
श्री. संपादक, आ. सु., यांस सप्रेम नमस्कार
आ. सु.चा सप्टेंबर २००० चा अंक बुद्धिवाद-विवेकवादाच्या अनेक अंगांना स्पर्श करून गेला आहे. पण विषय मोठा आहे आणि चर्चा त्रोटक आहे. अर्थात फार लांबलचक चर्चा कंटाळवाणी होते हेही खरे. पण त्रोटक चर्चेत अपूर्णताही पुष्कळ राहते.

प्रथम श्री. दप्तरीचेच विचार घेऊ. धर्म परिवर्तनीय आहे असे मानणे ही ऐतिहासिक पद्धत असल्याचे संपादकांनी म्हटले आहे. त्याने काय सूचित होते हे कळले नाही. ऐतिहासिक पद्धत याचा एवढाच अर्थ असायला पाहिजे की वेळो-वेळी काय वस्तुस्थिती होती याची नोंद घेणे. अशी नोंद घेतली तर असे दिसते की हिंदू धर्मात पुनर्जन्म आणि कर्मविपाक अशा दोन मूलभूत कल्पना आहेत. त्या बुद्धिगम्य मुळीच नाहीत. तेव्हा हिंदू धर्म बुद्धिगम्य असल्याचे श्री. दप्तरी म्हणतात ते पटण्यासारखे नाही. तर्काने अशी बुद्धिगम्यता सिद्ध करण्याचा प्रयत्न सर्व धर्मीयांमध्ये होतो. त्याने फक्त बुद्धिवादाची महत्ता सिद्ध होते. धर्माची बुद्धिगम्यता सिद्ध होत नाही. श्री. हलदुले वेगळेच काही म्हणतात. भौतिक शास्त्रे बुद्धीवर आधारलेली असली तरी “शास्त्रानेच आम्हाला कुठल्याही क्षेत्रात अंतिम सत्यापासून दूर ठेवले आहे” या प्रतिपादनात मला तीन चुका दिसतात पहिली म्हणजे ज्या अर्थाने तत्त्वज्ञान अंतिम सत्याविषयी चिंतन करून, ब्रह्म, पुरुष-प्रकृती किंवा ‘the word was God’ अशी अंतिम सत्ये रेखाटते त्या अर्थाने अंतिम सत्याचा शोध शास्त्र घेत नसते. आपल्याला ज्या अनेक घटना घडताना दिसतात त्या सर्वांची संगती एकाच नियमवाक्याने लावता येईल का याच्या म्हणजे Unified Theory च्या शोधात शास्त्र आहे. असे नियमवाक्य मिळणे अधिकाधिक कठीण होत आहे असे काही शास्त्रज्ञही म्हणतात. पण त्याचे कारण हे नव्हे की अगणित ‘गृहीतकृत्यांवर’ प्रयोग करण्याची आपली क्षमता वाढली आहे. खरे कारण हे आहे की पूर्वीच्या गृहीतकृत्यांशी न जुळणाऱ्या घटनाच आपल्या नजरेस पडत आहेत. Richard Patterson यांनी म्हटल्याप्रमाणे “The world has opened up and it isn’t behaving as it ought to, as predicted”. आपल्याला अशा नवनवीन घटना ‘प्रयोगांतून’ मिळत असतील पण हे प्रयोग खूपशी गृहीततत्त्वे कल्पून ती तपासण्यासाठी केलेले नसतात. श्री. हलदुले यांच्या विधानातली तिसरी चूक म्हणजे आपण अंतिम सत्यापासून दूर जात आहोत हे म्हणणे. वस्तुतः विश्वाचे बहु-आयामी सत्य आपल्याला जास्त जास्त समजत आहे, आपण ते यशस्वी व्यवहारात उतरवत आहोत. त्या बहु-आयामी सत्याचे एक-सूत्री वर्णन करणे कठीण जात आहे इतकेच. धर्म हा बुद्धिगम्य नसतो आणि शास्त्रे ‘अंतिम सत्य’ नावाच्या कृत्यापर्यंत पोचवत नाहीत असा हा तिढा आहे. या तिढ्यातूनच बुद्धिवाद किंवा विवेकवादाच्या मर्यादा दिसून येतात. ‘अंतिम सत्याची’ कल्पना हवीच कशाला असे विचारता येईल व मग व्यवहारोपयोगी बुद्धिवादाचे एकछत्री साम्राज्य स्थापन होईल. पण मनुष्यस्वभा-वात ते बसत नाही. बुद्धिवादापलीकडे असणारे काहीतरी त्याला आकर्षत असते.

आ. सु. च्या जुलै-ऑगस्ट २००० च्या अंकांतील संपादकीय प्रतिपादनां-तून हे स्पष्ट होते की विधानांची सत्यता (म्हणजे केवळ औपपत्तिक सुसंगती) आणि कर्माची नैतिकता हे ठरवण्यापुरतेच विवेकवादाचे कार्य मर्यादित आहे. सुंदर काय हे विवेकवादाने ठरत नसते. समाजाच्या सुखातच माझे सुख आहे हे नीतिशास्त्राचे वाक्य बुद्धिगम्य आहे, बरोबर आहे, पण पुरेसे नाही. कारण मुळात सुख हे माणसांच्या ऊर्मीवर आधारलेले आहे, विवेकवादावर नाही. नीतिशास्त्र ‘नियमानुसार चाला’ असे सांगू शकते. पण या वाक्यात किती शुष्कता आहे, आनंदाचा किती अभाव आहे हे रवींद्रनाथ टागोरांनी ‘ताशेर देश’ (पत्त्यांचा देश) या नाटकात छान दाखवले आहे. तेव्हा जीवनात सुंदर काय आहे असा एक प्र न आहे जो विवेकवादाच्या बाहेरचा आहे. मी सुख या शब्दाऐवजी सौंदर्य असा शब्द वापरतो कारण त्यात स्वतःचा आनंदही येतो आणि इतरांनी दिलेली दादही येते. म्हणजे इतरांनाही सुख-कारक असणे त्यात अनुस्यूत आहे. सौंदर्य हा शब्द कलाक्षेत्रात जास्त येतो. कले-विषयी बोलताना Graham Green म्हणतो : “Great works of art enable us to understand what it is to be a human being, not as physiology and psychology do (ही शास्त्रे झाली) but by providing images which illuminate our experience.” (ही मिथके झाली). या मिथकांतून संस्कृतीचा एक वेगळा पदर निर्माण होतो. जीवनमूल्यांचा, चालीरीतींचा. संस्कृतीचे जे विवेकप्रधान पदर आहेत-शास्त्रे आणि समाजाची legal-rational बांधणी (समाजशास्त्रज्ञ Max Weber याने स्ढ केलेला शब्द)—-त्यांनी समाजाचे व्यवहार चालतात. संस्कृतीच्या तिसऱ्या पदराने जीवनाला सौंदर्य आणि मूल्य प्राप्त होते. हे तिन्ही पदर एकमेकांशी विसंगत होता कामा नये हे खरे. त्याप्रमाणे मिथकांचे सतत नवीनीकरण होत असते व व्हायला पाहिजे. म्हणजे असे की पाचशे किंवा हजार वर्षांपूर्वी मानवाला जे ज्ञान होते त्याच्याशी विसंगत नसतील अशी मिथके त्यांनी रचली. आजची आपली मिथके आजच्या ज्ञानाशी सुसंगत असावी लागतील. ज्ञान जोपर्यंत अपूर्ण आहे तोपर्यंत मिथके राहतीलच. पण अशी मिथके अंधश्रद्धेच्या स्वरूपाची असणार नाहीत.

अशास्त्रीय ठरलेल्या मिथकांनी समाजाचे जितके नुकसान होत आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान इतिहासाच्या नावाने पुढे येणाऱ्या मिथकांमुळे होत आहे. आपल्या संस्कृतीचा गौरव करणे इतरांच्या संस्कृतीला हीन ठरवणे, आपल्याला सोईचे ऐतिहासिक निष्कर्ष काढणे आणि ते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणे, लहान मुलांच्या मनात ते भरवणे याने किती सामाजिक संघर्ष निर्माण होत आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या घातक मिथकांच्या प्रसाराला आळा कसा घालायचा हा आज एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यात विवेकवाद्यांची शक्ती खर्च होणे जास्त इष्ट आहे, नाही का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.