आम्ही खंबीर आहोत

अनौरस मुलांचा कैवार घ्यावयाचा म्हणून त्यांना बापाचे नाव लावता येत नाही म्हणून कोणीच ते लावले नाही म्हणजे प्रश्न सुटला असे डॉ. संजीवनी केळकरांना वाटत असावे. मला मात्र वेगळे वाटते. मला त्या निरागस मुलांच्या मातांचा कैवार घेण्याची गरज वाटते. त्यांच्याकडे क्षमाशील दृष्टीने पाहावेसे वाटते. त्यांचे आचरण मला निंद्य वाटत नाही. त्या मातांचे आचरण सध्याच्या तथाकथित उच्चवर्णीयांच्या मूल्यव्यवस्थेच्या विरुद्ध आहे एवढाच त्यांचा अपराध मला वाटतो. मला सध्याची मूल्यव्यवस्था मान्य नाही. ती कायमची नष्ट केली पाहिजे असे विचार अलीकडे माझ्या मनात येत आहेत.

आजची मूल्यव्यवस्था – स्त्रीपुरुषविषयक नीती – ही पुरुषांना झुकते माप देणारी आहे. पण ती तेवढेच करीत असती तरी मी ती एकवेळ मानली असती पण ती स्त्रियांना पुरुषांच्या गुलामगिरीत ढकलणारी आहे; पुरुषांचे स्त्रियांवरचे स्वामित्व सिद्ध करणारीच नाही तर त्या स्वामित्वाचे शाश्वतीकरण करणारी आहे असे माझे मत झाले आहे. का ते पुढे सांगतो.

विवाहित स्त्रीच्या ठिकाणी निर्माण होणारी प्रजा तिच्या पतीचीच असावयाला हवी असते. तेवढ्यासाठीच तर तिचे लग्न व्हावे लागते. लग्न लागले की तिच्या शरीराची मालकी तिच्या पतीची होते. तोपर्यंत ती आपल्या मालकाची वाट पाहत असते. तिच्या शरीराचा स्वामी कोणीतरी पुरुष होणार हे तिला बाळपणापासून माहीत असते – फक्त तो कोणता पुरुष हे विवाहाने ठरते. एकदा विवाह झाला की त्या पुरुषाची मालकी तिला कशानेही पुसता येत नाही. एक जरा कठोर उदाहरण सुचले – त्याबद्दल आधीच माफी मागतो – जनावरावर जसा मालकाने डाग द्यावा, आपल्या नावाची अक्षरे त्या जनावराची चामडी जाळून कायमची तेथे उमटवावी आणि त्या जनावराने मरेपर्यंत ती अंगावर वागवावी तशी त्या पुरुषाच्या मालकीची चिन्हे तिने आयुष्यभर वागवावयाची असतात. नवरा मेल्यानंतर पुढच्या जन्मापर्यंत तिने त्याची मालकी झुगारावयाची नसते. आता क्वचित् ती दुसऱ्या नवऱ्याची कामना करू शकते पण असे करणाऱ्या स्त्रीच्या ठिकाणी वैगुण्य येते. तिची सामाजिक प्रतिष्ठा घसरते. जन्मोजन्मी एकाच पतीची कामना करणे हेच तिचे कर्तव्य असल्यामुळे; दुसऱ्या पुरुषाचा विचार मनात आणणे हे मोठे पाप आहे असा संस्कार तिच्या मनावर असल्यामुळे तो पती तिचा खरोखरचाच मालक होतो. तिची स्वतःची इच्छा असो वा नसो, त्याच्या वासनेला तिला बळी पडावे लागते. त्याने केलेला अपमान, त्याने केलेली शिवीगाळ तिला सोसावी लागते. त्याने मारझोड केली तरी तिला कोठेही तक्रार करता येत नाही. निदान तिने तक्रार करू नये अशी आणि तिने तक्रार केली तरी नवराबायकोच्या भानगडीत दुसऱ्याने पडू नये अशीच समाजाची सगळ्यांना शिकवण असते.

ह्या आपल्या मूल्यव्यवस्थेला आम्ही आदर्श मानून चाललो आहोत असे जेव्हा मला दिसते तेव्हा स्त्रियांचे स्थान आमच्या समाजात किती नीच आहे हे जाणवल्यामुळे मी बेचैन होतो. विवाहसंस्काराला मान्यता म्हणजे ह्या साऱ्या मूल्यव्यवस्थेला मान्यता दिल्यासारखे होते – औरस-अनौरस अशा मुलांच्या वर्गवारीला मान्यता दिल्यासारखे होते – हे आपल्या येथे कोणाच्याच लक्षात येत नाही हे माझ्या मनाला खुपते. स्त्रियांची सध्याची स्थिती न बदलता डॉ. संजीवनी केळकर फक्त अनौरस मुलांची बदलू पाहत आहेत. माझा आग्रह त्यांच्या उलट, स्त्रीमुक्तीसाठी लैंगिक स्वातंत्र्याचा आहे. माझे म्हणणे जर समाजाने स्वीकारले तर अनौरस अपत्यांचा प्रश्न आपोआप सुटेल असे मला वाटते.

डॉ. केळकरांना वाटत असावे की सगळे विवाह काही अयशस्वी होत नाहीत. विवाहाचे पर्यवसान दुःखातच होते असे नाही. त्यातून मध्यमवर्गीय स्त्रियांची स्थिती अलीकडे पुष्कळ सुधारली आहे. काही तरुण नवरे त्यांच्या बायकांना पाटपाणी करायला मदत करीत आहेत. असे सारे असताना लैंगिक स्वातंत्र्याचा आधी आणि अनौरस संततीचा नंतर असा प्रश्नांचा क्रम लावण्याची गरज नाही. त्यावर उत्तरादाखल मला एवढेच सांगावेसे वाटते की मला सर्व विवाह सुखपर्यवसायी होतील अशी आपली समाजरचना हवी आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे असे की आम्ही आमच्या स्त्रियांना अधिक आदराने वागविले पाहिजे. त्यांच्या निर्णयशक्तीचा आदर केला पाहिजे. ह्या निर्णयशक्तीमध्ये त्यांचे यौन-आचरणही आले. मुद्दा सर्वांच्या सुखाचा तर आहेच पण शिवाय तो सर्वसाधारण स्त्रियांना गौरवाने वागविण्याचा आहे. त्यांच्या प्रतिष्ठेचा (dignity) आहे. इतकी प्रस्तावना करून आता त्यांच्या काही वाक्यांकडे वळतो.

‘अक्करमाशीच्या प्रश्नाला सोडविण्याऐवजी मोहनीचे विचार भलतीकडेच गेल्यामुळे मुख्य प्रश्नाला बगल दिली गेली’ असे त्या म्हणतात. मला त्याविषयी एवढेच वाटते की त्याच मुख्य प्रश्नाला बगल देत आहेत. कारण त्या नदीच्या किनाऱ्यावर जेमतेम घोटाभर पाण्यात उभ्या आहेत तर मी ऐन प्रवाहात जाऊन त्याच्या विरुद्ध दिशेने पोहत आहे. मला त्यांची सहानुभूती तर राहोच त्यांचा विरोध सोसावा लागत आहे. मी सर्व स्त्रियांच्या कल्याणाची – त्यांच्या हक्कांची – गोष्ट करीत आहे तरी माझी सूचना त्यांच्या सुसंस्कृतपणाच्या विरोधी असल्यामुळे ती त्यांना नको आहे.

अनौरस संततीला औरस संततीचा दर्जा कसा मिळवून द्यावयाचा हा मुख्य प्रश्न आहे असे मी समजतो, तर त्या अनौरस संतती निर्माण होऊ नये असे इच्छाचिंतन (wishful thinking) करीत आहेत. मी ते घडणारच असे गृहीत धरून चाललो आहे. औरस-अनौरस हा भेद मानवनिर्मित आहे, कृत्रिम आहे. ही वर्गवारी जगात सर्वत्र नाही. लग्नापूर्वी गर्भधारणा झाल्याशिवाय मुलीचे लग्नच होत नाही अशा जमाती कोठेकोठे आहेत. साहजिकच लग्नापूर्वीच गर्भधारणा तेथे गौरवास्पद आहे. अशा जमातींत बहुधा स्त्रियांची मालकी पुरुषांकडे असते, त्यांना होणारी मुले त्यांची ‘समजली’ जातात, म्हणजे स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य असते व त्यांना होणारी मुले कोणापासूनही होऊ शकतात. तेथे कन्याविक्रयाची प्रथा आहे. वर गाई-म्हशी, कापडचोपड वधूच्या बापाला देऊन विकत घेतो तरी तिला स्वातंत्र्य, आणि आपल्याकडे वधूच्या बापाने वरदक्षिणा मोजूनसुद्धा येथल्या स्त्रिया पुरुषांच्या सर्वतोपरी गुलाम! सारा संस्कारांचा परिणाम!

आपल्या येथे पुरुषांची स्त्रियांवरची मालकी अनेक समाजमान्य रूढींतून दिसून येते. विवाहानंतर एकट्या स्त्रीचेच नाव आणि आडनाव बदलणे, ती पतीच्या गोत्राची होणार म्हणून तिच्यासाठी सोयरसुतकाचे नियम वेगळे ठेवणे, तिच्या प्रत्येक अपत्याला बापाचे नाव लावावे लागणे ही त्याची काही उदाहरणे आहेत. ह्या प्रथा काही जातीजमातींमधून वेगवेगळ्या असल्या तरी आपल्या एकूण भारतीय समाजात स्त्रियांच्या शरीरावरचा पुरुषांचा अधिकार कमी होत नाही. जात जितकी वरची, ‘सुसंस्कृत’, तितके स्त्रीचे स्थान खालचे. पुरुषांच्या अधिकारांची जाणीव आम्हा मंडळींच्या मनात खोल स्तून बसली आहे. मला त्या जाणिवेला काढून फेकून द्यावयाचे आहे. मी जाणीव हा शब्द वापरला खरा पण आमच्या मनांमधला तो जो भाव आहे तो व्यक्त जाणिवेच्या पातळीवरचा नाही. ती नेणीवही नाही. त्याला उपबोध म्हणता येईल. एखाद्याला औरस, कोणाला अनौरस समजणे आणि त्याच्या जन्मावरून त्याला जात चिकटविणे ह्यांत काही फरक नाही. हा उपबोध भोवतालच्या परिस्थितीतून माणूस ग्रहण करतो. त्यामुळेच त्याला हटविणे फार दुष्कर होऊन बसले आहे.

मी महिलांना त्यांच्या अधिकाराची, हक्काची जाणीव करून देण्याचा यत्न करतो. विवाहसंस्थेला मान्यता दिल्यामुळे स्त्रियांचा पुरुषाला नाही म्हणण्याचा अधिकार त्या गमावतात असे मला वाटते. पुरुषावर आज सामाजिक बंधने अगदी कमी आहेत. सध्याच्या महिलांच्या स्थितीवर उपाय म्हणून पुरुषांवर ती घालणे चूक आहे. ही बंधने समर्थनीय नाहीत कारण त्यांच्यामुळे समाजातले सुख वाढत नाही; उलट स्त्रियाही पुरुषांच्या आयुष्यात अपार दुःख निर्माण करू शकतात, करतात. शिवाय ती बंधने पूर्णपणे कृत्रिम असून ती सर्व पुरुषांना कधीही पाळता आलेली नाहीत. त्या बाबतीतले त्यांचे उन्नयन करण्याचे प्रयत्न विफल झाले आहेत. कामप्रेरणा ही अत्यन्त बलवती सहजप्रेरणा असून तिचे दमन अशक्य आहे असा माझा समज आहे. दमन करण्याच्या प्रयत्नामुळे समाजामधला ढोंगीपणाच वाढला आहे असे नाही तर लैंगिक रोगांचे प्रमाण वाढले आहे. अलीकडे ह्या विषयाची माहिती असलेल्या एका डॉक्टरांशी बोलत होतो तेव्हा ते म्हणाले, “विवाहाचे वय खाली घसरविले तर तशा रोगांचे प्रमाण एकदम निम्म्याने कमी होईल.” नैसर्गिक कामप्रेरणांचे उन्नयन कसे करावयाचे त्याची रीत डॉ. केळकरांनी समजावून द्यावी अशी त्यांना माझी विनंती आहे. १९९१ च्या जनगणनेप्रमाणे आमच्या देशात १००० पुरुषांमागे ९२७ स्त्रिया आहेत. मोठ्या शहरांतून ते प्रमाण १०००:८५० पर्यंत कमी आहे. अशा स्थितीत प्रत्येक पुरुषाला स्त्रीसहवास मिळणे अशक्यच आहे.

डॉ. केळकर एका ठिकाणी म्हणतात, ‘नैसर्गिक कामप्रेरणांचे उन्नयन करणे किंवा संयम ठेवणे हे मुलीला, स्त्रीला शिकविले जाते तसे मुलाला किंवा पुरुषाला शिकविणे काय कठीण आहे? मर्यादा दोघांनाही नको का?’ हे त्यांचे म्हणणे मला पटत नाही कारण मी भारतीय संस्कृतीचा अभिमानी नाही. गुजरातमध्ये तसेच मुंबईत नवरात्रामध्ये निरोधचा खप एकदम वाढतो. इतकेच नाही तर त्यानंतरच्या दोन तीन महिन्यांत गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांची प्रॅक्टिस वाढते अशा बातम्या वाचल्यानंतर माझा आमच्या संस्कृतीचा, नीतिमूल्यांच्या शिक्षणाविषयीचा अभिमान गळून पडतो. पुरुषांना नसलेले जननिंदेचे प्रचंड भय असून आमच्या तरुण कुमारिका रासगरबा खेळल्यानंतर आपल्याला आवरू शकत नाहीत हे मला समजते. मला अशा तरुणींबद्दल सहानुभूती वाटते. त्यांचे उन्नयन झालेले नाही हे मला कळते. ज्या मुली शहाण्यासारख्या वागतात त्या तश्या वागल्या नाहीत तर त्यांचे हाल कुत्रा खाणार नाही हे चांगल्या प्रकारे समजून असल्यामुळे वागतात. त्यांचे शहाणपण स्वेच्छेने किती आणि समाजाच्या दडपणामुळे किती असा मला प्रश्न पडतो. सध्याच्या कुटुंबापेक्षा अधिक सुखी कुटुंबे एकतर कोणी पाहिली नाहीत. कधी अशी दिसली तर आपल्या पवित्र धर्माच्या, आपल्या उच्च संस्कृतीच्या अभिमानामुळे आपल्यापेक्षा जास्त सुखी कुटुंबाकडे सारे तुच्छतेने पाहतात.

माझ्या सूचना मूल्यपरिवर्तनासाठी आहेत. माझ्या लेखांचे वाचक आणि सभेमधले श्रोते मूल्यपरिवर्तन झाल्यानंतरच्या समाजाची कल्पना करू न शकल्यामुळे आपल्या निकटवर्तीयांनी लोकविरुद्ध आचरण केल्यामुळे त्यांच्यावर जी संकटपरंपरा कोसळेल तिला घाबरून माझ्या सूचनांना प्राणपणाने विरोध करतात! जेथे स्त्रीपुरुष आपल्या जोडीदारांकडे अधिक उदारपणे पाहतात तेथली कुटुंबे साधारणतया एकपतिपत्नीक कुटुंबांपेक्षा अधिक सुखी आहेत. आपल्या भारतात सगळेच लोक बापाचे नाव लिहीत नाहीत. चक्रवर्ती राजगोपालाचार्य त्याचप्रमाणे राजेन्द्रप्रसाद, आपले पहिले गव्हर्नर जनरल आणि पहिले राष्ट्रपती ह्यांच्या वडिलांचे नाव मला माहीत नाही. रोजच्या वापरात वडिलांचे नाव न वापरल्याने अनौरस संततीचे लांच्छन कमी कसे होईल ते मला कळत नाही. असो. डॉ. केळकरांच्या बाकीच्या विधानांचा परामर्श घेण्याचे कारण मला दिसत नाही. त्यांच्या पत्राच्या निमित्ताने आणखी थोडे विचार मांडतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या मनावर झालेल्या संस्कारांचा आहे. माझे म्हणणे काही महिलांना पटले तरी त्या आजपर्यंत ज्या परिस्थितीत राहत आहेत त्या परिस्थितीत आणि मला अभिप्रेत असलेल्या भविष्यकालीन परिस्थितीत महदंतर आहे. महिलांना आजपर्यंत एका पुरुषाच्या वर्चस्वाखाली राहण्याची सवय झालेली आहे. हा पुरुष संधी मिळताच त्यांना ओरबाडावयाला निघालेल्या बाहेरच्या लांडग्यांपासून त्यांचे रक्षण करतो. तो एका वेळी एकटाच असतो. बाल्यावस्थेत पिता, युवावस्थेत पती आणि वार्धक्यात पुत्र त्यांचा त्राता असतो. असे रक्षण करणाऱ्या त्या पुरुषाच्या त्या कायमच्या उपकृत असतात. त्यांच्या मनाची घडण एकाच पुरुषाच्या ठिकाणी निष्ठा ठेवण्यास अनुकूल अशी झालेली आहे. बहुपतिपत्नीक कुटुंबामध्ये अशी निष्ठा अनेकांच्या ठिकाणी ठेवावी लागेल, अनेकांकडून सुरक्षितता मिळवावी लागेल. ते आजच्या महिलांना साधणार नाही आणि त्यांना सतत किंवा कायमचे असुरक्षित वाटेल अशी शक्यता आहे. त्यावरही आम्हाला उपाय शोधावे लागतील. आमची समाजरचना ‘एक विरुद्ध अनेक’ अशी आहे. येथे प्रत्येकाने एकेकट्याने परिस्थितीशी झगडून आपला घास घेण्यास टपलेल्यांपासून आपले रक्षण करावयाचे एवढेच नाही तर दुसऱ्याचा पराभव करावयाचा, जमल्यास त्याचा घास घेऊन आपली उपजीविका करावयाची आहे. आमच्या समाजास परस्परावलंबन माहीत नाही. येथे परस्परसहकार्यही फार थोडे आहे. ‘जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेंचि कष्टत गेला तोचि भला’ ह्या समर्थवचनावर आमची श्रद्धा आहे. घराबाहेरच्या जगावर तर सोडाच, पण एकाच घरात राहणारे पितापुत्र, पतिपत्नी, मातापुत्री ह्यांनाही एकमेकांची खात्री नाही. सारे जीवन संशयावर, दुटप्पीपणावर आधारलेले आहे. अशा ह्या परस्परांवरील अविश्वासाच्या वातावरणातून आम्हाला परस्परांवरील विश्वासाच्या वातावरणात जावयाचे आहे. युरोपातल्या स्कँडिनेव्हियन देशांत सर्वांत जास्त परस्परविश्वासावर जीवन आधारलेले आहे. अन्यत्र त्यापेक्षा कमी. आणि आपल्या जातीपातींनी, धर्मांनी, भाषांनी विभागलेल्या देशात एकमेकांविषयी सगळ्यांत जास्त अविश्वास आहे असे मला वाटते. बहुपतिपत्नीक कुटुंबे कशासाठी तर सगळ्यांना सारखेपणाने वागविण्यासाठी. एकमेकांमधले ‘न्यून’ पुरते करण्यासाठी. आंधळ्या-पांगळ्यांची जोडी जमविण्यासाठी. तेथे एकमेकांच्या हक्कांपेक्षा एकमेकांच्या सहकार्यावर भर राहणार आहे आणि हे सारे आम्हाला मुद्दाम घडवून आणावे लागणार आहे. ही तुम्हाआम्हा सुधारकांवर असलेली जबाबदारी आहे. आणि हे कोणाचे एकट्याचे काम नाही. इतिहासात कदाचित हे पूर्वी कधीही घडले नसेल. तरी त्या दिशेने आपणास प्रयत्न चालू ठेवावे लागतील.

मोहनीभवन धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.