पत्रसंवाद

र. द. जोशी
आजचा सुधारकच्या ११.८ या अंकात श्री. पळशीकर यांचा जो लेख आहे त्याची एक चांगली प्रतिक्रिया, श्री. देशपांडे यांची त्याच अंकात आहे. मी थोड्या वेगळ्या अंगाने पुढील प्रतिक्रिया देऊ इच्छितो.

लेखाच्या पहिल्याच वाक्यात ‘धर्म या गोष्टीचा उदय झाला’ असे जे म्हटले आहे. ते योग्य नाही. उदय फक्त देव, दैवी शक्ती व श्रद्धा यांचा झाला.

भारतात धर्म या शब्दात कमीत कमी दोन तरी प्रमुख व वेगवेगळ्या संकल्पना अंतर्भूत मानायला हव्यात. एक म्हणजे देव, पितर, प्रत्यक्ष दिसणारी पंचमहाभूते यांना संतुष्ट करण्याच्या भ्रांत कल्पनांनी केली जाणारी, प्रार्थना, पूजा, व्रतवैकल्ये, होमहवन, यज्ञ इत्यादि आणि दुसरी म्हणजे विविध सामाजिक व्यवहार उदा. विवाहपद्धती, मर्तिकपद्धती, नामकरणादि संस्कार इत्यादि. या दोन्ही प्रकारच्या गोष्टी ‘हा धर्म आहे’ या भावनेने आचरिल्या जात असत. याशिवाय भारतात तरी, ब्राह्मणादि वर्णीयांचे प्रत्येकी वेगवेगळे आचार, पत्नीची कर्तव्ये, पतीची कर्तव्ये, गृहस्थाची कर्तव्ये, वगैरे शेकडो गोष्टी, पत्नीधर्म, पतिव्रताधर्म, वीरधर्म, मित्रधर्म, युद्धधर्म, राजधर्म, यतिधर्म इत्यादि ही सर्व एकाच ‘धर्म’ या संज्ञेनेच व्यक्त होत असत. थोडक्यात धर्म म्हणजे कोणा अनाकलनीय शक्तीला संतुष्ट राखण्याचा कल्पनांनी केलेले आणि समाजात रहायचे म्हणून स्वीकारलेल्या बंधनात राहून केलेले अशा दोन प्रकारच्या विचार-व्यवहारांचा समुच्चय होता. यांतील पहिले व्यवहार निसर्गविषयक अज्ञान, तज्जन्य भय वगैरेमुळे आचरिले जात व दुसरे व्यवहार निसर्गाशी संबंधित नसून, समुदायनीती समजून ठरलेले असत. धर्माची ही दोन अंगे वेगळी दाखविण्याचे कारण एवढेच की, बुद्धिप्रामाण्यवादी संपूर्ण धर्म अनिष्ट व घातक आहे असे मानीत नसून फक्त अज्ञानजन्य व्यवहार अनिष्ट व घातक आहेत असे मानतात हे स्पष्ट करावे. धर्माचे सामाजिकव्यवहारजन्य अंग घातक मानण्याचे बुद्धिप्रामाण्यवाद्यांना फारसे काही कारण नाही; कारण एक तर ते बदलत असते, कोणत्याना कोणत्या तरी स्वरूपात प्रत्यक्ष असते व असणारच व असायला हवेही. उदाहरणार्थ, पुत्र व्हावा म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ करायला, पाऊस पडावा म्हणून पर्जन्यसूक्ताचे पठण करायला, रोगनिवारणार्थ पूजा, शांति करायला बुद्धिप्रामाण्यवादी विरोधच करतील. पण प्रेत पुरावे वा जाळावे, शासनकर्त्यांनी त्या त्या काळातला राजधर्म पाळावा, जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नामकरण करावे, सैनिकांनी शिस्तीचे पालन करावे, विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा, शक्य व योग्य असेल तर ब्रह्मचर्याश्रमकर्तव्ये करावी, पतिपत्नीत प्रेम असावे इतकेच नव्हे तर खरे बोलावे, शौच (स्वच्छता) राखावे, माणसा-माणसांत सौहार्द असावे अशा हजारो, समाजकल्याणकारक गोष्टींना ते विरोध करणार नाहीत; विरोध करण्याची त्यांना आवश्यकताच नाही. पळशीकरांच्या लेखाच्या परिच्छेद दोनच्या शेवटच्या वाक्याची व्याप्ती वरील विवेचनाने कमी होते.

लेखाच्या तिसऱ्या परिच्छेदातील वर्णन सकृतदर्शनी वस्तुस्थिति-निदर्शक वाटते. पण त्या बाबतीत पुढील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

१. धर्म व धर्मसंस्था यांचा समाजजीवनावर व जनमानसावर प्रभाव व पकड वाढली असेल तर जगात लोक अधिक धार्मिक व अधिक सदाचरणी झाल्याचा अनुभव यायला पाहिजे ना? तो आलेला दिसतो काय? जगातील देशात, भारतातच भ्रष्टाचार अधिक दिसतो हे, भारतीय किंवा हिंदू म्हणविणारे अधिक सदाचरणी बनल्याचे लक्षण मानता येईल काय?

२. धर्माची पकड वाढल्याचा जो अनुभव येतो तो फक्त झुंडीच्या सामर्थ्याचा प्रभाव दिसतो त्यामुळेच.

३. मंदिरात, मठात, तीर्थक्षेत्रांत लोकांच्या ज्या झुंडी दिसतात त्याची कारणे:- अ) वाढलेली लोकसंख्या ब) प्रवासाच्या सुविधा, जाहिराती व भत्ते क) मध्यमवर्गीयांची वाढलेली उत्पन्ने ड) जीवनात आलेली निराशा व देवकृपेची खोटी आशा ही व अशीच आहेत.

४. धर्माचा वाढता प्रभाव हा केवळ, धर्म हे सत्तासंपादनाचे, धनप्राप्तीचे एक साधन बनविल्यामुळे दिसून येत आहे.

धर्मसंस्था या पदाने पळशीकर काय सुचवितात? विविध पीठांचे धर्माचार्य आणि साधू म्हणविणारांचे गट हे सूचित होत असतील तर या दोहोंचा प्रभाव जनमानसावर मुळीच वाढलेला नाही. केवल जुन्या रूढींचे पालन करू पहाणाऱ्या या दोहोंचा, धर्म शब्दाच्या खऱ्या अर्थाशी फारसा संबंध राहिलेला नाही. मठ म्हणजे जनतेच्या फसवणुकीची आगरे बनलेली आढळून येतात. धर्माचरण करून घेणारे जे उपाध्याय त्यांचा अंतर्भाव धर्मसंस्थांत होत असेल तर हे उपाध्याय म्हणजे केवळ विधींची तंत्रे जाणणारे रूढींमुळे विधींना ‘बामण’ आवश्यक ठरलेले असल्यामुळे अंधश्रद्ध जनतेकडून आमंत्रित केले जाणारे दक्षिणार्थी भिक्षुक बनले आहेत. विसाव्या शतकाच्या या अखेरच्या वर्षी धार्मिक अस्मिता अधिक कट्टर होत चालल्याचे पळशीकरांना कशात आढळले ते त्यांनी स्पष्ट करावे. मात्र या कट्टरपंथीयांचे धर्मप्रेम वाढले आहे का आणि त्यांची खरी लक्ष्ये काय आहेत याचेही निरीक्षण त्यानी नोंदवावे.

अगदी पुढच्याच परिच्छेदात, धर्म म्हणून मानल्या गेलेल्या किती गोष्टी अनावश्यक ठरल्या आहेत हे स्वतः पळशीकरानीच नोंदविले आहे. त्या परिच्छेदाचा अर्ध्याहून अधिक भाग वाचल्यावर असा भास होऊ शकेल की पळशीकर म्हणजे पूर्वाश्रमीचे दि. के. बेडेकर झाले. पण हे सर्व म्हणून भागणार नाही. जर पळशीकरांनी हे प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने प्रचार केला व हे प्रत्यक्षात आले तर त्या वेळचे बुद्धिप्रामाण्यवादी, त्यांच्या पुढच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी सहमत होऊन प्रचार करतील. निदान मी तरी त्यावेळेपर्यंत असलो व लिहू बोलू शकत राहिलो तर बेडेकरांच्या व पळशीकरांच्या बाजूने राहीन. मात्र त्यावेळी धर्म व धर्मसंस्थांचे स्वरूप कसे असेल याची कल्पना पळशीकरांनी स्पष्ट करावी अशी विनंती आहे.

‘धारणात् धर्मः’ म्हणजे “ज्या गोष्टींचा समाजाने आचारविचार केल्याने समाजाचे धारण होते म्हणजेच संपूर्ण समाजाला ऐहिक सुख, शांती, प्रगती यांचा लाभ होतो त्या गोष्टींचा समुच्चय म्हणजे धर्म’ हे मान्य केले तर बुद्धिप्रामाण्यवादीसुद्धा धर्माचे निर्मूलन होऊ नये हे मान्य करतील. कारण कोणत्याही काळी कोणत्याही परिस्थितीत समाज कोणतेतरी आचार उपयुक्त, सुखदायक मानणारच. ते आचार हाच त्या काळी धर्म मानला जाणार हे उघडच वाटते. तो धर्म पाळणे यालाच धार्मिकता म्हटले जाईल. त्यामुळे बेडेकर व म्हणून पळशीकर यांच्या, त्या परिच्छेदातील मताशी सहमत होण्यास बुद्धिप्रामाण्यवाद्यांना हरकत वाटू नये. मात्र ७ व्या परिच्छेदापासून पळशीकर जी मांडणी करतात व ती मधील जे काही बेडेकरांचे म्हणून म्हटले आहे ते सर्व कल्पनाविलास, अनाकलनीय शब्दांनी युक्त व विसंगतिपूर्णही आहे.

लेखाच्या शीर्षकापासूनच विसंगतींना प्रारंभ होतो. एखादी व्यक्ती श्रद्धेने काही कृती करते. तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात भक्ति-भावना प्रभावी झालेली असते. तिचे मन त्या भावनेने व्याप्त झालेले असते. अशीच वाक्ये क्रोध, द्वेष, प्रेम इत्यादि मनोभावनांबद्दल लिहिता येतील. यावरून श्रद्धा ही मनाची एक भावना आहे असे म्हणता येते. धर्म ही सुद्धा एका अर्थाने मनोभावना आहे. पण दुसऱ्या व्यापक अर्थाने धर्म ही भावना नसून अनेक सिद्धान्त, अनेक रुढी, अनेक नीतिनियम, अनेक आचारविचार यांचे एकत्रीकरण आहे व याच दुसऱ्या अर्थाने पळशीकरांनी लेखात धर्म हा शब्द सर्वत्र, अनेक वेळा वापरला आहे. त्यामुळे ‘धर्मप्राय श्रद्धा’ या शब्दयुग्याचा काही अर्थच लागू शकत नाही. ते युग्म विसंगतिपूर्ण वाटते. जसे, मरणप्राय म्हणजे जवळजवळ मरणाइतके, अशक्यप्राय म्हणजे जवळजवळ अशक्य असे अर्थ होतात तसा धर्मप्राय म्हणजे जवळजवळ धर्म असा काही अर्थ होत नाही आणि श्रद्धा ही एक भावना जवळजवळ धर्म होऊ शकत नाही; धर्माच्या अर्था एवढ्या व्यापक अर्थाने घेता येऊ शकत नाही. सार्थकता या शब्दाचेही दोन अर्थ होतात. श्रमाचे सार्थक यांत फल मिळणे हा अर्थ आहे. यावरून ‘सार्थकता म्हणजे फल देण्याचा गुणधर्म’ हा एक अर्थ. कृष्ण या नावाचा एखादा माणूस रंगाने काळाकभिन्न असेल तर त्याचे नाव सार्थ आहे असे म्हटले जाते. शब्दाच्या अर्थाप्रमाणे वस्तुस्थिती असणे किंवा घटना घडणे हा दुसरा अर्थ. या दोन्ही अर्थांनी, पळशीकर आपल्या लेखात श्रद्धेची सार्थकता दाखवीत नाहीत. ते जरी “श्रद्धेच्या चौकटीत सर्व प्रश्नांची उत्तरे देता येतात, ती मनाला शांती, समाधान प्राप्त करू देतात, श्रद्धा हीच ती (कसलीशी) ग्वाही देते’ अशी विधाने करतात तरी ती फक्त पोकळ विधाने आहेत. त्यांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एकही उदाहरण दिलेले नाही. केवळ श्रद्धा बाळगून कार्ये सिद्धीस जात नसतात. रस्त्यात पडलेला एखादा मोठा दगड एका किंवा कितीही व्यक्तींच्या श्रद्धेमुळे हलणार नाही. उलट कसलीही श्रद्धा न बाळगता, माणसांनी पुरेशी शक्ती लावली तर तो हलेलच. इथे कदाचित् असा प्रश्न उपस्थित होईल की त्या माणसांच्या मनात, शक्ती लावल्यावर तो दगड हलेल ही श्रद्धा असावी लागेल ना? ती नसेल तर ते शक्ती लावायला उद्युक्तच होणार नाहीत ना? यावर उत्तर असे की, मनात श्रद्धा बिद्धा न बाळगणारे इतकेच नव्हे तर ज्याच्याजवळ मन अशी काही चीजच नसते असे एखादे यंत्रही तो दगड हलवू शकेल, उचलून फेकून देऊ शकेल. त्याला श्रद्धेची गरजच असणार नाही. यावरही प्रश्न येऊ शकेल की त्या यंत्रामागच्या माणसाच्या मनात तरी, यंत्रशक्तीने दगड हलविता येईल ही श्रद्धा असावी लागेल ना? या प्रश्नाचे उत्तर “नाही लागणार” असे देता येते. यंत्रामागच्या माणसाच्या मनातील भावनेला म्हणायचे ‘विश्वास’ आणि तो विश्वास पूर्वी अनेकवेळा त्या माणसाने स्वतः तसे कार्य केलेले असल्याने व काही भौतिकशास्त्रीय नियम जाणून घेतलेले असल्याने निर्माण झालेला असतो. श्रद्धा निर्माण होण्यापूर्वी कसलाही अनुभव असावा लागत नाही, कसलेही नियम जाणून घ्यावे लागत नाहीत, कसलीही चाचणी घ्यावी लागत नाही. संपूर्ण अज्ञान आणि कसले तरी भय असते. क्लेश असले, दुःख असले की कोणीही, कसली तरी आशा दाखविली की माणसे श्रद्धा बाळगायला तयार होतात. मग त्यांना पुन्हा पुन्हा सांगितले जाते की श्रद्धा ठेवा, फळ मिळेल. प्रश्न विचारू नका, अश्रद्धा दाखवू नका, नुकसान होईल. माणसे अधिकाधिक श्रद्धाळू होतात आणि अश्रद्ध होण्याचीही त्यांना भीती वाटू लागते. फळ मिळाले नाही तर आपल्या नशिबाला दोष देऊ लागतात ते श्रद्धा विषय संशयास्पद ठरवू धजत नाहीत. सामान्यतः श्रद्धा आणि विश्वास हे शब्द समानार्थक समजले जातात. पण ते थोडेसे ढिलेपणाने केले जाते. आपण त्यात थोडा फरक करू या.

मनाच्या ज्या भावनेमुळे, माणसे अज्ञान, भय, आशा यांच्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा साक्षात्कारी समजले गेलेल्यांच्या वचनांवस्न, अथवा आप्तवाक्य म्हणून एखादी गोष्ट खरी अथवा शक्य मानतात तिला श्रद्धा म्हणावे. आणि मनाच्या ज्या भावनेमुळे, माणसे अनुभवाने, प्रत्यक्ष प्रयोगाने, श्रद्धा नसली तरी एखादी गोष्ट खरी किंवा शक्य मानतात तिला विश्वास म्हणावे.

ईश्वराच्या अथवा संतमहात्मा समजल्या गेलेल्या मानवाच्या कृपेने कल्याण होते किंवा होईल यावर काही लोकांची श्रद्धा असते. पण त्या कृपेवर विश्वासून राहता येत नाही. पण आकाशात थोड्या अंतरावर जाईल अशा तऱ्हेने फेकलेली निर्जीव वस्तू परत पृथ्वीवर येईल असा विश्वास बाळगता येतो. तशी श्रद्धा ठेवावी लागत नाही. ती वस्तू परत पृथ्वीवर येईल यावर विश्वासून राहता येते.

पळशीकर श्रद्धेची सार्थकता म्हणजे काय, कशी होते याचे विवरण करीत नाहीत, उदाहरणही देत नाहीत. श्रद्धेच्या चौकटीत सर्व प्रश्नांची केवळ काल्पनिक उत्तरे देतात, ‘उल्लंधित सर्वंकष श्रद्धा’ असे, काहीही अर्थ न होणारे बेडेकरांचे शब्द वापरतात, भान किंवा जाणीव यांना ‘आकार’ देण्याबद्दल बेडेकर म्हणाले म्हणून बोलतात. त्यांच्या दृष्टीने ‘आकार’ हा शब्द ‘मोठा अर्थपूर्ण’ असला तरी तो इथे निरूपयोगी वाटतो. एखाद्या भानाला किंवा जाणिवेला सरळपणे धर्म, किंवा कला म्हणायला काय अडचण आहे? तिला धर्म अथवा कला हा आकार देण्याची काही आवश्यकता आहे काय? तो देण्याने विवेचन अधिक स्पष्ट किंवा समजण्यास अधिक सोपे होते काय? पृष्ठ २९२ वरील अंतिम परिच्छेद, जो पृष्ठ २९३ वर संपतो त्यात बेडेकर नव्हे पळशीकर बरीच गंमत करतात. अनुभवांचे ‘उल्लंघन’ ते कसे करतात आणि लोकांनी कसे करावे हे ते सांगत नाहीत; तरीही ते ‘उल्लंघन केल्यावरच आकार देता येतात जे आकार असले तरच उल्लंघन करता येते’ असे काही तरी, अंडे असेल तरच कोंबडी बनेल पण कोंबडी असेल तरच अंडे मिळेल या धर्तीवरचे विधान करून जातात. आणि शेवटी सुव्यवस्था असते असे निःसंदेहपणे मानतात, जो केवळ त्यांच्या श्रद्धेचा परिणाम आहे.

पळशीकरांनी विश्वाचा जो निर्माता ठरवला आहे तो म्हणे सर्व काही घडवणारा व दयाळू आहे. हे म्हणणे म्हणजे जगातील करोडो दीन, दुबळ्या, दरिद्री, पीडित, वंचित मानवांची क्रूर थट्टा आहे. पळशीकरांच्या त्या निर्मात्याचीही ते थट्टा करीत आहेत. ज्या स्वार्थी लोकांच्या अमानुष्य कृत्यांमुळे, अन्यायांमुळे आणि करुणाहीनतेमुळे त्या दीनांना यातना भोगाव्या लागल्या व लागत आहेत त्या तथाकथित उच्च वर्णीयांना संरक्षण व समर्थन देण्याचे कार्य मात्र धर्म व श्रद्धा यांमुळे, कदाचित् पळशीकरांच्या नकळत, सतत झालेले आहे व आजही होत आहे. मानवांच्या वाट्याला येणारे क्लेश, नुकसान, दुर्भाग्य परंपरा ही सर्व मनुष्यकृत आहेत. धर्म व श्रद्धा यामुळे ती कधीही नाहीशी झालेली नाहीत व होतही नाहीत. निधर्मीपणाकडून धार्मिकतेकडे व श्रद्धेकडे वळलेल्या ‘अनेकांपैकी’ एक असे कोणी दि. के. बेडेकर यांची वचने आणि शाब्दिक अवडंबर न वापरताही पळशीकर आपले धर्म, धर्मश्रद्धा व धर्मसंस्था या विषयीचे विचार सहज व्यक्त करू शकले असते. बेडेकरांच्या विरुद्ध दिशेला वळलेल्यांची ही नावे सांगता येतील, पण या नावांचा बुद्धिप्रामाण्यवाद्यांना उपयोग नाही. पळशीकरांना आदर्श वाटणाऱ्या (तथाकथित) साक्षात्कारी ऋषिमुनींनी बेडेकर अथवा पळशीकर यांच्यापेक्षा अधिक समर्थपणे श्रद्धादिकांची समर्थने केली ती पळशीकरांनाही माहीत असतील. पण तशी कोणतीही समर्थने बुद्धिप्रामाण्यवादाच्या कसोट्यांना उतरत नाहीत. मात्र या कसोट्या बहुसंख्य लोक लावीत नाहीत, लावू शकत नाहीत. आणि ते अज्ञानी म्हणून सश्रद्ध असण्यानेच काही अल्पसंख्य लोकांचे कल्याण साधत असते.

र. वि. पंडित
३०४, अंबर अपार्टमेंट्स, इस्कॉन मंदिराजवळ, जुहू, मुंबई — ४०० ०४९
आ.सु.चा नोव्हेंबर २००० चा अंक (११-८) दि. २६-११-०० रोजी म्हणजे फारच उशीरा मिळाला.

१. विवेकवादाचा किल्ला जिद्दीने आणि शौर्याने लढविणारे किल्लेदार प्रा. दि. य. देशपांडे अजूनही पूर्ववत बलशाली आहेत हे पाहून फार बरे वाटते. या किल्ल्याचा ‘रेगे’ नावाचा बुरूज दोन वर्षांपूर्वी ढासळला आणि आता ‘पळशीकर’ हाही मजबूत बुरूज ढासळला आहे. धर्म आणि श्रद्धा या शत्रूच्या आक्रमणापुढे ढासळलेले हे दोन बुलंद बुरूज काय शोभेचेच होते? आमचे किल्लेदार मात्र बुरुज ढासळले, तटबंदीला चिरा पडल्या तरी धर्म/श्रद्धा या शत्रूशी प्रखरपणे लढा देत आहेत हे पाहून आमच्यासारख्या, धर्म आणि श्रद्धेची कफने डोईला गुंडाळलेल्या विवेकी बाजारबुणग्यांचे अवसान टिकून राहते हे निश्चित.

आ. सु.ने वेबसाईट सुरू करावी काय, याबद्दल श्री. निमखेडकर यांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्यच आहेत. जागतिक माहितीजालावर मुक्काम स्थापन करण्याचा उद्देश जगात कोणालाही, कोणत्याही वेळी या मुक्कामावर संगणकाद्वारे पोहचून तेथे असलेली माहिती वाचता यावी हा असतो. आ.सु. हे काही करमणुकीचे साधन नाही तर ते एका विशिष्ट पद्धतीच्या समाजसुधारणेचे व्रत घेतलेले गंभीर माध्यम आहे. या संस्थेची (?) सद्यः आर्थिक स्थिती व कायमची आवक ही फार मोठी नाही आणि ही आवक वाढविण्याचे व्यापारी धोरणही नाही (हे योग्यच आहे).

आ.सु. हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील मराठी भाषिक वाचकांचे उद्बोधन करू इच्छिणारे मासिक आहे. त्यामुळे ज्यांच्याजवळ वैयक्तिक संगणक आहेत अथवा तासाला २५-३० रुपये फेकून माहितीजालकेंद्रावर आ.सु. वाचणारे, हे या मासिकाचे लक्ष्य नाहीतच. तेव्हा केवळ आधुनिकपणाची लाट (fashion) म्हणून आ.सु.ने वेबसाईट सुरू करण्याची मुळीच गरज नाही. त्यापेक्षा नियमितपणे अंक काढणे व तो खेडोपाडी जास्तीत जास्त सामान्य वाचकांपर्यत पोचविणे हे अधिक महत्त्वाचे व प्राथमिकतेचे आहे. संचालक/संपादक/सल्लागार मंडळींनी वेबसाईटचा प्रस्ताव मुळापासूनच उपटून फेकावा हेच बरे.

३. भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण करण्याचे कंकण हाती बांधलेल्या शासनाने ‘खादी ग्रामोद्योग मंडळाला’ देण्यात येणारा ‘मलिदा’ (रिबेट निमित्त) बंद करणे हे पूर्णतः तर्कसंगतच आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ हा अलीशान अंबरखान्यात राहणारा मत्त झालेला पांढरा हत्ती आहे. या हत्तीला रस्त्यावर, शेतात, वनात कामाला जुंपून आपली गुणवत्ता व उपयुक्तता कोणत्याही मलिद्यावाचून सिद्ध करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे.

जयंत परांजपे
Ph.D., D. Lit., भगीरथ अपार्टमेंट्स, १२४, शिवाजीनगर, नागपूर –४४० ०१०
आ.सु. चा अंक आजच (१७ नोव्हेंबर २०००) हाती पडला. त्यात श्री गंगाधर गलांडे यांचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात श्री. ल. ग. चिंचोळकर यांच्या पत्रातील दोन वाक्ये उद्धृत केली आहेत. ‘गांधींनी प्रत्येक प्रसंगी हिंसा त्याज्य मानली होती. बलात्कार करणाऱ्याचा सुद्धा हिंसात्मक प्रतिकार करण्याऐवजी संबंधित स्त्रीने आत्महत्या करावी असे त्यांचे मत होते.’ उद्धृत केलेल्या वाक्यानंतर गलांडे यांनी त्यावर टिपणवजा दीर्घ परिच्छेद लिहिला आहे.

श्री चिंचोळकरांनी हे विधान मुळात कशाच्या आधारावर केले आहे ते मला सांगता येत नाही. परंतु माझ्या आठवणीप्रमाणे ते चूक आहे. गांधींचे मला आठवणारे विधान असे की अत्यंत अटळ परिस्थितीत एखाद्या स्त्रीने चाकू घेऊन बलात्कार करणाऱ्याचा खून जरी केला तरी ते माझ्या (त्यांच्या) अहिंसेत बसणारे होते. गांधीची अहिंसा ही दुबळ्यांची अहिंसा नव्हती हे सांगण्यासाठी या विधानाचा अनेकदा उल्लेख केला जातो. ‘हिंसा ही भित्रेपणापेक्षा चांगली’ असेही गांधींचेच एक प्रसिद्ध वाक्य आहे. हे लक्षात घेतले तर गलांडे यांची संपूर्ण टिप्पणी हीच मुळात गैरलागू ठरते. दाभोलकरांच्या पत्राबाबत कंसात स्पष्टीकरण देऊन संपादकांनी खुलासा केला आहे. तसाच खुलासा याही बाबतीत करता आला असता. हे एवढ्यासाठी लिहिले की ज्यांच्याविषयी सहज गैरसमज पसरावे असे गांधी एक विलक्षण महापुरुष आहेत. असो. खरे तर असे नसो.

ब्रिजमोहन हेडा
३३/बी, समर्थ कॉलनी, अमरावती — ४४४ ६०६
मध्यंतरीच्या काळात मी भारतात नसल्याच्या कारणाने आ.सु.चे अंक वाचू शकलो नव्हतो. त्यामुळे ही प्रतिक्रिया थोडी उशीराने कळवीत आहे.

धर्मग्रंथांवर टीका करायला हरकत नाही. धर्मग्रंथ अस्पर्श आहे असेही माझे म्हणणे नाही. (अशी टीका*) कितीतरी वर्षांपूर्वी प्रा. दि. य. देशपांड्यांनी केलेली आहे. परंतु त्यांची शैली आणि भाषा वेगळी होती. (अशा*) उपहासात्मक शैलीने सश्रद्ध माणसांना दुखावण्याखेरीज अजून काही साध्य होईल असे आपणास वाटते काय? उलट माणसे अशा आक्रमणाने आपल्या मतांना अधिकच चिकटतात असा माझा अनुभव आहे. लोकांच्या श्रद्धाविषयावर टीका करताना आपली भाषा अत्यंत तोलून-मापून योजलेली असणे आवश्यक असते. स्त्रीला मादी म्हणता येते, आईला बापाची बायको म्हणता येते. त्यामुळे सत्याला कुठेच धक्का लागत नाही, परंतु भावनांना लागतो. आणि माणसांना भावनाही असतात हे सत्य दुर्लक्षिण्यासारखे नाही. समाजावर टीका करणाऱ्यांचे समाजावर प्रेम असणे आवश्यक असते, एवढेच नव्हे तर त्याचे प्रत्यंतरही समाजाला येणे आवश्यक असते, तेव्हा कुठे अशा समाजसुधारकांच्या विचारांचा समाजावर काहीसा प्रभाव पडतो. एरवी आपली विद्वत्ता व्यक्त करण्यापलिकडे अशा लेखातून फारसे काही साध्य होते, असे मला वाटत नाही.

मी मागे एकदा अलाहाबादला गेलो होतो. तेव्हा तिथे कुंभमेळा होता. त्या मेळ्यातील हजारो लोकांकडे बोट दाखवत माझे मित्र प्रा. मोहता यांनी विचारले, ‘यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते?’ त्यांचे सुरकुतलेले चेहेरे, फाटक्या कापडाच्या गाठोड्या, लक्तरांतील मुलेबाळे पाहून मी म्हणालो, ‘यांना पर्यायी व्यवस्था देता येत नसेल तर हीच यांची मनोरुणालये आहेत. या श्रद्धा नसतील तर हे वेडे होतील.’ अशा* प्रकारची टीका वाचताना हा प्रसंग वारंवार माझ्या डोळ्यांपुढे येतो.

महात्मा गांधी, साने गुरुजी, गाडगेबाबा यांनी केलेल्या समाजसुधारणांचा त्यामुळेच अधिक प्रभाव पडला आहे असे मला वाटते. धर्मग्रंथांवर वा जनतेच्या श्रद्धास्थानांवर टीका करताना आपण आपल्या आईवडिलांच्या वा स्वतःच्या दोषांसंबंधी बोलू, तसे बोलणे आवश्यक असते. आईच्या मायेने समाजाची घाण दूर करावी लागत असते व तिने घातलेल्या धपाट्यातून तिचा कळवळा व्यक्त होत असतो.

आ.सु.च्या लेखकांचा दृष्टिकोन अधिक उदार होईल, समाजाच्या व्यथांनी त्यांचे अंतःकरण कळवळेल व त्या करुणेचा प्रत्यय त्यांच्या लिखाणातून येईल तर आ.सु.ची उपयोगिता अधिक वाढेल असे मला वाटते. अर्थात हेही एक मतच आहे, आग्रह नाही.

[*श्री. हेडा एका सहा महिन्यांपूर्वीच्या लेखाबद्दल बोलत आहेत. पत्राच्या शेवटी ते अशाच मागे झडलेल्या एका वादावरही बोलतात. हे दोन्ही विषय आज शिळे झाले असल्याने नेमके संदर्भ टाळले आहेत. पण कळवळा असणे आणि तो प्रत्यय लेखनातून येणे यावर हेडांचे म्हणणे मनापासून मान्य करूनही उपहास हे समाजसुधारणेचे हत्यार बाद करावेसे मला वाटत नाही. गाडगेबाबा सत्यनारायण आणि बळी देण्याचा उपहासच करतात. गांधीजी व साने गुरुजी हेही सर्वच स्थितीत सौम्य वृत्ती दाखवत नसत.
श्रद्धा हा मानसोपचाराचा प्रकार आहे, हेही पटायला जड आहे. ज्या पर्यायी व्यवस्थेचा उल्लेख हेडा करतात, तो विवेकवाद आहे, असे माझे मत, तेही आग्रही. जखमेवरील घाण दूर करून, फोड-गळवे साफ करून वर आयोडीन लावताना झोंबणारच. तसे करताना आईलासुद्धा कठोर व्हावे लागते व लेकराचे रडणे भेकणे दुर्लक्षावे लागते. कळवळा ह्या स्वच्छता मोहिमेतूनही दिसतो, अखेरच्या धपाट्यातूनच नव्हे. पाहणाऱ्या त्रयस्थानेही जरा प्रयत्नाने हा कळवळा समजून घ्यावा लागतोच. आणि एखाद्या लेखकाच्या भाषेत, शैलीत कळवळा पुरेसा स्पष्ट झाला नाही, एवढ्याच कारणासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडणारे लिखाण टाळणेही औदार्याचे नव्हे तर पडखाऊपणाचे वागणे नव्हे का?] संपादक

[हे पत्र कोणाचे आहे हे कळले नाही]
आशा ब्रह्म ह्यांचा ‘खरा ब्रेन ड्रेन’ हा पुस्तक-परीक्षणात्मक लेख वाचला. डॉ. सुखात्मे ह्यांचे मूळ पुस्तक मी वाचले नाही. (ते उदगीरसारख्या गावी मिळण्याची शक्यता नाही) त्यामुळे पुस्तकावर व परीक्षणावर मी काहीही भाष्य करणार नाही. पण त्या लेखाच्या निमित्ताने ब्रेन ड्रेन संबंधात माझे मनोगत कळवीत आहे.

१. अंतर्गत ब्रेन ड्रेनची कल्पना आशा ब्रह्म ह्यांनी लिहिल्याप्रमाणे खरोखरीच फार विवाद्य आहे. व्यक्तीच्या शिक्षणावर समाजाने केलेला खर्च (भांडवली गुंतवणूक) समाजाला योग्य आणि पूर्ण गुंतवणुकीच्या व्याजासह परत मिळाला पाहिजे. हा परतावा समाजाला का राष्ट्राला ह्यातच अंतर्गत ब्रेन ड्रेनचे विवाद्य रूप आहे. हा परतावा राष्ट्राला न म्हणता समाजाला असा अर्थ घेतला तर ही संकल्पना आणखी बरीच ताणली जाऊ शकेल. उदा. वैयक्तिक कारणाने (प्रापंचिक अडचणी) किंवा आदर्शवादी भूमिकेतून शहर सोडून खेड्यात गेलेल्या अनेक शिक्षित कर्तृत्ववान व्यक्तिंचा समाजाला पुरेपूर परतावा मिळू शकला नाही किंवा मिळू शकत नाही. खेड्यातल्या संकुचित वातावरणात व्यक्तीच्या क्षमतांना Capabilities पूर्ण वाव मिळू शकत नाही. पर्यायाने नुकसानच होते. हाही एक Brain drain चा प्रकार मानावा लागेल (व्यक्तीच्या क्षमतांचा वापर योग्य आणि पूर्ण हे व्यक्तीच्या दृष्टीने ठरवावयाचे का समाजाच्या दृष्टीने हाही मुद्दा परत विवाद्यच आहे) हीच विचारप्रक्रिया पुढे चालू केली तर ग्रेच्या Elegy in the country church yard ह्या कवितेप्रमाणे ‘Full many a flower is born to bloom unseen’ इथपर्यन्त Brain drain ची कल्पना ताणता येईल. Brain drain चा अर्थ Brain going down the drain असा होईल तो Brain drain च्या संकल्पनेशी विपर्यस्त आहे.

२. समाजाने/राष्ट्राने शिक्षणावर केलेल्या खर्चाचा परतावा त्या राष्ट्राला न मिळता दुसऱ्या राष्ट्राला मिळत असला तर Brain drain म्हणता येईल. ६०-७० पर्यन्त देशाबाहेर गेलेल्या तंत्रज्ञांच्या बाबतीत आपण ब्रेन ड्रेन म्हणत होतो. कारण त्या व्यक्तीच्या शिक्षणाचा फायदा आपल्या देशाला होत नव्हता. पण ९०-९१ नंतर परिस्थितीत पुष्कळ बदल झाला आहे. आता आपल्याकडून परदेशात गेलेल्या व्यक्तीच्या पैसा परकीय चलनाच्या रूपात भारताला पुष्कळ प्रमाणात मिळत आहे. परकीय चलनाच्या तुटवड्याच्या वेळी तर हा परतावा देशाच्या दृष्टीने मोलाचा झाला आहे. हे झाले नोकरी करण्यासाठी परदेशी गेलेल्या व्यक्तीबाबत. तेथे स्थाईक झालेल्या ८० च्या आधी गेलेल्या भारतीयांचाही आता आपण अनिवासी भारतीय ह्या गोंडस नावाखाली आदर करीत आहोत. जे गेल्या दशकांत Brain drain चे शिकार समजले जात होते ते आता आपल्याला संभाव्य गुंतवणुकदार वाटत आहेत व तसे ह्या अनिवासी भारतीयाचे योगदानही दिसत आहे. म्हणजे भांडवल गुंतवणुकीतील जो परतावा आपल्याला लगेच मिळायला पाहिजे होता तो थोड्या उशीराने मिळत आहे. म्हणजे ब्रेन ड्रेनने सगळेच काही वाया गेले असे नाही. शिवाय अनिवासी भारतीयांचा राजकीय प्रभावपण (त्यांच्या देशात) वाढत आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या देशाच्या भारताबरोबरच्या संबंधात दृष्टीस पडत आहे. अनेक सर्जक भारतीयांच्यामुळे भारताची प्रतिमा उजळली आहे. त्यांचे कर्तृत्व इतर भारतीयांना आश्वासक ठरत आहे. ह्या Indian diaspora ने भारताची एक लॉबी निर्माण केली आहे व त्या लॉबीचे महत्त्वही वाढत आहे. आपल्याकडील परिस्थिती (आर्थिक, सामाजिक, राजकीय) सुधारल्यानंतर Reverse Brain Drain ची शक्यताही नाकारता येत नाही. भांडवल जसे कोणत्याही देशातले कोणत्याही देशात फायद्याकरिता वापरले जाऊ शकते तशीच श्रमशक्तीही (बौद्धिक आणि शारीरिक) मुक्तपणे वापरली जाणे हे आपल्या फायद्याचे आहे. म्हणजे ज्यास आपण Brain drain म्हणत होतो तो आता Brain export ठरला आहे.

३. आपल्याकडे कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्याचा नफा काही ठराविक प्रमाणात दुसऱ्या देशात जातो. अशा बहुराष्ट्रीय कंपन्यात काम करण्याऱ्या तंत्रज्ञांच्या बौद्धिक क्षमतेचा उपयोग त्या कंपनीच्या नफ्याकरिता केला जातो. म्हणजे ज्या प्रमाणात त्या कंपनीच्या नफा कंपनीच्या मूळ देशाला जात असेल त्या प्रमाणात त्यात काम करणाऱ्या तंत्रज्ञांचा Brain drain झाला असेल गृहीत धरावे लागेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांनंतर आता येत असलेल्या Trans-National कंपन्याच्या बाबतीत नफा कोठे जातो हेही ठरविणे अवघड आहे.

४. जागतिकीकरण, मुक्तअर्थव्यवस्था व दूरसंचाराचा वाढता उपयोग इ-फायनान्स (E-finance) ह्या सर्व गोष्टींमुळे राष्ट्र (Nation-State) या संकल्पनेलाच हादरे बसत आहेत. यापुढे राष्ट्र या संकल्पनेचे स्वरूप, व्याप्ती याबद्दल अधिक विचार व्हावयास हवा.

एकूणच माझ्या मते Brain drain ही संकल्पना कालबाह्य होत आहे.

[वरील पत्रलेखकाची उपजीविका कशावर चालते व त्याचा संबंध समाजातील कोणत्या धंद्या-पेशांशी येतो, हे स्पष्ट नाही. माझा व्यक्तिगत बांधकाम क्षेत्रातला अनुभव सांगतो की पुरेसे तज्ज्ञ तंत्रज्ञ नसल्याने कामांची गुणवत्ता सरासरीत घसरते आहे. मोठ्या प्रकल्पांवरच्या भारी यंत्रांच्या वापराने तंत्रज्ञांची गरज कमी होते (आणि कामगारांची गरज शून्यवत् होते!). पण भारी तंत्रज्ञान, उच्च तंत्रज्ञान हे बहुतांशी आयात होत असते. त्यामुळे माझ्या धंद्यात तरी ब्रेन ड्रेन एक्स्पोर्ट नसून मशीनरी-टेक्नॉलाजी इंपोर्ट आहे! इतर पेशाधंद्यांची याबद्दलची परिस्थिती जाणून घ्यायला मला आवडेल.] संपादक

केशवराव जोशी
स्वातंत्र्य सैनिक, तत्वबोध नेरळ, कर्जत, रायगड — ४१० १०१
[नेरळ ग्रामपंचायतीने २० नोव्हें. ते डिसें. २००० या काळात एक ‘निशुल्क चुंबक चिकित्सा शिबिर’ भरवले – शुद्धलेखन त्यांचेच! ह्या ‘उपचारपद्धती’मुळे कार्यशक्ती, स्मरणशक्ती, रोगप्रतिकारशक्ती वाढते, सर्व रोग दुरुस्त होतात, वगैरे दावे केले गेले. आ.सु.चे आजीव वर्गणीदार केशवराव जोशी यांनी ग्रामपंचायतीला खालील पत्र लिहिले. असला गाढवपणा आपल्या आसपास घडत असल्यास आपणही जोशींसारखे पत्र लिहावे, व शक्य झाल्यास त्याला वृत्तपत्रीय प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन करून आ. सु. जोशींना सुयश चिंतितो.] – संपादक

डॉ. आंबेडकरांनी घटनेच्या ५१(ए) (एच) कलमानुसार प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, चौकस बुद्धी आणि सुधारणावाद याचा प्रसार करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना औषध, इलाज, उपचार याबाबत फसवणूक करणारे आढळल्यास त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले आहे. खेडेगावातील भोळ्या लोकांची फसवणूक टाळावी या उद्देशाने केंद्रशासनाने १९५४ मध्ये दैवी दावा आणि चुकीच्या उपचार पद्धतीविरोधी कायदा, अस्तित्वात आणला आहे. तसेच ‘मोनापोलीज ॲण्ड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड पॅक्टेसेस ॲक्ट’ १९६९ नुसार एखाद्या वस्तूमध्ये अद्भुत औषधी गुण असल्याचा दावा करून लोकांना फसविणे हा दखलपात्र गुन्हा ठरविला आहे.

‘इंडियन मेडिकल कौन्सिल’ची चुंबकचिकित्सा उपचारपद्धतीला मान्यता नाही. चुंबकीय जलामधले चुंबक काढून घेतल्यावर इलेक्ट्रॉन्स पुन्हा आपल्या मूळ कक्षेत जातात. त्यामुळे हे चुंबकीय पाणी, साधे पाणी बनते याबाबत तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी, अलिबाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक, अलिबाग यांचेकडून खात्री करून घ्यावी. नेरळ ग्रामपंचायतीने तुमच्या स्वाक्षरीने ‘निशुल्क चुंबकचिकित्सा शिबिर’ ता. २०/११/२००० ते ४/१२/२००० पर्यंत आयोजित केले आहे. त्याची जाहिरात मला आज मिळाली. म्हणून हे पत्र तुम्हास देत आहे. नेरळ ग्रामपंचायत हा महाराष्ट्र शासनाचा एक भाग आहे. आणि शासनाची व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची ज्या उपचारपद्धतीस मान्यता नाही अशा उपचारपद्धतीचे शिबिर भरवून लोकांची फसवणूक होण्यास तुम्ही कारणीभूत होत आहात याची दखल घेऊन ताबडतोब या शिबिरापासून तुम्ही परावृत्त व्हावे ही विनंती.

अनिल नागनाथ कोरे
कापड दुकान, मेन रोड, मोहोळ, जि. सोलापूर
नोंव्हे. २००० च्या अंकात आपण विद्यापीठ अनुदान मंडळाच्या, ‘वैदिक कर्मकांडे व ज्योतिषशास्त्र’ या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या धोरणाबाबत चर्चा केली. वाचकांना आपण चर्चा करण्याचे आवाहन केले.

मुळातच आपला देश, समाजात असणाऱ्या विविध अंधश्रद्धानी ग्रासला आहे. त्यात फलज्योतिष हा विषय शिकविणे सुरू केल्यास आपण पाच हजार वर्षे मागे जाऊ हे सांगण्यास कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. फलज्योतिष हे शास्त्र नाही. राहू, केतू, चंद्र हे ग्रह नसताना ज्योतिष त्यांना ग्रह मानते व पृथ्वी हा ग्रह असताना ज्योतिषी पृथ्वीला ग्रह मानण्यास तयार नाहीत. कोणत्या ग्रहाची किती व कोणती फले आहेत याबाबत सर्व ज्योतिष्यांमध्ये एक मेळ नाही. विज्ञानाचे तसे नाही, जगात कोठेही गेलात तरीही विज्ञान तेच सांगणार जे सिद्ध झाले. ज्योतिष्यांचे तसे नाही. वडील एक सांगणार तर मुलगा दुसरेच सांगणार. हा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी यु. जी. सी. ने हवे तर ज्योतिषीरावांना विचारावे किती जणांचे एकमत येते ते पहावे मग यु.जी.सी.ला समजेल ते शास्त्र आहे की नाही.

‘वैदिक कर्मकांडे’ हा विषय तर चातुर्वर्णाचा स्वीकार करते. देशातील बहुसंख्य लोकांना वैदिक कर्मकांडाची माहिती नव्हती व नाही. तरी पण देश स्वतंत्र झाला. अविकसित अवस्थेतून विकसनशील अवस्थेत पोहोचला आज तिथेही प्रगती आहे. वैदिक कर्मकांडे माहीत नाहीत म्हणून कुणाचे कार्य थांबल्याचे दिसत नाही. अशी कर्मकांडे शिकून आजचा युवक उद्याच्या रोजगारासाठी, येथे सर्व संस्कार करून मिळतील’, ‘अंतिम संस्कारासाठी २४ तास सेवा’, ‘वेदोक्त संस्कार ही आमची खासियत’, या क्षेत्रांतही स्पर्धा सुरू झाल्यानंतर, ‘दोन विधी एकदम केल्यास तिसरा विधी मोफत’ असे नामफलक रंगवून दुकाने टाकतील. यामध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही. अशा विषयावर आपण चर्चा केली व करावी असे सांगावे वाटते. तसेच या अंकातील विजय वर्षा यांचा ‘आडनाव हवेच कशाला?’ हा परिवर्तनवादी लेख प्रबोधनात्मक वाटला.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.