वैजनाथ स्मृती

(कालचे सुधारक : डॉ. श्री. व्यं. केतकर)

आजच्या जगातील अनेक चालीरीती मनुष्यप्राण्याच्या जंगली काळात उत्पन्न झाल्या आहेत. त्या चालीरीती व त्यांचे समर्थन करणारे कायदे नष्ट झाले पाहिजेत. आणि त्यासाठी जी नवीन नियममाला स्थापन व्हावयाची त्याचा प्रारंभयत्न ही वैजनाथ स्मृती होय.
जगातील प्रत्येक मानवी प्राण्याच्या इतिकर्तव्यता आत्मसंरक्षण, आत्मसंवर्धन आणि आत्मसातत्यरक्षण या आहेत. आत्मसंरक्षण मुख्यतः समाजाच्या आश्रयाने होते. आत्मसंवर्धन स्वतःच्या द्रव्योत्पादक परिश्रमाने होते व आत्मसातत्यरक्षण स्त्रीपुरुषसंयोगाने होते; तर या तिन्ही गोष्टी मानवी प्राण्यास अवश्य आहेत. आत्मसंरक्षण आणि आत्मसंवर्धन यासाठी शास्त्रसिद्धी बरीच आहे. कारण, रक्षणसंवर्धनविषयक विचार दररोज अवश्य होतो. आत्मसातत्याचे शास्त्र अजून तयार झाले नाही. “वंशसातत्य’ या दृष्टीने स्त्रीपुरुषसंयोगाची तपासणी करून तो अधिक शास्त्रसिद्ध मार्गावर आणणे हे या शास्त्राचे ध्येय आहे आणि यासाठी अस्तित्वात असलेल्या सर्व नियमांचा विचार करून मी वैजनाथ नियम देत आहे.
कुटुंबस्थापना, कुटुंबशासन याविषयीचे नियम करणे हा या शास्त्राचा प्रथमाध्याय होय. याविषयी नियम करताना समाजातील अधिकारी वर्गाने स्वतःला सर्वज्ञ न समजता प्रत्येक व्यक्तीस आपापल्या इच्छेप्रमाणे कुटुंबस्थापनेचे व कुटुंब-संवर्धनासाठी नियम करण्याचे, आणि नवऱ्यास अगर बायकोस वर्तनस्वातंत्र्य किती असावे, आपण दुसऱ्याच्या किती अंकित असावे व दुसऱ्याचे पोषण करण्याची जबाबदारी आपणावर कितपत असावी, हे ठविण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. समाज जे नियम करील ते व्यक्तिनिर्मित नियमांच्या अभावी आहेत असे समजावे.
विवाह ही संस्था अत्यंत उपयुक्त आहे. याच्या योगाने पुरुषास अपत्याविषयी स्वकीयता उत्पन्न होते व या दृष्टीने ही संस्था आत्मसातत्यास अत्यंत उपयुक्त आहे. ही संस्था अनेक बऱ्यावाईट नियमांनी बद्ध झाली असल्यामुळे तिची उपयुक्तता वाढवावी हे शास्त्राचे ध्येय आहेच. विवाह हा एक त-हेचा विमा आहे. मनुष्याचा प्रयत्न ज्या आपत्ती मनुष्यमात्रावर स्वाभाविक कारणामुळे उत्पन्न होतात, त्या दूर करण्याकडे असावा. जेव्हा कारखान्यात अनेक माणसे कामे करतात पण एखाद्याचाच हात तुटतो, तेव्हा कायद्याचा प्रयत्न नुकसान पावलेल्या व्यक्तीची नुकसानभरपाई करण्याकडे असावा. स्त्री व पुरुष ही एकत्र झाली म्हणजे स्त्रीस गरोदरस्थिती व अपत्यप्राप्ती ही होतात व त्यामुळे तिची द्रव्यार्जनक्षमता कमी होते; पुरुषाची द्रव्यार्जनक्षमता कमी होत नाही; त्यामुळे स्त्रीच्या आणि तिच्या अपत्याच्या पोषणाचा भार पुरुषावर टाकला आहे, व हा भार टाकता यावा यासाठी पुरुषाच्या ठायी अपत्याविषयी स्वकीयता स्थापन झाली पाहिजे, म्हणून विवाहपद्धती अमलात आली आहे. आणि यामुळेच विवाहित स्त्रियांना पुरुषांकितता प्राप्त झाली आहे. स्त्रीची पुरुषांकितता द्रव्यमूलक आहे व पुरुष जोपर्यंत आपले कर्तव्य करीत आहे तोपर्यंत कौटुंबिक सुखासाठी स्त्रीने मुख्याधिकार पुरुषाचा आहे हे लक्षात ठेवूनच नेहमी वागले पाहिजे. यापेक्षा अन्य प्रकारचा आयुष्यक्रम फारसा सुखावह होत नाही. स्त्रीने विवाहपद्धतीचा व पुरुषांकिततेचा स्वीकार करून आपल्या पोषणाची आणि अपत्यांच्या पोषणाची जबाबदारी पुरुषावर ढकलावी ही गोष्ट बहुजनसाध्य असल्यामुळे या रीतीचाच अवलंब जगभर झाला. आणि ही संस्था यशस्वी करण्यासाठी पातिव्रत्याचे महत्त्व सर्व कवी वणू लागले व पुरुषाचा अधिकार पक्का होण्यासाठी कायदे होऊ लागले. स्त्रियांची पुरुषांकितता किंवा कुटुंबातील पितृसत्ता द्रव्यमूलक असल्यामुळे प्रस्तुत विवाहसंस्था अनेक प्रसंगी स्वाभाविक प्रवृत्तीशी विसंगत व समाजास अपुरी होते. त्या प्रसंगापैकी एक प्रसंग म्हटला म्हणजे जेव्हा पुरुष द्रव्यार्जनक्षम नसतो किंवा जेव्हा स्त्री पुरुषापेक्षा अधिक द्रव्य मिळवू शकते तेव्हाचा होय. अशा प्रसंगी परिस्थिती मातृसत्ताक कुटुंबास अनुस्य, पण कायदा मात्र पितृसत्ताक कुटुंबाचा अशी असंगती होते. याशिवाय जेव्हा एखाद्या स्त्रीला नवरा मिळतच नसेल व ती जरी स्वसंरक्षणक्षम आणि अपत्यसंरक्षणक्षम असली तरी तिला प्रजोत्पादनाची संधी नाकारली जाते तो होय.
अशा प्रसंगी तिला आर्थिक लायकी असताही आत्मसातत्यरक्षणाची संधी समाज नाकारीत असतो. याचे कारण तिला पुरुष मिळत नसतो म्हणून नव्हे, तर समाजाने निर्माण केलेल्या कायद्याचे बंधन स्वीकारणारा पुरुष मिळत नाही म्हणून; आज जे संबंध अनीतीचे समजले जातात तसे संबंध करण्यास तयार असे पुरुष तिला हवे तितके मिळतील. विवाहाशिवाय अपत्योत्पादन तिने पत्करले तर विवाहाच्या केवळ आर्थिक अशा आदिकारणाशी अपरिचय असलेला समाज तिला गुन्हेगार ठरवितो, म्हणून ती विवाहाशिवाय प्रजोत्पादन पत्करीत नाही व म्हणून तिला मातृत्व नाकारले जात आहे; यासाठी समाजाच्या मूलभूत कायद्यातच फेरफार पाहिजे. पुरुषसत्ताहीन मातृसत्ताक कुटुंबपद्धती यशस्वी करणे लोकसंख्येच्या वाढी-साठी आणि स्त्रियांस त्यांचे हक्काचे मातृत्व देण्यासाठी अवश्य आहे आणि यासाठी त्यांच्यावर असलेले अनवश्य नियंत्रण मी वैजनाथ काढून टाकीत आहे. ही पद्धती मलबारसारख्या स्थानास चिकटलेली न राहता सार्वराष्ट्रीय आणि वैकल्पिक स्वीकाराची झाली पाहिजे.
कार्यारंभासाठी मी सर्व अविवाहित राहिलेल्या व वैधव्यात असलेल्या स्त्रियांस स्पष्ट सांगत आहे की, त्यांनी जर एक होऊन पितृसत्ताक कुटुंबपद्धतीविरुद्ध बंड केले तर तो अधर्म न होता उच्चतर धर्म होईल. कारण हे बंड स्वतः जास्त जबाबदारी घेणारे आहे, हे बंड यशस्वी करण्यासाठी तुम्ही संघटित व्हा. तुमच्या कार्यास विधायक दिशा लागावी म्हणून अविवाहित असतादेखील मातृत्व पत्करणाऱ्या स्त्रियांसाठी फंड उभारला किंवा सहकारी संस्था तयार केली, तर तुम्ही आपले कर्तव्य करू लागला असेच मी समजेन. समाजाच्या कर्तृत्वविकासास दोन्ही त-हेच्या कुटुंबपद्धति अवश्य आहेत. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत स्त्री व पुरुष यांची श्रमविभागणी होऊन स्त्रीस केवळ गृहकर्मेच करावी लागतात. जेव्हा स्त्रीस द्रव्यार्जनदेखील करावे लागते तेव्हा तीस कायद्याने जरी कौटुंबिक सत्ता दिली नसली तरी ती उत्पन्न होतेच. यासाठी स्त्रीसत्ता चोरट्या द्वाराने येऊ न देता उघड्या द्वाराने येऊ द्या. त्या सत्तेचे विचारपूर्वक संरक्षण व संवर्धन पाहिजे.
मातृसत्ताक कुटुंबपद्धतीची मान्यता वाढावी यासाठी ती स्वीकारण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक स्त्री-पुरुषास असले पाहिजे; पण हे स्वातंत्र्य द्यावयाचे म्हणजे एकंदर कुटुंबघटनेच्या कायद्यांत व्यक्तीस वाटेल तो कायदा स्वीकारण्याची मोकळीक द्यावयाची. जगात कुटुंबपद्धती अनेक आहेत आणि कौटुंबिक शासनाचे कायदेदेखील देशपरत्वे आणि धर्मपरत्वे भिन्न आहेत. प्रत्येक कुटुंबास वाटेल तो कायदा घेण्याचे किंवा प्रचलित नसलेला कायदा स्वतःपुरता स्वतःच्या कुटुंबशासनास लावून घेण्याचे स्वातंत्र्य असावे, कायद्याचा स्वीकार धर्माच्या स्वीकारावर मुळीच अवलंबून ठेवू नये. ज्याप्रमाणे कंपन्यांचा कायदा निरनिराळ्या प्रकारच्या कंपन्या नोंदू शकतो व कंपनीची अंतर्व्यवस्था कशी असावी यासंबंधाने हवे ते नियम करण्याचे स्वातंत्र्य कंपनीस देतो, त्याप्रमाणेच आपल्या कुटुंबात कोणता कायदा लागू पडावा यासंबंधाने नियम करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक कुटुंबास द्यावे. मनुष्य ख्रिस्ती असला म्हणजे यास अमुक कायदा लागू असावा, आणि मुसलमान असला म्हणजे निराळा कायदा लागू असावा, असे का? इस्टेटवाटणीचा आणि उपासनापद्धतीचा अर्थाअर्थी संबंध काय? एखाद्या मनुष्याला मुसलमानांचा इस्टेटवाटणीचा कायदा आवडला, म्हणजे तो घेण्यासाठी त्याने सुंता केली पाहिजे हा न्याय कोठला? यासाठी मी वैजनाथ हे म्हणतो की, कोणत्या कायद्याने कुटुंबशासन व्हावे हे ठरविण्याचा हक्क ज्याला त्याला असावा. कंपनीने अंतःशासना-साठी स्वतः केलेला कायदा नोंदावा लागतो, त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने आपणास लागू पडणारा कुटुंबशासनाचा कायदा नोंदावयास कोणतीच हरकत नाही. प्रत्येक व्यक्तीस आपल्या कुटुंबस्थापनेसाठी त्या व्यक्तीस आवडणारा कायदा पत्करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. ही गोष्ट साध्य करणे समाजसुधारणेच्या दृष्टीने आपले आदिकर्तव्य आहे. कुटुंबाला लागू पडणारा कायदा ठरविण्याचे स्वातंत्र्य एकदा नि चत झाले म्हणजे शासनतंत्रास कोणत्याही व्यक्तीच्या धर्ममतांची चौकशी करण्याचा प्रसंग पडणार नाही. आपण मेल्यानंतर आपणास कोर्ट काय धरतील, या प्रकारचा धाक मनात बाळगून कृत्रिम पुरावा निर्माण करण्याची खटपटदेखील कोणी करणार नाही.
[डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या “ब्राह्मणकन्या’ या कादंबरीतील एका प्रकरणाचा काही भाग वर देत आहे. ही ‘स्मृती’ मुळात चौदा पाने व बेचाळीस सूत्रे इतकी आहे. इथे केतकरांचा मानसपुत्र ‘वैजनाथ’ याचे नियम मोडून फक्त अंशच देत आहे—-पण संपूर्ण ‘स्मृती’ व कादंबरीही वाचावी, अशी विनंती आहे. —- संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.