पत्रसंवाद

प्रियदर्शन पंडित, किल्ला रोड, महाल, नागपूर — ४४० ००२
मे महिन्याच्या आ.सु. मध्ये खादीवर स्फुट आले आहे. मी स्वतः पूर्ण खादी वापरणारा आहे. मी रोज सूत काततो. माझे वडील तर साध्या टकळीवर सूत कातीत. तेही पूर्ण खादी वापरीत. तेव्हा खादी हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा भाग आहे. म्हणून हा लेखनाचा प्रपंच करीत आहे.
माझ्या या लिखाणात माझे अनुभव आणि माझी काही वैयक्तिक माहिती येईल तरी तिला अहंमन्यता असे समजू नये ही विनंती, कारण आपल्या एकूण व्यवहारात आपण स्वतःसंबंधी उल्लेख टाळतो त्याचप्रमाणे व्यक्तींची नावे येऊ देत नाही. तसे करणे म्हणजे त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्रमण समजण्यात येते. येथे मृत अथवा अनुपस्थित व्यक्तींची वचने (बहुधा स्वतःच्या कल्पनेत साकारलेली) साक्ष म्हणून उद्धृत करणाऱ्या वक्त्यांचा व लेखकांचा अपवाद करावा लागेल. पण असे करणारे बहुतेक एका विशिष्ट शाखेचे असतात. हे नमूद करणे आवश्यक आहे. एवढ्या प्रस्तावनेनंतर खादीकडे वळतो. प्रथम दिवाकर मोहनींना त्यांनी यंत्र आणि वस्त्र यांचा विकासाचा जो क्रमवार इतिहास थोडक्यात सांगितला त्या करिता त्यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी दिलेली ही माहिती मला नवीनच आहे. परंतु मी त्या लेखातील मुख्यतः अर्थार्जनासंबंधीच्या विचाराशी अजिबात सहमत नाही. खादी किंवा सूतकताई याकडे मी उपजीविकेचे साधन म्हणून पाहत नाही. आणि खादीकडे कोणी त्या दृष्टीने पाहत असेल असे वाटत ही नाही. कारण आज प्रचलित झालेल्या अर्थोत्पादनाच्या गतीची आणि खादीची लय जुळू शकणारी नाही.
श्री. मोहनी लेखाच्या प्रस्तावनेत म्हणतात की खादी हा विचार आहे. जीवनप्रणाली आहे. आणि पुढे तेच हे विसरले आहेत असे वाटते. खादी माणसाला निवृत्तीकडे नेणारा विचार आहे. तो संयम शिकविणारा विचार आहे. या करिता मी माझे काही कौटुंबिक अनुभव मुद्दाम सांगत आहे.
माझे वडील त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षांपासून खादीचे व्रत घेतलेले. ते अतिशय निष्ठेने पाळणारे. इतके की त्यांच्या लग्नातही त्यांनी खादीचे धोतर व खादीचा कुडता व गांधी टोपीच घेतली. माझ्या आईचे माहेर मालगुजारांचे. त्यांना जावयाच्या पोषाखावर इतका कमी खर्च जाचक झाला. यावर उपाय म्हणून त्यांनी जावयाच्या भावाला मँचेस्टरच्या कापडाचा सूट शिवून दिला. पूर्वी सूत दिल्याशिवाय खादीचे कापड मिळावयाचे नाही टकळीवर किती सूत निघणार? तरीही वडील सतत टकळीवर सूत काढावयाचे. हे मी अगदी लहान असतानाचे. मी थोडा मोठा झालो : माझे काका मिलचेच कापड वापरावयाचे आणि बोलताना खादीत देशाचे अर्थकारण पेलण्याची ताकद आहे का, असे काहीसे विनोदाने, काहीसे उपरोधाने म्हणावयाचे. त्यावेळी मला त्यांचे हे विधान मोठे काव्यात्मक व खरेही वाटावयाचे कारण मी ही तेव्हा खादी वापरत नव्हतो. मी स्नातक होईपर्यंत बेजबाबदारच होतो. पण माझ्या अंतर्मनात चिंतन चालू असावे असे वाटते कारण त्याही काळात वडिलांना पूरक व्हावे म्हणून मी सूतकताई करीत असे.
पण मी माझ्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी उपरती होवून व खादी विचार पटून खादीच फक्त वापरण्याचा नि चय केला व वडिलांना माझा विचार सांगितला, व खादी वापरू लागलो. मी नित्य नेमाने सूतकताई करतो. मी आज जरी साठीला टेकता असलो तरी सूतकताई लहानपणापासूनच करीत आहे. मला दिवाकररावांच्या साठीच्या घरातील सूत कातणारे या विधानामुळे दुःख झाले म्हणून हा एवढा प्रपंच केला.
तसेच पन्नास टक्के विणणावळीच्या सबसीडीचे आमिष असा जो त्यांनी उपहास केला आहे त्याचे ही वाईट वाटले. कारण सूतकताई करून विणून येणारे कापड ते किती असते व पन्नास टक्के अर्थ साहाय्याने वर्षात फार तर रु. २०० वाचत असावेत. जे कौटुंबिक कापडावर होणाऱ्या एकूण खर्चात नगण्य आहेत. बरे शासनदेखील अर्थसाह्य कस्न काही उपकार करीत नाही. कारण कापड-गिरण्या, यंत्रमाग यांच्या प्रचंड उत्पादकतेमुळे भांडवलदारांना कष्टकऱ्यांच्या कष्टाची लूटमार करावयाकरिता शासनाकडून झालेल्या साह्याची व श्रमिकाचा हक्काचा घास हिसकल्याची बोच त्याला कमी करावयाची असते. त्याकरिता हा परभारे धर्म शासन करू पाहते.
खादीचे व्रत घेणाऱ्याला चैन चालणार नाही. सूतकताई किंवा हातमागावरील विणणावळ तुम्हाला श्रमाचे खरे मूल्य नि िचत समजावून सांगते. एखादी कापड गिरणी पाच हजार मजुरांना रोजगार देते तेव्हा ती किती माग बंद पाडते व किमान पन्नास हजार विणकरांचा रोजगार हिसकून त्यांचे संसार कसे उद्ध्वस्त करते याचे भान आणून देते व तुम्हाला समाजाभिमुख करते. खादीचा विचार हा भव्य उत्पादकतेच्या कारखान्यांच्या अर्थशास्त्राला लंबरेषेने भेटणारा आहे. त्यात कारखानदारीच्या उत्पादन, उत्पादकता यांचा प्रक्षेप (projection) शोधण्याचा प्रयत्न मूढता मात्र आहे. परंतु खादी, सूतकताई अर्थशास्त्राचा मूलभूत सिद्धान्त म्हणजे श्रमाच्या गुंतवणुकीतून कच्च्या मालात परिष्कृती केली की श्रमाचे रूपांतर संपत्तीत (मूल्य-वर्धनात) होते, हे व्यावहारिक व व्यापक प्रमाणात चपखलपणे शिकविते हे निचित.
बरे खादीची पीछेहाट होण्यास खरे कारण तर खादीच्या उत्कर्षाबरोबर ज्या छोट्या मोठ्या भांडवलदारांच्या भांडवलाचे मूल्यवर्धन बंद पडण्याच्या स्थितीत होते तो मोठा वर्ग त्याच्या भांडवलाच्या पूर्ण शक्तीनिशी त्यावर आक्रमण कस्न आला आहे. या वर्गाची व्याप्ती किती विस्तृत होती हे का सांगावयास पाहिजे? यात कारखानदार त्यांचे शेअरहोल्डर्स एवढेच काय कापसाचे व्यापारी व न्यूयॉर्क कॉटनच्या भावावर जुगार खेळणारे जुगारी देखील होते. खादीची प्रवृत्ती वाढविणारे लोकदेखील त्यांच्या प्रचार पुढे वाकून गेले हे खरे दुर्दैव आहे. पूज्य विनोबाजींबरोबर वर्षानुवर्षे पदयात्रा करणारे भक्तदेखील आजच्या भारताची स्थिती दानात मिळालेल्या मोटारने वेगाने हिंडून पाहतात व त्या वेगाचे, यंत्राने झालेल्या सोयीचे, गतीचे हरखून जावून वर्णन करताना आपण सर्वच आज पाहतो आहोत.
“गर्व से कहो, हम हिंदू हैं’ हे घोषवाक्य आपल्या घरांत ठळकपणे लावून त्यातील वाढून ठेवलेली पुढे आमंत्रित होणाऱ्या असहिष्णुतेची पुसटशीसुद्धा जाणीव मनात येवू न देता त्या कृतीत शौर्य, धर्मनिष्ठा शोधणारी माणसेही आपलीच आहेत. तेव्हा खादीला पुन्हा ऊर्जितावस्था आणणे जमले नाही तरीही आपण आज आपला स्वतःचा धीर खचू न देणे व आपले व्रत निष्ठेने पाळणे महत्त्वाचे आहे.
भ. पां. पाटणकर, ३-४-२०८ काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
एप्रिल २००१ च्या अंकातील श्री. प्र. ब. कुळकर्णी यांचा धर्मविषयक लेख आ.सु.च्या एकंदर भूमिकेशी विसंगत वाटतो.
“धर्माचा पूर्ण बीमोड केल्याशिवाय कोणत्याही सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणे अशक्य आहे” इति आ.सु. मार्च ९८. “आम्ही परमेश्वराचे अस्तित्व (आज तरी) सपशेल नाकारतो” इति आ.सु. ऑगस्ट ९९. त्याच अंकात मी असे म्हटले होते की “आम्हाला अन्याय दूर करायचा आहे” हे जर आ.सु.चे उद्दिष्ट असेल तर त्याकरता ‘देव नाही, देव नाही’ असे ओरडत बसण्याची गरज नाही, गांधींनी देवाचे नाव घेऊनच अन्यायाशी लढा दिला. त्यावर संपादकांचे उत्तर असे की ‘ज्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे त्यांनी समता आणण्यासाठी सामान्यजनांच्या दानबुद्धीला आणि न्यायबुद्धीला आवाहन केले आहे. तेवढ्याने समता येत नाही . . . आप्तवाक्य-प्रामाण्य मानणारा असा स्वभाव देवा-धर्मावर विश्वास असणाऱ्यांचा असतो . . . (ते) समाजसुधारणेशी संबंधित नसतात . . . त्यामुळे समाजामध्ये जे परिवर्तन घडवावयाचे आहे त्याची सुरवात परमेश्वराचे अस्तित्व नाकारण्यापासून करणे आम्हास इष्ट वाटते (सप्टेंबर ९९)
अशा रीतीने देवाधर्माशी पूर्णपणे कट्टी करणाऱ्या आ.सु.त “(हिंदू) धर्म काय किंवा धर्मग्रंथ काय अपौरुषेय नाहीत, पूर्णपणे बुद्धिगम्य आहेत” (सप्टेंबर २०००) या दप्तरी-मताची वकिली प्र. ब. कुळकर्णी यांनी करावी हे विसंगत नाही काय?
हिंदू धर्म बुद्धिगम्य आहे असे ज्याप्रमाणे दप्तरी म्हणतात त्याप्रमाणे इस्लाम धर्म बुद्धीला पटणारा आहे असे असगर अली इंजीनिअरही म्हणतात त्यांना मी जे पत्रद्वारे म्हटले तेच इथे म्हणतो.
(1) “If you are in a position to know, through reason, what is good and what is bad, where is the need for a revelation?”
(2) There are many religious doctrines which are beyond the scope of present day human knowledge.
(3) The third problem is the effect of riding two horses at a time (faith and reason). If you see the other man riding two horses, simply say that he is a Kafir. If the tussle is within yourself, you spend all your energies in finiding a ‘reasonable interpretation of the given doctrine.”
माझी भूमिका मी या आधी चारपाचदा आ.सु.मध्ये मांडली आहे. ती पुरेशी स्पष्ट मांडली गेली नाही असे आ.सु. जानेवारी २००१ मधील संपादकीय प्रतिक्रियेवस्न वाटते. तेव्हा माझी भूमिका सारांश-स्पाने पुन्हा एकदा मांडतो.
(१) मी ईश्वराचे अस्तित्व मानलेले नाही. (२) पुनर्जन्म, कर्मविपाक हे सिद्धान्त मानलेले नाहीत.
(३) धर्म हे अन्यायाचे मूळ आहे असे मी मानत नाही. अन्यायाचे मूळ निसर्गनिर्मित असमतेत आहे. निसर्गाने कुणाला सशक्त कुणाला अशक्त, कुणाला बुद्धिवान कुणाला अल्पमति असे निर्माण केले आहे. समाजरचनेने या असमतेला वाढवले आहे इतकेच.
(४) ही असमता फक्त निधर्मी मार्गांनीच दूर केली पाहिजे असा माझा आग्रह नाही. गांधींसारख्या धार्मिक लोकांनी प्रस्थापितांच्या दानबुद्धीला व न्याय बुद्धीला आवाहन करून काही साधले तर त्याचे महत्त्व मी कमी लेखत नाही.
(५) मी स्वतः ‘प्रस्थापित’ या वर्गात मोडत असल्यामुळे, दानबुद्धीने म्हणा किंवा न्यायबुद्धीने म्हणा, इतरांची मदत करणे मी माझे कर्तव्य समजतो.
(६) असे करणे म्हणजे जीवनाला ‘सुंदर बनवणे’ अशी माझी ‘भावना’ आहे. ते सौंदर्य मी बुद्धिवादाने सिद्ध करू शकत नाही.
(७) ज्यांना तसे सौंदर्य धर्माच्या द्वारे मिळत असेल त्यांच्या धर्मभावनेवर मी ‘विवेकवादाच्या’ नावाने टीका करू इच्छित नाही.
(८) कर्मसिद्धान्त, पुनर्जन्म, ब्रह्म या ‘परिकल्पना’ आहेत हे कुळकर्णी यांचे मत मला पटते. इतर कल्पना पुढे मांडायला आपण मोकळे आहोत हेही त्यांचे म्हणणे पटते. याच अर्थाने मी ‘मिथकांचे नवीनीकरण’ ही कल्पना डिसेंबर २००० च्या अंकात मांडली होती. ही परिभाषा मुळात सिलोनी प्राध्यापक गणनाथ अभयशेखर यांची.
[१. ईश्वर, पुनर्जन्म, कर्मविपाक ह्या मी मानत नाही, कारण त्यांना विवेकाचा आधार नाही. श्री. पाटणकर स्वतः त्या कल्पना मानत नाहीत, हे ठीक —- पण ते त्यांना ‘असोत बापड्या’ या नमुन्याची मान्यता मात्र देताना दिसतात. ते त्या कल्पना मोडीत काढत नाहीत. (इथे अल् बिरुतीचे दोनेक अंकांपूर्वी पहिल्या पानावर दिलेले अवतरण आठवावे!)
२. असमानता निसर्गात आहेच. पण अन्याय मात्र मानवी समाजरचनेतूनच येतो. निसर्गव्यवहार निरपेक्ष— उदासीन-(इंडिफरंट या अर्थी) असतात. आज समाज-रचनेचे ‘कर्तृत्व’ धर्माकडे आहे. म्हणून मी धर्म हे अन्यायाचे मूळ मानतो.
३. दानबुद्धी-न्यायबुद्धीला आवाहन करून काही साधते, हे विवाद्य आहे. आणि आवाहनांची जागा संस्थांनी घेण्यात, नियमांकडून आवाहनांचे काम करवून घेण्याच्या बाबतीत धर्मांचे ‘प्रगति पुस्तक’ आशादायी नाही. पाटणकरांची भूमिका मला अत्यंत अल्पसंतोषी वाटते.
४. दान-न्यायबुद्धींना केलेल्या आवाहनांना प्रतिसाद देणे, हे व्यक्तिगत झाले. मला ते समाजरचनेचा भाग होऊन हवे आहे. पाटणकरांची सौंदर्याची कल्पना/भावना सामाजिक संस्थांमध्ये परिणत होण्याने चांगले होणार आहे, की वाईट? जर चांगले होणार असेल, तर असे सामाजिकीकरण पाटणकरांनाही जास्त सुंदर वाटायला हवे.
५. मिथकांचे नवीनीकरण या शब्दप्रयोगाने काही प्रमाणात तरी ‘जैसे थे’ वृत्तीला आधारच मिळतो. आणि नवीनीकरणाची पहिली पायरी म्हणून जुन्याला ‘पाडावे’ ही माझी वृत्तीही मी नोंदलीच आहे. उमर खय्यामची स्वाई पहा, ज. के. उपाध्यांनी भाषांतरित केलेली —-
“उत्कंठेने तरुणपणि मी भेटलो पंडितांना तेथे त्यांचे विविधविषयी ऐकिले वाद नाना ऐसे तैसे विवदति बहू निर्णयासी न येता गेलो तैसा परत फिरलो काहिही लाभले ना”.
आता मी माझ्या पुरता ‘निर्णयासी’ येऊन काही लाभ घेऊ इच्छितो. केवळ ‘ऐसे तैसे’ म्हणत बसण्यातला माझा ‘रस’ संपलेला आहे. मला सौंदर्य वाढून हवे आहे —- आहे त्यात समाधान नाही!
पण पाटणकरांची भूमिका स्पष्टच होती आणि आहे. त्यावर माझीही भूमिका स्पष्टच होती आणि आहे. आणि आता ‘तत्त्वचर्चे’ पेक्षा उपयोजनावर भर वाढेल असा मजकूर पुरवणे मला निकडीचे वाटत आहे. —- संपादक
सुनीति नी. देव, ‘कर्मयोग’, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२ भयमुक्त शिक्षणासाठी एक प्रतिक्रिया

आजचा सुधारक, मे २००१, (१२.२) ह्या अंकात विद्यागौरी खरे ह्यांचा ‘भयमुक्त शिक्षणासाठी’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांशी सहमती व काही मुद्द्यांशी असहमती दर्शविण्यापूर्वी दोन शब्द लेखाला दिलेल्या शीर्षकाविषयी! ‘भयमुक्त शिक्षणासाठी’ हे शीर्षक वाचून माझ्या मनात लेखाविषयी जी कल्पना उभी राहिली ती अशी की भयापासून मुक्त असे शिक्षण मिळविण्यासाठी सुचविलेला पर्याय कदाचित् लेखिकेने ह्या लेखात दिलेला असावा. परंतु लेख वाचल्यावर त्यात काही मुद्दे, ज्यांच्याविषयी सर्वसाधारण दुमत होण्याचे कारण नाही असे मांडले आहेत, काही विवाद्य आहेत व लेखाच्या शेवटी जॉन होल्ट ह्या शिक्षकाने लिहिलेल्या दोन पुस्तकांमधील काही मुद्द्यांचा गोषवारा देऊन ती शिक्षणाशी संबंधित सर्व व्यक्तींनी वाचावी अशी शिफारस केली आहे. असो.
सुरुवातीला मी लेखिकेने उपस्थित केलेल्या ज्या बऱ्याच मुद्द्यांशी सहमत आहे हे त्यावर टिप्पणी न करता, नमूद करते. आता ज्या मुद्द्यांशी मी असहमत आहे. त्यांची केवळ नोंद न करता त्यावर टिप्पणी करून लिहिण्याचा विचार आहे.
(१) पहिला मुद्दा असा की ‘मुलांच्या शाळेतील अपयशामागे भीती हे एकच (तिरपा ठसा माझा) महत्त्वाचे कारण आहे’ शाळेतील अपयशाचे भीती हे इतर कारणांपैकी एक कारण असेल, पण एकच कारण आहे असे म्हणण्याचे कारण नाही. इतरही अनेक कारणे आहेत. आपल्याकडे दहावी पर्यंत गणित/विज्ञान सर्वांना सक्तीचे आहे. ह्या मागील उद्देश चांगला आहे. तो असा की ह्या शास्त्रांचे निदान प्राथमिक (elementary) ज्ञान तरी प्रत्येक विद्यार्थ्याला असावे. परंतु ह्याचा तोटा असा होतो की बुद्धिमान, सर्वसाधारण कुवत असलेले, बेताची कुवत असलेले सर्वच विद्यार्थी एकाच वर्गात बसतात व लेखात म्हटल्याप्रमाणे ६०-७० विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये शिक्षकांला प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष घालता येत नाही. त्यामुळे एखादा विषय प्रथमपासूनच कच्चा राहतो. उदा. गणित, पदार्थविज्ञान, इंग्रजी इ.
ह्यात पुन्हा आजच्या बदललेल्या कौटुंबिक वातावरणाची भर पडते. आई-वडील दोघेही नोकरीनिमित्ताने बाहेर, मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायला वेळच नाही, प्रगति-पुस्तकात एखाद्या विषयात पाल्याला कमी गुण पडले का? त्या विषयाची शिकवणी लावून टाका. (पालकांचे कर्तव्य (!) संपले). शिकवणी वर्ग ही शाळेचीच छोटी आवृत्ती! तेथेही जातीने लक्ष द्यायला शिक्षकाला वेळच नसतो. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या विषयाच्या पाया कच्चा तो कच्चाच राहतो. भीतीखेरीज वरील दोन कारणे मी नोंदविली. अन्यही नमूद करता येतील. (विस्तारभयास्तव त्यावर आणखी भर न देता मतभेदाचे अन्य मुद्दे नोंदवते.)
(२) ‘आपण अयशस्वी ठरू ह्या भीतीपोटी कॉपीचा अनुचित मार्ग अनुसरला जातो.’
हे कितपत खरे आहे? सत्रभर अभ्यास करायचा नाही, वर्गात शिकविले जाते तेव्हा लक्ष द्यायचे नाही, परीक्षा ऐन तोंडाशी आली की पुस्तके उघडायची, मग पास होणार कसे? आजच्या पद्धतीने घेतलेल्या परीक्षेतसुद्धा! आणि मग कॉपी करायची! कॉपी कस्नही पास होतीलच ह्याची खात्री नाही. कोणत्या प्र नाचे उत्तर कसे व किती लिहायचे हे तरी किमान माहीत असायला हवे ना? विनासायास, श्रम–मेहनत न घेता जर मला परीक्षेत ‘उत्तीर्ण'(!) होता आले तर हवेच आहे. या ठिकाणी देखील बदललेले सामाजिक वातावरण लक्षात ठेवायला हवे. श्रम न करता लठ्ठ पगार घेणाऱ्या व्यक्ती समाजात थोड्या नाहीत. ही चैन आपणही करून पहावी हाही विचार मनात येणे स्वाभाविक आहे. सर्व प्रकारच्या धोक्यांमधून स्वतःची वाट योग्य त-हेने निवडणे सोपे नाही अन् मग अनुचित मार्गाला बळी पडण्याची संभाव्यता नाकारता येत नाही.
(३) तिसरा मतभेदाचा मुद्दा असा की ‘शिक्षणाच्या संदर्भात कुठलेही स्वातंत्र्य शिक्षकाला असत नाही. अभ्यासक्रम ठरवणे, क्रमिक पुस्तके ठरवणे हे सगळे निर्णय घाउक पद्धतीने घेतलेले असतात.’ वास्तविक अभ्यासक्रम ठरविणे, क्रमिक पुस्तके ठरवणे, ती कोणत्या लेखकाकडून (शिक्षकाकडून) लिहून घ्यायची हे ठरविणे हे सर्व शिक्षकांचाच प्रातिनिधिक गट ठरवीत असतो. (वरील अवतरणातील ‘. . . हे सगळे निर्णय घाऊक पद्धतीने घेतलेले असतात’ म्हणजे काय? मला त्याचा अर्थ कळला नाही). शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा. ‘शिक्षणातील प्रचलित स्ठी आपण सगळे फार निमूटपणे स्वीकारतो आहोत का? विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आणि त्यांचे ज्ञान ह्यांचा कुठलाच ताळमेळ नसलेल्या परीक्षा आपण का स्वीकारतो आहोत?’
वरील दोन्ही प्र नांची उत्तरे अनिच्छेने का होईना होकारार्थी द्यावी लागतील. हे मान्य आहे की आज शिक्षण व्यवसायात (हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरते आहे.) खूपच अप्रिय गोष्टी आलेल्या आहेत. त्या कोणत्याही संवेदनाशील व्यक्तीला मान्य होण्यासारख्या नाहीत. तरीही आहे ती शिक्षण-व्यवस्था मोडीत काढून पर्यायी यंत्रणा उभी करण्याची कुवतही ह्या व्यक्तींमध्ये नाही. मग करायचे काय? मुलांना शिक्षण देणे तर भाग आहे. शिक्षण-क्षेत्रातील भ्रष्टाचारापासून त्याला दूर ठेवायचे असेल तर शिक्षणाची पहिली पायरीच चढू द्यायची नाही असे तर करता येणार नाही. शिक्षण-क्षेत्रातील भ्रष्टाचार, त्यात गुंतलेल्या व्यक्तींची संख्या, त्यांचे परस्परांशी असलेले लागेबांधे, राजकीय हस्तक्षेप या सर्व घटकांची एक शिस्तबद्ध (!) साखळी असते. त्यातील कोणत्याच कडीवर संवेदनशील व्यक्तींचा काबू नसतो. वातावरण आहे हे असे आहे. त्यात स्वतः लिप्त न होता आपला मार्ग आखून त्याप्रमाणे चालणे एवढेच काय ते संवेदनशील व्यक्तींचा हातात असणार.
त्यातही गंमत अशी की संवेदनशील व्यक्ती मूठभर आणि निष्प्रभ आहेत. ह्या सगळ्या वातावरणाशी जुळवून (!) घेणाऱ्यांची संख्या भरमसाठ आहे. शिकवणी-वर्गाची न परवडणारी फी देणारे आहेतच ना? पेपर कोठे गेला हे पाहणारे, त्यातील गुण वाढवून घेणारे आहेतच ना? गुणानुक्रमे नंबर आणण्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारणारे आहेतच ना? ही सर्व परिस्थिती भोवळ आणणारी आहे. पण तरीही ती मोडकळीला न येता अधिकाधिक पक्केपणाने रुजतेय. काळाचा महिना आणखी काय?
अनुजा रोहित, ८०४ बी, भांडारकर रोड, पुणे — ४११ ००४

फेब्रुवारी २००१ अंकातला चिं. मो. पंडितांचा लेख आणि त्यावरच्या एप्रिल २००१ अंकातल्या द. रा. ताम्हणकर आणि शांता बुद्धिसागर या दोघांच्या प्रतिक्रिया वाचल्या. गंमत वाटली. मी अगदी तरुण मुलगी आहे आणि नोकरी करणारीही. म्हणून घरातल्या सगळ्यांनीच निदान आपापली कामे तरी करावीत अशी माझी किमान अपेक्षा आहे. त्यासाठी सगळ्या गृहकृत्यांची जबाबदारी एकट्या पुरुषानंही उचलण्याची जरूर नाही आणि एकट्या बाईवरही ती पडू नये. घर सगळ्यांचेच असते तर एकाने ऑफिसमधून आल्यावर पेपर वाचत पडायचे आणि दुसऱ्याने लगेच कट्याशी उभे राहायचे हे आपल्या सदसद्विवेकबुद्धीला तरी पटते का?
घरातल्यांना चमचमीत, चविष्ट पदार्थ करून खायला घालायचे. कामावर असताना, ‘बायका काय माझी साडी -तुझी साडी, आज काय केले, परोठे कसे करायचे ग? अग! परवा मी डोसे केले होते. अशाच गप्पा मारत असतात’ असे पुरुषांचे टोमणे मुकाट्याने ऐकायचे. पण अशा गप्पांमधूनच माहीत झालेले काही नवीन पदार्थ आपण जिभल्या चाटत खातो की नाही? ‘बायका काट्यावर काटा यायच्या आधीच आवरून घरी जायला तयार. आम्हाला थांबावे लागते.’ असे म्हणताना आपल्या घरची बाई उशीरा घरी यायला लागली की ‘उशीरा जेवू’ असे म्हणायची आहे का तयारी? बायकोला उशीर होतोय तर आज आपण स्वैपाक करू असे पुरुष म्हणायला लागले तर जास्त वेळ थांबतील की बायका ऑफिसमध्ये!
बरे, काही जणांना उच्चशिक्षित बायको हवी असते. पण तिने नोकरी नाही करायची. मजाच आहे बुवा! मग तिने शिकायचे कशाला एवढे. तुमची धुणी धुवायला? का तिने स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे असू नये?
बायको पुष्कळ शिकलेली, सुंदर, भरपूर पैसे कमावणारी, सुगरण, पोरं पैदा करणारी, सगळ्यांना सांभाळणारी, ‘माझ्या आईवडिलांची सेवा करणारी, आज्ञा-धारक, माझे ऐकणारी, प्रत्युत्तर न करणारी, पाहुणेरावळे हसतमुखाने सांभाळणारी, माझी Relations जपणारी अशी पाहिजे बुवा! मग ती वयाने थोडीशी मोठी . . . चालेल! दुसऱ्या जातीचीही हरकत नाही. वेळ येईल तेव्हा घरात थोडीफार मदत करायला माझी तयारी आहे पण नेहमी नाही जमणार बुवा! आहे की नाही मी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कर्ता! अशिक्षित मुलगी नकोच. मुलींनी खूप शिकावे. शिकलेच पाहिजे. वैचारिक पातळीवर चर्चा वगैरे करायला बरे असते. नाहीतर मी एक सांगतोय अन् तिचे लक्ष पोळ्या न् भाकऱ्यांत!
स्त्री-पुरुष समानता याला म्हणतात का रे भाऊ?
दुसरे एक, माणूस हा मृत्यूनंतरच निवृत्त होतो हो, पण पैसा घेऊन काम करताना ‘केलेच पाहिजे’ ही भावना असते. ती सेवानिवृत्त झाल्यावर नसते. नोकरदार माणसासाठी! गृहिणीला मात्र वाटते, ‘इतकी वर्षे पोळ्या लाटल्या, आता बास्! पुरे आता.’ तर पोळ्यांशिवाय राहणार का माणसे? विकत सगळेच मिळते हो. पण ते ‘दार’चे मिळेल. ‘घर’चे नाही. घरचे ते घरचेच शेवटी! पोळ्या बाईला कराव्याच लागतात. पुन्हा पगारी नोकरी ८ ते १० तासांची, त्यानंतर कुणी ‘ऊठ काम कर’ म्हणत नाही. गृहिणी २४ तासांची बिनपगारी नोकरदार, तिला हक्काची विश्रांती नाही. ‘अमुक काम माझे नाही’ हे म्हणायचा अधिकारही नाही. लगेच गृहिणीपदाला बट्टा लागतो. तात्पर्य, अनेक कामे तिला नाईलाजानेच गृहिणीचे कर्तव्य म्हणून ओढावी लागतात.
‘स्त्री’ त्यागाची मूर्ती असते, स्त्री अल्प काळची पत्नी आणि अनंतकाळची माता असते. पण प्रेम करण्यासाठी एक मूल पुरेसे असते आईला. ७/८ पोरे पैदा करण्याची हौस तिला निश्चित नसते. पण पुरुषांनी पर्यायाने समाजानेही ही वाक्ये ठोकून–ठोकून इतकी तिच्या डोक्यात भरून ठेवली आहेत की ते ओझे पेलत नसता-नाही ती बाळगते आणि निम्म्यात आयुष्य असतानाच अॅनिमिक होऊन वैकुंठाच्या वाटेला लागते. अलिकडेच माझ्या डॉक्टर मैत्रिणीशी मी बोलत होते. ती म्हणली डिलिव्हरी-नंतर दुसऱ्या तासाला बाईला नेऊ का म्हणून नातेवाईक विचारतात. कारण घरी करायला कुणी नाही. अडचण होते. हे मध्यमवर्गीय नाही. ग्रामीण जनता जी भारतात ७५% असावी बहुतेक. अशावेळी मुलीने स्वतःच्या गृहकृत्यांचा हिशेब पैशात केला तर त्याला दोषी कोण? ती मुलगी का समाज? चिं. मो. का द. रा? समाज म्हणजे कोण?
शहरातल्या झोपडवस्त्यातल्या बायका दवाखान्यात येतात पण पुरेशी विश्रांती न घेताच त्यांना परत नेले जाते. आपल्याला दवाखान्यात जावे लागते हे त्या बायकांनाही अपराधीपणाचे वाटते. त्यांना विश्रांती घेण्याची मुभा नाही. सगळेच स्त्रीच्या प्रेमाची आणि त्यागाची कदर करणारे असते तर मेडिकल सर्व्हेत बायकांच्या पुढे लागलेल्या अॅनिमिक, कुपोषित, दुर्बल, अशक्त ह्या विशेषणांचे प्रमाण कमी असायला हवे किंवा नकोच असायला हवे. पण ते तसे नाही. मग काय करायचे? भारताला स्वातंत्र्य मिळून ५० वर्ष झाली. बाई कधी स्वतंत्र होणार? तिला हक्काची विश्रांती कधी मिळणार? डार्विनच्या सिद्धान्तानुसार प्रत्येक सजीव परिस्थितीप्रमाणे बदलत असतो. त्याने बदलायलाच हवे. तरच समाज पुढे जाईल. अन्यथा आपण आदिवासीच नसतो का?
प्रभा हर्डीकर, अनुबंध अपार्टमेंट, प्लॉट नं. १८, नीलकमल सोसायटी, कर्वेनगर, पुणे — ४११ ०५२

श्री. चिं. मो. पंडित यांच्या फेब्रुवारी २००१ च्या आजचा सुधारक या मासिकातील, ‘मी गृहिणी होते’ या लेखावरील श्री. द. रा. ताम्हनकर यांची प्रति-क्रिया वाचून आपल्या पारंपारिक पुरुषप्रधान संस्कृतीचे फिरून एकवार दर्शन घडले. एकविसाव्या शतकातही स्त्री-जन्माचे भोग फारसे बदललेले नसणार याचा प्रत्यय आला. कुटुंबात आणि समाजात नेहमी Dirty Work असते, जे पूर्वी शूद्राच्या माथी मारलेले असे, ते नव्या व्यवस्थेत यंत्राच्या माथी मारले जाते–इति ताम्हनकर उवाच–तथापि ज्याला ते काम केल्याशिवाय गत्यतंर नाही असे म्हणताना, ताम्हनकर या कामासाठी कुठला वर्ग सुचवू इच्छितात? विजेवर चालणाऱ्या यंत्राची हमी कोण देणार? खेरीज, एकवेळ यंत्र चालवीन. पण हाती झाडू घेणार नाही असा पुरुषी युक्तिवाद आपण आणखी किती काळ गृहीत धस्न, नकळत त्याचे समर्थन करीत बसणार? की तसा युक्तिवाद करणाऱ्यांचा ‘अहं’ सांभाळीत बसणार? आपला घरातील गृहिणीपद, येऊ घातलेल्या सुनेच्या गळ्यात घालण्याचा विचारही न करता, श्री. पंडित किती जबाबदारीने, कौशल्याने ते गृहिणीपद पार पाडीत आहेत याचा पुरावा म्हणून गृहिणीच्या अनंत कामांची त्यांनी केलेली तपशीलवार नोंद पुरेशी आहे — भरपूर बोलली आहे. ‘आधी केले मग सांगितले’ याचा वस्तुपाठच जणु!
हातपाय हलविल्याशिवाय भागत नाही’, एवढाच गृहिणीच्या निवृत्तीचा अर्थ घेणे योग्य आहे का? या बाबतच्या तिच्या मतांचा, इच्छा. आकांक्षांचा गांभीर्याने कुणी विचार केला आहे का? तिची सर्व कामे शक्यतेच्या आणि समाज-व्यवस्थेच्या दृष्टीने पुरुषांनी करणे संभाव्य नाही हे विधान कोणत्या तत्त्वाला धस्न आहे? सुदैवाने पूर्वीची वर्णव्यवस्था आज अस्तित्वात नसल्यामुळे ‘जेनू काम तेनू थाय’ ही म्हण केव्हाच कालबाह्य झालेली आहे.
एखादे काम समाजात जेव्हा हलके, श्रम अधिक, प्रतिष्ठा शून्य असे मानले जाते, ते आपल्या वाट्याला कधीही येऊ नये या उदात्त (!) हेतूने ते काम करणाऱ्या व्यक्तीला प्रेम व त्याग याची मूर्ती बनवणे, मानभावीपणाचा आव आणून, तिच्याइतका त्याग व प्रेम पुरुषांना जमणार नाही अशा त-हेची अशास्त्रीय, सांकेतिक विधाने करीत, तिचे माणूसपण नाकारणे यामागील मूळ कावा लक्षात न येण्याइतका भाबडेपणा, सुदैवाने अथवा दुर्दैवाने स्त्रीच्या ठायी आता राहिलेला नाही. निव्वळ किताब बहाल केल्याने मूळ भूमिकेत फरक पडत नसेल तर त्याचे यत्किंचितही प्रलोभन न वाटता त्या किताबांची किंमत शून्यवत्च ठरते.
ताम्हनकरांच्या मनात आणखीही एक भीति दडलेली आहे समजा, गृहिणीपदापासून सुटका म्हणून दिलेली पंधरा दिवसांची मुदत पुरली नाही तर . . . दरमहा तशी सुट्टी मागितली तर . . . आजतागायत हे पद नेकीने संभाळणाऱ्या असंख्य स्त्रियांऐवजी असंख्य पुरुषच आज हे पद भूषविताना दिसले असते! दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. यातच त्यांच्या शंकेचे उत्तर मिळावे!
लग्नाळू मुलीच्या अटी विलक्षण व अवास्तव वाटतात; पण ते तशाच विना मोबदला, जिकीरीच्या, कधीही न संपणाऱ्या, प्रतिष्ठा नसणाऱ्या, गृहीत धरलेल्या अशा घरकामाचे वास्तव, परखड मूल्यमापन आहे. त्या कामाची भरपाई इतक्या मोठ्या रकमेनेच होऊ शकते एवढे सिद्ध करण्यासाठी. आजवर झालेल्या अवहेलनेची, उपेक्षेची मोजलेली ती किंमत आहे. ज्वालेचा फक्त ऊब उपभोगणाऱ्यांना तिचे चटके कसे समजावे? तात्पर्य, स्वतःला बदलणे सोयीचे नसल्यामुळे, काळानुरूप इष्ट असे अपरिहार्य गरजेचे बदल इतरांनीही न स्वीकारता, प्रेम, कदर यांच्या शाब्दिक वर्षावात तृप्त राहून, आपण सुखा-समाधानात राहून (!) इतरांनाही त्याचा लाभ द्यावा, या परते उचित दुसरे काय असू शकते श्री. ताम्हनकरांच्या मते!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.