पत्रसंवाद

न. ब. पाटील, अ-३७, कमलपुष्प, वांद्रे रिक्लमेशन, मुंबई — ४०० ०५०
सृष्टिज्ञान मासिक ७३ वर्षांचे झाले. मराठी विज्ञान परिषदेनेही पस्तिशी ओलांडली. विज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे हेच ह्या दोघांचेही उद्दिष्ट आहे. मागे वळून पाहण्याच्या उद्देशाने त्या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे पुण्यात एक छोटासा मेळावा दि. १९ व २० मे २००१ रोजी आयोजित केला होता. या प्रसंगी ‘विज्ञान वाङ्मय निर्मिती’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजले होते. एका सत्रार्धाचे अध्यक्षत्वही मी केले. दि. १९ रोजी दुपारी १२.३० वाजता हे चर्चासत्र सुरू झाले. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संपादन विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. प्र. ना. परांजपे यांचे बीजभाषण झाले. मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष श्री. अ. पां. देशपांडे हे या प्रसंगी अध्यक्ष होते. मराठीत लिहिले जाणारे विज्ञान-वाङ्मय, वाचकांशी संवाद साधण्यात कधी कधी कसे तोकडे पडते, हे यावेळी प्रा. परांजप्यांनी सांगितले. त्यांनी एक विज्ञानविषयक लेख वाचून दाखवला आणि वाक्प्रचार, व्याकरण यांची पुरेशी जाण लेखकाला नसेल तर त्याचे लिखाण दुर्बोध होते, हे त्यांनी सांगितले. वैज्ञानिक लेखन करणाराने मराठी भाषेच्या धाटणीचाही अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. अध्यक्ष श्री. देशपांडे यांनीही प्रा. परांजपे यांचे काही मुद्दे अधिक स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या शास्त्रीय व तांत्रिक शब्दावलीतील काही शब्द संस्कृतच्या प्रभावामुळे क्लिष्टतर झाले आहेत, इकडे श्री. देशपांडे यांनी सभेचे लक्ष वेधले.
प्रा. परांजपे यांच्या बीजभाषणावर बरीच चर्चा झाली. पारिभाषिक शब्दांच्या क्लिष्टतेसंबंधात मी शासकीय दृष्टिकोण स्पष्ट करावा असे अध्यक्षांनी आवाहन केले. कारण भाषा संचालनालयातील शब्दावलि-निर्मितीच्या कामाशी मी २० वर्षांहून अधिक काळपर्यंत संबंधित होतो. परिभाषा-निर्मिति-कार्यक्रमाचा इतिहास, कार्यपद्धती, या संबंधीची केंद्र व राज्य शासनाची मार्गदर्शक तत्त्वे, भाषा-समृद्धीसाठी संस्कृत भाषेचा, संविधानातील तरतुदीनुसार करावा लागणारा उपयोग, अन्य भाषेतील शास्त्रीय व तांत्रिक शब्दांबरोबर साधावयाची एकरूपता, काही शब्दांच्या बाबतीत अर्थवाहकतेच्या दृष्टीने क्लिष्टतेशी करावी लागणारी तडजोड, इत्यादी मुद्दे मी मांडले. मी असेही सांगितले की, आता विज्ञान-वाङ्मय-निर्मितीमध्ये मुख्य अडचण परिभाषेची नसून मराठी धाटणीच्या वाक्यरचनेची आहे. इंग्रजीच्या प्रभावामुळे ही शैली दिवसेंदिवस आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे आता खरी गरज आहे ती मराठीच्या प्रगत अशा भाषिक अध्ययनाची. शाळांतून आणि कनिष्ठ महाविद्यालयातून मराठीच्या सखोल अध्ययनाला अधिक प्राधान्य मिळावयास हवे. अन्यथा स्थिती आणखी बिघडत जाईल.
दुसऱ्या दिवशी पुणे विद्यापीठातील मराठी-विभाग-प्रमुख, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली; मेधा नागराज, (का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्र) यांनी “मराठी विज्ञान-वाङ्मयात सृष्टिज्ञानचे योगदान’ ह्या विषया-वरील आपला निबंध सादर केला. त्यांनी गेल्या ६०-७० वर्षांतील सृष्टिज्ञान मधील लेखविषयांची वर्गवारी सांगितली. सुरवातीच्या आणि अलीकडील अंकांची तुलना करून विषयांचा आवाका कसा वाढत गेला हेही स्पष्ट केले. अध्यक्ष, डॉ. कोत्तापल्ले यांनी, मराठीतील संशोधनाच्या कक्षेत साहित्यिक विषयाबरोबरच अधिकाधिक सामाजिक विषयही यावयास हवेत असे सांगितले. डॉ. प्रभाकर सोवनी, भूशास्त्राचे प्राध्यापक, यांनीही सृष्टिज्ञानचा गेल्या ७२ वर्षांचा संक्षिप्त इतिहास सांगितला. आद्य संपादक-मंडळातील डॉ. गो. रा. परांजपे यांनी सृष्टिज्ञानला जवळ जवळ पाच दशके नेतृत्व दिले. सुरवातीच्या काळात लेखकांची उणीव भासत असे. त्यावेळी डॉ. परांजपे विविध विषयांवर स्वतःच अनेक लेख लिहीत व निरनिराळ्या नावांनी ते सृष्टिज्ञानमध्ये प्रसिद्ध करीत. सृष्टिज्ञानने विज्ञान-विषयाची गोडी निर्माण केली आणि ती दोन तीन पिढ्यांमध्ये रुजवली. नंतरच्या एका सत्रार्धात डॉ. स. ह. देशपांडे, मुंबई विद्यापीठातील कृषि-अर्थशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक, यांच्या अध्यक्षतेखाली, पुणे, मुंबई, नागपूर आणि अन्य ठिकाणांहून निघणाऱ्या विज्ञान, कृषी, खगोलशास्त्र इ. विषयांना वाहिलेल्या नियतकालिकांबद्दल प्रा. रा. वि. सोवनी (मराठी विज्ञान पत्रिका) डॉ. प्रभाकर सोवनी (उद्यम), हेमंत मोने (नभांगण), भा. कृ. क्षीरसागर इत्यादींनी माहिती दिली. बळीराजा, कृषीवल, शेतकरी इत्यादि शेतीविषयक नियतकालिकांबद्दलही माहिती देण्यात आली. कृषि-विषयक नियतकालिकांचा खप अन्य नियतकालिकांपेक्षा अधिक आहे हेही लक्षात आले. एरवी अन्य नियतकालिकांचा संसार ओढगस्तीचा व एकखांबी असल्याचे दिसून आले.
शेवटच्या सत्रात, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कोळस्कर यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी विज्ञान आणि नैतिकता या विषयावर विवेचन केले. पा चात्त्य देशांत संशोधनातील नीतिमत्ता कसोशीने पाळली जाते व संशोधनात खोटेपणा आढळून आल्यास अशा संशोधकांवर कडक कारवाई करण्यात येते. नवे रोग व त्यावरील नवीन नवीन औषधे यांचे योग्य परीक्षण न केल्यामुळे अनेक सामाजिक समस्या कशा निर्माण होतात, याचेही त्यांनी वर्णन केले.
या दोन दिवसांच्या चर्चासत्रात, विज्ञान-वाङ्मय-निर्मिती, शासकीय व तांत्रिक परिभाषा, कृषिविषयक संशोधन व संशोधन-प्रसार माध्यमे या सर्वच विषयांचे बरेच मंथन झाले.
आजचा सुधारकच्या विवेकवादी वाचकांना ह्या घटनेची माहिती मिळावी म्हणून हा वृत्तान्त आपल्याकडे पाठवत आहे.
ग. के. केळकर, १७ प्रफुल्ल, १४ जी. पास्ता रोड, दादर, मुंबई — ४०० ०१४

[श्री केळकरांनी २५ मे रोजी दोन पत्रे पाठवली. एक पत्र आ.सु.च्या मे च्या (१२.२) अंकातील बऱ्याच लेखांचे कौतुक करणारे आहे. दुसरे पत्र यशवंत
पाठक यांच्या पुणे सकाळच्या १८ मे २००१ मधील ‘नैवेद्य’ या लेखाबाबत आहे. खाली ‘नैवैद्य’ या लेखाचा केळकरांनी चर्चिलेला गाभा देऊन नंतर केळकरांचे पत्र देत आहे.]
“नैवेद्य म्हणजे सक्रिय क्षमतेचा विनम्र समर्पणभाव. स्वार्थापुरते दार लावून एकटे न चापता हे सर्वांचे आहे, असे मानून अर्पण करणे याला नैवेद्य म्हणतात. तो सोवळ्यात म्हणजे शुचिर्भूत मनाने अर्पण करावा. मी माझ्यापुरते ताटात घेऊन बकाबका खात सुटणे, ही आजची मॅक्डोनाल्ड संस्कृती नव्या पिढीचा घात करतेय. जनावरे खातात तसा पिझागर्दीचा घोडबाजार भरलाय. मी फक्त माझ्यापुरते ओरबाडून खायचे. कुठेही-कसेही उभे राहून अन्नाची नासाडी करायची. ही गर्दभश्रीमंती या शतकात मातली आहे. हा माज कधीही न येऊ देण्याची क्षमता नैवेद्यात आहे. कुळधर्म म्हणजे कौटुंबिक एकात्मता. ही व्यापक अर्थाने नैवेद्याच्या ताटातून जेव्हा व्यक्त होते, तेव्हा ती सामाजिक समरसता ठरते. श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन नैवेद्य संस्कृतीत कधीही नसते. विश्वाच्या कल्याणासाठी वैश्वदेव असतो. अतिथीचे पूजन असते. आधी नैवेद्याचे ताट अतिथीला द्यायचे. त्याला नमस्कार करायचा. तोच देव. त्याला देऊन मग आपण खायचे नि आपणाबरोबर सर्वांनी नैवेद्याच्या ताटातला प्रसाद ग्रहण करायचा. ‘इदं न मम’ या समर्पण भावनेतून निर्माण झालेली नैवेद्य ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती आहे. ती ज्यांनी जोपासली ती घरे आजही सांस्कृतिक बेटे आहेत. माणूस माणसाला जोडण्याचे सामर्थ्य नैवेद्यात आहे. वडिलांना मान देण्याची नम्रता नैवेद्यात आहे. यातला आपलेपणा हीच एकात्मता आहे.” (यशवंत पाठक : नैवेद्य) ।
नुकतेच माझ्या वाचनात, पुणे सकाळच्या १८ मे च्या पुरवणीतील ‘नैवेद्य’ या शीर्षकाचे व प्रसिद्ध साक्षेपी लेखक यशवंत पाठक यांनी लिहिलेले एक स्फुट आले. ते मला खूप भावले. त्यासंबंधात विचारांती या पत्राद्वारे मी आ.सु.मध्ये काही प्र न उपस्थित करू इच्छितो. त्यांवर आ.सु.च्या वाचकांकडून चर्चा व्हावी असे मला वाटते.
“मेंदू बुद्धी व मन यांचा परस्पर संबंध काय? विचार समज, भावभावना या सर्व संवेदनांचे आकलन आपल्याला मेंदूद्वारे होते. केवळ तर्काद्वारे व बुद्धीला पटेल तेवढेच व विज्ञानाच्या कसोटीला उतरेल तेवढेच सत्य किंवा स्वीकार्य असे ठरवले तर केवळ मनालाच समजणारे व पटणारे असे जे विषय असतील त्यांचे काय? सोबतच्या ‘नैवेद्य’ किंवा त्यासारख्या संकल्पनांमागे समाजाचे देणे, पर्यावरणाचे व पर्यायाने सृष्टीवरील अन्य जीवजंतू, वनस्पती यांचे भान ठेवणे, माणसामाणसांमधील स्नेहभाव वाढविण्याची प्रक्रिया यांसारख्या समाजधारणेच्या संकल्पनांचा किंवा उपक्रमांचा उद्देश असतो. अशा अनेक उपक्रमांची मालिका ही एखाद्या मानवसमूहाची संस्कृती म्हणता येईल. आजकाल संस्कृती या शब्दानेच अनेकांना दचकायला होते. म्हणून आपण त्याला त्या त्या समूहाची जीवनपद्धती किंवा रीत म्हणू या. जगातील वेगवेगळ्या मानवसमूहांची जीवनपद्धती, स्थानिक परिस्थितीप्रमाणे आणि विचारसरणीनुसार वेगवेगळी असू शकते. वेगवेगळे अविष्कार दर्शवणारी असू शकते. जोपर्यंत अशी ‘संस्कृती’ ही अन्य मानवाच्या जिवावर उठणारी नसेल तोपर्यंत तिच्याबद्दल कोणालाही आक्षेप घेण्याचे कारण नाही. ती ज्या प्रमाणात मानवजातीला हितकारक असेल, पृथ्वीवरील संपत्तीचा हव्यास न ठेवता काटकसरीने उपयोग करण्याची शिकवण देणारी असेल त्या प्रमाणात ती जास्त किंवा कमी स्वीकारार्ह किंवा अनुकरणीय असेल असे आपण म्हणू शकतो का?
अशी जीवनपद्धती माणसाकडून सदैव आचरणात येत राहावी यासाठी जे उपक्रम किंवा कर्मकांडे (यांत मला नुसत्या पूजाअर्चा अभिप्रेत नाहीत तर सणवार, उपवास, वातावरणातील बदलानुसार आहारविहारातील अर्थपूर्ण बदल किंवा नियंत्रणे इ. अनेक) समाजधुरीण ठरवून देतील, त्यामध्ये केवळ विज्ञानाधिष्ठित विचारच उपयोगी असेल का? किंवा असावा का? मग मन, अंतःकरण ह्या सारख्या संज्ञांतून निर्देशित होणाऱ्या संकल्पनांचे काय? वैद्यकीय उपचारांमध्ये आणि माणसाच्या घडणींमध्ये माणसाच्या मनाचा मोठा भाग असतो असे आता जे अनेक देशीविदेशी शास्त्रज्ञ, संशोधक आणि विचारवंत त्यांच्या प्रयोगांनंतर सांगत आहेत त्याचे काय? माणसाच्या चांगल्या-वाईट घडणीमुळे आणि त्यामुळेच तयार होणाऱ्या मानवसमूहाच्या (समाजाच्या) निर्मितीमध्ये विज्ञान व तर्क याशिवाय मनाच्या मशागतीचा सहभाग कसा व किती असावा? वर समाजधुरीण असा जो शब्द मी वापरला आहे तो अशा अर्थाने की, सामान्य माणसाला सर्व क्षेत्रांत संशोधन, निष्कर्ष व उपाययोजना इ. प्रक्रियेत भाग घेता येत नाही. तेव्हा त्या त्या क्षेत्रातील (वैद्यक, समाजशास्त्र, मानसशास्त्र इ. अनेक) तज्ज्ञ या अर्थाने समाजधुरीण हा शब्द वापरला आहे. अशा धुरीणांनी घालून दिलेल्या एखाद्या पद्धतीनुसार समाजधारणा होऊ लागली (म्हणजे समाज त्या पद्धतीने आचरण करू लागला) तर त्याला तर्काचा व विज्ञानाचा आधार तर असेलच पण मनुष्याच्या मनाचा व संवेदनांचा विचार केला गेल्यामुळे ती जास्त नैसर्गिक, शास्त्रीय, चिरकाल टिकणारी आणि गुणवत्तेने सरस असे समाजघटक निर्माण करणारी असू शकणार नाही का?
अशा पद्धतीने निर्माण झालेली जीवनपद्धती ही कायमची असू शकणार नाही हे उघड आहे. कालौघांत नव्या येणाऱ्या धुरीणांच्या साहाय्याने परिस्थित्यनुरुप आवश्यक असे बदल तीमधे होत राहतीलच. दर नव्या पिढीतील तज्ज्ञांचा पूर्वसूरींशी केवळ त्यांच्या लिहून ठेवलेल्या साधनांद्वारे संबंध राहू शकेल. अशी शाश्वत पण प्रगत होणारी समाजव्यवस्था होण्यासाठी काय व्यवस्था असू शकेल? की केवळ आवश्यकता आणि त्यामुळे होणारी नैसर्गिक उत्क्रांती एवढेच शक्य आहे? अशा व्यवस्था समाजातील जास्तीत जास्त घटकांनी पाळाव्या.
वरील सर्व प्र नांना एकाच प्रकारची व अगदी बरोबर अशी उत्तरे अर्थातच असणार नाहीत. कदाचित् माझे प्र नही स्पष्ट नसतील. पण त्यावरील चर्चेने माझ्या (व कदाचित् इतरांच्याही) विचारांना चालना/दिशा मिळेल व माझेही प्रबोधन होऊ शकेल.
[केळकरांच्या बऱ्याच प्र नांना समाधानकारक आणि योग्य दिशा दाखवणारी उत्तरे विवेकवादातून मिळतात. पण त्यांच्या पत्रातल्या शेवटच्या भागात केलेल्या मागणी’ प्रमाणे चर्चेला आवाहन करीत आहे.] —– संपादक
श्याम कुलकर्णी, द्वारा श्री जयवंत कुळकर्णी, डी-५/४, सुंदर गार्डन, माणिक बाग, पुणे — ४११ ०४१

आजचा सुधारक चा मी पहिल्या अंकापासून वाचक आहे (वर्गणीदार म्हणत नाही कारण आ.सु. माझ्या पत्नीच्या नावावर येतो) व कधीकधी प्रसंगोपात्त त्यात लेखन करण्याचा प्रयत्नही मी केला आहे व माझे विचार ग्राह्य वा अग्राह्य वाटले तरी ते प्रकाशित झाले आहेत.
पत्र लिहिण्याचे कारण दि. १०-३-९४ ला माझी पत्नी आपल्या मासिकाची आजीव वर्गणीदार रु. चारशे फक्त भस्न झाली. माझ्या मते या सहा वर्षांत चारशे रु. पेक्षा जास्तच किंमतीचे अंक मला मिळाले आहेत व त्यांचे वैचारिक दृष्ट्या मूल्य ठरविणे फारच अवघड जाईल. असो! लिहिण्याचे कारण म्हणजे पुन्हा एकदा आजीव वर्गणीदार होणे आवश्यक आहे असे मला वाटते म्हणून सोबत रु. सहाशेवीसचा धनादेश (२० रु. वटनावळ) पाठवीत आहे.
[आम्ही हे पत्र ‘अमूल्य’ समजतो. स्नेहाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत नाही —- स्नेहादरानेच उत्तर देतो!
– संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.