नागपूर पत्रसंवाद

नाना ढाकुलकर, १७४, तारांगण, विवेकानंद नगर, वर्धा मार्ग, नागपूर–४४० ०१५ सीता जोस्यम्! एक प्रभावी परीक्षण
आजचा सुधारकच्या जून २००१ च्या अंकात ‘सीता जोस्यम्’ या नाटकाचा परिचय चास्ता नानिवडेकर ह्यांनी करून दिला आहे. श्रीमती नानिवडेकर यांच्या शेवटच्या अभिप्रायाशी ‘विचारप्रवृत्त करणारे हे नाटक मनाला उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद देते’ मी पूर्ण सहमत आहे. मी विचारप्रवृत्त तर झालोच पण लगेच कार्यप्रवृत्तही जालो. १९८० च्या सुमारास मी ‘रक्षेद्र’ (रावण) हे संगीत नाटक लिहून रंगभूमीवर आणले होते. आणि मी रक्षेद्र (रावण) ही ५०० पानाची कादंबरी लिहिली. (१९९७) माझा रावण शिवभक्त नीतिसंपन्न, वश न झालेल्या स्त्रीशी विवाह किंवा बलात्कार करीत नाही. सीतेला वश करण्याकरिता रावण सर्व प्रकारचे प्रयत्न करतो पण बलाढ्य असूनही सीतेवर बलात्कार करीत नाही. ह्या आणि इतरही कारणांनी सीतेच्या मनात रावणाविषयी भीतियुक्त आदर निर्माण होतो. मूळ वाल्मीकि रामायण वाचल्यावर वरील विधान बरोबर वाटेल. नार्लाचे सीताजोस्यम् हे मूळ वाल्मीकि रामायणावरच आधारित आहे.
सर्वसामान्य वाचकांसमोर, श्रोत्यांसमोर मूळ वाल्मिकी रामायण आलेच नाही, येऊ दिले नाही. कारण संस्कृत ही देवभाषा! आपल्यासमोर जे आले आहे ते पशू, स्त्री, शूद्र, ढोल ‘यह सब ताडन के अधिकारी’ म्हणणाऱ्या तुलसीदासाचे प्राकृत रामायण! आणि त्यावरच आधारलेली मराठी रामायणे. तुलसीदास पक्का मनुवादी ईश्वरवादी होता. त्याने रामाला विष्णूचा अवतार मानले. त्याचे बरेच उन्नयन केले. वाल्मीकीचा राम मात्र मानव आहे, धनुर्धारी आहे, कमालीचा आज्ञाधारक आहे. वाल्मीकीची सीता ही आधीपासूनच विचारी आहे, जाब विचारणारी आहे, परंतु कधीही आज्ञाभंग करीत नाही. पतीशी प्रतारणा करीत नाही. पतीला सोडून जाण्याची भाषा करीत नाही. उलट रामच तिला सोडून देण्याची भाषा करतो, अविश्वास व्यक्त करतो. वनवासाला निघताना सीता रामाबरोबर वनात येण्याचा हट्ट धरते. राम तिला म्हणतो की तिने अयोध्येतच भरत किंवा शत्रुघ्नासोबत राहावे. त्यावेळी ती फणकाऱ्याने म्हणते ‘भावाबरोबर नांदायला सांगता? मला माहीत नव्हते, तुम्ही इतके षंढ असाल म्हणून’. सीता जोस्यम् वाचल्यानंतर अंधश्रद्धाळू रामभक्तांना नालाचा संतापच येईल. परंतु तो ग्रंथ चिकित्सक बुद्धीच्या वाचकांना विचार करायला लावील. याच दृष्टीने वाल्मीकि रामायण अभ्यासल्यास त्यातील स्वभावचित्रणे व तुलसीरामायणातील स्वभाव-चित्रणे फार वेगळी वाटू लागतील. मनुवादी तुलसीदासाने सीतेला मूर्ख, हट्टी परंतु पतिपरायण दाखविले आहे. रावणाला अमानुष, दुष्ट क्रूर बलात्कारी दाखविले आहे. परंतु ‘वा. रा.’त तसे पुरावे नाहीत. वानर, ऋक्ष, वृषभ, मूषक, महिष इत्यादी अनार्य मानवसमूहांना जनावरे, दुष्ट राक्षस असे संबोधले आहे. परंतु वा. रा., जैन रामायण (पऊमचरिऊ), बुद्ध रामायण (लंकावतार सूत्र) यात वानर राक्षस वगैरे मानवसमूह विद्याधर श्रौतकर्मी मानले आहेत. सीताजोस्यमचे दुसरे प्रस्तावनाकार (दिवंगत) डॉ. आनंद साधले यांचा उल्लेख नानिवडेकरांनी केला नाही. त्यांचीही प्रस्तावना विचार-प्रवर्तक आहे. सर्व भाषेतील रामायणाचा अभ्यास केलेले डॉ. साधले म्हणतात ‘रावण हा पौरुषाचा पुतळा होता. त्याला दुष्ट, क्रूर, बलात्कारी संबोधणे चूक ठरेल’ (खाजगी पत्रव्यवहारात). याच दृष्टीने डॉ. साधलेंनी ‘राम रामायणे’ हा (लेखसंग्रह), आणि रावणाला उद्देशून ‘शत्रू असावा यासम हा’ हे काव्य लिहिले आहे. सीतेलाही नि चयी, विचारी असे संबोधले आहे. नालांनी तर आपल्या वाङ्मयात सीतेलाच अतिशय महत्त्व दिले आहे. या संदर्भात वेदपंडित श्रीपाद सातवळेकर यांचे वा. रा. चे मराठी भाषांतर अभ्यसनीय आहे.
जिज्ञासू चिकित्सक बुद्धीच्या वाचकांनी माझी रक्षेद्र (रावण) ही कादंबरीही वाचावी. तिच्यात कुठेही जादुई चमत्कृती किंवा अद्भुतरम्यता नसून वास्तववाद मांडला आहे. ती ललित लेखनकृती आहे, इतिहास किंवा अंतिम सत्य नव्हे. परंतु ज्यांना रामायण ऐतिहासिक सत्य वाटत असेल त्यांना माझी कादंबरी सत्याच्या जवळची वाटेल. मी ६०, ७०, वैदिक-अवैदिक विद्वानांचे संदर्भ घेतले आहेत.
आदिम काळी (आर्य आगमनापूर्वीच्या शैव संस्कृतीत, अनार्य संस्कृतीत) स्त्रीला विशेष महत्त्व होते. स्त्रिया विद्वान होत्या. नंतरच्या स्मृतिकारांनी स्त्रीला आणि अनार्यांना विकृत रंगविले. पुराणिक, प्रवचनकार, कथा कीर्तनकरांनी त्यांचीच री ओढली. आपण अजूनही त्याच मानसिक गुलामीत वावरत असतो.
[सीता जोस्यम’ हे पुस्तक कुठे मिळेल, असे विचारणारी अनेक पत्रे आली. ‘मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश, इस्लामिया बाझार, हैदराबाद–५०००२७’ ह्यांच्याशी संपर्क साधावा.]
केशवराव जोशी, तत्त्वबोध, चेक नाका हायवे जवळ, नेरळ (रायगड) — ४१० १०१

मे २००१ चा अंक मिळाला. अंड्यांच्या किंमती संबंधांत आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की, मधुमेहावरील औषध इन्सुलिन हे १९९० साली ३० रु. ला विकले जात असे. उदारीकरणाच्या धोरणानुसार हेच औषध परदेशी कंपनी १९९५ मध्ये ५० रु. ना विकू लागली. देशी कंपनी साहजिकच बंद पडली. आता परदेशी कंपनी तेच औषध २३० रु. ना विकत आहे. भारतीयांच्या परदेशी माल खरेदी करण्याच्या हव्यासापोटी देशी ३० रु. पेक्षा परदेशी ५० रु. चे औषध जास्त खपत असे. (टाईम्स — २८-२-२००१)
बहिरामपाड्यासंबंधात एक गोष्ट अशी की, दंगलीच्या वेळी जेव्हा पोलिसांनी छापे मारले तेव्हा दाऊद इब्राहीमचे लोक आणि शिवसेनेचे लोक एकाच घरात राहत असल्याचे आढळून आले. (टाईम्स —- ८-३-२०००) अशा घटना मराठी वर्तमानपत्रे ठळकपणे छापीत नाहीत. त्यामुळे धार्मिक द्वेष कायम राहतो.
पांडुरंग श्रीधर काकतकर, देऊळवाडा, पो. मालवण, जि. सिंधुदुर्ग

आजचा सुधारक चे बहुतेक सर्व अंक आधाशीपणाने वाचतो. चालू अंकातील ‘सनातन भूल’ हा लेख विशेष आवडला. महत्त्वाचे कारण म्हणजे श्री जोशी यांनी मांडलेले विचार वयाच्या पंधरासोळाव्या वर्षापासून गेली चौपन्न वर्षे माझ्याही मनात घोळत आहेत. त्या विचारांचा समर्थ आविष्कार श्री जोशी यांनी केला आहे; अगदी शीर्षकापासून सर्व लेखन सुसंगत वाटले. ‘सनातन’ व ‘भूल’ यांपैकी एकही शब्द मला सुचला नव्हता. पण मानवजातीला सर्वांत दीर्घ काळ युगानुयुगे गुंतवून ठेवणारा भ्रम हा शब्दमात्र माझ्या मनात घर करून राहिला होता. श्री. जोशी यांचे शीर्षक अधिक अर्थवाही वाटले.
दोन मुद्दे श्री जोशी यांच्या प्रतिपादनात ठाशीव स्वरूपात यायला हवे होते, ते असे —- १. ईश्वराचे अस्तित्व बुद्धीच्या कसावर सिद्ध होत नाही. भावनेच्या भरात काहीही सिद्ध होते, केले जाते. सामान्यपणे तथाकथित श्रद्धावान लोक असा दावा करतात की ईश्वर आहे. तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, न्यायी, निर्गुण, निराकार, भक्तवत्सल वगैरे आहे. ठीक आहे, मानून चालू. पण वरील वर्णनातील शब्द एकमेकास छेद देतात व शून्यच बाकी राहते! म्हणजे नेति नेति हेच वर्णन योग्य वाटते. ईश्वर, परमात्मा, देव वगैरे जो कोणी आहे तो दयाळू व न्यायी आहे, असाही दावा केला जातो. पण ईश्वर मानणाऱ्यांनाही मान्य करावे लागेल की लोकव्यवहारात विरुद्ध चित्र दिसते. तो दयाळू नाहीच पण न्यायी तर मुळीच नाही. तसा तो असता तर फाळणीनंतर निर्वासितांचे लोंढे भारतात का आले? त्यांचे पाप कोणते की ज्याची शिक्षा म्हणून त्या दयाळू परमेश्वराने नेसत्या वस्त्रानिशी त्यांना स्थलान्तर करून अनंत हाल, वेदना यांना तोंड देण्यास उभे केले? दाऊद इब्राहीमने बाँबस्फोट घडवून मुंबईतील तीनशे निरपराध माणसे मारली. तो दाऊद अन्यत्र पळून गेला व तिथे आरामात आहे. त्यावेळी दयाळू ईश्वर अंगाई करीत होता काय? तेव्हा दयालुत्व हा त्याचा गुण नाही. न्याय तो करू शकत नाही, कारण दाऊद त्याला विचारीत नाही! दैवो (नव्हे देवो) दुर्बलघातकः । सबळांच्या पाठीस लागण्याची त्याची हिंमत नाही.
विनायक राजाराम लिमये, मृगजळ, कुपवाड रोड, विश्रामबाग, सांगली — ४१६४१५

श्री. र. द. जोशी आणि श्री. लोकेश शेवडे यांच्या अनुक्रमे ‘सनातन भूल’ आणि ‘मला आस्तिक व्हायचे आहे’ (आ.सु., जुलै २००१) या दोन लेखांबद्दल त्या दोघांचे अभिनंदन. या दोन्ही लेखांचे एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे कुणालाही सहज समजेल अशा भाषेत ते लिहिले आहेत. श्री. जोशी यांनी, केवळ दैवी शक्तीच्या सहाय्याने चमत्कार करून दाखवणाऱ्यांना, आव्हान दिले आहे. मीही असे आव्हान देत आहे. फक्त दैवी शक्तीच्या मदतीने, कोणत्याही भौतिक साधनाचा वापर न करता, शून्यातून, कुणीही एक हत्ती अथवा एक हिप्पोपोटामस (चमत्कार करणाऱ्यास निवडीचे स्वातंत्र्य आहे.) मला निर्माण करून दाखवावा. मोठ्या मोकळ्या मैदानातील २००४२०० चौरस फूट जागेतच दैवी चमत्काराने हत्ती अथवा हिप्पोपोटामस निर्माण करून दाखवला पाहिजे. चमत्कार करून दाखवतो म्हणणाऱ्याची अंगझडती मी घेणार नाही. भौतिक शास्त्रज्ञ हजर असणार नाहीत. या प्रमाणे दैवी चमत्कार जो कुणी करून दाखवेल त्याला मी माझी सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता, जिची आजच्या बाजारभावाने किंमत ३५/४० लाखांपेक्षा कमी नाही, बक्षीस द्यायला तयार आहे.
सूचना चर्चेची सुसंगती साधण्याकरता हा अंक ४८ पानांचा केला आहे. पुढील अंक ३२ पानांचा असेल. – संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.