पत्रसंवाद

पत्रसंवाद
केशवराव जोशी, तत्त्वबोध, हायवे क्र. ३५, नेरळ (रायगड) — ४१० १०१
मला ताठ वागणारी माणसे आवडतात. राजवाडे नातेवाईकांकडे राहत नसत; कारण ते म्हणत, “लोकांकडे राहिले की, त्यांच्या मुलाचे कौतुक करावे लागते. परंतु पात्रता सिद्ध झाल्याशिवाय मला ते जमणारे नाही”. अण्णासाहेब कर्वे मुलाकडे चहा प्यायले, तरी कपात एक आणा टाकून जात. तत्त्वामध्ये थोडीशी जरी तडजोड केली तरी समाज घसरत जातो. म्हणूनच बेडेकर आणि रेगे यांचेपेक्षा मला दि. य. देशपांडे जास्त आदरणीय वाटतात. ईश्वर नाही हे ते स्पष्टपणे सांगतात.
दुर्गाबाई भागवतांनी लिहिले आहे की, “आद्य शंकराचार्यांनी ‘शांकरभाष्यात ज्ञानाच्या वरच्या पातळीवर ईश्वर नाही’ असे म्हटले आहे”. ही गोष्ट एकही संस्कृत पंडित अथवा विद्वान समाजाला सांगत नाही. ईश्वर मान्य केला की, धर्म आला; आणि मग सर्वच भेदाभेद आले. इंडिया टुडेच्या २०-०८-२००१ च्या अंकात त्यांनी केलेल्या लोकमताच्या पाहणीनुसार समाजाला ताठ वागणाऱ्या इंदिरा गांधी पंतप्रधान हव्या आहेत. अशाच एका ताठ वागणाऱ्या अरुंधती रॉय यांनी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या निवेदनाची माहिती त्याच अंकात आहे. सुप्रीम कोर्टाची बेअदबी झाली असेल तर त्याबद्दलची शिक्षा भोगण्यास त्या तयार आहेत. म. गांधीनंतर अशी भूमिका कोणीही ठेवलेली नाही. रॉय म्हणतात. “तहलका प्रकरणी चौकशी करण्यास सुप्रीम कोर्टाकडे न्यायाधीश नाही हे खोटे आहे. तसेच नर्मदा धरण प्रकरणी दिलेला निकाल चूक आहे. न्यायाधीश सुद्धा सत्ताधाऱ्यांकडे पाहून निकाल देतात आणि त्याविरुद्ध मी आवाज उठविणारच’.
[ताठ वागणे’ पुरेसे नाही. त्यामागील तत्त्वांना, विचारांना, शोधकवृत्तीलाही महत्त्व आहे अनेकदा ताठ वागण्यामागे विचार करणे संपल्याचा भाव असतो. जोशींनी सांगितलेल्या उदाहरणांमध्ये हे घडत नाही, पण ही शक्यताही असते, हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. — संपादक

श्री. गो. काशीकर, ११३, शिवाजीनगर, नागपूर — ४४० ०१० ।
आजचा सुधारकच्या सप्टेंबर २००१ च्या अंकात श्री. कृ. रा. लंके यांनी विवाहाने काय दिले ह्याबद्दलची श्रीमती मंगला सामंत यांची टिपणी उद्धृत केली आहे ती नि िचतच चिंतनीय आहे. परंतु त्यांनी ‘भयावह’ म्हणून ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यांपैकी काही (उदा.कुमारी-मातृत्व, अनौरस संतती इ.) ह्या विवाहसंस्थेने दिल्या असे म्हणण्यापेक्षा विवाहसंस्थेच्या योग्य अंमलबजावणीच्या अभावामुळे निर्माण झाल्या असेही म्हणता येईल. तसेच इतर काही ‘भयावह’ गोष्टींचे निराकरण विवाहसंस्थेत सुधारणा कस्न (उदा. विधवा-विवाह, स्त्रियांना समान अधिकार, इ.) केले जात आहे हेही लक्षात घ्यावयास हवे. विवाहसंस्था नसती तर अतिभयावह अशा काही गोष्टी निर्माण झाल्या असत्या हेही लक्षात घ्यावयास हवे. टी. व्ही. च्या ‘डिस्कव्हरी’ व ‘नॅशनल जिऑग्राफिक’ वाहिन्यांवर वन्यप्राण्यांचे नर-मादी व्यवहार पाहावयास मिळतात. त्यात मादीकरिता स्पर्धा करणाऱ्या नरांमध्ये रक्तबंबाळ होऊन जीवघेण्या मर्यादेपर्यंत क्रूर संघर्ष होताना दिसतात. विवाहसंस्था नसती तर असेच क्रूर संघर्ष मनुष्यप्राण्यांतही सर्रास चालू राहिले असते. इतर प्राण्यांत काही विशिष्ट काळांतच हे संघर्ष होतात पण मनुष्य-प्राण्यांत तशा नैसर्गिक मर्यादा नसल्यामुळे हे संघर्ष सतत होत राहिले असते. अशा स्थितीत मानवाने निरनिराळ्या क्षेत्रांत आज जी प्रगती केली ती करण्यासाठी त्याला उसंत तरी मिळाली असती की नाही ह्याची शंका आहे.
मनुष्यप्राणी निसर्गतः इतका दुबळा आहे की जर त्याला बुद्धीची देण लाभली नसती तर त्याला जगणेदेखील अशक्य झाले असते. मग आजची प्रगती दूरच राहिली असती. परंतु आपल्या बुद्धिसामर्थ्याने त्याने आपल्याभोवती अनेक संरक्षक व संवर्धक कृत्रिम रचना निर्माण केल्या व त्याद्वारे आपले सर्वश्रेष्ठत्व प्रस्थापित केले. निसर्ग ही जगनिर्मात्या शक्तीची कला आहे तर कला ही मानवाची निसर्ग प्रवृत्ती आहे. त्यामुळेच भाषा, वस्त्रे, घरे, शस्त्रे, समाजरचना, तशीच विवाहसंस्था इ. कृत्रिम रचना निर्माण झाल्या त्या संघर्ष टाळण्यासाठीच नव्हे तर अपत्यसंगोपन व वृद्धसंरक्षण यांसाठी देखील विवाहसंस्थेची गरज मनुष्यप्राण्याने फार पूर्वीच ओळखली असली पाहिजे व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती जगभर प्रस्थापित झालेली दिसते.
टीव्हीच्या ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर काही काळापूर्वी एका अत्यंत रानटी जमातीची, चित्रफीत दाखविण्यात आली होती. जवळजवळ नग्न अवस्थेत राहणारी, शेतीची कला अवगत नसलेली व वन्य शिकारीवर व नैसर्गिक उत्पन्नांवर उपजीविका करणारी ती जमात होती. परंतु आ चर्य हे की विवाहसंस्थेशी साधर्म्य दाखविणारी व्यवस्था त्यांच्यात निर्माण झालेली होती. विवाहसंस्था ही मानवी अधिकारांचे व स्वातंत्र्याचे हनन करणारी आहे अशा काहीशा समजुतीने पा चात्त्य देशांत ती आज बरीच खिळखिळी झाली आहे. परंतु हा खिळखिळेपणा आज तेथे चिंतेचा विषय बनला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सध्याचे अमेरिकेचे पराराष्ट्र सचिव श्री पॉवेल हे काही वर्षांपूर्वी भारतात आले असताना पत्रकारांशी बोलताना ते असे म्हणाले की अमेरिका आता एकमेव जागतिक सत्ता झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील आमची चिंता कमी झाली आहे; परंतु आता आम्हाला देशातील अंतर्गत प्र नांकडे –विशेषतः विवाहसंस्थेच्या पुनरुत्थानाकडे – अधिक लक्ष दिले पाहिजे. आजही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाकरिता उभ्या असलेल्या व्यक्तीची प्रतिमा ‘कुटुंब वत्सल’ स्वरूपाची नसेल तर त्याला निवडून येणे कठिण होते. भारतीय वंशाचे उद्योजक स्वराज पॉल यांना लॉर्ड किताब मिळाला तेव्हा इंग्लंडमधील भारतीयांनी त्यांच्या सत्कार केला. तेव्हा ते म्हणाले की भारतातील कुटुंबव्यवस्था ही आजच्या जगातील अनेक समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त व्यवस्था आहे व ती भारताची जगाला देण आहे.
ह्याचा अर्थ त्या व्यवस्थेत दोष नाहीत असे नाही. कोणतीच व्यवस्था परिपूर्ण नसते. त्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवावीच लागते. परंतु ती समूळ नष्ट करावी हे म्हणणे योग्य नव्हे. उद्या जैविक विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने काय होईल हे सांगणे कठिण आहे. परंतु आज तरी विवाहसंस्थेला पर्याय नाही असेच म्हणावे लागेल. असे असूनही ज्यांना विवाहसंस्था केवळ ‘भयावह’ परिणाम करणारी वाटते त्यांना माझी एक सूचना आहे. अशा सर्व व्यक्तींना आपला एक समूह कस्न आपल्या-मधून विवाहसंस्था पूर्णपणे बाद करून व सर्व वैवाहिक बंधने झुगास्न परस्पर व्यवहार करावेत व असा आठ-दहा वर्षे अनुभव घेऊन मगच ह्या विषयावर लिहावे.

देवदत्त दाभोलकर, सातारा
सज्न.– आ. सु.मधील चर्चांच्या संदर्भात:
१. उरळीकांचनचे कर्तृत्वशाली गांधीविचाराचे कार्यकर्ते मणीभाई देसाई यांनी सुमारे तीन दशकांपूर्वी मला सांगितले : “मी गांधीजींना म्हणालो, ‘तुमचा खादी-चरख्याचा आग्रह मला काही समजत नाही’. ते म्हणाले : ‘खादीमुळे गरीबाला जेवढे पैसे मिळतात तेवढे मिळण्याचा तू दुसरा कोणताही मार्ग शोधून काढ आणि तू चरखा मोडून टाकलास तरी माझी हरकत नाही’. मणिभाईनी पुढे सांगितले ‘बापूजी असे म्हणाले असे मी विनोबाना सांगितले तेव्हा विनोबा म्हणाले’, “असे, त्यांनी तर तुला चरखा तोडून टाकलास तरी चालेल म्हणून सांगितले. मी सांगतो, तू जाळून टाकलास तरी माझी हरकत नाही”.
२.खादीवरील माझी व्यक्तिगत श्रद्धा माझ्या देवावरील श्रद्धेप्रमाणे आहे. अस्तिकांसाठी मी नास्तिक आहे. नास्तिकांसाठी मी आस्तिक आहे. म्हणजे काय? मला समजले म्हणजे सांगेन.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *