स्त्री-हत्या: जैविक प्रतिसाद की सामाजिक मानसिकता?

आजचा सुधारक, ऑक्टो. २००१ मधील श्री. सुभाष आठले यांचा ‘स्त्री : पुरुष प्रमाण’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनगणनेनुसार समाजात स्त्रियांचे प्रमाण घसरण्याचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्त्रीहत्या आहे हे निर्विवाद. पण त्याची कारणमीमांसा करताना जनसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाल्यावर अबोध समाजमनाकडून केवळ जैविक प्रतिसादरूप असा स्त्रीहत्येचा निर्णय आपोआप घेतला जात असावा असे जे प्रमेय मांडले आहे ते मुळीच विवेकाला धन नाही. समाजातील स्त्री/पुरुष प्रमाणाचा नैसर्गिक समतोल ढळतो आहे. लेखक म्हणतात त्याप्रमाणे स्त्रीहत्या जैविक पातळीवर नैसर्गिकपणे घडून आली असती, तर हा समतोल बिघडण्याचे कारण नव्हते. परंतु नैसर्गिक समतोल बिघडतो, तेव्हा मनुष्य तो मुद्दाम बिघडवीत असतो; निसर्ग नव्हे.
आपल्या युक्तिवादासाठी लेखकाने प्राणिजगतातील जैविक पातळीवर होणाऱ्या घटनांची काही उदाहरणे दिली आहेत. परंतु त्यांनी स्त्रीहत्येचे समर्थन होऊ शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे प्राण्यांमध्ये जैविक पातळीवर हत्येचे जे अबोध निर्णय होतात, त्यांत निवड कधीच नसते. बोका पिल्लांना मारतो, ते नर किंवा मादी असे पाहून नाही. पक्षी अशक्त पिल्लाला मरू देतात, मग ते नर असेल किंवा मादी असेल. लेमिंग उंदरांपैकी फक्त माद्याच किंवा नरच सामुदायिक आत्महत्या करतात असे नाही. मनुष्येतर प्राणी कधीच नरमादी असा भेद करीत नाहीत. मनुष्यसमाजात जन्मजात मुलीची किंवा स्त्रीभ्रूणाची जी हत्या होते, ती हेतुपुरस्सर होते. एरवी केवळ स्त्रीचीच हत्या का व्हावी? हत्येसाठी स्त्रीची निवड मुद्दाम केलेली आहे. तिला जैविक पातळीवर नेऊन निरागसता दाखविणे चुकीचे आहे.

दुसरे असे की, जनसंख्या व पुनरुत्पादन आटोक्यात ठेवण्यासाठी जैविक पातळीवर स्त्रीहत्येचा निर्णय आपोआप होतो असे म्हणावे तर खरे तर तो पुरुषहत्येचा व्हायला हवा. कारण पुनरुत्पादनात स्त्रीपुरुषांचा सहभाग सारखा असला तरी पुरुषाची अपत्यनिर्मितीत गुंतवणूक स्त्रीपेक्षा फारच कमी असल्याने त्याचा पुनरुत्पादनाचा वेग स्त्रीपेक्षा कितीतरी जास्त असू शकतो. एका स्त्रीने एका बालकाला (जुळी-तिळी सोडावी) जन्म देऊन दुसऱ्यासाठी तयार होईपर्यंत कमीतकमी एक वर्ष जाते. पण पुरुषाला असे बंधन नाही. म्हणून एक स्त्री आपल्या हयातीत साधारणपणे १५ ते २० बालकांना जन्म देऊ शकते. पण आजही वेगवेगळ्या स्त्रियांपासून ५० च्या वर अपत्ये निर्माण करणारे पुरुष आहेत. म्हणजे जनसंख्यावाढीचा ‘धोका’ स्त्रीपेक्षा पुरुषाकडूनच अधिक आहे. म्हणून जैविक पातळीवर जर निवड व्हावयाची असेल तर ती पुरुषाची व्हायला हवी; स्त्रीची नव्हे. परंतु समाजात हत्या मात्र स्त्रीची होते. ह्याची संगती कशी लावायची? प्राणिजगतातील उदाहरण देताना लेखकाने असे म्हटले आहे की, जे अशक्त आणि तगण्यास असमर्थ पिल्लू असेल, त्याकडे प्राणी किंवा पक्षी दुर्लक्ष करतात व त्याला खुशाल मरू देतात. हा जैविक पातळीवरचा निकष जर मनुष्यप्राण्याला लावावयाचा असेल तर स्त्रीहत्या बाद ठरते. कारण हा जीवशास्त्राचाच सिद्धान्त आहे की, स्त्रीजातीत चिवटपणा (endurance) जास्त असून ती तगण्यास अधिक समर्थ आहे.

जैविक पातळीवरील निर्णय सर्व मनुष्यसमाजात सारखेपणे लागू पडताना दिसला पाहिजे. परंतु तसे घडत नाही. स्त्रीहत्येचा निर्णय भारतीय समाजासारख्या बुरसटलेल्या विचारांच्या समाजातच दिसून येतो व तेथेही लेखक म्हणतात त्याप्रमाणे संपन्न, सुशिक्षित, विवेकशील वर्ग या निर्णयापासून फटकून राहतो. हे कसे? पा चात्त्य समाजात अशा प्रकारची स्त्रीहत्या कधीच दिसली नाही. मागील काळात तेथे जन्मदर व जनसंख्या पुष्कळ असूनही अशी स्त्रीहत्या झाली नाही. मग तो समाज जैविक पातळीवर कार्य करीतच नाही असे मानावयाचे काय? या सर्व विवेचनाचा सरळ अर्थ असा की, भारतीय समाजातील स्त्रीहत्ये- मागे स्त्रीपुरुष विषमतेची सामाजिक मानसिकताच आहे. या विषमतेची पाळेमुळे समाजमनात इतकी खोलवर रुजली आहेत की, समाज जणू अबोधपणे तिला स्वीकास्न त्याप्रमाणे वागतो. परंतु ती जैविक पातळी नाही. ते वर्षानुवर्षे मनीमानसी भिनलेले विषमतेचे विषच आहे. आधी आपणच स्त्रीचे स्थान गौण करावयाचे आणि मग तिला गौण म्हणून नाकारीत जायचे असे अन्याय्य वर्तन भारतीय समाजाने वर्षानुवर्षे केले आहे. त्यामुळे भारतीय समाजाची ती दृढ मानसिकताच बनून गेली आहे. लेखक लिहितात की, समाज स्त्रीहत्येच्या बाबतीत भावनांची व नैतिकतेची कदर न करता अमानुष वागतो. कारण तो निर्णय जैविक पातळीवर घेतला गेला असतो. समाजाच्या अमानुष वर्तणुकीचा हा अन्वयार्थ लावायचा असेल तर हाच भारतीय समाज अत्यंत अमानुषपणे स्त्रीला सती जावयास भाग पाडीत होता त्या कृत्याचेही असेच समर्थन करता येईल.

म्हणून स्त्रीहत्येमागे स्त्रीपुरुषविषमतेची मानसिकताच आहे, आणि ही समाजाची मानसिकता बदलण्यावाचून गत्यंतर नाही. ही मानसिकता अशी घडली आहे की, अपत्यांमधील मुलीला जबाबदारी (Liability) व मुलाला लाभ (Asset) असे समजले जाते. जबाबदारी कुणालाही नको असते, लाभ हवा असतो. पण ही विचारसरणीच चूक आहे हे कोणी ध्यानात घेत नाही. मी लोकसंख्यादिनानिमित्त दै. हितवाद-मध्ये लिहिलेल्या लेखात (changing mindset of the people) हाच मुद्दा मांडला आहे. लोकांची मानसिकता बदलणे हे अत्यंत कठीण व संथपणे चालणारे काम असते. परंतु ते सोडून मात्र द्यावयाचे नसते. समाजाला चुकीच्या विचारापासून परावृत्त करण्याचे हे काम समाजातील विचारवंत व विवेकवादी व्यक्तींना सतत करावयाचे आहे. स्त्रीहत्या हा जैविक प्रतिसाद आहे, हे स्त्रीहत्येचे समर्थन नाही असे लेखकाला म्हणावयाचे आहे. लेखकाचा तसा उद्देश असो वा नसो, या प्रतिपादनाने ते समर्थन मिळतेच मिळते; जणु एक सूट मिळते. स्त्रीहत्येला असे खोटे समर्थन, अशी सूट मिळू नये.

*[पुरुषांची शुक्राणू घडवण्यांची क्षमता जास्त असते, पण तो ‘पुनस्त्पादनाचा वेग’ नव्हे! –संपादक]
११, श्रीविष्णु अपार्टमेंट्स, जीवनछाया ले-आऊट, दीनदयाल नगर, रिंग रोड, नागपूर — ४४० ०२२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.